गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी)

Submitted by जिप्सी on 10 June, 2010 - 23:38

मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रामदास कामत यांनी गायिलेली आणखी गाणी :
दैव किते अविचारी ऊधो जीवनगती ही न्यारी (कबीराच्या दोह्यावर आधारित आहे का हे? कर्मन की गती न्यारी?)
संगीतरस सुरस मम जीवनाधार
सूर ताल लय धून नटला विविधरंगी
स्वररूप ओंकार
आनंदघन असा बरसे नभातून
हा वेद श्रुतिमान सुखसार

दोन्ही शांताबाई आणि अभिषेकी.

गुंतता हृदय हे या कमळदळाच्या पाशी
हा प्रणय गंध परिमळे तुझ्या अंगासी

साद देती हिमशिखरे उंच पर्वताची

आनंद सुधा बरसे
संशयकल्लोळातली पण गाणी त्यांच्या आवाजात आहेत,
देवा तुझा मी सोनार्. हे पण बहुतेक्..मी आठवायचा प्रयत्न करतोय प्रकाश घांग्रेकर की रामदास कामत?

रामदास कामत एअर इंडियामधे नोकरीला होते आनि त्यांनी नोकरी सांभाळून नाटके केली. काटा रुते कुणाला हेही बहुधा त्यांचे वेगळ्या चालीत आहे.
नको विसरू संकेत मीलनाचा हे आणखी एक नाट्यगीत
ते गेल्य नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांच्या मुलाखती व गाणी अनेक वेळा पहायला/ऐकायला मिळाल्या.
मास्तर कृष्णरावांच्या कन्या वीणा चिटको यांनी स्वतः लिहून संगीतबद्ध केलेली गाणी रामदास कामतांच्या आवाजात आहेत.
पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव,
या उदास गगनासाठी मी तृणात (की उन्हात) निजलो आहे
वर्षाव तुझ्या प्रीतीचा मी त्यातुन भिजलो आहे.

शरददा तुम्ही गाण्यांचे अर्थ सांगताय ते खूपच आवडते आहे.
देवलांपूर्वीची गाणी संस्कृत प्रचुर भाषेतली होती, त्याचा अर्थ कळणे खूपच कठीन जाते. बरे ही गाणी नुसती ऐकलेली त्यामुळे संदर्भ ही कळणे नाही.

देवा तुझा मी सोनार्. हे पण बहुतेक्..मी आठवायचा प्रयत्न करतोय प्रकाश घांग्रेकर की रामदास कामत?>>>>भरत, १००% रामदास कामतच. तेच सध्या ऐकतोय Happy

संगीत एकच प्याला, हे राम गणेश गडकर्‍यांचे नाटक. दारुपायी झालेली शोकांतिका, असे याचे स्वरुप आहे. या नाटकावर ऑथेल्लो ची दाट छाया आहे. गडकर्‍यांनी यातली गाणी लिहिली नव्हती. ती पुढे विठ्ठल सितारम गुर्जर यांनी लिहिली. या भुमिकेत मी प्रत्यक्ष, जयमाला शिलेदार, किर्ती शिलेदार, रजनी जोशी आणि कान्होपात्रा किणीकर (शिवाय बाल गंधर्व आणि कुमार गंधर्व, यांच्या आवाजातली गाणी संग्रहात आहेत ) यांना बघितले आहे. या नाटकाचा प्रभाव, यातल्या संगीतामूळे कमी होतो, असे डॉ लागू यांचे मत होते, आणि त्यांनी स्वतः, सुहास जोशी, रोहिणी हटगंडी, सुहास भालेकर यांना घेऊन संगीत विरहीत प्रयोग केले, पण ते फारसे चालले नाहीत.
काहीही असले तरी, नाटकात उत्तमोत्तम गाणी आहेत.
सिंधु चा भाऊ प्रभाकर, याच्या तोंडी गाणे आहे,
वसुधा तल रमणीय सुधाकर
व्यसन तिमिरी बुडला

सुधाकरची बहीण शरद, हिच्या तोंडी गाणे आहे, ललना मना नच घलव शंका,

बाकीची सर्व गाणी, नायिका सिंधु च्या तोंडी आहेत.
१. मानस का बधिरावे, बघुनिया खिन्ना जगती ( सिंधूला, पुढे येणार्‍या वादळाची जणू चाहूल लागलेली आहे )
२. कशी या त्यजू पदाला, तव शुभग शुभ पदाला
परलोकी चरण हे नसती, ते मजसि निरय वसती
वसे पदयुग जिथे हे, मम स्वर्ग तेथ राहे

(तिचा भाऊ तिला माहेरी न्यायला लागतो, त्यावेळी सुधाकराला सोडून जाणार नाही, असे ती भावाला सांगते )

३. सत्य वदे वचनाला नाथा, स्मरुनी पदाला या सूर विमला
वित्त पराजित मानी विषसम, स्पर्शीन ना कधी मी त्याला
(तळीराम, सुधाकराला उसकावून सिंधुला शपथ घे, अशी जबरदस्ती करायला लावतो.)

४. मज जन्म देई माता, परी पोशिले तूम्ही हो
( तळिरामाची बायको गीता, सिधुला काही काम मिळवून देते, व तिला थोडेफार पैसे मिळवता येतात, त्यावेळी गीतेला उद्देशून सिंधु म्हणते )

५. बघू नको मजकडे केविलवाणा, राजस बाळा (बाळाच्या दूधासाठी पैसे नसताना, बाळाला उद्देशून म्हणते. कलिंगडा रागाचा उत्तम अविष्कार )

६. दया छाया घे, निवारुनिया, प्रभु मजवरी कोपला
जीवनासी मम आधार, गुरु जो, तोहि कसा अजि कोपला
(सुधाकर जास्तीत जास्त दारुच्या गर्तेत रुतत चालला हे बघून ती निराश होते )

७. हास गड्या तू नाच गड्या (तिच्या आयूष्यातला एक आनंदाचा क्षण, बाळाला उद्देशून )

आणि अप्रतिम भैरवी
८. प्रभु अजि गमला, मनी तोषिला
मृतची हृदय होते, नाथ हे पूर्ण झाले
परी वचन सुधेने त्यासी जिवंत केले
अमृत मधुर शब्दा, त्या पुन्हा ऐकण्या
श्रवणी माझी सकल शक्ती एकत्र होते
( सुधाकर ने दारू सोडायची शपथ घेतल्यावर, अत्यानंदाने ती हे पद म्हणते, पण हा आनंद क्षणभंगुर ठरतो. नाटकात सिंधु, तिचे बाळ आणि सुधाकर, तिघांचाही अंत होतो.)
हि गाणी इतकी प्रभावी ठरली, कि या नाटकाचा जो संदेश आहे, तो दुर्लक्षित राहिला.
नाटकाचे कथानक साधारण माहीत असले, कि नाट्यगीतांचा जास्त आनंद घेता येतो. आता या नाटकांचे प्रयोगच होत नाहीत, त्यामूळे मुळ भुमिकेतील गायनाला आपण मुकतो आहोत.

मला असे वाटते की महान नाटककारांना शोकांतिकांचे आकर्षण असते तेही भव्य दिव्य..शेक्सपिअरची नाटके...मराठीत नटसम्राट आनि एकच प्याला.
दारूचे व्यसन हे शोकांतिकेसाठी केवळ निमित्त असावे...
पण नाटक सुधाकराचे न राहता सिंधूचे झाले,(बालगंधर्वामुळे का?- दोष नाही देत फक्त शंका) बालगंधर्वांबरोबर सुधाकर कोण करायचे? गणपतराव बोडस की कोणी नानासाहेब होते? चित्तरंजन कोल्हटकरांनी गडकर्‍यांचा घनश्याम केला...चिंतामणराव कोल्हटकरांनी पण गडकर्‍यांचे नाटके केलीत का?
या नाटकासाठी बालगंधर्वांना भरजरी शालू पैठणी सोडून फाटक्या साड्या नेसाव्या लागल्या.कशी या त्यजू पदाला ,मम सुभग शुभ असावे..इथे बालगंधर्व पदाला...बाबा,पदाला..दादा,पदाला.. माझ्या अशी नाट्यमयता आणि विविधता द्यायचे म्हणे.
शरद तळवलकरांनी तळीराम केला.
चंद्र चवथीचा हे गाणे याच नाटकातले का? सगळीच गाणी वि सी गुर्जरांनी लिहिली की काही गडकर्‍यांची ही होती?
अण्णासाहेब किर्लोस्कर, कृ.प्र्.खाडिलकर आणि कोल्हटकरांच्या(श्री कृ.) नाटकातली गाणी कधी घेताय शरददा?
गडकर्‍यांच्या भावबंधन आणि राजसंन्यास मधे पण गाणी होती.

वा दिनेश. तुम्ही सही लिहताय. Happy कुमारांच्याच 'विराट ज्ञानी' वर लिहा.

रामदास कामतांचे नाव घेतल्यावर त्यांचे 'देवाघरचे ज्ञात कुणाला' ह्याची आठवन येणे क्रमप्राप्त आहे. फार सुंदर गायलं आहे. पण रामदास कामत मला स्वतःला फारसे आवडत नाहीत. (त्यांचे योगदान मान्य करुन.)
देवाघरचे ज्ञात कुणाला हे फारच सुंदररित्या लिहले व गायले गेले आहे.

कामतांचे इतर मला आवडणारे म्हणजे हे आदिमा, हे अंतिमा आणि थोड्याफार प्रमाणात गुंतता हृदय हे.

सर्वश्री दिनेशदा, भरत, योगेश, केदार आणि अन्य सन्माननीय सदस्यांचे "रामदास कामत" चर्चेबद्दल मनापासून आभार. मला तर हाताच्या बोटावर मोजावी इतपतच श्री.कामत यांची गाणी माहित होती, पण त्यांचीही इतकी भरभरून गीते आहेत हे वाचून आनंद झाला. नक्की मिळवीन मी गाणी.

या चर्चेच्या अनुषंगाने श्री.दिनेशदा यांनी "बालगंधर्व" यांचा विषय योगायोगाने छेडला आहे. या विषयावर मात्र माझे बर्‍यापैकी वाचन आहे, आणि एक विलक्षण योगायोग मला इथे आढळला, तो असा की, श्री.दिनेशदा यांनी काल दिनांक २६ जून रोजी "एकच प्याला" मधील बालगंधर्वांच्या गाण्याच्या जादूविषयी लिहिले आणि दिनांक २६ जून हाच बालगंधर्वांचा "जन्मदिवस". (१२२ वा...).

माडखोलकरांनी म्हटले होते की, "गंधर्व नाटक मंडळी म्हणजे अलका आणि अमरावती यांचे सारे वैभव या रंगभूमीवर एकवटलेले आणि त्यातील बालगंधर्व म्हणजे त्या रंगभूमीची उर्वशी. त्यांचे सौंदर्य, संगीत आणि नाट्य अमर आहे. त्यांच्या यौवनाची स्मृती अजर आणि अविवाशी आहे."

त्यांचा सुवर्णकाळ पाहिलेले लोक आता हयात असणे याची शक्यता फार धूसर आहे, पण तरीही ज्या काही आठवणी लिखीत स्वरूपात आहेत त्या पाहता/वाचता याची जाणीव तरी नक्कीच होते की, बालगंधर्वानी आपल्या गाण्यांनी त्या वेळेच्या रसिकांना वेड लावले होते की, त्यांच्या सुभद्रा, वसंतसेना, भामिनी, देवयानी, रुक्मिणी, रेवती, सिंधू या भूमिकांनी, की या सर्वांपेक्षा रंगभुमीवर ते उधळत असलेल्या श्रीमंतीमुळे ! पण काही का असेना "परिमनाला नटवर झाला मंत्र महान !" हेच त्यांच्या बाबतीत खरे ठरले होते.

बालगंधर्वांची जी गाणी उपलब्ध आहेत त्यांचे रेकॉर्डींग अगदीच वाईट आहे. त्यांचा वारसा जयमालाबाईनी चालवला. त्यांच्या गायनात त्यांची झाक दिसतेच. पण त्यांचेही ऐन ऊमेदीतले गायन उपलब्ध नाही आता.

त्यांनी धर्मात्मा, नावाच्या एका सिनेमात पण काम केले होते. (तो सिनेमा सिडीवर उपलब्ध असणार, )
ती पुरुष भुमिका होती, आणि लोकांना ती रुचली नाही. खरे तर स्त्री भुमिकांमूळे त्यांची शोकांतीकाच झाली. मग गौहरजान प्रकरण झाले, असो पण तो या बीबीचा विषय नाही.
एकच प्याला मधले एकही गाणे गडकर्‍यानी लिहिले नाही. चंद्र चवथीचा त्या नाटकात ऐकल्याचे आठवत नाही. मी इथे लिहिलेय ते केवळ आठवणी वरुन, माझ्याकडे पुस्तक वगैरे नाही, म्हणून खात्री करावी लागेल.
भावबंधन मधे गाणी होती, पण त्या मानाने कमी होती. आशा भोसलेचे कठीण कठीण कठीण किती, हे त्यातलेच.
काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर वर्षभर संगीत नाटके सादर झाली होती, ती पण कुठे उपलब्ध नाहीत. ज्या सिडीज उपलब्ध आहेत त्यांचा दर्जा इतका वाईट आहे, कि त्यातून नव्या लोकांना आवड निर्माण होणे शक्यच नाही. या बीबी च्या शीर्षकासारखे, ती गाणी मनातच राहिली.
मानापमान मधली फारच कमी गाणी रेकॉर्ड झाली, त्या नाटकात वेगवेगळ्या चालींची इतकी गाणी आहेत, कि ते नाटक पूर्ण सादर केले तर सहज ५ तास चालेल.
असो, आणखी एका गाण्याची आठवण काढतो (हे उपलब्ध आहे)
पुर्वी बायकांनी नवर्‍याचे नाव घ्यायची प्रथा नव्हती, म्हणून सौभद्र मधली सुभद्रा, अर्जूनाचे सूचन कसे करते आहे ते बघा

पांडू नृपती जनक जया
माता कुंती यदुतनया
धर्म भीम बांधव जया
नामे विजय जो

म्हणजे पांडू ज्याचा पिता आहे. कुंती ज्याची माता आहे, धर्म आणि भीम ज्याचे बंधू आहेत आणि ज्याच्या नावाचा अर्थ अर्जून आहे तो. कर्नाटक शैलीतील हि चाल आहे. माझ्याकडे हे गाणे, मालिनी राजूरकर यांच्या आवाजात आहे. त्यांच्या आक्रमक ग्वाल्हेर शैलीत, हे गाणे ऐकणे म्हणजे ...
तूम्ही त्यांच्या गायनशैलीशी परिचित नसाल, तर यू ट्यूबवर त्यांचे गायन ऐकाच..

दिनेशदा,

एकच प्याला, मानापमान १०० % अनुमोदन. पांडू न्रुपती तर काय जोरात सुरू होते नाही का? मालिनीबाई आमच्या हैद्राबादेत बरकत पुर्‍यात राहतात. थोर गायिका. मला त्यांचा पूर्ण संच हवा आहे. आक्रमक जोरकस शैली अगदी अगदी पण एकेक स्वर कसा लखलखतो.
प्रभु अजि गमला अत्युत्तम.
विराट ज्ञानी पण.

धनराशी जाता मूढा पाशी हे ही चांगले पद आहे. ( मी कायम म्हणत असते. )
शस्त्र जसे कमला कराला, रूप जसे ते योगिनीला.

प्रतिक बालगंधर्वांवरील सुन्दर पोस्ट. माझे सासरे कामा निमित्त गावोगावी हिंड्त त्यांना एका ठिकाणी
गंधर्व नाट्क मंड्ळीचा पड्दा बघायला मिळाला होता जड व भरजरी. ते अगदी थक्क झाले होते.

बालगंधर्वांचा चित्रपट 'महात्मा' संत एकनाथांवर आधरित होता.
सुभद्रा जसे अर्जुनाचे कानामागून हात घेऊन घास भरवल्यासारखे वर्णन करते, तसेच अर्जुन ही तिला माझी मातुल कन्यका(मामाची मुलगी) म्हणतो ना?.
चंद्र चवथीचा वर बालगंधर्वांचे चरित्रकार बाळ सामंत यांनी लेख लिहिला होता एवढेच वाटतेय. या गाण्याची ध्वनिफीत नसावी बहुधा.
बालगंधर्वांविषयी अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत, त्या खर्‍या घटनाही असू शकतील. ते एकदा स्त्री वेशात हळदीकुंकवाला गेले तेव्हा अगदी शेवटपर्यंत ही स्त्री नाही असा कुणाला संशय आला नाही, शेवटी पान नखलण्याच्या पद्धतीवरुन कुणीतरी पकडले. बालगंधर्व त्यावेळचे स्टाइल आयकॉन होते, साडी नेसण्याची आणि केशभूशेची त्यांची स्टाइल स्त्रिया कॉपी करायच्या. नाटक सुरू होण्यापूर्वी त्यांच्या शालू शेले इ. अत्तरात बुडवून ठेवलेले असायचे, त्यामुळे नाटक कानांना, डोळ्यांना आणि नाकालाही सुखवायचे.

नाट्यसंगीताच्या आठवणी काढताना आणखी एका गीताला विसरता येणार नाही ते म्हणजे
देह देवाचे मंदीर
आत आत्मा परमेश्वर

श्वेतकेतू जेंव्हा वैदिक ज्ञानातील आत्मदर्शन आत्मसात करुन येतो तेंव्हा आत्मज्ञानाबद्दल त्याचा पिता त्याला विचारतो. त्याला नीट उत्तर देता येत नाही. तेंव्हा त्याचा पिता त्याला शरीर व प्राणाचे महात्म सांगतो त्यात शरीरातील ९ छिद्र अन अष्टचक्र ह्यांचे वर्णन येते. तुकोबा हे तत्वज्ञान फार मस्त पद्धतीने ह्या गीतातून मांडतात.

जसे दुधामध्ये लोनी
तसा देही चक्रपाणी

देव देहात देहात
का हो जाता देवळात

तुका सांगे मुढजन
देही देव का पहान
देह देवाचे मंदिर

केदार ते गायलय उदयराज गोडबोले यांनी. त्यांचा आवाजही फार गोड होता.
जशी उसात हो साखर, तसा देहात हो इश्वर, अशी पण ओळ आहे त्यात.

अश्विनी, मालीनी राजूरकरांचे, आणखी एक पद माझ्याकडे आहे,
शिवहरा हे भवहरा,
शंभो उमा पतिता
आता घे तरी पदरा.

त्यांच्या आजवर निघालेल्या सर्व सिडी माझ्याकडे आहेत.
त्याची संध्याकाळी सलग ५ तास आणि दुसर्‍या दिवशी सकाळी सलग ६ तास मैफील मी ऐकलेली आहे.
त्यांचे टप्पा गायन तर खासच. अशी टप्पा गायकी नाट्यगीतात पण होती, (असे भार्गवराम आचरेकरांनी, गाऊन सिद्ध केले आहे.)

धाडिला राम तिने का वनी मधले कैकयीचे एक पद (बहुधा अवमानिता मी झाले) हे टप्पा थाटा अभिषेकींनी बांधले असे त्या पदाच्या गायिका रजनी जोशी यांनी सांगितल्याचे आठवते.

योगेश, दिनेशदा...

मनात आलेला एक प्रश्नः - नाट्यसंगित जे पुर्वी पूर्णपणे 'शास्त्रीय संगिता'वर आधारीत असायचं, ते नंतरच्या काळात 'भाव-संगिता'कडे कां?, आणी केव्हा पासुन?, झुकु लागलं, या बद्दल काही माहिती सांगाल तर खूप चांगलं होईल...

कै. मा. दीनानाथ, कै. बालगंधर्व, कै. केशवराव भोळे... या दिग्गज गायकांची, त्यांच्या बहरातलि 'गायकी' आज उपलब्ध नाही, आणि जी काही उपलब्ध आहे ती सदोष ध्वनी-मुद्रणामुळे आजच्या काळात ऐकणे जमत नाही... तरी देखिल आमचे आजोबा, वडिल सांगायचे की, या गायक नटांची नाटके 'जलशा'सारखी रात्र-रात्र चालायची... अर्थात ते (आजोबा, वडील) काही वर्णन करायचे, त्या वरुन एक अंदाज बांधता येतो की, शास्त्रीय संगीताची पूर्ण-पणे जाण असल्या शिवाय अशी संपूर्ण रात्र-भर नाटक रंगवणे शक्य होत नाही... पण त्यानंतरच्या काळात आलेली संगित नाटके - उदा. धाडिला राम तीने का वनी?, हे बंध रेषमाचे, इ... या नाटकातिल संगित बर्‍याच प्रमाणात 'भावगिता'च्या अंगाने स्टेज वरुन सादर होऊ लागलेलं होतं... तर या बद्दल तुम्हा दोघांकडुन (अर्थात आणी ईतर रसिकां कडून देखिल) माहिती मिळालि तर आम्हाला वाचायला निश्चितच आवडेल...

विवेक, मला जितके माहीत आहे तेवढे लिहितो. ज्यावेळी चित्रपट संगीत जास्त लोकप्रिय नव्हते
त्या काळात किर्तन, लावण्या वगैरे जास्त लोकप्रिय होत्या आणि ऐकल्याही जात होत्या.
किर्तनातल्या दिंड्या आणि साक्या नाट्यसंगीतात होत्याच. लावणीमधून पण काही चाली आल्या
(उदा. वद जाऊ कुणाला शरण, हे नाट्यगीत, नेसली पितांबर जरी, जरी गं जरतारी लाल काठ,
या लावणीवर आधारीत आहे. )
पण किर्तनाचा प्रभाव जास्त होता हे निश्चित. शिवाय विषयही पुराणातलेच असत. मोठ्या
नाटकाच्या मध्यंतरात, रिलिफ़ म्हणून काही फ़ार्स सादर केले जात असत, त्यापैकी
तसबीराचा घोटाळा, खुपच लोकप्रिय झाल्यावर, त्याचे संशयकल्लोळ असे पूर्ण लांबीचे
नाटक झाले.
त्यावेळचे गायक नट हे शास्त्रीय संगीताची रितसर तालीम घेतलेलेच असत, आणि गाणी
बसवणारे बुवा देखील. शास्त्रीय संगीत आधीच लोकप्रिय असल्याने ( त्याकाळी शास्त्रीय
संगीताच्या प्रसाराला वाहून घेतलेले लोक होते ) त्या चालीवर गाणी बसवण्यात आली,
(पूर्वीच्या नाटकांच्या पूस्तकातच, राग आणि ताल दिलेला असे.)
शिवाय, सहकुटूंब जाण्यासारखी मनोरंजनाची साधने नसल्याने, लोकांना भरपूर वेळ
असल्याने, रात्र रात्र चालणारी नाटके होत. संस्थाने असताना, त्यांचा पण राजाश्रय होताच.

पण धाडिला राम तिने का वनी, हे काही भावगीते असणारे पहिले नाटक नाही. त्यातले
एखाददूसरेच गाणे (घाई नको) भावगीताच्या चालीवर आहे.
त्याकाळात स्त्रियांनी गाणे म्हणायला प्रतिष्ठा नव्हती, आणि नाटकात काम करायला तर
त्याहून नव्हती. हिराबाई बडोदेकर आणि ज्योत्स्ना भोळे यांनी अनुक्रमे त्या त्या क्षेत्रात काम केले.
ज्योत्स्ना भोळ्य़ांचे, कुलवधू, हे नाटक याबाबतीत मैलाचा दगड ठरले. त्यांनी पाचवारी
साडीला पण प्रतिष्ठा मिळवून दिली.
कुलवधू नाटकातली गाणी अशी थोडी चाकोरी सोडुन होती. मनरमणा मधूसूदना हे भजन
आपण ऐकतोच. क्षण आला भाग्याचा, ही भैरवी पण ऐकण्यातली, पण त्याच नाटकात
त्या आणि मा. अविनाश, तूझे नी माझे जमेना, असे धमाल द्वंद्व गीत गात असत.
त्याच काळात ज्योत्स्ना भोळे भावगीत पण गात आणि गाजवत होत्याच.
या नाटकात गाणी पण मोजकीच होती. नाटकाची लांबी पण कमी होत गेली.

जितेंद्र अभिषेकिंनी मग खुप प्रयोग केले. गर्द सभोति रान साजणी, हे त्यांचेच संगीत.
लेकुरे उदंड झाली, हि पुर्णपणे संगीतिका होती.(पुर्वी श्रीकांत मोघे आणि दया डोंगरे असत)
हे बंध रेशमाचे मधे लावणी होती.

लोककलांच्या आधाराने पण संगीत नाटके होती. आतून किर्तन वरुन तमाशा, वर्हाडी
माणसं, यात दोन्ही प्रकारचे संगीत होते. होनाजी बाळा मधे पण लावण्या होत्या.

बाळ कोल्ह्टकरांनी पार्श्वगायन आणले, मग कुमार गंधर्व, वाणी जयराम गाऊन गेले.
माणिक वर्मांचे, निघाले आज तिकडच्या घरी, (नाटक, वाहतो हि दुर्वांची जूडी)

(कदाचित गाणारे नट नट्या उपलब्ध न झाल्यानेही असा पायडा पडला असावा.)

हे पण नाट्यगीतच आहे.वसंत देसाईंनी केवळ पेटी तबल्यावर अवलंबून न राहता,
आणखीही वाद्ये आणली (उदा, सावज माझं गवसलं,नाटक जय जय गौरिशंकर )
त्यांनी जयवंत कुलकर्णी कडून पण गाऊन घेतले. ( विश्वनाट्य सूत्रधार, नाटक
शाब्बास बिरबल शब्बास ) सुधीर फ़डके यांनी पण पार्श्वगायन केले (नाटक गोकुळचा चोर)
तर असे प्रयोग करता करता, नाट्यगीते सोपी होऊ लागली. पण भावगीतच काय कुठलेही
श्रवणीय गाणे, हे कुठल्या ना कुठल्या रागावरच अवलंबून असते. त्यामूळे शास्त्रीय संगीत
असल्याशिवाय संगीत असू शकत नाही.

अवमानिता मी झाले ची जी रेकॊर्ड आहे, ती टप्प्यासारखी वाटत नाही,
(मुळ चीज, नटनागरा श्री शंकरा ) कदाचित नाटकात त्या गात असतील.
टप्पा म्हणजे वेगळेच प्रकरण असते. साधारण उंटावर बसून गायले, तर
जसे गावे लागेल, तसा हा प्रकार असतो. (या उपमेत उपहास नाही )

मालिनी राजूरकर यांचे, चाल पहचानी, गुलफ़ूला फ़ुले शेवंती आदी टप्पे
यू ट्यूबवर उपलब्ध आहेत. गोव्याच्या तरुण गायिका, आरती नायक, यांचा
पण एक टप्पा उपलब्ध आहे. नीला भागवत पण गातात. पण गायला कठिण
प्रकार असल्याने, फ़ारसे गायक गायिका याच्या वाटेला जात नाहीत.
नाट्यगीतांपैकी, हि सहज कशी खेळविते ललना, हा टप्पा आठवतोय.

शरददा लेकुरेच्या जाहिरातीत दया डोंगरे आणि श्रीकांत मोघे असायचे. अरविंद जोगळेकर कोण? अरुण जोगळेकर म्हणायचे आहे का?
अलीकडे प्रशांत दामले आणि योजना शिवानंद यानी केले , त्यांच्या आवाजत एक ध्वनिफीत पण आहे...

हो भरत, श्रीकांत मोघेच. (सुधारले ) पण मला वाटते गजरा मधे दया डोंगरे आणि अरुण जोगळेकर (सई परांजपेचा नवरा ) यांनी एक प्रवेश सादर केला होता.
प्रशांत दामलेने हल्लीच प्रयोग केले त्याचे. हि योजना शिवानंद (भाट्ये) पण चांगली गायिका आहे. महानंदा मधे पण तीच होती.
आणि हे लोक मला का नमस्कार करताहेत, ही थोर माणसे महान कार्य करुन गेली, मी तर फक्त आठवणी काढतोय.

दिनेशदा, धाडिला राम मधले मी जाया धर्ममया..हे टप्पा थाटाचे आहे का?
टप्पा थाट समजावणारी उंटाची उपमा खासच.
हे गाणे नाही, पण आकाशवाणीवर सकाळी मंगल प्रभात कार्यक्रमात रजनी जोशींच्या आवाजात रावणविरचित एक स्तोत्र वाजायचे...बहुधा शिवस्तुतीपर ...कोणी ऐकलेय का? शाळा कॉलेजला जायच्या गडबडीला ते साथ द्यायचे मला. आता अजिबात आठवत नाही!

दिनेशदा
काय हे मालिनी बाईंच्या गाण्याचा संग्रह.? हिरे मोतीच की. त्यांचे बसंत मुखरीतील चीज व रागमाला फेवरिट माझी. आवाजाचे काय टिंबर आहे नाहीका. जोरकस.

बाकी सर्व पोस्टी उत्तम व अभ्यसनीय.

एक रम्य ही स्वर्गाहुनी लंका गाणे आहे ते ही चांगले आहे. बाबा म्हणत असत.
तेव्हा मला करंट्याला ये लड्का हाये अल्ला आवडायचे. ( वयच तसलं वेडं)

आण खी आवडीची गाणी : विकत घेतला श्याम
घनः श्याम सुंदरा.
फेवरिट : तोच चंद्रमा नभात. हे प्रेमगीत म्हणून सुरू होते पण शेवट्च्या कड्व्यात भ्रमनिरास होतो. कोणत्याच प्रेमकहाणीचे असे होउ नये असे मनापासून वाट्ते.

मी जाया धर्ममया, पण नाही वाटत टप्प्यासारखे. यू ट्यूबवरचा आरती नायकचा टप्पा ऐकून बघाच.
अश्विनी, मालीनीबाईंना बघितले असेलच. किती तो साधेपणा आणि नम्रता. आपल्या साथीदारांना सांगत असत, कि आणखी कुणाचे आमत्रण आले तर अवश्य जा, त्यांच्याकडे माझ्यापेक्षा चांगले शिकता येईल. (मी वर उल्लेख केलेल्या मैफीलीत त्यांनी मध्यंतर का केले माहीत आहे, म्हणाल्या बराच वेळ ऐकता आहात गाणे, भूक वगैरे लागली असेल, जा जरा पाय मोकळे करुन या. मी थांबते !!)
त्यांच्या साध्या चेहर्‍याकडे बघून वाटत पण नाही कि बाई इतक्या आक्रमक शैलीत गात असतील.( यावर बाईचे उत्तर तितकेच साधे आहे. त्या म्हणाल्या होत्या, माझी मैफील किंवा रेकॉर्डींग ठरले असले कि कामवालीची नेमकी रजा असते. मग मला वॉशिंग मशीनवर पेटी ठेवून रियाझ करावा लागतो. तो राग सगळा गाण्यात निघतो.)
मला स्वतःला हे आक्रमक शैलीतले गायन फारच प्रिय आहे. नाट्यगीतात पण या दोन शैलीचा प्रभाव आहे, एक आहे लडीवाळ शैली (बाल गंधर्व, छोटा गंधर्व, जयमाला शिलेदार, किर्ती शिलेदार, उदयराज गोडबोले आदी ) तर दुसरी शैली आक्रमक ( मा दीनानाथ मंगेशकर, पं राम मराठे, लता शिलेदार, आशा खाडिलकर आदी ) कट्यार काळजात घुसली मधे याच दोन शैलीतील संघर्ष आहे. घेई छंद दोन्ही शैलीत येते ते यामुळेच. या लडीवाळ शैलीबद्दल खाँ साहेबांच्या मनात राग असतो, म्हणुन तर ते म्हणतात

या भवनातील गीत पुराणे
मवाळ हळवे सूर,
जाऊ द्या हो, जूने येथुनी दूर
भाव भक्तीची भावूक गाथा
पराभूत हो नवनिर्माता
नवे सूर आणि नवे तराणे
नवा हवा तो नूर

मास्टर दिनानाथांची सावरकरांवर नितांत श्रद्धा होती. आणि त्यांनी ज्या भुमिका साकारल्या त्यात अश्या आक्रमक शैलीची गरजच होती. त्यांची फारच कमी गाणी आता उपलब्ध आहेत, पण आशानी जी गाणी गायलीत, त्यात ही शैली पूरेपूर उतरलीय. लक्षात घ्या, आशाची गाणी हि केवळ तीन साडेतीन मिनिटांची आहेत, प्रत्यक्ष रंगमंचावर काय करामत होत असेल, याची कल्पना करा.
लता शिलेदार, उर्फ दिप्ती भोगले चे गायन फारसे ऐकायला मिळाले नाही. संत कान्होपात्रा, स्वरसम्राज्ञी मधे ती दुय्यम भुमिकात असे. मंदोदरी नाटकात मात्र ती प्रमुख भुमिकेत होती, पण त्यात तिला गाणे नाही. चमकला ध्रुवाचा तारा मधले, उधळीन प्रणयाचा अंगार, हे गाणे मात्र या शैलीतलेच आहे.
पं राम मराठे यांना जोड रागांचा बादशाह म्हणत असत, त्यांना सर्व मुख्य घराण्यांची तालीम मिळाली होती या सर्व शैलींचा अर्क त्यांच्या गायनात होता. (त्यांचे वूद्धपणीचे मानापमान, आणि जयजय गौरीशंकर नाटकातले पद, यू ट्यूबवर उपलब्ब्ध आहे.) त्यांच्या चमकदार (जबड्याच्या) ताना सुरु झाल्या कि अंगावर रोमांच उभे रहात असत. त्यांच्या शास्त्रीय गायनाच्या ध्वनिफिती अलूरकरांनी काढल्या होत्या. आता त्या उपलब्ध आहेत का त्याची कल्पना नाही.
पण लडीवाळ गायकीचे आपले असे सौंदर्य होते आणि त्यांचे मूर्तिमंत उदाहरण, छोटा गंधर्व. आपण त्यांच्या बाबतीत सुदैवी आहोत, कारण त्यांचे बरेचसे गायन आज चांगल्या स्थितीत उपलब्ध आहे. मी त्यांची शास्त्रीय संगीताची मैफील प्रत्यक्ष ऐकलेली आहे. ते मालकंस रागाला मालकोष म्हणत असत आणि त्यांनी स्वतः बसंतीकोष नावाचा राग निर्माण केला होता. तो मी त्यांच्या तोंडून ऐकला होता. तसेच काही टुमर्‍या पण ऐकल्या होत्या.
ते तसे रुढार्थाने देखणे नव्हते (याबद्दल ते स्वतःच विनोद करत असत) पण संगीत सौभद्र नाटकातला त्यांचा एक प्रवेश म्हणजे एक मैफलच असायची. हा प्रवेश रुक्मीणीबरोबरचा आहे. या नाटकात रुक्मीणीला पद नाही. या प्रवेशात, बहुत दिन नच भेटलो, नभ मेघांनी आक्रमिले, नच सुंदरी करु कोपा आणि प्रिये पहा, अशी एकाहून एक सरस पदे ते म्हणत असत. या पदांवरची त्यांची छाप कुणालाही पुसता येणे शक्य नाही.
याच नाटकात, लाल शाल जोडी, असे सुंदर पद आहे. खरे तर हे कृष्णाने केलेले अर्जूनाचे वर्णन आहे, पण त्यातला लडीवाळपणा, डूलताना हलती कानी , वर घेतलेल्या हरकती, काही वेगळाच अनुभव देतात.
त्यांनी मानापमान, मृच्छ्कटीक या नाटकातील पण पदे गाजवली. त्यांच्या आवाजात काही चित्रपट गीते, (गणराजाला करु मुजरा ) काही अभंग (बोलू ऐसे बोल) पण उपलब्ध आहेत.

वा वा हे सर्व आवडले वाचायला. धन्यवाद सर्व लिहीणार्‍यांना!

मामी, 'दिसते मजला...' माझेही अत्यंत आवडते (त्यातील गणपतीची दोन ही सुंदर आहेत)

सौभद्र मी आकाशवाणीवर ऐकले होते..(दिवाळीची मेजवानी)...लाल शाल जोडीची सिच्युएशन किती छान आहे...अर्जुन संन्याशाच्या वेशात द्वारकेत राहतोय, बलरामाला त्याच्याबद्दल(संन्याशाबद्द्ल) आदर वाटायला लागलाय पण अर्जुन सुभद्रा विवाहाला पूर्ण विरोध. तेव्हा बलराम आपण बोलू त्याच्या नक्की उलट करणार हे ओळ्खून त्या संन्याशाची निंदा(शब्द कठोर आहे, दुसरा सुचत नाही) करणारे हे गाणे.'रंगभूमीवर नट सजुनी' यावा तसा म्हणे हा साधू.
कोण तुजसम सांग मज गुरुराया हे पण यातलेच ना?
छोटा गंधर्वांनी रंगल्या रात्री अशा या चित्रप्टासाठी पण गायन केले होते.
कृष्णावर किती नाटके झाली मराठीत :स्वयंवर, सौभद्र, सुवर्णतुला ...??

सौभद्र हे पूर्णपणे प्रसन्न नाटक आहे. सगळा कौटूंबिक मामला असल्यासारखा, बहीण भाऊ, नणद भावजय, दीर वहीनी असे प्रसंग आहेत.
पाश्चात्य संगीतातल्या ज्या रचना आहेत, त्या बांधीव असतात. त्यात कलाकाराला करण्यासारखे फारसे नसते. पण भारतीय संगीतात, रागांच्या सूरांची चौकट न ओलांडता प्रत्येक कलाकाराला स्वतंत्र अविष्कार करता येतो. ठुमरीसारख्या उपशास्त्रीय गानप्रकारात तर भावाला जास्त महत्व असल्याने, रागचौकटीचे बंधनही शिथील होते.
नाट्यगीते, म्हणजे तर त्यापुढची पायरी. प्रत्यक्ष भुमिकेत, वेषभूशेत ती म्हणायची असल्याने, ती जास्तीत जास्त खुलवता येतात.

अशी काही पदे बघुया

संगीत शाकुंतल मधले

पुष्पराग सुगंधित, शीतल किती
अति मंद चले बघ वायु हा
हरीण उडती बहू
शषक धावती, तरुवर डोलती

हे गाणे मी बालगंधर्व, हिराबाई बडोदेकर आणि किर्ती शिलेदार यांच्या तोंडून ऐकले आहे.
शब्दांना अनुसरुन हे बागेश्री रागात बांधलेले आहे. पण यातले शब्द पाहता बालगंधर्व, रागात वर्जित असलेले सूर पण लावत असत. (असा प्रयोग लताने, सुरसंगम सिनेमात, मैका पिया बुलावे अपने मंदीरवा, या गाण्यात केला आहे. पण त्या सूरावर गाणे खाड्कन थांबते ) हिराबाईंनी त्यांच्या सोज्वळ शैलीत हे गायलेले आहे. किर्तीने मात्र त्यात जान ओतलीय. अति मंद या शब्दांवर खरेच झुळूक आल्यासारखी वाटते तर, हरीण आणि शषक या शब्दावर अश्या काही हरकती घेतल्या आहेत, कि खरेच हरिण आणि ससा यांच्या चालीचा भास व्हावा.

मानापमान मधे, खरा तो प्रेमा असे पद आहे. या पदाचा संदर्भ लक्षात घेतल्याशिवाय, याची मजा कळणार नाही, नाटकाची नायिका भामिनी, हि वनमालेचे रुप घेऊन, वनात रहायला आलेली आहे.
तिला त्यापुर्वी श्रीमंत अश्या लक्ष्मीधराचे आकर्षण आहे, पण वनात आल्यावर तिला धैर्यधराचे, धीरोदात्त रुप दिसून येते. वनातले चोर दागिने लूटतात. ते धैर्यधर हस्तगत करतो, पण त्याचा काहि एक मोह न धरता, ते सर्व दागिने तो वनमालेला देतो.
(या प्रवेशात अनेक सुंदर पदे आहेत.
भामिनीच्या तोंडी, मी अधना न शिवे भिती मना, (म्हणजे माझ्याकडे कसलेच धन नाही तर मी कशाला घाबरु ?)
धैर्यघराच्या रुपाचे वर्णन करताना, ती म्हणते, भाळी चंद्र असे धरीला.
यावर तो म्हणतो, रवि मी, चंद्र कसा मग, मिरवितसे, लावित पिसे ?
तो भामिनीला दागिने घ्यायचा आग्रह करतो, त्यावेळी म्हणतो, दे हाता शरणागता.
शेवटी तो तिला स्वसंरक्षणार्थ तलवार देतो, तो गेल्यानंतर वनमाला हे पद म्हणते )

खरा तो प्रेमाला धनी, ना धरी लोभ मनी
नभी जन हितरत भास्कर तापत
विकसत पहा नलिनी....

हे पद मांड रागात आहे. हे मी बालगंधर्व, माणिक वर्मा, किर्ती शिलेदार आणि जयमाला शिलेदार यांच्या तोंडून ऐकले आहे.
खरे प्रेम कुणावर असावे, त्यात मोह कसा नसावा असा साक्षात्कार झाल्याचा आनंद यातल्या प्रत्येक ओळीतून दिसतो. बालगंधर्वांचे ऐन उमेदीतले गाणे मी ऐकले नाही. माणिक वर्मांची रेकॉर्ड हि मर्यादीत वेळेची आहे. किर्तीने हे १५ मिनिटे गायले आहे. तिच्या हरकती तर ग्रेटच आहेत, पण सरताज आहे ते जयमालाबांईचे. किर्तीचे गाणे जिथे संपते तिथे त्यांचे सुरु होते, असे म्हणायला हरकत नाही.

जोहार मायबाप जोहार
तूमच्या महाराचा मी महार
बहु भुकेला झालो, तूमच्या उष्ट्यासाठी आलो
चोखा म्हणे आणिली पाटी, उष्ट्यासाठी आणली

हा संत चोखा मेळाचा अभंग. संत कान्होपात्रा नाटकातला. खरे तर हि नाटकातली भैरवी नाही (अगा वैकुंठीचा राया, अगा विठ्ठल सखया, ही आहे ) पण या गाण्यानंतर काही ऐकायची इच्छाच रहात नाही,
हे गाणे मी बालगंधर्व, किर्ती (प्रत्यक्ष भुमिकेत, शरद गोखले यांच्याबरोबर) आशा खाडीलकर आणि आनंद गंधर्व यांच्या तोंडून ऐकले आहे.
बालगंधर्व, प्रेक्षकांना मायबाप मानत असत. त्यामूळे मायबाप या शब्दांवर ते बरीच कारागिरी करत असत. किर्ती तर या भुमिकेत झोकूनच देत असे (शेवटच्या गाण्याच्या वेळी ती इतकी रंगून जात असे, कि पडद्यामागून तिला लता शिलेदारची स्वरसाथ घ्यावी लागत असे. अगा वैकुंठीच्या राया हे गाणे गात गात विठ्ठलाच्या पायाशी ती प्राण सोडते, असा प्रसंग आहे)
आनंद गंधर्व या कलाकाराचे खरे नाव मला आठवत नाही. अगदी आठ दहा वर्षांचा कोवळा मुलगा असताना, दूरदर्शनवर त्यांचा कार्यक्रम विनय आपटेंनी सादर केला होता. त्याची ध्वनिफीतही निघाली होती. तो हे गाणे असे काही म्हणायचा, कि अरे बाबा थांब, नको आळवूस आणखी, किती गळा शिणवशील, असे म्हणावेसे वाटे. पुढे त्याचे नाव ऐकायला मिळाले नाही.

आनंदचे जोहार मी ही बैठकीत ऐकले आहे. अप्रतिम गातो तो. तो अजूनही कार्यक्रम करत असतो. मागच्याच वर्षी बोस्टन, शिकागो आणि इतर अनेक शहर असा त्याचा दौरा झाला.

Pages