शास्त्रीय संगीत प्रश्नोत्तरे

Submitted by webmaster on 9 June, 2008 - 21:35

हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीताचा उगम कुठे आणि कसा झाला?

माझ्या वाचण्यात आलेल्यापैकी काही theories खालील प्रमाणे:

Theory क्र. १) हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीत हे पर्शियन म्हणजे इराणी संगीतातून निघालयं. साधारण बाराव्या शतकात हे संगीत भारतात आलं आणि त्या नंतर काही महान विभूतिंनी (उदा. तानसेन इत्यादि) त्या संगीताला वेगवेगळी स्वरूपं दिली जसे खयाल, ध्रुपद, ठुमरी, कजरी, टप्पा इ.

Theory क्र. २) ही theory आपल्याला पार पुरातन काळात घेऊन जाते. ब्रम्ह्ना, हनुमान, शिव आणि क्रुष्ण ह्या देवादिकांनी चार 'मत' स्थापन केले. इथे 'मत' चा अर्थं 'मती' किंवा 'बुद्धी' असा घ्यावा.
ब्रम्हा-मत पासून खायाल गायन निघाले.
हनुमान-मत पासून ध्रुपद गायकी उत्पन्न झाली.
क्रुष्ण-मत पासून ठुमरी, कजरी इ. निघाले.
शिव-मत ...??? [ sorry , मला ह्या बद्दल फ़ारसं माहीत नाही].

इथून पुढे ह्या सर्वं गायकी प्रचलित झाल्या.

Theory क्र. ३) नारद मुनींनी गायन विद्या ही स्वर्गातून प्रुथ्विलोकांत आणली. अथर्वंवेदाचा पाठ हा हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीताच्या स्वरांमध्ये केल्या जातो. वेदांचं पठण होऊ लागल्यापासून हे संगीत प्रचलित झालं. हा झाला mythology चा भाग. परंतु ह्या मागील व्यावहारिक संदेश काय असेल?

ह्यातली कुठली theory खरी मानायची, आणि कितपत खरी मानायची?

ह्यावर कुणि प्रकाश टाकू शकेल काय? वरील माहिती दुरुस्तं करावयाची असल्यास जरूर करावी.

हा प्रश्न rakhalb यानी विचारला होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राग मलुहा केदार बद्दल सोप्या भाषेत (पक्षी- राजन पर्रीकरांच्या जड भाषेत नसलेलं) माहिती कोणी देऊ शकेल का?
माझ्या गुरुजींचा आवडता राग आहे. एकदाच त्यांचा रियाज ऐकलाय या रागाचा. पण नीट माहिती नाहिये.
मंद्रसप्तकात जास्त खुलवला जातो आणि मंद्रातल्या शुद्ध मध्यमावर न्यास आहे इतकं माहिती आहे.
पण स्वरविस्ताराबद्दल कोणी माहिती देऊ शकेल का?

तुम्ही निखिल बॅनर्जींचा मलुहा कल्याण ऐकलाय का? कदचित त्यातुन "मलुहा" या प्रकाराबद्दल कदाचित माहिती मिळेल. म्हणजे हे आपल माझा सजेशन. मला त्यातल ओ की ठो कळत नाही. मी पं भीमसेन जोशींचा मलुहा केदार ऐकलाय. मस्त एकदम!

http://www.cse.iitk.ac.in/users/hvs/Veena/lecdems.html

http://www.it.iitb.ac.in/~hvs/Veena/semester_series.html

वीणाताईंची काही लेक्चर्स, शास्त्रीय संगीताबद्दल! मला फार आवडलीत सगळी. सगळं बेसिक! वीणाताईंनी राग डेमॉन्स्ट्रेट केलेत.

अगदी बेसिक प्रश्न ...
कपृया हसू नये...

राग म्हणजे नक्की काय ?
तो कसा ओळखतात ? मुळात तो ओळखावा का लागतो? एकाच रागावरची गाणी वेगवेगळी कशी असतात? च्ज्याला रूढ अर्थाने चाल म्हणतात ते शास्त्रीय संगीतात नेमके काय असते.? राग कधी २-३ मिनिटात आटोपतात तेच राग २-३ तास कसे चालतात?

राग म्हणजे १२ स्वरांपैकी काही स्वर घेऊन, त्याचे चलन (आरोह, अवरोह, ठेहेराव, वादी / संवादी स्वर, मींड, कण स्वर इ.) ठरवलेला साचा. हल्लीच्या माबो भाषेत 'जमीन' Proud

ओळखावा का लागते: समजा १०० राग आहेत आणि गाणारा त्या पैकी कुठला गातोय हे त्याने सांगितले नाही आणि मैफिलीत बसून ५-३-२ खेळायला बंदी असेल तर मग राग ओळखायची पद्धत आहे. सक्ती नाही. तेवढंच आजूबाजूच्या लोकांना भारी वाटतं. उगाच समेवर मानेला हिसका द्यायची पद्धतपण आहे. मानेचा आजार असेल तर आपल्या जवाबदारीवर. ताल कळला नाही, तरी हात (आपल्याच) मांडीवर अधून मधून मारवा.

गाणी वेगवेगळी कशी? राग ह एक स्वर समूह आणि जनरल चलन वलन सांगतो. संगीतकार त्यात वेगवेगळ्या रचना करू शकतोच ना. परत सुगम/ फिल्मी बरीच गाणी रागावर आधारित असतात, काही सूट घेतलेली असते. अनेक गायक/ गायिका इम्प्रोवाईज़ करताना (घराणे अलाऊ करत असेल तर) भलते सूर पण लावतात जे कानाला सलते वाटत नाहीत.

चाल: शास्त्रीय संगीतात पण चालच म्हणतात, 'शास्त्रीय-वाईट' चाल असतेच राव. आठवा: पेपर वाटताना शास्त्राच्या बाई/ बुवांचा चेहरा.

२-३ मिनिटे ते २-३ तास: आता जमिनीत 'काय' पेराल ते उगवेल. एकाच जमिनीत हिणकस रचना वाचायच्या असतील तर यांना संपर्क करा. आमचा मास्तर maxwell चा राग २ मिनिटे ते एक सेमिस्टर असा आळवायचा. मास्तरांचा राग करू नका.
Light 1

अमित तुमचे पोस्ट उपहासाच्या अंगाने गेले आहे. त्यामुळे माहिती मिळाली नाही. रागातील स्वर समुदाय जो असतो तो कोणतेही चार पाच स्वर रँडमली जोडले तर राग तयार होऊ शकेल काय .... पुन्हा नवीन शब्द सम म्हणजे काय. यू ट्यूबवरही पाहिले पण उदाहरणासह कोणी डेमो दाखवताना दिसत नाहीत. हे नैसर्गिक रीत्या येते की अभ्यासाने सिद्ध होते?

रॉबिनहूड, आत्ता घाईत आहे पण तरी थोडे लिहिण्याचा प्रयत्न करते. नंतर वाढवेन पोस्ट. साध्या शब्दांत सांगायचा प्रयत्न करते Happy

आपल्याला सगळ्यांनाच माहीत असेल की संगीतात सात सूर - सा रे ग म प ध नी. ह्यातील सा आणि प हे सूर अचल आहेत म्हणजे आपल्या मूळ स्थानापासून हलत नाहीत. रे ग ध नी हे चार सूर कोमल होतात म्हणजे शुद्ध स्वराची जी जागा असते त्यापासून उतरतात तर मध्यम हा तीव्र होऊ शकतो म्हणजे शुद्ध मध्यमापेक्षा थोडा चढतो. हे गाऊन किंवा पेटीवर स्वर वाजवून दाखवले तर जास्त चांगले समजेल.

तर ह्या बारा स्वरांपैकी ( सात शुद्ध, चार कोमल आणि एक तीव्र ) ह्यांची वेगवेगळी काँबीनेशन्स केल्यास वेगवेगळे राग तयार होतात. पाच स्वरांच्या रागाला ओडव जातीचे राग म्हणतात, सहा स्वरांच्या षाडव जातीचे राग म्हणतात तर सारेगमपधनी हे सगळे स्वर वापरले गेले असल्यास ( शुद्ध/ तीव्र/ कोमल किंवा दोन्ही स्वरुपात ) तर त्याला संपूर्ण जातीचे राग म्हणतात.

आरोहात ( सुरांची चढती कमान ) एक जात आणि अवरोहात ( उतरती कमान ) एक असे असल्यास ओडव-षाडव, षाडव-संपूर्ण अशा वेगवेगळ्या प्रकारांतही राग येऊ शकतात.

उदाहरण : राग भूप : ओडव: सगळे सूर शुद्ध
आरोहः सा रे ग प ध सां
अवरोह: सां ध प ग रे सा

प्रत्येक रागाला एक पकड असते म्हणजे मुख्य स्वरसमूह. त्यावरुन राग ओळखायला मदत होते. तसेच प्रत्येक रागाला विशिष्ट असे चलन असते म्हणजे हे सूर एका विशिष्ट ऑर्डरमध्येच येऊ शकतात. ते सांभाळून रागाची बढत करता येते म्हणजे त्या रागातल्या सुरांची वेगवेगळी काँबिनेशन्स करत गाता येते. तसेच एक वादी आणि संवादी स्वर असतो. तो म्हणजे त्या रागातला राजा आणि प्रधान असे म्हणता येईल. त्या सुरांना जास्त महत्त्व देऊन म्हणजे स्वरसमूह बनवताना ते स्वर जास्त गुंफून गायले तर राग डिफाईन होतो.

हे सगळे नियम का ? तर बारा स्वर वापरुन तर वेगवेगळे राग होतातच पण तेच सूर वापरुनही केवळ हे नियम पाळून दोन वेगळे राग होऊ शकतात.
उदा. राग देसकार. ह्याचे सूर अगदी भूपसारखेच. पण ह्याची पकड आणि चलन थोडे वेगळे आहे. तसे चलन भूपमध्ये घेणे टाळतात.
तसेच भूप हा पूर्वांगप्रधान राग आहे ( वादी स्वर ग आणि संवादी ध ) तर देसकार उत्तरांगप्रधान राग आहे ( वादी ध आणि संवादी ग. त्यामुळे सप्तकातल्या खालच्या स्वरांवर रेंगाळता येत नाही. ) अर्थातच देसकारातल्या बंदिशी ऐकल्या तर सप्तकातल्या वरच्या स्वरांत बांधलेल्या आहेत.
ह्या वरच्या भूपच्याच सुरांत एखादा सूर कोमल झाल्यास वेगळा राग, स्वर वाढल्यास वेगळा राग, आरोह अगदी भूप सारखा पण अवरोह वेगळा असे करुन वेगळा राग. असे सगळे सूर वेगवेगळ्या प्रकारे वापरुन किती राग तयार होतील ह्याची तुम्ही कल्पना करु शकाल Happy

थोडक्यात राग पेश करणे हे एखादी पाककृती रांधण्यासारखे आहे. एखादा जिन्नस वाटीभर, एखादा चमचाभर, एखादा चिमूटभर तसे एखादा सूर परतपरत येतो, एखादा थोडासाच येतो आणि एखादा येतच नाही. एखादा सूर चमचाभर लावण्याऐवजी वाटीभर पडला तर राग बिघडला Happy

एखादा राग दोन-तीन मिनिटं तर एखादा दोन तास : एखाद्या रागातला स्वरसमूह इसेन्ससारखा गाऊन दाखवून ( रागातले मुख्य स्वरसमूह घेऊन ) दोन मिनिटांत राग दाखवता येईल. त्यापुढे असते ती बढत. वरच्या भूप रागांत पाचच स्वर असले तरी त्याची शेकडो काँबिनेशन्स बनू शकतात. ते वेगवेगळ्या लयीत ( स्पीडला ) गाता येतात. संथ असतील तर आलाप, तेच खूप फास्ट घेतले की ताना.
रागातली विशिष्ट तालात बांधलेली बंदिश ( एकच ताल खूप संथ पद्धतीने वाजवला जाऊन बंदिश बांधली तर बडा ख्याल, तर मध्यम/ जलद गतीत बांधल्यास छोटा ख्याल ) ह्या बढतीला एक आकृतीबंध देते. त्या बंदिशीतले शब्द गुंफून स्वरसमूह केल्यास बोलआलाप, बोलताना गाता येतात. नोम तोम सारखे शब्द गुंफून तराणा गाता येतो. अशा प्रकारे राग रंगवण्याचा वेळ वाढतो Happy

हेच स्वरसमूह वापरुन भावगीतंही बांधता येतात पण बर्‍याचदा अगदी स्ट्रिक्टली तेवढेच सूर वापरले जातील असं नाही. भावगीतं शब्दप्रधान असल्याने रागाचे चलन मोडू शकते पण प्रामुख्याने रागाचे विशिष्ट चलन आल्यास एखादे गाणे ह्या रागावर आधारित आहे असे म्हणता येते. अर्थात अगदी एकाच एक रागात बांधलेली गाणीही आहेत Happy

खर तर हे मी इथे नाही विचारायला पाहिजे पण कुठे विचारु कळेना. पारीकराची वेबसाईट आपल्यापैकी बहुतेक लोकांना माहित असेलच. मला प्रचंड आवडते ती साईट. पण तिथे अली अकबर खानांना फार नावे ठेवलियेत त्याने. का हे माहितीय का कुणाला? कारण मला आवडते अली अकबरांची गाणारी सरोद!

हुडा,

सात स्वरापैकी कोणतेही किमान पाच स्वर घेऊन राग होतो. त्यात सा असावाच लागतो. म किंवा प पैकी एक तरी असावाच लागतो. उरलेले स्वर काहीही चालतात.

गणिती नियमानुसार हजारो राग होऊ शकतात.

पण ज्याच्यात गोडवा आहे आणि कानाला गोड वाटतात असे राग कमीच असल्याने केवळ तेच ' राग ' या नावासाठी पात्र ठरतात.

एक राग दोन तीन मिनिटे आणि काही दोन तीन तास-
याची दोन कारणे असू शकतात.
ज्या काळात ध्वनिमुद्रण अस्तित्वात आले तेव्हा त्याची मर्यादा ३ ते ३.५ मिनिटांची होती (असे ऐकले आहे)
त्यामुळे प्रत्यक्षात ज्या एखाद्या रागाच्या स्वरांची अनेकविध पर्म्युटेशन्स कॉम्बिनेशन्स होऊन चांगला दोन दोन तीन तीन तासही ज्याचा रागविस्तार (राग उलगडत नेणे) शक्य होते अशा रागांचं अगदी मर्म असं त्या ३ ते ३.५ मिनिटांत त्या गायकांनी गायिलं आहे. अर्थात हे त्यांच्यासाठीही अवघड शिवधनुष्य पेलण्यासारखंच होतं.
हे एक कारण.
दुसरं म्हणजे काही रागांचा आत्माच तेवढा नसतो. (म्हणजे, त्यातले स्वर आणि त्यांची त्या रागाच्या नियमाला धरून होणारी कॉम्बिनेशन्सच मर्यादित स्वरूपाची असतात.) त्यामुळे असे राग फार वेळ आळवता येत नाहीत. असे राग कमी वेळ (अगदी २-३ मिनिटे नाही, पण ८-१० मिनिटेच) गायले/ वाजवले जातात.

अगो, फार छान समजावून सांगितलं आहे.

कुलु,
पर्रीकरांच्या साईटवर अलि अकबर खाँ आणि पं .जसराज यांना नावे ठेवलेली आहेत.
बहुतेक पर्रीकरांच्या मते उस्ताद अल्लाउद्दिन खाँ (अलि अकबरांचे वडील) यांचा वारसा अलि अकबर समर्थपणे पुढे नेऊ शकले नाहीत आणि ते कां बाबा अलाउद्दिन खाँसाहेबांच्या जावयाने म्हणजेच पं. रवि शंकर यांनी केलं. म्हणून त्यांची सर्वत्रच स्तुती दिसेल साईटवर. हा माझा अंदाज आहे. नक्की माहिती नाही.
जसराजांना का नांवे ठेवतात तेही काही अंशी समजतेच. पण असो..
त्या साईटवर मी तरी फक्त जुने आणि दुर्मिळ काही तरी ऐकण्याच्या उद्देशाने जातो.
पर्रीकर बरेच अवघड शब्द वापरून लिहितात त्यामुळे लिहिलेले वाचून सहज पचत नाही.

चैतन्य,
जसराजांना का नावे ठेवलियेत हे खरंच समजतं. त्यांची गोरख कल्याण ची आणि अडाण्यातली जुनी रेकॉर्ड आहे, तेवढीच आवडते मला. बाकी जसराज तेवढे भिडत नाहीत. बर्याच जणानी संगितलं म्हणुन त्यांची न पं. हरिप्रसादांची जयजयवंती ची जगलबंदी ऐकली., पण नाही रुचली तितकिशी Sad तार सप्तकात जायचा केवढा तो अट्टाहास, त्यात जयजय्वंती बिचारी कोपर्यात कुठे तरी राहीली. Sad

अगो, किती छान , अभ्यासपुर्ण आणि तरीही रोचक अशा भाषेत समजाविले आहेस. एक वेगळी लेखमालाच लिहायला घे. आईचेही लेख घे नक्की त्यामधे. बरोबर ऑडिओ विवेचन असेल तर बहार येईल.
:स्वप्नरंजन करणारी बाहुली:

http://www.youtube.com/watch?v=-AmK0LX1lEI

ही लिंक पहाच. निखिल बॅनर्जींचे संगीताविषयीचे विचार, त्यानी अगदी सुक्ष्मातिसुक्ष्म भेद सतारीवर demonstrate केलेत!

अवल, चैतन्य आणि मुग्धानन्द, मनःपूर्वक धन्यवाद Happy

मला खरंच आवडेल लेखमाला लिहायला. विशेषतः जराही जड भाषा न वापरता अधिकाधिक लोकांना संगीताच्या जादुई दुनियेची ओळख करुन द्यायला ! फक्त लिहिण्याबरोबरच तिथल्यातिथे ते गाऊन दाखवता आले तर बरे पडेल. असं करता येईल का विचारायला हवं Happy

अगो,
तिथल्या तिथे गाऊन दाखवलेलेच जास्त चांगले.
ऑडिओच्या लिंक्स त्या त्या पेजवर डकवणे शक्य ठरावे अ‍ॅडमिनला.
अगदीच तसे न जमल्यास, साउंडक्लाउड वर अपलोड करून त्याची लिंक लेखात दिली तरी काम होईल.
साऊंडक्लाऊडवरून ऐकत ऐकत लेख वाचता येऊ शकेल. लवकरात लवकर लिहायला घे. वाट बघतोय.

अगो, इथे जमणार नसेल तर स्वतःचा ब्लॉग बनव...तिथे तुला ऑडिओ/विडिओ असे दोन्हीही सहजपणे चढवता येईल...आणि एक कायमस्वरूपी दस्त-ऐवजही तयार होईल.
दाद,चैतन्य, तुम्हीही ह्या सुचनेचा गांभीर्याने विचार करा...तुमच्याकडेही बरंच काही आहे..देण्यासारखं!

राग म्हणजे नक्की काय ?
तो कसा ओळखतात ? मुळात तो ओळखावा का लागतो? एकाच रागावरची गाणी वेगवेगळी कशी असतात? च्ज्याला रूढ अर्थाने चाल म्हणतात ते शास्त्रीय संगीतात नेमके काय असते >>>>
@राहू साहेब, तुम्ही आधी ५०-१०० तास तरी रागसंगीत ऐका. तुम्हाला ऐकावेसे वाटते आहे का? आवडते आहे का ते बघा. जर आवडते आहे असे वाटत असेल तर च ह्या प्रश्नांची उत्तरे शोधा. ( खरे तर शोधावी लागणारच नाहीत )
जर आवडले नाही, किंवा २ वेळेला ऐकुनच "पुन्हा नको" असे झाले तर मग ह्या प्रश्नांची उत्तरे ( पुस्तकी )तुम्हाला मिळाली तरी ती तुम्हाला कळणार नाहीत.
कारण राग हा कमीतकमी पाच स्वराचा समुह असतो आणि त्याला चलन वगैरे असते, असली उत्तरे तुम्हाला पाठ होतील पण कळणार नाहीत.

आणि खरेच सांगतो, तुम्हाला राग संगीत आवडत असेल किंवा आवडायला लागले तर हे प्रश्न पडणारच नाहीत. कारण उत्तरे अगदी सरळ, साधी तुमच्या समोर असतील.

आणि खरेच सांगतो, तुम्हाला राग संगीत आवडत असेल किंवा आवडायला लागले तर हे प्रश्न पडणारच नाहीत. कारण उत्तरे अगदी सरळ, साधी तुमच्या समोर असतील.>>>>>>>
@ टोचा एकदम बरोब्बर. Happy

टोचा,
तुम्ही म्हणताय ते खरे आहे.
पण शास्त्रीय संगीत शिकणार्‍यांनी/ जाणणार्‍यांनी ते अजून लोकांपर्यंत कसे पोहोचेल याचाही विचार करायला हवा.
पु. ल. देशपांडेंच्या एका भाषणात त्यांनी आइनस्टाईनचा किस्सा सांगितला आहे. किती खरा/ खोटा माहिती नाही, पण किस्सा असा-
"आइनस्टाईनच्या घरी पार्टी होती. सगळे जमलेले लोक एकत्र त्यांच्या शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेत होते.पण एक तरुण मात्र त्याचा आस्वाद घेऊ शकत नव्हता. त्याला समजलेच नाही हे काय चालू आहे. आइनस्टाईनच्या लक्षात ते आलं आणि तो त्या तरुणाला घेऊन वरच्या मजल्यावरच्या आपल्या खोलीत गेला. तिथे त्या तरुणाला त्याने त्याच्याकडे असलेले संगीताचे काही नमुने ऐकवून. 'हे अमुक कसं आहे बघ. हा रिदम कसा आहे बघ.' असं समजावलं.
आइनस्टाईनसारख्या माणसालाही पार्टी बाजूला ठेवून 'संगीताचा आस्वाद घेऊ न शकणार्‍याला संगीत समजावून सांगणं गरजेचं वाटलं' ....

अवांतराबद्दल क्षमस्व.
पु.लं. चं ते भाषण इथे ऐकू शकता.
मोठं भाषण आहे त्यात हा किस्सा त्यांनी सांगितला होता.

हूड साहेब, तुम्ही कोणत्या उद्देशाने ते प्रश्नं विचारले आहेत ते समजून घ्यायला आवडेल. म्हणजे त्या अनुशंगाने अधिक ’साजेसं’ उत्तर देणं सोपं होईल. अगोनं दिलेली तांत्रिक माहिती सुरेख आहे, योग्यं आहे. पण त्या माहितीचा तुम्हाला बोध/उपयोग झालाय का नाही ते कळलं नाहीये. ती म्हणतेय तसं समोर बसून गाऊन दाखवत उलगडण्याचा हा विषय आहे.
असो... माझ्याकडून अजून एक आगाऊ पोस्ट... जी इतरांपेक्षा फ़ार वेगळं सांगत नाहीये (बहुतेक).
राग म्हणजे स्वरांच्या समुहाचं विशिष्टं चलन-वलन... येणं जाणं (ज्याला आरोह-अवरोह म्हटलय).
त्या नियमात पुढील गोष्टी येतात -
कोणते सूर लागतात आणि कोणते वर्ज्य आहेत.
आरोहात कोणते आणि अवरोहात कोणते
कोणते सूर वारंवार दाखवावेत (च्वादी, संवादी... उदा. भूप आणि देसकारचं उदाहरण अगोनं दिलय ते)
आणि अधिक खोलात जाऊन - काही रागांमधे त्यातल्याच सुरांचं विशिष्टं कॊम्बिनेशन त्याच पद्धतीनं येणं आवश्यक आहे
वगैरे... ही झाली रागाची व्याख्या.
आता चाल - चाल म्हणजे गाण्याचे शब्दं विशिष्टं सूर अन ताल ह्यात म्हणता येण्यासाठीची सुरावट. उदा. गीताचे शब्दं न म्हणता जर तुम्ही ला ला ला ल्लल्ल ला... करीत गाणं म्हणत असाल (आणि ते दुसयाला ओळखता आलं तर Happy ) तुम्ही चाल म्हटलीत त्या गाण्याची.
गाण्याची चाल ही पूर्णत: एकाच रागावर आधारित असू शकते किंवा त्या रागात नसलेला एखाद-दुसरा सूर लावून त्या रागावर आधारित असू शकते... किंवा संपूर्णं भेळ!

ज्योती कलश झलके - पूर्णत: भूप रागात बांधलेलं एक अप्रतिम गीत.

आता... राग ओळखणे, त्याची व्याख्या माहीत असणे वगैरे, शास्त्रीय संगीत ऐकण्याच्या आनंदात किती भर घालतात? अगदी किंचितही नाही असं माझं मत. हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकेच राग मला ओळखता येतात. पण कोणत्याही शास्त्रीय संगीताची मैफिल काळीज अंथरून ऐकायला कोणताही अडसर येत नाही.
हा... मध्यंतरात ... धैवताची श्रुती कसली दाखवलीय बुवांनी म्हणताय.... वगैरे चर्चेत भाग न घेता मी निवांतपणे पुन्हा एकदा काळीज अंथरून बटाटेवडा-कॊफ़ीचा आस्वाद घेते... बटाटेवड्याची अन कॊफ़ीची रेसिपी माहीत असूनही माझी तशी होत नाही... अन रेसिपी माहीत असून-नसून त्या आनंदात तसूभरही फ़रक पडला नसता की नै?
तस्सच आहे संगीताचंही.
फार बोलले.

पण आपण ऐकलेला राग ओळखता येणं ह्यातही गंमत आहेच... त्यासाठी रागाची नुस्ती माहिती असणं पुरेसं नाही. तोच राग अनेक रुपांत - गाणं, वाद्यं, खयाल, बंदिश, तराणा, गीतं... अशा अनेक प्रकारांमधून एकला की कोरलाच जातो मनावर.

अगो, अतिशय सुंदर पोस्ट. अगदी सोप्या शब्दात 'शास्त्रीयत्व' उलगडून दाखवलेत तुम्ही. अजून नक्की लिहा. ह्याच धाग्यावर लिहा किंवा वेगळा लेख लिहा, पण नक्की लिहा.

चैतन्य, एखादी कार्यशाळाच करूया. नुसते शिकवणेच नाही तर एकमेकांकडचा संगिताचा खजीना ऐकायला पण खूप मजा येइल.

दाद, तुमची पोस्ट वाचून जाणवले की गानभूली बर्‍याच दिवसात आली नाहीये Happy

Pages