सारातोव्ह,रशियातील बाप्पा मोरया!!!!!!!

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि | तन्नो दन्ति: प्रचोदयात् |

आमच्या होस्टेलमध्ये नेहमीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव साजरा झाला. हे आमच्या सारातोव्ह मेडीकल युनिव्हर्सिटीच्या होस्टेलमधील गणेशोत्सवाचे ५ वे वर्ष होते.पहिल्या वर्षी जेमतेम ५-६ जणांनी मिळुन गणेशोत्सव साजरा केला होता पण आता आमच्या गणेशोत्सवाचे रुपांतर एका मोठ्या उत्सवात झाले आहे व आमचे एक छोटेसे गणपती मंडळच स्थापन झाले आहे.मागच्या वर्षीचा गणपती बराच मोठा करण्यात आम्हाला यश आले होते.यावर्षी त्याहुन पुढे जाण्याचा निश्चय होता.त्यासाठी भारतातच सजावट तसेच प्रसाद याचा एक आराखडा बनवण्यात आला व भारतातुन येताना आवश्यक असलेले सामान आणले.त्याचबरोबर गणेशोत्सवासाठीच्या निमंत्रणपत्रिकाही छापुन आणल्या.येथे सजावटीचे सामान घेणे शक्य नव्हते कारण येथे भारतीय वस्तुंची दुकाने नाहीत व येथील सजावटीचे सामान म्हणजे वाढदिवसाच्या सजावटीसारखे दिसते.

फोटो येथे पहा- http://picasaweb.google.ru/chinya1985/Ganeshotsav200802#

यावर्षी राजवाड्यासारखी सजावट करायचे ठरवले होते. त्यासाठी भारतातुन थर्माकॉलचे मोठे सिंहासन आणले.त्यानंतर येथील दुकानांमधे सीलींगची सजावट करण्यासाठी असणारे थर्माकॉलचे साहीत्य आणुन ते एकमेकांना जोडुन ,रंगरंगोटी करुन त्याचे खांब बनवण्यात आले.त्याचबरोबर ६ गणपतीची चित्रे काढण्यात आली व त्या चित्रांच्या बाजुने मखर बनवण्यात आले.त्याचबरोबर लायटिंग व सीलिंगची सजावट करण्यात आली. होस्टेलमधील सर्व कॉरीडॉरना पताका लावण्यात आल्या. हे सर्व करण्यासाठी जेमतेम १ दिवस व २ रात्री मिळाल्या. त्यात सर्व कार्यकर्त्यांनी जिव तोडुन काम केले. २ तारखेला सर्वांना पत्रिका देण्यात आल्या व नोटिस बोर्डवर सर्वांना निमंत्रण व सहभागासाठी विनंती करण्यात आली. ३ तारखेला दुपारी पुजा सुरु झाली. एकीकडे पुजा सुरु झाली होती पण सजावटही पुर्ण झाली नव्हती.त्यामुळे तेही काम एकीकडे चालु होते.त्याचबरोबर प्रसादही बनवण्याचे काम सुरु होते. पहील्या दिवशी मोदक ,शिरा,पंचामृत्,फळे हा प्रसाद होता.जवळपास २०० मोदक बनवण्यात आले होते.साधारण संध्याकाळी ६ पर्यंत सर्व काम झाले.एकीकडे पुजा चालुच होती. साधारण ७ च्या दरम्यान आरती झाली.आरतीला जवळपास ७० मुले होती.'गणपती बाप्पा मोरया' च्या जयघोषाने पुर्ण होस्टेल दुमदुमुन गेले.
IMG_5003.jpg

दुसर्‍या दिवशीपासुन संध्याकाळच्या आरतीची सुरुवात शंखनादाने होत असे.शंखाचा आवाज ऐकल्यावर सर्व मुले आरतीला येत.मागच्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही आमच्याकडे दररोज आरती,गणपती अथर्वशीर्षाचे पठन्,प्रसाद ,सांस्कृतिक कार्यक्रम होत.पण त्याचबरोबर यावर्षी अजुन २ गोष्टी आम्ही करु लागलो. पहीली म्हणजे गणेशाच्या नावाचा जप सकाळच्या आरतीनंतर होत असे व त्याचबरोबर संध्याकाळी विविध परंपरांमागचे म्हणजे नमस्कार का करतात्,घंटा का वाजवतात्,प्रदक्षिणा का घालतात इत्यादींमागची भावना,महत्व याची माहीती दररोज सांगण्यात येत असे. ४ तारखेला म्हणजे दुसर्‍या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमामधे गणेशोत्सव सुरु करणार्‍या लोअमान्य टिळकांबद्दल एक छोटेसे भाषण झाले.त्यात टिळकांच्या चरीत्राचा आढावा,गणेशोत्सव्,शिवजयंती सुरु करण्यामागचा उद्देश सांगण्यात आला. त्याचबरोबर त्या दिवशी 'देहाची तिजोरी' हे गाणे सादर केले.प्रसादासाठी या दिवशी बेसनाचे लाडु होते.५ तारखेला आमच्या सर्वांचा आवडता कार्यक्रम म्हणजे इस्कॉनच्या भक्तांच्या किर्तनाचा कार्यक्रम होता.मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी या कार्यक्रमाला प्रचंड दाद मिळाली.या दिवशी प्रसाद म्हणुन फ्रुट सॅलड बनवले होते.६ तारखेला प्रश्नमंजुषा झाली.यात मुख्यत्वे धर्माशी संबंधित प्रश्न होते.या दिवशी प्रसाद म्हणुन केळीचे शिक्रण होते.

७ तारखेला रविवार असल्याने सकाळच्या पुजेलाही बर्‍यापैकी गर्दी होती.या दिवशी सकाळी गणपती स्तोत्राची २१ आवर्तने झाली.या संध्याकाळी ट्रेडिशनल डे होता.त्याचबरोबर गणपतीच्या काही कथा सांगण्यात आल्या व 'मल्हार वारी' हे गाणे एका विद्यार्थ्याने अतिशय सुंदररीत्या गायले.या दिवशी गाजराचा हलवा हा प्रसाद करण्यात आला होता.८ तारखेला 'Ganesha Outside Hinduism' या विषयावरील माहीतीपुर्ण भाषण झाले.त्याचबरोबर 'उदे ग अंबे उदे' वर नृत्य व 'सनईचा सुर' या गीताचे समुहगायन झाले.या दिवशी प्रसाद म्हणुन गुलाबजाम बनवले होते.९ तारखेला 'महाराष्ट्राची संत परंपरा' याविषयावर भाषण्,एक नृत्य व एक गाणे हा सांस्कृतिक कार्यक्रम होता. या दिवशी शेवयाची खिर हा प्रसाद बनवला होता.१० तारखेला फॅन्सी ड्रेसचा कार्यक्रम होता.या कार्यक्रमाला अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला. जवळपास २० जणांनी वेगवेगळी वेषभुषा केली होती.यात विविध देविदेवता,ऐतिहासिक व्यक्ती यांचा समावेष होता.याचबरोबर आमच्या होस्टच्या होस्टिंगने या कार्यक्रमाला वेगळीच मजा आणली.या दिवशी भोपळ्याचा हलवा हा प्रसाद होता.११ तारखेला ध्यानधारणा व एका विद्यार्थ्याने स्वतः गणपतीवर लिहिलेला पोवाडा हे सांस्कृतिक कार्यक्रम होते.या दिवशी लस्सी व फळांचा प्रसाद दाखवण्यात आला.

१२ तारखेचा कार्यक्रम अविस्मरणीय होता.आपल्या मराठी भाषेत म्हणतात की 'साधु संत येता घरा तोचि दिवाळी दसरा'.त्याप्रमाणे यादिवशी आमच्या कार्यक्रमाला भक्तिब्रिंग गोविंद स्वामी महाराज आले होते.याच दिवशी आमच्या शहरात जगन्नाथाची रथयात्रा होती . अशा प्रकारे दुग्धशर्करा योग जुळुन आला होता. आम्ही विद्यार्थ्यांची रथयात्रेलाही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. त्यानंतर संध्याकाळी स्वामीजींनी किर्तन केले व सर्वांना भारतिय संस्कृतीचे महत्व पटवुन सांगितले. हा कार्यक्रम खुपच छान झाला.या दिवशी तांदळाच्या खिरीचा प्रसाद दाखवण्यात आला.१३ तारखेला 'सेंटर ऑफ श्री चिन्मोय' च्या लोकांनी येउन बंगाली भाषेतील काही भजने सादर केली.त्याचबरोबर एका विद्यार्थ्याने 'गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धिमही' हे गाणे सादर केले व याच दिवशी २ नृत्याचे कार्यक्रमही झाले.त्याचबरोबर 'रांजणगावाला महागणापती' हे समुहगानही झाले.या दिवशी नारळाचे लाडु व लस्सी बनवली होती.त्याचबरोबर गणेशोत्सवात चित्रकला स्पर्धाही ठेवण्यात आली होती. जवळपास १० गणपतीची अतिशय सुंदर चित्रे स्पर्धेसाठी आली होती.त्यावर प्रेक्षकांनी मतदान केले व विजेता निवडुन दिला.विजेत्याला व इतर सहभाग घेणार्‍यांना पारितोषिक वितरण याच दिवशी करण्यात आले.

१४ तारखेला विसर्जनाचे काम खुपच मोठे होते. जवळपास ४०० मोदक बनवायचे होते व ३० लिटर मसाला दुध बनवायचे होते.दर वर्षी विसर्जनाच्या दिवशी संपुर्ण होस्टेलला आम्ही प्रसाद देतो.त्याचबरोबर जे जे विद्यार्थी आरतीला येत त्या सर्वांसाठी म्हणजे जवळजवळ १०० विद्यार्थ्यांसाठी विसर्जनानंतर स्नेहभोजन ठेवले होते. हे सर्व बनवण्याचे मोठे काम कार्यकर्त्यांवर होते. अगदी सकाळपासुन सर्वजण कामाला लागले होते ते काम संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालले.एकीकडे स्वयंपाकाचे काम चालु असताना दुसरीकडे पुजा व अथर्वशीर्षाची ५४ आवर्तने झाली.संध्याकाळी ७ वाजता आरती झाली.त्यानंतर वाजतगाजत आणि 'पुढच्या वर्षी लवकर या' च्या घोषणांसकट गणपती व्होल्गा नदिवर विसर्जनासाठी नेण्यात आले.जवळपास ६० जण विसर्जनासाठी आले होते.विसर्जनानंतर पुर्ण होस्टेलला मोदक व मसाला दुध हा प्रसाद देण्यात आला व पुजेला येणार्‍यांचे स्नेहभोजन झाले.

विसर्जनानंतरचे १-२ दिवस सर्वच कार्यकर्त्यांसाठी फारच खराब जातात.दहा दिवस पुर्ण जीव तोडुन काम केलेले असते,स्वतःच्या हातानी आणि मोठ्या कष्टानी जी सजावट केलेली असते ती काढावी लागते.अभ्यास्,क्लासेस्,लेक्चर्स सांभाळुन हे सगळे उभे करणे व दहा दिवस चालवणे ही खुप मोठी गोष्ट आहे असे मला वाटते.इतर वेळी सर्वजण स्वतःच्या आयुष्यामध्ये गुंतलेले असतात ते सर्व विनातक्रार एकत्र येतात व एकत्र येउन काम करतात .ही गोष्ट आपण गरज पडल्यास आपापसातली भांडण विसरुन एकत्र येउ शकतो व काहीतरी विधायक कार्य करुन दाखवु शकतो हा विश्वास निर्माण करते.आता परत सर्वांची दिनचर्या पुर्वव्रत होउ लागली आहे,पण कुठेतरी काहीतरी खटकतय्,काहीतरी नाहीये,काहीतरी हरवलय याची भावना मनात आहे.गणपतीच्या इतर दिवशी उत्साहानी नाचणारी मंडळी विसर्जनाला नाचु शकली नाहीत.माझे तर हे येथील गणेशोत्सवाचे शेवटचे वर्ष होते.वर्षातील सर्वात अविस्मरणिय असे क्षण गणेशोत्सवात येतात्.पण आता हे परत होणार नाही.पुढच्या गणेशोत्सवात कुठे असेल माहीत नाही पण इथे होतो तसा गणेशोत्सव तिथे होईल का नाही शंकाच आहे. रुसवे -फुगवे असले तरी होस्टेलमधले विद्यार्थी म्हणजे एक मोठे कुटुंबच असते. असे इतके मोठे कुटुंब पुढे कधी लाभणार आहे??माझ्या आयुष्यातले सर्वात अविस्मरणिय क्षण दिल्याबद्दल या कुटुंबाचे आणि गणराया तुझे लाख लाख धन्यवाद!!!!!!!

चिन्मय कुलकर्णी

प्रकार: 

चिन्या... सहीच रे.... Happy
पण एवढे भारतीय कसे काय तुमच्या हॉस्टेल/कॉलेज मधे?
- येडचॅप

छान लिहिलेस रे चिन्या.

सही!! भरगच्च कार्यक्रम केलेला आहे. किती मेहनत लागली असेल याची कल्पना येत आहे. अभिनंदन.
याच दिवशी आमच्या शहरात जगन्नाथाची रथयात्रा होती >>> हे वाचुन आश्चर्य (बरोबर लिहिला आहे का हा शब्द?)वाटलं.एवढे भारतीय रशियात? काही सांग ना याविषयी.

वा चिन्मय.. एव्हडे सगळे कार्यक्रम पार पाडल्याबद्दल तुझे व तुझ्या सहकार्‍यांचे अभिनंदन..

>>>
एकीकडे पुजा सुरु झाली होती पण सजावटही पुर्ण झाली नव्हती.त्यामुळे तेही काम एकीकडे चालु होते.त्याचबरोबर प्रसादही बनवण्याचे काम सुरु होते.
>>>
हा आपल्या भारतातील गणपती मंडळांचा पायंडा तू रशियामध्येही पाळल्याबद्दल तुझे अभिनंदन Happy (दिवे घे)..

>>रुसवे -फुगवे असले तरी होस्टेलमधले विद्यार्थी म्हणजे एक मोठे कुटुंबच असते. असे इतके मोठे कुटुंब पुढे कधी लाभणार आहे?? >>>
हे बरीक खरे बोललास बघ गड्या....

चिन्या,
लिहिलं आहेस छान, पण तो फोटोसुद्धा सही आहे.

ध्यन्यवाद येडचॅप्!!!!!!अरे मी आता ६व्या कोर्सला आहे. माझ्यानंतर दरवर्षीच्या कोर्सला मुले आली आहेत. आणि भारतीय १००च्या आसपास आहेत येथे

धन्यवाद आयटे,सुप्रिया,टन्या,चिनुक्स आणि चिन्नु!!!!!!!
सुप्रिया,शब्द बरोबर आहे. जगन्नाथाची रथयात्रा इस्कॉनवाल्यांनी आयोजित केली होती.त्यात भारतीयांचा हात नव्हता.आमची फक्त उपस्थिती होती.इथे भारतीय जेमतेम १०० असतील.
टन्या, अरे भारतीय म्हटल्यावर हे होणारच. दररोजच्या आरतीलाही थोडा उशीर व्हायचाच्.रशियन लोक येउन वाट पहायचे आणि आपले भारतीय आरामात यायचे.
चिनुक्स्,फोटो खरच छान आला आहे तो.
चिन्नु,चुक सांगितल्याबद्दल धन्यवाद!!!!

चिन्मय, छान.. तुम्हा सर्वांचे अभिनंदन! किती मराठी लोक आहेत तुझ्या भागात? मोदक वगैरे तुम्ही मुलांनीच बनवलेत का? सहसा मराठी लोक गणेशोत्सवात जास्त आवर्जून सामिल होतात.

सुप्रिया, तू मराठी शब्दांचे धडे घेत आहेस म्हणून विचारतो, तू भारताबाहेर वाढलेली आहेस का?

चिन्या, तुझे व तुझ्या मित्र मैत्रिणींचे मनःपुर्वक अभिनंदन.

बी,झकास आणि अश्विनी धन्यवाद!!!!!!
बी मराठी लो ४०-५० असतील इथे. मोदक आम्ही मुलामुलींनी मिळुन बनवले.

चिन्या, खुपच छान आणि तुमचा सगळ्यांचा उत्साह तर खरच वाखाणण्यासारखा आहे, तु म्हणाला रशियनसुद्धा यायचे व पुर्ण होस्टेल मधे सजावट केलीस म्हणजे ईतरांचा ही चांगला सहभाग व सहकार्य होते तर.

फोटो मुळे खरच एकदम मजा आली.

धन्यवाद विनायक आणि च्यायला!!!!
च्यायला,रशियन आमचे पाहुणे असायचे.

कमाल आहे बाकी. एवढे मोदक करN, तळणे,बाकी पूजा प्रसाद,कर्यक्रम... hats off!

चिन्मय,
खुपच छान. मागच्यावर्षीपण तुमच्या या उपक्रमाबद्दल आणि शिवजयंतीबद्दल वाचले होते. यावेळेची सजावट पण खूप छान झाली होती. फोटो आवडले. रशियात एका ठिकाणी ४०-५० मराठी म्हणजे खुपच जास्त झाले खर तर. Happy
एवढ्या कमी resources मध्ये एवढा सुंदर कार्यक्रम केल्याबद्द्ल तुमचे सगळ्यांचे कौतुक वाटते. सगळ्यांचे मनापासुन अभिनंदन.

चिन्या, खूप छान वाटलं वाचून.
अभ्यास वगैरे संभाळुन, हा गणपती उत्सव यथासांग साजरा करणे खरच कौतुकास्पद आहे.
आजच्या सामना मधे पण ही बातमी वाचनातं आली.
तुमचं खूप अभिनंदन!

धन्यवाद मनुस्विनी,रुनी आणि मीपुणेकर!!!!
रुनी सगळे विद्यार्थी असल्याने ४०-५० मराठी आहेत. बाकी येथे मुख्यत्वे मराठी आणि तामिळी लोक आहेत.
मीपुणेकर ,सामनाच्या प्रिंट एडीशनमधेही बातमी आली आहे का???

चिन्या, सामना ऑनलाईन मधे वाचली ती बातमी इकडे (अमेरिकेत), प्रि.न्ट एडिशन बद्दल काही कल्पना नाही.

अच्छा .अच्छा. सामनाच्या वेबसाईटवर मीही वाचली.बहुतेक प्रिंट एडीशनमधेही आली असेल्.मी घरच्यांना कळवल आहे बघायला.मागच्या वर्षी त्यांनी माझा पुर्ण लेखच छापला होता

ये हुई ना बात! Happy मस्तच रे!
वर्णन वाचून क्षणभर थरारून उठलो
नशिबवान हेस लेका, अशा गणेशोत्सवात सहभागी होता आले तुला!
सगळ्यान्ना अभिनन्दन कळव
...;
आपला, लिम्बुटिम्बु