आज रेसकोर्स वर

Submitted by हर्पेन on 22 November, 2013 - 03:01

गुढगे वाईट्ट्ट्ट्ट् दुखत होते, वाईट वाटत होते की आज आपल्याला धावता येणार नाही.
थोडेसेच अंतर धावलो रेसकोर्सवर. आज रेसकोर्सवर जास्तकरून फक्त चाललो.

धुक्याच्या दाट पट्ट्यातून चाललो....धुके हाताला लागतंय का ते पाह्यलं, ओलसर दमट हवेचे संथ खोल श्वास घेतले, सिगारेटच्या धुरासारख्या तोंडातून वाफा काढल्या.

गारठल्यामुळे जाडजूड झालेल्या साळुंक्या एकमेकांना चिकटून बसलेल्या पहिल्या, जोडीने उडणारे धनेश पाहिले. घोड्यांच्या टापांबरोबरच त्यांच्या श्वासाचेही आवाज ऐकले.

चाललो स्वतःच्या तंद्रीत, नादात, तालात. मनातल्या मनात म्हणत असलेली गाणी, नकळत जरा मोठ्यानेच गुणगुणलो, कोणी ऐकतंय असे कळल्यावर थोडासा कानकोंडा झालो आणि ऐकणारी मंडळी पुढे निघून गेल्यावर परत खुश्शाल मोठ्यानेच गायलो..

धावणाऱ्या माणसांच्या मागून येणाऱ्या पायरवावरून त्यांच्या आकारमानाचा अंदाज बांधला....कधी बरोबर ठरलो तर कधी पूर्ण चुकलो..

मित्रांबरोबर शेवटचे काहीतरी अंतर धावलोच, धावल्यावर गुडघेदुखी विसरून एकदम ताजातवाना झालो
मावळतीचा चंद्र फिकट, निस्तेज होताना पाह्यला आणि उगवतीला केशरी 'मार्तंड जे तापहीन' उगवताना...

गुढगे वाईट्ट्ट्ट्ट् दुखत होते, वाईट वाटत होते की आज आपल्याला धावता येणार नाही. थोडेसेच धावलो रेसकोर्सवर. आज पहाटे रेसकोर्सवर जास्त करून चाललो मी.

आज रेसकोर्स वर एक रात्र संपताना पाह्यली अन एक नवा दिवस उगवताना....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.