- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
मायबोली गणेशोत्सव २००८
सदस्य प्रवेश |
गणराज रंगी नाचतोगणपतीला १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिष्ठाता मानलेले आहे. यातील एक कला म्हणजे नृत्य कला. श्री गजाननाच्या नृत्य निपुणतेचे वर्णन करताना समर्थ रामदासस्वामी म्हणतात, सगुण रुपाची ठेव l महा लावण्य लाघव ll नृत्य-गणपती हे भारतीय संगीत आणि नृत्य कलेचे प्रतीक जणू. दक्षिण भारतात, नृत्य गणपतीच्या मूर्ती सापडतात. म्हैसूरच्या हळेबिड येथील होयसलेश्वर मंदिरात (बारावे शतक) नृत्य गणपतीची अत्यंत नयनमनोहर अशी अष्टभुजा मूर्ती आहे. मूर्तीच्या सहा हातांमधे परशू, पाश, मोदक्पात्र, दंत, सर्प आणि कमळपुष्प असून, दोन हात, अनुक्रमे, गजहस्त आणि विस्मयहस्त मुद्रेमध्ये आहेत.* तंजावूरच्या भेडाघाटच्या मंदिरातही श्रीगणेशाच्या कलात्मक प्रतिमा आहेत. मयूरभंज, ओरिसा येथेही नृत्य गजाननाची अत्यंत मनोहारी अशी मूर्ती आहे. भुवनेश्वर येथे मुक्तेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराची निर्मीती सन ८०० ते १०६० च्या दरम्यान झालेली आहे. ह्या मंदिरातही नृत्य गणपतीची अष्टभुजा मूर्ती आहे. मूर्तीमध्ये जी नृत्य मुद्रा साकारलेली आहे, त्यात गजाननाने दोन हात वर करुन, त्या दोन्ही हातांमध्ये सर्पास पकडले आहे, चार हातांत मोदक, कुर्हाड, तुटलेला दात आणि कमळ धरलेले आहे. राहिलेले दोन हात भग्नावस्थेत आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूला सेवक असून डाव्या बाजूचा सेवक झांज तर उजव्या बाजूचा सेवक मृदंग वाजवत आहे. काशी हिंदू विश्विद्यालयाच्या भारत कला भवनात नृत्य मुद्रेतल्या गणपतीच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. उत्तर प्रदेशातील कनोज येथे साधारण आठव्या शतकाच्या आसपास निर्माण केलेली चतुर्भुज अशी नृत्य गणपतीची मूर्ती सापडली असून गजाननाने सर्पयद्नोपवीत (जानवे) धारण केले असून, वाघाची कातडी पांघरलेली आहे. अल्वर येथील संग्रहालयातही तोमरकालीन, गणपतीची नृत्यप्रधान मूर्ती असून तिच्या दोन हातांत सर्प असून, पायांपाशी मूषक आणि गण इत्यादी आहेत. मूर्तीबरोबर जो लेख सापडला आहे, त्यात महालोकस नामक व्यक्तीने विक्रम संवत ११०४ मध्ये (ई. स. १०४४)मध्ये या मूर्तीची निर्मिती केली असा उल्लेख आढळतो. मध्यप्रदेशातील खजुराहो येथील मंदिरामधून द्विभुज, चतुर्भुज, षड्भुज, अष्टभुज ते षोडशभुज अश्या नृत्यामध्ये मग्न असणार्या गणपतीच्या मूर्ती आढळून येतात. लखनौच्या राजसंग्रहालयात, बाराव्या शतकातील गाहवालवंशीय राजांच्या कारकीर्दीत निर्माण झालेली नृत्य गणेशाची मूर्ती त्या काळातल्या मूर्तीकलेचे सुंदर उदाहरण मानले जाते. अश्या ह्या नृत्य निपुण देवतेला मानवंदना म्हणून संगीतज्ञांनी गणेशताल निर्माण केला आहे. तानसेनाच्या संगीत-सार ग्रंथात, तालाध्याय, या अध्यायांतर्गत, ब्रह्मताल, रुद्रताल, विंध्यताल, कंदर्पताल, सिंहताल, जनकताल आणि विष्णूताल या तालांची माहिती आहे, परंतु, गणेशतालाचा उल्लेख आढळत नाही. संगीतज्ञ मानतात, की गणेशतालची निर्मिती संगीत रत्नाकर ह्या ग्रंथाच्या नंतर झाली. ह्या तालाच्या मात्रा २१ व १० भाग आहेत. भाग : धा ता दिं ता कत तिट धा दिं ता कत भागः तिट ता धागे दिं ता धागे ता तिट कत गदि गन अश्या ह्या नृत्य निपुण देवतेची सेवा म्हणून तानसेनाने ब्रजभाषेत काही धृपद रचना केल्या आहेत, ज्यात श्री गजाननाची स्तुती केलेली आहे. एकदंत गजबदन बिनायक बिघ्न -बिनासन हैं सुखदाई ll आणि ही एक, ज्यात तानसेन श्री गणेशाची कृपा प्राप्त व्हावी अशी प्रार्थना करत आहे, अजून एक गणेश स्तुती, असा हा सर्व विद्या आणि कलांचा अधिपती असलेला देव. आद्यकवी वाल्मिकी ऋषी गणेशाची स्तुती करताना म्हणतात, चतु:षष्टीकोटयाख्यविद्याप्रदं त्वां सुराचार्यविद्याप्रदानापदाम् l अर्थात, हे गणपती, तू चौसष्ठ कोटी विद्या प्रदान करणारा आहेस, एवढेच नाही, तर देवांच्या आचार्यांनाही विद्या प्रदान करणारा आहेस. कठालाही विद्या देणारा तूच आहेस ( कठोपनिषदरुपी विद्येचा दाता) दोन दात असणारा, कवी, असा तू, कवी (बुद्धीमान) जनांच्या बुद्धीचा तू स्वामी, तुला माझे वंदन असो. संदर्भः १. कल्याण श्रीगणेश विशेषांक, गीताप्रेस, गोरखपूर.
13 सप्टेंबर, 2008 - 04:40 ITgirl
|
|
सुन्दर लेख!!!
माहितिपुर लेख!!!!
मला राम रक्शा हवी आहे.कशी दौन्द्लोद करावी?