अवघी विठाई माझी (२३) सलाद ग्रीन्स

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

100_0511.JPG

पाश्चात्य जेवणात ग्रीन्सचे स्थान महत्वाचे आहे. आपल्याकडे मेथीच्या पानांची, किंवा मूळ्याच्या पानांची पछडी असे काहि अपवाद सोडल्यास, हिरव्या भाज्या कच्च्या खाण्याची परंपरा नाही. आपल्याकडची आहारपद्धती लक्षात घेतल्यास, आपल्याला आपल्या नेहमीच्या आहारातून, भरपूर चोथा मिळत असतो. त्यामुळे मुद्दाम कच्ची पाने खायची रित नाही.
पाश्चात्य जेवणात मात्र, मैद्यासाखरेपासून केलेले पदार्थ, पास्ता आणि मांस यांवर भर असल्याने, त्यांना सलाद खाणे आवश्यक असते.

सलाद जेवणाच्या सुरवातीला, मुख्य पदार्थ वा जेवणानंतर गोड पदार्थ म्हणून पण खाल्ले जाते.
सलाद मधे अनेक प्रकारची हिरवी पाने आणि त्यासोबत इतर कच्च्या भाज्या (काकडी, टोमॅटो, कांदा, गाजर ) काहि शिजवलेल्या भाज्या (बीट, बटाटा, बीन्स ) चीज, फळे (सफरचंद, संत्री )नट्स तसेच ब्रेडचे तूकडे, उकडलेली अंडी, चिकन, बीफ हे पण घेतले जाते. तूम्ही सलाद कुठल्या हेतूने खाताय त्यावर हे ठरते.

सलादमधे ड्रेसिंगला पण महत्व आहे. फ्रेंच ड्रेसिंग, मेयॉनीज, लिंबाचा रस, क्रीम वगैरे यात वापरले जाते.

सलाद नेहमी थंडच खाल्ले जाते. (अपवाद पोटॅटो सलाद ) यातली पाने स्वच्छ धुवुन कोरडी करायची असतात. त्यासाठी खास उपकरण मिळते. जाळीदार टोपलीत सलादची पाने घालून, दोरीला बांधुन ती टोपली गरगर फिरवून पण पाणी काढीत असत. सलादची पाने चिरण्यापेक्षा त्यांचे हाताने तूकडे करणे योग्य ठरते.
सलादची पाने हि ताजीच मिळतात (सुकवलेली वा फ्रोझन नाही ) आणि ती शक्यतो ताजीच खायची असतात. ती जर कोमेजली असतील, तर थोडा वेळ लिंबू रस घातलेल्या पाण्यात ठेवली तर परत टवटवीत होतात. पण ती फ्रीजमधे ठेवायची असतील तर केळ्यासारख्या फळांच्या सोबत ठेवू नयेत.

सलाद ग्रीन्समधे प्रामुख्याने चोथा. अ व क जीवनस्त्वे, व थोड्या प्रमाणात खनिजे असतात.

सलाद ग्रीनमधे अनेक वनस्पतींचा समावेश होतो. बेबी स्पिनॅच, एन्डाइव्ह, कॉस, रॉकेट, दांडेलिऑन, बेबी चार्ड, बेबी पाक चोई, लेट्यूस, आईसबर्ग लेट्यूस, वॉटरक्रेस, बटरहेड असे अनेक.

पण मला वाटते, सलादमधील रंगसंगती, त्यातील घटकांचा ताजेपणा, तसेच आकारमानाच्या मानाने अत्यंत कमी कॅलरीज, यामूळे सलाद खाताना, एक मानसिक समाधान वाटते.
पुरावा म्हणुन हे सलाद बघा.

P1000016.JPG

यात मी, कडेने लाल नेविल संत्र्याच्या पातळ कापा लावल्या आहेत (या सालासकट खाता येतात.)
त्यावर सफरचंदाच्या अत्यंत बारिक काड्या ठेवल्या आहेत. त्यावर मिश्र ग्रीन्स, त्यात स्वीट कॉर्न, आणि काही फूले ठेवली आहेत. ड्रेसिंग म्हणून फक्त संत्र्याचा रस टाकला आहे.
बघा आहे कि नाही, नजरेलाही सुखावणारी डिश ?

सर्व वाईट (वा चांगल्या, म्हणू शकतो ना ?) गोष्टींचा शेवट व्हावा असे म्हणतात. तसाच या लेखमालिकेचाही समारोप इथे करतोय. यापेक्षा वेगळ्या व नवीन भाज्यांची चव घ्यायला मिळाली तर लिहिनच.
शिवाय उद्यापासून गणपति बाप्पा यायचेत. त्यासाठी पण वेळ हवा. तेंव्हा म्हणा
गणपति बाप्पा मोरया !!

विषय: 
प्रकार: 

माझं आवडतं सॅलड: वरची ही सॅलड ग्रीन्स, चौकोनी चिरलेला टोमॅटो, ताज्या मोझ्झरेला चीजचे चौकोनी तुकडे, द्राक्षं, पिस्ते , ताजं क्रश्ड पेपर, किंचित ऑऑ, आणि विनायग्रेट ड्रेसिंग.

दिनेशदा, सॅलड मस्तच दिसतंय, विशेष म्हणजे खावेसे वाटतेय Happy
त्यात चॉकलेटी रंगाचे मधे दिसतेय ते काय आहे?
सायो, विनायग्रेट ड्रेसिंग म्हणजे काय?

बाल्सामिक व्हिनेगर बेस्ड ड्रेसिंग. हलकं असतं, आंबटसर चव येते. मेपल, रास्पबेरी वगैरे फ्लेवर्स येतात ह्यात.

अशा टाईप : http://www.kmart.com/shc/s/p_10151_10104_033V002194636000P?vName=Food%20...

तुम्ही लेखमाला संपवताय हे ऐकून वाईट वाटले. ब्राम्हीचा वेल लावायचं मी ठरवून टाकलय.
अशीच एखादी नवी भाजी दिसल्यावर त्याची ओळख करून द्यायला विसरु नका.

दिनेश, अतिशय सुरेख लेखमाला. खूप मेहनत आणि अभ्यासपूर्ण. एखाद्या संदर्भग्रंथासारखी झाली आहे. प्रचि तर अप्रतिम. संपली म्हणू नका मात्र, जमेल तेव्हा आणखी लिहीत रहा.

दिनेशदा, लेखमाला २ दा वाचली. सुंदरच. सगळी माहिती जमा करुन, आम्हाला घरबसल्या ज्ञान दिल्याबद्द्ल आभारी. असेच लिहित रहा.

वॉव.. सुंदर ,अ‍ॅपिटायझिंग दिसणारं आणी लागणारं सॅलड.. ऑरेंजच्या किती पारदर्शक ,पात्तळ स्लाईसेस कापल्यात.. सुरेख.
माझ्याकडेही रोज सॅलड लागतच.. काकडीचे तुकडे, कांद्याच्या पातळ चकत्या, सॅलड लीव्ज,हिरवी ,पिवळी भोपळी मिर्चीच्या पात्तळ स्लाईसेस्,चेरी टोमॅटो,पुदिन्याची थोडी पाने,क्रश करून, ऑलिव्ज ,त्यात थोडा लिंबाचा रस,मीठ,मिरपूड्,कधीमधी चव बदलायला ओरिगॅनो,बेसिल लीव्ज,थाईम ,अ‍ॅपल सिडार विनिगर घालते.

ह्म्म, माझंही सॅलड फेव्हरिट. हल्ली सकाळी १ पोळी कमी करून त्याची भरपाई सॅलडने करतेय. पण फार व्हेरिएशन नाही करत त्यात. सॅलड (लेट्यूसची पानं), चेरी टॉमेटो, काकडी व गाजर, त्यावर लिंबाचा रस व थोडा चाट मसाला.