पैशात फार थोड्या भागेल एक दिवशी,...

Submitted by हर्षल_चव्हाण on 16 February, 2013 - 12:25

देवपूरकरांच्या ह्या गझलेतील मतल्यातील 'समजेल एक दिवशी' घेऊन ही रचना झाली.

पैशात फार थोड्या भागेल एक दिवशी,
प्रेमात सर्व आहे, समजेल एक दिवशी...

दु:खास अंत नाही, समजून वाग ना तू,
सुख भोगण्याची तर्‍हा, बदलेल एक दिवशी...

सांभाळ तू घराला, अंधार मी पहातो,
समई उजेड देती, गवसेल एक दिवशी...

नि:शब्द प्रेम माझे, सांगू कसे तुला मी?
विसरावयास दैन्य, विनवेल एक दिवशी...

आहे जरी कफल्लक, दिलदारही मी आहे,
जागा तुझ्या मनी मी मिळवेल एक दिवशी...

आभाळ फाटलेले, दे हात तू जरासा,
लढतोय एकट्याने, उसवेल एक दिवशी...
---------------------------------------------------------------
हर्षल (१६/२/१३ - रात्रौ. १०.३५)
---------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हर्षल!
ही रचना गझल रचना आहे! छान आहे, बारीकसारीक वृत्तदोष सोडल्यास!
गझल विभागात हलवावी!
प्रा.सतीश देवपूरकर

धन्यवाद सतिशजी Happy
२४ मात्रांच्या ओळी आहेत सर्व. मात्रावृत्तात गझल होऊ शकते ना?

हर्षल, प्रयत्न चांगला आहे.
मतल्यामध्ये गागालगा लगागा *२ हा क्रम निश्चित झाल्यामुळे तोच क्रम सगळीकडे पाळावा लागेल.

सुख भोगण्याची तर्‍हा, बदलेल एक दिवशी...

आहे जरी कफल्लक, दिलदारही मी आहे,
>> वृत्त गडबडलंय!

नि:शब्द प्रेम माझे, सांगू कसे तुला मी?
>> सहज मिसरा! आवडला..

विसरावयास दैन्य, विनवेल एक दिवशी...
>> "न्य" लघु आहे, गुरू नाही.

जागा तुझ्या मनी मी मिळवेल एक दिवशी...
>> मी मिळवेन असं हवं ना? (याला नंतर मी "काफियासाठी वाट्टेल ते" असं म्हणेन ;))

पुन्हा लिहितो, प्रयत्न चांगला आहे, खयाल अजून नीट आणि स्पष्ट मांडता यायला हवे आहेत. संदिग्धतेमुळे आपल्याच शेराचं स्पष्टीकरण द्यावे लागू नये... तू गझल लिहायला नुकतीच सुरूवात केली आहेस, त्यामुळे याकडे नीट लक्ष द्यावेस अशी सुचवणी. Happy

सविस्तर तरीही संक्षिप्त प्रतिसादाबद्दल धन्स आया Happy

<<<"न्य" लघु आहे, गुरू नाही.>>> ही चूक निसटली खरी माझ्याकडून.

अजुनही बर्‍याच चुका, माझ्याच मला सापडतायेत, सुधारेल Happy

अक्षरगणवृत्तात लिहिले की आपोआप मात्रा बरोबर येतातच दोन्हीतला फरक अजून स्पष्ट बाणवावा
असो गझल छानच आहे

धन्स सुप्रियाताई Happy
वैभव : मान्य, पण अक्षरगणवृत्त बर्‍याचदा योग्य शब्द ऐनवेळी सुचत नसल्यानं (माझ्याबाबतीत तरी अजून) अडतं. त्यामुळे मात्रांचा प्रयत्न केला. इथून पुढे सुधारणा होईल Happy

अजून एक,
एक दिवशी हे व्याकरणदृष्ट्या अयोग्य आहे. एखाद्या शेरामध्ये तडजोड म्हणून चालून गेलं असतं, रदीफ म्हणून असं चुकीचं निवडल्यावर गझल नीट वाचणार्‍यांची त्यातली मजा जाते Happy

ज्या रचनेवरून मला हे सुचलं, त्यावरचा प्रतिसाद मी वाचला आधीच, त्यामुळे आता हे असंच राहू द्यावं की अ‍ॅडमिनला सांगून हा धागा उडवावा, ह्या विचारात आहे Sad

हर्षल,

मला तरी गझल बर्‍यापैकी वाटली. उडवता कशाला?? क्रिटीसिझम सकारात्मक रित्या स्वीकारायला शिका.
प्रयत्न करत रहा.

शुभेच्छा!

हर्षल,,
तुमचा प्रयत्न चांगला आहे.
परंतु, वर दिल्या गेलेल्या सूचनांवर विचार होणे गरजेचे आहे हे अर्थातच तुमच्याही लक्षात आले असेलच.

"हे असंच राहू द्यावं की अ‍ॅडमिनला सांगून हा धागा उडवावा, ह्या विचारात आहे" >>> कशाला उडवता ?
सुधारणा कशी व्हावी/करावी याबाबत तुम्हाला आत्मीयतेने सकारात्मक सूचना केल्या जातायत, ही भाग्याची
गोष्ट आहे. त्याबाबात गांभीर्याने विचार करावा असे वाटते.
फक्त एकच गोष्ट सांगू का ?
कविता मनात स्फुरली तरच लिहावी. बर्‍याच दिवसात काही लिहिलं नाही म्हणून लिहू नये.
मनात कविता स्फुरणे आणि ती कागदावर उतरून अखेरीस प्रकाशित केली जाणे यादरम्यान
'संस्करण' हा महत्वाचा भाग असतो, जो मला तरी फार महत्वाचा वाटतो.
अर्थातच संस्करण करत असताना कवितेचा आत्मा जपूनच केले जावे.
असो.....

पुलेशु.

मनस्मी आणि उकाका : मी पुर्णतः सहमत आहे आपल्या दोघांच्याही मताशी Happy मला सुधारणेला खूप वाव आहे आणि मी ती करेल असं मी वरच म्हटलंय. गझल लिहिणे हा प्रकार नवीन आहे माझ्यासाठी. यात्रीने सांगितलेल्या सुधारणा मला कळल्या. त्यामुळे जर अचुकतेचे सर्व निकष लावायचे झाल्यास ही गझल पूर्ण झाली नाहीये असंच म्हटलं जाईल. म्हणून मला ती ठेवावी की नाही हा प्रश्न पडला होता. किमान, मी आधी ही कवितेतच पोस्ट केली होती, ती पुन्हा तिथेच हलवावी का असाही. आणि उगाच प्रतिसाद देऊन वर आणण्यापेक्षा <<<आता हे असंच राहू द्यावं की>>> हे ही वर लिहिलंय Happy

आणि उकाका : संस्करणाबद्दल तुमचे मत योग्यच आहे Happy