स्वप्ने, पूर्वाभास, टेलिपॅथी, बाधा, मल्टिपल पर्सनॅलीटी डिसऑर्डर आणि पुनर्जन्म- यांना जोडणारा एकच धागा...!!!

Submitted by निमिष_सोनार on 14 March, 2010 - 00:32

(या लेखात काही वैज्ञानीक संदर्भ घेतले आहेत, ते मी वाचलेल्या माहितीवर आधारीत आहेत, ते चुकलेले असल्यास कृपया निदर्शनास आणून द्यावेत. )
स्वप्ने - ड्रिम्स...
स्वप्ने ही आपल्याला "घडणाऱ्या, घडत असलेल्या किंवा घडून गेलेल्या" घटनांबद्दल काहितरी सूचवत असतात हे आजपर्यंत अनेकांनी अनुभवले आहे आणि मान्य केले आहे. स्वप्नातले जसेच्या तसे घडत नसले तरी ते प्रतिकात्मक सुद्धा असू शकते व त्यातून योग्य अर्थ लावता आला पाहिजे. स्वप्न आणि त्यांचे अर्थ यावर भारतात पूर्वीपासून संशोधन झाले आहे.
परदेशांतही सिग्मंड फ्रॉइड याने यावर "इंटर्प्रिटेशन ऑफ ड्रिम्स" असे पुस्तक सुद्धा लिहिले आहे. म्हणजे स्वप्ने आपल्याला एक प्रकारचा पूर्वाभास देत असतात. म्हणजे इंट्यूशनचाच हा एक प्रकार म्हटला पाहिजे.
तसेच-
पूर्वाभास - इंट्यूशन किंवा एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन (इएसपी)
आणि मनकवडेपणा - तसेच दूरवरच्या व्यक्तीच्या मनातले विचार ओळखणे (टेलिपॅथी)
बाधा/पुनर्जन्म - म्हणजे एखादा जीवंत व्यक्ती मृत व्यक्तीप्रमाणे बोलायला लागणे व त्याविषयी माहिती देणे.
मल्टिपल पर्सनॅलीटी डिसऑर्डर - एकाच व्यक्तीत आलटून पालटून अनेक व्यक्तीमत्वे राहात असणे.

.... या सगळया गोष्टींचे स्पष्टीकरण वैज्ञानिक दृष्ट्या एकाच पद्धतीने आपण देवू शकतो असे मला वाटते.

माणसांच्या मनात दिवसभर अनेक विचार चक्रे सुरू असतात. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की मानवाच्या विचारांच्या प्रकारानुसार व तीव्रतेनुसार काही विशिष्ट प्रकारची किरणे/लहरी डोक्याबाहेर कमी अधिक प्रमाणात पडत असतात. त्या अदृश्य प्रकाशकिरणांना औरा म्हणतात. कुणी एखादा बेत तडीस नेण्याचा विचार करत असेल, तर कुणी काही इतर विचार करत असेल. विचार जेवढे तीव्र तेवढे जास्त वेळ ते वातावरणात साठून राहातात व तितक्या दूर प्रवास करतात, असे आपण गृहित धरले तर ते विचार एखाद्या संवेदनक्षम माणसाच्या मेंदूत प्रवेश करून अशा प्रकारे त्याला काहितरी पूर्वाभासात्मक सूचना देवू शकतात. ते विचार स्विकारण्याकरता त्यावेळी मेंदू विशिष्ट स्थितीमध्ये ट्यून्ड असला पाहिजे. (जसे टेलीकम्यूनिकेशन मध्ये रेडियो लहरी प्रक्षेपीत केल्या जावून त्या विशिष्ट फ्रिक्वेन्सी- वारंवारिता असलेल्या रेडीयो स्टेशन वर ट्यून होवून ऐकायला मिळतात त्याचप्रमाणे. ) मग याद्वारे टेलिपथीचा ही उलगडा होतो, मनकवडेपणाचाही आणि स्वप्नांचाही अन बाधा/पुनर्जन्म या गोष्टींचाही!!!
म्हणजे, मृत व्यक्तीचे विचार एखाद्याचा मेंदूत शिरून त्याच्या मेमरीत आपोआप साठवले जावी शकतात.
(कुठेतरी मी असे वाचल्याचे आठवते की आपण जे बोलतो ते सुद्धा म्हणे वातावरणात सूक्ष्म रूपाने कायमचे कोरले जाते. म्हणजे नैसर्गिक रेकॉर्डींग. ते पुन्हा कसे ऐकायचे हे मात्र कुणी सांगू शकत नाही. भविष्यात विज्ञानाच्या आधारे यावर संशोधन होईलही! )
मग पुढे कदाचीत या सर्व गोष्टींवर आपल्याला त्यावर नियंत्रण मिळवणे सुद्धा शक्य होईल...म्हणजे असे की कोणत्या प्रकारच्या व्यक्तीचे कोणत्या प्रकारातले विचार नेमक्या कोणत्या माणसाकडे व कसे पोचवायचे वगैरे. मग ही "ह्युमन टेलीकम्युनीकेशन" नावाची एक क्रांतीच होईल असे वाटते.

आपल्याला काय वाटते?

गुलमोहर: 

टेलिपॅथी चा अनुभव खूप वेळेला घेतलाय. त्याचा अर्थ मी असा लावते, जसं की आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तर त्याचा ध्यास असतो, स्वयंसुचना असते,त्या विचारात एक प्रकारची positivity असते.
दोन व्यक्तिंना एकाच वेळेला एकमेकांची आठवण येणे, आज असं घडायला हवे असे वाटणे आणि तसेच घडने, इत्यादी.
स्वप्नांच्या बाबतीत मात्र आपण जसे विचार करतो, तशीच स्वप्ने पडतात. ते विचार आपल्याला पूर्ण ज्ञातच असतातच असे नाही, म्हणजे consciously केलेले असतातच असे नाही. आपली ज्या व्यक्तिशी कोणत्या न कोणत्या नात्यामधून ' नाळ जोडलेली" असते, त्यांच्या जीवघेण्या प्रसंगात मात्र आपल्याला सूचक स्वप्ने पडतात, ह्याचे कारणही हेच असावे की त्या व्यक्तीला आपली तीव्रतेने आठवण झाली असावी.
हे झाले अनुभव. पण ह्या सर्वांवर खूप विश्वास ठेऊन राहावे असे काही वाटत नाही.
ध्यास मात्र जरुर असावा!

विचार जेवढे तीव्र तेवढे जास्त वेळ ते वातावरणात साठून राहातात व तितक्या दूर प्रवास करतात, असे आपण गृहित धरले तर ते विचार एखाद्या संवेदनक्षम माणसाच्या मेंदूत प्रवेश करून अशा प्रकारे त्याला काहितरी पूर्वाभासात्मक सूचना देवू शकतात. ते विचार स्विकारण्याकरता त्यावेळी मेंदू विशिष्ट स्थितीमध्ये ट्यून्ड असला पाहिजे.>>>>>>>>>>>>>

माझे आजोबा वारले त्याच्या आदल्या रात्री मला वातावरण भकास वाटत होतं, तसंच काहीतरी चुकचुकल्या सारखं वाटत होतं.

माहिती बद्दल धन्यवाद..

हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालय असं मला नाही वाटत.. कारण एखादी गोष्ट सिद्ध होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचं सँपल घेऊन त्यानं दर वेळेस तसेच रिझल्टस दिले पाहिजेत. जे ह्या गोष्टीच्या बाबतीत शक्य नाही.
पण मला स्वत:ला स्वप्नांचा वैयक्तिक अनुभव आहे.
उदा. एके रात्री मला स्वप्न पडलं की माझ्या नात्यातले २ पुरुष आजारी/काहीतरी प्रॉब्लेम्स मधे आहेत - आणि मी त्यांच्यातल्या एकाला २०००० रु द्यावेत.

मी आईला फोन केला आणि वरचं स्वप्न पैशाच्या आकड्याचा उल्लेख न करता सांगितलं.

तीनं सांगितलं की माझा काका हॉस्पिटलाईझ्ड होता आणि आमच्या तशा लांबच्या नात्यातल्या एका व्यक्तीला २०००० रु ची गरज होती..
२०००० चा आकडा मॅच झालेला ऐकून मी इतकी दचकले!

आणखीन एक एक्स- रूममेट प्रेग्नंट आहे असं स्वप्न पडलं. त्या मुलीचा आणि माझा २-३ वर्षात काहीच संबंध नाहीये. मी तिला मेसेज टाकला की मला असं स्वप्न पडलं.. तिचा फोन नंबर विचारणारा स्क्रॅप आला.. ती खरच प्रेग्नंट होती..

अशीच आणखीही काही स्वप्न ... सगळीच सांगू शकत नाही - कारण ती खूप वैयक्तिक आहेत.. काही अतिशय वाईटही आहेत Sad
पण अशा लागोपाठच्या काही अनुभवांनंतर मी सकाळी उठल्यावर जी स्वप्न impact ठेवतात अशा स्वप्नांना सिरियसली घ्यायला शिकलेली आहे...(मला जवळपास सगळीच स्वप्न आठवतात- पण सगळी impact नाही ठेवत, काहीकाही तर इतकी भंकस असतात)

मला माझ्या बाबतीत असं वाटतं की ही स्वप्न मी स्वतः "तयारी"ची आहे म्हणून पडत नाहीत, accidently मी unknown frequency ला Tune होते. त्यात माझी भुमिका फक्त बघ्याची असते, आणि बघणंही माझ्या मर्जीवर नाही.

मस्त धागा...!

मला स्वप्नांचा अनुभव नाही. पण टेलीपथी....माझ्या खुप लांबच्या मैत्रीणीला कधीतरी ३-४ वर्षातुन फोन करावा तर ती लगेच म्हणते," बघ, आताच तुझी आठवण काढली होती आणी फोन करायचा विचार करत होते."

दुसरा अनुभव म्हणजे माझे आणि माझ्या वडीलांचे ट्युनिंग! आई आणि वडील इतकी वर्षे सोबत असुनही आई, माझ्या वडीलांना काय म्हणायचे आहे (किंवा एखाद्या वाक्यातुन काय अभिप्रेत आहे) हे ओळखु शकत नव्हती ...पण हे लगेच मला कळायचे....अगदी कधीतरी काही विचार सल्ला होत असतांना मी एखाद्यावर प्रतिक्रिया दिली की वडील लगेच म्हणायचे," बघ अगदी हेच विचार माझ्या डोक्यात आले किंवा मी हेच म्हणणार होतो" अर्थात याला आपण कदाचीत अनुवंशिकता किंवा जिन्स ट्रान्स्फर असे नाव देऊ!
मागच्या वर्षी वडील वारले त्याच्या आदल्या दिवशी डॉक्टरांनी त्यांना सांगितले की ," काही नाही, तुम्हाला आता पूर्ण बरे वाटतेय...उद्या यांना व्हिल चेअरवर बसवुन खाली हॉस्पिटलच्या पॅसेजमधे घेउन जायचं!" आम्ही एकदम खुष...कारण १२ दिवसांपासुन आयसीयु ते जनरल रुम मधेच फिरणारे आम्ही वडीलांना खाली फिरवुन आणायच म्हणजे...थोडासा चेंज!
पण तरी का कुणास ठाऊक, मी घरी येउन वडीलांचे सगळे कपडे(रोजच्या वापरातील/ बाहेर जायचे) सुटकेस मधे भरुन बॅगा वर ठेउन दिल्या...डोक्यात विचार की आपण सगळे आलटुन पालटुन हॉस्पिटलमधे जातो...घरी कोणी नाही तर एखादा उंदीर वडीलांच्या कपड्यांची वाट लावेल!
आणि दुस-याच दिवशी पहाटे वडील गेले....:( अजुनही मी विचार करते हे असं सुचलच कसं आपल्याला?

बाबांनाही इंट्युशनचा चांगला अनुभव! बाबा आजारी पडले की 'मला काही झाले नाही.... हे डॉक्टर लोक उगाच बिल वाढवतात' असा अविर्भाव असायचा त्यांचा!
४ मार्च २००९ ला पॅरॅलिसीसचा अ‍ॅटॅक आला...तेव्हा ३ दिवस हॉस्पिटलमधे राहुन बरे होउन परत आले. नंतर ८ दिवसातच भावांना म्हणायला लागले की "अरे, पैसे काढुन ठेवा रे...तुम्हाला लागतील' असे म्हणुन चेकवर सहीसुद्धा करुन ठेवली...म्हणाले ,"बघा मला आताच नीट लिहीता येत नाहीये...! " नंतर बारीकसा ताप होता म्हणुन पुन्हा अ‍ॅडमीट केले तेव्हाही मोठ्या दुखण्यांना अंगावर काढणारे आमचे बाबा "माझी आताच सेवा करुन घ्या... नंतर तुम्हाला संधी नाही" असे म्हणायला लागले.

..जायच्या २ महिने आधी आमच्या कॉलनीतील एक काकू वारल्या..बाबा त्यांच्या मर्तिकेला हजेरी लाउन आल्यानंतर म्हणाले," आपल्या पोरांना सांगायला पाहिजे....तिरडी कशी बांधायची शिकुन घ्या म्हणावे! तिथे त्या बाईची तिरडी बांधायला किती प्रॉब्लेम आला! " आम्ही हसण्यावारी नेले की बाबा, जग कुठे चाललय आणि तुम्ही मुलांना तिरडी बांधायला शिकायला सांगताय!

माफ करा.....मला माहितीये थोडं विषयांतर होतय...पण माहितीकरता सांगते..

असं म्हणतात की मृत्यूची जाणीव माणसाला सहा महिने आधीपासुन होते....! वयाच्या ७२ व्या वर्षीही... २० वर्षांपासुनचा मधुमेह शरीरात पोसुन बाबा ठणठणीत होते....ते जायच्या आधी ६ महिन्यापासुन मात्र त्यांचे दात विरळ होत गेले... पायाचे मांस ढिले पडले...पाय बारीक झाले! (नाहीतर रोज भरपुर चालण्याने त्यांचे पाय मजबुत होते) .
एखाद्याचा मृत्यू जवळ आलाय हे ओळखण्याची खूण म्हणजे 'त्याच्या कानाच्या पाळ्या ढिल्या पडतात.... (बाबांच्या बाबतीत हे २ महीने आधीपासुन झाले....कानाच्या पाळ्या अक्षरशः लुज म्हणजे काही जीवच नाही अशा...कलर सुद्धा फिका झाला- बाबांनी बँकेला लागतो म्हणुन फोटो काढलाय त्या काळात, त्यात सुद्धा तशाच आल्यात) , नाकाचा शेंडा तिरपा होतो' ....! हे जुन्या लोकांचे ठोकताळे मी अगदी अनुभवले बाबांच्या या प्रसंगावरुन!

याव्यतिरीक्त मानसिक बदल म्हणजे माणुस निर्वाणीचं बोलायला लागतो. अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो तसं यालाही असणारच...! पण शेवटी हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

हा मला झालेला आयुष्यातला एकमेव भास : एका स्पर्धेसाठी चार दिवस गडहिंग्लजला गेलेलो. आलो त्या दिवशी परतायला उशीर झालेला. रात्री साडेआकराला घरी पोहोचलो. गावात सगळी सामसूम होती. आलो ते डायरेक्ट अंथरूणावर गेलो. मधेच जाग आली बाहेर कसलातरी विचीत्र आवाज होत होता. मी खिडकीतून पाहिलं तर समोरच्या रस्त्यावर सरण रचलय, अग्नि दिलाय आणि त्यावर शेजारी राहणारे रघुनाथ नावाचे आजोबा बसलेत. रस्त्यावर असा प्रकार होणे शक्य नसल्याचे माझ्या लक्षात आले. आयुष्यात एवढा कधीच घाबरलो नव्हतो. पटकन मागे सरलो आणि सकाळ होईपर्यंत अंथरुणात तळमळत राहिलो. पहाटे पहाटे रडण्याचा पुसट आवाज आला. उठून बाहेर आलो तर शेजारच्या अंगणात सगळेजण जमा झालेले. आज्जीला विचारल्यावर कळालं की दोन दिवसांपुर्वीच ते हार्ट अटॅकने गेलेले. आज मातिचा कार्यक्रम होता. मी रात्री पाहिलेला प्रकार तिला सांगितला तर तिने महादेवाच्या देवळातला अंगारा आणुन मला लावला आणि काही नसतं ते म्हणुन सांगितलं.

डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांचे "अज्ञाताचे विज्ञान" हे पुस्तक वाचा, त्यामधे बर्‍याच गोष्टींचा खुलासा मिळेल.
या सर्व गोष्टी घडण्यामागे कारणीभुत आहेत विद्युतचुंबकीय लहरी.

एकेकांची स्वप्नं खरी ठरतात तर एकेकांची वक्तव्यं खरी ठरतात... असे का होते? ( खरे तर मी यावर एक धागा कढणारच होतो.. तितक्यात हा धागा वर आला. Happy ) बर्‍याचदा अशी लोकं अभद्रच वक्तव्यं करतात... तुला एक कोटीची लॉटरी लागेल असे हे बोलत नाहीत.. तुझे शेत जळेल, तुला अ‍ॅक्सिडेंट होईळ, तुझा पाय मोडला तर..? सगळी बोलणी अभद्रच अस्तात आणि नेमकी ती खरी होतात... यामागचे कारण काय असेल? तळतळाटाने शाप खरा होतो, हे मान्यही करता येईल.. पण या लोकांचं कुणी वाऐट केलेलं नस्तं, तरीही ते दुसर्‍याबाबत वाइट अनवधानाने बोलुन जातात आणि ते खरे होते...

असे बरेच लोक अवतीभवती असतात... यांची दुष्ट बोलणी खरी ठरु नयेत याला काही उपाय आहे का? की पूर्व सुचना मिळाली असे समजुन त्यांचे आभार मानुन गप्प्प बसायचं?

जागोमोहनप्यारे >> माझी आजी याला ' बत्तिशी असणे ' असे म्हणते . . .
तिचा १ अनुभव : आजी ससून मध्ये कामाला असताना जवळच २ खणांचे चाळवजा घर होते. शेजारच्या कुटुंबात त्या वेळेला ८० च्या घरात वय असणारर्‍या आजी रहात असत. त्या कधी जास्त बोलत नसत पण कधी तोंड उघडलेच तर 'गटार' . . एकदा आजोबांनी मुलीला (माझ्या आई ला ) फ्रॉक चे नविन कापड आणले . आजी ने ते शेजरी दाखवले .
शेजारच्या आजी : " काय फॅशन करतात हल्ली . . . हे असले कापड घेतात का आई-बाप पोरीला ? "
माझी आजी : "आहो आज पहिल्यांदा आणलय ह्यांनी . . नाहितर काय कौतूके .."
शेजारच्या आजी : " हो पण मग हे असं ?? डोळे काय फूटले होते काय ? .. "
माझी आई तेथेच होती .. ति भलत्या आवेशात म्हणाली .. " ओ ... माझ्या बाबांनी आणलाय .. शिवणारे मि ... "
शेजारच्या आजी : "हो काय्य ?? .. छाने .. घाला हो .. आणि घ्या मग स्व:ताचे हि डोळे फोडून " ....

नंतर ज्या दिवशी आई तो फ्रॉक घालून बाहेर गेली .. डोळ्यात काच घूसून मोठी इजा झाली .. थोडक्यात डोळे वाचले . . झाले असे कि - शाळेत ' फार बडबड करते ' म्हणून बाईंनी डस्टर फेकून मारले. नेम चूकला. आई खिडकी जवळच्या बाकावर बसली होती. .खिडकीची काच फूटली . मोठा तुकडा उडून डोळ्यात गेला.

नानबा +१
मी ही काही स्वप्न अतिशय सिरियसली घेते. माझा सिक्स्थ सेन्स बराच स्ट्राँग आहे असं मला वाटतं.
मी हॉस्टेल वर असताना एक मुलगी बरेच दिवस घरी जाते म्हणून गेली होती... आणि परत आलीच नव्हती. एक दिवस मला स्वप्न पडलं की तिने लग्न केलंय. त्याच दिवशी ती संध्याकाळी तिचं सामान घ्यायला आली होती. तेव्हा गळ्याभोवती वगैरे स्कार्फ (मुद्दाम घातला) होता. तिला मी म्हणलं अगं सुप्रिया तु लग्न केलंस असं स्वप्न पडलं मला, तेव्हा फक्त ती हसली, तिचं सामान घेऊन आम्ही रिक्षापर्यंत गेलो तेव्हा फक्त ती, मी आणि अजून एक मुलगी होतो, तेव्हा तिने स्कार्फ काढून दाखवला आणि सांगितलं की हो मी लग्न केलं. पळून जाऊन केलेलं फक्त, त्यामुळे हॉस्टेलला फक्त एकाच मुलिला माहीत होतं.

स्वप्नापेक्षा मला सिक्स्थ सेन्सवर जास्ती विश्वास आहे, जनरली मला वाटतात त्या गोष्टी उशिरा का होईना (उशिराच) पण जशाच्या तश्या होतात.

विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की मानवाच्या विचारांच्या प्रकारानुसार व तीव्रतेनुसार काही विशिष्ट प्रकारची किरणे/लहरी डोक्याबाहेर कमी अधिक प्रमाणात पडत असतात. त्या अदृश्य प्रकाशकिरणांना औरा म्हणतात. >>> कृपया एखाद्या मान्यताप्राप्त 'पीअर रिव्ह्यूड जर्नल'चा दाखला देणार का?
नसला तरी फरक पडत नाही, पण फक्त हे सगळे 'विज्ञानाने सिद्ध केले आहे' एवढे काढून टाका.
आपल्याला आलेला वेगळा अनुभव विज्ञानाच्या कसोटीवरही खरा ठरला पाहिजे हा अट्टाहास कशाला?
मला अनुभव आला तो माझ्यापुरता खराच आहे त्याला कसल्याही शास्त्रिय कसोटीची गरज नाही अशी धमक दाखवायला काय हरकत आहे?

आणि घ्या मग स्व:ताचे हि डोळे फोडून

बरोब्बर.. मी असेच लोक आणि असेच प्रसंग याबाबतच बोलत होतो... असली पिडा टळावी याला काही उपाय नाही का?

कृपया एखाद्या मान्यताप्राप्त 'पीअर रिव्ह्यूड जर्नल'चा दाखला देणार का?

ऑराबाबत इथे एक धागा होता.. कुठलीतरी पुण्यातील संस्था काँप्युटरने ऑरा काढून आरोग्याबाबत अंदाज देते.... जे लोक विचार, आचार, उच्चार याने सात्विक असतात त्यांचा ऑरा चांगला असतो.. मला वाटते असे लोक अशा पिडेला कमी बळी पडत असतील किंवा त्यांची पिडा कमी होत असेल.

जामोप्या.. नितिनचंद्र यांचा तो धागा! त्यावर मीच सांगितले होते की पुण्याच्या एम आय टी संस्थेत अशी सोय आहे. Happy

माझ्या मित्राच्या वडिलानी स्वस्प्न मिमांसा असे पुस्तक लिहिले आहे.. त्यात अशुभ स्वप्नांवर उपाय आहेत.
ते सातारचे आहेत श्री गुरसाळे.

सध्या "My third husband will b a dog " हे मस्त पुस्तक वाचतोय. त्यात लेखिका लिझा असाच एक खरा खुरा आणि ऐतिहासिक गमतीशीर अनुभव सांगतेय.

तीची आई मेरी मायमीच्या घरात झोपलेली असते.तीला पहाटे कसला तरी धक्का झाल्याचं जाणवतं. ती उठून तीच्या लेकीला विचारते कि काय गं काहीतरी हादरल्याचं तुला जाणवलं काय? लिझाही तीला म्हणते कि काही नाही गं आई तु झोप तुला उगाच भास होतोय. तरीही ती म्हातारी गप्प बसत नाही.. ती तीच्या लेकाला विचारते.. काय रे .. तुला काही हादरल्याच जाणवलं का? तेव्हा तो ही तीला वेड्यात काढतो आणि झोपायला सांगतो. ती बाहेर जाते आणि शेजार्‍यांना जागं करून विचारते काय हो तुम्हाला हादरे जाणवले काय? तेव्हा ते हि तीला वय झाल्याचं कारण सांगून झोपा आता असे सांगतात. पण म्हातारी या वयात सुद्धा जिद्दीला पेटते आणि रेडीओला फोन लावून त्या आरजे ला विचारते कि आत्ता इथे भुकंप झाल्याचं मला जाणवलं तुम्हाला जाणवलं काय? तेव्हा तो ही नाही म्हणून सांगतो आणि फोन कट करतो. पण अर्ध्या तासानं त्याचा फोन येतो .. आज्जी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे इथे मायामी जवळ ३० मैलावर ६.० रिश्टर स्केलचा भुकंप झालाय आणि तो आख्ख्या मायामी मधे फक्त तुम्हालाच जाणवलाय. तेवढ्यात सगळ्या टिव्ही न्युज चॅनलवाले तीच्याघराकडे वळतात आणि आश्चर्य म्हणजे त्या भुकंपाला मेरी अर्थक्वेक असं नावंही देतात.

आत्ताही तुम्ही गुगलून पाहिलं ना तर 'मेरी स्कॉटेलाईन अर्थक्वेक' अश्या नावाचा मायामीतला अदभूत भुकंप सापडेल. Proud

http://www.donsausa.com/2006/09/southwest-florida-gets-hit-by-60.html

टेलीपथी चा अनुभव मलाही खुप आहे. प्रसंग छोटे असतात, पण अनुभव येतो.

परवाच गाडीने घरी येत होते. डोक्यात अनेक गाणी होती. मी जोगवा चित्रपटातलं " लल्लाटी भंडार " हे गाणं गुणगुणत होते. माझी गाडी ठाण्याच्या ब्रिज वरुन जाताना ज्ञान साधना कॉलेजात गॅदरींग चालु होत. आणि मी जी ओळ गुणगुणत होते तीच तिकडे एक परफॉर्मर गात होता.... आहे ना गम्मत.

मी आणि माझा नवरा ह्या फ्रीक्वेन्सी बद्दल खुपच अनुभव घेतो. कित्येकदा मला त्याला तिव्र ते ने फोन करवास वाटतो, त्याच वेळी त्याचा फोन येतो. असे छोटे छोटे अनुभव आम्ही नेहेमीच घेतो.

माझे वडिल वारले तेंव्हा पहाटे पासुन काहीतरी अभद्र होणार असेच वाटत होते. ते परत येणार नाहीत असे फीलींग येत होते. तसेच झाले.

आगाऊला " 'विज्ञानाने सिद्ध केले आहे' एवढे काढून टाका " बद्दल अनुमोदन
विज्ञान काही सिद्ध करत नसतं.

> मानवाच्या विचारांच्या प्रकारानुसार व तीव्रतेनुसार काही विशिष्ट प्रकारची किरणे/लहरी डोक्याबाहेर कमी अधिक प्रमाणात पडत असतात. त्या अदृश्य प्रकाशकिरणांना औरा म्हणतात. कुणी एखादा बेत तडीस नेण्याचा विचार करत असेल, तर कुणी काही इतर विचार करत असेल. विचार जेवढे तीव्र तेवढे जास्त वेळ ते वातावरणात साठून राहातात व तितक्या दूर प्रवास करतात, असे आपण गृहित धरले तर ते विचार एखाद्या संवेदनक्षम माणसाच्या मेंदूत प्रवेश करून अशा प्रकारे त्याला काहितरी पूर्वाभासात्मक सूचना देवू शकतात. ते विचार स्विकारण्याकरता त्यावेळी मेंदू विशिष्ट स्थितीमध्ये ट्यून्ड असला पाहिजे. (जसे टेलीकम्यूनिकेशन मध्ये रेडियो लहरी प्रक्षेपीत केल्या जावून त्या विशिष्ट फ्रिक्वेन्सी- वारंवारिता असलेल्या रेडीयो स्टेशन वर ट्यून होवून ऐकायला मिळतात त्याचप्रमाणे. )

उपमा दिल्याने गोष्टी सिद्ध होतात असा अनेकांचा (अंध्)विश्वास असतो. त्या विद्युविद्युत्चुंबकीय लहरी एक विशिष्ट सर्कीट प्राप्त करत असतं. त्यातील घटकांची किम्मत ( value, not cost) थोडी जरी बदलली तरी कोणत्या कंपनांकाची लहर प्राप्त होणार हे बदलते - म्हणुनच डायल फिरवल्यावर वेगेवेगेळी स्टेशन्स लागतात. Fourier analysis गुगलून पहा - अनेक साध्या वाटणार्‍या सिग्नल्स मधे किती कॉम्प्लेक्स लहरी असतात ते. मेंदु अशा लहरी मिळवोन त्याचा अर्थ लावू लागला तर त्याचे लोणचे होईल.

तसेही सोनाराच्या बाफचे सोने झाले. All telepaths unite. You know where to meet.

aschig,

मेंदूची आकलन करून घेण्याची शक्ती विलक्षण असते. आता हेच पहा ना, तुम्हाला जे काही दृश्य दिसते, त्याची प्रतिमा डोळ्याच्या पडद्यावर उलट उमटलेली असते. याला कारण म्हणजे नेत्रभिंग बहिर्गोल असते. मात्र मेंदू ती ग्रहण करतांना सुलट करून घेतो.

त्यामुळे मेंदूला बारीकातील बारीक कंप्रतालहर ग्रहण करून आकलण्यास अडचण येत नसावी. अर्थात यालाही मर्यादा असणारच. आजच्या (२०१२०२१५) लंडनच्या एका वृत्तपत्रात बातमी आलीये की मेंदूतून निघणार्‍या लहरींच्या सहाय्याने संगणकावर विचार ओळखता येतील.

त्यामुळे विज्ञानाला काही सिद्ध करता नाही आलं तरी फारसं बिघडत नाही. तंत्रज्ञान विकसित करायला दर वेळेस विज्ञानाची मदत हवीच असा आग्रह नको, बरोबर?

आ.न.,
-गा.पै.

Pages