मायबोलीवर येताना....

Submitted by प्रज्ञा९ on 25 January, 2011 - 17:53

साधारण २००७ च्या शेवटी मी घरी इंटरनेटची सुविधा घेतली. प्रोजेक्ट पूर्ण करताना सतत लागेल म्हणून. आणि मग बाकीचा अभ्यास करताना सहज एकदा पुलंबद्दल काही माहिती मिळते का ते बघायला म्हणून गूगल केलं आणि पुलंच्या साइटबरोबरच मायबोलीचा शोध लागला. व्यक्ती आणि वल्ली मधून अनेक व्यक्तींच्या छान साइट्स मिळाल्या, पण खुद्द मायबोलीवरचं लेखन सुद्धा सापडलं. आणि "प्रथमग्रासे नवनीतप्राप्ती" व्हावी तशी दाद यांचं "नावात काय्ये!" हे विनोदी लेखन मिळालं. मग रोज एक(च) काहीतरी वाचायचं असं ठरवून शोध चालू झाला. त्या वेळी मराठी महिन्यांचे अर्काइव्ह्ज होते. त्यामुळे मूळ लेखन मिळायला थोडा वेळ लागे. पण रोमात राहून वाचन चालू होतं. मग काही दिवसांनी समजलं की मायबोलीचं नूतनीकरण होत आहे....थोडी निराश झाले. यासाठी, की पुन्हा काहीही अडचण न येता ही साइट नक्की उघडेल ना? पण सुदैवाने मायबोली नवीन रूपात सुरू झाली.

सुरुवातीला कळेना, की कोण कोणाला उद्देशून काय बोलतंय! पण तरी नुसतं समजून घेणं चालू होतं. बरेच दिवस खातं नव्हतं उघडलं. मग एक दिवस रत्नागिरीच्या एका आयडीने केलेलं लिखाण वाचलं, आवडलं आणि ओळख नाही, पण आपलाच गावकरी आहे Happy तर चांगला प्रतिसाद द्यावा म्हणून खातं चालू केलं. अर्थात रोम मोड सुटला नाही. पण मग माझाही एक अनुभव इथे शेअर केला. फार प्रतिसाद येतील अशी अपेक्षा नव्हतीच! स्वान्तःसुखाय केलेलं लिखाण ते, लोकांना नाही आवडलं तर न का आवडेना!!

आणि नेमकी हीच सीमारेषा आखून घेतली मी स्वतःसाठी. खूप वाचत होते. म्हणजे माझा BE चा अभ्यास आणि प्रोजेक्ट वगैरे सांभाळून जमेल तेवढंच. कारण ती शेवटची सेमिस्टर होती. पण मराठी वाचायचा वेग बर्‍यापैकी चांगला असल्यामुळे १५-२० मिनिटं वाचलं तरी बरंच वाचून होई.
पुढे उत्तम प्रकारे रिझल्ट लागून मी नोकरीला लागले. थर्ड यिअर ला असतानाच कॅम्पस सिलेक्शन झालं होतं, त्यामुळे ते टेन्शन नव्हतं.

पुण्यात येउन नोकरी सुरु झाली. मधल्या काळात मायबोलीवरचा वावर खूपच कमी झाला. २००९ मधे लग्न ठरलं. नवरा उसगावात होता. त्याच्याशी गप्पा मारण्यासाठी पुन्हा एकदा रूमवर नेट घेतलं. मग उरल्या वेळात पुन्हा मायबोलीवर डोकावायला सुरुवात झाली. पण तरी जास्त नाहीच.
मधून मधून गटग वृ वगैरे वाचून वाटायचं की जावं एकदा काय असतं ते बघायला, पण दरवेळी काही काम निघे आणि बेत बारगळे. ववि, गटग वगैरे खास शब्द सुरुवातीला पचनी पडत नसत. मग आपोआपच समजले. खरं तर मायबोलीला असंच समजून घेण्यात जास्त मजा आहे.
त्यानंतर डिसेंबर २००९ मधे लग्न होउन मीही उसगावात आले. (तरी वावर इकडे कमीच होता म्हणायचा!) रोमात राहून मात्र खूप प्रगती केली होती. पाकृ, कोकण, आरोग्य वगैरे गृप्स्मधे सामील झाले. एखादी पाकृ अडली की इथे येउन शोधायची, कंटाळा आला की इथे यायचं, योगामाधलं काही विसरायला झालंय असं वाटलं तर इथे येउन चेक करायचं वगैरे सवयीचं झालं.

मधल्या काळात नीधप यांचा "श्वास" वरचा लेख वाचला, आणि कुठेतरी खूप बरं वाटलं. कितीही आभासी जग म्हटलं तरी ही भावना सुखाची होती माझ्यासाठी. याच मधल्या काळात दाद, नंदिनी२९११ (माझ्या लक्षात राहिलाय हं वाढदिवस! Happy ) दक्षिणा, विशाल कुलकर्णी, कौतुक शिरोडकर, साजिरा, चाफा, राफा, झक्कीकाका, लिंबूकाका, पल्ली, चिनूक्स, अशा अनेक जाणत्या लोकांशी आभासी ओळख झाली. (अजून खूप आयडी आहेत, सगळ्यांचा उल्लेख झाला नाही..)
कोणी कथांमधून भेटलं, कोणी लेखमालांमधून, कोणी हसवलं, कोणी नकळत डोळ्यांत पाणी आणलं. काहीही असो, त्या क्षणी माझं असलेलं एकटेपण दूर केलं.

असं एकदा जुन्या हितगुजवर बागडताना बापुंचा बीबी सापडला. त्या बीबी ने करमणूक केलीच, पण अनेक लोकांशी खास ओळख झाली. म्हणजे आभासीच. मायबोलीचं अनोखं आणि जास्त कौतुकास्पद रूप दिसलं. त्या बीबीबद्दल अधिक काही इथे नाही सांगत. पुन्हा नको ते सगळं.

पण हल्ली ४-५ महिन्यांत, जेव्हा मी वर्क परमिट काढून नोकरी शोधायला सुरुवात केली तेव्हा मला पहिली मदत मायबोलीची घ्यावीशी वाटली. अजूनही शोध संपलेला नाही नोकरीचा, पण काहीतरी नव्याने लिहावंसं वाटलं. अर्थात त्यालाही काही कारणं आहेत.

गेल्या ४-५ महिन्यांत जुन्या विषयांअरच्या अनेक चर्चा वाचल्या. अगदी कंपूबाजीच्या आरोपापासून गटग वृ पर्यंत जमलं तेवढं नजरेखालून घातलं आणि गरज लागली तिथे समजून घ्यायचा प्रयत्न केला. खरंतर मला इथे कोणताच जुना वाद उकरून काढायचा नाही, नवीन वादाला सुरुवात करायची नाही (हे असं हल्ली फार लिहावं लागतं इथे याचं खरं दु:ख आहे. Sad )

पण इथे नवीन येताना काही गोष्टी जपल्या जाव्यात असं जे प्रकर्षाने जाणवलं ते सांगायचा प्रयत्न आहे. पटलं तर ठीक, नाहीतर सोडून द्यावा.

जेव्हा आपण अशा आभासी जगात येतो तेव्हा सगळं आपल्याला समजलंच पाहिजे, आणि तेही लवकरात लवकर, असा आग्रह का? आणि ते समजत नसेल तर ज्यांना समजतं, ते आपसात बोलतात म्हणून कंपूबाजी म्हणायचं का? त्यापेक्षा, थोडे दिवस इथे नुसतं येउन बघावं. वाचावं. आपला पिंड काय आहे, आवडी काय आहेत, त्यासंबंधी इथे काय लिखाण, चर्चा झाल्या आहेत, त्या चर्चा ज्यांनी केल्या आहेत, त्यातल्या कोणाचं मत आपल्याला पटतं ते बघावं. आपण मत व्यक्त करताना त्यामुळे कोणी व्यक्तिशः दुखावलं जातंय का हे बघणं कठीण आहे का?

कथा किंवा इतर वाङमयावर प्रतिक्रिया देणं आणि प्रत्यक्ष घटनेवरच्या एखाद्या लेखाला प्रतिक्रिया देणं वेगळं हे भान ठेवायला हवं. वाङमय आवडू शकतं किंवा नाही. पण घटना घडताना आपल्याला चॉइस नसतो. मग त्यावर बोलताना तरी सांभाळून बोली शकतो आपण. उदा. शिवाजी महाराज, राजकारण वगैरेंबद्दल बोलताना आपण स्वतःवर संयम ठेवू शकतो.

इथे आलो म्हणजे सगळे आपली वाटच बघत होते, आणि आता आपण काही लिहिलं नाही तर तो गुन्हा ठरेल अशा थाटात काही लिहायचं, आणि प्रतिक्रिया आली नाही/ अप्रिय प्रतिक्रिया आली की चिडायचं हे योग्य नाही. मुख्य म्हणजे इथे आपण आलो ते कोणी सांगून नाही, स्वतः आलोय हे लक्षात ठेवायला हवं. आणि जे करू ते सुरुवातीला तरी स्वत:साठी असायला हरकत नाही. मग इथे त्याला कसा प्रतिसाद मिळतोय ते बघून सुधारणा करता येतेच की!
माझा तरी अनुभव असा आहे, की एखादी बाब जर आवडली नाही, तर इथे तसं सरळ सांगतात. त्यामुळे आपण स्वतः बदलायचं की वाट बदलायची हे निवडणंही आपल्या हाती असतं.

"कालोह्ययम् निरवधिर्विपुला च पृथ्वी" हे वचन मला नेहेमी पटतं. "हा काळ अनंत आहे, आणि ही पृथ्वी विपुल- अमर्याद आहे. तस्मात, माझे विचार पटणारा कोणीतरी जा पृथ्वीवर कधी ना कधी नक्की येइल" हा विश्वास असला की बर्‍याच गोष्टी सोप्या होतात. फारच तत्त्वज्ञानी वाटेल हे, पण यातलं १/१० जरी आचरलं तरी निम्मा त्रास कमी होतो! Happy

खरंतर एकमेकांशी बोलावंसं वाटणं ही सगळ्यांचीच गरज असते. त्यामुळे शेअर करायला काहीच हरकत नसते. पण आपण सांगू तेच बरोबर अशी भूमिका घेतली की सगळंच बिनसतं. आणि मग वाद सुरु होतात.
मायबोली हे विसाव्याचं ठिकाण आहे, हेच विसरलं जातं.

एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतात तसं मायबोलीच्या प्रेमात पडावं. सुरुवातीला नुसतं बघणं, नजरानजर....
हळूच काही निमित्ताने ओळख्...मैत्री..मग प्रेम...

हे टप्पे झाल्यावर जर काही रुसवाफुगवा झाला तर गोडच वाटतो तो!"अनुभवावं" असं आहे हे सगळं. कारण फूल कसं फुंकर मारून फुलवता येत नाही तसं नातंही फुलवता येत नाही. मग आपण नातं जोडतोय हे विसरून कसं चालेल? सगळंच इंस्टंट मिळालं की किंमत नाही राहात.

आणि जर नातं जोडायचंच नसेल, तर मग सगळं माहिती असावं, आपल्या मतांची दखल घेउन त्याचा आदर केला जावा वगैरे सगळयाच अपेक्षा कशासाठी?

खरंतर "माझा काय संबंध" म्हणून मी दुर्लक्ष केलं असतं पण मायबोलीवर असं होउ नये ही कळकळ आहे म्हणून हा उपद्व्याप. काही दिवसांपासून वेगवेगळ्या बीबींवर काही ना काही वाद चालू असलेले बघितले, त्यांचा खास उल्लेख करायची गरज नाही वाटत.

मी काही लेखिका नाही, किंवा खूप जुनी माबोकर नाही. पण सूर जुळलेत इथे. खुस्पटं काढायला असलेल्या जागांपेक्षा मोहक वाटतील, लोभस वाटतील अशा खूप जागा आहेत इथे. या सुरेख अनुभवासाठीच हे सगळं लिहावंसं वाटलं.

गुलमोहर: 

.

पटलं...मला असेच वाटते..
(शिवाय माझी मायबोलीवर येण्याची सुरूवात वगैरे देखील एकदम सेम ! :फिदी:)

भावना पोहोचल्या.
तुम्ही जे लिहिलय ते काही तथाकथित मात्तबरांनी पाळल तर मायबोली अजुन सुखकर होईल.

पटलं तुझं म्हणणं. छानच सांगितलस..

या बेसिक गोष्टी विसरल्या ( अ‍ॅटॅचमेंट वाढली ) कि मग अपेक्षा वाढतात. तसं होऊ नये. माझी आतापर्यंत एकदाच चिडचिड झाली, ती व्यत्क्तही केली आणि नंतर जरा संयम पाळला असता तर बर झाल असतं अस वाटल. पण वेळ निघून गेली होती. यानिमित्ताने कबुली देता आली.. Happy

खुस्पटं काढायला असलेल्या जागांपेक्षा मोहक वाटतील, लोभस वाटतील अशा खूप जागा आहेत इथे.

अनुमोदन..... Happy

प्रज्ञा९ : काय योगायोग आहे !
१) हे तुम्ही मायबोलीविषयी लिहिलत ते अगदि अगदि माझ्या मनातलं लिहिलंत. मला लिहिण्याचा कंटाळा येतो म्हणून मी लिहिले नाही. पण आता फक्त एवढच म्हणते -----१००००००% अनुमोदन!!!
२) तुमचं माझं आताच नाव व आडनाव सेम!
३)माझे माहेर कोकणातच व माझ लहानपण्सुद्धा रत्नागिरी, सिधुदुर्ग ह्या भागातच गेले, त्यामुळे तिकडचि खूप ओढ आहे.
४)विचाररही सेम आहेत.

मुख्य फरक हा मला लिहिण्याचा जाम कंटाळा येतो Happy

प्रज्ञा,
बारात कुठे?. ह्या विकेंड्ला ये ना भेटायला.
इथे बघ.
http://www.maayboli.com/node/21943
खरच खुप आवडेल तुम्हाला.(म्हणजे तुला आणि तुझ्या नवर्‍याला). आणि आम्हाला पण आवडेल.

सगळ्यांचे मनःपूर्वक आभार!
माझ्या गुलमोहोर लेखनाला दोन आकडी प्रतिसाद बघून खूप बरं वाटतंय. जे सांगयचं ते पोचलंय.

प्रज्ञा१२३, Happy
खूपच भारी योगायोग म्हणायचे की!!

अनिलभाई, मला बारा ए.वे.ए.ठि.बद्दल माहिती आहे, आणि अगत्याने सांगितल्यबद्दल थँक्स!
पण अजून थोडे दिवस तरी मी रोमात रहायचं ठरवलंय हो Happy
खरंच. (प्लीज हे माझं औद्धत्य समजू नका.)

अजून थोडं मनासारखं काहीतरी घडावं, जे मी स्वतःसाठी ठरवलंय, आणि मग अनेकांशी प्रत्यक्ष ओळख व्हावी असं वाटतंय. गैरसमज नका करून घेऊ.
बारा ए.वे.ए.ठि ला खूप खूप शुभेच्छा!! Happy

एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतात तसं मायबोलीच्या प्रेमात पडावं. सुरुवातीला नुसतं बघणं, नजरानजर....
हळूच काही निमित्ताने ओळख्...मैत्री..मग प्रेम...>>>> Happy

छान मनापासून लिहिलय Happy

इथे आलो म्हणजे सगळे आपली वाटच बघत होते, आणि आता आपण काही लिहिलं नाही तर तो गुन्हा ठरेल अशा थाटात काही लिहायचं,
हे मला उद्देशून लिहीले आहे की काय? हंSSSS. बहुधा चोराच्या मनात चांदणे, पण एकदा विचारून घेतलेले बरे.
पण अजून थोडे दिवस तरी मी रोमात रहायचं ठरवलंय हो
रोमात रहाणे नि ए. वे. ए. ठि. ला येणे यांचा एकमेकांशी काहीहि संबंध नाहि. सगळेच कुठले माझ्या सारखे असणार, माबो उघडली की लागले लिहायला?

तर तुम्ही नक्की या, मिस्टरांना पण घेऊन या. आणि एकदा सगळ्या लोकांशी प्रत्यक्ष ओळख झाली की मग तुम्हाला रोमात राहवणार नाही. इथे तुमच्या सारखे बुद्धिमान, गुणी लोक आहेत. त्यांना भेटून तुमचा वेळ फार मजेत जाईल.

>>>> इथे आलो म्हणजे सगळे आपली वाटच बघत होते, आणि आता आपण काही लिहिलं नाही तर तो गुन्हा ठरेल अशा थाटात काही लिहायचं, <<
>>>हे मला उद्देशून लिहीले आहे की काय? <<<<
छे छे हो झक्की, तुम्ही (अन आम्हीही) कधी काय कुणाची वाट बघत बस्तो की काय? झालय अस कधी? की झक्कीन्नी पोस्ट टाकली अन बस्ले वाट बघत प्रतिसादान्ची, सारख सारख रिफ्रेश मारत??? Proud अशक्य!
अहो, आपले इथे येणे हा नुस्ता योगायोग नसून, ते देवदत्त कर्म अस्ते! आपण इथे येतो, दोनचार अनुभवसिद्ध/अनुभूतीपूर्ण मते मान्डतो अन जातो, ज्यान्च्या नशिबात ते वाचणे असेल, ते वाचतील, नै ते नाही हा आपला खाक्या, नै?
इन्द्रराजा आभाळातून पाऊस पाडतो शतधारान्नी, तो काय विचार करत अस्तो का की वाट बघत अस्तो का की कोण कोण आपापली भान्डीकुन्डी त्या धारान्खाली भरायला लावतील?
पूर्वदिशेचा तो दिनकर, आपल्या सहस्ररश्मींनी अखिल दुनिया उजळून टाकतो रोजच्या रोज सकाळी, तो काय असा विचार करत असेल का की कुणी थकलाभागला, रात्रीच्या ह्यान्गओव्हरमधे झोपुन राहिलेला जीव सकाळी उठुन मला बघत देखिल नै! माझ्या स्वागतास देखिल येत नै! करत असेल असा विचार तो? नै ना?
अगदी तस्सच हे बघा या झक्कीबोवान्च (अन आमच पण).
काय म्हणता?

****************
मनोगत चान्गले लिहीलय, बहुतेकान्ची काहीशी अशीच परिस्थिती असेल
पुढील लेखनास व अमेरिकेतील वास्तव्यास शुभेच्छा Happy

सहीच लिहलंय. मला आवडलं. आणि एक दोन चुकार भांडणं होतातच. एवढं मनावर नाही घ्यायचं. खर्‍या समाजासारखाच हा व्हर्चुअल समाज. Happy

आता थोडी गंमत - टायटल अगदी "तिशी ओलांडताना" टाईपचे झाले आहे. Happy

तुम्हा सर्वांच्या सुरेख प्रतिसादांमुळे लिहायचा हुरूप आला आणि एक विनोदी लेखनाचा प्रयत्न केला.
http://www.maayboli.com/node/23007

तुम्हाला आवडला तर नक्की आनंद होईल.
नाहीतर "कालोह्ययम्.."आहेच! Wink

Pages