खेळणे

Submitted by वैवकु on 14 May, 2013 - 04:53

नियतीने सगळे डाव मांडले होते........

पाहिला करुन व्यापार नवा नात्यांचा
कर्मांची खेळुन सापशिडीही झाली
ते बुद्धिबळाने किती काटले शहही
नशिबाचे पत्तेही कुटले कितिदा मी

पण मन माझे त्या कशातही लागेना .....

मग मी म्हटले की नवे खेळणे शोधू
जे कुणाकडेही नसेल जगतामध्ये
की मला हवे ते तसे खेळता यावे
झेलावा त्याने शब्द शब्द तो माझा

जे मला पाहिजे तेच मिळाले आहे .....

जे मला पाहिजे तेच मिळाले आहे !!
मी त्याला घेवुन खूप खेळतो आता
मी कसे कथू केवढी मजा येते ती
की भूक-प्यासही विसरायाला होते

हा विठ्ठल घे अन् पहा खेळुनी तूही......

हे असे खेळणे कुठेच नाही मित्रा !!
हे असे खेळणे कुठेच नाही मित्रा !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जय हरी विठ्ठल|| श्रीहरी विठ्ठल.

पुंडलिका वरदे हरी विठ्ठल

बोलो हरी भक्त परायण श्री वैवकू महाराज की जय.

(कविता आवडली)

वैभव दारी आले-- मिळाले नवीन खेळणे
गंगा धारेत न्हाले--जमेल पेलणे खेळणे?
बेफिकीर ची झाले -- विठ्ठल- विठ्ठल जपणे
आनंदात चालले -- विजया विठ्ठल...
पराजया विठ्ठल-...
जय हरि विठ्ठल..जय हरि विठ्ठल...

अरे व्वा वैभव! खूपच सुंदर कविता.आकृतीबंधात असूनही यमकमुक्त.
विठ्ठलावर मुक्तप्रेम व्यक्त करणारी..

हा विठ्ठल घे अन् पहा खेळुनी तूही......

हे असे खेळणे कुठेच नाही मित्रा !!
हे असे खेळणे कुठेच नाही मित्रा !!

फार सुंदर!!

सुरुवातीस ही कविता आयुष्यावर खूप स्पष्ट आणि जरा रोखठोक भाष्य करते. दिसायला दिसत असतं, वाटत असतं की, हे आपलं आयुष्य आहे. ह्याचा एक हिंमतवान बाणाही असतो की, 'हे माझं आयुष्य आहे, मी ठरवीन काय करायचं, काय नाही वगैरे!' पण प्रत्यक्षात हा सगळा एक नियतीचा डाव आहे. तिच्याच सोंगट्या, मोहरे, तिचाच पट, तिचाच डाव ! आपण कधी नात्यांचे व्यापार, बाजार मांडतो.. कधी भल्या-बुर्‍या कर्मांचे जमाखर्च.. कधी बिकट परिस्थितींवर कुरघोडी करून विजयाचा आविर्भाव आणतो, तर कधी नशिब म्हणून होईल ते स्वीकारतो. काही लोक असे असतात, जे ह्या खेळात रमतच नाहीत. कारण त्यांना जाणवत असतं की, हे सगळं खोटं आहे. खरी ताकद दुसर्‍याच कुणाची आहे, माझी नाही. While I look like in control, I am rather being controlled..!
मग ह्या सगळ्या वैषयिक गोष्टींच्या पलिकडे जाऊन 'खर्‍या खेळाचा' शोध घ्यावासा वाटतो. तो खेळ म्हणजे दुसरं तिसरं काही नाही.तो खेळ, ते खेळणं म्हणजे ती शक्ती जी ह्या सगळ्यामागे आहे. जिचं नाव प्रत्येकासाठी वेगळं आहे. इथे, कवीसाठी ते नाव 'विठ्ठल' आहे.

इथपर्यंत, हा विचार तसा नवा नाही. अनेकांनी, अनेक वेळा मांडला आहे. पण इथून पुढे 'वैभव' दिसतो.
तो म्हणतो -

"हा विठ्ठल घे अन् पहा खेळुनी तूही
हे असे खेळणे कुठेच नाही मित्रा !!"

विठ्ठला'शी' खेळ नव्हे, तर 'विठ्ठल' खेळ, असं इथे तो सांगतो. हा विचार इतका खोल आहे की हरवून जायला होईल..

हॅट्स ऑफ वैभवा.. हॅट्स ऑफ..!!
हे झालं आशयाचं वेगळेपण. पण मांडणीही वेगळीच आहे! यमकरहित वृत्तबद्ध !! जब्बरदस्त्त !

एक तुझा -

ऐक ना आता स्वतःला विठ्ठला
लाव ना माझा लळा तू लाव ना !

हा शेर.. आणि एक तुझी ही कविता...
आयुष्यात विसरणार नाही रे..!
अफाट....... निव्वळ अफाट !!

भारतीताई, विक्रांतजी, जितू खूप खूप आभार
__________________________________________
जितू विशेष धन्स
सुंदर व नेटके रसग्रहण केलेस (रसप हे नाव सार्थ आहे बघ तुझे काव्य'रस' पीतो तो रसप जसे मध पीतो तो मधुप :))

माझे एखादे काव्य /शेर जेव्हा कुणाला तरी इतके आवडते तेव्हा मी जाणून असतो की हे आवडण्यामागचे कारण हेच की त्या व्यक्तीला मुळात विठ्ठलच तितका आवडत असणे होय !! ...आणि हीच गोष्ट मला फार सुखावून जाते

ही कविता छान आहे खरीच पण् तिला आहे त्यापेक्षाही सुंदर करून पाहणे हा तुझा असाधारण सौंदर्यबोध आहे
मला नेहमी वाटतं माणसाचं असच असतं तो देवालाही आहे त्यापेक्षा प्रेमळ कृपाळू सर्वशक्तिमान वगैरे वगैरे करून पाहतो सुंदर करून पाहतो
माझा एक शेर आठवला ...

पांडुरंगा त्यास का म्हणताय लोकांनो
विठ्ठलाचा रंग तर काळाच आहे ना !!

वरील कवितेत त्या जगाला खेळणे म्हणून पाहणार्‍या विठ्ठलालाच खेळणे करून पाहिले आहे
आणि हा एक जगावेगळे खेळणे आहे हे तूही खेळून पहा असे सांगायचा प्रयत्न केला आहे जसे आपण मित्र लहानपणी खेळणी शेअर करतो तसेच
यामागे विठ्ठल जसा म्हणून ज्या रूपात म्हणून मी कविता करताना अनुभवला तसाच तो इतरानाही अनुभवायला देणे हा मनसुबा आहे ... त्याना त्याच्याशी स्वतः खेळून पाहिल्यावर माहीती पडेलच

या मागचा माझा एक शेर असा होता ....

अरे जा ना विठ्या पिच्छा पुरवशील केवढा माझा
किती करतात येथे शायरी बघ चांगली दुसरे

ही कविता निर्यमक असणे हे तुझ्या गेल्या काही दिवसातील कविता वाचून माझ्या हातून झालेले धाडस आहे फक्त

ही कविता वृत्तबद्ध असणे हा माझ्या मेंदूतील एक दोषच असावा आजवर मला सुचा म्हटल्यावरही मुक्तछंदात ओळी सुचल्याच नाहीत कधी

शेवटच्या ओळीत मित्रा हा शब्द मला सुचला त्या क्षणी माझ्यापुढे तूच आलास हे मला तुला उघडपण सांगायचे आहे जितू Happy
आणि पहा ना माझी ही साद तुझ्यापर्यंत पोचलीही आहे !!!

एक माझाच शेर आठवला ....

सोड चिंता की कुठे पोचेल हा नद भावनांचा
शायरा तू शेर कर बस पावणारा पोच देतो !!!

धन्स मित्रा !!
______________________________________________-
सर्वांचे खूप खूप आभार !!

लोभ असूद्यात
~वैवकु Happy