वर्तमानात घेतलेला भविष्याचा शोध (Talaash - Movie Review)

Submitted by रसप on 1 December, 2012 - 00:42

अपनी मर्ज़ी से कहाँ अपने सफ़र के हम हैं
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम हैं
- निदा फाजली
कमी-अधिक प्रमाणात असंच आपलं आयुष्य असतं. बहुतेक गोष्टी ओघानेच घडत असतात आणि आपण त्यासोबत घडत-बिघडत जातो. स्वबळावर आपली दिशा निवडणारे लोकही अनेकदा ह्या ओघासोबत वाटचाल करतातच. आपला असूनही आपला नसलेल्या किंवा नसूनही असेलल्या ह्या प्रवासात काही जाणीवा आपसूक होत जातात. कुणी त्याला ठाव लागणे म्हणतं तर कुणी शोध घेणे. फरक काही नसतो, काही तरी नवीन उमगलेलं असतं, फारसा प्रयत्न न करता किंवा प्रयत्न काही वेगळ्याच इप्सितासाठी असतो आणि हाताला काही वेगळंच लागतं. गुंतागुंतीचं आहे, पण बहुतेक वेळा सत्य गुंतागुंतीचंच असतं. नसेल पटत तर एकदा रीमा कागती दिग्दर्शित 'तलाश' पाहा, कदाचित पटेल आणि तरीही नाही पटलं तर हरकत नाही. ओघ चालू आहे, कधी ना कधी पटेलच; अशी मला - रणजितला - एक वेडी खात्री आहे.

सुर्जनसिंह शेखावत उर्फ सूरी (आमीर खान) मुंबई पोलीसदलातील एक निरीक्षक असतो. नव्यानेच ह्या शहरात दाखल झालेल्या 'सूरी'कडे केस येते एका विचित्र अपघाताची. हा अपघात साधासुधा नसतो, कारण तो फिल्म सुपरस्टार अरमान कपूरच्या गाडीला झालेला असतो आणि त्यात अरमान कपूर जागीच ठारही होतो. मध्यरात्रीच्या सुमारास, स्वत:च्या घरापासून बरंच दूर, एका वेश्यावस्तीजवळ असलेल्या समुद्र किनाऱ्यालगतच्या रस्त्यावर, कुठलीही नशा केलेली नसताना, कधीच स्वत: गाडी न चालवणारा अरमान त्याच रात्री भरधाव गाडी का चालवत असतो? अपघाताच्या आदल्या दिवशी संध्याकाळी त्याने त्याच्या अकौंटन्टकडून मोठी रक्कम का घेतलेली असते ? रस्त्यावर कुणीही नसताना अचानक रस्ता सोडून, त्याची गाडी समुद्रात का उडी घेते ? असे अनेक विचित्र प्रश्न ह्या केसला क्लिष्ट बनवत असतात. काहीच विशेष हाती लागत नसल्याने एक अन्सोल्वेबल केस म्हणून ही फाईल बंद करावी, असंही वाटत असतं.
दुसरीकडे, एक कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून नाव कमावलेला सूरी स्वत:ला एक कर्तव्यशून्य पिता मानत असतो. कारण त्याचा अल्पवयीन मुलगा, त्याच्या अपरोक्ष अपघाती मरण पावलेला असतो. ह्या अकस्मात धक्क्यामुळे सूरी आणि त्याची पत्नी रोशनी (राणी मुखर्जी) खूप अस्थिर असतात. दोघांतला संवाद खुंटलेला असतो. मनातल्या अपराधी भावनेमुळे सूरी अबोल, एकलकोंडा झालेला असतो. ह्या मानसिक अस्वास्थ्यामुळे रात्रीची झोप हरवलेला सूरी बहुतेकवेळा रात्र-रात्र घराबाहेरच राहत असल्याने त्याचे व त्याच्या पत्नीचे नाते अजून बिघडत चाललेले असते.
अश्या विचित्र मानसिक व कौटुंबिक कोंडीत असलेल्या सूरीला एक अनाहूत वेश्या रोझी (करीना कपूर) अपघाताची केस सोडविण्यासाठी काही मदत करते आणि त्याला मानसिक आधारही देते. तो केसच्या मुळापर्यंत जाण्याच्या दिशेने झटू लागतो. हळूहळू गुंते उलगडत जातात आणि उघडकीस आलेले सत्य त्याचा वैयक्तिक आयुष्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोनही बदलते.

'तलाश' म्हणजे केवळ कुठली रहस्यकथा नाही किंवा फक्त एक भावनिक नाट्यही नाही. ही तलाश, हा शोध केवळ एका पोलिसाचा नसून एका पतीचा, पित्याचा आणि एका वेश्येचाही आहे. काही वेळी म्हणूनच आपल्याला असं वाटत राहातं की दिग्दर्शिकेला नक्की काय मांडायचं आहे ? थरारनाट्य की भावनाट्य ? उत्तर आहे - दोन्ही. फलित आहे - अप्रतिम !

talaash_350_110512050053.jpg

सिनेमा आमीर खानचा आहे, म्हटल्यावर सिनेमाभर आमीर असणारच, आहेच ! पण त्याने रंगवलेला सूरी व इन्स्पेक्टर शेखावत लाजवाब.
करीना व राणी, दोघींना मर्यादित वाव असला तरी दोघीही चोख काम करतात. राणी मुखर्जी खूप आकर्षक दिसते.
छोट्याश्या भूमिकेत नवाझुद्दिन सिद्दिकी परत एकदा आपली छाप पाडतो. त्याचा पाठलाग होत असतानाचा संपूर्ण भाग अतिशय थरारक झाला आहे.
पटकथा अजून जराशी आवळता आली असती, पण जशी आहे तशीही छानच !
दिग्दर्शिका रीमा कागती, दुसऱ्याच सिनेमात खूप प्रभावी पकड दाखवते.
बऱ्याच दिवसानंतर एका सिनेमात गाणी कानांवर बलात्कार करत नाहीत. त्यासाठी राम संपत ह्यांचे विशेष आभार !
हीरोच्या अंगावर 'खाकी' आहे म्हणून त्याने काहीही अचाट उड्या माराव्या, ठोसे लगवावे आणि 'माइंड इट' इष्टाईलने दुर्जनांचा नि:पात करावा असल्या दाक्षिणात्य मोहाला बळी न पडल्याबद्दल दिग्दर्शिका व एक्शन दिग्दर्शकाचेही आभार !!

काही ठिकाणी जराशी गती मंदावली असली, शेवट झाल्यानंतरही शेवट चालू ठेवला असला, तरी 'तलाश' नक्कीच ह्या वर्षातील उत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहेच.

(अवांतर : "जब तक हैं जान" पाहिल्यापासून जर कुणाला बॉलीवूड-अपचनाचा त्रास सुरू झाला असेल, तर 'तलाश'ची एक गोळी हा रामबाण उपाय ! - इति वैद्य रणजित पराडकर !)

रेटिंग - * * *

http://www.ranjeetparadkar.com/2012/12/talaash-movie-review.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रणजीत पण खरचं केवळ अमीर आहे म्हणुन तो सिनेमा चांगला झाला आणि शाहरूख असता तर वाया गेला असता हे अस म्हणणं कितपत योग्य आहे?
मला एक प्रश्न नक्की विचारावासा वाटतो जबतक है जान मध्ये अमीर असता तर एवढ्याच शिव्या दिल्या गेल्या असत्या का?
कारण इथे कथा सुंदर पण अभिनेत्यामुळे पिक्चर वाया गेला अस नव्हतं ना?
टुकार कथेला टुकार म्हणा की
शाहरूख असो अमीर असो वा अमिताभ
फरक काइ पडतो?

सगळ्या पोस्ट वाचल्या आणि सलमान-शाहरुख- आमीर- ह्यांच्या बद्दल त्यांच्या फॅन च्या उलट सुलट प्रतिक्रियाही वाचल्या. खुप पोरकट वाटलं सगळं...

शेवटी हे सगळे आपल्या खीशावर उड्या मारतात हे विसरु नका. त्यांना मोठं कोणी बनवलं? प्रेक्षकांनीच ना. मग चांगल्याला चांगलं म्हणा, वाईटाला वाईट.

शेवटी सगळे हीरो हे निर्माते आहेत अगदी शाहरुख, सलमान, आमीर, सैफ, अक्षय... सगळे. पुर्वी अमिताभ मानधन न घेता एखाद्या टेरीटरीचे हक्क घ्यायचा. याचाच अर्थ त्याचा सिनेमा पुढले ९९ वर्ष त्या टेरीटरीत कधीही लागला तरी त्याचे पैसे त्याला मिळणार. हा फंडा इंडस्ट्री मधे रुजवण्याचा मान जातो राजेंद्र कुमारला. पुर्वी चे हीरो हे बीझनेस्मन नव्हते. आजचे आहेत. मग ते त्यांचा बीझनेस त्यांच्या प्रमाणे करतात. आमीर तर स्टोरी आणि टेकिंग मधे ढवळाढवळ करण्यात प्रसिध्ध आहे. कारण त्याच्या बहुतेक गाजलेल्या ( सध्याच्या) सिनेमांचा तो एकतर वितरक तरी आहे किंवा निर्माता तरी ( ही गोष्ट माझ्या वितरक क्लायेंटनेच सांगितली आहे). तोच नाही तर प्रत्येक हीरो, अगदी जॉन अ‍ॅब्राहम, सुनील शेट्टी सुध्धा.

हा ट्रेंड तर मराठीतही आहे. साउथ मधे तर फार पुर्वीच आलेला आहे.

आपलं दुर्दैव हे आहे की आपण त्यांच्या बीझनेसला त्यांची कला समजुन त्यावर अगदी "जान नीछावर" करतो. आपापसात वाद घालतो, भांडतो. ते फक्त आपल्याला स्वप्न विकतात, आपल्याच भावनांशी खेळतात. ( एल.आय.सी सारखं आपलच लाइफ आपल्याला विकतात....)

आपण त्यांचे सिनेमे पहावेत, पैसे टाकुन मजा अनुभवावी. पण तिकडेच सगळं संपलं पाहिजे. एखाद्या सिनेमाने आपल्याला काय दिलं, एखादी व्यक्तीरेखा आपल्याला का आवडली बास... येवढ्या पुरताच हा प्रवास निश्चीत पाहिजे. मग तो स्टार माणुस म्हणुन कसा आहे, त्याचे इतर चाळे काय आहेत.... काय करायचय आपल्याला ???

जसा एखादा बिल्डर आपला कॉम्प्लेक्स बांधतो आणि मग सोसायटी बनवुन निघुन जातो तसं आहे... ते प्रत्येक सिनेमा कडे एक "प्रॉजेक्ट" म्हणुन पहातात. मग तो प्रॉडक्ट लोकांना आवडण्या साठी सगळे उद्योग करतात. विकला की मात्र त्यांचा त्या गोष्टीशी संबंध नसतो.

संघर्षाचं म्हणाल तर प्रसिध्द हिरो हिरॉइनची मुलं पण संघर्ष करतात. त्यांना पहिला सिनेमा बापा मुळे मिळेल, बाप्/आई त्यांच्या साठी शब्द टाकतिल पण पुढे काय? ते ओझं जास्त असतं. विचारा इशा देओल ला, विचारा कुमार गौरव ला, विचारा पुरु राज कुमार ला, विचारा करिष्मा कपुर ला....

ह्यांचे फायनान्सर वेगळेच असतात. मग त्यांच्या इछ्छां नुसार ह्या लोकांना नाचावे लागते.

आता सगळ्या पोस्ट वाचल्या.. लोकहो इतका सरळ सरळ शेवट का सांगायचा? कितीही म्हटलं तरी सिनेमा बघण्यातली मजा कमी होतेच अशाने. पटले नाही.

आता सगळ्या पोस्ट वाचल्या.. लोकहो इतका सरळ सरळ शेवट का सांगायचा? कितीही म्हटलं तरी सिनेमा बघण्यातली मजा कमी होतेच अशाने. पटले नाही.>>>>>>>>>>> +१
चिंगी, कुठल्याही रहस्य कथनकाचा, पुस्तक किंवा सिनेमा चा शेवट सांगु नये असा सर्वसाधारण संकेत आहे. लोक तेवढही तारतम्य पाळत नाहीत. Sad

पुढच्या वेळी सस्पेन्स मूवी येणार असेल तेव्हा पाहण्याआधी रिव्ह्यू न वाचणे हा एक उपाय आहे. फेसबुक शक्यतो टाळावे. एसेमेस पाहू नयेत, मित्रांना भेटू नये इ. इ.

रिया ही पोस्ट तुझ्यासाठी म्हणुन लिहितोय अन्यथा वादात पडण्याची इच्छा अजिबात नाहिये.

आमिर ला घोस्ट डायरेक्टर म्हणायचे इतपत तो नाक खुपसतो असं कुठे कुठे वाचलय.
आणि हे सर्वच आघाडीचे हिरो करतातच. हे वर इतरेजणानी नमुद केलच आहे.

रिया,

रणजीत पण खरचं केवळ अमीर आहे म्हणुन तो सिनेमा चांगला झाला आणि शाहरूख असता तर वाया गेला असता हे अस म्हणणं कितपत योग्य आहे?

>> असं मी म्हटलं नाही.. म्हणणारही नाही.

मला एक प्रश्न नक्की विचारावासा वाटतो जबतक है जान मध्ये अमीर असता तर एवढ्याच शिव्या दिल्या गेल्या असत्या का?

>> नक्कीच. मी दिलेल्या शिव्यांबाबत म्हणत असाल, तर मी शा.खा. सह इतरांनाही हाणलं आहे. दिग्दर्शकांनी आधीच एक्झिट घेतलेली होती म्हणून आवरलं.

कारण इथे कथा सुंदर पण अभिनेत्यामुळे पिक्चर वाया गेला अस नव्हतं ना?
टुकार कथेला टुकार म्हणा की

>> माझ्या मते 'तलाश'ची कथा टुकार नक्कीच नाही. 'जतहैंजा'ची होती.. तिला तसं म्हटलं.

शाहरूख असो अमीर असो वा अमिताभ
फरक काइ पडतो?

>> काहीच फरक पडत नाही. निदान मला तरी.. करावा आ.खा.ने जतहैंजा... माझ्या परीने बदडीन. करावा अमिताभने परत 'आग'.... हाणीनच... आणि करावा शा.खा.ने बर्फी/ तलाश/ टायगर.. मनापासून स्तुतीसुमनं उधळीन की !

काही लोक मुद्दामुन तुलना करुन कैच्याकै लिहितात...मग त्याला उत्तर म्हणुन बाकिच्यांना सुध्दा लिहावे लागतेच... Happy

मी अजुन ही चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयावर टिका केली नाही आणि होउ ही शकत नाही ..परंतु प्रचंड विस्कळीत पटकथा (कथा नव्हे लक्षात घ्या) मधे मधे चुकिचे संवाद आणि प्रसंग..यावर मात्र न चुकता टीका करावी लागली...रसप यांनी नेहमी प्रमाणे चांगला रिव्ह्यु लिहिलेला पण लुप पोल वर जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले...ही बाब खटकली...म्हणुन इतके लिहावे लागले..........:)

नंदिनी,

आपल्या प्रतिक्रीयेतला उपरोध कळला व पोहोचलाही! Happy
इतकेच सांगू इच्छितो की कोण मोठा कोण टुकार हा वाद मी करतच नाहीये... ते ठरवायला मी खूपच लहान आहेत. माझ्या इवल्याश्या लेखणीने ह्या मोठ्या लोकांना गुदगुल्याही होणर नाहीत, हे मला माहित आहे. म्हणूनच मी ह्या वादात पडत नव्हतो... अनावधानाने पडलो! Sad

मी इथे नविन आहे. मस्त आहे मायबोलि. मराठी टाईप करायला भारी वाट्तय. वाचायला पण. इथे मराठी लिहायची प्रक्टिस कुठे करायची? अनुस्वार कसा द्यायचा? आणि अर्धचन्द्र?

उदयन, रसप हे त्यांना आवडेल त्या सिनेमाचे त्यांना जसे वाटले तसे रीव्ह्यु लिहितात. ही खरंतर त्यांची वैयक्तिक मते आहेत. मग त्यांनी "असेच का लिहिले आणि तसेच का लिहिले नाही?" असे विचारणारे आपण सर्व कोण? मला तरी त्याच्या आजवरच्या कुठल्याच रीव्ह्युमधे तो "आमिरभक्त" असल्याचा साक्षात्कार झाला नाही. या रीव्ह्युमधेदेखील त्याने शाहरूख खानबद्दल एक शब्द देखील लिहिलेला नाही. तरीपण मुद्दामून तुलना कुठे दिसत आहे?

तुला वाटलं असतं तर तू नविन सविस्तर रीव्ह्यु लिहायचा होतास त्यामधे तुला हवी तशी चिरफाड करायची होती; कुणी नको म्हटलं होतं का?

नंदीनीजी
.
.(अवांतर : "जब तक हैं जान" पाहिल्यापासून जर कुणाला बॉलीवूड-अपचनाचा त्रास सुरू झाला असेल, तर 'तलाश'ची एक गोळी हा रामबाण उपाय ! - इति वैद्य रणजित पराडकर !) >>>>>>
,
,
हे जर नाही लिहिले असते........तर मी इतके रामायण केले नसते :).. Biggrin
.
असो तुम्हाला ते दिसनार नाहीच कधी आणि मी अपेक्षाही केली नाही आपल्याकडुन...असो...

.
वादावर पडदा माझ्यातर्फे टाकतोय आता

इथे एक सांगावेसे वाटते..

मान्य आहे की मी रिव्ह्यू लिहितो, तो रिव्ह्यू म्हणजे माझे वैयक्तिक मत असते. परंतु, त्यावर इतरांनी मला प्रश्न केल्यास माझी काहीही हरकत नाही. मी कुणी सर्वज्ञानी नाही. माझे अवलोकन, माझे मत चूक की बरोबर हे मला तुमच्याकडूनच कळणार आहे. पण, पक्षपाताचा आरोप चुकीचा आहे. मी - एक नोबडी - जर कुणा सुप्रसिद्ध व्यक्तीवर टीका करत आहे, करू शकतो; तर माझं तेच लिखाण प्रत्येक वाचकाच्या टीकेसही उपलब्ध असणार. त्यावर अवश्य टीका करावी.

माझ्या रिव्ह्यूला चुकीचा म्हटल्याबद्दल मला अजिबात प्रॉब्लेम नाही..... "मी पक्षपाती लिहिले, मुद्दाम.." असे जर वाटत असेल, तर ते मात्र चूक आहे.

पारिजाता, वादविवादमधे भाग घे Happy

उदयन, वादावर पडदा टाकूनच ठेव. लवकरच दबंग २ येतोय. तेव्हा आपण वादविवाद लई करू शकतो. आम्ही सलमानखान गटाचे खंदे पुरस्कर्ते आहोत. आखा शाखापेक्षा सखा जास्त प्रिय. Proud

मदतपुस्तिका सापडली.
जाउ द्या ना . वाद घालून आपण त्यांचा भाव वाढवतोय. एवढा भाव देण्याइतके हे लोक ग्रेट नाहीयेत यार. त्यांना इतकी चांगली अ‍ॅक्टींग येत नाही. Wink :फीदी:
मीराने बरोबर लिहीलेय.
(प्रॅक्टिस)

मोकिमी सौ बात की एक बात. पण याला कारण आपली भारतीय मने आहेत आणी भोचकपणा हा सर्वच भारतीयांचा जन्मजात अवगुण आहे. आणी भारतात व्यक्तीच्या आचार विचारांपेक्षा व्यक्तीपूजेलाच जास्त मान आहे, त्यामुळे ईच्छा नसली तरी प्रत्येकजण या स्पर्धेत उतरतो आणी एकमेकाचे पाय ओढतो हे पण तितकेच सत्य आहे.

त्यामुळे तो अमिर, शाहरुख, सलमान, अमिताभ ह्यांनी आपल्याला करमणूकीपेक्षा वेगळे काय दिले हा शोधाचाच प्रश्न आहे. फरक एवढाच आहे की अमिरच्या चुझीपणामुळे आपल्याला थ्री इडीयटस आणी तारे जमीं पर ह्यातुन काहीतरी नवीन पहायला मिळाले, अनूभवायला मिळाले.

आपण लोक कलाकारांवर प्रेम करतो, पण त्यांची समाजाप्रती असलेली बांधिलकी बघतो का?

पूर्वी एक फ्याड होते. कुठेही पूर आला, भुकंप झाला हे नौटंकी कलाकार ( ह्यात हिंदी सिनेमावाले जास्त) मदत फेरी काढायचे उघड्या ट्रकातुन, लग्गेच् अख्खी जनता गोळा यांना पहायला, जसे काही हे स्वर्गातुन उतरलेले इंद्रच. तर हे शहाणे त्या पुरग्रस्त आणी भुकंपग्रस्ताना मदत म्हणून झोळी फिरवायचे लोकांपुढे आणी लोक टाकायचे लग्गेच, का तर आपला राज गब्बर, दिलीप भाव नाहीतर कुठली रंभा सोंभा प्रत्यक्ष दिसायची म्हणून. का बरे हे कलाकार मदत फेरी काढायचे? ह्यांना स्वतःच्या खिशातुन देताना कधी नाही पाहिले? ( सुनील दत्त सारखे काही अपवाद आहेतच ) हे प्रश्न आहेत अजून.

मात्र सध्या ही नौटंकी थांबलीय, म्हणजे असे नाटक दिसले नाही बर्‍याच वर्षात.

हो टुनटुन, मी स्वतः अशा फेरीत अनेक आवडत्या कलाकारांशी हातमिळवणी (शेकहँड) केली आहे. पण त्यावेळी सिनेमाच्या बाहेर हे कलाकार क्वचितच दिसत.. ते दिवस होते खरे तसे. आता एखादा कलाकार माझ्या बाजूला बसलेला असेल तरी फारशी उत्सुकता दाखवणार नाही. ( अपवाद जेष्ठ मराठी नाट्य कलावंतांचा ! ते मला नेहमीच पूज्य आहेत. )

चिंगी, कुठल्याही रहस्य कथनकाचा, पुस्तक किंवा सिनेमा चा शेवट सांगु नये असा सर्वसाधारण संकेत आहे. लोक तेवढही तारतम्य पाळत नाहीत>> सहमत. वर अजून स्वतःच्या या मूर्खपणाचे समर्थन करणार, की हे रहस्य कथानक नाहीच्चे. कधी सुधारणार आहेत देव जाणे.

रहस्यभेद होण्याआधीच मी हा चित्रपट पाहिला होता, पण तरीही इथे वाचून जाम चिडचिड झाली. त्या सभासदाच्या विपूमध्ये एक जळजळीत प्रतिक्रिया टाकणार होतो..पण म्हटलं जाऊद्या...कशाला चिखलात दगड फेकायचा.

असो.. रसप यांचे लिखाण आवडले. आणि सर्वांच्या प्रतिक्रियांनी छान करमणूक होतेय.

माझे मतः सर्वांची कामे उत्तम असली तरी कथानकात 'आमीर'दम नाही. आमीरच्या चित्रपटाकडून जास्त अपेक्षा असतात. अर्थात त्याही त्यानेच वाढवून ठेवल्यात म्हणा.

चिल अविकुमार Happy
प्रतिक्रिया वाचायलाच हव्यात अस काही नाही की नाही Happy
सिनेमा आधी परिक्षण वाचा
आणि येऊन प्रतिक्रिया वाचा
हाकानाका
म्हणजे चिड चिड होणार नाही Happy

Pages