पंचम (२): 'पंचमयुग'- कारकीर्द (२.४-२.६)

Submitted by योग on 20 February, 2013 - 03:06

२.४ तंत्र आणि मंत्र.

मंत्र हा स्वयंपूर्ण आहे, कालातीत आहे, अचल आहे; तर तंत्र हे कालानुसार बदलत असते, अधिक सशक्त होत असते. मंत्र स्वतः कुठल्याही तंत्राशिवाय टिकू शकतो असे म्हणता येईल, पण मंत्रच नसेल तर तंत्राला अर्थ ऊरत नाही. तंत्र आणि मंत्राचे हे गणित अचूक साधणार्‍या कलाकारांची कारकीर्द व्यावसायिक वा व्यावहारीक दृष्ट्या यशस्वी व दीर्घायुषी असते असे अनेक ऊदाहरणांवरून दिसून येते.

आधीच्या भागात नमूद केल्याप्रमाणे पंचम चे संगीत शिक्षण जरी ईतर ऊस्ताद लोकांकडे झाले असले तरी त्याला खरा 'गुरूमंत्र' आपल्या वडीलांकडून म्हणजेच दादा बर्मन यांकडूनच मिळाला असे स्वतः पंचम मान्य करतो. तो मंत्र पंचमने आयुष्यभर जपला, त्यापैकी खालील गोष्टी पंचम ने वेळोवेळी नमूद केल्या आहेत:

१. साधे, सोपे, सुलभ, आणि गुणगुणता येईल अशी रचना असावी.
२. आपले सहकारी, मदतनीस, ई. सर्वांना आदरपूर्वक वागवावे.
३. कुठल्याच गोष्टीचा (वाद्य, धून, चलन,) अतीरेक नको, रचनेत संतुलन हवे.
४. रोज न चुकता पेटी समोर (अक्षरशः) बसणे. कारण त्या स्वरूपात सरस्वती, प्रेरणा (समोर) आहेच फक्त त्यावर काम करणे आवश्यक आहे.

खुद्द पंचम ला जेव्हा विचारले गेले, "चांगला संगीतकार होण्यास आवश्यक गुण कोणते?" त्यावर पंचम म्हणतो- "शास्त्रीय संगीताचे ज्ञान असणे आवश्यक आहे पण त्याच बरोबर जॅझ संगीताची माहिती/जाण व एखाद्या वाद्याचा नाद, नैसर्गिक सूर ई. पासून प्रेरणा घेण्याची सक्षमता हवी."

'जॅझ' या प्रकारात केवळ पहिल्या ओळीला अनुसरून (सुरावटीतील निव्वळ पहिली ओळ) ऊर्वरीत गाणे, रचना करणे, सुरावटीचे प्रस्तारण, फुलवणे, असे केले जाते. यात संगीतकाराच्या सृजनशीलता, नैसर्गिक कुवत, ई. सर्वाचा विकास होतोच खेरीज संगीताची जाण, वादन, याचाही कस लागतो.

पंचम ने याही पुढे जाऊन पाश्चात्य संगीत निर्मितीतील 'जॅमिंग' हा प्रकारही अंगीकारला. जॅमिंग म्हणजे थोडक्यात सर्व वादक, गायक व संगीतकार ई. मंडळी एकत्र येऊन एखाद्या गीतावर, संगीत रचनेवर काम करतात. यातून प्रत्त्येकाची प्रतिभा, सूचना, गुण विशेष असे त्या रचनेत समाविष्ट होतात. ते गाणे एकट्याचे न राहता सर्वांचे बनते. संगीतकारासाठी ही अमूल्य गोष्ट आहे. पंचम बरोबर अनेक वर्षे काम केलेले त्याच्या बरोबरीचे वादक मंडळी म्हणतात- "पंचम बरोबरचे सेशन्स म्हणजे अक्षरशः घरातील काम, सोहळा असल्यासारखे वातावरण असे.. त्याने कधीच कुणावरही आपले मत लादले नाही.. एखाद्याने सुचवलेले बदल समाविष्ट केले, त्याचे कौतूक केले.. कुठलाही अहंकार त्याला शिवला नाही.. अक्षरशः तन मन धन विसरून आम्ही काम करत असू.."
आणि दादा बर्मन यांचा कानमंत्र पाळत शेवटी त्या सर्वातून जे स्वतःला पटले तेच पंचम गाण्यात ठेवत असे.

"..एखादा प्रसंग, गीत हे ऐकल्यावर तत्क्षणी, त्याचवेळी मनात जी पहिली धून येते तीच बहुतांशी सर्वात जास्त सुंदर धून ठरते.. गुलजार साठी केलेल्या किंवा काही वेळा जाणिवपूर्वक रचलेल्या, बनवलेल्या रचना सोडल्यास, ९०-९५% धूना या अशा पहिल्याच वेळी/ऊस्फूर्त सुचलेल्या आहेत..." असे पंचमदा नम्रपणे नमूद करतात.

pancham11.JPG
(दादा बर्मन व लता बरोबर गाणे संगीतबध्द करताना: स्त्रोत- फिल्मफेयर, जून १९८४)

पंचम च्या आधीच्या संगीतकाराची ओळख ही त्यांच्या कामाईतकेच किती मोठा वाद्यवृंद असे यावरून(ही) ठरत असे. त्यातही सितार, (नौशाद), लोकगीत-तालवाद्ये (सलिल दा) व्हायलीन व अ‍ॅकॉर्डीयन (जयकीशन) ही त्याकाळच्या चित्रपट संगीतात स्वताचे मानाचे स्थान राखून होती. रॉक एन रोल, जॅझ संगीत प्रकाराच्या हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रवेशामूळे पियानो, सॅक्सोफोन, ट्रंपेट, यांनाही वाव मिळाला असला तरी भारतात त्याकाळी 'ऊपलब्ध' ध्वनी तंत्रज्ञान व ऊपकरणे यांच्याच आधारावर अनेक गीते केली जात असत. आधीच्या लेखात नमूद केले तसे मुळात 'मेलडी' हाच गाण्यांचा फोकस असल्याने ऊपलब्ध सर्व 'भारतीय' वाद्यमेळ हा पुरक व पुरेसा होता.

'कॅबरे' प्रकाराच्या संगीतात मात्र हाच वाद्यमेळ आवश्यक तो परिणाम साधण्यास अपुरा वाटू लागला. "पिया तू अब तो आजा" मधे ऑर्केस्ट्रा मधिल "ब्रांस सेक्शन" हा संपूर्ण गाण्याला एक स्वताची वेगळी अभिव्यक्ती देतो. पंचम ने अशा अनेक गाण्यांतून ब्रांस ऑर्केस्ट्रा प्रामुख्याने वापरला आहे. (ब्रांस- तांबे, पितळ, मिश्र धातू. ई. पासून बनलेले बिगुल, हॉर्न, सॅक्सोफोन अशी तत्सम वाद्ये.). त्याच बरोबर गाण्यातील कडव्याची 'पट्टी' बदलणे, हार्मनी असे प्रयोगही पंचम ने "मै चली.." (पडोसन) सारख्या गाण्यातून यशस्वीपणे केले होते.

पंचमच्या सुरूवातीच्या काळांतील गाणी याच प्रस्थापित वाद्यमेळावर बनवली गेली आहेत किंबहुना त्यावर दादा बर्मन, सलिल चौधरी यांसारख्या संगीताकारांची छापही दिसून येते. त्यापैकी, लताच्या आवाजातील "घर आजा घिर आये..." (छोटे नवाब- १९६१), "विनती करूं घनश्याम.." (पती पत्नी- १९६६) "ओ गंगा मैया.." (चंदन का पालना- १९६९), "चुनरी संभाल गोरी..." (बहारों के सपने- १९६९) नंतर "भोर भये पंछी .."(आंचल- १९८०) या गाण्यांचा ऊल्लेख करता येईल.

pantera1.JPG
('पांतेरा' अलबम मधिल मुख्य गायक/कलाकार जोज फ्लोरेस सोबत: स्त्रोत-फिल्मफेयर, जून १९८४)

मात्र १९८० मध्ये अमेरीकेत आंतरराष्ट्रीय कलाकारांबरोबर 'पांतेरा' हा संगीत अलबम करताना पॅट्रीक ग्लीसन सारख्या अत्यंत नावजलेल्या, कुशल, व निष्णात तंत्रज्ञ कलाकाराशी झालेली ओळख आणि देवाण घेवाण ही पंचमच्या पुढील संगीतीक वाटचालीत अतीशय महत्वपूर्ण ठरली. 'ग्लीसन' हे नाव मुख्यतः संगीत तंत्रज्ञान, ध्वनिमुद्रण ऊपकरणे, सिंथेसाई़ड साऊंड (थोडक्यात, ध्वनी लहरींचे गुण आवश्यक तसे बदलून त्यातून वेगवेगळे आवाज तयार करणे) या क्षेत्रात 'न्युटन' ईतकेच मानाचे आहे.
(http://en.wikipedia.org/wiki/Patrick_Gleeson)

त्याच्याकडून मिक्सींग, रेकॉर्डींग, साऊंड सिंथेसिस अशा अनेक गोष्टींचे बारकावे पंचम ने जाणून घेतले. ईतकेच नव्हे तर बास गिटार, ट्वेल्व स्ट्रींग गिटार, स्पॅनिश गिटार, ईलेक्ट्रीक गिटार, डीजीटल पियानो, ईलेक्ट्रॉनिक ऑर्गन यासारखी वाद्ये, तर वाद्याच्या मूळ आवाज व टोन याला बदलणारी 'गॅजेटस', त्याच बरोबर खास पाश्चात्य असे ताल प्रकार या सर्वाचा पंचम ने केलेला अभ्यास अन त्याचा भारतीय चित्रपट संगीतात अत्यंत खुबीने केलेला वापर हे सर्व पंचमच्या वेगळेपणाची व प्रयोगशीलतेची साक्ष देतात.
pancham10.JPG

('पांतेरा' शी संबंधित कलाकार ई. मंडळीं बरोबर: स्त्रोत- फिल्मफेयर, जून १९८४)

ईतके असूनही, भारतीय मूळ आणि संगीत वाद्य परंपरेतील वैविध्यता हे पंचमच्या संगीतात कायम आहे. यात ऊल्लेखनीय असे- 'मादल' या नेपाळी ताल वाद्याचा वापर ("हे कंचन...", "तेरे बिना जिया जाये ना.." ); संतूर व सरोद या खास ऊत्तर हिंदुस्तानी वाद्यांचा वापर (गुलजार साठी केलेली जवळ जवळ सर्वच गाणी); जलतरंग ("सावन का महिना आ गया है.." सारखी पावसाची गाणी), 'खोल' हे ढोलकी सारखेच पण अतीशय छोटे तोंड असणारे व सहसा टीपेच्या पट्टीत वाजणारे बंगाली तालवाद्य ("रैना बिती जाये.." "ओ मांझी रे..."), 'दिलरूबा'- १२- १५ तारांचे गिटार सारखेच पण व्हायलीन प्रमाणे वाजवायचे वाद्य (बंगाली चित्रपट संगीत, बंगाली भजन गीत).

dilruba1.jpg
('दिलरूबा')

याखेरीज, माझ्या 'अर्धवट' माहितनुसार दरबुका हे मध्य आशियाई तालवाद्य- बाँगो, काँगो सारखेच फक्त जरा बसकट वाद्य (शोलेफेम मेहबूबा गीत), पं. शिवकुमार शर्मा यांचेकडील ईराणीयन संतूर (मेहबूबा मेहबूबा ची ती फेम धून..) युरोपियन कॅस्टनेट (आपल्याकडे याला 'करताल' म्हणतात)- 'कटर कट कट..." असे आवाज करणारे दोन हातात चिमट्यात पकडून वाजवले जाते ते ("ओ हसीना जुल्फोंवाली.." सारखी गाणी), 'मंडोरा'-मॅंडलिन व गिटार चे मिश्रण ("दो लब्जो की है दिल की कहानी.."), अशाही वाद्यांचा पंचम ने ऊपयोग केला आहे.

darabuka.jpg
('दरबुका'- मांडीवर आडवे ठेवून दोन्ही हाताने (एकच) तोंड वाजवले जाते.)

mandora1.jpg
('मंडोरा')

euc3.jpg
('कॅस्टनेट')

[सर्व चित्रे आंतरजालावरून साभार!]

पंचम ने काही गाण्यांसाठी खास प्रयोग करून निर्माण केलेले आवाज, मिश्र वाद्यांचे आवाज, अनेक वाद्यांच्या सरमिसळीतून निर्माण केलेले अदभूत आवाज्/सूर. ई. सर्व या बद्दलही आपण बरेच वेळा वाचतो, कहाण्या ऐकतोच. एका मुलाखतीत आशा ताई म्हणतात- "एकाच गाण्यात एका गायकाचा आवाज वेगळ्याच पट्टीत किंवा हार्मनि मध्ये रेकॉर्ड करताना, ध्वनिमुद्रणाच्या वेळी पंचम सांगत असे- "आता गाताना ही जागा मोकळी ठेव...","...ज्या काळी मल्टि ट्रॅक व्होकल रेकॉर्डींग व मागाहून व्होकल्स मध्ये सुधारणा करता येत नसत, त्या काळी मग असे एकाच टेप वर टप्प्या टप्प्या ने रेकॉर्ड करून पुन्हा सर्व एकसंध राखण्याची किमया तो कशी काय साधत असे हे मला कधीच कळले नाही.." ऊ.दा. हे गाणे- "..कोई आया आने भी दे.." ('काला सोना'- १९७५); "कतरा कतरा मिलती है.." (ईजाजत-१९८७). यातील आशा तांईच्याच आवाजातील एक ओळ वेगवेगळ्या प्रकारे म्हटली गेली आहे आणि शिवाय ते एखाद्या कोरस सारखे ओव्हलॅप देखिल केले गेले आहे.

एक विशेष गोष्ट अशी नमूद करता येईल की पियानो हा पूर्वी गाण्यांमध्ये अधून मधून डोकावत असे. पंचम ने मात्र पियानो अनेक अंगाने वापरला आहे. कधी संपूर्ण गाणे पियानोवर, कधी निव्वळ मधले तुकडे, कधी एखाद्या अंतराच्या आधी लीड म्हणून, कधी चक्क गिटार बरोबर रिदम सारखा, कधी गाण्यातील भावना अधोरेखित करण्यासाठी वापरलेले स्पर्श (key touches), ईत्यादी, पैकी:
"तुमने मुझे देखा.." (तिसरी मंझिल)- यातील प्रत्त्येक कडव्याच्या आधी व धृवपदानंतर वाजवला गेलेला पियानो चा तुकडा..
"प्यार दिवाना होता है.." (कटीपतंग)- जवळ जवळ अख्खे गाणेच पियानो वर आहे
"हम बेफवा हरगीज ना थे.." (शालीमार)- यातील पियानो वरील Charriot Tune वरून पुढे बनवलेले सर्व गीत..
"सुहानी चांदनी राते हमें सोने नही देती.."(मुक्ती-१९७७) गाणे सुरू व्हायच्या आधी संपूर्ण पियानो चा तुकडा आहे आणि संपूर्ण गाण्यात देखिल पियानो key touches आहेत.

तरिही या सर्व तंत्रज्ञान व प्रयोगशीलतेच्या मेळाव्यात सेमी क्लासिकल (क्लासिकल व लाईट यांचे मिश्रण) अशी रागावर आधारीत गाणी देखिल पंचमने अनेक केली आहेत. "मुद्दामून एखाद्या रागावर(च) आधारीत गाणी देणे असे मी करत नाही... किंबहुना चित्रपट संगीतात बहुतांशी गाणी मिश्र रागातली होतात, ज्यात एकापेक्षा अधिक रागाच्या छटा दिसून येतात.." असे पंचम ने म्हटले आहे. त्यामूळे शोधायला गेलो तर 'राग' सापडेल असे पंचमच्या गाण्यांबद्दल मला वाटते. ऊ.दा.:
१. बीती ना बीताई रैना... (यमन कल्याण)
२. आयो कहां से घनश्याम (राग खमाज)
३. करवटें बदलते रहें... (राग पहाडी)
४. रैना बिती जाये.. (तोडी/ललित)
५. कुछ तो लोग कहेंगे (खमाज/कलावती)
अशी अजून अनेक ऊदाहरणे आहेत.

आता एका मुख्य विषयाकडे वळुयात- संगीत दिग्दर्शक/संगीतकार व संगीत संयोजक.

खरे तर आपल्याकडे पूर्वीपासूनच संगीतकार वा संगीत संयोजक असा भेद नसून दोन्ही एकच असेच समीकरण होते. याचे कारण मुळात जे संगीत दिग्दर्शक होते त्यांना संगीत, वाद्ये यातली सर्व अंगे ज्ञात होती, अवगत होती, ठाऊक होती. बरेचसे संगीतकार आपल्या आधीच्या संगीतकाराकडे वादक, वा सहाय्यक म्हणूनही काम करत असत. तेव्हा एखादे गीत वा काव्य संपूर्ण संगीतबध्द करताना आवश्यक त्या सर्वच गोष्टिंची जाण आपल्या संगीतकारांमध्ये होती. पूर्वीच्या सर्वच चित्रपटातील श्रेयनामावालीमध्ये 'म्युझिक डायरेक्टर' (किंवा 'म्युझिक') असाच ऊल्लेख आढळतो. अलिकडे, म्हणजे २००० च्या दशकापासून मात्र संगीतकार व संगीत संयोजक या दोन प्रमुख भूमिका लोकमान्य झाल्या आहेत. आता तर पार्श्वसंगीत देखिल मुख्य संगीताईतकेच महत्वाचे झाले आहे.

संगीतकार व संगीत संयोजक यात नेमकी फर काय तर ऊदाहरणादाखल असे चित्र डोळ्यापूढे आणून पहा- समजा घरात एखाद्या सणानिमित्त करंज्या बनवायला घेतल्या आहेत. अशा वेळी आई/ आज्जी नेमकी काय व किती रेसिपि घ्यायची व त्याचे मिश्रण कसे करायचे हे ठरवते/सांगते, मग दुसरीकडे कुणी करंज्या लाटतय, कुणी ते सारण/मिश्रण बनवतय, कुणी लाटलेल्या करंज्यात ते भरतय, कुणी त्याला कण्या/कळ्या पाडतय, कुणी त्या तळतय, कुणी तळलेल्या करंज्या एका ताटात कागदावर काढून ठेवतय, कुणी त्या ताटात व्यवस्थित मांडून ठेवतय.. आणि या सर्वावर देखरेख करायला घरातील दुसरी अनुभवी बाई. [बरेच वेळा आईच या सर्व भूमिका एकहाती यशस्वीपणे पार पाडते हे वेगळे सांगायला नकोच!]

आई/आज्जी ची भूमिका म्हणजे संगीतकार, बाकी सर्व भूमिका म्हणजेच वादक/कलाकार/गायक तर या सर्वांमध्ये सुसूत्रता ठेवणारी, देखरेख करणारी, कुठे कमी जास्त काय ते बघणारी बाई म्हणजे संगीत संयोजक. थोडक्यात व्यावसायिक भाषेत संगीतकार हा जर डायरेक्टर असेल तर अ‍ॅरेंजर हा प्रॉजेक्ट मॅनेजर ठरतो.

आता थोडे विषयांतर करून हे असे का झाले हे पहावे लागेल. यात सर्वात महत्वाची गोष्ट व कळीचा मुद्दा आहे ते म्हणजे बदलेले तंत्रज्ञान!

पूर्वी म्हणजे १९५०, ६०, ७० च्या दशकात सर्व वादक, गायक, ई. मंडळी ही संगीतकार/संगीत दिग्दर्शक याच्या देखरेखीखाली व त्याच्या सुचनेनुसार गाणी स्टुडीयो मध्ये थेट ध्वनी मुद्रीत करत असत. म्हणजे स्टूडीयोच्या एका भागात वाद्यमेळा वाजतोय, दुसरीकडे ते ऐकून गायक गाणे गात आहे, तिसरीकडे संगीतकार सर्व सूत्रसंचालन करत गाणे ध्वनिमुद्रीत करत आहे असे एकंदर "लाईव्ह" चित्र होते. एखादा टेक चुकला की अक्षरशः पुनः पहिल्यापासून सुरू- replace/erase हा पर्याय ऊपलब्ध नव्हता. अक्षरशः टेप च्या टेप फुकट जात असत. परिणामी ध्वनिमुद्रणाला येण्यापूर्वीच गाण्याची सर्वांगाने चोख तयारी करणे, अनेक रिहर्सल्स घेणे, असे करून ऊत्तम दर्जा व कमीत कमी ध्वनिमुद्रण वेळ, पर्यायाने कमी खर्च असे गणित बसवले जायचे. तेव्हा निव्वळ गाण्याव्यतिरीक्त ही सर्व अंगे व बाजू देखिल संगीतकाराला संभाळाव्या लागत.
पण जस जसे याबाबतीत ऊपकरणे व तंत्रज्ञान प्रगत होत गेले (१९८० च्या दशकात) तसे आधीच फक्त वाद्यमेळा ध्वनिमुद्रीत करून ठेवणे मग त्या ट्रॅक वर नंतर गायकांनी येऊन गाणे ध्वनिमुद्रीत करणे ('कराओके' सारखे), त्याही पुढे जाऊन वाद्यमेळ वा गायन यात काही बारीक सारीक चुका असतील तर तंत्रज्ञान (सॉफ्ट्वेयर) वापरून त्या सुधारणे हेही शक्य झाले झाले. तरिही अजून वाद्य आणि वादक यांना पर्याय नव्हताच. सुधारणा फक्त ध्वनिमुद्रण तंत्रात झाली होती.

१९८० च्या ऊतरार्धात मात्र 'मिडी' (midi- musical instrument digital interface: http://en.wikipedia.org/wiki/Musical_Instrument_Digital_Interface) या संगणक वाचू शकेल व त्यावर प्रक्रीया करू शकेल अशा संगीत-भाषेचा शोध आणि तंत्रज्ञानाचा व्यावहारीक वापर सुरू झाला आणि संगीत क्षेत्रात एक प्रचंड उत्क्रांती झाली. ती अशी की जवळ जवळ सर्वच वाद्यांचे आवाज निव्वळ किबोर्ड किंवा सिंथसायझर वापरून (सिंथेसाईज्ड साऊंड) संगणकावर रेकॉर्ड करता येऊ लागले. परिणामी वाद्य व खुद्द वादक नसेल तरी वाद्य वाजवता येईल (म्युझिक किबोर्ड वर) अशी सोय झाली.
याचे अनेक फायदे तोटे आहेत आणि तो एक स्वतंत्र लेखाचा रंजक विषय होईल हे निश्चीत! पण एखाद्या गीताला निव्वळ "चाल लावणे" किंवा एखाद्या गाण्यात अमुक तमुक वाद्ये वापरावी एव्हडेच करून व सांगून देखिल आज एखादा "संगीतकार" होऊ शकतो, ऊर्वरीत सर्वच काम "संयोजकाचे" रहाते. तंत्रज्ञानाचा वापर/गैरवापर व कलेशी प्रामाणिकपणा हा वादग्रस्त विषय आहे.
[आजकाल जवळ जवळ ९०% गाणी ही अशी संगणक, तंत्रज्ञान, सिंथेसाईझ्ड साऊंड यांचा वापर करून केली जातात- पुर्वी सारखा अनेक वादक मंडळींचा ऑर्केस्ट्रा ही गोष्ट आता जवळ जवळ नामशेष झाली आहे. किंबहुना बरीचशी वादक मंडळी आता स्टूडीयो बाहेर वादन वगैरे ईतर कामे करून आपली ऊपजिवीका साधत आहेत.]

पण वरील करंज्यांच्या ऊदाहरणाच्या अनुशंगाने या सर्वाचे एका वाक्यात वर्णन असे करता येईल की आई एका तासात सर्वांच्या मदतीने ऊत्कृष्ट ५० करंज्या बनवत असेल तर त्याच वेळात अक्षरशः मशिन मधून ५०० करंज्या निर्माण करायची सोय झाली. आता कुणाला काय आवडते हा ज्याचा त्याचा प्रश्ण. 'मागणी तसा पुरवठा' हे समीकरण कुठल्याही कलेसाठी वा त्या कलेच्या व कलाकाराच्या विकासासाठी जितके पोषक आहे तितकेच घातकही ठरू शकते असे माझे मत आहे.

एकंदर तंत्रज्ञान व कार्यपध्दतीतील हा मुलभूत व अमूलाग्र बदल मात्र पंचम ने आनंदाने स्विकारला. त्यामागे अशा तंत्रज्ञानामूळे ऊपलब्ध होणारे फायदे, प्रयोगशीलतेला पोषक वातावरण, बदलत्या काळातील संगीताचे बदलणारे प्रकटीकरण, चित्रपट संगीतातील व्यावसायिक गणिते, या सर्वाचे स्वरूप पंचम ने ध्यानात घेतले होते हे लक्षात घ्यायला हवे.

या विषयावर एका मुलाखतीत प्रश्ण विचारला गेला तेव्हा पंचम ने म्हटले आहे- ".. मी अशा तंत्रज्ञानाचे स्वागतच करतो. संगीतकारासाठी ते एक वरदानच आहे. एकच कडवे अनेक वेळा ध्वनिमुद्रीत करून शेवटी त्यातले सर्वात ऊत्तम कुठले घ्यायचे हा पर्याय संगीतकाराला व खुद्द गायकालाही ऊपलब्ध होतो तेही कमी वेळ व खर्चात.." (मायबोली शीर्षकगीताचे बहुतांशी काम तर असेच तंत्रज्ञानाच्या मदतीने झालेले आहे हे आपल्याला माहित आहेच.)

त्यावर आशाताई देखिल म्हणतात- ".. बरेच वेळा वादक, गायक यांच्या आपापसात वेळा, तारखा जमत नाहीत अशा वेळी असे तुकड्यात ध्वनिमुद्रण करणे सोयीचे ठरते..." पण पुढे जाऊन त्या असेही नमूद करतात की "मात्र यात एकत्रीतपणे ध्वनिमुद्रीत करतानाची ऊस्फूर्तता, एकमेकांपासून मिळालेली प्रेरणा, व संवाद याचा अभाव असल्याने अक्षरशः मशिन सारखे गाणे गायले जाते.. नकळत याचा परिणाम विशेषतः जोडीच्या गाण्यामधील भाव, एक्स्प्रेशन्स यावर होत असतोच... विचार करा 'आंधी' चित्रपटामधले "तुम आ गयो हो नूर अ गया है" हे गाणे (किंवा ईतर सर्वच जोडीची गाणी) तितकेच मनाला भिडणारे झाले असते का, जर लता गात असताना बाजूला किशोरदा ऊपस्थित नसते..?"

असे आधीच वाद्य ट्रॅक बनवून मग त्यावर व्होकल रेकॉर्ड करताना कायम हेडफोन वगैरे वापरावे लागल्याने बरेच वेळा गायकासाठी ती एक अडचण देखिल ठरते.

"आशा... तू आता हेडफोन ची सवय करून घे.... येणार्‍या काळात हेडफोन शिवाय ध्वनिमुद्रण होणार नाही.." या पंचम ने आशा ताईंना केलेल्या विनंतीवजा सूचनेवरून भविष्यातील संगीताचे स्वरूप व तंत्र काय असेल याची जाण पंचम ला आधीपासूनच होती हे दिसून येते.

या सर्वा व्यतिरीक्त दोन गोष्टी पंचम जवळ होत्या ज्या अभावानेच एखाद्या संगीतकाराच्या नशीबी व वाट्याला येतात. एक म्हणजे अनेक वर्षे त्याच्या बरोबर मन लावून काम केलेले वादक आणि दुसरे म्हणजे खुद्द स्वतः पंचम एक चांगला गायक होता. एखाद्या गाण्यात पंचम ला काय अपेक्षित आहे किंवा पंचमच्या एकंदर रचनेमध्ये आपण कशा प्रकारे काही विशेष सुधारणा वा काही नविन अधिकचे (value additions) करू शकू हा विचार या वादक मंडळींनी केला. पंचम बरोबर अनेक वर्षे काम केल्याने एखादे गाणे बसवताना व संगीत रचना करताना पंचमच्या मानसिकतेचा, विचार पध्दतीचा त्यांना अंदाज बांधता येत होता. कधी कधी अशा देवाण घेवाणीतून एखादे गीत आपसूकच जन्म घेत असे.

ऊ.दा. भानू गुप्ता (पंचमचे प्रथम पासूनचे सहकारी, ज्येष्ट वादक) सांगतात- ..."मी एकदा नुसत्या गिटार च्या कॉर्ड्स वाजवत बसलो होतो... पंचम आंघोळ करत होता. हळूच बाथरून च्या दारातून डोकवात त्याने विचारले- "तुम्ही काय वाजवत आहात..? चालू ठेवा.. थांबू नका..." दोनच मिनिटात आंघोळ अर्धवट सोडून पंचम पेटीवर येऊन बसला. गिटार च्या कॉर्ड्स च्या अनुशंगाने एक धून बनवली- ती धून हा मूळ गीताच्या धृवपदाचा ऊर्वरीत भाग होता, मुख्य ओळ तर अजून बनायचीच होती... "वाजवणे चालू ठेवा.... हा धृवपदाचा एंड पार्ट आहे... मी आलोच..." एव्ह्डे म्हणून पंचम पुन्हा आंघोळीला गेला... काही वेळातच आतून आवाज आला "मिल गया मिल गया..." भानू गुप्तांनी विचारले "क्या मिल गया भाई.."? पंचम चे ऊत्तर- "गाण्याचा मुखडा.."
आधी शेवट बनवून मग मुखडा बनलेले ते अजरामर गीत होते- "मुसाफीर हूं यारो..." (परिचय)

ईतरही असेच गमतीशीर व रोमांचकारी किस्से आहेत.
pancham 9.JPG
(वादक मंडळींबरोबर गायन व ध्वनिमुद्रण करताना: स्त्रोत- Pancham Strings Of Eternity, Compilation- Brahmanada Singh & Gaurav Sharma, 2009.)

स्वतः पंचम खुद्द गायक असल्याने गाण्याचा गायक म्हणूनही विचार तो करू शकत होता, त्याचाच परिणाम म्हणजे नेमकी कुठल्या गाण्यासाठी कुठला गायक, कुठली पट्टी, अगदी कुठले मायक्रोफोन्स, ईतका सर्वंकष विचार पंचम करू शकत असे. पंचम च्या गाण्यात लता जितकी मधुर ऐकू येते तितकीच लताच्या आवाजातील आर्तता देखिल (तुझसे नाराज नही जिंदगी...., कुछ ना कहो...); आशा जितकी धारदार ऐकू येते तितकीच मादकही (ये वादा रहा.... प्यार करनेवाले ... (शान), कतरा कतरा...); किशोर जितका आश्वासक तितकाच गेहरा (ओ मेरे दिल के चैन... ओ हंसनी... आनेवाला पल... सागर किनारे....). ही करामत जितकी गायकांची होती तितकीच, ध्वनिमुद्रण ऊपकरणे, मिक्सींग, साऊंड बॅलंसींग हे सर्व सर्व स्वतः जातीने हाताळणार्‍या पंचम ची देखिल होती.
pancham 8.JPG
('सुंदर' गायन... कोई शक? Happy स्त्रोत- Pancham Strings Of Eternity, Compilation- Brahmanada Singh & Gaurav Sharma, 2009.)

आजकालचे यशस्वी व नावाजलेले तंत्रज्ञ पंचमला 'साऊंड मिक्सिंग व बॅलंसींग चा राजा' मानतात. याचे कारण असे की जेव्हा बेस गिटार, ढोलक, डग्गा, अशी वाद्ये एखाद्या गाण्यात एकत्र वाजत असतात तेव्हा बरेच वेळा सर्वांची (बास) फ्रिक्वेंसी जवळ जवळ सारखी असल्याने एकमेकास पुरक न ठरता मारक ठरू शकतात त्यामूळे प्रत्त्येकाचा वेगळा आवाज व खूबी ऊठून दिसत नाही. पण पंचम च्या अनेक ताल/ठेका/वाद्य प्रधान गाण्यांमधून ही सर्व वाद्ये कधिही एकमेकाशी स्पर्धा न करता स्वताचे वेगळेपण, आवाज टिकवून ठेवतात. पंचमची गाणी मुद्दामून एखाद्या सर्वोत्कृष्ट साऊंड सिस्टिम मधून किंवा ऊच्च प्रतीच्या हेडफोन मधून ऐकलीत तर अनेक गाण्यातील काही वाद्यांचे 'स्पेशल ईफेक्ट्स' वा ईतर गुणवैशीष्ट्ये अगदी ठळकपणे जाणवतात- वाद्यांचे सूर घुमवणे, व्हायलीन वा ईतर ब्रांस समूहाचा ध्वनी अक्षरशः डाव्या कानातून ऊजव्या कानात प्रवास करतोय असेही जाणवते. ज्या काळी आजच्यासारखी अत्यंत महागडी सर्वोत्कृष्ट ध्वनिमुद्रण ऊपकरणे, मिक्सींग बोर्ड्स ऊपलब्ध नव्हते त्याकाळी हे सर्व यशस्वीपणे करणे हे फार अवघड होते हे ध्यानात घायला हवे.

'बेताब' (१९८३) चित्रपटातील पंचम ची गीते ही अशीच तांत्रिक दृष्ट्या अतीशय सरस आहेत असे माझे मत आहे. एक प्रयोग करून पहा(च).. "जब हम जवां होंगे.." हे गीत, शक्यतो mp3 file, हे हेडफोन वापरून ऐका. त्यातील वाद्यमेळ, ध्वनी यांकडे विशेष लक्ष देऊन ऐकले तर अक्षरशः संपूर्ण ऑर्केस्ट्रा नेमकी कुठे बसला आहे असे चित्र डोळ्यापूढे ऊभे राहते- व्हायलीन समूह एका कोपर्‍यात, तालवाद्ये दोन्ही बाजूला, गिटार सारखी कॉर्ड्स वाद्ये भरणा म्हणून मागच्या बाजूने, अ‍ॅकॉर्डीयन, हार्मोनिका वगैरे साधारण मध्य भागी, शेकर्स, रेशो रेशो, व ईतर साईड रिदम म्हणजेच छोटी तालवाद्ये ही दोन्ही बाजूला आणि बरोबर मध्ये फोकस झालेले गायन/गायकाचा आवाज.

आशा, लता, किशोर, रफी यांच्यावरच न थांबता अनेक ईतर नविन गायक मंडळींना देखिल पंचम ने वाव दिला, यात सपन चक्रवर्ती पासून अमित कुमार, शैलेंद्र सिंग, भुपेंदर, अनुप घोषाल, आरती, ते दक्षिणेतील नावाजलेल्या एस पि बालसुब्रमण्य, कविता कृष्णमूर्ती, अगदी मराठी मधिल सुरेश वाडकर, रविंद्र साठे यांचाही समावेश आहे. वैयक्तीक नाती, हितसंबंध, व व्यावहारीक नफा नुकसान यापेक्षा देखिल संगीत कलेशी प्रामाणिक असलेल्या सच्च्या कलाकाराचे हे निदर्शक म्हणावे लागेल.

म्हणूनच एकूणात पंचम ची किती गाणी हिट ठरली वा किती फ्लॉप पेक्षा त्या गाण्यांनी किती लोकांना किती प्रकारे स्पर्श केला, आपलेसे केले, या एका कसोटीवर पंचम त्याच्या समकालीनांपेक्षा व आजच्याही अनेक आघाडीच्या संगीतकारांपेक्षा अनेक योजने पुढेच ठरतो.

पंचमच्या गाण्यांचं तारूण्य अजूनही टिकून आहे यापेक्षा दीर्घायुषी सौंदर्य कुठलं?

तंत्र आणि मंत्राच्या अनुशंगाने; विशेषतः अनेक दिग्गज प्रस्थापित संगीतकार दादा मंडळींच्या मांदियाळीत स्वताची कला पेश करताना; खालील काही ऊदाहरणे पंचमचे वेगळेपण, स्वतंत्र विचार अधोरेखीत करतात असे मला वाटते:
१. रागावर आधारीत गाणे असूनही त्याचे प्रसरण व पुढील रचना ही पाश्चात्य संगीतातील कॉर्डस वर आधारीत अंगाने करणे- "कुछ तो लोग कहेंगे..." (अमर प्रेम)
२. ६० च्या दशकात तबला न वापरता गिटार चा वापर ठेका देण्यासाठी करणे (.."आजा पिया तोहे प्यार दूं..")
३. एखाद्या प्रसंगाचा विचार करून त्याच्या संगितीक मुळाशी जाऊन मग नंतर संगीत रचनेबद्दल विचार करणे- "फिरसे आइयो बदरा.." हे 'नमकीन' चित्रपटातील गीत. यातील मुलगी ही मूक आहे. तेव्हा तीला व्यक्त होताना आवश्यक ते आवाज देण्यासाठी पंचमने फळा, खडू, पेंसील, कॅनव्हास अशा साधनांचा वापर करून ३ तास ते आवाज ध्वनिमुद्रीत केले व त्याचा वापर केला.
४. 'दिल पडोसी है' या संगीत अलबम साठी पंचम ने खंडाळा या ठिकाणी पाऊस, धबधबा, रेलवेची शिट्टी, ई. सर्व आवाज ध्वनिमुद्रीत करायला अनेक श्रम घेतले.
५. एखाद्या गाण्याला निव्वळ संगीत न देता त्याच्या चित्रीकरणानुसार त्यात बदल करणे- "हम को तो यारा तेरी यारी..." (हम किसी से कम नही) या गाण्यात काजल किरण व रिषी कपूर यांमध्ये एक 'बुल चेस' दाखवले आहे तिथे पंचम ने स्पॅनिश गिटार वापरली, नंतर तेच गाणे एक पिटी /परेड कवायत या दृष्यात जाते तेव्हा पंचम ने निव्वळ शिट्टी तेही ठेक्यात व मात्रेत वापरली आहे.
६. भारतीय शास्त्रीय संगीतात रागाची लक्षणे, आरोह, अवरोह, त्याचे चलन तसे बहुतांशी ठरलेले असते. तरिही मूळ रागाला कुठेही धक्का न देता परंतू निव्वळ एखादे वेगळे चलन वा स्वरांची गुंफण करून पंचम ने तेच राग वेगळ्याच प्रकारे पेश केले- "चिंगारी कोई भडके.." (भैरवी), "मेरे नैना सावन भादो" (शिवरंजनी).

पंचम ऊर्फ राहुल देव बर्मन या अष्टपैलू कलाकार, संगीतकार, व्यक्ती बद्दल कितीही लिहीलं तरी कमी आहे. निव्वळ तंत्र आणि मंत्र च्या अनुशंगाने पंचम चे काम बघितले, तपासले, विश्लेषण केले तर ते करता करताच आपण चांगले संगीतकार होऊ शकतो ईतके प्रचंड काम पंचम ने केले आहे.

पंचमच्या एकंदरीत काम व कारकीर्द याबद्दल मजरूह सुलतानपुरीचे हे शब्द प्रातिनिधीक व पुरेसे बोलके आहेत- "... पंचम हे एक 'युग' होतं, एक संगीत विद्यालय होतं..ज्या पातळीवर व दर्जावर तो आणि त्याचे काम आहे ते भविष्यात पुन्हा कधी होणे अवघड आहे...".

थोडक्यात १९७० च्या दशाकातील पंचम चे संगीत acoustically rich तर ८० नंतरचे त्याचे संगीत technically rich होते असे तुलनात्मक विश्लेषण करता येईल. आणि दोन्हीचा ऊत्कृष्ट संगम हा गुलजार साठी केलेल्या गाण्यांतून कायम दिसून येतो.

२.५ पंचम ठसा (सिग्नेचर).

तसे तर पंचमच्या जवळ जवळ प्रत्त्येक गाण्यास स्वताची अभिव्यक्ती, ओळख आहेच तरिही अशी काही खास ऊदाहरणे आहेत आणि खास वैशीष्ट्ये आहेत जी फक्त पंचमचीच आहेत.

१. "बडे अच्छे लगते है.." हे 'बालिका वधू' (१९७६) मधिल गीत तर सर्वश्रुत आहेच. त्यात अमित कुमार ने ज्या प्रकारे गायले आहे, असे वाटते की त्याने पंचम ला जवळ जवळ जसेच्या तसे अनुकरण केले आहे. या गाण्यात.. "ओ.. मांझी रे.... जैय्यो पिया के देस.." या ओळी पंचम ने गायल्या आहेत. त्या ऐकल्यावर क्षणभर असे वाटते की त्या ओळी देखिल अमित कुमार गात आहे.. Happy असेच एक दुसरे गीत जे अमित कुमार ने गायले आहे पण त्याच्या गायकीत पंचम ची झलक दिसतेच- "ये जमीं गा रही है..." (चित्रपट, तेरी कसम- १९८२)
२. खेल खेल मे (१९७५) चित्रपटातील हे गीत.. "सपना मेरा टूट गया... तू ना रहा कुछ ना रहा..." यात पंचम व आशाताई एकत्र गायले आहेत. हे गीत ऐकल्यावर खात्री पटते की पंचम एक ऊत्कृष्ट गायक होताच पण त्याचा गळा वरच्या पट्टीतही सहज चालत असे. किंबहुना पंचम च्या गायकीला स्वताची एक ओळख होती. त्याकाळी त्याचा आवाज विचीत्र वाटत असला तरी तोच आवाज पंचम च्या गायकीची ओळख बनला. (पंचम चे टाँसिल्स चे ऑपरेशन झाल्यावर त्याचा आवाज बदलला तो कायमचाच!).
३. "आओ ट्विस्ट करे.." हे गीत मि पहिल्यांदी ऐकले तेव्हा मला वाटले होते हे पंचमने गायले आहे, विशेषतः त्यातील ज्या गळ्याच्या (splitting voice) हरकती आहेत- "नाच ऊठी है-ए झिंदगानी-ई..". मन्ना डे सारखे अत्यंत ज्येष्ट व महान गायक म्हणतात- "पंचम म्हणतो तसे आम्ही डिट्टो फॉलो केले तरी गाणे जवळ जवळ ९९% समाधानकारक होत असे.. बरेच वेळा तो कसे गातो हे पाहून/ऐकून आम्ही गायचो..."
४. "तुमने मुझे देखा.. " (तिसरी मंझिल) या गाण्याच्या धृवपदानंतर अंतर्‍याच्या आधी जो लीड तुकडा पंचम ने बसवला आहे तो अक्षरशः आपल्या नकळत गाण्याची मूळ पट्टी बदलून अंतरा दुसर्‍या पट्टीत नेतो.
५ "तेरे बिना जाये ना.." (घर) या गाण्याचं सौंदर्य हे त्या वापरलेल्या मादल, तबला, तरंग, डुग्गी यांच्या एकत्रीत मिश्रणातून, मेळ्यातून अधिक खुलतं. त्यातही ही वाद्ये गाण्यांच्या सुरानुसार आपली पट्टी देखिल बदलतात.. ("तेरे बिना जाये ना" या शब्दांनतर जो ठेका वाजतो- "टाणा टींग टींग..")
६. पंचम ने गिटार चा मेन रिदम म्हणून जो वापर केलाय तो जवळ जवळ ट्रेंड्सेटींग आहे. यात तबल्याची सम "धा" ही रिदम गिटार वर वाजवली गेली आहे. ऊ.दा: "रैना बिती जाये...", "ओ माझी रे.."

'मेलडी' हा पंचमच्या सर्वच रचनांचा आत्मा असला तरी 'रिदम' हे त्याचे हृदय आहे, काळजाचा ठोका आहे. कित्येक गाणी तर निव्वळ गिटार, बाँगो, तुंबा, ई. वगैरे चा वापर करून सुरू केली आहेत. त्या अर्थाने 'रिदम' हा पंचम चा ठसा आहे. पैकी ही गाणी आठवून पहा, गुणगुणून पहा, पहिली गोष्ट मनला भिडते ती म्हणजे रिदम, ठेका:
"दम मारो दम..", "सामने ये कौन आया..." "जीवन के हर मोड पे...".. "ये वादा रहा.." "प्यार हमे किस मोड पे ले आया.."
एका गाण्यापासून तोच रिदम कायम ठेवून अक्षरशः ५० एक गाणी वाजवता येतात तेही अगदी सहज एकातून दुसरे असे.
एक गंमत पहा: रिदम/ठेका (खाली मात्रा गट):
झिक तांग झिकी झिक तांग s
1.....2 3... 4... 5.... 67..8

गाणी: तुजसे नाराज नही झिंदगी - मुसाफीर हूं यारो- एरी पवन - सामने ये कौन आया - झिंदगी के सफर मे गुजर जाते है - हम तो सफर करते है - आनेवाला पल - क्या हुवा तेरा वादा- तुम आ गये हो नूर आ गया है - क्या नजारे क्या सितारे- ओ मेरे दिल के चैन - आती रहेंगी बहारे- ईक दिन बिक जायेगा - आजकल पांओ जमी पर - कभी कभी सपना लगता है - कतरा कतरा
(याचे एक स्वरचित प्रात्यक्षीक ईथे अपलोड करायची ईच्छा होती... पण वेळेअभावी ते शक्य नाहीये!)

तसेच मूळ गाणे/धृवपद एका ठेक्यात किंवा बिट मध्ये तर कडवी ऑफ बीट मध्ये असेही पंचम ने केले आहे. पण कुठेही गाण्याला धक्का लागत नाही, ऐकताना कानाला खटका लागत नाही.

आशाताई म्हणतात-"...पंचमची गाणी म्हणजे गायकाच्या ताल/लय याची परिक्षाच असे.. एरवी तालावर/समेवर/ठेक्यावर गाणे हेच आमच्या अंगवळणी पडलले पण पंचम तोच ताल ईतक्या वेगळ्या प्रकारे वापरत असे, बांधत असे की गाताना कायम सतर्क रहावे लागे."

आजकाल गाण्याची पध्दत, शब्द, मॉडीफाईड साऊंड, ई. चा वापर गाणे हॉट वा सेक्सी बनवण्यास केला जातो. पंचम ने निव्वळ रिदम च्या सहाय्याने गाणे "हॉट" केले..
जसे वेस्ट ईंडिंयन फलंदाज, गोलंदाज यांच्या अंगात एक जन्मजात लय असते, ठेका असतो. तसेच काहीसे पंचमच्या गाण्यांमध्ये एक जन्मजात लय असल्यासारखी वाटते. त्याला मिटर मध्ये न लिहीलेली गीते देखिल अपवाद नाहीत, ऊ.दा:
"मेरा कुछ सामान.."- त्यातही बेस गिटार, स्ट्रिंग गिटार, शेकर्स, अक्षरशः एव्हड्याच वाद्यावर संपूर्ण गाणे सुरू होते... अगदी धृवापदात शेवटी "मेरा वो सामान लौटादो.." ईथून तबला सुरू होतो.
"एकही ख्वाब कई बार देखा है मैने.." पुन्हा एकदा गिटार, डग्ग्यावरील थाप निव्वळ एव्हड्यावर अक्षरशः संपूर्ण गाणे रचले आहे.
' आजकल पांओ जमी पर नही पडते मेरे..." या अक्षरशः गद्य काव्याचे (गुलजार!) अशक्य सुंदर अशा गेय व मधुर गाण्यात रूपांतर करताना पंचमने मध्ये मध्ये पॉझ/गिटार स्ट्रम्स वापरले आहेत.

'क्यूं नये लग रहे है ये धरती गगन.." (१९४२ लव्ह स्टोरी) या गाण्यात "प्यार हुवा.." यानंतर तबला एका विशीष्ट पध्दतीने वाजतो- टण टणणणणण.. (अगदी तबल्याच्या शाईची थरथर देखिल ऐकू येते) त्यासाठी पंचम ने काय केले असेल कुणी सांगू शकेल? Happy (हिंट- टिपरी आणि तबला!)

अगदी जेवण बनवताना देखिल हा मनुष्य कानात हेडफोन व त्याच्या तालावर झुलत त्याच तालावर पदार्थ ढवळणे, असली कामे करत असे. जळी, स्थळी, काष्ठी.... पंचम ला फक्त गाणे, ताल एव्हडेच दिसत असे असे म्हटले तर वावगे ठरू नये. पंचम काम करताना किती भारावलेला असे याचे ऊदाहरण देताना गुलजार साहेब म्हणतात- "...मी अजून असा कलाकार पाहिला नाही ... गाण्याची चाल लावली जात आहे.. पंचम संगीत साज ई. वर काम करतोय... मध्येच कुणितरी चहा आणून देतं.. हा मनुष्य त्या अतीगरम चहात थंड पाणी ओततो आणि चहा पितो... कारण चहा थंड होईपर्यंत त्याला थांबायचे नसते आणि कामाच्या मध्ये त्याला व्यत्यय नको असतो!..."

आणि वरील सर्व फक्त हिंदी चित्रपट संगीताबद्दल आहे. त्याच्या व्यतिरीक्त पंचम ने बंगाली चित्रपट व संगीत दुनियेत केलेई अनेक गाणी, काही खाजगी अलबम, विशेषतः "पूजा अलबम्स" यातील गाणी ही अजूनही अधिक सुंदर आहेत असे त्याचे बंगाली फॅन्स शपथेवर सांगतात.

आणि एका वेगळ्याच अर्थाने पंचम चा ठसा कायमचा कोरला गेला आहे तो म्हणजे "रिमिक्स" गाण्यांच्या यादीत सर्वात जास्ती रिमिक्स गाणी ही पंचमच्या गाण्यांची बनवली गेली आहेत.

संगीतात पंचम 'प' हा अचल, अटळ सूर आहे. पंचम ऊर्फ राहुल देव बर्मन व त्याचे काम आणि त्याचा ठसा असाच अचल आहे, अटळ आहे, कालातीत आहे. अटळ आहे कारण आजचे आघाडीचे संगीतकार शंकर एहसान लॉय, विशाल भारद्वाज, ई. मंडळी हे मान्य करतात की त्यांच्या रचनांमधून पंचम डोकावत असतो, पंचमच्या सुरावटींचा प्रभाव त्यांच्या गाण्यांमध्ये कळत नकळत ऊतरत असतो; कालातीत आहे कारण आजही सर्व वयातील मंडळी ही पंचमच्या गाण्यांचा आनंद घेत असतात.

२.६ दैवयोग

"दैव जाणीले कुणी....?". खरे आहे मनुष्य कुठलाही असो, वा कुठल्याही सामाजिक पातळीवरचा असो, त्याला 'दैव' चुकत नाही. कधी सुदैव तर कधी दुर्दैव वाट्यास येते. पण व्यावसायिक कलाकाराच्या बाबतीत मात्र हेच सुदैव किंवा दुर्दैव संपूर्ण आयुष्याची दिशा बदलण्यास कारणीभूत ठरू शकते.

पंचम च्या वाट्याला देखिल असेच अनेक चांगले, वाईट दैवयोग आलेले दिसतात. पैकी काहींमूळे तो अधिक संपन्न झाला, काहींमूळे कायमचा स्वतालाच हरवून बसला. यातील काही गोष्टी तर अविश्वसनीयच वाटतात.

'दम मारो दम' हे गाणे देव आनंद ने पहिल्यांदा ऐकले तेव्हा हे गाणे विचीत्र आहे, चालणार नाही, नको घेऊया असे पंचमला कळवले. त्यावर "हे गाणे प्रासंगीक आहे बाकी इतर कुठेच व कुठल्याही दुसर्‍या चित्रपटात चालणार नाही... गाणे संपूर्ण तयार आहे तेव्हा चित्रपटात ठेवुया" असा आग्रह पंचम ने केल्यावर गाणे चित्रपटात ठेवले गेले!

'कोरा कागज था ये मन मेरा' हे गाणे शक्ती सामंता, राजेश खन्ना या सर्वांनी खरे तर नाकारले होते!

अमर प्रेम या चित्रपटाची सर्वच गाणी 'राजकुमारी' या बंगाली चित्रपटासाठी केली गेली होती आणि तो चित्रपट दणकून पडला होता.

शोले मधिल प्रसिध्द 'मेहबूबा मेहबूबा' गीत प्रथम आशाच्या आवाजात (हेलन वर चित्रीत) व्हायचे होते. पण त्या दृष्यात जलाल आगा याला घेतल्यावर ते गीत जलाल आगा साठी पंचम ने गावे यावर सर्वांचे एकमत झाले आणि एका ट्रेंड सेटींग गाण्याचा व पंचमच्या त्या विशिष्ट पध्दतीच्या गायकीचा जन्म झाला.

पंचमला दम्याचा त्रास होता. त्यावर ऊपाय म्हणून पोहण्याचा व्यायाम त्याला सुचवला गेला. पंचम ने पोहण्याचे ईतके मनावर घेतले की त्याचा दमा तर बरा झालाच पण त्यामूळे त्याचे श्वासावर प्रचंड नियंत्रण आले, फुफ्फुसांची ताकद प्रचंड वाढली- यामूळेच त्याच्या गायकीत श्वास नियंत्रणावर आधारीत विशीष्ट हरकती आल्या.

'धरम करम' या राज कपूर च्या चित्रपटासाठी एरवी शंकर जयकीशन ना घेता पंचम ला घेऊन राज साहेबांनी गाणी केली. त्यातील 'ईक दिन बीत जायेगा माती के मोल.." हे सदाबहार गीत पंचम ने ऐकवताच पहिल्याच सेशन मध्ये राज साहेबांनी ओके केले- 'हीट ट्यून है, बॉटल खोलो!"

१९८७ मधिल 'पांतेरा' (म्हणजे स्पॅनिश भाषेत- पँथर) हा पंचम व जोस फ्लोरेस या दोघांनी केलेला अंतरराष्ट्रीय संगीत अलबम अनेक वर्षे न्यू यॉर्क म्युझिक चार्ट, व संगीत जगतात टॉप टेन मध्ये होता. दुर्दैवाने भारतात त्याची फारसी प्रसिध्दी व कौतूक झाले नाही.

१९८५ च्या आसपास/नंतर पंचम ची गाणी/संगीत असलेले जवळ जवळ २५ चित्रपट 'पडले', यात सागर सारख्या चित्रपटाचाही समावेश होता. त्यानंतर १९८९ मधिल परींदा, १९९३ मध्ये गुरूदेव, १९९३ मध्ये १९४२ लव्ह स्टोरी या चित्रपटांतील गाणी अतीशय लोकप्रीय ठरली. किंबहुना १९४२ लव्ह स्टोरी साठी पंचमला (मरणोत्तर) ऊत्कृष्ट संगीतकाराचा फिल्मफेयर पुरस्कार दिला गेला.

पंचम आणि 'क्लासिकल' गाणी हे समीकरण आपल्या चित्रपटसंगीत सॄष्टीत अनेकांना मान्य नव्हते, त्याच बरोबर म्युझिक कंपन्यांच्या ('लेबल्स') धंदा, पैसा, या बळावर व दबावामूळे 'शंकराभरणम' सारख्या ऊत्कृष्ट दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी रिमेक चे संगीत मात्र व्यावसायिक दृष्ट्या तेव्हाचे 'चलनी नाणे' असलेल्या लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना सोपवले गेले. तरिही रिमेक असलेला 'सूर संगम' चित्रपट आपटलाच!

पंचमला ऊत्कृष्ट संगीतकाराचा पहिला फिल्मफेयर चा पुरस्कार 'सनम तेरी कसम' (१९८२) या चित्रपटासाठी मिळाला तोपर्यंत पंचम च्या कारकिर्दीची २५ वर्षे पूर्ण झाली होती ! 'अमर प्रेम', 'परिचय', 'यादों की बारात', यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी मात्र त्याला कधीच पुरस्कार मिळाला नाही. 'ईजाजत' साठी गुलजार व आशा दोघांना राष्ट्रीय पारितोषिक मिळाले होते, पंचम च्या वाट्याला मात्र त्या चित्रपटासाठी साधे 'नामांकन' देखिल आले नाही.

एकंदर ऊत्कृष्ट संगीतकार म्हणून १९७२ ते १९९५ पर्यंत तब्बल १५ नामांकने, पण निव्वळ ३ पुरस्कार (सनम तेरी कसम-१९८३, मासूम-१९८४, १९४२ लव्ह स्टोरी- १९९५) पंचमच्या वाट्याला आले.

१९४२ लव्ह स्टोरी चित्रपटांच्या गाण्यांचे काम करत असताना, (व आशाताई वेगळ्या रहात असताना) पंचम स्वताच्या नविन घराचेही काम करत होता. त्यावेळी एका मुलाखतकार मित्राला तो सहज म्हणला, "बस्स! अब ये घर छोडना चाहिये..!" काही महिन्यातच पंचम हे जगच सोडून गेला होता.

'लिबास' या पंचम व गुलजारच्या प्रकाशीत न झालेल्या चित्रपटातील एक गाणे खुद्द पंचम व लतादिदी यांनी जोडीने गायले होते. ज्या गायिकेबरोबर पंचम ने आपल्या कारकिर्दीची अधिकृत सुरुवात केली (गीत- "घर आजा घिर आये", चित्रपट- छोटे नवाब) तीच्या बरोबर पहिल्यांदा व शेवटचे(!) पंचमने गीत गायले होते जी कधीच प्रकाशीत झाले नाही. वैयक्तिक पंचम चे ते शेवटचे गायलेले गाणे ठरले.

जो माणूस आपल्या ३० वर्षाच्या कारकिर्दीत कायम मित्रमंडळी, हितचिंतक यांच्या घोळक्यात असायचा, ज्याने आयुष्य भरभरून जगले, प्रत्त्येक क्षण हा संगीतमय होऊन जगला, त्याच्या अंतीम काळात हा मनुष्य एकटेपणामूळे खचला, आणि अक्षरशः बाजूला कुणिही नाही अशा परिस्थितीत अंतीम समयी एकटाच हे जग सोडून गेला. मात्र 'शेवटच्या' चेंडू वर षटकार मारून गेला (१९४२ लव्ह स्टोरी) असेच म्हणावे लागेल.

"मुझे चलते जाना है" या पंचम वरील ऊत्कृष्ट डॉक्युमेंटरी मधे कवी जावेद अख्तर यांचे हे शब्द अत्यंत मार्मिक व काळजाचा ठाव घेणारे आहेत (त्याचा अनुवाद ईथे देत आहे):

.."मोहमद अली (बॉक्सर) ने आपल्या आत्मचरित्रात एक सुंदर गोष्ट लिहीली आहे- खरा चँपियन तो असतो जो जमिनीवर पडायच्या शेवटच्या क्षणाच्या वेळी आपल्या अंगातील सगळी ऊर्जा, शक्ती एकवटून समोरच्याला एक निर्णायक ठोसा (नॉक आऊट पंच) मारू शकतो. जर त्याच्या अंगात ही क्षमता असेल तरच तो खरा चँपियन असतो. पंचम ने नेमके हेच केले. परिस्थितीने त्याला हतबल केले होते, जखमी केले होते, पण तो आर. डी. बर्मन होता, खरा चँपियन होता- १९४२ लव्ह स्टोरी च्या संगीतातून तो नॉक आऊट पंचम ने देऊन दाखवला."

या लिंक वर तो भाग बघता येईलः http://www.youtube.com/watch?v=s8qhKe6f5iM (०६.०० पासून पुढे). त्या आधीचा/पुढचा भागही तितकाच हृदयस्पर्शी आहे.

पंचमच्या वैयक्तीक आयुष्यातील व व्यावसायिक चढ ऊतार याचा संक्षिप्त आढावा घ्यायला खरे तर एक वेगळाच लेख लिहावा लागेल. लेखमालिकेतील या दोनही भागांचा फोकस पंचमचे संगीत, काम, हाच होता आणि त्या अनुशंगाने त्याच्या आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टी वर नमूद केल्या आहेत ईतकेच. पण कुठल्याही कलाकाराला संपूर्णपणे समजून घ्यायचे असेल तर थोडे त्याच्या अंतरंगात देखिल डोकावून पहावेच लागते. शेवटी कुठल्याही कलाकाराची व्यक्त कला ही त्याच्या 'आतील' चलबिचल, विचारमंथन, अनुभव, याचे आरसपानी प्रकटीकरणच असते. "एक चतुर नार, गोलमाल.." सारख्या विनोदी व धम्माल गाण्यांतून, .."कुछ तो लोग कहेंगे.." च्या गेहराई पासून, .."दम मारो दम.." सारख्या बेफिकीरीतून, " ..चोरी चोरी सोलाह सिंगार.." च्या शृंगारातून, .." तेरे बिना जीया जाये ना.." च्या घरकुलामधून, "..मेरा कुछ सामान..." च्या आर्त तगमगीमधून, ते शेवटी.."कुछ ना कहो.." सारखी अंतर्मुखी रचना ही वाटचाल पंचमच्या वैयक्तीक जीवनातील देखिल समृध्द, खोलवर व व्यापक विचार व अनुभवांची साक्ष आहे.

पंचम ने चित्रपट संगीत सृष्टीला जितके दिले त्यापेक्षा अधिक माझ्या सारख्या अनेक संगीत प्रेमी व रसिकांना दिले असे- गाणे कसे ऐकावे, त्यातील बारकावे व रचनेतील गुण वैशीष्ट्ये कशी तपासावीत, गाण्याच्या निर्मिती प्रक्रीयेतील सूर, ताल, लय, शब्द, गायकी, तंत्र, ई. ची एकत्रीत वीण कशी करावी, आणि गाण्याच्या प्रकटीकरणाला आवश्यक 'ध्वनी' चे विज्ञान व वापर कसा असावा अशा अनेक गोष्टी पंचम ची गाणी ऐकत असताना नकळत शिकायला मिळतात. स्वतःच्या प्रतिभा व कले ईतकेच ऐकणार्‍यालाही श्रीमंत करणार्‍या या अशा कलाकाराची कला 'चिरायु' आहे!

('नमकीन'- १९८१- गुलजार, आर.डी., किशोर):

"जल गये जो धूप मे तो साया हो गये
आसमां का कोई कोना थोडा सो गये
जो गुजर जाती है बस, ऊसपे गुजर करते है|

ऐसे ऊजडे आशियाने तिनके ऊड गये
बस्तीयों तक आते आते रस्ते मुड गये
हम ठहेर जाये जहां ऊसको शहर कहेते है|

... खुश रहो एहेले वतन हम तो सफर करते है....

भाग २ समाप्त.
[पुढील भागात पंचमची टॉप टेन गाणी].
पुढील भाग
लेखनातील शुध्दलेखनाच्या चूकांबद्दल दिलगीर आहे.

**************************************************
संदर्भः
१. मुलाखत- फिल्मफेयर, जून, १९८४.
२. R.D. Asha Interface- Interview by Girija Rjendaran, 1989.
3. आशा भोसले मुलाखत- 'राहुल अँड आय', जितेश पिलाई.
४. R.D. Burman an unpublished interview by Sheila Vesuna, Feb 1994.
5. What makes Pancham Tick- article/interview by Chaitanya Padukone
6. Varius articles on www.panchamonline.com
7. Pancham Strings Of Eternity, Compilation- Brahmanada Singh & Gaurav Sharma, 2009.
8. Pancham Unmixed- Mujhe Chalate Jana Hai- a film by Bhramanand Singh
9. Anecdotes and quotes on R.D. Burman available online and in various music CDs.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप माहितीपूर्ण लेख....... मस्तच लिहिलाय.
संगीतावर आणि आवडत्या संगीतकारावर नितांत प्रेम असलेलाच इतकं सगळं लिहू शकेल.
यापुढे गाणी ऐकताना लेखातील लक्षात राहिलेली माहिती आठवत राहील.

धन्स लोक्स!

चिमण,
नक्की ऐक रे आणि 'नविन' काही वेगळे सापडलेच तर इकडेही लिही..

>>संगीतावर आणि आवडत्या संगीतकारावर नितांत प्रेम असलेलाच इतकं सगळं लिहू शकेल.
भिडे साहेब तुम्हाला 'संगीत' म्हणायचे आहे ना? Wink

अगदी हरवलो होतो हे वाचताना. सुंदरच जमलाय.

आशाचेच एक गाणे असे दोन आवाजात होते. मला शब्द आठवत नाहीत पण बहुतेक, जुन्या गोलमाल मधले होते. आणखी एक गाणे होते, " ऊलझन हजार कोई डाले, रुकते कहा है दिलवाले.. नि निन्ना निन्ना" हे पण आशाचेच होते. दोन्ही बहुतेक पंचमचीच होती. या गाण्यात पण असा प्रयोग, झाला होता असे वाटतेय.

आता असे वाटतेय, आजचे आधुनिक तंत्र जर आर्डीला लाभते तर ! ( थोडक्यात आज आर्डी असता तर ! )

संगीतावर आणि आवडत्या संगीतकारावर नितांत प्रेम असलेलाच इतकं सगळं लिहू शकेल>>>>>+१
योग,

फार सुंदर लेख. (आपला अभ्यास्/परिश्रम दिसतात).

वेळ मिळाल्यास आणखी इतरांवरही लिहाल का.. उदा. खय्याम, हृदयनाथ मंगेशकर. खळे..

धन्यवाद.

हा भाग पण मस्तच रे!! Happy
काही वर्षापूर्वी मला समग्र आर.डी (हिंदी+बंगाली) मिळाला होता. त्यातला बंगाली मी जागे अभावी डीलिट केला होता Sad

मनस्मि,
धन्यवाद!
>>वेळ मिळाल्यास आणखी इतरांवरही लिहाल का.. उदा. खय्याम, हृदयनाथ मंगेशकर. खळे..
अरे बापरे......... [पंचम पूर्ण होईपर्यंत तोंडाला फेस आला आहे]. Happy

खय्याम बद्दल माझा तेव्हडा अभ्यास नाही.. पं. हृदयनाथांवर लिहायचा प्रयत्न करू शकेन. माबो वर यातील बरीच 'जाणकार' मंडळी आहेत जी लिहू शकतील..

मॅsssssड झालाय अख्खा लेख. अधाशासारखा वाचला.
योग, इतकी माहिती जमवून त्यचं इतं सुंदर संकलन.... विलक्षण चिकाटी आणि प्रेम.. संगीतावर आणि आर्डीवरही Happy
तुला खरच सांष्टांग नमस्कार आहे, रे.

हा लेख कदाचित पुन्हा एकदा (किंवा पुन्हा पुन्हा ) वाचावा लागेल. नंतर प्रतिक्रिया देईन (खरं तर इतक्या चांगल्या लिखाणावर फक्त पोचपावती देणेच योग्य राहील).

चांगला बैठक मारूनच लिहिलेला दिसतो आहेस रे लेख Happy
जमून आलाय एकदम. मला तर व्यवस्थित लक्ष्य देऊन, गाणी पुन्हा पुन्हा आठवून आणि काही तर ऐकूनही वाचावा लागला. बराच वेळ लागला त्यामुळे वाचायला. पर मजा आ गया पढने में.

तू अगदी 'आर्डी शहाणे' करून सोडावे सकळ जन असं मनावरच घेतलेलं दिसतंयस.
मराठीत किती मार्क्स असायचे रे तुला शाळेत? मुद्दे, पॅराज, फोटोज सगळं नेमकं झालंय म्हणुन विचारलं.

>>मराठीत किती मार्क्स असायचे रे तुला शाळेत? मुद्दे, पॅराज, फोटोज सगळं नेमकं झालंय म्हणुन विचारलं.

दुखती नस.. 'शुध्दलेखनाचे' वजा करता बाकी सर्व मिळायचे Happy

[विषय निघालाच आहे म्हणून-दहावी च्या बोर्डात मराठी मध्ये २ मार्काने पहिला क्र. हुकला होता, आणि ६ मार्काचे 'पत्र' लिहायचे राहिले होते वेळ पुरला नाही म्हणून. पहिली आली होती आमच्याच वर्गातील जोशी नावाची मुलगी- ८८/१०० Happy काही गोष्टी कधीच विसरल्या जात नाहीत नाही का?]

हा प्रतिसाद इथे अयोग्य वाटल्यास सांगावे. बदलून लिहीन.
खरं तर प्रतिसाद लिहावा या स्थितीतच नाहीये. हक्काबक्का कि काय तशी अवस्था झालीये. माझा एक खूप जुना प्रश्न आहे, कुणाला विचारावा ते समजत नव्हतं.. हल्लीचं रेकॉर्डिंग पाहीलेलं असल्याने मिक्सिंगची थोडीफार कल्पना आहे. पण आरडीने इजाजत मधे कतरा कतरा या गाण्यात आशाताईंचा आवाज कोरस मधे आणि ते ही दोन वेगळ्या ट्रॅकवरून घेतल्यासारखा कसा काय घेतला ? त्याकाळी वेगवेगळे ट्रॅक्स होते का ? (यातलं ज्ञान जवळ जवळ नाहीच म्हणून जागा मोकळी सोडल्याने त्याच ट्रॅकवर पुन्हा रेकॉर्डिंग कसं घेतलं असावं हा एक भाबडा प्रश्न आहे. )

जवानी दिवानी तर त्याही आधीचा आहे. त्यातही जाने जा, ढूंढता फिर रहा चं मिक्सिंग कसं केलंय ? त्या काळी तर संपूर्ण गीत वन टेक मधे होत असेल ना ? दोन गायक वेगळे असले तरी या गाण्यात ऐकताना जो वेगळाच फील येतो तो त्या काळच्या कुठल्याही गीतात नाही असं का ? कतरा कतरा तर कोडंच आहे. कारण एकाच गायिकेचा आवाज !! इथे दिलेल्या स्पष्टीकरणा नंतरही मला नीट समजलं नाही ते.