प्रास्ताविक...गेल्या आठवड्यात मी आणि माझा मामेभाऊ कोकणात बाईक भ्रमंती करून आलो....सागरी किल्ले पाहणे हे प्रमुख उद्दीष्ट असल्याने आम्ही बाकी अनेक निसर्गरम्य ठिकाणांपाशी जास्त काळ थांबलो नाही...
अलीबागपासून सुरूवात करून ते गणपतीपुळ्याजवळील जयगडपर्यंत असे एकूण ११ किल्ले या भ्रमंतीत पाहिले...
(त्यातील निवडक किल्लेच आता उरले आहेत. बाकिचे केवळ अवशेष आणि तेही शोधून काढावे लागतात...असो)
पुणे ते पुणे असे एकूण ९५० किमी ची भ्रमंती झाली....आणि माझ्या होंडा युनिकॉर्नने या सफरीत मोलाची साथ दिली...आमच्या दोघांचे आणि सामानाचे असे जवळपास १६० कि. चे वजन सहजी पेलून गाडीने कोकणातल्या तीव्र चढ उतारांवर अजिबात त्रास दिला नाही...आणि येताना सातारा-पुणे महामार्गावर तर तब्बल ११५किमी च्या वेगाने पळवली....
दिवस पहिला....
भल्या पहाटे जेव्हा पुण्याहून जर्कीन, ग्लोव्हज, हेल्मेट परिधान करून अलिबागच्या दिशेने सुटलो तेव्हा हवेत एक सुखद गारवा होता..सूर्यमहारांजाचे आगमन व्हायचे होते आणि हायवेवर रहदारीही फारशी नव्हती....
त्या संधीचा फायदा घेऊन जे बाईक सुसाट पळवली ती थेट लोणावळ्यापर्यंत...घड्याळात पाहिले तर जेमतेम एका तास झाला होता.
मग तिथल्याच आमच्या फेवरिट 'अन्नपूर्णा' हॉटेलमधून भरपेट नाष्टा करून आगेकूच केली. आता उकाडाही वाढत चालला होता आणि रहदारीही...पण गाडीचा वेग कमी करावा लागला नाही आणि पेण मार्गे अलिबागजवळ येऊन ठेपलोही...तिथे जातानाच आम्हाला 'थळ ८ किमी' असा बोर्ड दिसला...थळजवळ खांदेरी-उंदेरी किल्ले आहेत माहीती होते पण ते आमच्या वेळापत्रकात नव्हते..पण फक्त आठ किमी अंतर असेल तर दोन किल्ले पदरात पडतील या हिशोबाने गाडी तिकडे वळवली...
हे दोन्ही किल्ले समुद्रात आतवर असल्याने बोटीनेच जावे लागते. पण फारसे पर्यटक इथे येत नाहीत त्यामुळे नावाडी ठरवून त्यानुसार जावे लागते. त्यामुळे थळपाशी जाताच आम्ही नावाडी शोध मोहीम हातात घेतली. सुदैवाने एक अविनाश बोचके म्हणून नंबर मिळाला. त्याला फोन लावल्यानंतर त्याने विचारणा केली..आम्ही दोघेच आहोत म्हणल्यावर त्याने डायरेक्ट १०००रु मागितले...
मग घासाघिस सुरू...नाय होय म्हणता ५०० रुपयांवर सौदा तुटला...
"मी आत्ता एका ग्रुपला घेऊन किल्ल्यात गेलो आहे..तासाभरात येतो..."
मग तिथल्याच किनार्यावर गेलो आणि सुकट मासळीचा दर्प नाकात घुसला..बापरे...
अगदी असह्य वास होता तो. इथून पुढे याच वासाची सवय करावी लागणार आहे असे म्हणत तिथेच ठाण मांडले...
दरम्यान, जवळच्या एका घरापाशी बाईक लावली. तिथली एक षोडषवर्षा आम्हाला पाहून पुढे आली. मग सगळे पुराण ऐकवले. आम्ही दोघेच असे बाईकवरून आलो म्हणल्यावर ती अगदीच प्रभावित झाली. मग सामान आणि हेल्मेट ठेवण्यासाठी एक खोली उघडून दिली. बोट कुठे थांबते हे नुसते रस्ता दाखवून थांबली नाही तर टळटळीत उन्हात आमच्याबरोबर चालत आली आणि वर एवढ्या उन्हात बसण्यापेक्षा घरीच बसा असे अधिकाराने सांगितलेही..
(माझे पिकलेले केस आणि सुटलेले पोट पाहून माझ्यापेक्षा अमेयकडेच जास्त तिचा ओढा असावा असा माझा अंदाज )
मग तिथल्याच कोळ्यांच्या पोरांबरोबर क्रिकेट खेळत वेळ काढला.
एकाचे दोन तास झाले तरी या माणसाचा पत्ता नाही. फोन करतोय तर उचलायला तयार नाही..
दरम्यान, अजून एक जण पुढे येऊन ठाकला.
"कुठं जायचं, किल्ल्यात?"
"हो, त्या अविनाश बोचकेंबरोबर चाललोय"
"मी पण घेऊन जातो की, ५०० रुपये लागतील"
"अहो पाचशेमध्ये तर बोचके घेऊन चाललेत, तुम्ही ४०० मध्ये नेणार का?"
"चला नेतो."
आम्ही वेळ आणि शंभर रुपडे वाचल्याच्या उत्साहात निघालो तर ती मस्यकन्या वेळेवर धावली..
"अहो जाऊ नका त्याच्याबरोबर, तो दारूडा आहे, किल्यात सोडून पळून जाईल.".
आणि एवढ्यावर ती थांबली नाही, तिने त्याला जाम शिव्या-बिव्या घालत हाकलून दिले.
बापरे, हे कायतरी भयंकरच होते.
शेवटी अडीच एक तासांनंतर तो बोचके उगवला. आम्ही भराभर कॅमेरे उचलून निघालो तर थंड स्वरात म्हणाला..
"अहो आपले अजून हिशोबाचे बोलणे झाले नाही.."
मला काय टोटलच लागेना. आता परत कसले हिशोबाचे बोलणे..
"पाचशेत परवडत नाय आम्हाला, हजार रुपये लागतील.."
आता माझे टाळके सणकले..आणि जो मी पट्टा सोडला..
"मग हे आधी बोलणे झाले तेव्हा काय कान वाजले होते का. तेव्हा कशाला म्हणाला पाचशेत सोडतो. आणि आता अडीच तास थांबायला लाऊन निर्लज्जपणे सांगतोय. आम्ही काय &*^% म्हणून थांबलो का? किल्ला काय तुझ्या %^&^% का च्यायला, अशी लूटमार करता का तुम्ही. नव्हते परवडत तर तेव्हाच थोबाड उचकटून बोलायचे..इइ. "
एवढे बोलल्यानंतर मला वाटले आता "तुझ्या आवशीचा." पासून सुरुवात होणार. पण काय नाय त्याने थंडपणे माशांची जाळी उचलली आणि चालता झाला.
माझा संताप अजूनही कमी झालेला नव्हता आणि मी त्याच्या मागोमाग तणतणत गाड्यांपाशी आलो. तरीही काहीही फरक नाही.
उद्विग्न मनाने गाडी काढली आणि अलिबागकडे सुटलो. ती मस्यकन्यापण कुठे गायब झाली होती देव जाणे.
आपण मूर्ख बनवलो गेल्याची भावना त्रस्त करत होती आणि अनेक हिंसक विचार मनात येत होते.
थोडक्या वेळातच अलिबागपाशी पोचलो...
अलीबागपासून कुलाबा किल्ला अगदी जवळ आहे आणि ओहोटी असेल तर किल्ल्यात चालत पण जाता येते.
असा अंदाज होता की ओहोटीची वेळ साधून चालत जाता येईल पण गेल्यानंतर कळाले की ओहोटीची वेळ टळून गेली त्यामुळे झक मारत प्रत्येकी ८० रुपये भरून बोट केली. पण किल्ल्यात गेल्यानंतर मात्र दिवसभरच्या श्रमाचे सार्थक झाले.
अतिशय देखणा किल्ला आहे.. १६८० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला वसवला. त्यानंतर मायनाक भंडारी या पहिल्या दर्यासारंगाने किल्ला झुंजता ठेवला. असे म्हणतात की किनाऱ्यावरील तोफांचा मारा प्रवेशद्वारावर होऊ नये म्हणून संभाजी महाराजांनी सर्जेकोट बांधला. हा एक छोटेखानी किल्लाच आहे.
सर्जेकोट किल्ला..यालाच किल्ल्याचा सतरावा बुरूज असेपण म्हणतात..
कुलाबा किल्ला आता पुरातत्व खात्याच्या अधिकारात आहे आणि किरकोळ प्रवेशमूल्य आकारले जाते.
हा किल्ला नंतर कान्होजी आंग्रे यांचे प्रमुख केंद्र बनला. परकीयांवर दरारा बसविणाऱया मराठमोळ्या गुराबा बोटी देखील इथे बांधल्या जात अशी माहीती मिळाली. या किल्ल्याने अनेक लढाया पाहिल्या आणि यशस्वीपणे तोंड दिले. परंतु अखेर वंशकलहात त्याची वाताहात झाली आणि वारस नसल्याचे दाखवत इंग्रजांनी किल्ला बळकावला.
सिद्धिविनायक मंदीर
या मंदिरात गणेशमूर्तीबरोबर सूर्य आणि इतरही देवतांच्या मूर्त्या आहेत. त्यामुळे याला गणेश पंचायतन म्हणून ओळखले जाते आणि चतुर्थीला इथे प्रचंड गर्दी होते.
किल्ल्यावरून जाणारे एक हेलीकॉप्टर
त्यानंतर परत अलिबागला आल्यावर किल्ल्याच्या बॅक़ड्रॉपला सुंदर असा सूर्यास्ताचा देखावाही मिळाला.
पर्यटकांची बेसुमार गर्दी नसती तर तो अजून सुंदर वाटला असता...
असो, तिथून पुढचे ठिकाण होते कोर्लईचा किल्ला..त्यासाठी अंधार पडला तरी रेवदंड्याला पोचणे भाग होते. मग त्या खडबडीत रस्त्यावरून जेव्हा रेवदंड्याला पोहोचलो तेव्हा जाणवले की सकाळी आठ वाजता केलेल्या नाष्ट्यानंतर काहीच खाल्लेले नाही.
मग तिथल्याच एका खानावळीत घुसलो. आधी थाळी संपवली मग एक्सट्रा चपात्या, भाजी असे भस्म्या झाल्यासारखे खात सुटलो. शेवटी ती बाई येऊन म्हणाली
"बाळा भाजी संपली.."
"अजून काय आहे का खायला..?"
रस्स्यात घालायचे टॉमॅटो आहेत फक्त
"चालतील द्या.."
मग त्या टोमॅटोंवर तिने फोडणी घालून भाजी म्हणून दिली.
नंतर पोळ्यापण संपल्या.
"भात आहे ना..आणा तोच"
शेवटी भातपण संपला तेव्हा मात्र उठलो..आणि अत्यंत जडावलेल्या शरीराने एका घरगुती गेस्टहाऊसमध्ये अंग टाकून दिले....
क्रमश...
http://www.maayboli.com/node/21892 भाग २
वॉटरमार्क देणे मला नीटसे
वॉटरमार्क देणे मला नीटसे जमलेले नाहीये, त्यामुळे कुठेही कसाही वॉटरमार्क देऊन मीच फोटोंची वाट लावली आहे..त्याबद्दल क्षमस्व
छान लेख. मला वाटतं फोटो आणि
छान लेख. मला वाटतं फोटो आणि शीर्षक यांची गल्लत झालीय, सुधारणार का ?
त्या साहेबांचं नाव दिलय ते चांगलेच झाले.
सुरेख लेख आशु...... प्रचि
सुरेख लेख आशु...... प्रचि सुद्धा फार छान.. वॉटरमार्क व्यवस्थित आहेत्,कुठे खटकत नाहीत...
बोचकेसारखे अनुभव बकी फार वेळा येतात.....असो...
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.
अरे चँप.. खांदेरी-उंदेरीचा
अरे चँप.. खांदेरी-उंदेरीचा तोच मोठा प्रॉब्लेम आहे.. पुर्णपणे मोनोपॉली चालते त्या एका माणसाची असे ऐकून आहे.. तोच बोचके का हे मात्र माहित नाही.. पण त्याचा दर हा खूपच वाजवी असल्याने सहसा तो ट्रेक आता फारच कमीजण करतात.. !! आमचा विचार चालू आहे २६ जाने. ला जाण्याचा..
पण तू नक्की कोणता किल्ला बघितलास ते लिहायला बहुदा विसरला आहेस.. खांदेरी की उंदेरी ? की दोन्ही ? आणि तिकडे तो 'भांड्याचा आवाज' करणारा खडक सापडला का ?
बाकी सुरवात चांगली.. येउदे तपशीलवार !:)
वा छान उपक्रम.. पुढचे भाग
वा छान उपक्रम.. पुढचे भाग वाचण्याची उत्सुकता आहे आता..
छान ! हेवा वाटतोय पण पुढच्या
छान ! हेवा वाटतोय पण पुढच्या भागांसाठी आसुसलोय !!
मायबोलीवर खांदेरी -उंदेरी फारच गाजतेय सध्या. <<आमचा विचार चालू आहे २६ जाने. ला जाण्याचा..>> मुळे कुतूहल शमेल असं वाटतंय !!
छान लेख!! वॉटरमार्क प्रचिच्या
छान लेख!!
वॉटरमार्क प्रचिच्या कोपर्यात टाक. सगळे फोटो मस्तच.
मस्त सफर...
मस्त सफर...
मस्त प्रचि आणि वर्णन.
मस्त प्रचि आणि वर्णन. सूर्यास्ताचे प्रचि तर एकदम सही.
हेलिकॉप्टर वरचा वॉटरमार्क एकदम चपखल बसलाय...मालकी हक्क दाखवत असल्यासारखा
<<बाळा,भाजी संपली>>.........:हाहा:
आशु. मस्त फोटो आणी वर्णन
आशु. मस्त फोटो आणी वर्णन
सूर्यास्त - टू ब्यूटीफुल
आशु फोटो मस्त आहेत पुढचा भाग
आशु फोटो मस्त आहेत
पुढचा भाग लवकर येउ देत
दिनेशदा व यो रॉक्स यांनी
दिनेशदा व यो रॉक्स यांनी सांगितल्याप्रमाणे सुधारणा केली आहे व किल्ल्याची थोडी माहितीपण दिली आहे...
सर्वांना मनापासून धन्यवाद...
यो अरे त्याला हजार रुपये देण्याची इच्छा नव्हती त्यामुळे आम्ही खांदेरी-उंदेरी न करताच परत आलो...:(
क्लास फोटो आणि वर्णन
क्लास फोटो आणि वर्णन
:पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत असलेला बाहुला:
(No subject)
बढिया आशू....मस्तं फोटो
बढिया आशू....मस्तं फोटो आहेत्...आणि description पण छाने..तुम्ही पण एकदम "भटक्या-विमुक्त" जातीचे आहात् हे बघून छान वाटलं
मस्त.. फोटोही छान आहेत. पुढील
मस्त.. फोटोही छान आहेत. पुढील भाग लवकर येऊ देत.
नो, वर्डस.. आशू तुझ्या घरी
नो, वर्डस.. आशू तुझ्या घरी जेव्हा हि सगळी प्रकाशचित्रे पाहताना.. दिल कोकण कोकण झाला होता रे
वर्णन मस्त लिहिलं आहेस आवडलं. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
तू स्पोर्टस पत्रकार आहेस ना .. मग नुकत्याच झालेल्या रेसिंग ईवेंट्चे फोटो पहायला आवडेल रे.
खांदेरी आणी उंदेरीला जायला
खांदेरी आणी उंदेरीला जायला सहसा कोणी तयार होत नाही कारण नेव्हीची परवानगी आणी बोटवाले मिळताना मारामार होते.
पण खांदेरीवर एक वेताळ मंदीर आहे ज्याचा उत्सव होळीला असतो. त्यामुळे होळीच्या दिवशी खांदेरीला थळ गावातील बरेच लोक जातात व परवानगीचाही प्रश्ण नसावा.
मी ही होळीला खांदेरी - उंदेरीला जायचा विचार करतो आहे.
मस्त रे सही ....
मस्त रे सही ....
मस्तच.... आशु पुढचे भाग पण
मस्तच.... आशु पुढचे भाग पण टाक पटापटा.... आणि किती तो त्रास द्यायचा खानावळवाल्या मावशींना...
वॉमा कुठेच त्रास देत नाहीयेत.. काही फोटोंत दिसत नाहीयेत ते टाकले नसतील तर त्या फोटोंत पण टाक..
सूर्यास्ताचे फोटो जबरीच..
सुकी..अरे मुंबई-पुणे बद्दल
सुकी..अरे मुंबई-पुणे बद्दल बोलतोयस का..नाही केली तरी कव्हर..म्हणजे फोटोग्राफर म्हणून..पण त्याआधी झालेली पुणे मॅरेथॉन मात्र केली...
हिम्सकुल - काय करणार बाबा, पापी पेट का सवाल था.
बी मनोज - सही रे, जाऊन येच...आणि तो बोचके भेटला तर सांग म्हणाव तुझे नाव बदनाम करण्याची मोहीम घेतलीये मी...
रश्मे - एवढा बोलून फक्त स्मायली. किमान दोन चार तरी टाकायच्यास
जिप्सी, परिक्षित, मयुरेश धन्स रे...
पुढचा भाग टाकतो
पुढचा भाग टाकतो लवकरच..टायपाचा जाम कंटाळा आहे रे मला..आधी वाटले होते की नुसतीच प्रचि टाकावीत पण वाटले थोडे वर्णन पण द्यावे..असे करत करत लिहीले...
(No subject)
सुरेख वर्णन आशु आणी फोटो पण
सुरेख वर्णन आशु आणी फोटो पण जबरी!
सूर्यास्ताचे क्रमवार फोटो बघुन "ढलता सूरज..." ची आठवण झाली!
छान आहे. सगळ्या
छान आहे. सगळ्या सहलींबद्दल-किल्ल्यांबद्दल लिही आणखी.
मस्ताय रे
मस्ताय रे
मस्त उपक्रम रे आशु पुढच्या
मस्त उपक्रम रे आशु
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत आहे......
धन्यवाद सर्वांना... पुढचा भाग
धन्यवाद सर्वांना...
पुढचा भाग टाकतो लवकरच...
आर्या - धन्स गं
फोटो मस्त आलेत. बाइकवरुन
फोटो मस्त आलेत. बाइकवरुन भ्रमंती म्हणजे फुल्ल धमाल असते एकदम.
लेख आणि प्रचि खुपच मस्त!!!
लेख आणि प्रचि खुपच मस्त!!!
बाकी "Mast jamla ahe lekh.. Khamang !! pudhcha lavkar lav .." ही प्रतिक्रिया तू काय स्वत:च स्वतःला दिलीयेस की काय?
Pages