विदर्भातले 'बेडे' नव्हे 'केळ'कर (फोटो सहित)

Submitted by मंजूताई on 20 March, 2013 - 10:42

एखादा पदार्थ कसा खावा त्याचे काही संकेत, नियम पद्धती असतात. चुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र आवाजा करीत इतरांच्या टेबलापाशी येणारा सिझलर्स हा पदार्थ खूप खायची इच्छा असूनसुद्धा कैक दिवस खायचं धाडस केलं नव्हतं केवळ ते कसं खायचं माहीत नसल्यामुळे. समोरच्या टेबलावरचे कसे खातात हे बघणं शिष्टाचारसंमत नसूनसुद्धा एकदा चोरून कोणी बघत तर नाहीन हे बघून समोर बघण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. अखेर आपण जसे इतरांकडे बघत नाही तसे इतरही आपल्याकडे कशाला बघायला बसलेत विचार करून खाऊनच पाहिला चूर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र आवाजातला सिझलर्स! हॉटेलात मोठा 'आ' वासून बर्गर खाण्याचं धाडस अद्याप केलं नाही. हे झाले हॉटेलातले पदार्थ. भाजलेले दाणे डब्यातून मूठभर घेऊन, कच्चा चिवडा कागदावर घेऊनच खायची मजा येते ती वाटी चमच्याने खाण्यात नाही. 'बोरकुट' बोरकुट कसे खावे? बोरकुट खायची मजा ते तळहातावर घेऊन जिभेने मांजरासारखे चाटून खाण्यातच; आणि ते तसं खाताना बघून समोरच्याच्या तोंडातून लाळ टपकलीच समजा, पण ती टपकणं शक्यच नाही कारण बोरकुट ही एकट्याने खायची चीजच नाही. तसेच हे बोरकुट काही दुकानातून विकत आणून खायची गोष्ट नाही आणि ते दुकानात मिळते की नाही हेही माहीत नाही पण बोरकुट हे विकत घ्यायचे ते शाळेच्या समोर बसणार्‍या गाडीवाल्या/टोपलीवालींकडूनच ...मधल्या सुट्टीत. पण आज शाळेच्या समोर उभ्या असणार्‍या गाड्या पूर्णपणे कालबाह्य झाल्या असं म्हणता येणार नाही सरकारी, नगरपालिकांच्या शाळांसमोर दिसतात. काळाप्रमाणे बोरकुटानेही आपले रूप बदलले अन चांगल्या रंगबेरंगी आकर्षक वेष्टनात दुकानात दिमाखाने विराजमान झाले एवढेच नाहीतर ते सातासमुद्रापार मॉलमध्येही जाऊन पोचले. ह्या बोरकुटाचा ,कायापालट, हातगाडी ते मॉल हा प्रवास व प्रतिष्ठा मिळवून देणारे उद्योजक आहेत श्री अरुण केळकर. नागपुरात आल्यापासून गेली पंचवीस वर्षे 'केळकर' राजमलाई, बोरकुट व वर्‍हाडी ठेचा खातोय. भाची होमियोपॅथीचे औषध घेत असताना चॉकलेट व्यर्ज होते, तिच्यासाठी मग चॉकलेट ऐवजी राजमलाई आणली जायची. मुलांच्या सहलीसाठी वेफर्स, चिवड्याबरोबर बोरकुट हवेच असायचे. अश्या ह्या रोजच्या खाण्यातले पदार्थाचे जनक 'केळकर' पण स्थानिक वृत्तपत्रात मात्र त्यांच्याविषयी काही वाचण्यात आले नव्हते कारण त्यांची प्रसिद्धी परामुखता. रेल्वेने नागपूरहून पुण्या-मुंबईला जाताना वर्ध्याच्या पुढे दहेगाव स्थानकाजवळ हा छोटा कारखाना दिसतो. दहेगाव छोटंसं हजार वस्तीचं खेडं. अश्या ह्या खेड्यात ८० साली आपला व्यवसाय सुरू करणार्‍या अरुण काकांशी अचानक भेटीचा योग आला अन मनमोकळ्या गप्पा झाल्या.

प्रश्न: मला कुतूहल आहे ते एखादा माणूस बोरकुटाचा व्यवसाय करावा असा विचार कसा काय करू शकतो आणि आज तो एक ब्रँड बनतो?

अरुणकाका: आज तो एक ब्रँड झालाय त्याला प्रतिष्ठा मिळाली म्हणून आज मला हा प्रश्न विचारताहेत. पण खरं सांगू का इतरांच सोडूनच द्या, माझ्या पत्नीलाही मी काय कचर्‍याचा धंदा करतोय असं वाटतं होतं पण त्याचबरोबर तिचा माझ्यावर विश्वासही होता म्हणून विरोध केला नाही, मला बरोबरीने साथ दिली. इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते एक कायमस्वरूपी सरकारी नोकरी सोडून धंदात उतरणं निश्चितच धाडसी निर्णय होता. माझ्या वडिलांचा तूप - लोण्याचा व्यवसाय होता. आजूबाजूच्या खेड्यांमधून शेतकरी लोणी घेऊन यायचे त्याबरोबर बोरकुट आणायचे. आणि मला बोरकुट अतिशय आवडायचे. बोरांचा मोसम फक्त संक्रांतीच्या सुमारास असतो बाकी बोरं फारशी खाल्ल्या जात नाही. वाळवून उकडूनही खाल्ल्या जातात पण ती खूप दिवस टिकत नाही. मुलांना त्यांच्या आवडीची बोरं वर्षभर खाता यावीत ह्या उद्द्येशाने हा व्यवसाय सुरू केला. .

प्रश्न नोकरी सोडून धंदा करण्यापाठीमागे काय विचार होता? सुरुवातीला प्रतिसाद कसा होता?

अरुणकाका: मी आधी म्हटल्याप्रमाणे आमच्या घरी लोणी - तुपाचा व्यवसाय होता. आमची अकोला, अमरावती, नागपूर व जबलपुरामध्ये आठ दुकानं होती. आमच्याकडे अडीचशे गायी होत्या. कणीदार रवाळ ही आमच्या तुपाची खासियत! धंदा जोरात सुरू होता. माझ्या वडिलांना वाटायचे की चॉकलेटला भारतीय पर्याय असावा.दुधाचे पदार्थ जास्त काळ टिकत नाही. त्यांनी अनेक प्रयोग केले. आमच्याकडे येणार्‍या लोकांच्या हातावर रोज नवीन प्रयोगातून तयार झालेला पदार्थ ठेवला जायचा. अंतिमः १९३७मध्ये 'राजमलाई' बाजारात आली. मधल्या काही महायुद्धाच्या काळात लिक्विड ग्लूकोज आयातीवर बंधनं होतं त्यामुळे उत्पादन करू शकलो नाही पण नंतर १९७३ पुन्हा माझ्या भावाने राजमलाई बनवणे सुरू केले. आमच्या उत्पादनांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्यात टिकाऊपणासाठी कुठल्याही प्रकारचे रासायनिक घटक नाहीत.पण आमची राजमलाई वर्षभर टिकते. तर असा घरचा व्यवसाय होताच व थोडीफार शेती होती. मॅट्रिक झाल्यावर मी नागपूरला शिकायला आलो. शिक्षणात मन रमलं नाही. त्या काळी मॅट्रिकच्या भरवशावर टेलिकम्युनिकेशनमध्ये नोकरी मिळाली अन इंदोरला रुजू झालो. पण नोकरीत मन रमेना. माझी वृत्ती संशोधकाची होती. काहीतरी वेगळे करावेसे वाटत होते. मन अस्वस्थ होते. १९७६ मध्ये सहा महिने रजा घेऊन दहेगावला आलो. वडील आम्ही त्यांना काका म्हणायचो 'मिसा' अंतर्गत अटकेत होते. माझी आई व भाऊ प्रकाश सत्याग्रहात सक्रिय होते. माझं नावही काळ्या यादीत होतं. तेव्हा आणीबाणी असताना कशी काय जाणो मला सुट्टी मिळाली होती. मला आजही त्याचे आश्चर्य वाटते. नशिबाची साथ होती म्हणायचे! आर्थिक परिस्थिती बेताची पण थोडीफार शेती व जागा त्यामुळे इथे (दहेगाव) काहीतरी आपल्या नक्कीच करता येईल अशी खात्री पटली. वर्षभर धंदा करून बघायचा नाही जमलं तर परत इंदोरला जायचं. भावाचा राजमलाई करण्याचा व्यवसाय होता. पण मला वेगळं काहीतरी करायचं होतं. मसाले व बोरकुट तयार करायचं ठरवलं. त्या वेळेला नफा - तोट्याचा, मागणी - पुरवठा असा कुठलाही हिशोब मांडला नव्हता, खूप पैसा कमावायचा हा उद्द्येश नव्हता वेगळं काहीतरी करायचं, स्वतःचा व्यवसाय करायचा एवढाच एक विचार मनात होता. ऊर्मी, तीव्र आंतरिक इच्छा असेल तर संकटांना व अडचणींना तोंड देता येतं किंबहुना असं म्हणेन की आत्मविश्वास येतो 'लाथ मारेन तिथे पाणी काढीन' ! सुरुवात मसाल्यापासून झाली. त्याला नाव दिलं 'तेज मसाला' आम्ही घरीच मसाला कुटायचो. माझ्या पत्नीने वर्धेत घरोघरी जाऊन मसाला विकला. त्यावेळी वर्धा मोठं खेडंच. घरोघरी मसाले व्हायचे. मसाल्याची प्रत्येकाच्या घरची अशी एक विशिष्ट चव अन पद्धत असते बनवायची. कोणी विकत घेईना. त्या काळी आजच्या सारखं 'फ्री' काही मिळत नसे पण आम्ही लोकांना चव कळावी म्हणून 'फ्री' मसाला द्यायला सुरुवात केली पण विक्रीत फारसा फरक पडला नाही. नावात काय आहे? म्हणतात नावातच सगळं काही आहे म्हणूनच आज ब्रँडचा जमाना झालाय. 'तेज मसाला' चे नामकरण ' मटण मसाला' केलं अन चित्रच पालटलं! त्यानंतर बोरकुटाचं उत्पादन घरीच सुरू केलं. मी सुरुवातीला शाळेच्या समोर पुड्या विकत असे अन उरलेल्या दुकानात ठेवून देत असे, विकल्या गेल्यावर मग पैसे मिळत. वर्‍हाडी ठेचा, लोणची अशी एकेक उत्पादन वाढवत गेलो. ठेचा साधारणपणे हिरव्या मिरच्यांचा बनतो पण आम्ही लाल भिवापुरी मिरच्यांचाच बनवतो. आमच्या उत्पादनांची विशेषता म्हणजे टिकाऊपणासाठी ह्यात शक्यतो हानिकारक रासायनिक घटक टाकत नाही. क्वचित प्रसंगी आवश्यक वाटल्यास 'ए' ग्रेड प्रिझर्र्वेटीव्हज वापरले जातात. बोरकुट व वर्‍हाडी ठेच्यात मात्र अजिबात वापरले जात नाही.

प्रश्न व्यवसाय काय नोकरी काय अडचणी ह्या असणारच त्याचबरोबर स्पर्धाही आलीच त्यावर कशी मात केली? ती मात करण्याची ताकद कोणती?

अरुणकाका: हो, अडचणी ह्या असणारच! पण तुम्ही त्यावर विचार केलेला असतो, त्यावर उपाययोजनेचाही विचार केलेला असतो, तर फार कठीण जात नाही. काही वेळेला काल्पनिक भीती असते. मी आधी म्हटल्याप्रमाणे मला आणीबाणीच्या काळात सुट्टी मिळाली, ती मिळणार नाही ही माझी काल्पनिक भीती होती. मी खरं सांगू, व्यवसाय करायचा ठरवल्यावर माझी पत्रिका अगदी जाणकार ज्योतिष्यांना दाखवली होती. काही जण म्हणाले यशस्वी होणार नाही तर काही म्हणाले तुझ्या भविष्यात तू व्यवसाय करशील हे लिहिलेलंच नाहीये. माझा निर्धार पक्का होता. आज माझं वय ७१ वर्ष आहे, मी सतत काम करत आलोय. जे काही काम करतोय ते मला उत्कृष्ट कसं करता येईल हाच माझा ध्यास होता. ह्या कामाने मला जेवढं शिकवलंय तेवढं कोणताही गुरु ,आई-वडील शिकवणार नाही. 'कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषू कदाचन' नाव, प्रतिष्ठा मान, सन्मान, पैशाचा कधी विचारच केला नाही, नाही करतोय त्यामुळे मला कुठल्या स्पर्धेत उतरायचं नव्हतं. आमच्या उत्पादनाची आम्ही फारशी जाहिरात करत नाही. विक्री होते ती मॉऊथ पब्लिसिटीनेच! मला मुख्य हवे होते जॉब सॅटीसफॅक्शन, मी जे काही सचोटीने करतो आहे, ते करण्यात समाधान, आनंद मिळावा. आणि हे नक्की मिळतं जेव्हा तुम्ही करत असलेल्या कामाशी एकरूप होता, तेव्हा! ते ओझं न राहता जगणं बनतं! मला ह्या धंद्यात किती नफा झाला ते सांगता येणार नाही पण मी आज शंभर टक्के समाधानी आहे, हे आवर्जून सांगू इच्छितो. काही अडचणी आहेत त्याला सरकार जबाबदार आहे. सरकारची उदासीनता! गावामध्ये उद्योगधंदे यायला पाहिजे ज्यामुळे शहराकडे लोकं जाणार नाही हे खरंय पण वीज कोण देईल? चोवीस तासांपैकी फक्त आठ तास वीज असते सोळा तास गायब. इथल्या तापमानाचा फायदा असा आहे की बोरकुट उन्हात वाळवू शकतो त्यासाठी यंत्रे वापरायची गरज नाही तसाच तोटाही आहे अती उष्ण हवामानामुळे कैर्‍या, मिरच्या खराब होतात, हे असे काही पदार्थ टिकवण्यासाठी वातानुकूलित व्यवस्था आवश्यक आहे.

प्रश्न बालपण, शिक्षण, घरचं वातावरण संस्कार ह्याबद्दल काय सांगाल?

अरुणकाका: माझं बालपण इथे दहेगावातच मजेत गेले. आमच्या घरचं वातावरण धार्मिक, श्रद्धाळू. माझे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी सहावेळा तुरुंगवास भोगलाय. त्यामुळे अर्थात संस्कार संघाचेच. शिस्तबद्धता, नियमितपण, नीतिमत्ता, स्वावलंबन अंगात भिनलेली. माणुसकीवर नितांत श्रद्धा! जातपात, स्पृश्य - अस्पृश्य, धर्मभेद नव्हता. आमच्याकडे विहीर होती म्हणजे अजूनही आहे. गावातल्या लोकांना माझे वडील सकाळी उठून पाणी काढून द्यायचे. एक दिवस ते आपल्या आईला म्हणाले की ही विहीर मी सगळ्यांसाठी खुली केली आणि जर तू त्या विहीरतले पाणी प्यायलीस तर गावातले इतर लोक विरोध करणार नाहीत. आणि खरोखरचं माझी आजी ते पाणी प्यायली आणि सगळ्या जाती धर्मासाठी ती विहीर खुली झाली. दहेगावला फक्त पॅसेंजर गाड्या थांबतात. रात्री अकरा वाजता येणार्‍या भुसावळ पॅसेंजरने येणारी लोकं रात्री आमच्याकडे मुक्काम करायची व सकाळी चहा पिऊन आपआपल्या गावी जात. आम्ही व्यवसाय सुरू केल्यावर घर केलं ते वर्धेत कारण इथे आमच्या दोन मुलींबरोबर भाच्या पुतण्याच्या शिक्षणाची सोय होईल म्हणून. माझं हायस्कुलंच शिक्षण वर्धेत झालं. तीन विषयात डिस्टिंक्शन मिळवून दहावी पास झालो. पुढच्या शिक्षणासाठी नागपूरला आलो पण ते काय झालं देव जाणे जमलं नाही. आजही मनात ती एक खंत आहे, आपल्याजवळ डिग्री नाही. त्यामुळे काही अडलं नाही, त्या डिग्रीचा आणि व्यवसायाचा संबंध वा उपयोग असतोच असेही नाही पण ती हवी होती हे नक्की. भिंतीवर टांगायला ते सर्टिफिकेट हवे होते मला!

प्रश्न इतर कामा व्यतिरिक्त इतर काही छंद?

उत्तर मला ऐतिहासिक पुस्तक वाचायला आवडतात. इतरही वाचतो. आवडता लेखक 'पुल'. मरगळ दूर करायची असेल तर पुलंच कुठलंही पुस्तक काढावं अन वाचावं. मन प्रफुल्लित होते.मी किसान सभा, भाजपांच्या कामात सक्रिय भाग घेत असतो. सामाजिक कार्यक्रमात भाग घ्यायला आवडतो.

प्रश्न तुम्हाला किंवा उद्योगाला काही बक्षीस पुरस्कार?

उत्तरः आमच्या उद्योगाला दीनदयाल शोध संस्थेचा पुरस्कार मिळाला जिल्हा स्तरीय उत्कृष्ट उद्योगाचा पुरस्कार मिळालाय. अनेक थोर व्यक्तींनी ह्या उपक्रमाला भेट दिली. अटलबिहारी वाजपेयी, अडवाणी, नानाजी देशमुख ही त्यापैकी ठळक व्यक्तिमत्त्वे. नानाजींच्या कल्पनेतला/विचारातला उद्योग मी करतो आहे हे पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. आमच्या इथले काही लोक चित्रकुटला गेले अन तिथे त्यांनी ह्याच धर्तीवरचा कुटीर उद्योग उभारून दिला.

प्रश्न भविष्यातला योजना?

उत्तर: एक डायनिंग टेबला सूट होईल असं एक स्प्रेड बनवायचं. खूप दिवसांपासून प्रयोग सुरू आहेत. आम्ही खूप वर्षांपासून इथे प्रत्येक वर्षी डिसेंबरच्या शेवटच्या रविवारी हुरडा पार्टी करतो. ह्या पार्टीकरिता आम्ही मुद्दाम दादर ज्वारी व स्वीटकॉर्नची लागवड करतो. आजूबाजूच्या गावातले, नागपूरमधले मित्रमंडळी, नातेवाईक ह्या पार्टीची अगदी मनापासून वाट बघत असतात. ह्या पार्टीतच हे स्प्रेड सगळ्यांना चवीदाखल दिलं. त्याचं बारसं झालंय आता ते जन्माला घालायचं आहे.

आम्ही तुमच्या नवीन अपत्याची आतुरतेने वाट बघतोय, पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे मुलाखत. बोरकुट आत्तापर्यन्त खाल्लेले नाही, मिळवायला पाहिजे.
-------"प्रश्न भविष्यातला योजना?
उत्तर: एक डायनिंग टेबला सूट होईल असं एक स्प्रेड बनवायचं." ....डायनिंग "टेबलला"? ब्रेड स्प्रेड, पोळी/रोटी स्प्रेड बनवायचं असे का बरे लिहिले नसेल?

मंजू,मुलाखत आवडली. इथे केळकरांचा परिचय करून दिल्याबद्दल धन्स..
नागपुरातली ही विशेषता माहीत नव्हती..
आणी हो!!तुझी प्रस्तावना ही खूप आवडली..
Happy

<<"बेडे"कर लोणची वाले ते इकडे पुण्यातले, तिकडे नागपुरातही तस्सेच "केळ"कर आहेत, (हो, पुणेरी बेडेकर नस्ले म्हणून काय झाले? ) केळकर आहेतना आमच्याकडे" अशा बर्‍याचश्या गर्भितार्थाचा वरील मथळा आहे. तो कळतोय. >>अगदी बरोबर लिंबुटिंबु
@सुचित्रा.आपल्या पंगतीला साजेशी लोणची आहेतच म्हणून म्हणाले असावेत
@वर्षनीलू अगदी बरोबर
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद!

केळकरांचा एक फोटो High resolution मधला टाकता येईल का इथे? तुम्हाला माहिती असले तरी शेवटच्या फोटोत कोण नक्की केळकर आहेत हे आम्हाला माहिती नाही. त्यामुळे त्यांचा एकट्याचा फोटो आहे का?

आम्ही बोरकुटाला ब्राऊन शुगर अस म्ह्णायचो.... आणी उगाच डोळे गरगरा फिरवायचो... ;-).
एकदा पी. टी. च्या सरांनी ते ऐकलं आणी असं थोबाड रंगवलं कि बोरकुट खाऊन्/लावून हि रंगणार नाही. Happy

आम्ही बोरकुटाला ब्राऊन शुगर अस म्ह्णायचो... आणी उगाच डोळे गरगरा फिरवायचो>>> Rofl अगदी खरंय!!! ज्याने बोरकुटाची चव चाखलीय, त्याच्यासमोर बोरकुट ठेवले तर एक चिमूटभर तरी तोंडात टाकल्याशिवाय तो रहायचा नाही.

मला आठवतंय, आम्ही लहानपणी आजोळहून (नागपूर) मुंबईला घरी येताना किलो किलोने बोरकुट आणायचो आणि मग येता जाता खात रहायचो. माझ्या मुलीनेसुद्धा बालपणी येथे मुंबईत, 'केळकरांच्या' कृपेने मनसोक्त बोरकुट खाल्लेय. अजूनही कधी मार्केटमध्ये गेलो कि माझी नजर 'केळकरांचे' बोरकुट शोधत असते. 

सुंदर मुलाखत. मस्त ओळख करून दिली आहे. लहानपणी बोरकुट, राजमलाई आणि वर्‍हाडी ठेचा असं सगळं खाल्लं आहे त्यामुळे छान वाटलं त्यामागच्या माणसाची ओळख झाल्याने.

'राजमलाई'!!!!
''बोरकूट''!!!
स्म्रुतिमंजुषेतल्या; लहानपणींच्या आठवणींन्ना व जिव्हेला खवळायला लावणार्या गोष्टिंपैकी अतिशय महत्त्वाच्या!
नागपुरला महालमध्ये असलेल्या शाळेच्या मधल्या सुट्टित बोरकूट, चूरन (!), उकड्लेली बोरं, वगैरे अजूनही आठवतात.

जिभेला बोरकूट वा चूरन ( हे असेच म्हणायचे) गंध लावल्यासारखे खाउन तोंडाने 'ट्टाँSS' असा आवाज काढ्ल्यावरच त्या चवीचा साक्षात्कार व्ह्यायचा!

राजमल्लई तर माझी प्रचंड आवड्ती!. जगातले कुठलेही चाँकलेट ह्यासमोर झक मारेल. मी तर चोरून खायचो!! खोटे सांगत नाही पण साक्षात झुरिक ला स्वीस चाँकलेट खातान्नासुद्धा राजमलाई आठवली होती!! (आणी वर राजमलाई तर 'शुद्ध शाकाहारी'!!

केळकर सरांन्ना व त्यांच्या उद्योग परिवाराला शतशः अभिवादन!! तसेच मंजुताईंन्ना धन्यवाद! पुण्यात राजमलई कुठे मिळत असल्यास क्रुपया म्हणजे 'प्लिजच' कळवा.

राजमलाई, बोरकुट ... वाह, काय मस्त मस्त आठवणी आहेत. Happy
१९९३ ला धुळे सुटले तसे हे प्रकारही गेले. कमलाबाई, जिजामाता कन्याशाळेजवळ कच्ची कैरी , चिन्चा, बोरे, चन्यामन्या बोरे, करवन्दे घेउन एक बाई बसाय्ची. तिच्याकडे अमोन्या नावाचे हिरवे, लाल, आम्बट चिम्बट ज्वारीएवढे दाणे मिळायचे. रानमेवाच तो. इकडे कुठे दिसलाच नाही.

मन्जुताई, आता नागपुराहुन याल तेव्हा बोरकुट आठवणीने आणा.

मा बो वर पूर्वी एक मधुकर (रामटेके) होते. ललित चांगले लिहायचे पण अत्यंत आक्रमक जातीय लिखानाने तो आय डी उडाला. त्यांनी एकदा या राजमलाइ वर लिहिले आणि माबोवर वादळच आहे. प्रत्येक जण नोस्टाल्जिक झाला . ओळखीच्या माबो वाल्यानी राजमलाइची गिफ्ट द्यायला सुरुवात केली . गटगला राजमलाइ. काही परदेशस्थ माबो वाल्याने तर तिकडेही मागवून घेतली. काही तर ब्ल्यू व्हेल गेम सारखे दुकानादुकानातून राजमलाइ शोधत फिरू लागले. Happy
काहीनी पूर्वी सारखी चव राहिली नाही असा ही सूर आळवला. पण बहुधा मोठेपणी विविध व चांगली चॉकलेट्स खाल्ल्याने तसे वाटले असावे. बालपणीच्या बालभारतीतल्या पाठ असलेल्या कवितेसारखी ती राजमलाइ .... !!

पुण्यात बहुधा अगर्वाल चॉकलेट्स A-203, Gangadham-Shatrunjay Road, Next to Shreeji Lawns, Eisha Pearl Society, Kondhwa, Pune, Maharashtra 411048
Hours: Open ⋅ Closes 9PM
Phone: 082373 68733 इथे असावेत किण्वा कोणत्याही चॉकलेट/कन्फेक्श्नरीच्या स्पेशलिस्स्ट दुकानात असावेत.

Pages