होणार मूर्ख मी हे बघुनी

Submitted by बेफ़िकीर on 9 December, 2013 - 02:51

अतीश्रीमंतीने सजलेली घरे, मढलेल्या बायका, घरातही लग्नासाठी जमावे तसे सजलेले स्त्री-पुरुष, जनरेशन गॅप, कौटुंबिक नाट्य, रटाळ चित्रण, प्रत्येकाच्या चेहर्‍यावर कॅमेरा रेंगाळवून प्रत्येकाची रिअ‍ॅक्शन दाखवण्याची अविकसित बुद्धीमत्ता, टिपीकल कंटाळवाणी संवादफेक, चांगले असणारे फारच चांगले आणि वाईट ते फारच वाईट, रिअल लाईफमध्ये कधीही होणार नाहीत असे संवाद व त्यांचा वेग, ही सर्व गुण(?)वैशिष्ट्ये घेऊन मालिका अवतरतात.

मध्यमवयीन, ज्येष्ठ नागरीक व वेळ मिळेल तेव्हा काही स्त्री पुरुष या मालिकांवर जीव उधळतात. डोक्यात कुठेतरी सीमारेषा असते की ही एक काल्पनिक मालिका आहे आणि आपण वास्तवात जगत आहोत. काहींच्या बाबतीत ही सीमारेषा हळूहळू पुसट होऊ लागते. आपल्याही घरात असेच काहीसे आहे हे उगीचच पटायला लागते. नसलेल्या प्रश्नांची उत्तरे मालिकेमार्फत सुटतात का हे बघितले जाऊ लागते. मनोरंजन किंवा वेळ घालवणे या पलीकडे या ,मालिका जाऊन बसतात.

चीड आणणार्‍या ह्या मालिका काहींसाठी संध्याकाळचे ध्येय ठरते

त्यात पुन्हा जाहिराती वगैरे तर फारच महान!

या अश्या मालिकांमध्ये घडणारे नाट्य अद्भुत असू शकते. अपघात, अफरातफर, घरभेदीपणा, कौटुंबिक राजकारण, वाटण्या अन् काय काय! त्यात पुन्हा अगदीच 'घरेलू' स्वरुपाच्या मालिकांमध्ये तर जुने झालेले व त्यामुळे किंवा कश्यामुळे तरी ऑब्सोलेट झालेले संस्कार योग्य होते हे सिद्ध करणे यासाठी अहमअहमिकाच लागते. कोणीतरी वडीलधारी व्यक्ती म्हणजे जणू एकखांबी तंबू वगैरे असतो. त्याचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ!

नुकतेच काही कारणाने अक्षरशः 'होणार सून मी' या मालिकेचे सलग तीन भाग थोडेथोडे बघितले गेले. मोठी आई, बेबी वन्सं, जान्हवी वगैरे पात्र होती. ह्यात जान्हवीची आई अचानक जावयाकडून पैसे आणते व एक नाट्य घडते. नवरा बायकोला फोन करण्याआधी अनेकदा विचार वगैरे करतो. आत्ता हिचा मूड असा आहे, आत्ता हिला फोन करावा का? हिचा फोन का आला नाही? बरेच बरे नसेल का? मग ती कोणीतरी एक बेबी की कोण आहे तिने लावलेल्या शिस्तीमुसार त्या जान्हवीने वेळच्यावेळी 'उशीर होईल' असा निरोप न दिल्याने जणू घरातले सगळे चक्रच बिघडते. त्यावर विश्व रसातळाला जाणार असल्यासारखे चेहरे करून जो तो वाक्ये फेकू लागतो. मग माफीनामे, तेही अश्या टोनमध्ये की अगदी त्या बेबीपुढे लोटांगण घातल्यासारखे! फार तर काय, दोन पोळ्या अन् थोडीशी भाजी जास्त केली गेली असती किंवा करावीच लागली नसती. आठ दहा जण असलेल्या घरात, तेही इतक्या श्रीमंत घरात, त्याने असा काय फरक पडला असता? घरातली माणसे एकमेकांशी अजिबात ज्या पद्धतीने बोलत नाहीत त्या पद्धतीने ही पात्रे बोलत असतात.

आणखी कोणत्यातरी एका मालिकेत एक कोणीतरी घरातून निघून गेलेला असतो. त्याने त्याच्या मैत्रिणीला 'माझे बरेच नातेवाईक आहेत' असे काहीतरी सांगितलेले असते जे खोटे असते. ती तो घरी नसताना अचानक घरी प्रकट होते. मग तिला त्याचे म्हणणे खरे आहे हे पटावे म्हणून त्या तरुणाची आई, लहान बहिण, आत्या, वडील (बहुधा मोहन जोशी), मोठा भाऊ, वहिनी ही पात्रे एकामागोमाग एक उभी केली जातात. प्रत्येक पात्रासाठी हे नवीनच असल्याने त्या त्या पात्राच्या चेहर्‍यावर उमटलेले नवलाचे व धक्याचे भाव बघूनही त्या मुलीला एकदाही शंका येत नाही की लोक खोटे बोलत आहेत. मग ते इतके ताणलेले दाखवले की असे वाटले की टीव्हीच्या आत जाऊन त्या मुलीला गदागदा हालवून दोन थोबाडात लगावून विचारावे की अक्कलशून्य बये, तुला कळत नाहीयेका की ह्यांच्यातला कोणीही त्याचा खरा कोणीही नाही आहे वगैरे!

त्या होणार सून मध्ये परवा एकदा त्या नवर्‍याला जान्हवी विचारते की 'ए, मला तू ते (काहीतरी) सांगशील का?' हे विचारताना तिचा चेहरा असा झालेला असतो जणू दोघे नुकतेच प्रेमात पडलेले प्रेमवीर बागेत बसले आहेत आणि प्रेयसी विचारत आहे की तू मला कधी विसरणार नाहीस ना रे? त्यावर तो नवरा म्हणतो की नक्की सांगेन पण आधी डोके चेपून दे! मग तो पलंगावरून उतरून खाली बसतो आणि ती पाळलेल्या कुत्र्याच्या केसांतून हात फिरवावा तसे हात फिरवत स्वप्नील डोळे करून आढ्याकडे बघत राहते.

मध्यंतरी एका मालिकेत एका युवकाने आपल्या साहेबाला 'लिफ्टपाशी थांबलेल्या लोकांसाठी आरसे लावा म्हणजे ते कंटाळणार नाहीत' असा सल्ला दिला. तो सल्ला देण्यापूर्वी 'मी तुम्हा महान लोकांमध्ये बोलायला किती नालायक आहे' हे सांगण्यासाठी दहा वाक्ये खर्ची घात्रली. त्यात आगाऊ माफी वगैरे मागून घेतली. तेव्हाच पूर्ण खात्री झालेली होती की ह्याचे सजेशन साहेबाला पटणार. पण किती तो वेळेचा अपव्यय! त्या साहेबाला कोणी मंजिरी आवडत असते आणि तिचे उत्तर काय अशी पाटी असलेल्या जाहिराती गेले दोन दिवस झळकत आहेत. एव्हाना मंजिरीचे उत्तर काय ह्याची वाट न पाहता आजचा एखादा तरुण भलतीच्या प्रेमातही पडला असता च्यायला!

असेच एका मालिकेत कोणा एका तरुणाला मुलगी बघायला म्हणून तिच्या घरी घेऊन जातात. त्याचा कंप्लीट विरोध असतानाही! आणि अचानक त्याला ती मुलगी पाहून आवडते वगैरे! पण तिच्या मनात तसे काही नसते हे तर स्क्रीन बघणार्‍या प्रेक्षकांनाही समजते पण त्या बैलाला समजत नसते.

ह्या असल्या मालिका प्रेक्षकांना 'आपण काय बघावे' हे सुचवू तर शकतच नाहीत, पण तसा प्रयत्नही करताना दिसत नाहीत. अशी घरे नसतात, अशी नाटकी माणसे नसतात, अशी तत्ववादी, शिस्तप्रिय, जुनाट संस्कारांनी माखलेली धेंडे हल्ली नसतात, असे कोणी कोणाशी बोलत नाही हे लक्षात तरी घेतले जाते की नाही कोणास ठाऊक!

संभाव्य परिणामः

१. वेळ फुकट जाणे
२. अनावश्यक कथानकात गुंतल्यामुळे त्या कथानकानुसार बाकीची दिनचर्या किंवा तिचा काही भाग आखला जाणे
३. आपल्याकडे काही फार वेगळे चाललेले नाही असे काही जणांना वाटू लागणे व त्यातून बहकणे
४. अनुसरण केले जाण्याची शक्यता निर्माण होणे (मर्यादीत प्रमाणात)

शक्य असलेले उपायः

१. मालिका वास्तववादी असाव्यात
२. वास्तववादी मालिका बघाव्यात
३. मालिकांऐवजी बातम्या, चित्रपट, कॉमेडी शो, गाणी, स्पोर्ट्स चॅनेल्स बघावेत.

ह्या अश्या मालिका हिंदीतही अमापच आहेत.

तुम्हाला काय वाटते?

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

होणार सुन मी ह्या घरची च्या चालीवर होणार मुर्ख मी हे बघुनी म्हटले <<<

लवकर बघितलेत त्या मानाने त्या चालीवर म्हणून!

मी पाहू शकत नाही कोणतीच सिरियल फारशी.
का नाही चांगल्या सिरियल्स काढत हे लोक ? आणि मालिकेच्या लांबीवर काहीतरी निर्बंध असेल तरच तिचा दर्जा राहू शकतो..

अरे हजार मोदक!
असल्या इरिटेटिंग असतात या मालिका Angry
सातीला प्रचंड अनुमोदन! Sad

मी त्यापेक्षा डोरेमॉन, फिनिअस अ‍ॅण्ड फर्ब, टॉम अ‍ॅण्ड जेरी बघत बसते. ते लखपटीने चांगलं आहे याच्या पेक्षा!

बेफीजी,
काय बघायला/करायला/वाचायला आवडावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.

"मालिकांऐवजी बातम्या, चित्रपट, कॉमेडी शो, गाणी, स्पोर्ट्स चॅनेल्स बघावेत." >>> हे म्हणजे
दारू पिणार्‍याला, "बाबा रे ! दारूऐवजी दूध पीत जा हो." असे सांगण्यासारखे वाटते.

जो तो आपल्या आवडीनुसार वेगवेगळे चॅनेल्स पहात असतो.
माझं विचाराल, तर मी टीव्ही पहात नाही, मला तो दिसतो/ऐकू येतो इतकंच.
घरात टीव्ही चालू असताना मी माझी कामे करीत असतो, नेटवर भटकत असतो.

टीव्ही किंवा कुठलेही मनोरंजनाचे साधन आपल्यासाठी आहे, आपण त्याच्यासाठी नाही हे ध्यानात घेतल्यास दुष्परिणामांचा फारसा प्रश्न उरत नाही असे मला वाटते. अर्थात्, असे किती लोक वागू शकतात हा भाग अलाहिदा.

तुम्ही या लेखात विशेषत्वाने मालिकांबाबत लिहिले आहेत. पण क्रिकेट आणि इतरही खेळांचे चॅनेल्स तासन् तास बघणारे कित्येक लोक आहेत, त्यांचं काय ? तसेच जे नेटवर पडिक असतात त्यांचे काय ?
सद्ध्या नेटऐवजी स्मार्ट फोनसारख्या उपकरणांद्वारे WhatsApp, Viber इत्यादि Apps मधे काही लोक अती गुंतले आहेत त्यांचे काय ?

असो.... तुम्हाला जे म्हणायचे आहे ते लेखातून सहज स्पष्ट होतंय, लेख चांगला झालाय.

मीही मध्यंतरी ही मालिका पहायला लागलो होतो..(त्या दोघांचे लग्न होइपर्यंत)..त्यानंतर दर ५ मिनिटानी ती "मी किती नशीबवान आहे..मला किती चांगले सासर मिळाले" असे म्हणायला लागली, त्यात तिची आई आणि तिचा मामा यांची कारस्थाने इ. बघुन कंटाळा आला आणि थांबवले पहायचे.

या मालिकांवर उतारा म्हणुन काही इतर सीरीयल्सः
The Blacklist
Breaking Bad
Person of Interest
Poirot-->Highly Recommended
The Practice - Highly Recommended
Criminal Minds - Highly Recommended
The Big Bang Theory

माझ्या घरात तर सास-बहूच्या मालिका स्ट्रिक्टली बंद आहेत. अर्थात यामागे मुलं दिवसभर कार्टून चॅनल लावतात, त्यामुळे तिला ते पहायला मिळत नाही, हे कारण आहे. पण बायकोही मालिका बघताना लक्ष, सावधान इंडियासारख्या बघते. बाकी आई असली की मग ती तिच्या आवडत्या मालिका सोडत नाही. बाकी मी कॉमेडी शो, बातम्या आणि सिनेमे पाहतो.

बेफ़िकीर | 9 December, 2013 - 15:51 नवीन

बघा बघा, अवश्य बघा! मी फक्त माझ्याबद्दल म्हणालो, की होणार मूर्ख मी हे बघुनी! मी काय होणार हे ठरवायचा अधिकर तरी आहेच की मला?
<<

सहमत.
फक्त, टायटलात्ला भविष्यकाळ कशाला?

कालच एक एपिसोड चालू होता तो ऐकत व नंतर पाहात होतो. पहिली दहा मिनीटे त्या तीन बायका काहीतरी त्या बेबीच्या नियमांबद्दल बोलत होत्या. मग एक पुरूषी आवाज ऐकू आला - जुने रीसायकल्ड विनोद ("बायको म्हंटली बर्‍याच दिवसांत गेलो नाही अशा ठिकाणी जाऊ, तर मी तिला म्हंटले किचनमधे जाऊ" ई.ई), मागे "इथे विनोद झालेला आहे, हसा" असा क्यू देणारे टॉइंग, टूऊऊऊंग आवाज असे थोडा वेळ झाले. मग नंतर उरलेली दहा मिनीटे तो एक फोन - "तू गाडीने ये", "नको मी बस ने येते" हे सुमारे १०० वेगवेगळ्या पद्धतीने बोलणे. एकूण दोन मिनीटात होणारी चर्चा दहा मिनीटे चालवणे अशा पद्धतीने चालू होते सगळे.

मी त्यापेक्षा डोरेमॉन, >>>> त्यातल्या नोबिताचा आदर्श ठेवु नको म्हणजे झालं.

शॉन द शीप मस्तय. त्यातही हिन्दी डबिन्ग वालं नको बघु.
ओरिजिनल मध्ये नो डायलॉग.

सिरियल्सना नो नो.
सध्या मुलाला डिस्कव्हरी सायन्स वरच "हाउ इट इज मेड" बघायला आवडतं.
कार्टुन असतातच. ह्याच प्रमाण कमी करायच आहे.

सध्या एका लग्नाची तिसरी गोष्ट पाहिली जाते.
आणि कल्र्स वरची २४ देखील.

माझे ऑबझर्वेशन.
माझ्या ऑफीस मधले , ओळखीचे अनेक जण आणि जणी या सिरीयल बघतात, त्यावर चर्चा ही करतात. त्यांना सगळे डीटेल्स माहीती असतात. सिरीयल मधे किती मुर्खपणा दाखवतात हे बोलण्यात आपला वेळ खर्च करतात, पण न चुकता शेवटी असे म्हणतात, की "मै नही देखता रे, वो घरपे वाईफ और मम्मी देखती रहती है , तो फिर देखना पडता है'. जे मला अजिबात पटत नाही. किती तरी मुली, सासू आणि आई चे नाव देवून सिरीयल बघून वर आपण नाही हो त्यातले असा आव आणतात. खरोखर गरज आहे का?

तुम्ही जे डीटेल्स देत आहात, ते तुम्ही बघितल्याशिवाय तुम्हाला कसे कळतात. आणि एक भाग बघुनच जर अंदाज येतो तर मग पुढचे भाग का बघता? आणि शेवटी कन्क्लुडींग वाक्य 'अरे घरी होतो म्हणून बघितलं'

घरी टीव्ही आहे म्हणून बघितलाच पाहिजे असे काही नाही आणि चांगले पण कार्यक्रम असतातच.

सिरीयल जर स्टूपीड प्रूफ असतील आणि बघतही असाल तर मोकळ्या मनाने मान्य करा.

मी सी आय डी वर्षानु वर्ष बघते, घरी मला सगळे खूप चिडवतात त्यातील कॅरॅक्टर्स वरून. मला ही खुपशा गोष्टी पटत नाहीत , पण मला आवडतं बघायला. असं नाही म्हणणार की 'नवरा लावतो म्हणून बघाव लागतं'.

'होणार मूर्ख मी हे बघुनी' हे माहीत असुनही तुम्ही सिरियल्स बघता आणि त्यावर चर्चा ही करता. हे नाही पटत.

सिरीयल्स मधले प्रसंग शेअर करून तुम्हाला हसायला येत ना! मग सिरीयल्स आर रिअली एन्टरटेनिंग अ‍ॅन्ड यू आर एन्जोईंग

कुणालाही दुखवायचा हेतू नाही, मला जे वाटलं ते लिहिले.

सामी, बहुधा तुमचा गैरसमज झाला आहे. मी खरोखरच हे कधीच बघत नाही. बायकोने ह्या मालिका लावल्या की मी बाहेर तरी जातो किंवा मायबोलीवर येतो. पण गेले काही दिवस माझे सासू सासरे आमच्याकडे राहात आहेत. सासरे हॉस्पीटलमध्ये असताना त्या खोलीतील टीव्हीवर काही भाग बघितले गेले म्हणून खरे ते लिहिले.

Happy

बघायला आवडते तरी सांगायला लाज वाटते ह्या प्रकारात मी खरोखरच नाही. ह्याचा पुरावा म्हणजे मला प्रोफेशनल रेसलिंग (डब्ल्यू डब्ल्यू ई) बघायला खूप आवडते. ते गेली अकरा वर्षे मी फॉलो करत आहे. गेल्या वर्षीच्या आजारपणानंतर आणि क्राईम पॅट्रोल सुरू झाल्यापासून जरा कमी झाले आहे. मला त्यातील कथानके, एकमेकांवर उगवलेला सूड हे सगळे आवडते. खरे तर ती एक मालिकाच असते. खोट्या मारामार्‍या असतात हे माहीत असते, फक्त रक्त येते तेवढेच खरे असते. तरीही, त्या लोकांचा फिटनेस, त्यातील कथानके, ईर्ष्या, प्रेझेन्टेशन आणि प्रेक्षकांचा सहभाग हे सगळे बघायला आवडते. आवडत्या रेसलरच्या प्रवेशाला मिळणारी दाद पाहून नवलच वाटते. आणि हे सगळे सांगायला मला लाज वाटत नाही. Happy

याशिवाय काही लहान मुलांच्या हट्टामुळे कार्टून्स लावली गेली तेव्हा त्याचे काही भाग अर्धवटही बघून असे जाणवले की कार्टून्स कितीतरी सुपिरियर आहेत. कमाल वाटली त्या कल्पकतेची आणि प्रभावीपणाची. अर्थात, त्यामुळे त्याकडे आकृष्ट अजिबातच होऊ शकलो नाही, पण इम्प्रेस मात्र झालो.

बेफिकीर, मला वाटले की तुम्ही सुद्धा या सिरीयल बघता , चर्चा ही करता आणि 'होणार मूर्ख मी हे बघुनी' असे ही म्हणता.खूपच विसंगत वाटले म्हणून मला जे वाटले ते लिहिले. असो तुम्हाला दुखवण्याचा हेतु न्हवता. Happy

बेफिकीर पुरावे देऊ नका, फुकटचे काही लोकान्चे लक्ष्य व्हाल.:फिदी:

सामी गैरसमज करुन घेऊ नकोस, पण खरच या मालीका रद्दड आहेत. हो मधून मधून मी तुतिमी, विवाहब.न्धन, असावा टुकार स्वप्नान्चा बन्गला, राहीबा असल्या असन्तुष्ट मालीका बघत असते. ते नको म्हणूनच मायबोलीवर हो हम्मात सामिल होते. इथेही परत तीच राजकीय कुस्ती आणी दन्गल असते.:खोखो:

हे ही खरे आहे की साबा आणी साबु बघतात म्हणून मला बघावे लागते, नाहीतर मारुन मुटकुन डोरेमान, भीम तरी बघावेच लागते. मुलगी आता त्या येडपट नोबिताची नक्कल करायला लागलीय, पण तिला बाहेर खेळायला वाव नाही म्हणून मी सध्या लायब्ररी लावलीय, आणी पुस्तके वाचुन दाखवते( कारण लहान आहे).

या वरील सिरीयल मध्ये हेवेदावे, ईर्ष्या, लफडी_कुल.न्गडी, एकमेकीच्या झिन्ज्या ओढणे, कान भरणे इत्यादी धुडगुस राजरोसपणे चाललेला असतो तोच वैतागवाणा आहे.

सामी, काल मी बाजूच्या रूम मधे बसून काम करत असताना किंवा माबो/फेबु वर असताना की हॉल मधे हे चालू असलेले पूर्ण ऐकू आले. जेव्हा अचाटपणा जास्तच वाटला तेव्हा सरळ उठून टीव्हीसमोर उभा राहिलो व सिरीयल चा आनंद लुटला :).

अगदी १९८४ पासून मी दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहात होतो आणि त्यावेळी सादर करण्यात येत असलेल्या मालिकांना केवळ १३ भागांचीच अनुमती होती [खाजगी चॅनेल्सचा पूर आला नव्हता].... प्रक्षेपणही आठवड्यातून एकदाच.... त्यामुळे कथानक इतके बंदिस्त व्हायचे की अकारण त्यात पाणी वाढवून ढवळून प्रेक्षकांसमोर सादरीकरण होतच नव्हते. मालिका प्रभावी ठरत होत्या आणि ज्यावेळी त्या संपत त्यावेळी प्रेक्षकांना खूप वाईट वाटत असे. "बुनियाद" "ये जो है जिंदगी" आणि पुढे "रामायण" "महाभारत" पासून ५२ आठवडे हा रतीब सुरू झाला....आणि मग खाजगी वाहिन्यांचा धुडगूस सुरू झाल्यावर मालिकांवर कसलेच निर्बंध राहिले नाहीत हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले..... तरीही या मालिकां सार्वत्रिक पातळीवर का पाहिल्या जातात ?

तर त्याबाबतीत माझे निरीक्षण असे झाले की....ह्या कौटुंबिक मालिकांचा बहुसंख्य प्रेक्षक महिला आहे [ग्रामीण भागातही आहे]. स्त्रियांच्या पसंतीला उतरेल अशाच कथानकाची मांडणी करायला लेखक दिग्दर्शकाला चॅनेल कमिटीकडून सांगण्यात येते आणि मग तेही तसाच रतीब टाकण्यात वाकबगार होतात. कोणत्याही दोन मालिकांतील साम्यस्थळे शोधून काढता येतील आणि कलाकारांच्या रंगरंगोटी पोशाखाबाबतीतही टीमच्या सर्व्हतून दिसून आलेच आहे की ग्रामीण भागातील स्त्री वर्गाला तसल्या साड्यांच्या दागदागिन्यांच्या श्रीमंतीची उधळण पाहायला खूप आवडते. चॅनेल्सना जाहिरातीचे उत्पन्नही डोळे विस्फारून टाकणारे असल्याने मग असल्या कौटुंबिक मालिकांचा भरमसाट वाढ होतच राहाणार यात संदेह नाही.

बेफिकीर म्हणतात त्याप्रमाणे सर्वच मालिकांत मूर्खपणाची रेलचेल असते...हे मान्यच; पण तेही बघणारे लोक [स्त्री पुरुष] इतक्या प्रचंड संख्येने आहेत की मग चॅनेल्स मॅनेजमेन्टला तसलाच मसाला वापरायला काहीच अडचण येत नाही. मी स्वतः "होणार सून मी ह्या घरची..." ही एकमेव मालिका पाहतो....अन्य नाही. हिंदी इंग्लिश तर नाहीच नाही. "होणार....' पाहात असलो तरी सुरुवातीच्या काही प्रभावी भागांनंतर आज ती किती घसरत चालली आहे त्याचीही नोंद घेत आहे....नोंदवतही आहे मी तसे त्या धाग्यावर. असे असले तरी घरातील सर्वच लोक जर ती मालिका पाहात असतील तर मी त्याना न अडवता त्यांच्यासोबतीने शक्य तितका आनंद घेतोच त्यातील घडामोडीचा.

मालिका बघणे वा न बघणे....ह्या बाबी ना शहाणपणाच्या ना मूर्खपणा ठरविण्याच्या बाबी मानल्या जाऊ नयेत. टेलिव्हिजन म्हणजे एक कौटुंबिक घटक बनले आहे आणि त्या वरील कार्यक्रमांचा आनंद घेतला जाऊ शकतो. पूर्वी 'तमस' आणि "भारत एक खोज...." हे अत्यंत प्रभावी असे दोन कार्यक्रम मी एकटाच पाहात असे. कारण घरातील अन्य घटकांना त्यात रस नसे. पण मालिका मात्र सारे पाहातात म्हणून मी त्याना मूर्ख नाही म्हणू शकत...त्यानाही स्वातंत्र्य आहेच.

असो.

--

या सिरियल्स च्यावेळी कुणाकडे घरी गेलो कि घरातले काय वैताग आहे? अशा नजरेने पहातात. सिरियल बघायची चुकली की जस काही जगबुडी होणार आहे किंवा आयुष्यातली एक मोठी संधी गमवायची वेळ आली असे भाव असतात.

मी तर अशा सिरीयली लागल्या की सरळ जेवणाचे ताट उचलून वरच्या खोलीत जातो आणि पुस्तक वाचत किंवा कॉम्पवर एखादा सिनेमा बघत जेवतो. थोडक्या काळासाठी पण त्या सहन करणे माझ्यासाठी अशक्य असते.
पण अधून मधून बायकोला अरे तो श्री असा का वागतोय, जान्हवीची आई म्हणजे कहर आहे, असे मागतात का कुणी पैसै वगैरे डायलॉग मारतोच. त्यामुळे तिचा संशय आहे की मी घरी कुणी नसताना चोरुन या सिरेली पाहतो. तिला कशाला सांगू इथे अशोकमामांचे अपडेट्स त्या सिरेलीपेक्षा भारी असतात म्हणून. Happy

गंमत आहे.... गिळून सागराला, जाळीन् मी सूर्याला... अशा किंवा तत्सम कविता चालतात्, गझला टाळ्या मिळवतात. वास्तववादी असायची अपेक्षा फक्त नाटक, चित्रपट आणि मालिका यांच्या कडून !!

डॉ अशोक | 10 December, 2013 - 20:59 नवीन

गंमत आहे.... गिळून सागराला, जाळीन् मी सूर्याला... अशा किंवा तत्सम कविता चालतात्, गझला टाळ्या मिळवतात. वास्तववादी असायची अपेक्षा फक्त नाटक, चित्रपट आणि मालिका यांच्या कडून !!
<<<

फक्त वास्तववादीच असायची नव्हे, यडचाप नसायचीही अपेक्षा आहे. Happy

गंमत आहे हे खरे आहे. पण काय गंमत आहे हीसुद्धा गंमतच आहे.

Pages