सुखनवर बहुत अच्छे - ४ - मौलाना हसरत मोहानी - चुपके चुपके

Submitted by बेफ़िकीर on 11 June, 2011 - 06:28

चुपके चुपके रात दिन आसूं बहाना याद है
हमको अबतक आशिकीका वो जमाना याद है

साहित्यनिर्मीतीतून समाजाला योग्य दिशा दाखवून ब्रिटिशांवर कोरडे ओढण्यासाठी अनेकदा कारावास भोगणारे कदाचित एकमेव शायर! जे त्यांच्या काव्याला मिळालेले मानधन गरीबांमध्ये वाटायचे. मात्र मिळालेल्या पदावरून समाजातिल अन्यायावर कडक भाष्य करायचे व तेही असे प्रभावी की एक मोठा गट त्या विचारांनी प्रभवीत व्हावा. एक असे शायर, जे आपल्याला फार तर 'चुपके चुपके' रचणारे शायर म्हणून ज्ञात असतीलही, मात्र ज्यांनी स्वतःच्या वागणुकीतून ब्रिटिशांच्या तोंडचे पाणी पळवले होते आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर होत असलेल्या हिंसाचारात भारतात असलेल्या मुस्लिमांच्या बाजूने ठाम उभे राहून ज्यांनी सरदार पटेलांना भर संसदेत स्वतःच्या वाणीने हादरवून सोडलेले होते.

"द जिनियस इज इसेंट्रिक"

महात्मा गांधींबद्दल असे जाहीर वक्तव्य त्या काळातच काय, आजही कुणी करेल? गांधींनी ज्यांच्या 'संपूर्ण स्वातंत्र्याच्या' मागणीला तात्विक विरोध दर्शवला ते प्रामाणिक इस्लामीक वागणूक असणारे शायर अखेरपर्यंत हिंदुस्तानातच राहिले...

मौलाना ... हसरत मोहानी!

संपूर्ण स्वातंत्र्य मागणारी भारत देशातील पहिली व्यक्ती!

१८७५ साली उत्तर प्रदेशातील 'मोहान' या गावी जन्माला आलेल्या हसरत यांनी शिक्षणात विलक्षण प्रगती दाखवली. त्यानंतर अलीगढ विद्यापीठात पुढील शिक्षण घेतले. मात्र त्यांची खरी ओळख 'उर्दू शायर' म्हणण्यापेक्षाही स्वातंत्र्यसैनिक अशीच रास्त आहे.

उर्दु-ए-मुअल्ला या त्यांच्या लेखामुळे ते वादग्रस्त जाहीर करण्यात आले. या शायराने त्याचे संपूर्ण जीवन फक्त चारच गोष्टींमध्ये व्यतीत केले.

**खराखुरा धार्मिक मुसलमान होणे - ज्यात इतर कोणत्याही धर्माबद्दल अनादर नाही

**शायरी

** स्वातंत्र्ययुद्धात जळजळीत कामगिरी

** कारावासात आयुष्यातील प्रचंड कालखंड अत्यंत हालात व्यतीत करणे!

मौलानांना कारावासात अनेकदा टाकण्यात आले. दुसर्‍या वेळेसच्या कारावासात तर अपरिमित हाल त्यांना सहन करावे लागले. खरे तर हालअपेष्टा प्रत्येकच कारावासात होत्या कारण सक्तमजूरी दरवेळेसच मिळायची. दिवसदिवसभर चक्की पिसावी लागायची. त्यांचे शरीर इतके भक्कम नव्हते की त्यांना ते सहन होईल. पण पर्याय नव्हता. मग मारहाण व्हायची. हंटरचे फटके पडायचे. त्यातच एखाद्या कैद्याने स्वतः केलेले काम वाढीव दाखवण्यासाठी यांचा आटा चोरला किंवा थोडासा जरी आटा जमीनीवर पडला तर वेगळी मारहाण व्हायची. त्यांच्या शरीरावर या मारहाणीच्या अनेक जखमा होत्या.

मला एकदा इलाही जमादारांनी सांगीतले होते की मौलाना येरवड्याच्याच कारागृहात एकदा होते. मात्र मला हे नक्की माहीत नाही.

मौलानांचा आणखीन जास्त अपमान करण्यासाठी त्यांना विशिष्ट प्रकारचे कपडे देण्यात आले जे अत्यंत टाकाऊ स्वरुपाचे व रफ होते. मात्र मौलानांनी तेही सहन केले. एकच स्टीलचे भांदे देण्यात आले ज्याचा वापर दिवसातील प्रत्येक गोष्टीसाठी करावा लागायचा. तेही त्यांनी सहन केले. त्यांना एक जाडेभरडे कांबळे फक्त देण्यात यायचे निजण्यासाठी!

अतीव हालात काढलेल्या या प्रदीर्घ कालावधीत मौलानांच्या मनातून भौतिक इच्छा नष्ट होऊ लागल्या. त्यांच्यातील खमकेपणा व स्वातंत्र्याची आस तेजःपुंज होऊ लागल्या. त्याग झळाळू लागला. कोणत्याही भौतिक वासना राहिल्या नाहीत. आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे कारावासात त्यांनी निर्माण केलेले साहित्यच सर्वाधिक व सर्वोत्कृष्ट ठरले.

ब्रिटिश सरकारने एकदा त्यांना सक्तमजूरी व दंडही ठोठावला. अर्थातच, त्यांच्याकडे पैसेच नसल्यामुळे त्यांना दंड भरता आला नाही. मग सरकारने त्यांची शायरीची पुस्तके. जी मौलानांच्या मते त्यांच एकमेव पुंजी होती, ती अत्यंत अल्प किंमतीत विकून तो दंड वसूल करून त्यांचा आणखीन अपमान केला.

मौलानांचे शायरीला सर्वात मोठे योगदान म्हणजे एकीकडे वझीर सारख्या शायरांची उथळ आणि काल्पनिक शायरी प्रसवत असताना आणि दुसरीकडे दागसारख्यांची जबान बयानची आणि काहीशी हझलीश शायरी प्रसवली जात असताना, मौलाना यांनी शायरीला पुन्हा एकदा नावलौकीक मिळवून दिला.

मौलाना यांची शायरी ही दैनंदीन शब्दात, दैनंदिन जीवनातील संदर्भांसहीत मनातील भावभावनांना अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करते. त्याम्च्या शायरीची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सूक्ष्म भावना प्रकट करू शकण्याची हातोटी!

मौलानांचे निधन १९५१ साली लखनौ येथे झाले.

आयुष्यात काही वेळा मक्केला गेलेल्या मौलानांचे त्या प्रवासातील सामान म्हणजे एक कपड्यांचा सेट आणि एक बेडिंग! स्वातंत्र्याआधी ब्रिटिशांना आणि स्वातंत्र्यानंतर अल्पसंख्यांक मुस्लिमांच्या बाजूने उभे राहून भारतातील नेहरू, पटेल यांना हादरवून सोडणारे मौलाना हे टिळक व गांधीभक्त होते. लोकमान्य टिळकांवर तर त्यांनी एक काव्यही रचलेले आहे.

पण 'चुपके चुपके' ऐकताना ती गझल त्यांची आहे हे कदाचित काहींना माहीत नसेलही!

मौलानांची खूप मोठी साहित्यनिर्मीती उपलब्ध आहे. स्वतःचा काव्यसंग्रह, गालिबचा अनुवाद, काव्यातील महत्वाचे घटक, याशिवाय त्यांनी अनेक लेख लिहीले. आज पाकिस्तानात त्यांच्या नावाने एक लायब्ररी व उपक्रमही आहे.

तर मौलाना हसरत मोहानी यांच्या काव्याचा, खरे तर मुख्यत्वे 'चुपके चुपके'चा आस्वाद घेण्यासाठी ती संपूर्ण गझलच येथे देत आहे. गुलाम अलीने न गायलेले असे अनेक शेर त्यात आहेत. अनुवादही देत आहेच.

============================================

चुपके चुपके रात दिन आसू बहाना याद है
हमको अबतक आशिकीका वो जमाना याद है

(लपवून, चोरून रात्रंदिवस रडत राहणे अजून आठवते. मला ते जुने प्रेमाचे युग अजून आठवते)

बाहजारा इझ्तिराब - ओ - सद हजारा इश्तियाक
तुझसे वो पहले पहल दिल का लगाना याद है

(हजारवेळा ती बेचैनी, व्याकुळता आणि दहा हजार वेळा ती उत्कंठा, कुतुहल! तुझ्याशी ते पहिलं पहिलं प्रेम जमणं मला आठवतं)

तुझसे मिलतेही वो कुछ बेबाक होजाना मेरा
और तेरा दातोंमे वो उंगली दबानाअ याद है

(तू एकदाची दिसताच मी एकदम साहसी होणे, काय काय मनात साठलेले होते ते बोलायला उत्सुक होणे आणि ते जाणवून तू शरमून दातात तुझे बोट धरून ठेवणे आठवते.)

खैंचलेना वो मेरा पर्देका कोना दःफतन
और दुपट्टेसे तेरा वो मुंह छिपाना याद है

(तू ज्या पडद्याआड उभी आहेस तो पडदा तुला कसलीही कल्पना नसताना मी अचानक ओढल्यानंतर मला तू दिसू नयेस या इच्छेने घाबरून ओढणीने तू स्वतःचा चेहरा झाकून घेणे आठवते.)

जानकर सोता तुझे वो कस्दे पाबोशी मेरा
और तेरा ठुकराके सर वो मुस्कुराना याद है

(तू झोपलेलीच आहेस हे पाहून आणि ती संधी मानून मी तुझ्या पावलाचे हळूच चुंबन घ्यायला झुकताच अभिनय करत असलेल्या तू लाथेने माझे डोके उडवून लावणे आणि हासत बसणे आठवते.)

तुझको जब तनहा कभी पाना तो अजराहे लिहाज
हाले दिल बातोंही बातोंमे जताना याद है

(अगदी चुकून तू एकटी भेटलीसच तरीसुद्धा समाजाच्या भयाने मनातील भावना 'कुणा इतरांच्या प्रेमकहाण्या' सांगूनच व्यक्त करणे आठवते.)

जब सिवा मेरे तुम्हाला कोई दिवाना न था
सच कहो क्या तुमकोभी वो कारखाना याद है

(अर्थ स्पष्ट आहेच)

गैरकी नझरोंसे बचकर सबकी मर्जी के खिलाफ
वो तेरा चोरीछिपे रातोंको आना याद है

(अर्थ स्पष्ट आहेच)

दोपहरकी धूपमे मेरे बुलाने के लिये
वो तेरा कोठेपे नंगे पांव आना याद है

(अर्थ स्पष्ट आहेच)

देखना मुझको जो बरगश्ता तो सौ सौ नाझसे
जब मनालेना तो फिर खुद रूठ जाना याद है

(मी रुसलेलो आहे, रागवलेलो आहे हे लक्षात आले की शंभर प्रकारे माझी समजूत घालून एकदा का मी मूडमध्ये आल्याचे समजले की मग इतके प्रयत्न करावे लागले म्हणून स्वतः रुसून बसणे मला आठवते.)

चोरी चोरी हमसे तुम आकर मिले थे जिस जगह
मुद्दते गुजरी पर अबतक वो ठिकाना याद है

(अर्थ स्पष्ट आहेच)

बेरुखीके साथ सुनना दर्दे दिल की दास्ताँ
और तेरा वो हाथमे कंगन घुमाना याद है

(माझ्या प्रेमाच्या प्रार्थना अत्यंत कोरडेपणाने ऐकताना लक्षच नसल्याप्रमाणे हातातली बांगडी फिरवत असायचीस ते आठवतं.)

आगया गर वस्लकी शबभी कही जिक्रे-फिराक
वो तेरा रोरोके मुझको भी रुलाना याद है

(ऐन मीलनाच्या रात्री काही कारणाने चुकून कायमच्या वियोगाचा उल्लेख झालाच तर तुझे ते हमसून हमसून इतके रडणे, कीमलाही शेवटी रडू येणे, आठवते.)

वक्ते रुख्सत अल्विदा का लफ्झ कहने के लिये
वो तेरे सुखे लबोंना थरथराना याद है

(मीलन संपवून लांब जाताना, वियोगाची सुरुवात होत असताना, सगळेच कायमचे संपलेले असताना निरोप घेण्यासाठी, म्हणजे अल्विदा म्हणण्यासाठी तुझे ते कोरडे ओठ कसेबसे थरथरणे आठवते.)

बावजूदे ऐअदा ऐतिकाफ 'हसरत' मुझे
आज तक अहदे हवस का ये फसाना याद है

( मक्ता मला एकांनी जसा सांगीतला होता तसा लिहीला आहे. शब्द व अर्थ याबाबत मी खात्री देऊ शकत नाही. )

(सातत्याने येणारा एकांतवास नशीबात असला तरी हे 'हसरत', मला तो प्रियतमेच्या ओढीचा जमाना अजूनही आठवतो.)

=========================================

हसरत मोहांनींचे काही इतर शेर:

=========================================

उनके खत की आरझू है उनके आमद का खयाल
किस कदर फैला हुवा है कारोबारे इन्तझार

(तिच्या पत्राची वाट पाहणे आइ तिच्य आगमनाचा विचार करणे! हा प्रतीक्षेचा कारभार कसा कसा आणि किती पसरलाय पहा)

=====================================

कुछ समझमे नही आता कि ये क्या है 'हसरत'
उनसे मिलकर भी न इजहारे तमन्ना करना

(तखल्लुसचा वापर खुबीने केला आहे. तिला भेटूनही मनातले न सांगणे हा काय प्रकार आहे बुवा?)

=====================================

जी मे आता है के उस शोखे-तगाफुल केशसे
अब न मिलिये फिर कभी और बेवफा हो जाइये

(माझी सतत उपेक्षा करणार्‍या त्या सुंदरीला आता कधीच भेटायला नको आणि आपणच बेवफाई करूयात असे मनात येत आहे. ) ( वास्तविक पाहता हे काय बेवफाई करणार? तिने आधीच बेवफाई केलेली आहे आणि यांना कधीचेच सोडून दिलेले आहे. शेरातली मजा व्यथित करणारी!)

======================================

तेरी मैफिलसे उठाता गैर मुझको, क्या मजाल
देखता था मै तुने भी इशारा कर दिया

(तुझ्या मैफिलीतून तुझ्या प्रेमातील माझा प्रतिस्पर्धी असलेला माणूस मला जायला सांगेल अशी त्याची हिम्मतच नव्हती. मी बघत होतो की तो कशी काय हिम्मत करतोय, तेवढ्यात... तूही इशारा केलास मला जायचा...)

========================================

आधीचे लेखः

१. डॉ सर मुहम्मद इक्बाल - http://www.maayboli.com/node/22554

२. साहिर लुधियानवी - http://www.maayboli.com/node/22651

३. श्रेष्ठ शायर फिराक गोरखपुरी - http://www.maayboli.com/node/23096

========================================

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

धन्यवाद बेफिकीर! चुपके चुपके म्हणजे गुलामअली इतपतच माहिती Sad . तसेही कविता, गजल वगैरे यातले गाणे ऐकणे या पलिकडे फारसे काही कळत नाही पण स्वातंत्र्य लढ्यात एवढे कष्ट भोगणारे देशप्रेमी म्हणूनही मौलानांबद्दल काही माहित नव्हते. पुन्हा एकदा धन्यवाद.

एक चांगली ओळख करून दिलीत आपण. मौलानांबद्दल खुप काही कळाले.

मौलाना हसरत मोहानी यांना सलाम.

खुप खुप धन्यवाद.