थांबणे सोसेल तोवर लागते चालायला - तरही

Submitted by बेफ़िकीर on 7 February, 2011 - 06:36

तरही गझल मैफिलीतील माझा सहभाग! डॉ. कैलास यांचे आभार! या तरही ओळीमुळे माझ्या नोव्हेंबर २००९ मधील एका अपूर्ण गझलेतील एक शेर (शेर क्रमांक ३) कामास (कामी) आला याबद्दल विशेष आभार!

-'बेफिकीर'!
==============================================

बाप दारूड्या मुलाला पोसतो जगवायला
थांबणे सोसेल तोवर लागते चालायला

सोडले न्यायालयाने आत्महत्या मानुनी
सून ज्यांनी जाळली ते लागले मिरवायला

भाकरीसाठी निघाले तालुके शहराकडे
राहिली ओसाड गावे बाजरी पिकवायला

लोटल्या घाणीत अस्थी, लाजली इंद्रायणी
माउली बाहेर तुम्हीही निघा लाजायला

पाळले कर्तव्य त्यांनी, एवढा संताप का?
चालले नव्हतेच दादोजी शिवाजी व्हायला

गुलमोहर: 

वा!!

भूषणजी, चक्क सामाजिक आशय असलेली गझल!!

भाकरीसाठी निघाले तालुके शहराकडे
राहिली ओसाड गावे बाजरी पिकवायला

पाळले कर्तव्य त्यांनी, एवढा संताप का?
चालले नव्हतेच दादोजी शिवाजी व्हायला>>>>

हे दोन शेर आवडले Happy

अप्रतिम सत्य कथन.
बाप दारूड्या मुलाला पोसतो जगवायला
थांबणे सोसेल तोवर लागते चालायला

सोडले न्यायालयाने आत्महत्या मानुनी
सून ज्यांनी जाळली ते लागले मिरवायला

हे दोन्ही जवळून पाहिलेलं आहे.

बेफिकीरजी,
खूप कांही संगणारी अन अंतर्मुख करणारी गजल.

पाळले कर्तव्य त्यांनी, एवढा संताप का?
चालले नव्हतेच दादोजी शिवाजी व्हायला , हा शेर थेट भिडला. अभिनंदन

भाकरीसाठी निघाले तालुके शहराकडे
राहिली ओसाड गावे बाजरी पिकवायला

पाळले कर्तव्य त्यांनी, एवढा संताप का?
चालले नव्हतेच दादोजी शिवाजी व्हायला>>>>

जबरदस्त !!!!!!!!!!!! गजलेचा प्रत्येक शेर स्वतंत्र असतो, याचा अप्रतिम नमुना.......

बाजरीचा शेर खूप आवडला...
लिहीत रहा,
शुभेच्छा!

- चैतन्य.