मायबोलीवर येताना....

Submitted by प्रज्ञा९ on 25 January, 2011 - 17:53

साधारण २००७ च्या शेवटी मी घरी इंटरनेटची सुविधा घेतली. प्रोजेक्ट पूर्ण करताना सतत लागेल म्हणून. आणि मग बाकीचा अभ्यास करताना सहज एकदा पुलंबद्दल काही माहिती मिळते का ते बघायला म्हणून गूगल केलं आणि पुलंच्या साइटबरोबरच मायबोलीचा शोध लागला. व्यक्ती आणि वल्ली मधून अनेक व्यक्तींच्या छान साइट्स मिळाल्या, पण खुद्द मायबोलीवरचं लेखन सुद्धा सापडलं. आणि "प्रथमग्रासे नवनीतप्राप्ती" व्हावी तशी दाद यांचं "नावात काय्ये!" हे विनोदी लेखन मिळालं. मग रोज एक(च) काहीतरी वाचायचं असं ठरवून शोध चालू झाला. त्या वेळी मराठी महिन्यांचे अर्काइव्ह्ज होते. त्यामुळे मूळ लेखन मिळायला थोडा वेळ लागे. पण रोमात राहून वाचन चालू होतं. मग काही दिवसांनी समजलं की मायबोलीचं नूतनीकरण होत आहे....थोडी निराश झाले. यासाठी, की पुन्हा काहीही अडचण न येता ही साइट नक्की उघडेल ना? पण सुदैवाने मायबोली नवीन रूपात सुरू झाली.

सुरुवातीला कळेना, की कोण कोणाला उद्देशून काय बोलतंय! पण तरी नुसतं समजून घेणं चालू होतं. बरेच दिवस खातं नव्हतं उघडलं. मग एक दिवस रत्नागिरीच्या एका आयडीने केलेलं लिखाण वाचलं, आवडलं आणि ओळख नाही, पण आपलाच गावकरी आहे Happy तर चांगला प्रतिसाद द्यावा म्हणून खातं चालू केलं. अर्थात रोम मोड सुटला नाही. पण मग माझाही एक अनुभव इथे शेअर केला. फार प्रतिसाद येतील अशी अपेक्षा नव्हतीच! स्वान्तःसुखाय केलेलं लिखाण ते, लोकांना नाही आवडलं तर न का आवडेना!!

आणि नेमकी हीच सीमारेषा आखून घेतली मी स्वतःसाठी. खूप वाचत होते. म्हणजे माझा BE चा अभ्यास आणि प्रोजेक्ट वगैरे सांभाळून जमेल तेवढंच. कारण ती शेवटची सेमिस्टर होती. पण मराठी वाचायचा वेग बर्‍यापैकी चांगला असल्यामुळे १५-२० मिनिटं वाचलं तरी बरंच वाचून होई.
पुढे उत्तम प्रकारे रिझल्ट लागून मी नोकरीला लागले. थर्ड यिअर ला असतानाच कॅम्पस सिलेक्शन झालं होतं, त्यामुळे ते टेन्शन नव्हतं.

पुण्यात येउन नोकरी सुरु झाली. मधल्या काळात मायबोलीवरचा वावर खूपच कमी झाला. २००९ मधे लग्न ठरलं. नवरा उसगावात होता. त्याच्याशी गप्पा मारण्यासाठी पुन्हा एकदा रूमवर नेट घेतलं. मग उरल्या वेळात पुन्हा मायबोलीवर डोकावायला सुरुवात झाली. पण तरी जास्त नाहीच.
मधून मधून गटग वृ वगैरे वाचून वाटायचं की जावं एकदा काय असतं ते बघायला, पण दरवेळी काही काम निघे आणि बेत बारगळे. ववि, गटग वगैरे खास शब्द सुरुवातीला पचनी पडत नसत. मग आपोआपच समजले. खरं तर मायबोलीला असंच समजून घेण्यात जास्त मजा आहे.
त्यानंतर डिसेंबर २००९ मधे लग्न होउन मीही उसगावात आले. (तरी वावर इकडे कमीच होता म्हणायचा!) रोमात राहून मात्र खूप प्रगती केली होती. पाकृ, कोकण, आरोग्य वगैरे गृप्स्मधे सामील झाले. एखादी पाकृ अडली की इथे येउन शोधायची, कंटाळा आला की इथे यायचं, योगामाधलं काही विसरायला झालंय असं वाटलं तर इथे येउन चेक करायचं वगैरे सवयीचं झालं.

मधल्या काळात नीधप यांचा "श्वास" वरचा लेख वाचला, आणि कुठेतरी खूप बरं वाटलं. कितीही आभासी जग म्हटलं तरी ही भावना सुखाची होती माझ्यासाठी. याच मधल्या काळात दाद, नंदिनी२९११ (माझ्या लक्षात राहिलाय हं वाढदिवस! Happy ) दक्षिणा, विशाल कुलकर्णी, कौतुक शिरोडकर, साजिरा, चाफा, राफा, झक्कीकाका, लिंबूकाका, पल्ली, चिनूक्स, अशा अनेक जाणत्या लोकांशी आभासी ओळख झाली. (अजून खूप आयडी आहेत, सगळ्यांचा उल्लेख झाला नाही..)
कोणी कथांमधून भेटलं, कोणी लेखमालांमधून, कोणी हसवलं, कोणी नकळत डोळ्यांत पाणी आणलं. काहीही असो, त्या क्षणी माझं असलेलं एकटेपण दूर केलं.

असं एकदा जुन्या हितगुजवर बागडताना बापुंचा बीबी सापडला. त्या बीबी ने करमणूक केलीच, पण अनेक लोकांशी खास ओळख झाली. म्हणजे आभासीच. मायबोलीचं अनोखं आणि जास्त कौतुकास्पद रूप दिसलं. त्या बीबीबद्दल अधिक काही इथे नाही सांगत. पुन्हा नको ते सगळं.

पण हल्ली ४-५ महिन्यांत, जेव्हा मी वर्क परमिट काढून नोकरी शोधायला सुरुवात केली तेव्हा मला पहिली मदत मायबोलीची घ्यावीशी वाटली. अजूनही शोध संपलेला नाही नोकरीचा, पण काहीतरी नव्याने लिहावंसं वाटलं. अर्थात त्यालाही काही कारणं आहेत.

गेल्या ४-५ महिन्यांत जुन्या विषयांअरच्या अनेक चर्चा वाचल्या. अगदी कंपूबाजीच्या आरोपापासून गटग वृ पर्यंत जमलं तेवढं नजरेखालून घातलं आणि गरज लागली तिथे समजून घ्यायचा प्रयत्न केला. खरंतर मला इथे कोणताच जुना वाद उकरून काढायचा नाही, नवीन वादाला सुरुवात करायची नाही (हे असं हल्ली फार लिहावं लागतं इथे याचं खरं दु:ख आहे. Sad )

पण इथे नवीन येताना काही गोष्टी जपल्या जाव्यात असं जे प्रकर्षाने जाणवलं ते सांगायचा प्रयत्न आहे. पटलं तर ठीक, नाहीतर सोडून द्यावा.

जेव्हा आपण अशा आभासी जगात येतो तेव्हा सगळं आपल्याला समजलंच पाहिजे, आणि तेही लवकरात लवकर, असा आग्रह का? आणि ते समजत नसेल तर ज्यांना समजतं, ते आपसात बोलतात म्हणून कंपूबाजी म्हणायचं का? त्यापेक्षा, थोडे दिवस इथे नुसतं येउन बघावं. वाचावं. आपला पिंड काय आहे, आवडी काय आहेत, त्यासंबंधी इथे काय लिखाण, चर्चा झाल्या आहेत, त्या चर्चा ज्यांनी केल्या आहेत, त्यातल्या कोणाचं मत आपल्याला पटतं ते बघावं. आपण मत व्यक्त करताना त्यामुळे कोणी व्यक्तिशः दुखावलं जातंय का हे बघणं कठीण आहे का?

कथा किंवा इतर वाङमयावर प्रतिक्रिया देणं आणि प्रत्यक्ष घटनेवरच्या एखाद्या लेखाला प्रतिक्रिया देणं वेगळं हे भान ठेवायला हवं. वाङमय आवडू शकतं किंवा नाही. पण घटना घडताना आपल्याला चॉइस नसतो. मग त्यावर बोलताना तरी सांभाळून बोली शकतो आपण. उदा. शिवाजी महाराज, राजकारण वगैरेंबद्दल बोलताना आपण स्वतःवर संयम ठेवू शकतो.

इथे आलो म्हणजे सगळे आपली वाटच बघत होते, आणि आता आपण काही लिहिलं नाही तर तो गुन्हा ठरेल अशा थाटात काही लिहायचं, आणि प्रतिक्रिया आली नाही/ अप्रिय प्रतिक्रिया आली की चिडायचं हे योग्य नाही. मुख्य म्हणजे इथे आपण आलो ते कोणी सांगून नाही, स्वतः आलोय हे लक्षात ठेवायला हवं. आणि जे करू ते सुरुवातीला तरी स्वत:साठी असायला हरकत नाही. मग इथे त्याला कसा प्रतिसाद मिळतोय ते बघून सुधारणा करता येतेच की!
माझा तरी अनुभव असा आहे, की एखादी बाब जर आवडली नाही, तर इथे तसं सरळ सांगतात. त्यामुळे आपण स्वतः बदलायचं की वाट बदलायची हे निवडणंही आपल्या हाती असतं.

"कालोह्ययम् निरवधिर्विपुला च पृथ्वी" हे वचन मला नेहेमी पटतं. "हा काळ अनंत आहे, आणि ही पृथ्वी विपुल- अमर्याद आहे. तस्मात, माझे विचार पटणारा कोणीतरी जा पृथ्वीवर कधी ना कधी नक्की येइल" हा विश्वास असला की बर्‍याच गोष्टी सोप्या होतात. फारच तत्त्वज्ञानी वाटेल हे, पण यातलं १/१० जरी आचरलं तरी निम्मा त्रास कमी होतो! Happy

खरंतर एकमेकांशी बोलावंसं वाटणं ही सगळ्यांचीच गरज असते. त्यामुळे शेअर करायला काहीच हरकत नसते. पण आपण सांगू तेच बरोबर अशी भूमिका घेतली की सगळंच बिनसतं. आणि मग वाद सुरु होतात.
मायबोली हे विसाव्याचं ठिकाण आहे, हेच विसरलं जातं.

एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतात तसं मायबोलीच्या प्रेमात पडावं. सुरुवातीला नुसतं बघणं, नजरानजर....
हळूच काही निमित्ताने ओळख्...मैत्री..मग प्रेम...

हे टप्पे झाल्यावर जर काही रुसवाफुगवा झाला तर गोडच वाटतो तो!"अनुभवावं" असं आहे हे सगळं. कारण फूल कसं फुंकर मारून फुलवता येत नाही तसं नातंही फुलवता येत नाही. मग आपण नातं जोडतोय हे विसरून कसं चालेल? सगळंच इंस्टंट मिळालं की किंमत नाही राहात.

आणि जर नातं जोडायचंच नसेल, तर मग सगळं माहिती असावं, आपल्या मतांची दखल घेउन त्याचा आदर केला जावा वगैरे सगळयाच अपेक्षा कशासाठी?

खरंतर "माझा काय संबंध" म्हणून मी दुर्लक्ष केलं असतं पण मायबोलीवर असं होउ नये ही कळकळ आहे म्हणून हा उपद्व्याप. काही दिवसांपासून वेगवेगळ्या बीबींवर काही ना काही वाद चालू असलेले बघितले, त्यांचा खास उल्लेख करायची गरज नाही वाटत.

मी काही लेखिका नाही, किंवा खूप जुनी माबोकर नाही. पण सूर जुळलेत इथे. खुस्पटं काढायला असलेल्या जागांपेक्षा मोहक वाटतील, लोभस वाटतील अशा खूप जागा आहेत इथे. या सुरेख अनुभवासाठीच हे सगळं लिहावंसं वाटलं.

गुलमोहर: 

फार फार छान लिहीले आहे प्रज्ञा ९. माझीही सुरुवात अशिच काहीशी झाली. मला तर काहिच कळायचे नाही. आताही फार कळते आसे नाही. मी एक चांगली वाचक आहे फक्त. प्रतिक्रिया देत असते. पण प्रज्ञा तुम्ही व्यक्त केलेल्या विचारांशी २००००००००००००% सहमत आहे. या कुरबुरी आणि वाद -विवाद अशा लेखनेतर गोष्टी मा.बो. वर किति वाढत चालल्या आहेत हे आपण रोज पाहत आणि वाचत आहोत. या बाबतित नुकतीच माझी एका जेष्ठ मा.बो. कराशी फोन वरुन चर्चा पण झाली होती.
आसो. नेमक्या भावना नेमक्या शब्दात मांड्ल्याबद्दल अभिनंदन.

मस्त लिहिलं आहेस. सुरवात सगळ्यांची तू सांगितलंस तशीच होते आणि मग चटक लागते Happy

हे मला उद्देशून लिहीले आहे की काय? हंSSSS. बहुधा चोराच्या मनात चांदणे, पण एकदा विचारून घेतलेले बरे.

नाही हो झक्कीकाका, ते तुमच्यासाठी नव्हतं. Happy
आणि गटग चं म्हणाल तर खरंच जमत नाहिये या वेळी. पुन्हा कधीतरी तुम्हा सगळ्यांशी भेट होईल अशी आशा करते.
घरचं कार्य असल्यासारखं आमंत्रण दिलंत, आभार तरी कसे मानायचे!!
पण या वेळी योग नाही...पुन्हा कधीतरी.

तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा! Happy

प्रज्ञा, सुरेख लेख. नक्की कोण(कोण्)त्या वादांबद्दलचा वैताग इतका परिपक्वं रूपात बाहेर आलाय माहीत नाही... पण तुझ्या शेवटच्या परिच्छेदात इथे येण्याचं कारण साध्या, सोप्प्या शब्दांत मांडलयस. जियो!

<<........सूर जुळलेत इथे. खुस्पटं काढायला असलेल्या जागांपेक्षा मोहक वाटतील, लोभस वाटतील अशा खूप जागा आहेत इथे. या सुरेख अनुभवासाठीच हे सगळं ........>>

मायबोली मला तरी अनेकदा सवाई सारख्या कार्यक्रमासारखी वाटते.... गुरूसेवेसाठी कुणा वेड्या शिष्याने सुरू केलेल्या ह्या "जत्रेत" "गोंधळ" घालणं हा बहुमान वाटावा असं. जिथं त्या "परंपरेची सेवा" हाच भाव असावा. इथे येऊन काही शिकायला मिळतय ह्याबद्दल आदर असावा.... काही सादर करता येतंय याचा सन्मान वाटावा. "मिळेल त्या बिदागी" वर समाधान असावं.

कधी "रोमात" यावं, घटकाभर जीव रमवावा, जो काही काळ इथे घालवला त्याच्या पाऊलखुणाही इथे न ठेवता.... पण मनातलं मळभ निरभ्रं करून परत आपल्या गावी जावं.
कधी "जोमात" यावं. अगदी ठळक पाल ठोकावा. आपल्या मनीचं सादर करावं. प्रतिक्रिया, प्रतिसाद ह्यापैकी जे आपल्या "प्रकृतीला" पटतं, रुचतं ते उचलावं, बाकी कृष्णार्पणमस्तू!

<< ..... नवीन वाद उकरून काढायचा नाहीये... हे असं फार लिहावं लागतं>>
हे एक अनेकदा अनेक ठिकाणी वाचलं.
का? वाद का? किंवा वाद का नाही? वाद नक्की कशासाठी?
हे प्रश्नं आपल्यातल्या प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवेत. वादही हवेतच. पण कोणते? ज्याविना विचारमंथन होणं नाही. हे ही तितकच खरं.
मायबोली हे एक विरंगुळ्याचं, शिक्षणाचं, समाधानाचं स्थान आहे. त्याचं पावित्र्यं वगैरे सोडा... किमान स्वच्छता राखण्याइतकं तरी आपण तिचं देणं लागतो ना?
का... घरातला कचरा नेऊन फेकायचा उकिरडा आहे हा?

किती प्रतिक्रिया ह्यावर लेखाची गुणवत्ता ठरायला.... इथे लिहिणारे अन वाचणारे कुणीही इतके माठ नाहीत हे आपल्यातल्या प्रत्येकाला माहितीये.

तसं सुधारण्यासारखं आपल्यातल्या प्रत्येकात काहीना काही असतच... Happy फक्तं, कोण सागतय, कसं सागतय ह्यावर स्वीकारायचं का नाही ते ठरतं... नाही?

असो... तुझ्या ह्या सुंदर लेखानिमित्तं माझा प्रतिसाद मोठा होतोय त्याबद्दल माफ कर.

छान लिहिलय. दादचा प्रतिसाद हा सर्वसमावेशक आहे.
कोणे एके काळी मायबोलीवर सतीश चौधरी नावाचे प्राध्यापक होते. 'मायबोलीवरून जातांना' असा लेख न लिहिताच गेले बिचारे! गेले म्हणजे निजधामाला नाही हो; माबोवरून अदृश्य झाले. आज सहज यानिमित्ताने त्यांची आठवण झाली. Wink

प्रज्ञा, नेमकं लिहिलंयस अगदी.
मीही अशीच आले माबोवर, आधी बिना-आयडिची वाचक म्हणून, मग आयडी घेऊनही रोमात, मग काही ठिकाणी प्रतिक्रिया, मग अधनं मधनं लिहिणं....
बर्‍याच लोकांशी ओळखी झाल्यात ( अर्थात आभासी )...पण आभासी वाटू नयेत इतकी जवळची वाटतात ती माणसे. विचार जुळले की अंतराची बंधनं रहात नाहीत.
रच्याकने....माझंही नाव प्रज्ञा. Happy
दादचा प्रतिसाद .....नेहमीसारखंच मनाला भिडणारं लिहिणं. कृष्णार्पणमस्तुचा मंत्र खूप प्रभावी आहे,हे माझंही मत.

हे मला उद्देशून लिहीले आहे की काय? हंSSSS. बहुधा चोराच्या मनात चांदणे, पण एकदा विचारून घेतलेले बरे.
हे मला विचारले का?

खुस्पटं काढायला असलेल्या जागांपेक्षा मोहक वाटतील, लोभस वाटतील अशा खूप जागा आहेत इथे. या सुरेख अनुभवासाठीच हे सगळं लिहावंसं वाटलं. १०००% अनुमोदन खुप छान लिहले ....आवडले...

मी रोमात आहे

व्हेन इन रोम डू अ‍ॅज रोमन्स डू..

पूर्वी कुणाच मौनव्रत असल कि मला हसू यायच. पण रोमन झाल्यापासून हे मौनव्रत आता माझ्या रोमारोमात भिनत चाललय. रोमात गेल्यावर रोमातल्या लोकांसारख वागायला पाहीजे याचा विसरच पडला होता. माबो वर आल्यावर रोमात असणेचा अर्थ कळाला आणि पटलाही. इतक्यातच एका मुलीचा लेखही वाचला. आवडला, पटलाही. लगेचच कार्यवाही सुरू केली आणि रोमात गेलो. त्यामुळ लेख आवडला कि नाही हे कळवायच राहून गेल. पण काही बिघडल नाही. रोमात राहून, किबोर्डवर नियंत्रण ठेवूनही वाचता येत हे उमजल. Light 1

( सांगायच म्हणजे लेख आवडलेला आहे, पटलेलाही आहे.. पण गप्प बसायचं सोडून बोला. ते जमणार नाही )

प्रज्ञा... खुप छान लेख ... सर्वात कौतुक तुमच्या लेखन शैलीचे.. अत्यंत साध्या सोप्या शब्दात नेमकी मांडणी..
मायबोली हे एक विरंगुळ्याचं, शिक्षणाचं, समाधानाचं स्थान आहे. त्याचं पावित्र्यं वगैरे सोडा... किमान स्वच्छता राखण्याइतकं तरी आपण तिचं देणं लागतो ना?
का... घरातला कचरा नेऊन फेकायचा उकिरडा आहे हा?>>>> याला करोडो मोदक... ( हल्ली १०० चालत नाहीत Proud )
दाद... तुमची पोस्ट म्हणजे माझ्यासारख्या बर्‍याच माबोकरांच्या भावना... अत्यंत सुंदर शब्दात...

खुस्पटं काढायला असलेल्या जागांपेक्षा मोहक वाटतील, लोभस वाटतील अशा खूप जागा आहेत इथे. या सुरेख अनुभवासाठीच हे सगळं>>>>>> अगदी मनातलं लिहीलं आहेस ! मी मिसला होता हा लेख...... Happy

मी ही वाचलं नव्हतं आधी.

या लेखाची पूर्णता एवेएठिला येशील तेव्हाच होईल Proud (आणि वर्गवारी करशील तेव्हाही) Proud

मनोगत अतिशय भिडलं

केवळ मायबोलीच नाही तर संपूर्ण नेटवरच सारखेच अनुभव येतात..

अर्थातच कुठल्याही वेबसाईटवर, कम्युनिटीवर असे लेख पहायला मिळणं हे नवलाईचं राहीलेलं नाही. नवीन आलेल्याला औत्सुक्य, कौतुक असणं, प्रभावीत होणं हे ही पहायला मिळतं. मुळात आपण इथं आपण बोलत नाही तर लिहीतो. पुरावे मागे ठेवत जातो. त्यामुळंच बोलण्यात आणि लिहीण्यात जो फरक असतो तो असणारच. म्हणूनच एखाद्याच्या पोस्टवरून कोण कसा असेल हे अंदाज बांधण्याचं काम काही वर्षं नेटवर असणारे कुणीही करणार नाहीत. कधी कधी मनुष्य आपली गुडी गुडी इमेज उभारण्याच्या मोहात अडकतो आणि त्यातच अडकत जातो. त्याच्या व्यक्तिमत्वात अमूलाग्र बदल घडून येत असतील तर स्वागतच करायला हवं. पण ज्याक्षणी मि. गुडी लॉगआउट होतात त्याच क्षणी ते आपल्या मूळच्या जमदग्नीवतारामधे परततात.

प्रत्यक्ष गप्पांमधला सहजपणा लिखित गप्पांमधे नसणारच. पुढे मग अपेक्षाभंग आणि त्यातून कडवट पोस्टस हे ही पाहणं आलंच. पब्लिक फोरममधेही जे इमेजची काळजी करत नाहीत अशा महाभागांचं मनापासून अभिनंदन ( प्रत्यक्षात हे कसे असतील हा विचारही मनात येतोच).

गुलमोहर हे ठिकाण मात्र खरच छान आहे. जास्तीत जास्त वेळ इथं गेला तर आपल्या रोजच्या स्ट्रेसमधून रिलीफ मिळवता येईल.. आहे तोच स्ट्रेस कसा वाढेल अशा ठिकाणीच रमत बसलं तर आपल्याला कोण अडवणारेय ? असो.

लिखाण मात्र आवडण्यासारखंच आहे. लिहीत रहा.

प्रज्ञा९,
>>आपण मत व्यक्त करताना त्यामुळे कोणी व्यक्तिशः दुखावलं जातंय का हे बघणं कठीण आहे का? >><

अय्या, खूपच आदर्शवादी आहे हो हे वाक्य. तुम्ही कसे जमवता? म्हणजे जमवता येते का? आम्हाला हि शिकवा की मग. की फक्त लेखात लिहिण्यापुरतेच आहे हे. नाही म्हणजे काय आहे ना, तुमच्या प्रतिक्रिया पाहून जरा गोंधळ झालाय..

>>खुस्पटं काढायला असलेल्या जागांपेक्षा मोहक वाटतील, लोभस वाटतील अशा खूप जागा आहेत इथ>><<

खूपच जागा आहेत ना? मग.. इतका त्रासिक का होता ? तुमचे बहुधा असे काही झाले का जसे अगो ह्यांनी लिहिल्याप्रमाणे?
>>आपली गुडी गुडी इमेज उभारण्याच्या मोहात अडकलातणि पण ज्याक्षणी मि. गुडी लॉगआउट होतात त्याच क्षणी ते आपल्या मूळच्या जमदग्नीवतारामधे परततात. <<

खरंतर "माझा काय संबंध" म्हणून मी दुर्लक्ष केलं असतं पण मायबोलीवर येवून तुमचे असं होउ नये ही कळकळ आहे म्हणून. Proud

>>आपण मत व्यक्त करताना त्यामुळे कोणी व्यक्तिशः दुखावलं जातंय का हे बघणं कठीण आहे का? >><
वा वा प्रज्ञा ताई, ह्या लेखातले आणि ** धाग्यावरचे तुमचे खालील प्रतिसाद वाचुन मन हळहळलं Happy

untitled2.JPGuntitled4.JPG

zampe चाबुक्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क...... आता हसवण बंद कर बाबा ....
स्मित Happy बरोबर निरिक्षण ...
अरे हा लिहिलेला लेख २०११ चा आहे .. आज २०१३ आहे .. काळ वेळ बदलेली आहे ... त्या मुळे बदललेली मानसिकता आहे असावी ...
zampe ... ek ek shodhun baaki sahi kaadhates ...

Pages