सदस्य प्रवेश |
जाने क्यां तुने कही..साहिर.. म्हणजे जादू. सात आठ वर्षांपूर्वी पंचप्रयागच्या ट्रेकवर असताना साहिर दोन वेळा अचानक भेटला. आधीही भेटला होता पण आता भेटला तेव्हां .. जो खत्म हो किसी जगह ये ऐसा सिलसिला नहीं हे जाणवून गेलं. रुद्रप्रयागपासून ट्रेक सुरु झाला होता. बर्फ़ाळ पहाटे चंद्राची फ़िक्कट कोर आणि भोवती धूसर ढग. आम्ही होतो तिथून फ़क्त दहा पावलांवर. थरथरायला झालं भितीने उगीचच. नशीब आत्ता वर आकाशात फ़िकट का होईना चंद्र होता. आम्ही कॉर्बेटच्या वाचलेल्या ऐकलेल्या गोष्टी सांगत तिथल्या चहाच्या छोट्या टपरीबाहेरच्या बाकड्यावर टेकलो. पहाटेच्या सन्नाटा आता खूपच गडद वाटत होता. ढगाळ वातावरण. उजाडायलाही वेळ होता. दवाने ओलसर झालेली जमीन. काठावरचं जंगल ज्यांत आता आम्हाला शिरायचं होतं. जिम कॉर्बेटच्या नावाचा फ़लक असलेला तो दगड, पर्वतांच्या उंच कड्यांवरुन खाली झेपावत येणारे ते जंगल. खोल दरीतून फ़ुसांडत आवाज करत वहाणारी बियास. सगळे आपोआप शांत बसून होते. अपरिचीत पहाट. वरचा चंद्र पण त्या जंगलातलाच वाटत असल्यासारखा. अनोळखी. टपरीवाला चहाचे ग्लास कधी हातात आणून देतो ह्याची वाट पहात गारठलेली बोटे एकमेकांत गुंतवून सगळेच चुपचाप. रात भी है कुछ भिगी भिगी कॉर्बेटच्या गोष्टींमधली अंगावर काटा उमटवणारी भिती कुठच्या कुठे गेली. कातडीवर नवे रोमांच उठले. दवभरल्या पहाटेच्या धूसर अंधाराचा, आकाशातल्या चंद्रकोरीचा आणि त्या शिरशिरीचा संबंध थेट साहिरच्या शब्दांशी जाऊन भिडत होता. वरच्या आकाशातला चंद्राचा तुकडा आता फ़िकट झाला पण भोवतीच्या चांदण्यांचा सडा नजर मोहवून टाकायला लागला. सब के दिल पर युं गिरती है जलते हुए जंगल पर जैसे जयदेव ने त्या शब्दांत घुंगरांची आणि तबल्याच्या ठेक्यांची जान ओतली होती. होश में थोडी बेहोशी हैं रात भी कुछ भिगी भिगी अहा... रुद्रप्रयागच्या त्या जंगलात रात्र्-दिवसाच्या धूसर सीमेवर फ़िक्या चंद्राला तळहातावर घेऊन भेटलेला साहिर. क्षणापूर्वी भीषण वाटणार्या जंगलातल्या पहाटेला आणि अनोळखी चंद्राला आपल्या शब्दांच्या जादूने भुलवत आमच्या अगदी जवळ आणून पोचवणारा साहिर मग ट्रेक संपताना पुन्हा भेटला. शेवटच्या रात्री पूर्ण चंद्र आकाशात होता. बियासचा काठ, समोरच्या टेकडीवरच बर्फ़ाळ धुक्याने वेढलेलं चांदण्यांच्या प्रकाशात जास्तंच एकाकी वाटणार एक कोणतंतरी छोटं देऊळ. आणि बियासच्या दुसर्या काठावर ट्रेकची शेवटची कॅम्पफ़ायर साजरी करताना नेहमीच साकळून येणारी उदासी मनात वागवत कॅम्पलिडरने हातात दिलेला बोर्नविटा घातलेला दुधाचा कप हातातं पकडून तो पिवळसर चंद्र पहात शेकोटीभोवती गोल करुन बसलेले आम्ही. केदार गाणी म्हणत होता. हे म्हण, ते म्हण असं काहीही आम्ही सुचवत नव्हतो. समोरचा चंद्र पाहून सुचतील, आठवतील ती गाणी तो म्हणत होता. आम्ही ऐकत होतो.. कोने कोने मस्ती फ़ैल रही है चूप है धरती चूप है चांद सितारे... आकाशातला चंद्र आता अगदी माथ्यावर आला. साहिरच्या श्ब्दांमधलं ते डुबतं दिल. बियासच्या समोरच्या काठावरची पांढरी शुभ्र बारीक वाळू आणि दगड बर्फ़ाच्या चुर्याप्रमाणे चमकू लागले... तरुण चंद्र आपल्या उभार सौंदर्याची जादू आसपास पसरवीत होता.. निखरा निखरा सा है चांद का जोबन मधरात्र कधीच उलटून गेली. सहा वाजता निघायचय झोपा आता. कॅम्पलिडरने टेन्टबाहेर मान काढून हाक मारली. तसेही शेकोटीतल्या निखार्यांवरही आता राख साचायला लागली होती. थंडी वाढली होती. आणि मग ते शेवटचं गाण! बिछड गया हर साथी देकर पल दो पल का साथ दुसर्याच्या दु:खाने कळवळून रडू फ़ुटण्याची ती माझी पहिली वेळ. प्यासा प्रत्यक्षात खूप उशिरा पाहीला. पण त्यातल्या विजयच्या कवीहृदयाची भग्नता साहिरच्या शब्दांतून त्या रात्रीच अचूक मनापर्यंत पोचली होती. प्यासातल्या विजयमधे साहिर होता कारण साहिरच विजय होता. इस को ही जीना कहते है तो यूं ही जी लेंगे जाने वो कैसे लोग थे जिन के प्यार को प्यार मिला.. त्यानंतर अनेक वर्षांनी परत एकदा तसंच आतून फ़ुटून रडू बाहेर आलं होतं. तेव्हा फ़ाटून टाकणारं दु:ख माझं एकटीचं होतं. पण तेव्हाही साहिरचेच शब्द सोबत होते.. जे ते दु:ख शब्दांत मांडू शकले. तुम ना जाने किस जहां मे खो गये त्यातली परत ती डुबती नजर. आओ तुमको देख लें डुबती नजरोंसे हम बियासच्या काठावर कोजागिरीच्या चंद्रासोबत भेटलेला साहिर नंतरही अनेकदा भेटला. भेटत राहीला. फ़ैली हुई है सपनोंकी बाहे असं म्हणत.. आजा चल दे कहीं दूर.. सांगत. प्रत्येकच गोष्ट त्याची आणि तिची असते. म्हंटल तर नेहमीचीच. पण साहिर च्या तोंडून ती ऐकताना इश्क तोहमत असली तरी काय झालं? वो तोहमत उठाने को जी चाहता है.. म्हणावसं वाटलं!.. नेहमीचंच रुसना मनाना.. पण साहिर म्हणतो.. किसी के मनाने में लज्जत जो पायी वो फ़िर रुठ जाने को जी चाहता हैं .. तेव्हां दिल खुश होऊन जातं.. त्याचं तिचं आणि दुनियेचंही. त्याची आणि तिची ती गोष्ट फ़ुलत जाताना साहिर भेटत राहणं अपरिहार्य असतं. साहिरच्या गाण्यांमधून सामोर्या येत रहाणार्या त्या जादूभर्या रात्री आणि ते चंद्र.. कधी त्या रात्री ची दास्तां सांगणार्या. जेव्हां ती भेटली होती... हाये जिस रात मेरे दिल ने धडकना सिखा आयुष्यातल्या सर्वात बेहतरीन रात्रीला 'रात की रात' साहिरनेच म्हणावं. साहिरचे शब्द अजब होते. जादूभरे होते. नजरेतली कश्म्कश व्यक्त करत ती त्याच्याकडे व्याकूळ नजरेनी पहात असते. पण आता ती परकी झालेली असते. अशावेळी साहिरच्या शब्दांतला तो तिच्या त्या नजरेला काय सुंदर शब्द वापरतो.. न तुम मेरी तरफ़ देखो गलत अंदाज नजरोंसे... वाह! तुम्हें भी कोई उलझन रोकती हैं पेशकदमी से त्या आधीच्या भेटींमधला साहिर असा सावध नव्हता कधीच. उलट शृंगारातला धीट थेटपणा व्यक्त व्हावा तो त्याच्याच शब्दांतून.. परत एक रात्र साहिरचीच. तिला शरमा के न यूहीं खो देना रंगीन जवानी की घडियां असं सांगतानाच .. दूर राहू नकोस सांगणारा तो त्याच्या शब्दांतला उघड रोमान्स दूर रह कर ना करो बात करीब आ जाओ एक मुद्दत से तमन्ना थी तुम्हें छूने की ती संकोचत रहाते तेव्हां साहिर म्हणतो.. इस कदर हम से झिझकने की जरुरत क्या है... झिझकना काय अचूक शब्द.. तिच्या आणि त्याच्या पहील्या नजरभेटीचा तो जादूभरा खेळ सांगताना साहिरने म्हणावे.. सनसनाहट सी हुई थरथराहट सी हुई जाने क्या तुने कही.. साहिर अनेकांना अनेक कारणांसाठी आवडतो. त्याच्या कवितांतून दिसणारा सामाजिक राजकिय आशय, स्त्रियांबद्दलचा त्याचा आदर, त्याच्या प्रेमातली ती कडवाहट.. त्याचे उर्दू नजाकतदार शब्द.. कित्येकदा ते नक्की काय आहेत ते समजणंही कठीण अर्थ तर पुढचीच गोष्ट. पण तरी ते कधी खटकत नाहीत. त्याचा अर्थ हृदयाला कळलेलाच असतो. वो घडी मेरे लिये ऐश की तमहीद हुई. मधला तमहीद म्हणजे काय हे आधीच्या जिस घडी मेरी निगाहोंको तेरी दिद हुई.. मधून आधीच उलडलेला असतो. अनेकदा त्याचं शब्दांशी खेळणं किती लोभस असतं. हा दिद शब्द तर त्याने अनेकदा इतक्या खुबसुरतीने वापरलाय.. मुझे मिल गया बहाना तेरी दिद का साहिरचा तो जेव्हा तिला भेटून आल्यावरही तेरा खयाल दिल से मिटाया नही अभी.. म्हणतो आणि वर तिला सांगतो.. बेहोश होके जल्द तुझे होश आ गया खरंतर त्याला तिला सोडून यायचेच नसते. ते मखमली गाणं त्याच्या ह्या हट्टातूनच तर फ़ुललंय! कोणं विसरणार ते? प्रत्येकच त्याने अनेकदा तिला सोडून जायची वेळ आल्यावर गुणगुणलय ते.. ये शाम ढल तो ले जरा अभी न जाओ छोड के.. के दिल अभी भरा नहीं.. तो आणि ती भेटतात तेव्हाचा दोघांच्या दिलाचा मदहोश माहोल व्यक्त व्हावा साहिरच्या शब्दांतून.. मग ते हम जब सिमट के आप के बाहों में आ गये म्हणतानाचं दोनों जहान आज गवाहों में आ गयें.. असो किंवा ते बेहतरीन ड्युएट .. ये बोझल घटायें बरसती हुई... धडकने लगी दिल की तारों की दूनियां.. साहिरने आपल्या तल्खीयां मधे तो जेव्हा तिला भेटत नसतो तेव्हाची त्याची स्थिती इतकी सुंदर लिहिलेली आहे.. तु मेरे पास न थी फ़िर भी सहर होने तक साहिर ने हिंदी चित्रपटासांठी गाणी कधी लिहिलीच नाहीत. लिहिल्या त्या फ़क्त कविता.. देखा है जिंदगी को कुछ इतना करीब से.. मधे तो लिहितो.. कहने को दिल की बात जिन्हें ढूंढते थे हम इतरांना कशासाठीही आवडत असो साहिर मला आवडतो ते पुन्हा पुन्हा त्याच्या शब्दांतून भेटत रहाणार्या रात्रीं साठी आणि रात्री दिसत रहाणार्या चंद्रा साठी. . त्याच्या तिला मनवत असतानाही दिसणार्या ऎटीट्यूड साठी.. मुलाकात पर इतने मगरुर क्यों हो.. हमारी खुशामत पे इतने मजबूर क्यों हो.. विचारावं ते साहिरनेच. . किंवा तख्त क्या चीज है और लालो जवाहर क्या है जुल्म ए उल्फ़त पे हमें लोग सजा देते हैं इतक्या सगळ्या मुलाकाती.. इतकं सगळं उधळून टाकलेलं प्रेम.. तरीही ताटातूट अटळच असते. अफ़साना अंजाम चं रुप घेऊ शकलेलाच नसतो. हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक.. असं वचन दिल्यावर प्रत्यक्षात कायमच्य विरहाचीच कयामत येऊन ठेपते. त्या शेवटच्या भेटीत तो तिला कळवळून विचारत रहातो.. मैं ये ख्वाहिश ये खयालात किसें पेश करुं.. रंग और नूर की बारात आता कोण सजवणार? इश्क की गर्मी.. सुलगते हुए दिन रात आणि ते सारे जजबात आता कोण पेश करणार? कुणासाठी? .. तुम्हारी हैं तुम ही सम्हालों ये दुनियां म्हणत तो तर केव्हाच निघून गेलाय. आज सुद्धा आकाशात तोच कोजागिरीचा चंद्र आहे. स्वत:च्या शब्दांतून इतक्या सुंदर रात्री आणि त्या रात्री दिसत रहाणार्या चंद्रांचे तितकेच सुंदर दीदार करवणार्या साहिरने आजच्याच चंद्रभरल्या रात्री ह्या दुनियेतून रुखसत घेतलेली असावी हा काय अजब योगायोग? 25th Oct.ला साहिर गेला तेव्हां मागे फ़क्त एकच चुकीची ओळ लिहून गेला.. तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक हैं तुमको.. चुकीचं नव्हतं का ते? |
|
हे कोजागिरीच्या निमित्ताने. फक्त तिथलं इथे.
साहिरच्या गाण्यात जे काय होतं ते सगळं सगळं त्याच्या आत्म्यातून जसंच्या तसं उतरलेलं.
त्याच्या शब्दांतली आर्तता त्याच्या तेवढ्याच आर्त आयुष्यातून उतरलेली. त्याचं आयुष्यही नेहमीच भावनांच्या वादळांनी भरलेलं.
फक्त साहिरसाठी प्यासाची किती पारायण झाली.
'ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है....' यात 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' याच्या एवढाच प्रचंड आशय आहे.
प्यासा भावनिक पातळीवरचा तरीही तेवढाच संयत. साहिर आणि गुरुदत्तनं सगळ्यांना हे नितांत सुंदर शिल्प अगदी जगवलंय.
साहिर आणि गुलजार दोघेही कधीकाळी एकमेकांचे शेजारी होते............... मला कल्पनाच करवत नाहीये त्यांचे इतर शेजारी आयुष्याच्या त्या गुढ,धुकेजलेल्या वाटांवर कित्तीवेळा फिरून आले असतील. हेवा वाटतो मला त्यांचा.
अल्ला तेरो नाम, ऐ मेरी जोहरा-जबीं, जाने वो कैसे लोग थे....,जो वादा किया वो, छू लेने दो नाजूक.... ही साहिरची अजुन काही प्रसिद्ध अप्रतिम शिल्प.
माफ करा ट्यूलिप 'बियास जवळच्या रात्री तुम्हाला भेटलेला साहिर आणि तुमचा त्याच्याबरोबरचा प्रवास' हे सोडून जरा विषयांतर झालं, पण रहावलंच नाही.
अप्रतिम गायलंय तुम्ही, लिहिलंय नाही म्हणणार कारण मी ते गातगातंच वाचलं.मोहरून आलं अगदी.
साहिर म्हणजे जादू>>.......... साहिर ऐकल्यावर किंवा वाचल्यावर ती जादू कधी ओसरूच नये असं वाटतं नाही !
चित्रलेखामधलं 'मन रे तू काहे ना धीर धरे......' असं फक्त साहिरचं लिहिणं जाणो.
-----------------------
2b || !(2b)
क्या बात है!
सुंदर लेख!
रुद्रप्रयाग (जोडीने कर्णप्रयाग, जोशीमठ, बद्रि, केदार आणि बरेच काही. जरा डावीकडे गेलं की कुमाउंची राणीखेत, बागेश्वर)आणि साहिर. हुळहुळती जखम.
कौन रोता है किसी और की खातिर ए दोस्त
सब को अपनीही किसी बात पे रोना आया..
Home, home again.
I like to be here when I can.
When I come home cold and tired
It's good to warm my bones beside the fire.
Far away across the field
The tolling of the iron bell
Calls the faithful to their knees
To hear the softly spoken magic spells.
मगर ये हो न सका और अब ये आलम है!!! हे असं फक्त साहिर नेच लिहावं आणि अमिताभच्या गहिर्या आवाजानेच ऐकवावं..
टयु, सुन्दर लिहिलं आहेस.. specially 'तुम ना जाने किस जहा मे खो गये' ..
-क्षण दरवळत्या भेटींचे अन हातातील हातांचे
हे खरेच होते सारे का मृगजळ हे भासांचे
व्वा सुंदर!!
फारच छान लेख. साहिर हा माझाहि अत्यंत आवडता शायर. ज्या काळात सिने-संगीतात अजूनहि कसदार काव्याची कदर केली जात असे त्या काळात साहिरची पावलं चित्रपटसृष्टीकडे वळली हे आपलं भाग्य. अन्यथा त्याची कविता जनसामान्यांपर्यन्त पोचणं जवळ जवळ अशक्य होतं.
उर्दुचं फारसं ज्ञान नाही अशांनाहि समजेल अशी काहीशी सोपी उर्दु त्याने वापरली पण त्यामुळे काव्यगुणात कुठे कमतरता येऊ दिली नाही हे त्याचे आपल्यावरचे उपकारच म्हणायला हवेत. साहिरचा दुसरा उपकार म्हणजे फाळणीनंतर तो पाकीस्तानात गेला होता, पण तो थोड्याच दिवसांत परत भारतांत आला!
बाय-द-वे, साहिर या शब्दाचा अर्थ 'जादूगार' असा आहे! किती समर्पक!!
साहिर-चाहत्यांनी जरूर वाचावं मधव मोहोळकरांच्या 'गीतयात्री' पुस्तकांतलं ' अश्कोंने जो पाया है ' हे प्रकरण.
बापू करन्दिकर
आजचा दिवस मस्त जाणार आता !!
अजून दिवाळीपर्यंत शायरीची अशीच मेजवानी मिळू दे. !
ट्युलिप,
मस्त लेख! खास फुरसत काढून लिहीलाय वाटतं. प्रिंट काढून संग्रहात ठेवला तर चालेल का? अर्थात तुमची काही हरकत नसेल तरंच.
वाह !
"जाने वो कैसे लोग थे जिन के प्यार को प्यार मिला.. " या एकाच ओळीतून तो सुन्नाट करून टाकतो.
***
सर्वे जन्तु रुटिना: | सर्वे जन्तु निराशया: |
सर्वे छिद्राणि पंचन्तु | मा कश्चित् दु:ख-लॉग् भरेत् |
अहाहा. ट्युलिप.. काळजाला हात घातलास की गं..
गम और खुशीमें फर्क न महसुस हो जहाँ
मै दिलको उस मकामपें लाता चला गया
ट्युलिप, फार फार सुंदर लिहिल आहेस. पुन्हा एकदा कोजागिरीच चांदण हळव करून गेलं.
सुरेख लिहिलंयस...... तिकडेही वाचलं होतंच पण इकडे टाकल्यावर अजुन सुंदर वाटलं.
फारच छान लेख. साहिर हा माझाहि अत्यंत आवडता शायर. ज्या काळात सिने-संगीतात अजूनहि कसदार काव्याची कदर केली जात असे त्या काळात साहिरची पावलं चित्रपटसृष्टीकडे वळली हे आपलं भाग्य. अन्यथा त्याची कविता जनसामान्यांपर्यन्त पोचणं जवळ जवळ अशक्य होतं.
उर्दुचं फारसं ज्ञान नाही अशांनाहि समजेल अशी काहीशी सोपी उर्दु त्याने वापरली पण त्यामुळे काव्यगुणात कुठे कमतरता येऊ दिली नाही हे त्याचे आपल्यावरचे उपकारच म्हणायला हवेत. साहिरचा दुसरा उपकार म्हणजे फाळणीनंतर तो पाकीस्तानात गेला होता, पण तो थोड्याच दिवसांत परत भारतांत आला!
बाय-द-वे, साहिर या शब्दाचा अर्थ 'जादूगार' असा आहे! किती समर्पक!!
साहिर-चाहत्यांनी जरूर वाचावं मधव मोहोळकरांच्या 'गीतयात्री' पुस्तकांतलं ' अश्कोंने जो पाया है ' हे प्रकरण.
बापू करन्दिकर
खुपच सुंदर लिहिल आहेस. आजची कोजागिरी साजरी केलीस.... सुरेख.....
ट्युलिप फारच सुंदर लिहिलयंस. अप्रतीम!!!!!
जियो ट्यु!!!
फार फार सुरेख!!!!!!!
..............
कुणा आवडे चकली, कुणा कानोल्यात सुख; दिवाळीच्या फराळाचा, माझ्या पोटोबाला धाक!!!!
ट्यु - असाच एकदा संपूर्णसिंग गुलजार आणि चंद्र ह्यावर पण लिही ना.
अप्रतिम!!!
अप्रतीम.... फार सुंदर आहे हे सगळं.... खरंच गुलजार वर लिहि ना.
काल काही कारणाने कोजागिरी नाही साजरी करु शकलो.
ती रुख्ररुख आज दुर झाली. धन्यवाद.
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.
छानच!!!! हल्लीच्या काळात, जावेद आणि गुलजार (ह्या कवींविषय अतिशय आदर आहे आणि कुठेही तुलना करण्याचा माझा विचार नाही) ह्याच्या जमान्यात, साहिरवर लेख लिहील्याबद्दल आभार. ज्याने "ताजमहाल" चित्रपटात रोमँटिक गाणी लिहीली त्यानेच "मेरे मेहबूब कही और मिलाकर मुझको..... एक शहनशाहने दौलत का सहारा ले कर, हम गरीबों की मुहोब्बत का उडाया है मजाक" सारखी जळजळीत कविता त्याच ताजमहालाबद्दल लिहीली.
टीपः करंदीकरांनी लिहीलेले "गीतयात्री" अवश्य वाचावे. जराही गॉसिप न करता, साहिर, शैलेंद्र, मजरुह्..ई. वर अभ्यास्पुर्ण लेख आहेत. साहिरवर मला वाटत दोन लेख आहेत. ह्यात ही ताजमहाल वरील कविताही आहे.
आभार ट्युलिप!!
अहाहा.. जा ने क्या 'ट्यु'ने कही..
सुरेख लिहिलंयस...... तिकडेही वाचलं होत परत वाचताना अजुन छान वाटलं.
****************************************
अप्रतिम दुसरा शब्दच नाहि
ताजमहल कवितेत तो म्हणतो-
अनगीनत लोगोंने दुनियामें मुहब्बत की है
कौन कहता है सादिक ना थ जझ्बे उन के
लेकिन उन के लिये ताशीर का सामान नहिं
़क्युं कि वो लोग भि अपनि हि तरह मुफलीस थे
आणि खरचं गुलझार आणि चंद्र यावर प्लिज लिहा
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
खरोखर अप्रतिम!! ट्युलिप, अगदी काळजाला हात घातलास.. मनापासून धन्यवाद!
खरंच गाण्यांमध्ये काय जादू असते ना आजूबाजूच्या वातावरणाचा मूड बदलून टाकण्याची.. आणि त्यात ती गाणी साहिरसारख्या जादूगाराची असतील तर पहायलाच नको!
ज्याने लिहिण्याच्या ओघात हे शब्द लिहिले :
"मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी जवानी है,
पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी कहानी है.."
त्यानेच ती "चूक" लगेच स्वतःच दुरुस्त केली.. कारण त्याला माहिती होतं :
"मैं हर इक पल का शायर हूं, हर इक पल मेरी जवानी है,
हर इक पल मेरी हस्ती है, हर इक पल मेरी कहानी है.."
*********************************************************
जो ख़त्म हो किसी जगह, ये ऐसा सिलसिला नहीं...
वा!!!!!!!!!!!!
आजच वाचलं.............
"simply great written tulip!!!!!!!"
----जाने क्या तुने कही जाने क्य मैनै सुनी........!!!!!!!!
दिसलीस तू...फुलले ॠतू..................
उशिराच वाचले हे.. सुंदर लिहिले आहेस गं ट्युलिप.. विशेषतः प्यासा.. त्यातला एकटेपणा फार फार फार उदास करतो. धन्य तो साहीर आणि गुरुदत्त.