ग्रूप

Submitted by दाद on 13 May, 2008 - 20:13

’मी एकदाच काय, पण हज्जारदा परत परत हेच करेन... तुझं ज्यात कल्याण आहे असं माझ्या सत्सदविवेक बुद्धीला वाटतं ना, तेच मी करेन... तुझी मैत्रिण म्हणून माझं तेच कर्तव्य आहे... लहान मुलासारखा हट्टं करतोयस. म्हणे बोलू नकोस माझ्याशी.... गाढवा, अशा अवस्थेत एकटा कसा रहाशील?... विनी तीन महिन्यांची प्रेग्नंट आहे... गुरूला तिचं करतानाच पुरे होतय... माझ्याकडे येऊन तुला रहायचं नाही... हा कसला हट्ट तुझा? दिपू येऊन रहातोय ना तेव्हढ्यासाठी? दिल्या त्याची ट्रान्सफर रद्द करून घेतोय तुझ्या हट्टापायी.. कळतय का काही तुला? अरे, त्याची नोकरी जाईल अशाने... अक्कलशून्य आहेस... बरा असतास तर...’
इतका वेळ तावातावाने विशूबरोबर भांडणार्‍या अनूने एकदाच त्याच्या खोल गेलेल्या डोळ्यात बघितलं.... आणि ती थिजली....
नजर फिरवली अनूने आणि तिचा आवाजही खाली आला...
’तुला... तुला बोलावसं वाटेल, तेव्हा फोन कर...’, थरथरत्या हातांनी पर्समधला रूमाल काढून तिने तो उगीच उलगडला आणि परत त्याची घडी घालता घालता म्हणाली, ’तुला आत्ता कळणार नाही पण माझ्या जागी असतास ना, तर तू हेच केलं असतस..., चल रे दिपू.’

तिथेच चुळबुळत उभ्या दिपूला काय करावं सुचेना. अनू रूमच्या बाहेर पडलीही होती. त्याने जवळ येऊन विशूच्या खांद्यावर थोपटलं, ’तुला माहितीये अनूचं काय ते... उद्या सकाळी येतो रे... डोक्याला त्रास करून घेऊ नकोस. पण ती म्हणतेय ते खराय रे. एकटा राहू देणार नाही तुला आम्ही. आमच्याकडे येऊन रहायचं नाही तर नाही म्हणून सांग, तिला. पण मग सगळा बाडबिस्तारा घेऊन ती तुझ्याकडे येईल... माझ्यासकट... ते बघ काय ते... आणि या वेळी मी अनूच्या बाजूने आहे.’

थकून विशूने डोळे मिटून घेतले. अनूचं अस्तित्वं ती गेल्यावरही त्याला अवतीभवती जाणवत राहिलं....
पंचेंद्रियांना न जाणवणारी ही अनुभूती... तरीही खरी... सतत सावलीसारखी मनाच्या सोबत कुठेही असणारी...
हे कधी झालं? कधी आपण ती पायरी ओलांडली? ग्रूपमधला सगळ्यात स्वत:विषयी जागरूक म्हणवतो आपण स्वत:ला... कधी निसटलो आपण आपल्याच हातातून? अनू-दिपूचं ठरलय आणि येत्या डिसेंबरात लग्नं करतायत दोघे....

’तुझा खास दोस्त आणि तुझी मैत्रिण... प्रेम करतात एकमेकांवर... लग्नं करतायत.... येत्या डिसेंबरात... प्रेम करतात.. बेहद्द... दोस्त आणि जीवाभावाची... मैत्रिण...’ कुजबुजत स्वत:शी बोलताना कधी आवाज चढला त्याचं त्यालाच कळलं नाही...

ते ऐकून नर्स आली, ’मि. विशाल, तुम्ही बोलावलत? काही हवं आहे का?'

तिला त्याने हातानेच नाही म्हणून सांगितलं. त्याचं सलाईन वगैरे तपासून ती निघून गेली.

*****************************************
अनू... त्यांचा ग्रूप जॉइन करणारी पहिली मुलगी... मुलगाच म्हणायची. आपल्या ग्रूपमध्ये मुलगी येऊ द्यायची नाही... ही शपथ मोडली की नाही ते कळायच्या आधी ती त्यांची सगळ्यांचीच अनू होऊन गेली. अगदी अगदी मित्रं. बोलणं बिलणं अगदी टिप्पिकल मुलीचं... पण ग्रूपमध्ये मित्रंच म्हणायचं असलं वागणं होतं... सगळ्यात त्यांच्या जोडीला... ट्रॅकिंग असो, कायाकिंग असो... त्यांच्या ग्रूपला लागलेल्या चांगल्या वाईट सगळ्या सवयींमध्ये हिरीरीने सहभागी...
तुम्हीच का, मी ही ओढणार ह्या तिच्या एका हट्टावर, घाबरून दिल्या आणि विशूने सिगारेट सोडली होती. तिचे असले हट्ट किती खरे असतात त्याच्या अनुभव होताच सगळ्यांनाच. चार वर्षं एकत्र काढूनही ती मैत्रिणच राहिली. सच्ची मैत्रिण!

तिच्यासमोर कसलेही जोक्स मारायला त्यांना काहीही वाटायचं नाही. महिन्यातल्या त्या चार दिवसात तिची काळजी घ्यायचे चौघेही. बहीण नसलेल्या, घरापासून दूर हॉस्टेलवर आयुष्य गेलेल्या विशालला जरा कठीणच गेलं... अनूचं ग्रूपमध्ये वावरणं.
पण सगळ्यात त्या दोघांचंच खास पटायचं... आणि भांडणही झालीच तर त्या दोघांचीच व्हायची. मग ठरल्यासारखा दिपू विशालच्या बाजूने आणि गुरू-दिल्या तिच्याबाजूने... असा भरपूर आरडाओरडा करून झाला की, बहुतेकदा विशाल नमतं घ्यायचा... वर आणखी ’जाऊदे.... च्यायला... पोरगी आहेस म्हणून ऐकतोय यावेळी...’ असलं काही भकला की अनू पहिल्यापासून सुरू करायची.

ग्रूपमध्ये रिलेशनशिप्स सुरू करून गोंधळ करायचा नाही असं ह्या पंचायतनाने ठरवलं होतं. मग कधीतरी दिल्याची मैत्रेयी आणि गुरूची विनीही आल्याच ग्रूपमध्ये. पोरींमध्ये अडकून वाट लावलीत ग्रूपची म्हणून आधी त्या दोघांना फटकारणारी अनू नंतर वेळोवेळी या दोघींच्या बाजूने ह्या सगळ्यांशी भांडायला उभी रहायची.

पुढे कधीतरी अनूने तिला दिपूबद्दल वाटणारं खास मनातलं... दिपूच्याही आधी विशालला सांगितलं. विशाल भांडला होता तेव्हा तिच्याशी, ग्रूपमध्ये आता तूच गोंधळ घालतेयस म्हणून. तिलाही पटलच.
मग तीच म्हणत राहिली, चुकतय तिचं. कदाचित तिच्या भावना खर्‍या नसतीलही. काहीतरी ’टेम्पररी केमिकल लोचा असेल. मीच काही दिवस दूर जाते, कदाचित ताळ्यावर येईन’ म्हणून...
आणि नोकरी शोधली दूरच्या शहरी. इतरांशीही फारसा संपर्क ठेवला नाहीच पण दीपूपासून खास दूर राहिली, इमेलवरही. दोन महिन्यांनी वीक एंडला भेटायला म्हणून विशाल गेलाच शेवटी... आणि डोळे खोल गेलेली, वजन उतरलेली, सुकली अनू बघून हबकलाच. तिच्या दिपूबद्दल भावना किती तीव्र, किती खर्‍या होत्या ते त्यालाच कळलं.
’गाढवे, गधडे, मूर्खं,... एकटी भोगत राहिलीस ना... नालायक आहेस. आम्ही कुणीच नाही काय तुझे... काय करून घ्यायचं ठरवलं होतस?....’ एक धपाटा मारून मग तिला मिठीत घेऊन तोच गहिवरला. अनू हुंदकत राहिली, ’खूप प्रयत्नं केला रे, दिपूला विसरायचा.... तू म्हणशील तर अजून वाट बघूया का?... सुधरेन मी कदाचित... ग्रूपमध्ये कालवाकालवी नको ना...’ आणि मोकाट रडत सुटली.

तिचं गाठोडं गुंडाळून त्याने सरळ दिपूसमोर आणून उभी केली होती. प्रसंगी चिडून त्यांच्यापैकी कोणाचाही कान पकडू शकलेली, त्यांना धपाटे घालणारी अनू, दिपूच्या समोर ओंजळीत चेहरा घेऊन उभे होती. लाजेने कोळ झालेली अनू, तिच्याकडे एकटक बघणारा दिपू सोडून समाधानी मनानेच डोळे पुसत निघाला होता ना तो?

लग्न करून सेटल झालेले दिल्या आणि गुरू, येत्या डिसेंबरात गाठ बांधणारे दिपू-अनू, अजून कार्तिकस्वामी म्हणून सगळ्यांकडून लाड करून घेणारे, फुलपाखरी आयुष्यात रमलेले आपण, ग्रूपवर पाखर घालून अनू.... असच आयुष्य निर्वेध चालू रहाणार.... सोप्पं, सहज.

नक्की कधी ह्या खुळावलेपणात भरकटलो आपण? आपल्याला स्वत:ची लाज कशी वाटत नाहीये? का हे चूक असूनही इतकं खरं, इतकं नितळ वाटतय? पूजेच्या तयारीसारखं पवित्र, सुंदर...
***************************************************************************************
विशालने डोकं हलवलं. कितीही प्रयत्नं केला तरीही त्याला स्वत:ची लाज वाटेना. हा आतड्याचा टीबी, त्यावरची औषधं, शरीराला न मानवणारी... रोग हटत नाही म्हटल्यावर आतड्याचा तेव्हढाच भाग काढून टाकण्याचा निर्णय... हे इतक्या फटाफट घडलं, की आपलं आपल्याला स्वत:कडे रोखून बघायला वेळच मिळाला नाही. आता इथे पडल्या पडल्या विचार करताना आपल्याला झालेला हा साक्षात्कार... की आपण मनाने अनूत अडकलोय...

कसे बहकलो आपण? एखाद्या मोठ्ठ्या गहन मेझमधून वाट शोधत हिंडताना, चुकलेल्या चौदाव्या वळणावर कळून काय फायदा... की चौदाव्यांदा चुकलो? त्या मेझचं एक ठीकय... परत जाऊ... पण मनाच्या चाललेल्या वाटा अशा सहजासहजी पुसता थोड्याच येतात?

एकाच काडीचे दोन तुकडे केले आणि दूर... एकमेकांपासून दूर भिरकावले... तर त्यातला प्रत्येक तुकडा कसं तुकड्यातच अर्धवट, अपूर्ण आयुष्य जगतो... तसं मला जगायचं नाहीये. म्हणून मी अजून पोरीत अडकलो नाहीये. माझा हरवलेला तुकडा सापडेल ना.... तेव्हा सोडणार नाय आपण, जान कुर्बान करू एकवेळ पण पुढलं आयुष्यं तुकड्या-तुकड्यात घालवणार नाही... हे त्याचं तत्वज्ञान अख्ख्या ग्रूपने गंभीर चेहरे ठेवून ऐकून घेतलं होतं आणि मग पोट फुटेस्तोवर हसले होते सगळेजण. वेळोवेळी त्याला तुकडोजी, अर्धवट, हाफ, एकद्वितियांश वगैरे नावांनी चिडवून झालं होतं.

अनूमध्ये आपलं अडकणं... नक्की कधी घडलं हे? आठवत का नाहीये आपल्याला? आठवतायत त्या अनूच्या सगळ्या क्षणांना दिपूचा संदर्भ आहे, सुगंध आहे, चौकट आहे...

महाबळेश्वरला... पहाटे सायकलिंगला बाहे पडायचं. पुढे-मागे झालं तरी सगळ्यांनी सनसेट पॉइंटला भेटायचं... हा दिप्याचा दुसर्‍या दिवसाचा प्लान. पेंगुळलेल्या इतर चौघांपैकी कुणालाही हा प्रश्न पडला नाही की दिप्या सकाळी सनसेट पॉइंटला का भेटायचं ठरवतोय? सनसेट पॉईंटला सगळ्यात आधी पोचलेले विशू आणि अनू... पोटात दुखेपर्यंत दिप्याच्या मूर्खपणाबद्दल हसत राहिले...

वेळोवेळी दिप्याची तक्रार घेऊन आलेल्या अनूला विशूनेच समजावलं होतं अन अनूशी मुर्खासारखा भांडून आलेल्या दिपूला विशूनेच तिची माफी मागायला लावली होती...

नेपाळच्या ट्रॅकिंगच्या ट्रिपमध्ये अनू कधी नव्हे ती, आपल्या दिसण्याबद्दल, टापटिप रहाण्याबद्दल जागरुक झालेली दिसली....
संभाळा रे... आपल्याबरोबर ह्यावेळी एक ’पोरगी’ आहे... असं डोळा मारून तिला चिडवणार्‍या दिपूकडे बघून चक्क कावरीबावरी झाली. रात्री-अपरात्री टेंटच्या बाहेर जावं लागल्यास, कधी नव्हे ते दिपूला टाळून इतरांना सोबत यायचा हट्ट करू लागली. दिपू तिला जरा जास्तच चिडवायचा.. म्हणून असेल कदाचित, अशी दिप्यासकट सगळ्यांचीच समजूत.

एका काळ्याशार चांदण्या रात्री, ’चल रे जरा माझ्याबरोबर’, म्हणून अनूने विशूला फिरायला बाहेर काढलं होतं.... तेव्हाच दिपूबद्दलच्या तिच्या भावना बोलून दाखवल्या होत्या.
’ग्रूपमध्ये असलं काही होऊ द्यायचं नाही.. आपण ठरवलं होतं ना? हाऊ कुड यू? स्टुपिड....’ त्याच्या चढलेल्या आवाजावर हिमटी काढून लहान मुलीसारखी अनू रडत राहिली, ’मला मदत कर रे, हे निस्तरायला. ग्रूपमध्ये कुणाला सांगू नकोस, प्लीज...’
मलूल राहिली ट्रीपभर नंतर... सगळ्यांनी खोदून खोदून विचारल्यावर, तब्येतीचं कारण सांगितलं... ट्रीप आवरती घेऊन परतले सगळे.

पुढे विशूनेच निस्तारलं म्हणा, सगळं...

कोणार्कला, नक्षीदार खांबाला टेकून बसलेला दिपू आणि त्याच्या खांद्यावर मान टेकून मंद स्वरात घोरणारी अनू.. हे विशूचं सगळ्यात आवडतं शिल्पं होतं...

**********************************************************************************
मग कधी तिची पावलं उमटली... मनाची माती इतकी हल्लक झालेली कळलीही नाही आपल्याला? रोप-बीप नाहीच एकदम सडा पडल्यावरच कळतय... प्राणाला प्राजक्ती दरवळ येतोय... उखडून फेकून द्यायला हे छोटं रोपटं नाही... हा वृक्ष आहे... पालवी पालवीने फांद्यांमध्ये वाढलेला, कळ्याकळ्यांनी धुमारलेला, खोलवर मुळं खुपसुन... घर करून राहिलेला... आपल्याच श्वासांचं खत-पाणी घालून आपण आपल्याच नकळत जोपासलेला!

अनू ग्रूपमध्येच काय पण सगळ्यांच्या घरच्यांनाही हवी-हवीशी वाटणारी. तिचं अवतीभवती वावरणं सुखावतं आपल्याला. आपल्यासाठी काळजी करणं, आपल्याला ओरडण, आपल्याशी भांडणं... सगळंच एका वेगळ्या अर्थाने ’आपल्यासाठी, आपलं’ मानायला लागलोय आपण. हे चूक आहे हे सुद्धा नाकबूल केलं आपल्या निर्लज्ज मनाने?

मिटल्या डोळ्यांना फक्त तिच्या येण्याची आस असते, तिचा सूक्ष्म अंगगंध आपल्या श्वासाला किती तीव्रतेने जाणवतो, तिच्या पावलांची चाल आपले कान बरोब्बर टिपतात....

आपण.... आपण चाहूल घेतो आजकल तिची. एकदा का कुणाची चाहूल घ्यायची सवय लागली की... त्याचं व्यसन व्हायला वेळ लागत नाही... माणसाची श्वापदं झालेली बघितलीत.

विशाल नुसत्या ह्या विचारांनी शहारला.... पलंगावरून खाली उतरला आणि हळू हळू चालत बाल्कनीत येऊन... थकून बसला.... गेल्या काही दिवसात परिचित झालेला आकाशाचा तुकडा निरखत... हॉस्पिटलच्या आजूबाजूच्या झाडांचा वास येत होता... रानाला असतो तसा... ह्या हिरव्या ताज्या वासाने छाती भरून घेत असताना...

एकदम त्याला आठवलं... हॉस्पिटलमध्ये यायच्या चार दिवस आधीचीच गोष्टं... एका शनीवारी सकाळी, अनूकडे पहिल्या चहाला गेले होते.. तो आणि दिप्या... ओलेकिच्च केस झटकत उभ्या अनूला दिपू सकाळच्या पेपरमधली बातमी वाचून दाखवत होता... आणि त्याला मध्येच तोडत विशूने अनूला विचारलं होतं... शॅम्पू बदललायस तू? चकित अनूने दिप्याच्या हातातला पेपर काढून घेऊन त्याच्याच डोक्यावर मारीत म्हटलं... घ्या शिका, काहीतरी. सुंभ्या तुझ्या लक्षात यायला हवं हे....

विशू विचार करीत किती वेळ तसा तिथे बाल्कनीत बसला होता, कुणास ठाऊक...

**************************************************************************************
एअरपोर्टवर येऊन तासतरी झाला होता. अजून अनूचा पत्ता नव्हता. दिल्या, गुरू काहीतरी बोलून ताण हलका करायचा प्रयत्नं करत होते. विनीचं ’विशूदा’ला बिलगुन एकदा मुसमुसून झालं होतं.
'हिला त्रास दिलास ना, तर माझ्याशी गाठ आहे...जरा बरा झालो की आधी तुला ठोकून काढेन...' हे ऐकल्यावर गुरूचं आधी गडगडून हसणं आणि मग गदगदणारे खांदे लपवत डोळे पुसून झालं होतं.
मैत्रेयी माहेरी गेली होती पण सकाळपासून चारदा फोन झाला होता. दिल्या सगळ्यांत बलदंड पण भावूक म्हणायचा.... तोच जरा धीर धरून असल्यासारखा वरवर तरी बोलत होता.
’हल ए, तू कुठे जात नाहीस साल्या. बरा झालास की तुझं मुटकुळं बांधून आणतो मी... काय नाय म्हणतोस ते बघतो ना...’ असं बोलतानाही कावराबावरा होऊन शोधत होता... सगळ्यांचा आधार.. अनू... ती कुठे दिसत नव्हती. तिचा मोबईलही बंद होता. ’ही अनुरडी कुठे र्‍हायली... कुणास ठाऊक. आयत्यावेळी वेळेवर आल्या तर त्यांना पोरी कशाला म्हणायचं? ह्या दिप्याच्यात अडकली नव्हती तेव्हाच बरी होती... साला ग्रूपमध्ये मेजर राडा होतोय तेव्हा नेमकी ही गायब....’

गुरूही सुटलाच मग, ’मी सांगतो तुला, अरे गेली असेल... फुलांचा गुच्च नायतर फ़ेअरवेल कार्डं असलं कायतरी घ्यायला... इकडे आम्ही उल्टे टांगलेले आणि तिकडे ह्या पोरी मॅचिंग ओढणी शोधण्यात...’

इतक्यात विशूने आपली चाकांची खुर्ची गर्रकन फिरवली आणि लांबून त्याला अनू-दिपू येताना दिसले... म्हणजे दिपू अनूला चालवत आणत होता... नाहीतर जणू कोसळलीच असती अनू...

विशू वळला म्हणून त्यांना अनू-दिपू दिसले. विशूला सोडून सगळेच अनूभोवती जमले... मंद हसत ती नुस्तच ’अरे, काही नाही रे, साधंच... श्रमाचाच ताप असणार... हा विश्या जातोय त्याचंही असेल.. दु:ख का काय म्हणतात ते', असलं बोलत राहिली.

होता तिथेच थांबून विशू अपलक बघत राहिला... तिच नसणं, तिचं येणं, तिचं असणं... सगळंच खोलवर बाणासारखं रुतलं... अगदी खोल... डोळे मिटून त्यानं मग त्या आठवणीची हलक्या हाताने घडी घातली... दोन प्राजक्ताची फुलं त्यावर ठेवून तो कप्पा आपल्या हातांनी बंद केला...

...आणि डोळे उघडले... त्याला दिसला तो आपल्या वेगळा आपला जीवाभावाचा ग्रूप... अनूच्या भोवती जमा झालेला... त्या सगळ्यांना जवळ धरणारी... बांधणारी अनू.... एकमेकांना घट्ट धरून, एकमेकांच्या आधाराने 'एक' झालेला... ग्रूप!
आपण करतोय ते किती किती बरोबर आहे हे त्याला अगदी पहिल्यांदा मनोमन पटलं. आता....एकेक पान खुडत, फांदी फांदी वर घाव घालून, मुळन मूळ तोडून ह्या प्राजक्ताचं उच्चाटन करायचं. मनाच्या मातीला लागलेला प्राजक्ती दरवळाचा शेवटचा कण जाळून रान मोकळं होईपर्यंत आता परत येणं नाही.... एकच चांगलय की अजून कुणालाच ह्याची पुसटशीही कल्पना नाहीये...

अनूसह सगळेच जवळ आले... दिपू आणि अनूचं भांडण झालं होतं.. विशूने अचानक कुणा आत्ये-बहिणीकडे स्वित्झर्लंडला जाण्यावरून... अनूने आपल्याकडे रहायला येण्याचा इतका जोर लावला नसता तर विशू शेवटी ऐकला असता वगैरे वगैरे.... ह्यावर कधी नव्हे ते अनू काही बोललीच नाही... नेहमीसारखी आपलं मत हिरीरीने मांडत भांडलीच नाही... त्यावरूनही दिपू चिडला होता...

’साल्या, तू सुद्धा असा आहेस ना, नेमका हवा तेव्हा वंटास हो, रे... तुम्ही आणि तुमची प्रिन्सिपल्स.. का काय म्हणायची ती... बोडक्याची प्रिन्सिपल्स. अख्ख्या ग्रूपला नष्टं करणारी कसली आलीत तत्वं.... तुमचा इगो... साल्यांनो... ही सुद्धा कमीची नाहीये... इतरांना हज्जार गोष्टी ऐकवेल... आता स्वत:च्या अंगाशी आलंय... तर...’, दिपू चिडून रडवेला झाला होता. फुटणार्‍या ग्रूपकडे बघून हवालदिल झाला होता... कुणाला दोष द्यावा ते कळंत नव्हतं त्याला... लहान मुलासारखा त्रागा चालला होता.

’दिपू, गप्पं बस. जरा स्वस्थं बस... मी कुठेतरी चंद्रावर वगैरे कायमचा जात नाहीये. हा दिल्या नाहीका जातंय बदली होऊन? तसंच समज... आणि मी अनूवर चिडून जात नाहीये... उगीच तिला छळू नकोस. पूर्ण बरा झालो की भेटूच रे... काय लहान मुलासारखं करतोस?’, विशूने दिपूला समजवायचा प्रयत्नं केला.

अनूही गप्प गप्पंच होती.... थोडेतरी सैलावू म्हणून.... विशूजवळ अनूला ठेवून कॉफी-खायला आणायला गेले सगळे... अनूने विशूची खुर्ची ढकलत मोठ्ठ्या काचेच्या खिडकीशी आणली. त्याच्या बाजूला दुसरी खुर्ची ओढून घेऊन नुस्तीच बसली.

खिडकीबाहेर बघत विशू काही-बाही बोलत राहिला. तो तिच्यावर रागावून जात नाहीये, स्वित्झर्लंडला जास्त चांगले डॉक्टर्स आहेत, ती आत्ये बहीणही बोलावतेय अनेक वर्षं, ह्या सगळ्याबद्दल, ग्रूप बद्दल, तिच्या-दिपूच्या लग्ना बद्दल, गुरू-विनीच्या बाळाच्या नावाबद्दल, दिल्या-मैत्रेयीवर लक्ष ठेवण्याबद्दल, तिने दिपूचा मूर्खपणा समजून घेण्याबद्दल, अधून मधून त्यांनी भेटण्याबद्दल, तो पूर्ण बरा झाला की त्याच्या परत येण्याबद्दल... इथलं-तिथलं बरचसं....

अनूही खिडकीबाहेर बघत शांतपणे ऐकत राहिली. शेवटी न राहवून उठली आणि गुढगे टेकून त्याच्या समोर बसली... आता विशूला तिची नजर टाळता येईना...

’विशू, मी... मला कळतेय तुझी तडफड.... तू बोलला नाहीस, दाखवलं नाहीस तरी... मला... मला कळलय’ विशू चमकला....
'पण... मी... माझं... सॉरी, अनू... खरच माफ...' इतकच पुटपुटत त्याने वेदनेने डोळे मिटून घेतले.

’नको रे.... तू खरंच ग्रेट आहेस... माझ्यासाठी... माझ्यामागे तू होतास पहाडासारखा.... तुला हे सगळं एकट्यानेच निस्तरायचंय, विशू... कसं करशील रे?....
पूर्णं.... पूर्णं बरा झालास की परत ये... तोपर्यंत पत्रं-बित्रं पाठवून मी तुला अवघड करणार नाही... म्हणणं सोप्पय रे... पण... तुझ्या जागी मी असते तर हेच केलं असतं का?... असतं की नाही माहीत नाही... दिपूच्याबाबतीत करू शकले नाहीच ना?... पण... तू ना, परत येशील ह्याची मला खात्री आहे... तुझ्या इतकी मी स्ट्राँग नाही... आपल्यातलं कुणीच नाही.... पण ज्या ताकदीने तू आपला ग्रूप सोडून जाऊ शकतोस... माझ्या, दिपूच्या, ग्रूपच्या चांगल्यासाठीच जातोयस. त्याच ताकदीने निव्वळ आमचा सगळ्यांचा विशू म्हणून परत येशील... आम्ही वाट बघतो... मी वाट बघते रे....' अनूला पुढे बोलवेना...

विशूने डोळ्यातलं पाणी लपवण्यासाठी मान खाली घातली. अनू उभी राहिली आणि परत एकदा अबोल झाली...
***************************************************************************************
कस्टम्सच्या आत जाताना थकलेल्या विशूने वळून एकदा डोळे भरून आपला ग्रूप बघितला.... हात हलवणारे दोस्त लोक, मुसमुसणार्‍या मैत्रिणी... घशात येणारा आवंढा गिळून जमेल तितक्या जोरात तो ओरडला... ’येतो रे.. परत लवकर... आणि ए,... पोरगी आहेस म्हणून ऐकतोय या वेळी...’

मागे वळून न बघता जाणार्‍या विशूला सगळं सगळं दिसत होत... मागे दिल्याने हवेत उंच मारलेली उडी, गुरूने दिपूच्या पाठीवर थाप मारून मग आपणच वाजवलेल्या टाळ्या, दिप्याचं गुरूच्या टाळ्या किंवा दिल्याच्या उड्या संपून आपल्या ’हाय-फाय’ला कोण कधी प्रतिसाद देतो त्याची वाट बघत दोन्ही हात हवेत धरून ठेवणं... विनीचं अनूला बिलगुन आळीपाळीने मुसमुसणं आणि हसणं, अन अनूने उगारलेली मूठ... त्याला पाठीत एकच बुक्की घालायला... अन त्याच पालथ्या मुठीने डोळे पुसणारी...

समाप्त.

गुलमोहर: 

सुरेख दाद!!! रडवलंस गं!!! अशी मैत्री असेल तर आयुष्य फक्त त्या आधारावर काढायलाही मी तयार आहे.

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

खुप अस्वस्थ केल कथेन.खुपच छान कथा...

------------------------------
जीवन सोहळा जणु !!!!!
www.gulmohar.wordpress.com

खुप छान जमवलत. शैली फरच आवदली

वा! खुप छन जमवलत. शैली खुप अवदली.

खुप छान जमवलत. शैली फारच आवदली

धन्यवाद. सगळ्यांचे आभार.
"सख्खा मित्रं"... सखा किंवा सखी हे नातच असं आहे ना... पाण्यासारखं! त्याला स्वतःचा असा रंग नाही... म्हणूनच खूप जपावं लागतं... कशानेही गढळू शकणारं हे नातं... निवळशंख होऊन झुळझुळतंही परत..... नात्यांचं काय सांगता येत नाही Happy

अवघड आहे! !!!!
_________________________
-Impossible is often untried.

दाद, सुरेख्..नि:शब्द करुन सोडतेस नेहेमीच.
आणि ठांकु बर्का ! त्यामुळे कथा अनुभवणं फार सोपं गेलं. का ते सांगायची गरज नाही म्हणा. पण एक मात्र सांगतो, जर असा देखणा गृप मिळणार असेल तर आपल्याला टी.बी. ; कॅन्सर सगळं मंजुर.
अप्रतिम.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.

http://maagevalunpahataana.blogspot.com

दाद खरच खुप छान लिहिता तुम्ही!
मी बी ई करतोय..माझा पण १६ जणांचा ग्रुप आहे, ४ मुलि आणि १२ मुल काही महीन्यांपुर्विच आम्ही एकमेकांपासुन दुर झालो. तुमचि हि कथा वाचलि आणि मला एकदम आमचा शेवटचा दिवस आठवला..मैत्रीणी रडत होत्या आणि आम्ही त्यांना चिडवत होतो... पण त्याना चिडवता चिडवता माझे डोळे कधी पाणावले तेच कळल नाही... सर्व आठवणी ताज्या झाल्या...
दाद तुम्हि प्लिज अशा आणखी कथा लिहा..

Pages