
एक्स्पायरी डेट
( ही कादंबरी यापूर्वी पाच भागांमधे मायबोलीवर प्रकाशित झालेली आहे. मात्र ज्यांना सलग वाचायला आवडते त्यांच्यासाठी कादंबरीच्या स्वरूपात पुनःप्रकाशित करीत आहे. )
भाग पहिला, भाग दुसरा, भाग तिसरा, भाग चौथा, भाग पाचवा
मनोगत
आज ही छोटीशी कादंबरी आपल्यासमोर ठेवताना मला आनंद होत आहे. लहानपणी आजीकडून ऐकलेल्या गूढरम्य कथांमधली एक गोष्ट त्यावेळी खूपच अद्भुत वगैरे वाटली तरी पुढे कालौघात मी साफ विसरून गेले. एखाद दुसरी ओळ लक्षात राहिली असेल. त्या गोष्टीमधली मध्यवर्ती कल्पनाही अंधुकच आठवतेय. त्यावरून एक नवंच कथानक मनात उभं राहीलं. त्या मूळ कथेचा या कथेशी संबंध नाही. मात्र, या कथेची एक प्रकारे तीच प्रेरणा असल्याने त्याबद्दल मी माझ्या गोष्टीवेल्हाळ आजीचे आभारच मानायला हवेत ! तिच्या त्या ऋणामधून उतराई होण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. 
प्रकरण एक
खरं तर २०११ सरताना खूप जणांचे आभार मानायचेत. राहूनच गेलेत ते या वेळेस. आभार मानायचे ते मनातच. त्याचा सोहळा नाही करायचा. सोहळा केला कि त्याला बेगडी स्वरूप येतं. छान छान भाषणं ठोकली जातात. प्रत्येक वेळी शब्द खरेच असतील असं नाही. शब्द जसे देखणे असू शकतात तसेच फसवे असू शकतात, मोहवणारे असू शकतात तसेच बनावटीही असू शकतात. खरं तर भावना व्यक्त करायला शब्दच हवेत असं नाही.
प्रेमभराने दाबलेला हात. डोळ्यांतलं पाणी, खाली झुकणारे नेत्र, लज्जेच्या पदराखालचं अवगुंठित हसू, मंद विलगणारे ओठ, विस्फारित किंवा अर्धोन्मिलित नेत्र हे देखील व्यक्त होणंच नाही का ? अव्यक्त संभाषणाचे प्रकार !
हाताच्या वळणा-या मुठी पहायला आवडत नसल्या तरी त्यातून बरंच काही व्यक्त होत असतं. भावनांना लिपी नसते, शब्द नसतात. त्यांची अव्यक्त भाषा असते. म्हणूनच वर्ष सरतांना त्याचा लेखाजोखा मांडताना व्यक्त पेक्षा अव्यक्त पातळीवरच तो जास्त असतो. सिंहावलोकन करण्यातकी मी मोठी नाही. सरत्या वर्षाने काय दिलं, काय चुका झाल्या याची उजळणीही मला करायची नसते. तसं तर रोजच आजच्या दिवसाने काय दिलं हा विचार करता येतोच ना ? पण अशाने जगणं कंटाळवाणं होऊन जाईल अगदी !
आणि पद्धतही पडून गेलेली असते. कुठल्या तरी मुहूर्तावर काळाच्या एककात बसणा-या विशिष्ट कालखंडाचं अवलोकन करायची. माझ्यासाठी असं मागे वळून पाहताना जमेची बाजूच पाहणंच आनंददायी असतं. या जमेच्या बाजूला असतात काही भेटलेली माणसं. काही ना काही देऊन जाणारी.. शेवटी नफा तोटा म्हणजे तरी काय असतं ? माणसांवरच तर अवलंबून असतं सगळं. माणसं न कमावता नफा कमावणं अशक्य नसलं तरी अवघड नक्कीच आहे, आणि कुणाला हवंय अशा पद्धतीने नफ्यात राहणं ?
तर हे आभारप्रदर्शन, अव्यक्त पातळीवरचं. आईबाबांनंतर पहिल्यांदा विचार येतो तो परक्या ठिकाणी सांभाळून घेणा-या शहा दांपत्याचा. माझ्यासारख्या मराठी मुलीला पुण्याहून बोलावून घेऊन स्वतःच्या मुलीसारखं सांभाळणा-या , कडक शिस्त शिकवणा-या आणि मुख्य म्हणजे मराठी लोकांना ठाऊक नसलेला व्यवहार शिकवणा-या शहा दांपत्याचा, शहा काका आणि काकूंचा. इथं त्यांचाच हक्क पहिला नाही का ?
ही झाली ठळक आठवण .. पण रोजच्या जीवनात साध्या साध्या वाटणा-या अनेक गोष्टी असतात.
घरी येणारी मेड सर्वंट, तिचा देखील हक्क असतो आभारावर ... किती जणांना पटेल हे ?
रोजच्या रूटीनमधून रेस्तरॉंमधे जेवायला गेल्यावर हसून स्वागत करणारा, अदबीने विचारपूस करणारा वेटर .. तसं त्याने ऑडर घेतली आणि समोर ताट आणून आपटलं तरी चालण्यासारखं असतंच. पण ती संध्याकाळ माझ्यासाठी स्पेशल बनवण्यात त्याचा केव्हढा मोठा हातभार लागलेला असतो. मला माझी जाणीव करून देणारा, माझा अहं सुखावणारा तो वेटर त्याचे आभार का नाही मानावेत ?
भारतातून केपटाऊनला हवाईप्रवासातून मला ज्याने सुरक्षितपणे पोहोचवलं त्या पायलटचे देखील मला आभार नको का मानायला ? विमान पडलं तर अशी वाटणारी भीती भीतीच राहिली.. आणि मला जगण्याची संधी मिळाली.. ही माझ्यासाठी अनमोल भेट नाही का ?
रोज मला वेळेत कामावर नेऊन सोडणारा आणि घ्यायला येणारा ड्रायव्हर, माझी अर्जंट पत्र वेळेत आणणारा कुरीयर वाला.. आपण सगळ्यांचंच काही ना काही देणं लागत असतो. जो तो त्या ऋणातून उतराई व्हायचा आपल्यापरीने प्रयत्न करीतच असतो. कुणाकुणाला मात्र वाटतं आपण पैसे मोजतो याचे. ज्याचा त्याचा विचार वेगळा. माझेही विचार असेच तर होते कधी काळी. शहाकाकांनी ते जाणीवपूर्वक बदलले. संस्कार केले माझ्यावर आभार मानायचे, आणि आता ते अंगवळणी पडून गेलं. छे, मलाच पटलं ते..
खरं तर या लोकांशिवाय माझ्या आयुष्याला अर्थच नाही. मला माझं आयुष्य हवं तसं जगता यावं म्हणून हे लोक त्यांच्य़ा आयुष्याचा वेळ माझी कामं करण्यात घालवतात. पैसे मिळतात हा भाग वेगळा, पण जेव्हां कामं मन लावून होत असतील तेव्हाच त्याचं कौतुक झालं तर चीज झाल्याची भावना निर्माण होते. त्या भावनेचं मोल पैशात, मूल्यवान भेटीने नाही करता येत.
लोक मला विचारतात, तुझी कामं करायला बघ हे सगळे कसे पळत येतात. चमचे आहेत तुझे.. आम्ही जास्त पैसे देतो म्हटलं तरी टाळाटाळ करतात. काय जादू करतेस तू ?
मी नेहमीप्रमाणे स्मित करून विषय टाळते. मोबदला देतोय ना मग प्रत्येक पैशाचं मोल करून काम करायला लावणा-या माणसांना यंत्र आणि माणूस यातला फरक कसा समजावून सांगावा ? कदाचित म्हणूनच शहा ग्रुपमधला हा माझा विभाग अपेक्षेप्रमाणेच छान चाललाय. शहाअंकल कधीकधी मजेत म्हणतातच.. काय़ गं खिशातून बोनस बिनस तर नाही ना देत ? आणि मी म्हणते.. तुमच्या शिकवणीची जादू आहे सगळी. यावर नेहमीप्रमाणे हशा होतो. चांगला व्यवसाय करायचा तर व्यक्तिमत्वात काही चांगले बदल घडवून आणावे लागतात.
आत्ता खरं तर मला त्याचे आभार मानायचे होते. अगदी मनापासून....
तो खरंच स्पेशल होता. मन दोन वर्ष मागे गेलं.. २००९ साल सरतानाची गोष्ट ! त्याचा तो इंटरव्ह्यु मला आताही आठवत होता.
मला राहुल द्रवीड आवडतो असं त्याने हसून सांगितलं तेव्हाच मला तो आवडला होता. त्याला कामावर घ्यायच पक्क केलं होतं. तो वेगळा होता खराच. इंटरव्ह्यू दरम्यान त्याने राहुल द्रवीड आवडतो असं सांगितल्यावर माझी उत्सुकता वाढली. त्याचं नेमकं काय आवडतं तुला.. या प्रश्नावर त्याच्याच सारख्या डोळ्याला घड्या पाडत तो उत्तरला.. स्वत:च्या मर्यादा ओळखून लक्षाचा पाठलाग करणं..
म्हटलं तर तयारीचं उत्तर आणि म्हटलं तर उस्फूर्त ! पण या उत्तराने त्याने माझ्यासहीत इतर दोघांनाही जिंकून घेतलं होतं. माझ्याकडे सेहवाग होतेच इयर एण्डला हाणामारी करणारे. पण वर्षभर गाफील राहणारे.. आणि शेवटच्या स्लॊग ओव्हर्समधे हाणामारी करून लक्ष गाठणारे. आजवर लक्ष गाठता आलं, फटके व्यवस्थित बसले म्हणून ठीक.. पण शेवटच्या त्या दिवसात येणारं प्रचंड टेण्शन टाळता येण्यासारखं होतं हे समजत होतं. म्हणूनच या राहुल द्रवीडची खूप गरज होती. कधी कधी नुकसान न होऊ देणं हे देखील काहीतरी कमावण्यासारखंच असतं. स्त्रीसुलभ स्वभावानुसार एक पाऊल पुढे टाकतांना मागचं पाऊल सुरक्षित असल्याची खात्री झाल्याशिवाय पुढे जाणं मला आवडतही नव्हतं.
मुलाखत झाल्याबरोबर त्याला ताबडतोब अपॉइण्ट्मेंट लेटर द्यायच्या सूचना जेव्हां मी एचआरडीला दिल्या तेव्हां मायकेल फ्लेचरच्या चेह-यावर आश्चर्य होतं. पोलीस व्हेरिफिकेशन न करताच कंपनीने असं याआधी कुणालाच कामावर ठेवलं नव्हतं आणि बेकायदेशीरही होतं ते. राहुल भारतीय वंशाचा म्हटल्यावर कंपनीचे मालक जरी भारतीय वंशाचे असले तरीही त्याचं व्हेरिफिकेशन होणं गरजेचं होतं. पण पोलीसात चांगल्या ओळखी असल्याने ते नंतर पाहून घेऊ हा विचार मी केला होता. यावर खांदे उडवत आणि भारतीयांच्या कायदे धाब्यावर बसवण्याच्या वृत्तीवर एक झणझणीत कमेण्ट पास करून तो निघून गेला. मायकेल म्हणजे स्पष्टवक्ता होता.
राहुल अगदी नावाप्रमाणेच राहुल निघाला. २०१० या वर्षभराचं लक्ष त्याने स्वत:च छोट्या छोट्या कालखंडात विभागून टाकलं आणि त्याप्रमाणे दोन दोन दिवसांचा रिपोर्ट तो मला आणून द्यायचा. त्याने स्वत:च केलेले ग्राफ्स, त्याच्या भाषेत त्याचा रिक्वायर्ड रन रेट हे पाहून कधी कधी हसायलाही यायचं आणि त्याच वेळी कौतुकही वाटायचं. विनाकारण ऒफीस अवर्सनंतर त्याला थांबून राहीलेलं जसं मी पाहीलं नव्हतं तसंच ऒफीसमधे अळंटळं करतानाही कधीच पाहीलं नव्हतं. ऑफीसमधे असताना त्याच्या चेह-यावर एक प्रकारचं समाधान, या जागेबद्दलची आत्मीयता त्याच्या चेह-यावर स्पष्ट दिसून यायची. जसं काही हे ऑफीस त्याचं स्वतःचंच आहे असं वाटायचं आणि त्याच भावनेतून झोकून देऊन त्याचं काम करणं मला आवडायचं. मॅनेजमेंटशी इतके चांगले संबंध राहूनही इतर सर्वांशी त्याचे चांगले संबंध कसे काय राहत असतील याचं मला आश्चर्य वाटायचं. याबाबत त्याला मी विचारणार होतेच !
तसे सगळ्याच स्टाफशी मी चांगलेच संबंध ठेवून होते. प्रोफेशनल संबंधाचं भान ठेवून किंचित पलिकड झुकलेले. इथं भारतातल्यासारखं वातावरण नव्हतं. आम्ही एकमेकांना नावानेच हाक मारत असू. फक्त काही ज्येष्ठ लोकांचा उल्लेख मात्र आदरयुक्तच होत होता. त्या बाबतीत आम्ही इथल्या लोकांपेक्षा किंचित वेगळे होतो. कधी कधी गेस्ट म्हणून आलेल्या गो-या लोकांच्या ते लक्षात आलं कि त्यांच्या भिवया वर जाऊन ओठ दुमडून घेत ते वॉव करायचे. अर्थात त्यांच्या कौतुकाने हुरळून जायचं नसतं हे शहाकाकांच्या तालमीत तयार होत असलेल्या मला चांगलंच ठाऊक होतं.
राहुलमधे निश्चितच काही तरी वेगळेपणा होता. एकदा त्याच्या संपर्कात आल्यावर त्याच्याबद्दलच विचार करायला तो भाग पाडत होता. कदाचित, यामुळेच असेल पण त्याच्याबद्दल मनात एक कसलीतरी भावना तयार होत होत. ती कसली हे माझं मलाच उमजत नव्हतं. अधून मधून त्याचे रेकॉर्डस तपासायचा मोह व्हायचा तेव्हा काही न काही कारणं सांगून मायकेलला त्याची फाईल पाठवायला सांगायचे तेव्हा तो सरळ तू त्याच्या प्रेमात पडलीस का असं विचारायचा.
त्याच्या आधीच्या एम्प्लॉयरनेही त्याची पाठ थोपटल्याचं त्याचा बायोडाटा सांगत होता. परिमल उद्योग हे नाव वाचल्यासारखं, ऐकल्यासारखं झालं होतं. खरं तर मुलाखतीदरम्यान त्याला विचारायचं होतंच पण इतरांचे प्रश्न सुरू झाले आणि ते राहून गेलं.
कामावर जॊईन झाल्यापासून त्याने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली होती. स्वतःबद्दल तो फारसा बोलत नसे पण त्याला बाकिचे इतर सगळे घरी चहाला बोलवत, पार्टीला बोलवत असत. तो मनापासून सर्वांना मदतही करत असे. ऒफीसच्या वेळेनंतर स्टाफची जी काही गेट टूगेदर होत त्यात राहुल मस्ट होत चालला होता.
तशी त्याची अनेकांची मैत्री होती. पण नंदिनीशी त्याची वाढलेली जवळीक मलाही जाणवू लागली होती. हल्ली नंदिनी त्याच्या कामात रस घेताना दिसून यायची. मी तिला अनेकदा तिला तिच्या कामातच लक्ष देण्याबद्दल सुचवलं होतं.
हल्ली दोघेही बाहेर एकत्रच असतात अशी कुणकुण मला लागली होती. कुणाची कुणाशी मैत्री असावी याच्याशी मला काहीच देणंघेणं नव्हतं म्हणा .. पण नंदिनीमुळे राहुलचं त्याच्या कामात दुर्लक्ष होतंय कि काय अशी भीती मला वाटत होती. नंदिनी तशी काही वाईट नव्हती, पण स्वतःकडे इतरांचं लक्ष वेधून घ्यायला तिला आवडायचं हे माझ्या लक्षात आलेलं होतं. मला ते अजिबात आवडत नव्हतं पण तिला तसं मी कधी बोलून दाखवलं नव्हतं.
दिसायलाही ती बरी होती. अर्थात राहुलशी तिची मैत्रीच असण्याची शक्यता होती. ती कशी दिसते हा विचार मी का करावा ? तशीही माझ्यापुढे ती काहीच नव्हती. मला माझ्या रूपाचा सार्थ अभिमान असला तरी कुणाचं लक्ष वेधून घ्यावं, लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असावं असं मला कधीही वाटलं नव्हतं.
पण नंदिनीशी राहुलची वाढत चाललेली जवळीक मला अस्वस्थ का करत होती ? तिच्यापासून त्याने लांब राहण्यातच त्याचं हित आहे असं मला सारखं वाटत होतं. त्याला लवकरच ते कळून येईल असंही मला वाटत होतं. कि हे माझं विशफुल थिंकिंग म्हणावं ?
काहीतरीच ! विशफुल थिंकिंग आणि मी ! काय गरज ?
त्यांच ते दोघं पाहून घेतील. मला काय गरज कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याची ? कदाचित नंदिनीसाठी असावं. इथं तिच्याशिवाय मला कोण होतं ? जवळच्या गोष्टी शेअर करण्यासाठी तीच तर एक मैत्रीण होती. कामाच्या तासानंतर आम्ही दोघी खूप चांगल्या मैत्रिणी होतो. त्याच अधिकारातून मी तिला राहुलबद्दल विचारूही शकत होते. पण ती स्वतः काही सांगत नाही तोपर्यंत आपण काहीच बोलायचं नाही असं मी ठरवलं होतं.
म्हणतात ना, आपल्याकडे इतरांचं जास्त लक्ष असतं. आपल्याला जेव्हां असं वाटत असतं कि लोकांच्या काहीच लक्षात आलेलं नाही तेव्हांच त्यांच्या लक्षात सगळं आलेलं असतं. पण दोन कारणांसाठी लोक गप्प बसतात. पहिलं म्हणजे ज्याचं त्याला कळत असल्याने उगीचच स्वतःहून कुणाला सल्ले देऊन अपमान करून घेण्याची कुणाची इच्छा नसते आणि दुसरं म्हणजे लोकांना मनोरंजनासाठी, चघळण्यासाठी काहीतरी कारण हवंच असतं. ते कारणच नाहीसं व्हावं असं त्यांना वाटत नसतं. नंदिनीच्या बाबतीत लोकांचं तिच्याकडे लक्ष असणारच होतं.
त्यातच तिचं हल्ली कामावर लक्ष नव्हतं. असंख्य चुका होत होत्या. माझी चिडचिड वाढली होती त्यामुळेच. ही जर अशाच चुका करत राहिली तर कंपनीला टाळं लावावं लागेल एक दिवस. मी मायकेलला बोलावून घेऊन त्याच्याशी हा प्रॉब्लेम डिस्कस करायचं ठरवलं. जोपर्यंत ते दोघं एकत्र राहतील तोपर्यंत कामात चुका होऊन कंपनीला नुकसान होईल असं मला वाटत होतं त्यासाठी नंदिनीला प्रिटोरिया इथल्या ब्रांचमधे शिफ्ट करावं असा माझा विचार होता. पण माझा अंदाज आणि विचार दोन्हीही मायकेलने खोडून काढले. नंदिनीच्या कामात अशा काही चुका असल्याचंच त्याला मान्य नव्हतं. मी उगीचच तिच्या कामात चुका काढतेय असं त्याचं म्हणणं पडलं. नंदिनी म्हणजे पुरूषमंडळींचा वीक पॉईंट ! ती त्यांच्याशी जरा जास्तच अघळपघळ वागते असं मला वाटत होतं आणि या बाबतीत पुरूष सगळे सारखेच ! पण हे वाक्य मायकेलच्या बाबतीत लागू पडत नव्हतं. तो फटकळ असला तरी खरं तेच बोलायचा. मग समोर नंदिनी असो कि मी ! मला ते मान्यच होतं मात्र आता या क्षणी त्याचे ते बोल मला जिव्हारी लागले.
जसं ते एकत्र दिसत होते तसंच त्यांच्यात बिनसल्याचंही दिसून येऊ लागलं. दोघांच्यात काहीतरी झालं होतं बहुतेक. दोघं हल्ली बोलत देखील नव्हते. अर्थात त्याच्या वागण्या बोलण्यात अजिबात फरक पडला नव्हता मात्र नंदिनीच्या वागण्यात खूपच फरक पडला होता. तिला मला काहीतरी सांगायचं असावं. तिचे डोळे सतत तिला काहीतरी सांगायचंच, खूप महत्वाचं सांगायचंच हे बोलत असायचे. ते कशामुळे विभक्त झाले यापेक्षा ते विभक्त झाले याचं मला समाधान वाटलं होतं. आता तिचं काम समाधानकारक होईल आणि मला माझी जुनी मैत्रीण परत मिळेल असं माझं मन मला सांगत होतं.
झालंही तसंच. नंदिनीला आता मी आणि इतर सगळे जण दिसू लागले होते. माझ्याबरोबरही ती पूर्वीसारखंच व्यवस्थित वागत होती. तिला राहुलबद्दल मला काही सांगायचंय हे मला जाणवत होतं. कदाचित त्यासाठी ती योग्य संधीची वाट बघत असावी. मी तिला विचारायचा अवकाश कि ती सगळं सांगेल याबद्दल मला शंका नव्हती. पण मला का कोण जाणे ती राहुलबद्दल निगेटिव्ह काहीतरी सांगण्याची शक्यता वाटत होती.
झालंही तसंच...
ती त्याच्यात गुरफटली गेली होती याची स्वच्छ कबुली तिने देऊन टाकली. पण ब्रेक अपचं जे कारण तिने दिलं त्याने माझा संयमच सुटला. स्वतःची सफाई देताना एखाद्यावर काय आरोप करावेत याला काही ताळतंत्र ?
कदाचित राहुलने तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला काही वाईट सवयी, व्यसने होती असं काहीतरी ती सांगेल हा माझा अंदाज होता. पण तसं काहीच नव्हतं.
नाहीतर कुणी असे आरोप करतं का ? कोण विश्वास ठेवेल अशा गोष्टींवर ? तिने जे काही सांगितलं त्याची मी कधीच कल्पना केली नव्हती. आणि तरीही तिचं महत्वाचं काही सांगायचं राहीलंय असं म्हणणं होतं. मी मात्र रागाने लालबुंद झाले होते. माझा संताप आवरून स्वतःवर मी कशीबशी नियंत्रण ठेवू शकले होते. ऑफीसच्या एका बेस्ट एम्लॉयीबद्दल असं काही ऐकून घ्यायची माझी तयारी नव्हती. या वेळी मात्र मायकेल देखील माझ्याशी सहमत झाला होता.
कदाचित हिनेच काही केलं असावं आणि त्याने साफ नकार दिला असावा.. आणि आता त्याच्याविरूद्ध कुभांड रचत असावी या माझ्या म्हणण्यावर मात्र त्याने फक्त खांदे उडवले आणि हसून निघून गेला.
मी देखील हा विषय डोक्यातून काढून टाकायचं ठरवलं.
पण अचानकच राहुलशी कामाव्यतिरिक्त संबंध ठेवण्याचं इतरांनीही बंद केलं होतं. त्याच्याबद्दल काहीतरी कुजबुज होत होती. कुणी सांगत नव्हतं. कदाचित याच्याबद्दल बोलून माझ्या मनातून उतरायची तयारी नसावी लोकांची. खोदून खोदून विचारूनही काहीच कळलं नव्हतं. नम्रताकडून कळालं त्याप्रमाणे लोकांना त्याच्यापासून कसली तरी भीती वाटत होती हल्ली. त्याला टाळलं जातंय हे लक्षात येत होतं. यामागे नंदिनी असावी का ?
त्याच्या वागण्यात मात्र काही फरक पडलाय असं दिसलं नाही. माझ्या दृष्टीने तो अत्यंत महत्वाचा होता म्हणूनच त्याच्या बाबतीत काय झालंय हे त्याला न विचारता कळालेलं चांगलं होतं. मनात आलं मी याच्य़ाबद्दल काय जाणते ?
त्याने दिलेला पत्ता अस्तित्वात असणार यात शंका नव्हती. पण तो या जगात एकटा कसा ? त्याला कुणीच कसं नाही ? याबद्दल काही सुद्धा विचारलं नव्हतं. छे ! काय गरज ? तो एक बेस्ट एम्प्लॉयी होता आणि कामामध्ये त्याची कसलीच तक्रार नव्हती इतकंच जाणून घेणं पुरेसं नाही का ?
लोकांसाठी तो गूढ होत चालला होता. त्याचवेळी त्य़ाच्याबद्दलचा माझ्या मनातला सॊफ्ट कॉर्नर रूंदावत चालला होता. कदाचित त्याच्या प्रगतीचा इतरांना हेवाही वाटत असावा.. तसंच असणार. जाऊ दे ना, मध्यंतरी असलेली माझी अस्वस्थता नाहीशी झाली होती.
*********
२०१० या वर्षाचा शेवटचा दिवस खूपच आरामात गेला. पहिल्यांदाच !
गेल्या कित्येक वर्षात इयर एण्डला टार्गेट कम्प्लीशन साठी आम्ही धावाधाव करत असू. हे पहिलंच असं वर्ष होतं ज्या वेळी टार्गेट कंप्लीट होऊन फक्त रिपोर्ट्स बघायचं काम चाललं होतं. संध्याकाळी थर्टी फर्स्ट साजरं करता येणार होतं या आनंदात प्रत्येक जण होता. त्या दिवशी मात्र सर्वांनीच राहुलला याचं श्रेय मनापासून दिलं.
------------------------------------------------------------------------------------
प्रकरण दोन
स्टाफबरोबर मालक म्हणून निखळ मैत्रीचे संबंध असावेत कि नाही ? या प्रश्नाची उत्तरं व्यक्तीसापेक्ष येतील. मैत्रीचे संबंध असणं तसं चांगलंच. पण काही जणांना ते धोक्याचं वाटू शकतं तर भारतातल्या जुन्या वळणाच्या मॅनेजमेंट गुरूंना ते पटणार नाही. मात्र आता सगळीकडेच एक प्रकारचं मुक्त वारं वाहत असताना नव्या प्रवाहांची झटकन दखल घेणा-या भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्यांमधेही कल्चरल चेंज येत चालला आहे.
शहा ग्रुप त्याला अपवाद नव्हताच. उलट, नव्या ट्रेंडसची सुरूवात करण्याचं श्रेय शहा ग्रुपकडं जातं. इथं मालकाला देखील एकेरी हाक मारायची पद्धत असली तरी एक प्रकारचं अलिखित अंतर पाळलं जात होतच. स्टाफबरोबर मैत्री ठेवायची पण ती अशी कि त्यात थोडा अभिनय असला पाहीजे. आपण काही कुणाला फसवत नाही. पण चांगलं घडवण्यासाठी थोडासा अभिनय गरजेचा असतो. ख-या मैत्रीत देखील थोडा अलिप्तपणा हवाच कि. स्वतःचा फायदा करून घेतानाच सर्वांची काळजी असल्याचा अभिनय बेमालूम वठवता येणं, कुठं काय बोलायचं हे भान बाळगणं हे तत्त्वं जोपासलं तरच यशस्वी होता येतं पण हे तत्त्व लक्षात येणार नाही याची काळजी घेता येणं हेच मैत्री टिकवण्याचं रहस्य होय. आणि अभिनय करणं म्हणजे फसवणं नव्हे. जमेल तशी मदत करायचीच कि.. मैत्री देखील ठेवायचीच पण स्वत्व जपून !
मात्र काही लोकांशी खरंच मैत्री निर्माण होणं अपरिहार्य असतं. नंदिनीशी माझी मैत्री समवयीन असल्याने झाली होती. सुरूवातीला नंदिनीबद्दल चमचेगिरी वगैरे बोललं गेलं तरी माझी वागणूक सर्वांशीच चांगली असल्याने कुणाला पुढे त्यात काही खटकलं नाही. कंपनीच्या कामासाठी जेव्हां आम्ही जोहान्सबर्गला जात असू तेव्हां दोघींनीच केलेली धमाल कधीच विसरता येण्यासारखी नव्हती. ख-या अर्थाने आमच्या दोघींत मैत्र निर्माण झालं होतं .
आता मात्र नकळत नंदिनीची जागा राहुल घेत होता. मात्र राहुलशी होत असलेली मैत्री ब-याच जणांना पसंत नव्हती. असं का बर व्हावं ? राहुल आणि मी.. एक तरूण आणि एक तरुणी. मैत्रीचं नातं असू शकतंच ना ?
नेमके इथे या नात्याला बरेचसे पदर होते. मी निव्वळ एक तरुणी, एक अविवाहीत तरुणी नव्हते तर मालकीण होते त्यांची आणि मालकिणीबरोबर एका एम्प्लॉयीची घनिष्ट मैत्री हा बातमीचा, चर्चेचा विषय असू शकतो आणि म्हणूनच मनात उलटसुलट विचारांचं काहूर माजलं होतं. अर्थात लोकांच्या बोलण्याचा किती विचार करावा याचा निर्णय आपला आपणच करायचा असतो.
३१ डिसेंबरला त्याने जेव्हा वर्षाचा रिपोर्ट दिला तेव्हा त्यात माझं खरचच लक्ष नव्हतं. त्याने केलंय म्हटल्यावर ते ठीकच असणार होतं. मी त्याच्य़ाशी इतर गप्पा मारण्यावर भर दिला. अनेक वेळा चाळलेल्या त्याच्या रेकॉर्डमधून दरम्यान तो एकटाच असल्याचं माहीत होतंच पण इतर डिटेल्स माहीत नव्हते. मुलाखतीच्या वेळी विचारावेसे वाटले नसले तरी आता मात्र उत्सुकता वाटू लागली होती.
मी त्याला थर्टी फर्स्टच्या पार्टीचं आमंत्रण दिलं. थोडंसं धाडसच म्हटलं तर हे. भारतीय उच्चायुक्तांच्या बंगल्यात द. आफ्रिकेतल्या भारतियांसाठी ही पार्टी होती. प्रिटोरियाहून मिसेस शहांची मोठी बहीण येणार होती तिचं येणं कॆन्सल झालेलं मला माहीत होतंच. तिच्य़ा पासवर याला अॅडजस्ट करण्यासाठी एक फोन करणं आवश्यक होतं. पण मनात धाकधुक होतीच.
हा येईल का ?
पण तो चटकन हो म्हणाला आणि मला बरं वाटलं.. हे असं का व्हावं ? नाही म्हणायचा त्याला हक्क होताच कि ! मात्र मी हे विचार लागलीच झटकून टाकले.
संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान तो माझ्याकडे आला तेव्हां माझंच आवरून झालेलं नव्हतं. मी शहांकाकांची आणि त्याची ओळख करून दिली. शहाकाकांपर्यंत पोहोचलेला स्टाफपैकी तो काही पहिलाच नव्हता. स्टाफच्या लोकांशी संबंध कसे ठेवावेत हे शहाकाकांकडून शिकायला मिळायचं. येणा-याला आत्मियता दाखवत, तोंडभरून स्वागत करण्याची त्यांची पद्धत त्यांच्याबद्दलचं दडपण कमी करायला मदत करायची. आपल्याला खुद्द मि. शहा इतकं महत्व देतात या जाणिवेने देखील त्यांना बरं वाटत असे. आणि समोरच्याला जिंकून घेत मधूनच कामाशी संबंधित एखादा परिक्षा घेणारा प्रश्न विचारून आणि डोळ्यात रोखून पाहत उत्तराची अपेक्षा ठेवण्याच्या त्यांच्या स्टाईलने हे आपले मालक आहेत ही जाणीवही राहत असे. एका मर्यादेत लोकांना खूष ठेवतानाच कुणाला डोक्यावर बसवायचं आणि कुणाला नाही हे त्यांच्यापेक्षा जास्त कुणाला कळणार म्हणा !
धंदा म्हटलं कि माणसं हाताळायचं कौशल्य अंगी बाणवावं लागतं !
पण अर्थातच मी त्य़ांना वेळोवेळी राहुलबद्दल अपडेट केलेलं असल्याने मनापासून तोंडभरून त्याचं स्वागत केलं. या ३१ डिसेंबरचे रिपोर्टस शहाकाकांना राहुलमधे रस घेण्यासाठी पुरेसे होते.
त्याला शहाकाकांकडे बसायला सांगून मी तयार झाले तेव्हा तासभर उलटून गेला होता. सहा वाजता आम्ही सगळे पार्टीला निघालो तेव्हां मी सुबोधची, त्यांच्या मुलाची, ओपन फेरारी कार घेतली. याचा अर्थ मी काका काकूंबरोबर जाणार नव्हते ! काकूंच्या डोळ्यात उमटलेली आश्चर्याची झलक माझ्या नजरेतून सुटली नाही. नंतर त्यांच्याशी बोलता येणार होतं. उलट काकूंचं कौतुकच वाटलं मला. त्यांना मनातच हसत मी कार बाहेर काढली आणि राहुलला शेजारी बसायची खूण केली तेव्हां काकू खिडकीतून मलाच बघताहेत हे पाहण्यासाठी मला वळून पहायची काहीच गरज नव्हती.
आत्ता तरी सेंट्रल केपटाऊन पासून उच्चायुक्तांच्या घराकडे जाताना फेरारीचा ड्राईव्ह मला एंजॉय करायचा होता. ओपन फेरारी भन्नाट पळत होती. टाऊनमधून जवळच्या रस्त्याने जाणं शक्य असताना मी कार उगाचच गोल्डन एकर मॉलवरून व्हिक्टोरिया वॉटरफ्रंटला घेतली. तिथं दहा पंधरा मिनिटं रेंगाळून झाल्यावर समुद्रालगतच्या रस्त्याने केपटाऊन स्टेडियमच्या दिशेने गाडी घेतली. दोनच दिवसांपूर्वी स्टेडियमच्या बाहेर भरणा-या फ्ली मार्केटमधून एक लाकडाची मूर्ती मी विकत घेतली होती. या अशा वस्तू घेण्यासाठी प्ली मार्केटमधल्या त्या काळ्या बाईकडे मी नेहमी यायचे आणि ती तिच्याकडच्या विशेष वस्तू मला उत्साहाने दाखवायची. काही काही वस्तू तर खास माझ्यासाठी असत.
उजवीकडे समुदाचं दर्शन होत होतं. मावळतीच्या तांबुस छटांनी आसमंत व्यापला होता. केप टाऊन हे जगातल्या विंडी प्लेसेस पैकी एक. काही वेळा वारं इतकं भन्नाट सुटायचं कि चटकन कशाचा तरी आधार घेऊन उभं रहावं लागायचं. विशेषतं समुद्रालगतच्या भागात. आत्ता मात्र खोडसाळ वा-याने माझे केस उडत होते. तासभर खपून सेट केलेल्या हेअरस्टाईलचं पोहोचेपर्यंत काय होणार होतं कुणास ठाऊक ! पण का कोण जाणे या कशाचीच मला आत्ता फिकीर नव्हती.
रस्त्याने सजवलेल्या ओपन ट्रकवर वाद्यं वाजवत आणि गाणी म्हणत तरूण तरूणींचा एक ग्रुप चालला होता. माईक स्पीकर्स मुळे त्यांचा आवाज लांबपर्यंत जात होता. न्यू इयरची गाणी म्हणत दिसेल त्याला पाहून ते चित्कारतही होते आणि शुभेच्छा देत होते. मला कार थांबवायची खूण करून त्यांच्यापैकी एकाने फूल आणून दिलं. मी थँक्स म्हणेपर्यंत तो गेलाही.
हा प्रवास संपूच नये असं वाटत होतं. दोघांपैकी कुणीही बोलत नव्हतं. आमच्या दोघांत शांतता नांदत होती. मी त्याच्याकडे हसून पाहीलं. मूक संभाषण !!
तो ही हसला आणि मावळतीच्या सूर्याकडे एकटक बघु लागला. मला रागच आला क्षणभर .. पण त्यानेच विचारलं ..
" सूर्योदयापेक्षा सूर्यास्त जास्त सुंदर असतो नाही ? "
पश्चिमेला रंगांची उधळण झाली होती. काळपट गुलाबी, चाफ्यासारखा धम्मक पिवळा आणि अस्ताकडे लालबुंद बिंब समुद्रात डुंबत असतानाचं दृश्य ! वर्षाच्या शेवटच्या सूर्यास्ताचे फोटो घेत मी उत्तरादाखल हो म्हणून टाकलं. गप्पांना सुरूवात तर झाली होती. त्याच्या आवडीनिवडी, छंद, वेळ घालवण्याची साधनं यावर मी त्याला बोलतं केलं. पहिल्यांदाच ऑफीसव्यतिरिक्त इतर विषयांवर आम्ही बोलत होतो. खरं तर मला बरंच काही बोलायचं होतं त्याच्याशी. पण इतक्यातच उच्चायुक्तांचं घर आलं आणि हा प्रवास संपला.
इथं इतरही देशांच्या वकिलातीतल्या अधिका-यांची घरं असल्याने सिक्युरिटी होती. हिरव्यागार वनराईने परिसर सजलेला होता आणि आतमधे वीस पंचवीस एकरभर जागेत पसरलेले प्रशस्त बंगले..खूपच देखणा भाग होता हा.
श्री हरविंदर सिह, भारतीय उच्चायुक्त अशी नेमप्लेट असलेल्या गेटमधून सुरक्षाविषयक सोपस्कार पार पाडून आम्ही आत शिरलो तेव्हां पार्टीला सुरूवात होत होती.
अंधार पडायला सुरूवात झालीच होती. पांढ-या शुभ्र दुमजली ब्रिटीश बंगलीला छान रोषणाई केलेली होती. बंगलीच्या बाजूला उभारलेल्या कनातीतून मागच्या हिरवळीवर प्रवेश करता येत होता. विस्तीर्ण अशा जागेत कुंपणापर्यंत हिरवळ होती आणि हिरवळ संपते तिथे उंच झाडं होती त्यापलिकडे जॊगिंग ट्रॆक. हिरवळीच्या एका कोप-यात शुभ्र रंगाचा भव्य शामियाना उभारला होता. त्याच्या रोषणाईसाठी केलेला समया आणि मेणबत्त्यांचा वापर अतिशय कलात्मक वाटत होता. मेणबत्ती लवंडली तर पेट घेऊ नये ही काळजी घेण्यात आलेली होती. हिरवळीवर स्नॆक्स घेऊन गौरवर्णिय ब्रिटीश मुली लाल गणवेशात फिरत होत्या. आपल्या सेवेत गोरे राबताहेत ही जाणीव भारतीय मनाला कुठंतरी सुखावून जाणारी, अन्यायाचं परिमार्जन करणारी वाटते. माझ्याच कल्पनेचं मला हसू आलं.
शोभा गुंर्टू यांच्या ठुमरीचे बोल मंद आवाजात हिरवळीवर दरवळत होते. संपूर्ण देह दागिन्यांनी झाकलेल्या आणि झकपक पोषाख केलेल्या भारतीय वंशाच्या बायकांमधे मीच काय ती एकटी साधी होते. गळ्यात फक्त एक हि-याचं पेडंट आणि क्वचितच नेसली जाणारी काळी साडी ! इतर सर्व ठरवून आल्यासारखे शुभ्रवस्त्रधारी दिसत होते. ड्रेसकोड वगैरे अशा काही सूचना होत्या का ? एक शंका मनात येऊन गेली. कारण माझ्य़ासारखे ऒड वन आऊट जवळ जवळ नव्हतेच. तसं असेल तर उगीचच ओशाळल्यासारखं होणार होतं. पण तसं काहीच नव्हतं हे आपलं चौकशीअंती समजलं.
राहुल एंजॉय करतोय असं वाटत नव्हतं. तो काहीच खात नाही याचं आश्चर्य नाही वाटलं. बुजला असण्याची शक्यता होती. पण किमान ड्रिंक्स, सॊफ्ट ड्रिंक्स तरी.. ? काहीच कसं नाही !
तो कुठल्याच पार्टीत कधीच काही खातपीत नाही अशी कुणीतरी आगाऊपणे पुरवलेली माहिती मला आता अचानक आठवली. अरे.. म्हणजे याला इथं आणून चूक तर नाही केली ?
तसंही मला खरंच त्या पार्टीत इंटरेस्ट होता का ?
कि मी त्याला बोलवण्यासाठी एक निमित्त म्हणून या पार्टीचा उपयोग केला होता. छे ! एकटेपणामुळं विचारदेखील असंबद्ध होतात. एकटेपणा ? माझ्या मनात आलं. आजपर्यंत कधी असा विचार नव्हता केला.
माझे विचार असंबद्ध होते का खरंच ?
तासभर दिसेल त्याला भेटून तोंड भरून हसायचा आणि विचारपूस करायचा प्रकार चालला. मग पंजाबी मंडळींनी माईकचा ताबा घेतला आणि वातावरण पंजाबी होऊन गेलं. दलेर मेहंदीच्या सीडीजची फरमाईश झाली आणि स्टेजवर सामूहिक नृत्याचा कार्यक्रम सुरू झाला. माईकवरून आवाहन करून नृत्यासाठी बोलावलं जात होतं. गुजराथी मंड्ळींनी या प्रकाराकडे साफ दुर्लक्ष करून तिथेच बिझनेसच्या गप्पा सुरू केल्या. मी शहाकाकांकडून आलेली असल्याने मला त्यांच्या सर्कलचा भाग असणे गरजेचे होते. पलिकडे महाराष्ट्रीयन मंडळी बसली होती. मराठी लोक इतक्या मोठ्या संख्येने इथं असल्याचं पहिल्यांदाच कळत होतं. मी काही फॆमिलीजच्या स्वत:हून ओळखी करून घेतल्या.
या दरम्यान राहुल एकटा एकटा फिरत होता. मी ओळखीच्या लोकांमधून स्वतःची सुटका करून घेऊन त्याच्याजवळ गेले आणि आम्ही हिरवळीवर आलो.
"कशी वाटली पार्टी राहुल? "
"हम्म. पार्टीसारखी पार्टी "
" का रे ? आवडत नाही का हे वातावरण?"
" आवडीनिवडीचा प्रश्नच नाही यात "
" हम्म... काय रे, तू मनाविरूद्ध तर नाही ना आलास ? "
" छे ! तसं काहीच नाही. मी कधीच मनाविरूद्ध वागत नाही. रादर तसा प्रसंगच येत नाही. काय मनासारखं आणि काय मनाविरूद्ध.. याला काही अर्थ आहे का ? "
" म्हणजे ? "
" जे घडत असतं ते घडणारच असतं , नाही का ? "
" हम्म. खरंय "
ऒफीसच्या बाहेर त्याला अशी पहिल्यांदाच भेटत असल्याने कदाचित त्याच्यामधे अवघडलेपण असावं असं मला वाटलं. त्याला जितका खुलवायचा प्रयत्न करत होते तितका तो तुटक उत्तरं देत होता. दु:ख, आनंद अशा कुठल्याही भावनांचा त्याला स्पर्श होतोय असं वाटतच नव्हतं. हा काही नेमून दिलेलं काम करणारा रोबो तर नाही ना ?
मनातल्या या विचारांचं मला पुन्हा एकदा हसू आलं. ते रोखतानच त्याने माझ्या डोळ्यात रोखून पाहत विचारलं,
"काय झालं ?"
"कुठे काय ?"
" तू हसलीस ना .."
" अच्छा..ते होय ! असंच आपलं "
"हम्म.. कामाव्यतिरिक्त मी काहीच बोलत नाही. हाच विचार करत असशील ना ?"
त्याच्या प्रश्नाने नाही म्हटलं तरी आश्चर्य वाटलंच. याला मनातलं कळतं कि काय ?
"........................................ "
" तुझ्या मनात काय चाललंय हे मला कळतंय ! "
आता मात्र मी दचकलेच. हा योगायोग असणे शक्यच नाही. मनात संशयाची पाल चुकचुकली. मन इशारे देत असतं नाही कित्येकदा ?
मी काहीच बोलले नाही.
" ? "
" मनातले विचार कसे कळू शकतात कुणाला ?"
" त्यात काय, काहीच अशक्यही नाही ! "
आता पहिल्यांदाच त्याच्या चेह-यावर हसू होतं.
फेस रीडिंग ! कदाचित माझ्या चेह-यावरचे भाव इतके बोलके असावेत कि त्याला ते स्पष्ट वाचता आले असले पाहीजेत. या कलेत काही लोक मास्टर असतात. फक्त त्यांच्याबाबतीत इतकंच असतं कि त्यांच्या मनात काय चाललंय हे ते दुस-याला कळू देत नाहीत.
हा उगाच गूढ वगैरे बनायला बघत होता का ?
" मी कुणाला दाखवण्यासाठी काही करत नाही. "
अरे देवा ! याला खरंच ऐकू येतं कि काय ? मी काय विचाराने याच्याबरोबर आले आणि हे काय घडत होतं.. संभाषण कुठल्या दिशेने चाललं होतं. काहीतरी वेग़ळं घडत होतं आणि मन त्याबद्दल वेगाने सूचना देत होतं.
आपल्या मनातलं कुणाला कळू शकतं ? विचार ऐकू येऊ शकतात ?
कर्णपिशाच्च..!!
ऐकलं होतं बरेचदा. पण मन तिकडे ओढ घेत असतानाही कधी विश्वास ठेवला नाही. आईचा प्रचंड विश्वास आणि बाबा संपूर्ण नास्तिक अशा गोंधळात दोन्ही संस्कार मनावर झाले होते. त्यामुळंच बुद्धीला जे पटत नसे ते मनाला मात्र शंभर टक्के पटायचं.
" बरं मग सांग बरं शहांकाकांच्या मनात काय चाललंय ते ? "
" ते नाराज आहेत तुझ्यावर. मला इथं आणलंस म्हणून..."
माझ्या चेह-यावरचे रंग उडालेले मला आरशाशिवाय साफ दिसत होते. याला याबाबतीत आणखी काही विचारायला नको म्हणून मी विषय बदलत राहीले.
लॉनवरून त्याला सिंगसाहेबांच्या बंगल्यात आणलं.
"तुला माहीतै ? आजच मिस्टर सिंगांच्या बाळाचा पहिला वाढदिवस देखील आहे. "
"अच्छा !"
" चल आपण तिकडे जाऊयात "
विषय बदलत मी म्हणाले.
आम्ही दोघेही बाळाला शुभेच्छा देणा-यांच्या रांगेत येऊन थांबलो . पन्नासेक वर्षांपूर्वीचं बांधकाम असलेला तो बंगला दगडी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना होता. रोमन स्थापत्यशास्त्राचा उपयोग जागोजागी केलेला आढळत होता. अशा वास्तूत आत प्रवेश करताना व्हरांड्यापासूनच सिंगसाहेबांच्या कलासक्त मनाचा प्रत्यय येत होता. व्हरांड्याच्या उंच भिंतींना इटालियन पेंटींग्ज आणि विविध प्रकारच्या डेकोरेटेव्ह लँम्प्सने शोभा आणली होती. इथून हॉलचा बराचसा भाग दिसत होता. हॉलची प्रकाशयोजना आणि वॉल पेंटींग अगदी मनमोहक होतं.
एका पाळण्यात बाळाला ठेवलं होतं. अगदी मोजक्या लोकांनाच बाळाजवळ जाऊ देण्यात येत होतं. इतर सर्व निमंत्रित मिस्टर आणि मिसेस सिंगांना हस्तांदोलन करून शुभेच्छा देत होते. परदेशातील उच्चायुक्त म्हणजे काही साधी असामी नव्हे ! मी ही हस्तांदोलन करून सटकण्याच्या विचारात असतानाच सिंगसाहेबांनी चक्क माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मिसेस सिंगांशी ओळख करून दिली. एकदाच अन्नपूर्णामधे झालेली भेट त्यांच्या चांगलीच लक्षात राहिली होती. कदाचित शहाकाकांचा करिष्मा असावा..
मिसेस सिंग मला आस्थेनं बाळाकडे घेऊन गेल्या..
खूपच गोड होतं बाळ. पंजाब्यांची बाळं असतात तसंच गुटगुटीत आणि वर्णाने लालबुंद होतं. मी राहुलकडे वळून म्हटलं..
" कसलं क्युट आहे ना बाळ ? "
" छान आहे "
" अलेले काय ले शोन्या ... " म्हणत मी त्याला उचलून घेतलं.
राहुलच्या हाती द्यायचा प्रयत्न केला त्यावर ब-याचशा मुलांसारखंच त्याने बाळाला घ्यायचं टाळलं. पण माझ्याजवळ येऊन त्याने बाळाच्या गालाला हात लावला. आम्ही त्याचे कोडकौतुक करत असतानाचा बाळाने टॅहॅ केलं तसं कावरीबावरी होऊन मी आजूबाजूला पाहीलं. तशी त्याची आया झटकन त्याला घ्यायला आली.
"काळजी नका करू मॅडम. डायपर लावलाय त्याला "
मी त्यावर प्रसन्न हसले. त्याला पाळण्यात घातल्यावर पुन्हा एकदा त्याला खेळवून राहुलकडे वळले. तो बाळाच्या चेह-याकडे पाहत होता. चेहरा आक्रसलेला होता. त्याला काहीतरी होत होतं बहुतेक. पण माझ्या ते लक्षात न येऊन मी आपल्याच नादात असल्यासारखी बोलत राहीले
" लकी ना आजच्या दिवशी त्याचा वाढदिवस आहे ते ? "
" हम्म... त्यात आनंदून जाण्यासारखं काय आहे ? " चेहरा वेडावाकडा करत तो उत्तरला. बोलताना त्याला खूप कष्ट होत असावेत. त्याची नजर मात्र बाळाच्या चेह-याकडे एकटक रोखलेली होती. अशी नजर मी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती.
" म्हणजे ?" मी त्याचा अंदाज घेत विचारलं.
" म्हणजे काय म्हणजे.."
" वाढदिवस हे आनंदाचं कारण असू शकत नाही का ?"
" हम्म .. मात्र हे कारण दरवर्षी असलं पाहीजे. "
" म्हणजे ?" मी पुन्हा गोंधळून जाऊन विचारलं.
" पुढचा वाढदिवस हे बाळ पाहणार नाही "
" अरे काय बोलतोहेस तू... ! शुद्धीवर आहेस का ? "
मी जवळजवळ किंचाळतच होते.. त्याचा परिणाम इतकाच झाला कि आजूबाजूच्य़ा लोकांचं लक्ष आमच्याकडे वेधलं गेलं...!
" मी पूर्ण शुद्धीत आहे आणि खरं तेच सांगतोय. मिस्टर सिंगांचं बाळ फारतर आणखी दोन दिवस जगेल. त्याची एक्स्पायरी डेट दोन दिवसांवर आलेली आहे..... "
मी मटकन खालीच बसले.
त्याचं शेवटचं वाक्य ब-याच जणांनी ऐकलं होतं आणि त्याचा अर्थ हळूहळू त्याम्च्या ध्यानात येऊन तिथं आता भीषण शांतता पसरली होती. वातावरणात झपाट्याने बदल होत चालला होता. मिसेस सिंग झटकन बाळाला घेऊन दिसेनाशा झाल्या. चारही बाजूंना शांतता गिळंकृत करत होती. काहीच क्षण ...पण अगदी मेल्याहून मेल्यासारखं वाटायला लागलं होतं. हळू हळू दबक्या आवाजात कुजबूज सुरू झाली. जणू काही सगळ्या नजरा मलाच खायला उठल्या होत्या. राहुल हा माझा गेस्ट होता त्यामुळं त्याच्य़ा वर्तनाची जबाबदारी माझी होती. शहाकाका खाली मान घालून बसलेले पाहीले आणि माझा धीरच खचला. काकूंकडे पाहण्याची हिंमतच झाली नाही.
माझा मूड ऒफ झाला होता. पार्टीत थांबण्याला कसलाच अर्थ नव्हता. ही चर्चा आज ना उद्या सिंगसाहेबांच्या कानावर जाणार होती आणि मग शहाकाका... विचारच नको वाटत होते सगळे.
घरी जावं म्हटलं तर राहुलला सोडण्याची जबाबदारीही माझीच होती. एका क्षणात दुनिया किती उलटीपालटी झाली होती. मघाचा तो उत्साह... संपूर्ण मावळलेला होता. आता त्याचा सहवासही नको होता मला.
पण त्याला सोडून जाणंही शक्य नव्हतं. काहीही झालं तरी इतक्या लांब त्याला मीच घेऊन आले होते. रात्रीच्या या वेळी त्याला या भागातून ट्रान्स्पोर्ट तरी मिळेल का ? त्याला खूण करावी म्हणून आजूबाजूला पाहीलं तर तो कुठेच नव्हता. शामियान्यात पाहीलं, हिरवळीवर सर्वत्र फिरले, झाडांच्या मागेही जाऊन पाहीलं. पण तो सापडला नाही.
शेवटी बाहेर आले. रस्त्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्वत्र पाहीलं. मोबाईलही लागत नव्हता. शेवटी वैतागून कार स्टार्ट केली आणि घराच्या दिशेने निघाले.. गेला उडत !
थर्टी फर्स्टच्या मूडचा अगदी विचका झाला होता.....
क्रमशः
------------------------------------------------------------------------------------
इथं
याआधीचा भाग इथं वाचा.
प्रकरण तीन
२०११
नवं वर्ष सुरू होतानाच उठायला उशीर झाला. डोकं प्रचंड जड वाटत होतं. काहीच करावंसं वाटेना म्हणून सरळ नेटवर बसले. माझ्या आवडतं संकेतस्थळ उघडलं तर तिथंही शुकशुकाटच. बहुतेक कालचा हॅंगओव्हर असेल किंवा पार्ट्या, आऊटिंग असणार. अगदी निवांतपणे आण्हिकं उरकताना दोन तास गेले. ब्रेकफास्टसाठी फ्रीज उघडला तर काहीच नव्हतं.
आज कूकला सुट्टी ! विसरलेच होते. काल पार्टीमुळं त्याला सूचना द्यायच्या राहील्या. आता काही बनवण्यापेक्षा बाहेरच नाश्ता करावा असा विचार केला, मेहतांकडे समोसा आणि चहा घ्यावा हा प्लान केला. नंतर तिथंच भटकण्याचं ठरवलं.
कालचे विचार झटकण्याचा हा सर्वोत्तम मार्ग होता.
गाडी पार्क करून मी खाली आले. गोल्डन एकर म्हणजे जमिनीच्या वर आणि खाली पसरलेलं प्रशस्त शॉपिंग प्लेस ! २८ मजली स्कायस्क्रॅपर आणि जमिनीच्या खाली दोन मोठे मॉल्स आणि अनेक दुकानं, पोस्ट ऑफीस, पब्लिक युटीलिटीज आणि खवय्यांसाठी सोयी यामुळं इथं वर्दळ असायचीच. वॉटर फ्रंट आणि गोल्डन एकर या दोन ठिकाणी वेळ कसा जातो कळतच नाही. रस्ता ओलांडून गेलं कि अंडरग्राऊंड रेल्वे स्टेशन होतं. हा परिसर देखील भटकायला छानच होता.
बेसमेंटला आले तेव्हा चौकातल्या एका मोक्याच्या कॉर्नरला इंडियन स्नॅक्सचा एक छोटासा स्टॉल होता. हेच मेहता अंकलचं दुकान. केपमधे ज्या काही मोजक्या ठिकाणी समोसे मिळायचे त्यातलं लोकप्रिय झालेलं दुकान म्हणजे मेहता स्नॅक्स. तासाभरातच समोसे संपत असल्याने दुकान उघडायच्या वेळीच ददींची गर्दी तिथं असायची. स्थानिकांमधेही समोसे लोकप्रिय झालेले असल्याने भारतीयांनाच कधी कधी समोसे मिळायचे नाहीत. सुरूवातीला स्थानिकांचा खूप राग यायचा. वर मॅकडोनाल्ड असताना इथं आमच्या हक्काच्या प्युअर व्हेज खाद्यपदार्थांवर हे अतिक्रमण करतात असं वाटायचं. मॅकडोनाल्ड मधले पदार्थ तुम्हाला चालतात ना ? असं त्यांना विचारावंसं वाटे. पिझ्झा व्हेज असला तरी तो कसा बनवतात हे चांगलं माहीत असल्याने मी कधीच मॅकडोनाल्ड मधे गेले नव्हते. सुरूवाती सुरूवातीला एकटं राहण्याची सवय होण्यासाठी कपनीने सेंट जॉर्जजवळ रूम घेऊन दिली होती तेव्हां उपासमार व्हायची. एकतर मला स्वतः काहीच बनवता येत नव्हतं ( अजूनतरी कुठं येतं खूपसं? ) . पण नंतर मेहता अंकलचं हे दुकान सापडलं आणि त्यांच्याशी चांगलीच मैत्री झाली ती आजपर्यंत टिकून आहे.
समोसे संपल्यावर मेहता अंकल हाक मारून बोलावून घेत आणि आत बसायला सांगून गुपचूप मला समोसे देत. हा खास लोकांसाठी राखून ठेवलेला स्टॉक असे. प्रत्येकाच्या धंद्याच्या काही न काही क्लुप्त्या असतात. त्यातली ही एक. आज नवं वर्ष असल्याने असेल शॉपिंगसाठी चांगलीच गर्दी उसळलेली होती. मेहता अंकलकडे चहा समोसे झाल्याने बरं वाटू लागलं होतं. फ्रेश वाटावं म्हणून मी इकडं तिकडं फिरत बसले.
सकाळपासून तीनदा नंदिनीला बोलावून घ्यायचा मोह झाला होता. पण तिला त्यावेळी सुनावलं असल्यानं आता तिला कसं बोलवावं असा प्रश्न पडला होता. तिने सांगितलेलं बरंचसं खरं निघालं होतं.
पुन्हा नकोत ते विचार ! कदाचित याचसाठी नंदिनीला मी टाळलं होतं.
आज कंपनीतले किंवा ओळखीचे भारतीय कुणीच भेटू नयेत यासाठी मनोमन मी देवाकडे प्रार्थना करीत होते. कुणी भेटलं कि कालच्या प्रसंगाची उजळणी अपरिहार्य होती. नव्या वर्षाच्या सुरूवातीला तोंड लपवायचा प्रसंग माझ्यावर आला होता आणि यासाठी राहुलला मी कधीच माफ करू शकणार नव्हते.
पण असं एकटं तरी किती फिरायचं ना ?
एरव्हीचं ठीक आहे. काही वाटत नाही. पण आज नव्या वर्षाचा पहिला दिवस. त्यातच काल घडलेला प्रसंग. एकट्याने फिरणं हे काही घडलेल्या घटनांवर औषध नव्हतं. उलट मन नको त्याच गोष्टींकडे धाव घेतं याचा प्रत्यय येत होता.
इतक्यात कुणी तरी मला हाक मारतंय असं वाटलं. वळून पाहीलं तर सार्जंट जॉन ! या कृष्णवर्णीय जॉनची आणि माझी चांगली ओळख होती. बरेचदा त्याची आम्हाला मदत होत असे. आता डिटेक्टीव्ह होऊ घातला होता तो.
"हाय ! हॅपी न्यू इयर !"
"हाय जॉन.. हॅपी न्यू इयर !"
" वर गाडी पाहीली तुझी आणि तुला शोधत आलो "
" अरे वा ! मग उद्या ऑफीसमधेच का नाही येत ? तुझं गिफ्ट तयार आहे बरं का जॉन "
" ओह.. मी काय त्यासाठी तुझ्याकडे आलो असं वाटलं का ? न्यू इयर विश करायचं होतं. एनीवे , आता तू आग्रह करतेच आहेस तर उद्या चक्कर टाकतो. बरंच लांब आहे तुझं ऑफीस "
"हम्म. मोक्याची जागा आहे ना "
"हम्म ! सी यू . भेटूयात उद्या. आज खूप कामं आहेत. नम्रताला सांगून ठेव उद्या मी येतोय "
त्याला बाय बाय करून मी वर आले. वॉकिंग स्ट्रीट वरून पलिकडच्या गल्लीत शिरले. इथं देखील रेल्वे स्टेशनलगतच्या गल्लीत चांगली दुकानं होती. आधीचा रस्ता बंद करून त्यावर ब्रीकवर्क केलेलं असल्याने वाहनांचा त्रास नव्हता. मी एका छोट्याशा डायमंड शॉपमधे शिरले. टाईमपाससाठी अशी दुकानं बरी असतात.
कधी कधी कठीण प्रसंगातून आपोआपच सुटका होत असते. मी हि-यांचे दागिने बघत असतानाच नंदिनी तिथं आली आणि मागून हात लावून शेजारी येऊन उभी राहिली.
मी वळून तिच्याकडे बघताच दोघीही आनंदाने चित्कारलो. जगाच्या पाठीवर कुठंही दोन मैत्रिणी भेटल्या कि त्यांची भेटण्याची हीच पद्धत असते. अर्थात आता तिच्यापेक्षा मलाच जास्त आनंद झाला होता. नव्या वर्षाचं एकमेकींना विश करून झाल्यावर दोघी खिदळायला बाहेर पडलो. इथून पुढचे क्षण आनंदाचे जाणार होते.
गाडी तिथंच ठेवून आम्ही पायीच सेंट जॉर्ज परिसरात आलो. दोघींनी पायीच भटकंती करायचं ठरवलं होतं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर नंदिनीने माझा मूड पाहून कालच्या पार्टीचा विषय काढला. त्याबरोबर माझं तोंड कडवट झालं.
काल काहीतरी झालं असलं पाहीजे याचा तिला अंदाज आला. तिला सांगावं कि न सांगावं याचा माझ्या मनात विचार चालला होता तर मला निर्णय घ्यायला वेळ द्यावा असा तिच्या मनात विचार चालला होता. मी तिच्याशी नक्कीच कालचं शेअर करणार याची तिला खात्रीच दिसत होतीच.
शेवटी मी तिला सगळं सांगून टाकायचं ठरवलं. आणि एकदाचं ओकून टाकलं सगळं. तिच्या रिअॅक्शनसाठी तिच्याकडे पाहीलं. ती अधून मंद स्मित करत होती तर मधूनच गंभीर होत होती. अचानक कसल्याशा आठवणीने झुरळ झटकावं तसा तिच्या अंगावर शहारा येऊन जात होता. पण तिच्या डोळ्यात कुठेही हेवा, इर्ष्या, मत्सर या भावनांना स्थान नव्हतं. ती माझी खरी मैत्रीण होती.
माझं सगळं ऐकून घेतल्यावर ती बराच वेळ गप्प होती. कदाचित शब्द जुळवत असावी.
" अवघडच झालं गं सगळं. सिंगसरांच जाऊ दे गं, मी शहाअंकलचा विचार करतेय. "
" मी तर त्यांना विशसुद्धा केलेलं नाही आज " रडवेल्या आवाजात मी तिला सांगितलं.
माझे हात हातात घेत ती फक्त " आय अंडरस्टँड " इतकंच म्हणाली आणि मला रडूच फुटलं. असं पब्लिक प्लेसमधे रडू आल्याने ती देखील कावरीबावरी झाली आणि मी ही रूमालात चेहरा झाकून घेतला.
" उद्या सिंगसरांकडे काय होईल हा विचारही करवत नाही "
" त्यात काय विचार करायचाय . तो मूर्ख असेल, मनोरूग्ण असं मला स्वप्नादेखील वाटलं नव्हतं. सिंग फॅमिलीला वाईट वाटलं असेल आणि त्याबद्दल त्यांच्याशी काही दिवसांनी बोलावं असं मी ठरवलंय "
"ऐक जरा ! त्यावेळी तुला सांगेन सांगेन म्हणत होत्ते, पण तू कधी संधीच दिली नाहीस बघ "
" कशाचं ? "
" राहुल नॉर्मल नाहीय्ये. "
" ते आलंच काल लक्षात "
" तसं नाही. तो वेगळा आहे. इतर मुलांपेक्षा वेगळा. इतर मुलांना तरूण मुलगी सोबत असेल तर एकांत हवा असतो नाही का ? "
"हम्म "
" याला मी स्वतःहून एकांतात घेऊन गेले तरी त्याच्याकडून कसलाच प्रतिसाद नाही. "
" नंदिनी....!"
" ऐक आधी ! जणू काही अशा नाजूक भावनांना त्याच्या आयुष्यात स्थान नसावं. काल तुला आलाच असेल ना अनुभव ?"
" हो गं .. काल मी त्याला बोलतं करायचा किती प्रयत्न केला ! तो अगदी यंत्रवत वाटला मला "
" बघ. तुझ्यासारख्या सुंदर मुलीची डेट मिळावी म्हणून इथले गोरेदेखील एका पायावर तयार असतात. आणि तू स्वतःहून त्याला डेटवर घेऊन गेलीस तरी त्याला काहीच नाही त्याचं .. कळतंय का मी काय म्हणतेय ते ? "
मला चांगलंच कळत होतं. डेट ! नंदिनी किती सहन बोलून गेली. माझी सगळी धडपड तिने योग्य शब्दात मला उलगडून दाखवली होती. पण आता संपलं होतं ते सगळं. राहून राहून अपमानास्पद वाटत होतं.
" आणि ऐक.. सिंग सरांच्या घरी त्याने जे सांगितलं त्याने आपल्या अडचणी वाढणार आहेत. त्याचे अंदाज सहसा चुकत नाहीत "
आणि मग पुढचे दोन तीन तास ओफीसमधल्या सहका-यांना आलेले अनुभव मला सांगण्यात गेले. कुणाच्या न घरी त्याने भविष्याचा अंदाज वर्तवलेला होता आणि ते खरं झालं होतं. काहींच्या बाबतीत मात्र त्याने थेट मृत्यूचा अंदाज वर्तवला होता. तो त्याला एक्सपायरी डेट म्हणत असे. ज्यांची एक्सपायरी डेट वीस पंचवीस वर्षांपेक्षा दूर होती त्यांना काहीच वाटलं नाही पण वर्षा सहा महिन्यात किंवा काही दिवसांच्या फरकाने ज्यांच्या मृत्यूचा अंदाज त्याने वर्तवला होता ते खरं होताना प्रत्येकाने पाहीलं होतं.
दोघा तिघांच्या बाबतीत ते खरं झालंही होतं. विशेष म्हणजे ज्यांच्या बाबत हे खरं झालं ती माणसं शहासरांच्या जवळची माणसं होती असं तिचं म्हणणं होतं. त्यांची खास माणसं होती.
म्हणजे काकांच्या कानावर सगळं गेलं होतं कि काय ? पण नंदिनीने ती शक्यता ठाम नाकारली .
एरव्ही सगळे चांगले गुण असले तरी हा कसला गुण म्हणायचा ? लोकांच्या मरण्याचं भविष्य आणि ते ही अचूक सांगायचं. लोक टाळतील नाही तर काय ?
बाप रे ! तिच्या म्हणण्याचा अर्थ भयानक होता. आणि तिचं म्हणणं खरं असेल तर माझ्या सोबतीने त्याने वर्तवलेलं भविष्य खरं ठरल्यास त्याचा त्रास मला आणि माझ्यामुळे आमच्या कंपनीला पर्यायाने शहाफॅमिलीला होण्याची शक्यता होती. २०११ म्हणजे बेरीज ४.. शी ! कुठल्या दिशेने चाललेत विचार !
नंदिनीला हा विषय इथंच थांबवण्याची सूचना करून शहाकाकांकडे जाऊन वातावरण पाहून ये अशी मी विनंती केली. तिचा साफ नकार असतानाही केवळ मैत्रीखातर म्हणून ती हे दिव्य पार पाडायला तयार झाली. आता ती उद्याच भेटणार होती मला.
मी गाडी काढून केप ऑफ गुड होपला जाऊन बसले. माझं आवडतं ठिकाण ! मन थोडंसं शांत झाल्यासारखं वाटलं.
******************
रात्री मी सरळ गेस्टहाऊसला गेले असल्याने दुस-या दिवशी सकाळी बरीच तारांबळ उडाली. ऑफीसला उशिराच पोहोचले. सगळे आपापल्या कामात गर्क होते. मायकेल आपल्या केबीनमधे जात होता तो मला पाहून थबकला. मला पाहून घड्याळ पाहण्याचा अभिनय करत माझ्या उशिरा येण्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. मी काय कधीही आले तरी कोण विचारणार होतं म्हणा ! पण मायकेलला कळवल्याशिवाय कधी उशिरा आले नव्हते. आणि मायकेल मला काहीही बोलू शकत होता. त्याला सगळं माफ होतं. कंपनीचं हित कशात आहे हे त्याला चांगलं कळत होतं म्हणूनच मी नसताना त्याच्यावर विश्वास टाकता येत होतं. नम्रता आणि मायकेल हे माझ्यापेक्षाही जुने असल्याने त्यांना कंपनीचे बरेचसे बारकावे माहीत होते. २००९ ला या नव्या जागेत कार्यालय सुरू झालं ते या दोघांच्याच मेहनतीमुळे. त्याआधी बरेच दिवस या जागेचा व्यवहार चालला होता. नव्या ऑफीसची नवी कारभारीण म्हणून माझी नेमणूक झाली होती पण शहाकाकांची ही खास माणसं दिमतीला होतीच.
मी चेंबरमधे जाऊन बसले तशी नंदिनी आत शिरली. शहाकाकांकडचा रिपोर्ट ऐकायची मला भीतीयुक्त उत्सुकता होती. ते प्रचंड नाराज असल्याचं नंदिनीचं म्हणणं ऐकताच मला घामच सुटला. पण नंदिनीने परिस्थिती छान हाताळली. शहाकाकांना थोडंसं हसवत, गप्पा मारत त्यांचा मूड ठीक झाल्यावर तिने माझा विषय काढला. माझी चूक कशी नव्हती हे तिने ज्या हुषारीने काकांना सांगितलं त्याबद्दल मी तिची आजन्म ऋणी झाले होते. शहाकाकाही वेगळ्या अँगलने आता झालेल्या घटनांबद्दल विचार करू शकणार होते.
डिटेक्टिव्ह जॉन आल्याची वर्दी रिस्पेशनिस्टने दिली तेव्हा नंम्रताला त्याला त्याचं पुडकं देऊन बोळवण करायच्या सूचना मी देतच होते इतक्यात तोच एखाद्या वादळासारखा माझ्या चेंबरमधे शिरला.
"इतक्या लांब बोलावलंस ते फक्त गिफ्ट द्यायला का ?"
आल्याआल्याच गडगडाटी हसत त्याने प्रश्न टाकला. आज साहेब निवांत दिसत होते म्हणजे माझा बराच वेळ खाणार तर.. जॉन तसा चांगला होता पण समोरच्याच्या वेळेची कदर त्याला नव्हती. पोलीसी मग्रुरी आणि चांगुलपणा असं अजब कॉम्निनेशन त्याच्या ठायी होतं. मेंदू देखील अतिशय तल्लख आणि डाबरमन सारखं नाक होतं असं त्याच्याबद्दल बोललं जायचं.
जॉनशी इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर तिथं आलेल्या नम्रताला पाहून त्याने डोळा मारायची खूण केली.
" तपास चालू आहे "
"हम्म. आपण पलिकडे बसू बोलूयात "
या तपासाबद्दल मी अनभिज्ञ होते. आधी या जागेवर जी कंपनी होती तिथं कसलातरी अपघात झाला होता त्यासंदर्भात चौकशी चालू होती. त्यातच आम्ही ही जागा घेतल्याने जॉनचा मोहरा आमच्याकडे वळणं स्वाभाविक होतंच. अर्थात पोलिसांचा विनाकारण त्रास नको म्हणूनच त्याला या भेटी दिल्या जात होत्या. भेटी घेऊन कर्तव्यात कसूर करण्याचा रिवाज इथं नव्हता. मात्र त्या बदल्यात इतर अनेक छोट्या छोट्या गोष्टीत जॉन आणि त्याच्या वरिष्ठांची मदत होत होती इतकीच कल्पना मला देण्यात आली होती.
-------------------------------------------------------------------------------
केस नं ४०१
मिस रचना जोशी
प्रो. डॅनीएल व्हॅटमोर
" जॉन, तुझ्याबद्दल लिहीलेलं बरोबर आहे ना ? "
प्रोफेसर हसून विचारत होते. आतापर्यंत रचना जोशीची केस वाचण्यात गढून गेलेला डिर्टेक्टिव्ह जॉन त्यांच्या या प्रश्नाने हसला. इथं प्रोफेसर व्हॅटमोर यांनी काढलेली टिपणं संपत होती.
" हिने तर सगळंच लिहून ठेवलंय कि "
" नोटांचं पुड्कं ?" डोळे मिचकावत प्रोफेसर म्हणाले. त्यावर जॉनने गडगडाटी हास्य केलं.
" धन्यवाद प्रोफेसर तुमच्या या सहकार्याबद्दल. तुमच्या टिपणांची खूपच मदत झाली. रचनाची डात्=यरी म्हणजे असंबद्ध लिखाण आहे नुसतं. कुठे तारखा नाहीत, कुठे आत्मकथन तर कुठे कॉमेण्टी "
" जॉन.. असंबद्ध म्हणू नकोस. तिच्याशी अनेकदा बोलून मग घटनांची सुसंगती लावून ही टिपणं माझ्या असिस्टंटने तयार केली आहेत. पुढच्या वेळी परत येशील तेव्हां २०११ मधे काय झालं त्याचा उलगडा तुला होईल "
" अच्छा. आभार त्यासाठी. मला हे सगळं पुरावा म्हणून जवळ ठेवावं लागेल प्रो. ! "
"नक्कीच ! पण त्या आधी मला तुझी मदत लागेल जॉन. इथं या केसमधे तुझंही नाव असल्यानं मला तुलाही बरेच प्रश्न विचारायचेत "
" हा हा ! चांगलं आहे. एकाच केसचं दोघांकडून इन्व्हिस्टिगेशन ! तुम्ही मला प्रश्न विचारा, मी तुम्हांला विचारतो "
हसून प्रोफेसरांनी त्याला खुर्चीत बसायची खूण केली. रचना जोशीची केस खूप गुंतागुंतीची होत चालली होती खरीच...
--------------------------------------------------------------------------------
प्रकरण चार
संध्याकाळपर्यंत मी शांत झालेले होते. राहुलबद्दलही नाराजी असली तरी ती कामाच्या ठिकाणी काढायची नाही या दृष्टीने दिवसभर जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते. त्याच्या चेह-यावर अपेक्षेप्रमाणेच कसलेही भाव नव्हते आणि माझ्या मनात चाललेलं त्याला सगळं कळणार असल्याने एक प्रकारे ते बरंच झालं असं वाटत होतं . जॉनला जाताना टाटा केला आणि बर वाटलं. स्वारी खुषीत दिसत होती. नम्रताने त्याला पटवलेलं दिसत होतं. पटवायचं काय म्हणायला, खिसा जड झाला होताच कि. मी सरळ काम सोडून नम्रताकडे जाऊन बसले.
"काय गं, हा जॉन कसला तपास करतोय ?"
"सांगितलं ना , आपल्या आधी व्होरांच्या कंपनीत अपघात झाला होता "
"अपघात कसला होता पण ?"
तिने माझ्याकडे अविश्वासाने पाहीलं. जसं काही मला माहीत होतं आणि मी मुद्दामच विचारत होते..
"असं काय पाहतेस ? "
"नाही.. तुला सांगावं कि न सांगावं .."
"सांग कि, त्याने काय फरक पडणार आहे ? "
" त्यापेक्षा तू असं का नाही करत ? "
"कसं ? "
" शहासरांनाच का नाहीस विचारत ? "
" हं, म्हणजे सांगायचं नाही म्हण कि "
" वा ग ! शहासरांना विचार म्हटलं कि लगेच सांगायचं नाही म्हणे ! तू लाडकी पुतणी ना त्यांची ? मग घाबरायचं कशाला ? " नम्रता हसून विचारत होती.
" हुं ! लाडकी म्हणून तर म्हणून तर आदर करते त्यांचा. याला घाबरणं म्हणतात होय ? त्यांनी एकदाच सांगितलं कि पुन्हा नको त्या प्रकरणात रस घ्यायला म्हणून नाही विचारत त्यांना. एक तर ते वयाने मोठे आणि अनुभवाने पण ! पण काय गं, तुला कसला प्रॊब्लेम आहे मला सांगायला ? "
" शहाकाकांनी मनाई केलीये समज " ती खळाळून हसत म्हणाली.
म्हणजे ही काही ताकास तूर लागू देणार नव्हती.
मायकेल पाघळतो का ते पहायला पाहीजे. अनावश्यक माहीती ठेवू नये असं बाबांनी शिकवलेलं तर आईने त्याच्या उलट जाऊन अद्ययावत माहीती ठेवल्याने कसं सावध राहता येतं हे समजावून सांगितलं होतं. काही काही वेळा ती अंधश्रद्ध आणि भोळसट वाटली तरी शहाणपण तिच्याकडे भरपूर असल्याचं कळून यायचं. बाबांसारखी ती हुषार नसेल कदाचित, पण बाबांना जेव्हापासून आईचे शहाणपण लक्षात आलं आणि तिचे सल्ले घ्यायला त्यांनी सुरूवात केली तेव्हाच कदाचित बाबांच्या हुषारीचं सोनं झालं होतं. मी हे एकदा आईकडे बोलून दाखवलं तेव्हा मात्र तिने स्वत:च्याच गालात मारून घेतलं होतं. आई म्हणजे आईच होती.
आज दोन तारीख.
सकाळपासून कसलं टेण्शन होतं काही कळत नव्हतं. डोक्यात घण बसल्यासारखं येणार फीलिंग आज पुन्हा येत होतं. गेल्या काही महिन्यांपासून ढोल वाजल्यासारखं वाटायचं आणि डोकं प्रचंड दुखायचं. त्या ढोल वाजल्याच्या आवाजाने प्रचंड अस्वस्थ व्हायला होत होतं. कालही ते आवाज ऐकू आले असावेत. आणि त्यानंतर ते भास. मी गाडी लावते. कुठल्याशा गेटमधून बाहेर पडते आणि एक पोरगेलासा तरूण पळत जाताना मला धडकूतो . मी तोल सावरत असतानाच आणखी काही जण त्याच्या मागे जाताना दिसतात. अरे त्याला वाचवा.. मी ओरडत असते.
आजचा दिवस जरा वेगळा असल्याचं जाणवत होतं. इतरांकडे पाहीलं तर सगळं नॊर्मल चाललं होतं. प्रत्येकाच्या दुनियेचा केंद्रबिंदू तो स्वत:च असल्याने प्रत्येकाचं वर्तुळ वेगळं. एकमेकांत मिसळलेल्या वर्तुळात मात्र एकाच्या आवर्तनांची झळ दुस-याला बसत असते. त्याप्रमाणे माझ्या टेण्शनमुळे इतर कुणाला फरक पडत नव्हता. मात्र त्याच वेळी नंदिनी माझ्याकडे आवर्जून येऊन बसली होती.
" काय गं रच्यू ! टेण्शन बिन्शन घ्यायचं नाही हं. "
मी कसंनुसं हसले.
"टेण्शन, लेनेका नही देनेका "
तिने उगीचच जोक मारला. तिच्या ब-याच अयशस्वी प्रकरणात तिच्य़ा हाती अशी वाक्यं लागलेली होती. कधीकधी तिच्या या बिनधास्तपणाचं, बेफिकिरीचं कौतुक वाटायचं. पण नाही, ती जशी दाखवते तशी ती नव्हती. बारीक विचार करायची, पण ते फक्त दुस-यांच्याबाबतीत !
आज पुन्हा जॉन आल्याची वर्दी मिळाली तेव्हा त्याला मजेत सुनवायचा विचार केला होता मी. कालच तर त्याला पुडकं मिळालं होतं ना ? तो आल्याची खबर मिळाल्याने नम्रताही कपाळावर आठ्या पाडत आली.
" हाय मिस रचना ! कशी आहेस "
चेंबरमधे घुसलेल्या त्या सहाफुटी वादळाने आत शिरतानाच प्रश्न केला.
" जॉन ! काल बोललो ना आपण ? काही राहीलं का ? चल पुन्हा कॊन्फरन्स रूममधे बसून बोलूयात "
" अंहं.. आज मला फक्त मिस रचना जोशीशी बोलायचंय .."
मिस रचना जोशी.. असा उल्लेख करताना त्याचा स्वर थोडासा करारी झाल्यासारखा वाटला.
" काय प्रॊब्लेम आहे जॊन "
" नम्रता, मला माझी ड्युटी करू दे "
त्याच्या स्वरात आता जरब होती. त्यावर नम्रता ओशाळली.
" मिस रचना जोशी, मी तुला काही प्रश्न विचारले तर चालतील ना ? कि लेडी डिटेक्टिव्हला बोलवायचं ?"
" नाही त्याची काही गरज नाही "
" मी म्हणालो मला रचनाशी बोलायचंय हे तुला कळत नाही का नम्रता ? "
" आय अॅम सॉरी ! "
" हं , दॅटस बेटर ! आता इथं आपल्या दोघांशिवाय कुणीही थांबता कामा नये. नाहीतर मला नईलाजाने कारवाई करावी लागेल "
त्याच्या अधिकारांची जाणीव होताच वातावरणात तणाव निर्माण झाला. नम्रता आणि नंदिनी निघून गेल्या.
" हं बोल आता रचना. काय झालं थर्टीफर्स्टच्या रात्री ?"
" म्हणजे ?"
" तू सिंग साहेबांच्या पार्टीला गेली होतीस ना ?"
" हो. "
" मग मला सविस्तर सांग बघू. तू गेटच्या बाहेर गाडी लावलीस तिथून पुढे सगळं नीट सांग. काहीही हातचं राखून ठेवू नकोस.. "
"पण मला कळेल का ही चौकशी कशासाठी ते ? "
" अरे ! मी सांगितलंच नाही का ? तुझा हक्कच नाही का तो जाणून घ्यायचा... पण तुला माहीत नाही खरंच ?"
" काय ?"
" अच्छा ! मीच सांगायचं असेल तर... काल श्री सिंग यांचा मृत्यू झालाय "
"क्काय ? "
माझ्या डोळ्य़ासमोर माझं चेंबर गोल फिरत होतं.
" ऐकलं नाहीस का ? "
" हे कसं शक्य आहे ?"
" शक्य झालंय आणि ते कसं झालंय हे जाणून घ्यायलाच मी तुझ्याकडे आलोय "
"यू मीन ! मी काही केलंय ? "
त्यावर नापसंती दर्शवत त्याने खांदे उडवले
" हं ! मी अजून असा काहीही आरोप केला नाही. तू स्वतःच तसं म्हणतेहेस ! "
आता याला कसं सांगू कि मि. सिंग नाही तर त्यांच्या बाळाची एक्स्पायरी डेट राहुलने सांगितली होती.
"काल तू पार्टीला गेलेलीस. बाहेर पडण्यापूर्वी तू सिंगसाहेबांशी काहीतरी बोलत होतीस. "
" पण मला कसं माहीती ना, असं काही होणारेय ते ? ते ही दोन दिवसांनी ? आणि मीच का , त्यावेळी कितीतरी जणं होते कि तिथं !"
" तू तिथून अचानक बाहेर पडलीस. नंतर पुन्हा आत आलीस. सर्वत्र फिरलीस. काहीतरी शोधत असल्यासारखी आणि मग वेगाने बाहेर पडलीस. बरोबर ? "
" हो पण... "
" तू बाहेर पडलीस त्याच्या आधी काही तरी घडलं होतं. "
" काय ? "
"आता मात्र मला सगळ सगळं सविस्तर सांग. टेक युवर ओन टाईम "
मी मनाशी शब्दांची जुळवाजुळव करत होते. शहाकाकांच्या कानावर घालावं का ? नम्रताशी बोलावं का ?
मग मीच त्याला मला नम्रताशी बोलायचंय असं सांगितलं. त्यावर त्याच्या चेह-यावर पुन्हा एकदा नापसंतीदर्शक भाव उमटले.
" तू काही केलेलं नाहीस ना ? मग कशासाठी कुणाची मदत हवीये ? माझं ऐक ! जे काही आत्ता मला सांगशील ते तुझ्याच फायद्याचं असेल "
मला खूपच वेळ लागत होता निर्णय घ्यायला. तशी जॉनची नजर संशयी होत चालली होती. अशा वेळी मनाचा कौल लावायचा असतो. मन काय इशारे देतंय याकडे लक्ष द्यायचा मी प्रयत्न केला. मी सहज बाहेर पाहीलं, राहुल माझ्याकडे एकटक बघत होता. आत्ताची त्याची नजर !
डोक्यात प्रचंड घण .. ढोल वाजण्याचा आवाज !
मी गेटमधून आत शिरतानाच तो पोरगेलासा तरूण मला धडकतो..
पुन्हा तो भास !
इथं ब-याच घटना अशा होत्या ज्याबद्दल मी अनभिज्ञ होते. मनाला कसले तरी इशारे मिळत होते. पण त्याचबरोबर मी कुठल्यातरी शक्तींच्या नियंत्रणात चालली असल्याची जाणीव होत होती. माझ्या चेह-यावर चित्रविचित्र भाव उमटत असले पाहीजेत. मी अनावश्यक भाग टाळून इयर एण्डचा प्रसंग जॉनला सांगायचा निर्णय घेतला.
मी एखादं स्क्रीप्ट वाचून दाखवावं तसं थर्टी फर्स्टच्या त्या नाईटबद्दल सांगत होते. डोळे मिटून जॉन ऐकत होता.
माझं सांगून संपलं तेव्हाच त्याने डोळे उघडले.
" तुझा ब्लॅक मॅजिकवर विश्वास आहे ?"
" हा काय प्रश्न झाला ? "
" अच्छा ! बदलून विचारतो. तुला ब्लॅक मॅजिकमधे रस आहे ? "
" असं का विचारतोस जॉन ? "
" मग त्या फ्ली मार्केटमधल्या त्या बाईकडे तुझं जाणं येणं कशासाठी आहे ? "
मला काहीच सुचेना. एकतर थर्टीफर्स्टच्या नाईटबद्दल मी विचारात असतानाच अचानक हे प्रश्न आल्याने मी अगदी गोंधळून गेले होते. गडबडून गेले होते. मी उत्तर द्यायला नकार दिल्यावर खांदे उडवत जॉन निघून गेला.
पण त्या प्रश्नांमुळं एक बरंच झालं. माझं डोकं दुखायचं थांबलं होतं.
.................................................................
" जॉन ! तिच्या म्हणण्याप्रमाणे तू तिची चौकशी केलीस..?" मधेच जॉनला थांबवत प्रोफेसर म्हणाले.
" हं. खरंय ते "
" काय सांगितलं तिने ? "
" ते लिहीलंय नाही तिने .. नाही का ? का बरं असं ? "
" हं. तेच तर हवंय तुझ्याकडून. "
" प्रोफेसर ! माझं काम प्रश्न विचारायचं आहे, उत्तरं द्यायचं नाही "
" अच्छा ! तर मग तू तुझ्या पद्धतीने तपास चालू ठेव. भेटूयात "
" ओहो प्रोफेसर! नाराज झालात एकदम. मी माझ्या मर्यादा सांगितल्या तुम्हाला. तपासादरम्यान झालेली मतं आणि तपासाचे डिटेल्स मला वरिष्ठांच्य़ा परवानगीशिवाय कुणाकडेच व्यक्त करता येत नाहीत. प्लीज ट्राय टू अंडरस्टॅंड "
" मी केवळ तपासाला मदत म्हणून माझ्या व्यवसायामधली नैतिकता बाजूला ठेवून केसचे डिटेल्स तुला दिले. आता माझा उपयोग करून घेताना मधल्या मिसिंग लिंक्स मला मिळाल्याच नाहीत तर मी तरी काय करू शकणार आहे ? "
" हं.. खरंय! मी आजच डोनाल्डशी बोलतो. माझा बॉस ! आज मी मेल करणारच होतो त्याला "
प्रोफेसर काहीच बोलले नाहीत.
"या नव्या नोटस राहू देत माझ्याकडे. "
जॉन फोन करण्यासाठी म्हणून बाल्कनीत गेला. बराच वेळ त्याचं संभाषण चालू होतं. खरं तर आता त्याने प्रोफेसरांच्या प्रश्नांना उत्तरं दिली असती तरी बिघडलं काहीच नसतं. पण तो कृष्णवर्णिय, बॉस ब्रिटीश रक्ताचा. म्हणूनच हाताखालच्या माणसाने न विचारता घेतलेले डिसीजन्स त्याला चालले नसते. म्हणजे जोपर्यंत सुरळीत चाललंय तोपर्यंत ठीक , पण काही विपरीत घडलं तर मात्र बॉसला का नाही विचारलं, स्वतःच निर्णय कशासाठी घ्यायचे वगैरे ! या अशा नियमावलीत स्वतःच्या डोक्याने कोण काम करणार ? अजूनही नियम तेच असल्याने इथल्या पोलीस खात्याबद्दल तसा आनंदच होता. पण एक आहे ब्रिटीश होते तोपर्यंतएक बरं होतं, कायदा आणि सुव्यवस्था चांगली होती आणि भ्रष्टाचार हाताबाहेर गेलेला नव्हता. आता मात्र संध्याकाळच्या वेळी परदेशी नागरिकांनी एकटंदुकटं बाहेर पडू नये अशा सूचना द्यायची पाळी इतर देशांच्या वकिलातींवर आली होती. लुटालूट आणि गुन्हेगारी खूप वाढली होती.
" प्रो ! खूषखबर. बॉसने परवानगी दिलीय तपासाचा आवश्यक तितका भाग तुम्हाला डिस्क्लोज करायची. तसंच एक समिती बनतेय या केससाठी. तुम्ही, मी आणि डोनाल्ड आहोतच त्यात, शिवाय एक इंडियन लेडी आहे सायकॉलॉजीचा अभ्यास असलेली. सायबर क्राईमवाली. डिटेक्टिव्ह संदीपा बॅनर्जी . तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी तिला घेतलंय."
"तपास चालू आहे " जॉन त्याचं आवडतं वाक्य सवयीने बोलून गेला.
" जॉन तुझं मत सांगायला आता काहीच हरकत नसावी . त्याआधी या सगळ्या प्रकरणाची प्रार्श्वभूमी तू मला सांगणारेस "
" ओके. रचनाने संगितलेल्या कहाणीचे डिटेल्स माझ्या डोक्यात फिट्ट बसले होते. महत्वाच्या नोंदी लिहून ठेवायची मला सवयच आहे. कंपनीकडून तिला माझ्याशी जास्त बोलू दिलं जात नव्हतं. मी तिची माहीती काढली. ती शहांच्या मित्राची मुलगी. शहांचा डायमण्डचा बिझनेस सर्वदूर आहे. भारतात डायमण्डसच्या ज्या कंपन्या आहेत त्यातल्या साठ टक्के त्यांच्याच आहेत. रचना तशी मध्यमवर्गीय फॅमिलीतली. पण तिच्या वडिलांना उजव्या पक्षाकडून मिळालेल्या तिकिटावर ते निवडून आले आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहीलं नाही. शहांच्या मोठ्या पुतण्याच्या लग्नाच्या वेळी सरकारकडून बेहिशेबी संपत्तीचं प्रदर्शन केल्याच्या आरोपाखाली त्यांना बराच त्रास झाला होता. तेव्हां रचनाच्या बाबांनी, मि. जोशींनी त्यांना मदत केली होती. पुण्यातली एक नामांकित सराफी पेढी त्यांच्या नात्यातली . त्यांच्याकडे शहांच्या कंपनीसाठी रदबदली करण्यासाठी त्यांना मोठं कमिशन देण्याची तयारी शहांनी दाखवली. तेव्हां उत्सुकता म्हणून मि. जोशींनी या व्यवसायातल्या प्राप्तीबद्दल विचारलं आणि जे आकडे त्यांनी सांगितले ते ऐकून त्यांनी स्वतःच या व्यवसायात उडी घेतली. फक्त सात वर्षात आज भारतातल्या प्रमुख शहरात जोशी डायमण्डसची आउटलेटस आहेत. याशिवाय शहांच्या मसाल्याच्या व्यापारात त्यांची भागीदारी आहे. शहांना पैसे मिळवून देणारा मुख्य धंदा मसल्याचा व्यापार हाच आहे"
प्रोफेसर ऐकत असतानाच जॉनने एक पॉझ घेतला.
" शहांच्या व्यवसायाची माहिती करून घेण्यासाठी त्यांनी रचनाला दक्षिण आफ्रिकेला पाठवले. प्रशिक्षणासाठी म्हणून पाठवतोय असं त्यांनी सांगितलेलं. पण शहा धूर्त माणूस. मैत्री असली, भागीदारी असली तरी कायम सावध असणारा. या कानाचं त्या कानाला कळू न देणारा पाताळयंत्री मनुष्य ! अर्थात वाईट कामं केल्याचे पुरावे माझ्याकडे नाहीत पण त्यांनी वाईट कामं केलेलीच नाहीत असं म्हणता येणार नाही "
"दक्षिण आफ्रिकेत नव्याने उभारी धरलेलं आणखी एक बिझनेस हाऊस म्हणजे व्होरा फॅमिलीचं परिमल इंडस्ट्रीज. त्यांचा धंदा बंद पडावा म्हणून शहांनी जंग जंग पछाडलं. पण व्होरा तयारीचे होते. पण व्होरांचं दुर्दैव म्हणा किंवा शहांचं सुदैव म्हणा, एयरपोर्ट रस्त्यावरच्या त्यांच्या फॅक्टरीत एक अपघात झाला आणि चार जण जागेवरच गेले. वृत्तपत्रात त्यावर गदारोळ झाल्याचं आठवत असेलच. ते सगळे कृष्णवर्णिय असल्याने प्रकरण पेटलं. हॅन्सी कोनिए प्रकरणाचा राग इथल्या मेडीयाला आहेच आहे. व्होरांना धंदा करणं अवघड झालं. त्या जागेवर ब-याच जणांचा डोळा होता. पण नताशा आणि मायकेल या शहांच्या खास माणसांनी व्होरांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन, त्यांना कायदेशीर कटकटीतून सोडवण्याचा दिलासा देऊन तो प्लॉट घशात घातला. पण शहांनी शब्द पाळला नाही. व्होरा होत्याचे नव्हते झाले तेव्हाच त्यांनी हे प्रकरण बंद होईल याची काळजी घेतली. मला तर या सर्वांमागे शहाच असल्याचा दाट संशय होता. ते प्रकरण सगळ्याच भारतियांविरूद्ध पेटायला हवं होतं पण तसं झालं नाही . याच जागेत नव्याने कंपनी उघडून तिची धुरा रचनाकडे सोपवताना त्यांनी एका दगडात बरेच पक्षी मारले होते प्रोफेसर !"
" परिमल कंपनीत जो अपघात झाला त्यात चार जण जागीच गेले असले तरी तिथं पाच जण होते असं तपासात पुढे आलं. तो पाचवा एक पोरगेलासा भारतीय तरूण होता. विशेष म्हणजे त्याला कुणीच ओळखत नव्हतं, तसंच त्याची बॉडी सापडली नाही. कंपनीचे डॉक्युमेंटस मी ताब्यात घेतले. त्यात कुठेही त्याचं नाव नाही. मग तो तिथं काय करत होता हे गूढच आहे. तो वाचला असेल तर आश्चर्यच म्हणायचं इतका भयंकर स्फोट तिथं झाला होता. सुबोध एण्टरप्रायजेस नावाची एक कंपनी फ्रान्समधे आहे. शहांचा मुलगा सुबोध तिचा मालक आहे. एक्स्प्लोजिव्हच्या ऑर्डर्समधे मिळणारं प्रचंड कमिशन हे शहांच्या सगळ्या धंद्यापेक्षा जास्त आहे प्रो ! "
" तो जो भारतीय वंशाचा मुलगा होता त्याच्या शरीराचा काही अंश मिळतोय का हे पाहीलं. पण कसल्याच खुणा नाहीत. जर तो जिवंत असेल तर या केसमधे तो अत्यंत महत्वाचा साक्षीदार आहे. पण तो मला कधीच भेटला नाही. स्फोट होताना पाहीलेला तो एकमेव असावा. मी ज्या साक्षी नोंदवल्या त्या स्फोटाच्या आवाजाने पळत आलेले स्टाफचे लोक यांच्या. गेटवरचा त्या दिवशीचा सिक्युरिटीवालाही दुर्दैवाने त्या स्फोटात मरण पावला आणि त्याचं रजिस्टरही गहाळ झालेलं होतं. स्फोटकांच स्वरूप, त्याचा अहवाल याबद्दल आता जास्त विचारू नका. त्याची गरज नाही . तुम्हाला हवी ती माहीती मिळालीय हे मी गृहीत धरतो "
" जॉन ! तुझे आभार या माहितीबद्दल. विशेषतः रचनाच्या पार्श्वभूमीबद्दल दिलेल्या माहीतीचा खूप उपयोग होणार आहे . तुझा तपास आणि तुझी तपासाची पद्धत वाखाणण्यासारखी आहे. तू जसजसा तुझ्याकडची माहिती देऊन मला अपडेट करशील तसतसा या सगळ्या घटनांकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोण निश्चित बदलणार आहे. "
" गुड ! प्रो. , समितीचं काम चालू होऊन तपासाचा विचका होण्याआधी आपल्या दोन तीन बैठका होणं गरजेचं आहे. आज रात्री डोनाल्डला मेल करण्यासाठी तुमच्या नव्या नोटस मला हव्यात. "
" काही हरकत नाही "
" आणि उद्या मी परत येईन तेव्हा तुमचा नवा दृष्टीकोण मला ऐकायचा आहे "
"पाहूयात ! " प्रोफेसर हसत म्हणाले.
जॉनने फाईल गाडीत टाकली आणि तो त्याच्या ऑफीसकडे निघाला. आता निवांत बसून त्याला रचना जोशी केस वाचायची होती.
*************************
रचनाने दिलेल्या साक्षीत आणि या नोंदीत असलेल्या फरकामुळे जॉन रचनावर चिडला होता. मूर्ख मुलगी ! तिला किती वेळा सांगितलं होतं काहीच लपवू नकोस असं त्याच्या मनात येत होतं. नंदिनी, राहुल हे तिच्या इतक्या जवळचे असताना त्यांच्याबद्दल तपासादरम्यान ती काहीच बोलली नव्हती. कंपनीत पुन्हा एकदा चक्कर मारायचं त्याने मनात निश्चित करून पुढे वाचायला सुरूवात केली. सिंगसरांच्या खूनाचा तपास त्याला माहीतच होता. पुढे पुन्हा तिचा दिनक्रम आणि इतर काही घटना होत्या ज्याची नोंद त्याला घ्याविशी वाटली नाही. काही ठिकाणी तोचतोचपणा येत होता. प्रोफेसरांना ते महत्वाचं वाटलं असेल कदाचित. त्याला प्रोफेसरांचा या केसशी कसा संबंध आला ते जाणून घ्यायचं होतं. राहुलबद्दल त्याच्याही मनात औत्सुक्य होतंच.
डोनाल्डचं त्याला एका बाबतीत कौतुक वाटलं. संदीपाला समितीत घेतल्यानं पुढचा भाग समजून घेण्यासाठी त्याला मदतच होणार होती. बॉस आपण समजतो तसे मूर्ख नसतात नेहमीच ! जॉन स्वतःलाच बजावत राहिला.
क्रमश :
-----------------------------------------------------------------------------
प्रकरण पाच
"रचना तू काय सांगितलंस जॉनला ?"
" मला खरंच आठवत नाही आता पण राहुलचा उल्लेख वगळून सर्व सांगितलं "
" वेडी आहेस. सांगून टाकायला हवं होतसं. तू एकदा तरी हा विचार केलास कि, ओल्ड कॅसल भागातून तो रात्रीच्या वेळी कसा परत आला असेल ? ऊ शोधाशोध केली तेव्हां तुला तो सापडला नाही. मग त्या वेळी तो काय करीत असेल ? कुठे होता वगैरे "
" नंदिनी हे प्रश्न मलाही पडतात. पण त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही हे एकदा ठरवल्यावर पुन्हा कशाला विचारायचं ना ? "
" हो पण आता श्री सिंग यांचा हार्ट अॅटॅकने मृत्यू झाल्यावर हे प्रश्न महत्वाचे नाहीत का ?"
" अगं असं काय करतेस ? त्यावेळी मला माहीत होतं का असं काही होणार आहे ? "
" का बरं ? नव्हतं माहीत ? "
" नंदिनी ! "
" नंदिनी , तुझ्या म्हणण्याचा रोख कळला मला.पण त्याने सिंग सरांच्या बाळाची एक्स्पायरी डेट सांगितली होती. आणि आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे त्याचा अंदाज चुकीचा निघाला आहे. "
" रच्यु, मलाही हेच नवल वाटतंय. कदाचित तुझ्या ऐकण्यात काही फरक झाला असेल. त्याचे शब्द वेगळे असतील. "
" नाही. मी काही म्हातारी नाही झालेले .. आणि ब-याच जणांनी ते शब्द ऐकलेले आहेत "
" कदाचित ..पण काही असो. हा प्रसंग तू जॉनपासून लपवायला नको होतास "
" हुं , म्हणजे आणखी संशय ओढवून घ्यायला. त्याने विश्वास तरी ठेवला असता का या गोष्टींवर ? "
" ते ही आहेच म्हणा !"
" नंदिनी ! आपल्याला काहीतरी हालचाल केली पाहीजे "
" कसली हालचाल ? "
" अग अस काय करतेस ? हे बघ त्या दिवशी राहुल माझ्याबरोबर आला नाही. तुझ्या म्हणण्याप्रमाणे त्याचे अंदाज खरे व्हायला हवेत म्हणजेच सिंग साहेबांचा मृत्यू झाला याचाच दुसरा अर्थ राहुलचा अंदाज चुकला. आपल्याला राहुलची माहीती काढायला हवी. त्याच्या या विचित्र आगणुकीची माहिती काढायला हवी नाहीतर विनाकारण आपल्या अडचणी वाढतील "
" म्हणजे काय करणारेस तू ?"
" मानसशास्त्राची मदत घेणार आहे मी. चल आपल्याला शहरातल्या टॉपच्या सायकिऍट्रिस्टची यादी बनवायचीय. कामाला लाग "
पुढचे दोन तीन तास आम्ही इंटरनेट, बिझनेस डिरेक्टरीज असं सगळं पालथं घालून दहा बारा नावं निश्चित केली.
" नंदिनी ! आपण पुढचे चार पाच दिवस कामावर येणार नाही आहोत. मायकेलशी मी आताच बोलले "
पुढचे दोन दिवस आम्ही वेड्यासारख्या फिरत होतो. कुणी जर आमच्या मागावर असेल तर दोघींपैकी एकीला काहीतरी मानसिक आजार आहे अशीच त्याची समजूत झाली असती. कारण दोन तरूण मुली मानसोपचार तञाकडे का जात असतील हे कुणाला कसं कळणार ना ?
राहुलचा प्रॉब्लेम ऐकून घेतल्यानंतर आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. दोघांनी मात्र हे पॅरासायकॉलॉजीची केस असल्याचं सांगितलं. एक झालं मात्र सर्वांनी प्रो. डॅनीएल व्हॅटमोर यांचंच नाव सुचवलं. प्रो व्हॅटमोर हे एक नावाजलेले आंतरराष्ट्रीय किर्तीचे मानसशास्त्रञ होते. गेल्या काही वर्षात त्यांनी पॆरासायकॉलॉजीचा अभ्यास केला होता. अनेक रिसर्च पेपर्स, अनेक मानशास्त्रीय कसोट्या ज्यांच्या नावावर आहेत अशा प्रो व्हॅटमोर यांनी पॅरासायकॉलॉजीचा अभ्यास करावा हे अनेकांना रूचलं नव्हतं. वृत्तपत्र आणि सायन्स मॆगेझिन्स यातून टीकात्मक लेखही प्रसिद्ध झाले होते. पण अर्थातच प्रोफेसर कशालाच बधले नव्हते. आणि लवकरच त्यांच्या या योगदानाचं महत्व कळून आलं होतं.
आफ्रिका खंडच तसा काळ्या जादूसाठी बदनाम. युरोप, अमेरिकेतही आफ्रिकन काळ्या जादूची चांगलीच दहशत होती. ज्या ज्या ठिकाणी शिक्षणाचा प्रसार कमी त्याच ठिकाणी काळी जादू ,भूत बगैरे गोष्टींवर विश्वास ठेवला जातो. एखाद्याच्या मानसिक आजाराला काळ्या जादूच्या दृष्टिकोणातून पाहणं ही नित्याचीच बाब झाली होती. म्हणूनच मांत्रिकांचा धंदा तेजीत होता. जे काही लोक वेळेत सायकिऍट्रिस्टकडे जात त्यांना फायदा होत होता. पण प्रत्येक वेळी असं होत नव्हतं.
ब-याचशा केसेसमधे त्यांच्याकडे समाधानकारक उत्तरं नसल्यानं सुशिक्षितांनाही मानसोपचार तञांपेक्षा मांत्रिकांकडे गेलेलं बरं असं वाटून जायचं. वैञानिक दृष्टीकोण बाळगायचा तर या गोष्टींना विरोध करायचा आणि काळ्या दुनियेचा आसरा घ्यावा तर विञानवाद्यांची साथ सोडा असं काहीसं होऊन बसलं होतं. मध्यममार्ग असा नव्हताच. पॅरासायकॉलॉजीच्य़ा अभ्यासकांनी ही उणीव दूर केली. प्रो व्हॅटमोर यांच्या या अभ्यासाची आफ्रिकेत खूपच गरज होती. लवकरच सर्वांनी ते मान्य केलं होतं.
प्रो. व्हॅटमोर या नावाबद्दल इतकी माहिती मिळाल्याने त्यांच्याबद्दल आधीच विश्वास वाटू लागला. प्रत्यक्षात जेव्हां भेट झाली तेव्हां तो अधिकच दुणावला. त्यांचं ऑफीस वगैरे काही नव्हतंच. एका साध्याशा प्लॅटमधेच त्यांचा संसार आणि मानसशास्त्र दोन्हीही नांदत होते. प्रोफेसरांच व्यक्तिमत्व खूप साधं होतं. ट्रान्सटेलच्या ओल्ड फॉक्स या गाजलेल्या मालिकेतल्या डिटेक्टीव्हसारखेच ते दिसायला होते. आम्हाला पाहून प्रसन्न हसत त्यांनी आमचं स्वागत केलं.
"तुझ्या ता राहुलला नाही आणलंस ?"
" सर...मी लिहीलं होतं ना त्याबद्दल !"
" अरे हो ! तू लिहीलं होतंस नाही का त्याबद्दल ? " मिस्कील हसत प्रोफेसर म्हणाले.
" सर.. तुमचा विश्वास बसलाय ना मा़झ्यावर ? "
यावर पुन्हा एकदा ते प्रसन्न हसले. विश्वासदर्शक.
" विश्वास न ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. प्रश्न विचारायच्या आधी काही गोष्टी तुला स्पष्ट करतो. अधून मधून तू ही प्रश्न विचारू शकतेस. काय आहे प्रोफेसर असल्याने एकदा बोलायला सुरूवात केली कि तासभर बोअल्याशिवाय थांबायची सवयच नाही बघ " डोळे मिचकावत प्रोफेसर म्हणाले तसं मला हसायला आलं. त्याच्याबद्दलचं दडपण क्षणात नाहीसं झालं. हा मला रिलॅक्स करायचा प्रयत्न असावा. शेवटी एका नावाजलेल्या मानसशास्त्रज्ञाकडे मी आलेले होते !
" ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत त्याला एकदा तरी भेटणं माझ्यासाठी आवश्यक आहे. अर्थात तुझा प्रॉब्लेम तू व्यवस्थित समजावून सांगितलेला असल्याने तुला अपॉइण्ट्मेंट दिली. रचना नाही का तुझं नाव ?
सुंदर नाव आहे हे. तुम्ही भारतीय लोक अर्थपूर्ण नाव ठेवता . "
"तर रचना, मला तुझ्या कथेवर अविश्वास दाखवायचं कारणच नाही. शेवटी विज्ञान काय असतं ? विज्ञान कशालाच नाकारत नाही. एखादी गोष्ट समजली नाही म्हणून ती अवैज्ञानिक म्हणणं हा दृष्टीकोण म्हणजे एक प्रकारची अधश्रद्धाच नाही का ? मी पूर्वी फक्त मानसशास्त्राचा संशोधक होतो. पुढे अशा काही केसेस माझ्याकडे आल्या आणि असे काही अनुभव आले कि माझ्या विचारात बदल झाला. पॅरासायकॉलॉजी म्हणजे अतींद्रीय शक्तींबद्दलचं शास्त्र ! दुर्दैवाने वैज्ञानिक जगताने अद्याप या शास्त्राला म्हणावी तशी मान्यता दिलेली नाही. मी या वृत्तीबद्दल लढतोच आहे पण आज जर हे शास्त्र म्हणून प्रस्थापित झालं असेल तर त्याचं श्रेय आपल्याला प्रोफेसर फ्रेडरिक मायर्स आणि जे बी -हायेन या शास्त्रज्ञांना द्यावं लागेल. प्रोफेसर मायर्स यांना मानवी मर्यादेपलिकडच्या, म्हणजे आपल्या ज्ञानेंद्रियाव्यतिरिक्त इतर काही सोर्सेने प्राप्त होणा-या जाणिवांची कल्पना आलेली होती. त्यांनी या अतींद्रिय शक्तींना, Extrasensory perception (ESP), मान्यता दिली आणि ही कल्पना जे बी -हायेन यांनी स्विकारली. -हायेन यांनी त्यावर पुढे बरंच काम केलं. Extrasensory perception (ESP) ला वैज्ञानिक जगतात मान्यता मिळवून दिली. "
" टेलिपथी बद्दल ऐकलंच असशील तू. नेहमीच्या भाषेत आपण त्याला सिक्स्थ सेन्स असं म्हणून जातो. इतकी वर्षं मानव याचा अनुभव घेत आला आहे. कुठलंही शास्त्र त्याचा गैरफायदा घेणा-या व्यक्तींमुळं बदनाम होत असतं. शेवटी शास्त्र म्हणजे तरी काय ? एखादी गोष्ट विशिष्ट स्टेप्स फॉलो करीत गेल्यानंतर त्याचे रिझल्ट्स मिळत असतील, अनुभूती येत असेल तर ती विज्ञानाने सिद्ध झाली असं आपण म्हणतो. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर डेटा जमवणे, प्रयोग करीत राहणे आणि त्यातून सिद्धता सिद्ध करणे या प्रोसेसेस मधून गेल्यावर एखाद्या शास्त्राला मान्यता मिळते. त्यासाठीची शिस्त ही केवळ वैज्ञानिक दृष्टिकोणातून येते. "
" याचा अर्थ असा नाही कि विज्ञानाने जी गोष्ट सिद्ध झालेली नाही ती अस्तित्वातच नाही. मी तुला आधीच याबद्दल सांगितलं. मी याच भूमिकेतून गेली कित्येक वर्ष झगडतो आहे. जे बी -हायेन यांनी या लढ्याची सुरूवात केली. एखादं शास्त्र अशिक्षित लोकांच्या ताब्यात गेलं कि त्यातलं शास्त्र बाजूला राहतं आणि त्यामागचं विज्ञान न समजल्याने किंवा समजून घेण्याची कुवत नसल्याने त्याला चमत्कार, जादू असं काहीसं स्वरूप प्राप्त होतं "
"तसं पहायला गेलं तर मानवी शरीर हाचएक चमत्कार आहे. आपला जन्म हा ही एक चमत्कारच आहे. नाही वाटत ? असंच असतं. जन्माचं रहस्य आपल्याला कळालंय. आपण शाळेत शिकलो , पुस्तकातून आपल्याला ही माहिती मिळाली म्हणून आज माणसाचा जन्म ही एक साधारण गोष्ट वाटू लागते. आपल्या मेंदूत उमटणारे विचार, त्याप्रमाणे बोलले जाणारे शब्द, ते व्यक्त करण्यासाठी आवाज आणि ग्रहण करण्यासाठी असलेली ज्ञानेंद्रियं हे आपल्याला सगळं सहज वाटतं. "
इतकं बोलून प्रोफेसर थांबले. त्यांना हे प्रत्येकवेळी इतकं सगळं बोलावं लागत असेल का ? यातल्या ब-याचशा गोष्टी कानावरून गेल्याच होत्या. पण आता प्रोफेसरांच्या तोंडून एका विशिष्ट फ्लोमधे ऐकताना त्यांचे नवे अर्थ उलगडत होते.
" तेव्हां तुझ्या त्या राहुलला मनातलं ऐकू येणं ही असाधारण असली तरी अशक्य गोष्ट नाही म्हणता येणार. आ़णखी काय म्हणालीस तू राहुलबद्दल ? पुन्हा सांग एकदा .."
हे राम ! हे विसरले कि काय ? मग त्यांना पुन्हा एकदा सगळं रामायण सांगितलं. ते मधे मधे प्रश्न विचारत राहीले. मधे मधे प्रश्न विचारल्याने गोंधळ उडत होता इतकंच. मला एकदा त्याला भेटव.. ते पुन्हा पुन्हा म्हणत राहीले. मला आश्चर्य याचं वाटत राहीलं कि ते नंदिनीशी एक शब्दही बोलले नाहीत कि तिचं तिथं असणं त्यांना खटकलंही नाही.
" सर ! राहुलमुळे मी अडचणीत येणार आहे हा माझा मुख्य प्रॉब्लेम आहे. राहुलची अडचण दूर करणे हा नाही "
" आय अंडरस्टँड ! पण एकदा मी त्याला भेटू शकलो तर पुढे तुझ्यासाठी कायदेशीर बाजू भक्कम होईल असं नाही का तुला वाटत ? "
हा विचार मी केलाच नव्हता. मी पुन्हा विचारात पडले. पण त्याला आणायचं कसं ? मुळात त्याला फसवणं शक्य तरी होतं का ? आणि मनातले विचार एखाद्याला कळतात म्हटल्यावर मनातल्या विचारांना दूर सारणं सक्य तरी आहे का ? विचारांना जितकं बाजूला सारण्याचा प्रयत्न करावा तितके ते उसळी मारून वर येतात. मी हे सगळं प्रोफेसरांसमोर ठेवलं.
" ठीक आहे. म्हणजेच आता तू जी माहिती मला देशील त्यावरच मी तुला मदत करू शकेन, नाही का ? माझा सोर्स किंवा मध्यस्थ म्हणून तूच आहेस आता. "
इतकं बोलून आम्हाला बसायची खूण करून ते आत गेले. ते पुन्हा बाहेर आले तेव्हा त्यांच्या हातात काही पुस्तकं आणि एक पत्त्यांचा कॅट होता. टीपॉयवर ते सगळं ठेऊन ते पुस्तकात गढून गेले. काही पानं चाळत, काहींमधे बुकमार्क्स टाकत ते काही तरी शोधत होते.
" रचना मृत्यूची आगाऊ सूचना. याबद्दल ज्या काही केसेस आजवर अभ्यासल्यात त्या स्वतःबद्दल आहेत. त्यातही स्वप्नात अशा सूचना मिळाल्याच्या केसेस आहेत. पण दुस-याच्या मृत्यूचं प्रेडिक्शन ते ही इतक्या अचूक, तारीखवार सांगणं ही केस खरंच नवीन आहे. आपल्या या राहुलची भेट झाली असती तर एका अद्भुत अशा शक्तीचा वैज्ञानिक खुलासा करण्याची संधी आपल्याला मिळाली असती. "
मी काय बोलावं हे न समजून फक्त ऐकत राहीले. जेव्हां एखाद्या विषयातली अधिकारी व्यक्ती समोर असते तेव्हां काहीही न बोलणं हेच योग्य धोरण असतं. उत्तम श्रोता असणं हे केव्हाही चांगलंच. त्याने दोन शब्द कानावर पडतात, माहितीत भर पडते, विचार समृद्ध होतात असे झाले तर फायदेच होत असतात. उत्तम वक्ता होण्यासाठी आधी उत्तम श्रोता असणं गरजेचंच नाही का ?
" म्हणजे राहुलला या ज्या शकी आहेत त्या ख-या असाव्यात कि नाही ? "
" मी तुला आधीच म्हणालो ना, कि विज्ञान काहीच नाकारत नाही. त्याचबरोबर जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत ते स्विकारीतही नाही. आपण ज्याला पूर्वाभास म्हणतो तसंच काहीसं असावं हे. अर्थात आता काही बोलणं योग्य नाही. जे बी -हायेन यांनी पूर्वाभ्यासाला मान्यता दिलीच आहे. इतकंच नाही त्यांनी या अभ्यासाला मान्यता मिळावी म्हणून खूप कष्ट घेतले. मुख्य म्हणजे डेटा जमा केला. प्रश्नावली बनवल्या. अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून आज त्यांच्या नावावर आज ३३ मानसशास्त्रीय चाचण्या जमा आहेत. तुला माहीतच असेल मानसशास्त्रामधे चाचण्यांना मान्यता मिळण्याची प्रोसेस किती किचकट आहे. त्यातूनच आ़ज पॅरासायकॉलॉजी ही शाखा अस्तित्वात आली. हे नाव देखील -हायेन यांनीच दिलंय "
" तुला हे सगळं सांगायचा उद्देश लक्षात आलाच असेल. नाही का ? राहुलची केस स्टडी करण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे. तुला त्याला इथे आणण्यात अडचण येत असेल तर मी त्याला भेटायलाही जाईन. यासाठी तुझी परवानगी आवश्यक आहे "
"त्यात काय सर ! तुम्हाला हवं तेव्हां तुम्ही राहुलला भेटू शकता. अडचण इतकीच आहे कि त्याच्यापासून अपून काहीच राहत नाही. "
" अच्छा ! आता मला हे सांग, त्याचे किती अंदाज आजवर अचूक ठरलेत असं तुझं म्हणणं आहे ? "
" दोन तर नक्कीच. आणखीही घटना असू शकतील. "
" तुला कसं कळालं ते ? "
" इतरांकडून "
" तुझ्यासमक्ष झालेली घटना नाही का एखादी ? "
" श्री. सिंग, भारतीय उच्चायुक्त यांच्याबाबतची. पण तिथं त्याचा अंदाज साफ चुकला. त्यांच्या बाळाबद्दलचं भविष्य त्याने सांगितलं. प्रत्यक्षात मृत्यू झाला तो सिंगसरांचा "
" हे कदाचित ज्या पूर्वसूचना मिळतात त्याचा नेमका अर्थ लावता न आल्याने झालं असावं "
" पूर्वसूचना ?"
" हो ! म्हणजे हे बघ, कित्येकदा आपल्याला स्वप्नं पडतात. त्या स्वप्नांचा तसा आपल्या बाबतीत घडलेल्या घटनांशी कसलाही संबंध नसतो. स्वप्नं हे देखील मानसशास्त्राच्या दृष्टीने एक आव्हानच आहे. स्वप्नांचा अर्थ सांगणा-या काही वेबसाईटस आहेत. आणि तिथं लोक स्वप्नांचे अर्थ विचारत असतात. काही लोकांना त्याप्रमाणे अनुभव आल्याच्या देखील घटना आहेत "
" ही स्वप्नं म्हणजे पूर्वसूचनाच. राहुलच्या बाबतीत या पूर्वसूचना मिळण्यासाठी त्याला स्वप्नं पडण्याची गरज नसावी असं तुझ्या माहीतीवरून वाटतंय. "
बोलता बोलता प्रोफेसरांनी त्यांच्याकडचे कार्डस टेबलावर ठेवले . ठेवताना त्यांनी त्याच्या दोन ओळी केल्या. पहिल्या ओळीतले कार्डस झाकलेले म्हणजे क्लोज्ड या अवस्थेत ठेवले होते तर खालच्या ओळीतले कार्डस उलटे (ओपन) करून ठेवले होते. क्लोज्ड कार्डसची संख्या दहा होती तर ओपन कार्डसची संख्या फक्त पाच होती. त्या कार्डांवर प्रत्येकी वर्तुळ, स्टार, चौकोन, स्पायरल लाईन्स आणि क्रॉस होते.
" हा नेहमीचा पत्यांचा कॅट नाही. याला झेनर कार्ड्स म्हणतात. ही एक ईसपी टेस्ट आहे. खाली दिलेल्या कार्डांमधे जे आकार आहेत तेच वरच्या कार्डांवर आहेत. अर्थात ते खालच्या बाजूला असल्याने आपल्याला दिसत नाहीत. एकंदर पंचवीस पत्ते प्रत्येक सेट मधे आहेत. त्यातले दहा पत्ते आता आपण वरच्या ओळीत ठेवले. खालचे आकार पाहून आपण त्या आकाराचा पत्ता वरच्या लाईनमधे कुठे आहे हे सांगायचं. "
"कर सुरूवात रचना "
" म्हणजे ? मी नाही समजले मला काय करायचंय ते "
" हे बघ , या वरच्या ओळीत कुठले पत्ते आहेत हे तुलाही माहीत नाही आणि मलाही. आता तू अशी समोर बस बघू. ठीक . हे बघ, हा पत्ता मी उघडला, पाहीला आणि ठेवला. आता तुला तो पत्ता कुठला त्याचा अंदाज करायचा आहे "
" क्रॉस ? "
" आता दुसरा पत्ता "
" क्रॉस ? "
"तिसरा "
" सर्कल "
या पद्धतीने दहाही पत्ते प्रोफेसरांनी पाहीले आणि मी त्याचा अंदाज सांगत राहीले.
"दहापैकी दोन पत्ते बरोबर ओळखलेस " प्रोफेसर हसत हसत म्हणाले " आता आपण जो प्रयोग केला त्यात मी सेंडर होतो आणि तू रिसीव्हर. आपल्या दोघात कुठली अतींद्रिय शक्ती आहे का, टेलीपथीचं कनेक्शन आहे का हे या प्रयोगाद्वारे सिद्ध करता येतं. आता तुझ्या जागी तुझा तो राहुल असता आणि माझ्या जागी तू असतीस तर मात्र रिझल्ट्स वेगळेच आले असते. "
" पण आपल्याला हे नाही पहायचं ना ? "
" रचना ! हे सगळं सांगण्याचा उद्देश इतकाच आहे कि तुला या शास्त्राच्या मर्यादा आणि उपयुक्तता या दोन्हीची माहिती व्हावी. यानंतर तू या मार्गाने जायचं किंवा नाही याचा निर्णय तू घेऊ शकतेस. "
वेळ संपल्याचीच ती सूचना होती. मला विचार करायला वेळ हवा होता आणि पुढच्या वेळेला अपॉइण्टमेण्ट घेऊन मी येणार होते.
या भेटीचा उपयोग झालाच. आतापर्यंत गूढ असं एक दडपण मनावर होतं ते हळूहळू कमी होत चाललं होतं.
----------------------------------------------
॒॒॒॒॒॒॒
" रच्यु ! मला ही तसंच वाटत होतं.. आफ्रिकेत ब्लॅक मॅजीक खूप चालतं. एखाद्या जाणकाराकडे आपल्याला गेलं पाहीजे "
ब्लॅक मॅजीक ! जॉन मला फ्ली मार्केटमधल्या त्या बाईबद्दल विचारत होता.
" नंदिनी, चल, आपल्याला फ्ली मार्केटमधे जायचंय. "
" अगं पण.. "
" चल म्हटलं ना ! आज गेलो नाही तर पुढच्या आठवड्यातच आपल्याला ती भेटेल. चल आधी "
मी नंदिनीला जवळजवळ फरफटतच गॅरेजमधे नेलं. हार्ले डेव्हीडसनची क्रूझर बाईक ! वॉचमनने चावी आणून दिल्यावर आम्ही दोघी त्या प्रचंड बाईकवर बसलो. एयरपोर्ट रोडकडून वाहणा-या त्या प्रशस्त रस्त्यावर आम्ही दोघी हार्ले डेव्हीडसन वर चाललो होतो, रस्त्याने जाणा-या येणा-यांच्या नजरा झेलत !
"हाय ल्युसी ! "
मला पाहताच ती तोंड भरून हसली. ल्युसी ! ही असली नावं खोटी असतात हे आता माहीत झालं होतं. तिचं मूळ नाव खूप विचित्र असणार होतं. ओडोंबो, मोगांबो असं काहीतरी ! आपल्या नावाची कदाचित त्यांना ला़ज वाटत असणार किंवा धंदा म्हणून कदाचित पण ल्युसी, मायकेल अशी नावं या लोकांनी धारण केल्याचं दिसून येतं. डिटेक्टीव्ह जॉनसारखे काही धर्मांतरामुळे नाव बदललेले पण कमी नाहीत. जॉनची आठवण होताच मला आठवल.. त्या दिवशीही न्यू इयरला तो माझी गाडी पाहून आलेला आणि नंतर फ्ली मार्केटमधे मी कशाला येते असं विचारून गेला. हा माझ्यावर पाळत वगैरे ठेवतो कि काय ?
मी चहूबाजूला पाहीलं. जॉनचा सहाफुटी देह दिसला नाही. अर्थात इथं सहा फुटीउंची अगदी कॉमन असल्याने तो गर्दीत उठून वगैरे दिसण्याचा प्रश्नच नव्हता. पण किमान आमच्या पाठलागावर तो नाही याची खात्री करून घेणं आवश्यक होतं.
ल्युसीच्या कानाला लागून मी माझ्या कामाची कल्पना दिली. तिच्या चेह-यावर काही क्षण विचित्र भाव आले पण तसं काही न दाखवता ती ग्राहकांचं लक्ष आकर्षित करत राहीली. मला तिने थांबायचीही खूण केली. तिला बराच वेळ लागणार असं दिसताच मी नंदिनीसोबत फ्ली मार्केटमधे फिरत राहीले. स्वस्तात वस्त खरेदी करण्याची हौस असलेले कॉलेजकुमार, निम्नवर्गीय लोक ते दुर्मिळ वस्तू शोधणारे हौशी पण श्रीमंत लोक अशा सर्वांची पसंती या मार्केटला होती. पण आठवड्यातून ठाराविक दिवसच फ्ली मार्केट इथं भरत होतं. या शिवाय सुट्टीच्या इतर दिवशी असायचं.
दीड दोन तास असेच घालवल्यावर मी पुन्हा परतले तेव्हां ल्युसीचा चेहरा गंभीर दिसत होता. तिने तिचं "दुकान" आवरतं घेत असल्याची खूण केली.
" चल , कुठेतरी निवांत बसूयात "
नेमकी आज बाईक आणलेली असल्याने तिघी कशा मावणार ?
आम्ही मग स्टेडीयमच्या मागच्या बाजूला जाऊन बसलो. ही काही चांगली जागा नव्हती. बरेच कपल्स इथं येऊन बसायचे. आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पाय-यांवर बसलो. आमच्या गप्पांना सुरूवात झाली. आवाज कुणाला ऐकू जाणार नाही अशा पद्धतीने आम्ही बोलत होतो.
ल्युसीला आतापर्यंतच्या सगळ्या घटना सांगितल्यावर जेव्हां डोक्यात वाजणारे ढोलाचे आवाजाबद्दल सांगितलं तेहा ती सावध झाली. माझा हात हातात घेऊन तिने नीट तपासणी केली. कान, केस सगळं काळजीपूर्वक पाहीलं. मग खूप वेळ मान नकारार्थी हलवत राहीली.
"काय झालं ल्युसी ? "
" उद्या माझ्या घरी येशील ? "
प्रश्न नव्ह्ता तो. एक प्रकारे सूचना होती. निदान मला तरी तसंच वाटलं. मी नंदिनीकडे पाहीलं. तिने फक्त खांदे उडवले. कदाचित दुसरं काय हातात आहे असं तिला म्हणायचं असेल. तिचा नीट पत्ता घेऊन आणि उद्या नऊच्या सुमारास येतो असं सांगून आम्ही तिचा निरोप घेतला. नम्रताला तसं लगेच कळवूनही टाकलं.
एअरपोर्टकडून केपटाऊनला येणा-या रस्त्यावर एका ठिकाणी डाव्या हाताला पत्रे आणि कापडी बॅनर यांच्या सहाय्याने झाकलेला एक प्रचंड मोठा भूभाग आहे. पूर्वी मला नवल वाटायचं त्याबद्दल. नंतर कळालं ती कृष्णवर्णीय लोकांची वस्ती आहे म्हणून. शहरात प्रवेश करण्यापूर्वीच त्या विद्रूप झोपडपट्टीचं दर्शन नको म्हणून पूर्वीच्या ब्रिटीश प्रशासनाने ती झाकून टाकली होती. त्यांना हटवलं नव्हतं हे विशेष ! हटवण्याचा प्रश्नच येत नव्हता. घरकामाला, चतुर्थ श्रेणीच्या नोक-यांसाठी माणसं कुठून मिळाली असती मग ? आणि त्यांना हटवावं तर राहण्याची सोय करायचीही तयारी नव्हती त्यांची. स्वतः नरकात राहून दुस-यांची घरं चकचकीत करण्यासाठी अशांची गरज पडतेच. नकळत मुंबईतल्या झोपडपट्ट्या डोळ्यासमोर येऊन गेल्या.
सकाळी पावणेनऊलाच ल्युसीच्या घरी मी पोहोचले. पत्ता सापडायला विशेष कष्ट पडले नाहीत. इथं आल्यापासून देजावू चं फीलिंग येत होतं. पूर्वी कधीतरी इथं येऊन गेल्यासारखं. पण कालच्या गप्पांचा तो परिणाम असावा असं वाटत होतं.
ल्युसीचं घर दोनमजली होतं. अशा ठिकाणी बोलावल्यावर येणारं ओशाळेपणाचा लवलेशही तिच्या चेह-यावर नव्हता. तिच्याकडे बरेच जण येत असावेत असं आजूबाजूच्या लोकांच्या देहबोलीतून जाणवलं. तिचा पत्ता माझ्यासारखी मुलगी विचारतेय याचं आश्चर्य कुणाच्या चेह-यावर दिसलं नव्हतं. खरंतर काम माझंच असल्यानं तिला का अवघडल्यासारखं वाटावं ? तिला या वस्तीची सवय नसेल का ?
तिने जिन्यावरून वरच्या खोलीत जाऊन बसायची खूण केली. ती एक खास खोली होती. बरंचसं पूजेचं साहीत्य, बाहुल्या, मुखवटे यावरून ल्युसीच्या धंद्याची कल्पना येत होती. ल्युसी ब्लॅक मॅजीक करत होती हे जॉनचं म्हणणं खरंच होतं.
जिन्यावर पावलं वाजली आणि चित्रविचित्र दर्प नाकात शिरले. पाठोपाठ ल्युसीचा थुलथुलीत देह वर आला. तिच्या हातात वेगवेगळ्या रंगाच्या उदबत्त्या होत्या. त्या तिने खोलीभरून फिरवल्या. मग एक म्र्ती काढून तिच्यापुढे कसलेसे विधी केले. यावेळी ती खूपच वेगळी दिसत होती. मी हे असं या ठिकाणी येणं एरव्ही माझ्याच बुद्धीला पटलं नसतं. पण एकतर नाईलाज होता आणि दुसरं म्हणजे मनाचे इशारे ! मन बुद्धीला फसवतं कि बुद्धी मनाला ?
तिने कसल्याशा राखेने एक मोठं वर्तुळ जमिनीवर काढलं. मग त्यावर सावकाश एकेक करून मेणबत्त्या लावल्या. काही न बोलता आमच्यावर कसलंसं द्रव्य शिंपडून त्या गोलात बसायची खूण केली आणि ती स्वतःही त्यात येऊन बसली.
" आता सांग मला सविस्तर "
" पण हे सगळं काय आहे ? "
" इथं आता आपल्या व्यतिरिक्त कुणीच नाही. या वर्तुळात आपण सुरक्षित आहोत. आपण बोललेले शब्द त्यांच्यापर्यंत जाणार नाहीत कि त्यांचे कसलेही सिग्नल्स आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत "
वर्तुळात आल्यापासून खरंच एक शांतता मिळत होती. डोक्यातला कोलाहल थांबला होता. आता ते ढोलाचे आवाज ऐकू येणार नाहीत..का कुणास ठाऊक याची खात्री वाटत होती.
तिला पुन्हा राहुल आणि इतर घटनांबद्दल सांगितलं. तिने ते लक्षपूर्वक ऐकलं. मग माझे हात हातात घेऊन कसलेसे मंत्र म्हणायला सुरूवात केली. थोडाच वेळ.
" काही नाही. अजून कसलाही विधी केलेला नाही. तुझी परीक्षा आहे ही "
" माझी ? का ?"
" पोरी ! तुला धोका आहे. तुझ्यावर चेटूक झालंय याआधी. तू ब्लॅक मॅजीकची शिकार झालेली आहेस. आणि माझा अंदाज खरा असेल तर तुझ्यावर व्हुडू चे प्रयोग झालेत. "
" व्हुडू ? "
" सगळ्यात घातक चेटूक ! "
" अरे देवा ! "
खूप वेळ शांततेत गेला. मग ल्युसीने परिस्थिती आपल्या नियंत्रणात घेतली.
******************************************
प्रकरण सहा
" संदीपा, निघायचं ना ? "
" जॉन हे तरी वाचू देत ना
" काय वाचायचं त्यात ! आता कळेलच ना सगळं."
" धिस इज नॉट डन जॉन. तुला आणि प्रोफेसरांना सगळं माहीत आहे म्हणून मला काय फरफटत नेणार का सगळीकडे ?"
" हे बघ आपल्याला आता प्रोफेसरांच्या घरी जेवायला जायचंय. त्याआधी एयरपोर्ट रोडवरच्या ऑफीसमधे आपल्याला जायचंय. रचनाचं ऑफीस, संगणक नीट बघ तू. उद्या मीटिंग आहे आणि लगेचच अहवाल देखील बनवायचाय आपल्याला "
" नाही आताच सांग. हे काय चाललंय जॉन ? "
" सांगतो म्हणालो ना !"
" जॉन धिस इज टू मच . मला कशाचीही टोटल लागत नाहीये "
" बरं ठीक आहे. रात्री प्रोफेसरांनी बोलवलंय. त्यावेळी तुला कळून जाईल. उद्या बॉसने मिटींग बोलवलीये अहवाल बनवण्यासाठी "
"अहवाल ? "
"मॅडम, भारताच्या हाय कमिशनरचा मृत्यू ही साधी गोष्ट नाही. तिकडच्या मीडियाने लावून धरलय सगळं. आता एक वर्ष होत आलं म्हटल्यावर पुन्हा एकदा फोन येऊ लागलेत. एका न्यूज चॅनेलचे रिपोर्टर्स स्टोरीच्या आशेने कालच हेडक्वार्टर मधे आले होते. आज केपमधे दाखल झाले असतील "
" अरे पण त्यांचा मृत्यू हार्ट अॅटॅकने झाला ना ? "
" संदीपा ! ते खरंच आहे. आपणही तेच तर सांगतोय, पण असं आहे, शहांनी जी जागा खरेदी केली त्याच्या कमिशनचा चेक सिंग साहेबांच्या बायकोच्या नावाने भारतातल्या बँकेत जमा झालाय. भारतीय चलनात दहा कोटी रूपये ! "
" माय गॉड "
" हा चेक सुबोध एंटरप्रायजेसच्या खात्यातून जमा झालाय "
" म्हणजे व्होरांना उद्ध्वस्त करण्यात सिंग साहेबांनी भूमिका बजावलीये ? "
" तसं आताच म्हणता येत नाही. पण जागेच्या व्यवहारात तर नक्कीच ! "
" जॉन तू नेहमी हातचं राखून का बोलतोस ?"
त्यावर जॉन फक्त गडगडाटी हसला.
" जॉन, तू बराच पुढे आहेस तपासात. पण त्यातलं बरंचसं रिपोर्ट्समधे नाही असा मला संशय आहे. प्रोफेसरांनाही तू सगळी माहीती देत असशील यावर माझा विश्वास नाही "
" संदीपा..."
"जॉन, माझ्यापासून लपवू नकोस काही "
" अॅक्च्युअली प्रोफेसरांनी या नोटस क्रमाने काढल्या म्हणून इथपर्यंत तुला सलग कळालं नाहीतर तिच्या डायरीत कुठलाही क्रम नाही. जसं आठवेल तसं लिहीलय तिने. प्रोफेसरांनी मागचा प्रसंग आणि पुढच्या प्रसंगातली संगती जोडून घेत ते पूर्ण केलंय. रहस्यकथांमधे नाही का मागे सोडून दिलेलं प्रकरण पुढे सुरू होतं तसं "
" म्हणजे प्रोफेसर रहस्यकथा वाचतात तर " संदीपा हसत म्हणाली.
" माहीत नाही. पण आता प्रोफेसरांना वेळच मिळणार नाही नोटस काढायचा. म्हणूनच या केसमधली संगती लावणं आपल्या सर्वांनाच गरजेचं आहे. मागचा भाग लक्षात ठेवायचा आणि पुढे जोडून घ्यायचा. लक्षात ठेव हं संदीपा.. "
जॉन मिस्कील हसत होता. त्यातली मेख संदीपाच्या लक्षात आली नसावी.
" आता खरंच वेळ नाही आपल्याकडे. जर का यातलं काही लीक झालं कि हा इंडियन मेडीया अशक्य आहे. २४ तास हीच स्टोरी राहील त्यांच्याकडे. आणि इथंही त्यांचीच री ओढली जाईल असं दिसतंय. "
" का बरं ?"
" तिथं गोंधळ सुरू झाला कि कृष्णवर्णिय कामगारांच्या हत्येचा इश्श्यू इथं गरम होईल. दोन्हीमधे मरण आपलंच ना ?"
संदीपाने समजलं न समजलं अशा अर्थाची मान हलवली. एयरपोर्ट रस्ता येईपर्यंत तिने नोटस वाचायला सुरूवात केली. ल्युसीच्या इथे पुढे काय झालं... तिला भयंकर उत्सुकता लागून राहीली होती.
*******************
रात्री प्रोफेसरांकडे जॉन आणि संदीपा जेवायला गेले होते. संदीपाने दिलेल्या लिस्टप्रमाणे मिसेस व्हॅटमोर यांनी मसाले आणले होते. बंगाली पद्धतीने केलेले मासे आणि भात याचा घमघमाट जॉनला अस्वस्थ करत होता. त्याने तसं बोलून दाखवल्यावर सगळेच हसले.
"प्रोफेसर जॉनचं नाक खूपच तीक्ष्ण आहे "
" ते पाहीलंच मी. अतिशय तल्लख बुद्धीचा कॉप आहे जॉन "
" प्रोफेसर ! जेवण झाल्यावर आता या केसवर तुम्ही प्रकाश टाका "
बंगाली रश्शाचा रंग पाहूनच सगळे खूष झाले होते.
" तुला माहीतिये का संदीपा ! बंगाल मधे मी आवर्जून मासे खाल्ले. पहिल्यांदा डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. पण त्याचबरोबर ही चव पण अशी काही जीभेवर रेंगाळली कि त्यानंतर बंगाली \ भारतीय पद्धतीचं जेवण हा माझा वीक पॉईण्ट बनला. तुझी आई कोकणस्थ नाही का ? तिथली चव पण चाखलीये बरं का मी. त्या नारळाच्या दूधाला काय म्हणतात गं ? मी घरी पण ट्राय केलं पण जमलं नाही आणि सुझनची बोलणी खावी लागली ती वेगळीच " प्रोफेसर भरभरून बोलत होते.
त्यावर मिसेस व्हॅटमोर हसत हसत म्हणाल्या " संदीपा, डॅनी असाच आहे. पन मला भीती वाटते गं लाल रंगाची " संदीपा फक्त हसली.
संदीपाच्या हाताला चव होती.
जॉन डोळे पुसत पुसत आणखी मागून घेत होता. ते पाहून प्रोफेसर गालातल्या गालात हसत होते. सुझन आंटीच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या आणि त्या हातानेच नको नको म्हणून खूण करत होत्या.
त्यांना माशाचे तुकडे धुवून घेऊन फक्त भाताबरोबर खाताना पाहून प्रोफेसरांना हसायला आलं. त्यावरून त्या दोघात शाब्दिक चकमक उडाली.
आता त्यांना हसायची पाळी जॉनची होती.
"संदीपा, माझ्या बायकोला , मेरीला पण शिकवशील का ?"
" शिकवीन शिकवीन , पण फीज द्यावी लागेल "
" माझ्या मुलाला मासे खूप आवडतात संदीपा "
" ओहो, मग फीज नाही.. फ्री शिकवीन रे "
" जॉन, मुलाला घेऊन ये माझ्याकडे "
" प्रोफेसर, माझ्या मुलासाठीच मला वेळ नाही बघा "
जॉनच्या मुलाचा उल्लेख झाल्याने संदीपाला राहवलं नाही.
" काय होतं त्याला ? "
" आवाज ऐकू येतात त्याला दूरचे..."
" स्किझोफ्रेनिया ?"
" संदीपा ! पेशंटला पाहिल्याशिवाय, माहिती घेतल्याशिवाय अंदाज बांधत जाऊ नकोस "
संदीपाला मेल्याहून मेल्यासारखं झालं. ऩकळत ती प्रोफेसरांसमोर बोलून गेली. इतरांचं ठीक होतं, पण संदीपा या शाखेची विद्यार्थिनी म्हटल्यावर तिला बोलणी बसणं स्वाभाविकच होतं.
जेवणं झाली तसं सगळे हॉलमधे येऊन बसले.
" जॉन तुझा ब्लॅक मॅजीकवर विश्वास आहे ? "
" एक कॉप म्हणून नाही "
" म्हणजे जॉन म्हणून आहे...."
"प्रोफेसर .. मी इथं जन्मलो. वाढलो. ही संस्कृती माझ्या नसानसात वसलीय" दुखावलेल्या स्वरात जॉन बोलत होता " तुमच्या येण्याने आमच्या संस्कृतीवर बरेच आघात झाले. काही चांगले तर काही वाईट पण. तीन पिढ्यामागे धर्म बदलूनही मी माझी संस्कृती विसरू शकलो नाही "
" आय अंडरस्टँड जॉन "
" लहानपणापासून पाहीलेलं, अनुभवलेलं मी कसा नाकारू प्रोफेसर ? "
" हम्म.."
" असो. प्रोफेसर सुरू करा आता "
" मला एक सांग, मी मागवलेली माहिती आणलीस का ? "
" तुम्ही हुकूम करायचा प्रोफेसर. "
प्रोफेसर उठून उभे राहीले. पॅरासायकॉलॉजी बद्दल त्यांनी रचनाला दिलेलं लेक्चर पुन्हा एकदा संदीपा आणि जॉनसाठी रिपीट केलं. जॉनसाठी ते नवीन नव्हतं इतकंच.
" सर, म्हणजे हे पूर्वाभासाचं प्रकरण आहे का ?"
" ऑक्टोबर मधे जेव्हां मी एका प्रकरणाची माहीती घेतली तेव्हां मी चाटच पडलो. अशी केस यापूर्वी कधीही झाली नव्हती. एका व्यक्तीने ट्विटर वर तो मरणार असल्याचं ट्विट केलं. त्यात तो कुठल्या लॉजमधे कशा पद्धतीने आणि कुठल्या तारखेला मरणार आहे हे लिहीलं होतं. "
" हो . ऐकलंय त्याबद्दल. पण नंतर काय झालं त्याचं ? "
" तो ज्या दिवशी मरणार होता त्या दिवशी त्याचं मित्रांसाठी शेवटचं ट्वीट होतं त्यात मरणाच्या तारखेमधे पंधरा दिवसांचा बदल सुचवला होता. "
"पंधरा दिवसांनी तो त्याच नावाच्या लॉजमधे सांगितलेल्या दिवशी ( बदललेल्या तारखेला ) आणि सांगितलेल्या वेळेला ट्विट केल्याप्रमाणे हार्टअॅटॅकने मेला ......! "
"हे कसं झालं असावं "
" गूगल वर सर्च दिलात तर तुम्हाला ही माहीती मिळेल. मी त्याच्या मित्रांना संपर्क साधला तेव्हा त्याने अशाच प्रकारे काही लोकांच्या मृत्यूची भविष्ये सांगितली होती. "
" मग ?"
" त्यातली काही खरी झाली.... ! "
" ओह नो "
" जॉन काय म्हणशील याबद्दल ?"
" काहीच नाही. "
"म्हणजे?"
" प्रोफेसर, तुमच्याचसारखं .. माहीती घेतल्याशिवाय काहीच सांगता येत नाही " डोळा मारत जीन म्हणाला. प्रोफेसर हसले.
" सर ! या व्यक्तींना असं वाटत असावं कि आपण आता मरणार आहोत, आणि या भीतीपोटी ती वेळ जवळ येताच प्रचंड दडपणाखाली त्यांचा मृत्यू झाला असावा. मानसशास्त्राला अशा केसेस नव्या नाहीत"
" संदीपा, ते ठीक आहे. पण इतरांच्या भविष्याबद्दल काय ?"
,
,
" आपल्या केस मध्ये राहुल ? "
प्रोफेसर हसले.
"जॉन ! आता बोल तू "
जॉन ने पॉझ घेतला.
"प्रोफेसर ! मी या राहुलबद्दल माहीती काढली. ज्या ज्या कामगारांच्या मृत्यूच्या घटना झाल्या त्यासंबंधात माहीती काढली. रचनाच्या एचआरडी मधे जाऊन कंपनीच्या एम्प्लॉईज रजिस्टरची माहिती घेतली "
" मग ?"
" प्रोफेसर ! धक्कादायक माहिती आहे. हा राहुल कधीच या कंपनीत कामाला नव्हता ! इतकंच काय त्याच्याबद्दल कुणालाही कसलीही माहिती नाही. याबाबतीत रचनाने लिहीलेले सगळे प्रसंग काल्पनिक आहेत "
हा मात्र प्रचंड मोठा धक्का होता. अगदी प्रोफेसर सुद्धा त्यातून सावरले नाहीत. संपूर्ण केसला आता यु टर्न मिळाला होता. इतक्या दिवसांची मेहनत वाया जात होती.
" मला शंका आलीच होती. तिच्या बोलण्यात असंबद्धतता येत होती कधी कधी. "
ते मान हलवत राहीले.
" म्हणूनच ती राहुलला घेऊन ये म्हटलं कि विरोध करायची. "
"पण जॉन, नंदिनीला माहिती असेलच ना त्याच्याबद्दल. ती राहुलबद्दल तिच्याजवळ कितीतरी बोलली होती. जर राहुल अस्तित्वातच नाही तर रचनाच्या मेंदूच्या कार्यपद्धतीप्रमाणे ती नंदिनीजवळ कधीही राहुलबद्दल बोलणार नाही "
" म्हणजे प्रोफेसर, तुमच्या अजून लक्षात आलं नाही ? "
" काय ?
"अहो ! नंदिनी पण कधीच अस्तित्वात नव्हती "
" ओह गॉड ! "
सर्वांना धक्क्यांवर धक्के बसत होते. रचनाची केस किती कॉम्प्लिकेटेड व्हावी याला काही मर्यादा ?
---------------------------------------------------------
जॉन ने घाई केली म्हणून संदीपा चिडली होती.
तरी तिने नोटस सोबत घेतल्या होत्या. एयरपोर्ट रोडच्या रचनाच्या ऑफीसमधे पोहोचेपर्यंत जितकं वाचून होईल तितकं ती वाचत होती.
" व्हुडू ? "
" सगळ्यात घातक चेटूक ! "
" अरे देवा ! "
खूप वेळ शांततेत गेला. मग ल्युसीने परिस्थिती आपल्या नियंत्रणात घेतली.
" रचना तुझ्यावर हिप्नॉटिझम केलं गेलय आणि त्या वेळी तुझ्यावर नियंत्रण मिळवलं गेलंय "
" हिप्नॉटिझम ?"
"व्हुडूवाले हिप्नोसिस मधे एक्सपर्ट असतात. व्हुडू हे असं चेटूक आहे ज्यात ज्याच्यावर ते झालंय त्याच्याकडून वाट्टेल ते घडवून आणलं जातं "
"पण कशावरून माझ्यावर चेटूक झालंय"
"तुझे केस पाहीले मी. एक बट तिच्या स्कीन सहीत काढली गेलीय ! "
"........................."
" केस, स्कीन आणि रक्त. आता ते एका बाहुलीला लावलं गेलं असणार. त्या बाहुलीला दिलेले सिग्नल तुझ्यापर्यंत पोहोचत असणार आणि ते सिग्नल मिळाले कि तू हिप्नेसिसखाली वावरत असणार "
" ओह नो !"
" तुझ्यावर केलं गेलेलं चेटूक माझ्या लक्षात येत नाहीये. खूप एक्सपर्टचं काम आहे. व्हुडू वाल्यांची संघटना असते. शक्यतो ते एकमेकांची जादू कुठल्याही परिस्थितीत छेदत नाहीत. तसं केल्यास त्याचं वाटोळं होतं. "
"म्हणजे तू पण..?"
" नाही मी नाही. मी आपली काळी जादू शिकलेय ते लोकांवर काय जादू झालीये हे सांगण्यासाठी. कुणाचं वाइट होण्यासाठी मी हे काम करत नाही. व्हुडू देखील मी याचसाठी शिकलेय. तुझ्यावर कुणी चेटूक केलं हे समोर आलं कि त्यावरचा उतारा पण सांगता येईल."
"पण हे कशासाठी ?"
"मी तरी काय सांगू ? पण मला असं वाटतंय कि त्यांची जादू मधेच छेदली जातेय. त्यामुळे ते चिडून आहेत. कदाचित तुझ्या जीवावर उठणार आहेत. ते ढोलाचे आवाज हेच तुला संमोहीत करायचे सिग्नल असावेत. ज्यावेळी तुला संमोहीत केलं त्याच वेळी ढोलाचे आवाज तुला ऐकवले गेले असणार "
" आणि ते राहुलचं प्रेडिक्शन... "
" त्याबद्दल मला काहीच सांगता येत नाहीय्ये. कदाचित तो त्यांचा हस्तक असावा "
" हस्तक ?"
"हो हस्तक. हस्तक आजूबाजूला वावरतात. ते आजूबाजूला असताना सिग्नल्स पाठवता येतात. एकतर बाहुली किंवा माध्यम. फक्त माध्यमात आणि हस्तकात टेलिपथी असावी लागते "
"माध्यम ?"
" माध्यम. तू माध्यम आहेस "
" मी आणि माध्यम ?"
ल्युसी हसली.
"म्हणजे त्यांचं काम करण्यासाठी ?"
" तू माध्यम म्हणजेच लक्ष कुणीतरी असणार "
" काय म्हणायचंच्य ल्युसी ?"
" मला वाटतं रचना, राहुलने प्रेडिक्ट केलेल्या एक्सपायरी डेटस आनि तुझा जवळचा संबंध आहे. कदाचित त्यांचे खून झाले असावेत "
" ल्युसी काय बोलतेस तू ?"
" माफ कर रचना. मला नक्की सांगता येत नाही पण तुला त्यांनी त्यांची एक्सपायरी डेट सांगायला लावली असेल आणि त्या दिवशी तिथं असं काहीतरी घडलं असेल कि .... "
" ओह माय गॉड ! "
" किंवा त्यांच्याशी टेलिपथी प्रस्थापित केली गेली असेल. ती ही तुझ्याच करवी. आणि नंतर त्या माध्यमातून त्यांनी काही केलं असावं. काहीही. मेडिकल रिपोर्ट हार्टअॅटॅक सांगतो पण त्याचं कारण नाही सांगू शकत "
" ल्युसी तू मला खूनी ठरवतेस "
" रचना. प्लीज. मी तुला सावध करतेय. खून कुणीतरी घडवतंय. तुझा वापर त्यासाठी होतोय. यात तुला अडकवण्याचंही कारस्थान आहे "
,
,
,
,
" नंदिनी ! प्लीज हेल्प मी "
" रच्यु ! मी आहे तुझ्यासोबत. घाबरू नकोस "
"एक मिनिट ! "
ल्युसीने कसलातरी झाडू आणला. त्याने माझ्या अंगावर झटकल्यासारखं केलं. मग मला एका ग्लासातून थोडंस पाणी आणुन दिलं. त्यात कसलीतरी पावडर मिसळलेली दिसत होती .
मी ते पाणी प्यावं कि नको हा विचार करत होते पण ल्युसीने माझ्या खांद्यावर हात ठेवला. तिच्या डोळ्यात आता फक्त दयेचे भाव होते. विचार करत करत मी ग्लासातलं पाणी पिऊन टाकलं.
मला आता खूपच तरतरीत वाटू लागलं होतं.
" काही काळ तरी तुला त्यांच्यापासून लपून राहता येईल. पण नेहमीच नाही. या पाण्याचा प्रभाव संपल्यावर पुन्हा तुझ्याशी त्यांचं कनेक्शन प्रस्थापित होईल. त्यानंतर तू पुन्हा त्यांच्या ताब्यात जाशील. तोपर्यंत आपल्याकडे थोडा वेळ आहे "
ल्युसीने मग माझं डोकं दाबून दिलं. खूप बरं वाटलं तिच्या या कृतीने. खूप रिलीफ मिळाला. बरेच दिवसांच्या आजारातून उठल्यासारखं वाटत होतं.
मग मला का कोण जाणे कुणीतरी एक अनुवादीत इंग्लिश कविता म्हणतंय असं वाटू लागलं..
दि:कालातून आला, तो दि:कालातून आला
मृत्यूचे हे सत्य जगाचे, भविष्य घेऊन आला
अरे मानवा झुकेल आता त्याच्यापुढे हे शीश
ऐकशील ना आता आपुली मरणाची तारीख
माझ्या तोंडून हे कडवं ऐकताच ल्युसीने मला हलवलं. " कुठं ऐकलंस हे ?"
"नाही सांगता येत "
"ही आफ्रिकन दंतकथा आहे. मरणाचं भविष्य सांगणा-या मृत्युदूताची. त्याला देव मानलं जातं. खूष केलं जातं. त्याला खूष करणा-या प्रार्थनेचा हा इंग्लीश अनुवाद आहे."
"म्हणजे राहुल तो देव आहे ? "
"नाही. पण मृत्युदूताचा अंश जागवला गेलाय. नक्की माहीत नाही. राहुल नाही का ? काय फरक पडतो नावाने "
" मात्र आता ते चवताळून उठतील. काही काळ तू त्यांच्या नियंत्रणातून बाहेर होणार आहेस. निसटणार आहेस. हे त्यांना आवडणार नाही. माय गॉड ! मोठीच चूक झाली माझ्याकडून "
" रचना तुझ्या जिवाला खूप खूप धोका आहे "
ल्युसीने धोक्याची जाणीव करून दिली पण तिच्याकडे उपाय काहीच नव्हता. एखाद्या कॅन्सरने मरणा-या पेशंटला त्याच्या आजाराची जाणीव करून द्यावी आणि नंतर वैद्यकीय शास्त्रात या आजारावर अजून काहीच उपाय नाही हे ही त्याला सांगावं तशी माझी अवस्था झाली होती.
........................................................................................
रचनाचं ऑफीस येताच जॉनने गाडी पार्क करून संदीपाला उतरायचा इशारा केला. संदीपाने नोटस ठेवून दिल्या. ते आता रचनाच्या ऑफीसमधे शिरत होते
*****************************************
प्रकरण सात
" म्हणजे प्रोफेसर, तुमच्या अजून लक्षात आलं नाही ? "
" काय ?
"अहो ! नंदिनी पण कधीच अस्तित्वात नव्हती "
" ओह गॉड ! "
" जॉन ! मला नीट सांग बघू "
" मी नंदिनी बद्दल चौकशी केली. इथं कुठलीही नंदिनी म्हणून तिची मैत्रीण नाही. इतकंच काय कुणीच नंदिनी तिच्या कंपनीत कामाला देखील नाही आणि नव्हती. हे दोघे सोडले तर बाकिचे सगळे जण अस्तित्वात आहेत मी तिच्या शाळेतून माहिती घेतली. त्यावरून ती कुठे रहायला होती, तिचं लहानपण कसं गेलं. त्यांच्या परिस्थितीत कसा फरक पडला हे कळालं. "
" प्रोफेसर, त्तुम्ही जेव्हा तिच्या बाबतीत स्किझोफेनियाची शंका वर्तवली तेव्हाच माझ्या मुलाबद्दल तुम्हाला मी विचारलं होतं. तुमच्या म्हणण्याप्रमाणे स्क्रिझोफेनियाची लक्षणं जी माझ्या मुलात आहेत ती रचनात दिसली नाहीत मला."
" यू आर राईट जॉन. कदाचित ती सुरूवात असावी "
" प्रोफेसर , तिच्या शाळेतून मिळालेया माहितीनुसार तिच्या मित्र मैत्रिणींची माहिती घेतली. माझा भारतातला कॉण्टॅक्ट पुण्यात गेला होता. रचनाचं लहानपण चांगलं म्हणता येत नाही. तिच्या डायरीत तिच्या आईबद्दल उल्लेख आहे. पण तिची आई लहानपणीच गेली. तिला तेव्हां कळत होतं. आई आठवत असणार तिला. तिच्या बाबांचं कदाचित कूठे तरी अफेअर असावं. त्याबद्दल निश्चित माहिती मिळत नाही. पण बाबांनी लगेचच दुसरं लग्न केलं होतं. तिच्या आईचा मृत्यू कसा झाला हे कळत नाही. पण रचना खूपच डिस्टर्ब होती. "
" नवीन आई आल्यानंतर बाबांकडे पैसे खुळखुळायला लागले. रचनाची रवानगी पुण्याजवळच्या एका हिल स्टेशनच्या शाळेत झाली "
" पाचगणी का " संदीपाने विचारलं
" तुला कसं माहीत ? "
" मी तिथंच शिकलेय जॉन "
" दॅट्स गुड संदीपा, मला आधी माहीत असतं तर ?"
" तू आधीच विश्वासात घेतलं असतंस तर ? "
" हम्म .. प्रोफेसर ! मी ही माहिती मिळवण्यासाठी काय काय केलं , कल्पना नाही तुम्हाला. अगदी रचनाच्या लहानपणाच्या डिटेल्ससाठी तिथल्या पोलीस खात्याची मदत घेणं, काही प्रायव्हेट सोर्सेसची मदत घेणं हे सगळं सोपं नाही प्रोफेसर "
" हम्म .. त्याबद्दल आभार "
" मला लाजवू नका प्लीज. आभार तर मीच तुमचे मानायला हवेत प्रोफेसर. पण आमच्या खात्याला या मेहनतीची कल्पना नाही "
" जॉन ! " त्याच्या खांद्यावर हात ठेवत प्रोफेसर म्हणाले.
"हं.. तर पुण्यातल्या ज्या शाळेत रचना होती तिथं तिची एक बेस्ट फ्रेण्ड होती... तिचं नाव नंदिनी ! "
प्रोफेसरांचे डोळे चमकले.
" जॉन ! तिची आई गेली तेव्हां रचना किती वर्षांची होती ?"
" सात "
" हं ! म्हणजे तिला ती आठवत असणार. तिचा मृत्यूही आठवत असणार "
"हं "
" पण तरी तिच्या लिखाणात आईचा उल्लेख आहे. आहे ना अजब ?"
" सर... ती डीआयडी ची शिकार आहे ना ?"
"संदीपा ही खूपच इंटरेस्टींग केस आहे "
" मला समजेल असं बोला.. व्हॉट डीआयडी ?"
" डीआयडी ही टेस्ट आहे. मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणतात याला "
" म्हणजे ?"
" सोप्या भाषेत स्प्लिट पर्सनॅलिटी. संदीपा जॉनला समजावून सांग "
" जॉन ! एखादा मनुष्य एकापेक्षा जास्त व्यक्तीमत्व जगू लागतो तेव्हा तो या मानसिक आजारातून जातोय असं आपण म्हणू शकतो. त्याच्या कितीही प्रोफाईल्स असू शकतात. एक तो स्वतः आणि बाकि त्याने उभ्या केलेल्या "
" म्हणजे लोकांना फसवण्यासाठी "
"छे ! तो कुणालाच फसवत नसतो. त्याच्या मेंदूत कप्पे निर्माण झालेले असतात. थोडक्यात त्याच्या मेंदूतलं प्रोगामिंग असं काही बिघडलेलं असतं कि अचानक तो दुस-या व्यक्तिमत्वात शिरतो. त्याचा स्वभाव त्याने ठरवलेला असतो. त्याप्रमाणेच तो वागू लागतो. कदाचित तो क्राईमही करू शकतो. आणि जेव्हां मूळ व्यक्तिमत्वात परत येतो तेव्हां त्याला या कप्प्याचं त्या कप्प्याला काहीही माहीत नसतं. "
" म्हणजे त्याने दुसरंच कुणीतरी बनून खून केला तर.."
" हो, शक्य आहे. पण जेव्हां तो मूळ व्यक्तिमत्वात परत येईल तेव्हां त्याला त्याबद्दल काहीही माहीत नसतं. हे सिद्ध झालेलं आहे "
"जॉन संदीपाने उत्तम माहीती दिलीये बघ. या आजाराची शक्यता आपण गृहीत धरूयात. पण बघ ह. आतापर्यंत आपल्याला ज्या केसेस माहीत आहेत त्यात काय होतं ? तो स्वतःच त्या त्या भूमिका जगत असतो नाही का ?"
" हो. बरोबर सर "
" त्याला एका व्यक्तिमत्वात असताना दुस-याबद्दल काही ठाऊक असतं ?"
" नाही "
" आपल्या रचनाच्या केसमधे तिला एकाच वेळी सगळी व्यक्तीमत्वं ठाऊक आहेत का ?"
" अं.... खरं तर हो , तिला रचना असताना नंदिनीही ठाऊक आहे आणि राहुलही "
" आणि ती त्या भूमिकेत शिरतेय का ?"
" नाही. ती या भूमिकांपासून अलिप्त राहतेय "
" ती नंदिनी बनून किंवा राहुल बनून कुणाला भेटलीये का ? हा प्रश्न जॉनसाठी"
" आजपर्यंत तरी या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे. तसंच ती ज्याला ज्याला भेटली त्या कुणालाही या दोघांबद्दल बोललेली नाही. दोनच व्यक्तींसमोर तिने यापैकी एकाचा किंवा दोघांचा उल्लेख केलाय "
" कोण ?"
" एक तुम्ही स्वतः आणि दुसरी ब्लॅक मॅजीक वाली ल्युसी "
"हंम्म.. !"
प्रोफेसर विचारात पडले.
"सर ही केस डीआयडीची नाही का ?"
" संदीपा. असं कुठलीही शक्यता नाकारून चालत नाही. हे शास्त्र बाल्यावस्थेत आहे. अनुभवावर विकसित होतंय. ही केस जगावेगळी खरीच. कदाचित स्प्लिट पर्सनॅलिटीची ही एक वेगळीच केस असावी ज्यात व्यक्ती स्वतः ते आयुष्य जगत नाही "
" मग सर ! त्या प्रेडिक्शन्सचं काय ?"
" जॉन, आणखी काय माहीती दडवलीयेस ?"
" दडवलीये नका म्हणू प्रोफेसर.. ! "
जॉन उठत म्हणाला. त्याला थांबायचा इशारा करत प्रोफेसर त्याला निर्वाणीचा इशारा देत म्हणाले, " थांब जॉन ! आत चल "
दोघे गेस्टसाठी राखून ठेवलेल्या रूममधे गेले. आत फिक्क्ट पडलेली आणि चेह-यावर कसलेही भाव नसलेली एक स्त्री होती.
"जॉन ! ओळखतोस ना हिला "
" रचना जोशी ! ओह माय गॉड "
तिच्या डोळ्यातली ओळख केव्हाच नाहीशी झाली असावी. एखाद्या प्रेतासारख्या असलेल्या रचनाकडे पाहवतही नव्हतं. गाल बसलेले, केसाची दुरावस्था झालेली, कपड्यांचीही शुद्ध नसलेली आणि कदाचित श्वास घेतेय म्हणून जिवंत म्हणायचं अशी अवस्था झालेल्या तिला पाहील्यावर जॉनही गहिवरला.
"प्रोफेसर, ही कुठं सापडली ?"
" ती स्वतःच आली जॉन "
" कसं शक्य आहे ?"
" का नाही ? जॉन ती पहिल्यांदा आली तेव्हां तिने झेनर कार्डस पैकी फक्त दोनच पत्ते ओळखले होते. पण जस जसे आमचे सेशन्स होत गेले, अर्थात राहुलच्या केससाठी, आमच्यात इंटरअॅक्शन वाढत गेलं. ती जवळ असताना मला कधीकधी आजूबाजूला ढोल वाजल्याचे भास होत असत. म्हणून मी पुन्हा एकदा झेनर कार्डसचा प्रयोग केला... जॉन तिने दहाही पत्ते अचूक सांगितले "
" व्हॉट ?"
" एकदा नाही अनेकदा... प्रत्येक वेळी !"
" यू मीन... "
"येस्स जॉन. मी सुद्धा !!!"
आता धक्का जॉनला होता.
"संदीपा माझ्यात ही शक्ती असल्याची जाणीव झाली तेव्हाच मी या साईडकडे वळालो. मी मूळचा न्यूझिलंडचा बरं का जॉन. टेलिपथी आणि ब्लॅक मॅजिक यांचा जवळचा संबंध आहे. म्हणून मी भारतात आलो. बंगाल, कोकण या भागात हिंडलो. नंतर आफ्रिकेत आलो. इथं तर बरंच चालतं, तुला माहीतच आहे. "
" सर , तुम्ही या शक्तींचं अस्तित्व मान्य केलंत ?"
" तुला माहीत नाही का संदीपा ? मी केव्हढा विरोध झेलला. पण मी या सर्वांमागचं विज्ञान शोधलं तेव्हां मला असं जाणवलं कि संमोहन शास्त्र आणि मानसशास्त्र यांचा जितका संबंध आहे तितकंच या ब्लॅक मॅजीकवाल्यांनाही ते महत्वाचं आहे. ती एक कला आहे असं म्हणूयात ना, चेटूकवाल्यांना त्यातलं सायन्स माहीत नाही पण ते कसं वापरायचं हे माहीत आहे. ज्याच्यावर ब्लॅक मॅजीक झालंय असं म्हटलं जातं तो कुठल्या न कुठल्या मानसिक आजाराने ग्रस्त असतो. तो आजार दूर झाला कि त्याच्यावर चेटूकचा प्रभावही नाहीसा होतो. बरेचदा स्किझोफेनियाचे रोगी चेटूकचे शिकार झाल्याचं दिसून येतं. खरं म्हणजे त्यांच्यात ईसपी चे सेन्सेशन्स असतात. ज्यावेळी त्यांच्यावर संमोहनाचे प्रयोग केले जातात तेव्हा ते रिसीव्हर बनतात. आणि मग ते एखाद्या आवाजाची वाट पाहत असतात किंवा त्यांना तो ऐकवण्यात येतो. टेलिपथीची ही जाणीव म्हणा किंवा आणखी काही म्हणा.. कुठल्या तरी उपायाने रिसीव्हरशी कनेक्शन जोडण्याची कला यांना अवगत असते. ही बाहुली वगैरे निमित्त असावं.. तो मांत्रिक स्वतःच सेंडर बनत असतो. बाहुली प्रतिकाचं काम करत असते. तिच्याद्वारे काहीच होत नसतं. ती एक निर्जीव बाहुली.. सेंडरच्या जाणिवाच रिसीव्हरला मिळत असतात "
"आज ल्युसीला बोलवून घेतलं होतं. तिला यामागचं थोडंसं सायन्स सांगितलं तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. तिला थोडं समजलं बरंचसं नाही. लोकांना वाटतं मी त्यांना काळ्या जादूतून बरं करतो. पण खरं तर मानसिक आजार दूर झाला कि रोगी आपोआपच बरा होत असतो "
"म्हणजे मानसिक आवाजाचे सगळे रूग्ण हे चेटूकचे शिकार असतात ?"
"संदीपा ! माझ्या स्टेटमेण्टचा असा अर्थ निघतोय का ? हा आजार होण्याची कारणं वेगळी आहेत. लहानपणी घडलेल्या असाधारण घटना. ज्या रचनाच्या केसमधे दिसतातच. आई नसणं, तिचा गूढ मृत्यू, मग बाबांनी दुसरं लग्न करणं... तिचं भावविश्व उद्ध्वस्त होण्यासाठी पुरेसं होतं. उद्या मी याचा खुलासा करीनच "
" जॉन , आता मला तुझाकडची सगळी माहीती हवी तरच मी उद्याच्या मीटिंगला येण्यात अर्थ आहे. नाहीतर माझा संबंध फक्त रचनाशी आहे. मी तिच्याकडे लक्ष देणं हे सध्याच्या घडीला माझं परमोच्च कर्तव्य आहे. तुमची मदत करणं माझ्यासाठी दुय्यम बाब आहे "
जॉनला वाईट वाटलं असावं. पण त्याने निर्णय घेऊन प्रोफेसरांना सगळं सांगायला सुरूवात केली. जॉन सांगत असताना प्रोफेसर फक्त ऐकत होते. मधेच त्यांच्या भिवया ताणल्या जात, तर कधी डोळे आक्रसले जात. डोळे मिटून ते एकाग्रपणे ऐकत होते.
जॉनचं सांगून झाल्यावरच त्यांनी डोळे उघडले.
"जॉन उद्याची मीटिंग आणि आपली भेट शेवटची ठरो ! या केस संदर्भातली "
"प्रोफेसर तपास चालू आहे आणि राहील "
" म्हणजे ?"
" म्हणजे उद्या तयारीत रहा रात्री. मी ओल्ड कॅसलला जाणार आहे. तिथून फोन करीन तेव्हां आपल्याला पळापळ करायचीये ..."
प्रोफेसर न समजल्यासारखे पाहत राहीले.....
" शेवट जवळ आलाय प्रोफेसर ! " जॉन हसत म्हणाला
-------------------------------------------------------
किती वेळ गेला ते लक्षातच नाही आलं. समुद्राचं वारं जाणवत होतं. मधेच कधीतरी गाडी समुद्राकाठचा रस्ता सोडून वर चढू लागली तसं संदीपा बाहेर पाहू लागली. समुद्र खाली दिसत होता. गाडी आता केप पॉईंटच्या रस्त्याने वर चढत होती.
वर गेल्यावर एक दीर्घ वळण घेऊन ते थांबले
"संदीपा, उतर चटकन "
ओल्ड कॅसल भागात आता ते होते. ती एक निर्जन जागा होती आणि एक पडकं घर तिथं दिसत होतं. लांबूनही ते घर दिसलं नसतं पण रस्त्यावर थांबलेली गाडी मात्र दिसली असती असा तो स्पॉट ह्प्ता. घराला लागून अनेक वेली आणि झाडं होती. कित्येक वर्षात रंगरंगोटीही केलेली नसावी. दारं खिडक्या नावालाच होते. आत मधे कदाचित प्राणी पक्षी असावेत. माणसाचा लवलेशही बाहेरून दिसून येत नव्हता. तिथं असं एखादं घर असावं हे रोज त्या रस्त्याने जाणा-याच्याही लक्षात आलं नसतं.
जॉन च्या हातात गन होती आणि तो गाडीतून उतरत होता. हळूच त्याने गेट ढकललं तेव्हां बिजाग-यांचा केव्हढा तरी मोठा आवाज झाला. इतका कि जॉन देखील दचकला. आत वाघळांची फडफड झाली असावी. निशाचरांसाठी याहून चांगलं निवासस्थान कुठलं असणार होतं ?
"संदीपा, गाडीजवळच थांब. बी अॅलर्ट. मी आत जातोय. दोन तासाने परत आलो नाही तर कंट्रोल रूमला कळव "
" जॉन. काही घडणार असेल तर मी येते "
"काहीच घडणार नाहीये. काही घडलं तरच आश्चर्य आहे "
" मग ही गन, हा इशारा "
"काळजी नको घ्यायला ? "
" रिलॅक्स ! मी येतोच परत. आता इथं कुणी नसावं या अंदाजाने आपण आलोय. पण कुणी असलंच तर मात्र गोळीबार ऐकू येईलच तुला " जॉन हसत हसत म्हणाला.
संदीपाने दोन तासाचा अलार्मच लावला. अशा कुठल्याही मोहीमेची तिला सवय नव्हती. त्यामुळं एकीकडे भीती वाटत असतानाच ती थोडीशी उत्साहीतही झाली होती.
अर्ध्या तासाने जॉन आला तेव्हा त्याच्या अपेक्षेप्रमाणेच काही घडलं नव्हतं.
" जॉन आपण इथं का आलो होतो ?"
" एका मिसिंग कनेक्शनसाठी. त्याबद्दल सांगतो नंतर.. इथून ते नाहीसे झालेत. आपल्याला त्यांचा माग काढावा लागणार आहे. "
" कोण नाहीसे झालेत ?"
जॉनने एक फडकं दाखवलं. ते उघडून घेतलं तेव्हा त्यात एक काळी बाहुली होती आणि तिच्या डोक्याला केस चिकटवलेले होते. तिच्या डोक्याला सुया टोचलेल्या होत्या.
" हे काय आहे जॉन ?"
" मी म्हटलं ना मिसिंग कनेक्शन ! "
"प्रोफेसर ! रचना आहे का घरात ?"
........................................
"काय ? कशी ? कधी ? "
.......................................
"जॉन काय झालं ? "
"संदीपा रचना आज नाहीशी झालीय. प्रोफेसरांना काहीच माहीती नाही. ते आपल्यासोबत मीटिंगलाच होते ना दिवसभर !"
........................................................................................
डोनाल्डच्या ऑफीसमधे प्रोफेसर व्हॅटमोर, संदीपा, जॉन आणि खुद्द डोनाल्ड हे गंभीर चेहरे करून बसले होते.
" जॉन, खूप वेळ लागतोय , तपासाला. मी खूष आहे असं समजू नकोस "
" हं !"
" बोला प्रोफेसर ! काय म्हणता ?"
"संदीपा, तूच सुरू कर.."
संदीपाला समजेना डोनाल्डसमोर सुरूवात कशी करावी. ती भांबावली.
"जॉन ?"
जॉन ने मग प्रोफेसरांना सांगितलेली कहाणी पुन्हा रिपीट केली. खूपच संक्षिप्त. बहुधा त्याने बॉसला आधीच ब्रीफ केलेलं असावं.
" म्हणजे प्रोफेसर ही केस ब्लॅक मॅजीकची आहे असं तुमचं म्हणणं आहे ?"
"मी काहीच म्हणत नाही. काही नाकारतही नाही आणि काही स्विकारीतही नाही "
"कम ऑन ! आपल्याला लॉजिकल रिपोर्ट लिहायचाय. त्यात या ब्लॅक मॅजीकला काहीही स्थान नाही. माझा विश्वास नाहीच पण सगळ्यांचं ऐकून घ्यायला मी तयार आहे "
" डोनाल्ड ! जॉनला सांगू दे आता "
" सर , परिमल इंडस्ट्रीतला स्फोट शहांच्या माणसांनी घडवला असावा असा संशय आहेच. "
" काय झालं त्या केसचं ?"
" सर ! तपास चालूच आहे "
" कधीपर्यंत ? "
"केस बंद होत नाही तोपर्यंत !"
डोनाल्डला काहीतरी खरमरीत बोलायची हुक्की आली होती पण प्रोफेसर व्हॅटमोर तिथं असल्याने त्याने शब्द गिळले.
" बरं पुढे सांग "
" तर, त्या केस मधे एक भारतीय मुलगा होता. रचनाच्या असंबद्ध लिखाणातून आणि खोडलेल्या काही पानातून प्रोफेसरांनी जी शक्यता व्यक्त केली त्यावरून तिच्याबाबतीत संमोहनाचा प्रयोग केला गेला आहे "
" कम ऑन जॉन ! हे लिहायचं रिपोर्ट मधे ?"
" डोनाल्ड ! संमोहन हे शास्त्रच आहे..."
" ओके "
" तर संमोहनाचा उपयोग करून तिच्या मेमरीतला काही भाग पुसून टाकण्यात आला आहे. अगदी पाटी पुसतात तसा "
" प्रोफेसर हे शक्य आहे ?"
" संमोहनात असं स्कील मानसशास्त्राच्या अभ्यासक व्यक्तिंच्या बाबतीत माझ्या पाहण्यात नाही. पण अशा प्रकारे प्रावीण्य मिळवलेलं असणं अशक्य नाही. दुर्दैवाने ब्लॅक मॅजीकवाल्यांकडे हे ज्ञान आहे. पिढीजात ..!"
" त्याचा या केसशी काय संबंध पण ?"
" सर ! ज्या वेळी हा स्फोट झाला त्या वेळी रचना त्या इमारतीत शिरण्यासाठी बाहेर गाडी लावत होती. प्रचंड स्फोटाच्या आवाजाने ती बधीर झाली असावी , त्याच वेळी तिला धक्का मारून कुणीतरी पळालं आणि त्या व्यक्तीच्या मागे तीन चार लोक "
" इंटरेस्टिंग ! "
" सर ती माणसं शहांची असावीत असा माझा संशय आहे. ते रचनाला आणि रचना त्यांना ओळखत असावी "
" कशावरून ?"
" कारण, मला पहिल्यापासून रचनाशी बोलू दिलं जात नव्हतं तेव्हाच मला संशय आला होता आणि मी रचनावर पाळत ठेवली होती "
" जेव्हां ती ल्युसीकडे दिसली तेव्हा मला संशय आला. इथं काहीतरी पाणी मुरतंय. पण रचना अगदी इनोसण्ट वाटत होती. पण तिचा संबंध काही वस्तू खरेदी करण्यापुरताच दिसत होता. तरीही मी ल्युसीला दमात घेतलं. ल्युसी काही सामान्य बाई नव्हे. ब्लॅक मॅजीकच्या क्षेत्रातलं एक बडं नाव आहे. पण तिने तिच्या देवांवर हात ठेवून शपथ घेतली तेव्हा मला खात्री पटली. पण तिने जे काही सांगितलं ते धक्कदायक होतं. रचनावर ब्लॅक मॅजीक झालंय किंवा कोणत्या तरी शक्तीम तिच्यावर नियंत्रण मिळवू पाहत आहेत हे ल्युसीला जाणवलं होतं. म्हणून मी चौकशीच्या बहाण्याने रचनाच्या डोक्यात ल्युसीला भेटायची सूचना दिली. ती ही अशी कि ही सूचना आहे हे तिला समजू नये. मला ही खबरदारी घ्यायची सूचना ल्युसीनेच केली होती "
" पुढे तिच्या तपासात हे लक्षातच आलं. तिच्यावर काळी विद्या अजमावण्यातही आली होती आणि त्यासाठी संमोहनशास्त्राची मदत घेण्यात आली होती "
" काल प्रोफेसरांशी बोलल्यावर संमोहनाबद्दल माहीती मिळाली. रचना मानसिक दृष्ट्या खंबीर आहे असं ती समजत होती. प्रत्यक्षात तिचं बालपण असुरक्षित असल्याने मनाच्या एका झाकलेल्या कोप-यात असुरक्षिततेची भावना होती . असे लोक अशा प्रयोगांना चटकन बळी पडतात. "
" जॉन ! तुझ्या तपासातलं एक अक्षरही माझ्या कामाचं नाही. इतके दिवस वाया घालवून तू हे ऐकवतोयेस ? तुला वेळोवेळी ज्या सूचना दिल्या त्याच्यावर काहीसुद्धा विचार केला नाहीस ? आणि संदीपा तू पण पाट्या टाकल्यास ?"
" सर ! प्रोफेसर व्हॅटमोरना आणलंय ना त्यासाठीच "
"हं...."
मग अचानक चेह-यावर प्रोफेशनल हसू आणून डोनाल्ड प्रोफेसरांकडे वळाला.
" प्रोफेसर ! माफ करा हं. तुम्हाला ऑकवर्ड वाटलं असेल. पण माझी माणसं काय सांगतात ते ऐकलंत ना तुम्ही ? आता हे कायद्याच्या भाषेत कसं बसवू मी ? "
"लेट हिम फिनिश "
" सांग रे जॉन.. जे हवं ते सांग "
" सर ! ज्या ज्या लोकांचा गूढ मृत्यू झाला त्या सर्वांना रचना भेटलेली होती. तिच्या म्हणण्याप्रमाणे मात्र राहुल भेटला जो कधीही तिच्या कंपनीत नव्हताच. नंदिनीही अस्तित्वात नव्हती. पण खरी गंमत अशी कि जी माणसं मृत्यू पावली ती स्फोटाच्या दिवशी परिमल इंडस्ट्रीजवळ दिसली होती. वर्षभर चौकशी करूनही जे कळालं नाहि ते रचनाच्या डायरीमुळं लक्षात आलं आणि याचे धन्यवाद तिला द्यायलाच हवेत "
जॉनने एक अर्थपूर्ण पॉझ घेतला. डोनाल्डला ते असह्य झालं. हातानेच पुढे कंटिन्यू कर अशी खूण त्याने केली.
" एयरपोर्ट रोडला मंडेला सरांच्या सुरक्षिततेसाठी चौकी उभारण्यात आली होती. सुदैवाने या लोकांचे नंबर टिपून घेण्यात आले. आणखी एक नंबर एका कारचा होता जी शहांच्या या युनिटची आहे. त्यावेळी हे युनिट अर्थातच दुसरीकडे होतं "
" कंपनीच्या सिक्युरिटीच्या रेकॉर्डसप्रमाणे कार नम्रता आणि मायकेल वापरत होते ! "
" म्हणजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे नम्रता, मायकेल आणि त्या दोन चार जणांचा परिमल इंडस्ट्रीतल्या त्या स्फोटात हात होता जो रचनाने पाहिला आणि म्हणून त्यांनीच तिच्यावर.. ते ब्लॅक मॅजीक वगैरे... केलं असंच ना ?"
" नाही सर ! रचनावर हिप्नॉटिझम केलं गेलं ते शहासरांच्या संमतीने. तिच्या मेमरीतला तो भाग काढून टाकण्यासाठी "
" मग तिच्या जिवावर कोण उठलंय ? किंवा तिच्याकरवी कुणाला धोका आहे अजून ? कोण आहे यामागे "
" सर ती मिसिंग लिंक आहे या प्रकरणात..."
" एनी वे ! मला अजिबात रस नाही त्यात "
डोनाल्डने दोन्ही हाताची बोटं एकमेकांत गुंफून चाळा सुरू केला. तो विचारात पडला म्हणजे असं करीत असे.
" प्रोफेसर ! माझी मदत करा. हे ब्लॅक मॅजीक वगैरे सगळं वगळून शास्त्रीय भाषेत मला समजेल असं सांगा "
" शास्त्रीय म्हणजे काय डोनाल्ड "
" ते तुम्हीच सांगायचं ना ! नाहीतर मी कशाला पोलिसात भरती झालो असतो ?"
" हं ! "
प्रोफेसरांनी पुन्हा एकदा पॅरासायकॉलॉजी हे शास्त्र समजावून सांगितलं. त्यांना थांबवत डोनाल्ड म्हणाला..
" प्रोफेसर हे सगळं रेकॉर्ड होतंय बरं का "
प्रोफेसर मान हलवत चालेल म्हणाले. खरं तर अहवाल बनवायचा म्हणून रेकॉर्डिंग चालू होतं. यातला बराचसा भाग गाळायचा विचार डोनाल्ड करत होता. ज्याचे पुरावे शोधता येतील तितकाच भाग तो ठेवणार होता. आतापर्यंत तपास तर समाधानकारक होता पण त्यात आलेल्या चमत्कारिक गोष्टींनी तो अस्वस्थ झालेला होता.
" रचनाचं बालपण आपण पाहीलं. पुढे उद्भवणा-या मानसिक आजारांसाठी आदर्श परिस्थिती आहे त्यात. आई गेली तो आघात, बाबांनी लग्न केलं हा दुसरा आघात. तिने तिच्यासाठी आई उभी केली. लहान मूल स्वतःशीच गप्पा मारताना दिसतं. खरं तर ते स्वतःला एक्सप्रेस करत असतं. त्याला कळालेलं ते एका काल्पनिक मित्राला सांगत असतं. अशी मुलं हुषार असतात. आम्ही याला इमॅजिनरी फ्रेंड (disambiguation ) म्हणतो. यात काळजी करण्यासारखं काहीच नसतं उलट मुलाची मानसिक वाढ होण्यासाठी ते चांगलंच असतं. पुढे ही फेज निघून जाते. मुलं ते विसरतात.
पण रचनासारख्या मुलांना ते नको असतं. रचनाने तिच्या आईला तिच्या विश्वात बोलावून घेतलं होतं. ती तिच्याशी गप्पा मारत असे. ही Scizophrenia ची सुरूवातीची लक्षणं म्हणता येतील. delusiona, hallucination अशी लक्षणं मात्र इतर रूग्णांसारखी गंभीर स्थिती नाही. त्यांना नसलेल्या गोष्टी दिसू शकतात. पुढे तिची रवानगी बोर्डिंग स्कूलमधे झाल्यावर तिने नंदिनीला आपल्यासोबत नेलं. नंदिनी तिची बेस्ट फ्रेंड असू शकते. रचनाचे वडील तिच्याशी क्रूरपणे वागलेले दिसतात. मुलांचं भावविश्व वगैरे त्यांच्या गावीही नव्हतं.
ज्याला आम्ही मल्टी पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणतो त्यामधे ब्यक्ती स्वतःच त्या भूमिकेत जातो. तसं इथं घडत नव्हतं . म्हणजेच ही Paranoid Scizophrenia किंवा Undifferenciated Scizophrenia पैकी एक केस असावी असं वाटतं. या दोन्ही केस मधे काल्पनिक आवाज ऐकू येणं किंवा भास होणं हे घडतं. राहुलचा वावर काय किंवा नंदिनीचा वावर काय काल्पनिकच . हे अर्थातच रचनाच्या नाँदी, जॉनचा तपास यावरून म्हणतोय. पण रचनाच्या मेंदूमधे हे काल्पनिक जग ख-या जगाला सांगायचं नाही असं काहीतरी सांगनारी यंत्रणा तिने निर्माण केली होती. नंदिनी आणि राहुल इतरांना कधीच दिसले नाहीत. तसंच सिंग सरांचं बाळही. त्यांचं बाळच आता त्याला बाळ व्हायच्या वयाचं झालंय. तिचा एकटेपणा, या वयातल्या तिच्या आकांक्षा अशा समोर येत असताना तिला ते समजत नव्हतं. दुर्दैवाने आता ती या लक्षणांच्या पुढे गेलेली आहे.
इथून पुढे कदाचित तिला आपल्याला हलता येत नाही असं वाटू शकेल. जग याला तिच्यावर चेटूक झालंय असंही म्हणू शकेल. डोनाल्ड, दुर्दैवाने संमोहनासारख्या कला बेजबाबदार लोकांना चटकन अवगत होतात आणि ज्याला हवं त्याला प्रयत्नपूर्वकही ते साध्य होत नाहीत. याचं कारण विश्वास ! या शास्त्रावरचा विश्वास जितका ब्लॅक मॅजिकवाल्यांचा आहे तितका वैज्ञानिक जगतात नाही. अणुबाँब बनवायचं शास्त्र आहे ना तसंच आहे हे. कुणाच्या हाती ते लागतं त्यावर सगळं आहे.
रचनाची बालपणीची केस हिस्ट्री पाहिली तर तिच्यावर संमोहनाचे प्रयोग करायला नको होते. अर्थात ज्यांना ते करायचं होतं त्यांचे हेतू पाहता त्यांनी तिला जिवंत सोडलं हेच खूप ! "
डोनाल्ड ऐकत होता. प्रोफेसर थांबले हे पाहून त्याने विचारलं
"प्रोफेसर थँक्स या मदतीबद्दल..
आता एकच प्रश्न .. त्या गूढ मृत्यूंचं काय ?"
" ते रचनाने केलेत असं म्हणता येत नाही सर !"
" जॉन , प्रोफेसरांना बोलू दे "
" जॉन म्हणतो ते खरंच आहे. रचना त्यांना भेटली हे ही खरं आहे. हा योगायोग नाही का ? कदाचित त्यांना त्या घटनेबद्दल मन खात असावं जे रचना भेटल्यामुळे उफाळून वर आलं असणार. कदाचित रचना काही म्हणालीही असेल.. पण तिने खून केला असं म्हणता येत नाही. आपण त्या घटनेचे साक्षीदार होतो याबद्दल तिचं मन खात असावं. हिप्नोसिस नंतरही त्या व्यक्ती समोर आल्याने तिच्या स्मृती जागृत होत असाव्यात.. खरं तर त्या लोकांचे मृत्यू हा योगायोगच ! "
" हे झालं डोनाल्ड तुमच्या कायद्यासाठी. पण पॅरासायकॉलॉजी टेलिपथी वर विश्वास ठेवते आणि सिद्धही करू शकते. या लोकांच्या मृत्यूचा आणि टेलिपथीचा जवळचा संबंध असावा. त्या जबरदस्त स्फोटाने या सर्वांमधे कनेक्शन स्थापित झालेलं असावं. गॉड नोज ! "
पाणी प्यायला प्रोफेसर थांबले... शांतता ! पिनड्रॉप सायलेन्स निर्माण झाला होता.
" डोनाल्ड ! जे विवेचन मी केलं त्याचा आपण शास्त्रीय पद्धतीने तपास करू शकतो. आणि रचना बरी झाल्यावर काही प्रश्नांची उत्तरं मिळतीलही. ज्यांची मिळणार नाहीत ती सोडून देऊ .. पण अगदीच काही वाईट परिस्थिती नाही आपल्यासाठी, नाही का !"
" प्रोफेसर ! मी कसे आभार मानू तेच मला कळत नाही. मला कसा अहवाल द्यावा हेच समजत नव्हतं. आता तपास बंद केला तरी चालेल. फक्त पुरावे गोळा करायचेत , नाही का जॉन?"
" सर !"
त्यानंतर चहापानी होऊन मीटिंग संपली.
बाहेर पडताना प्रोफेसर जॉनला विचारत होते, " जॉन संपलं सगळं ?"
"तपास चालू आहे." हसत जॉन म्हणाला.
" म्हणजे ?"
"काल सांगितलेलं विसरलात ? "
प्रोफेसर व्हॅटमोर आश्चर्य करीत गाडी स्टार्ट करत असताना जॉन आणि संदीपा गाडीत बसत होते.
-------------------------------------------------------------------
ओल्ड कॅसलच्या भागात शांतता नांदत असली तरी संदीपाच्या मनात अशांतता खदखदत होती.
जॉनला त्याची कल्पना आलीच होती. आता जास्त ताणून धरायला नको म्हणून त्याने गन होल्स्टरमधे सारत गाडी सुरू केली.
" संदीपा.. सांग बरं मिसिंग लिंक कुठली या केस मधली ?"
" नाही सांगता येत "
जॉन हसला.
" मि. व्होरा ! देशोधडीला लागले बिचारे. नंतर त्यांचं काय झालं कुठे गेले काहीच ट्रेस होईना. भारतीय माणूस कुठे लपणार ?"
" व्होरांचा मात्र ट्रेस लागेना. ते केप ताऊनमधे पण नव्हते. आणि अचानक ते इथं उगवले. अर्थात त्या वेळी मला वास लागला नाही. माझ्या खब-यांचं अपयश ! खरं तर तेव्हां व्होरा इतके महत्वाचे पण वाटले नव्हते. एक उपचार म्हणून मी शोध घेत होतो. पण जेव्हां व्हुडूचं ऐकलं तेव्हां त्यामागे कोण असू शकतं ?
" व्होरा ?"
" हा हा हा ! व्होरा नक्कीच, त्याबरोबरच शहा, नम्रता आणि मायकेल हे पण ! "
" हळू हळू शहांबद्दलचा संशय फिटला. नम्रता वर मात्र अजूनही संशय आहे. मायकेल देखील रचनाच्या वाईटावर असेल असं वाटत नाही "
" ज्यावेळी स्फोट झाला त्या वेळी रचना गाडी पार्क करत होती आणि तिला धक्का मारून पोरगेलेसा भारतीय तरूण गेला. नाही का ? त्याच्यामागे काही जण धावले तेव्हां ती काय ओरडली ?"
" त्याला वाचवा असं.."
" म्हणजे त्याचा जीव धोक्यात आहे हे त्याक्षणी तिला माहीत होतं. त्या तरूणाला गाडीत टाकताना गॅरेजवाल्याने पाहीलं होतं. ओल्ड कॅसल भागात त्याचा खून झाला आणि बॉडी तिथंच पुरण्यात आली. मी नंतर येऊन गेलो पण बॉडी सापडली नाही. एका ठिकाणी कबरीसारखा खड्डा सापडला, पण उकरलेला !
संदीपा, मी खूप शोध घेतला विमानप्रवाशांचा. आणि एके दिवशी रस्त्याने नायजेरियाहून एक जण द आफ्रिकेत आल्याची नोंद सापडली. हौस ! "
" त्याचंच नाव राहुल ! राहुल व्होरा. व्होरांचा एकुलता एक मुलगा. केप टाउनला तो आला तो सरप्राईज देण्यासाठी. म्हणूनच त्याच्याबद्दल कुणाला माहीती नव्हतं. मेहतांच्या समोसा स्टॉलसमोर एक दिवस समोसा घेत असताना त्याला रचना भेटली. रचना आणि तो दोघेही पाचगणीच्या शाळेत एकत्र असल्याने त्यांची मैत्री जमली. रचनाने त्याला गेस्ट हाऊसवर ठेवून घेतलं आणि मग एक दिवस दोघेही त्याच्या वडिलांना भेटायला म्हणून गेले नेमका त्याच दिवशी तो स्फोट झाला "
" ओह ! माय गॉड "
" व्होरांच्या दृष्टीने शहांनी स्फोट घडवून आणला आणि रचनाने त्यांच्या मुलाला तिथं आणून मारलं असाच अर्थ निघत होता. त्यांना कुठेच मदत मिळाली नाही. मि. सिंगांनी तर त्यांच्या परिस्थितीचा खूप फायदा घेतला. सिंगांना कमिशन मिळायचं होतं "
" हताश अवस्थेत व्होरा परागंदा झाले. जेव्हां आले तेव्हा एका व्हुडू टोळीच्या संपर्कात राहीले. आता सुड घेणं हे एकच ध्येय त्यांच असणार. या घरात त्यांना पाहीलं गेलं. पण आता त्यांनी ते सोडलंय असं दिसतं "
" नम्रताच्या बाबतीत तिने शहांच्या सांगण्याच्या बाहेर जाऊन आत कामगार असताना स्फोट घडवला आणि हत्याही घडवून आणली. शहांना हे नको होतं. त्यातच रचना साक्षीदार झाल्याने तिचा धीर खचला. राहुल हा व्होरा आहे हे कुणालाच कळालं नाही. रचनावर हिप्नोसिस केल्यावर तिने चेटूक केलं नसेल कशावरून ? आणि जेव्हां कटातल्या साथीदारांचे खून झाले तेव्हा ती अस्वस्थ झाल्याचं दिसून आलं "
" नम्रता असं वागू शकेल ?"
"आ नाही ? जी माझ्या नावावर कंपनीकडून पैसे उकळू शकते ती काहीही करू शकते " जॉन बोलून गेला खरा आणि त्याने जीभ चावली.
संदीपाने डोळे गरागरा फिरवत जॉनला हात लावून विचारलं " तुझ्या नावावर ?" आणि ती खळाळून हसली.
" बघ, व्होरा, सिंग, रचना, शहा या लोकांच्या नादात जे कृष्णवर्णिय लोक मेले त्यांची आहे का कुणाला फिकीर ?"
" हं ! काय करणार ?"
" हेच तर ना, ते मेले तर मेले. सिंगसाहेब गेल कि आम्हीच पळायचं "
संदीपा विषय बदलत म्हणाली
" रचना कुठे गेली असेल ?"
" काळजी करू नकोस, मला वाटतं मला माहीत आहे ते. गाडीला वेग देत जॉन म्हणाला "
-------------------------------------------------------
प्रोफेसर काळजीने आल्या पावली बाहेर पडले. रचना नाहीशी झाल्यानं त्यांना खूप धक्का बसला होता. जॉनला फोन केले तर तो ड्रायव्हिंग करत असल्याने उचलत नव्हता. नंतर त्याचाच फोन आला आणि त्यांनी हवालदिल होत रचना नसल्याचं सांगितलं.
केप टाऊन मधे कुठं शोधायचं तिला ? लहान का शहर होतं ते ?
गाडी घेऊन तिच्या सर्व ठिकाणांवर ते पाहून आले आणि अचानक
ढोल वाजायचा आवाज. त्या दिशेने त्यांनी गाडी वळवली. या दिशेने येत होता ढोलाचा आवाज, तीव्रता वाढत चालली होती.
ढम ढम ढम
आता कानठळ्या बसेल असा आवाज येत होता. पण कुठंही मोर्चा, मिरवणूक दिसत नव्हती किंवा ढोल वाजवणारा नव्हता.
मग त्यांच्या लक्षात आलं कि ढोल तर त्यांच्या डोक्यात वाजतोय. इथंच तीव्रता जास्त आहे. आणि
रचना !!
हिस्टेरिया झाल्यासारक्खी ती चालली होती. चावी दिलेल्या बाहुलीसारखी !
त्यांच्या हाका तिच्यापर्यंत पोहोचत नसाव्यात. ते किती जवळ होते. पण तिला आवाज जात नसावा. आणि मागून ल्युसी धावत येताना दिसली. प्रोफेसरांना पाहून ती थबकली. एकच क्षण ..
आणि मग पोरीच्या जिवाला धोका आहे असं तिने ओरडून सांगितलं. प्रोफेसरांना काय करावं ते कळेना. अशा आणिबाणीच्या प्रसंगांची त्यांना सवय नव्हती. ते गाडीत बसून राहीले आणि हॉर्न वाजला.
दमून त्यांनी डोकं हॉर्नवर ठेवलं होतं. हॉर्न वाजत राहीला. त्यांच्या कानात तो आवाज शिरत राहीला.
---------------------------------------
तिच्या डोक्यात असह्य कलकल सुरू झाली आणि पाठोपाठ ढोल वाजायचा आवाज. त्यानंतर ती उठून उभी राहिली. आता ढोलाच्या आवाजाशिवाय तिला काहीही ऐकू येत नव्हतं. ती चालत होती.
नम्रता !!
नम्रताचं घर ! सेंट जॉर्ज परिसरात ती आली. कुणीतरी हाका मारत होतं खूप लांबून. आवाज ओळखीचा वाटत होता. मागे फिरावंसं वाटत होतं. पण ढोलाचे लयबद्ध आवाज आणि मागे न फिरण्याचा इशारा. कुणीच बोललं नाही मात्र मागे फिरायचं नाही हे समजलं होतं.
ती बिल्डींगचा जिना चढून वर आली. दार वाजवलं तेव्हां नम्रतानेच उघडलं. समोर रचनाला या अवतारात पाहून ती प्रचंड घाबरली.
" नम्रता तुला मरायचंय ना ?"
" नाही !"
"तुला मरावं लागेल नम्रता. किती जीव घेतलेस तू !"
आणि अचानक एक प्रचंड हॉर्नसारखा आवाज !!
कर्कश्श ! तीव्रता वाढत जाणारा. ढोलाच्या आवाजांची लय बिघडवणारा. हा सतत येत होता. तिची तंद्री भंगली आणि....
सगळं असह्य होऊन ती कोसळली.
.........................................................................
" रचना कसं वाटतंय आता ?"
प्रोफेसर व्हॅट्मोअर तिच्या केसातून हात फिरवत तिला विचारत होते.
डोक्यातला कोलाहल थांबला होता. काल काय झालं हे तर्काच्या कसोटीवर नंतर घासून पाहता येणार होतं.
गरमागरम सूपाने तिला तरतरी आल्यासारखी दिसली. डोळ्यात ओळख आली होती. शारीरीक दृष्ट्या ती बरी व्हायला वेळ लागणार होता. मग तिच्यावर मानसोपचार करता येणार होते. अर्थात गरज पडलीच तर.. गरज पडणार नाही. त्यांना एक विश्वास होता.
सकाळीच संदीपा आली. रात्रभर तिलाही झोप नव्हती. काल रात्री जॉन आणि संदीपा नम्रताच्या घरीच निघाले होते . जॉनचा अंदाज अगदी खरा ठरला . खालीच ल्युसी स्वतःचा देह सावरत धावत येत होती.
"जॉन तिला वाचव..... "
" ती वर गेली ? "
" हो ! "
" तू रोखलं नाहीस ?"
" अरे मी मागं होते खूप. आधी बघ काय झालंय ते "
" आपल्याला उशीर झालाय बहुतेक.."
आणि त्यांना नम्रता खाली आलेली दिसली. तिच्या खांद्यावर रचना डोकं ठेवून चालत होती.
संदीपाने रचनाला मदत करत गाडीत घातलं आणि ते प्रोफेसरांना शोधू लागले. एका ठिकाणी हॉर्न वाजत होता म्हणून जॉनने आत डोकं घातलं तर प्रोफेसर तिथंच झोपलेले.
"असं झालं तर रात्री ! "
प्रोफेसर हसत म्हणाले.
" जॉन अरे ही सगळ्यातून बाहेर पडलीये आता "
" बाय प्रोफेसर !"
" बाय "
" हिला महिनाभर पूर्ण विश्रांती घेऊ द्या. लगेच प्रश्न नको संदीपा "
संदीपाच्या साथीने रचना लवकरच खडखडीत बरी झाली.
....................................................................................
जॉन रोज बघायला येऊन जात होता. ल्युसी देखील अधून मधून येतच होती. फ्ली मार्केट उठून जाताना जॉन ल्युसीकडे आला.
"ल्युसी काय वाटतं ?"
"त्या दिवशी उशीर केलास तू "
"तू गहाळ राहिलीस. ती पूर्ण बरी होईल ?"
"तसं दिसतंय. नाही का ?"
" आणि तिची गेलेली मेमरी ?"
" येऊ पण शकते "
" येईल कि नाही ते सांग "
" नाही तसं सांगता येत "
" काहीही असो. पुन्हा काहीही होउ शकतं. नाही का ? आपण सावध असलेलंच बरं !"
" हं "
जॉन मग तिथंच बसून राहीला. ल्युसीही कंटाळून निघून गेली. जॉन उगीचच स्टेडीयमच्या मागे रेंगाळत राहीला. रचनाच्या केसने त्याचा पिट्टा पडला होता.
कसली तरी जाणिव झाली म्हणून त्याने चाहूल घेतली तर..
दि:कालातून आला, तो दि:कालातून आला
मृत्यूचे हे सत्य जगाचे, भविष्य घेऊन आला
अरे मानवा झुकेल आता त्याच्यापुढे हे शीश
ऐकशील ना आता आपुली मरणाची तारीख
एका भयाण सुरावटीसह हे बोल त्याच्या कानी पडले तसा तो सावध झाला. स्त्री चा आवाज !
रचना ......!!!
" रचना तू ? इथं काय करतेस "
" तुला चांगलंच माहीतेय ते जॉन ! "
" काय म्हणायचंय तुला ?"
" जॉन नम्रताला मारायला तूच पाठवलंस ना ? आता तुझी पाळी "
" थांब थांब ! मी काही केलेलं नाही.. नम्रता "
" जॉन तूच तर होतास ना रे तिथं ? ते चार जण तर वाचवायला धावलेले. सगळं सगळं तूच घडवलंस जॉन. का केलंस हे ? का मारलस माझ्या राहुलला ? "
आता जॉनला विश्वास आला होता. त्याच्या डोळ्यात चमक आली.
" आता तू काय करणार ? सगळं ल्युसीच तर घडवत होती, माझ्या सांगण्यावरून. बाहेरून आलेले लोक तुम्ही. आमचे डायमंडस घेऊन जाता, सोनं घेऊन जाता आणि आम्हाला मात्र त्या वस्तीत रहावं लागतं. माझी माणसं मेली तर त्याचं तुम्हाला दु:खं नाही. किड्यासारखं रगडले जातो आम्ही आमच्याच देशात "
त्याच्या शब्दाशब्दात कडवटपणा भरलेला होता.
द्वेष ! हेवा ! मत्सर आणि सूड...
शहां आणि व्होरा यांच्यातल्या स्पर्धेचा जॉनने उपयोग करून घेताना आधी शहांकडून पैसे घेऊन व्होरांना बरबाद केलं. परिस्थितीही त्याला अनुकूलच होती. मात्र स्फोटात कृष्णवर्णिय लोक ठार झाले आणि जॉनचं डोकं फिरलं. दोन्हीकडून पैसे उकळताना आपणही त्यांच्या मृत्यूला जबाबदार आहोत असं त्याला कधीच वाटलं नाही. द्वेषाने तो अंध झाला होता. आणि आता व्होरांवर संशय जाईल अशा पद्धतीने तपासाला दिशा देत होता. कृष्णवर्णीयांच्या एका कडव्या संघटनेचा तो एक कडवा कार्यकर्ता होता.
आणि आता ही वेडपट मुलगी स्वतःहून समोर आली होती. त्या दिवशी नम्रताला मारून हिला अडकवण्याचा त्याचा विचार होता. रचना अडकली कि थेट शहांना हात लावता येत होता. सगळं कसं व्यवस्थित चाललेलं पण प्रोफेसरांचा हॉर्न !!! त्या हॉर्नने ढोलाची लय बिघडवली. प्रोफेसर आणि रचना यांच्यामधली टेलिपथी ....
सगळी गडबड झाली. हाक मारून त्याने ल्युसीचं लक्ष वेधलं. हळू हळू जाणारी ल्युसी पुन्हा माघारी वळली.
" रचना ! आता कोण वाचवणार तुला ?"
" जो नेहमीच वाचवत आला .. ज्याने तुमच्या प्रत्येक खूनात मला सहभागी होण्यापासून रोखलं .. जे सगळे खून तुम्हीच केले "
" सगळं कळलंय तर तुला "
" काय दाखवत होता तुम्ही त्यांना "
" येऊ दे ल्युसीला ... बघायचंय ना ?"
" जॉन तुझ्या मरणाची तारीख आजच आहे.. ल्युसीसोबत "
जॉन हसू लागला. "ल्युसीला तर येऊ दे "
" ये ल्युसी !"
आणि ल्युसी पुन्हा माघारी जाण्यासाठी वळली..... कारण
रचनाच्या मागून सावकाश एक आकृती आकार घेत होती. जॉन डोळे विस्फारून पाहत राहीला..
आणि सावकाश त्याच्या डोळ्यात ओळख उमटली
पोरगेलासा तरूण
राहुल त्याच्या समोर उभा होता. एक डोळा बाहेर आलेला. छातीत सुरा खुपसलेला... जॉनचाच तर होता तो
शेवटची जाणीव तीच होती !
समाप्त



--
मस्तंच!
आवडली कादंबरी!
पुढिल कादंबरीच्या प्रतिक्षेत...
मुखपृष्ठ चांगलं जमलंय मैत्रेयी.
थँक्स अ लॉट
खुप सुंदर.. पुर्ण वाचूनच थांबलो
अप्रतिम...
पु.ले.शु
गुलमोहर - कादंबरी - एक्सपायरी डेट...हे शोधायला जास्त सोप्पं ! नाही का ?
( जाणते लोक्स... दुर्लक्ष करणे सोयीस्कर. )
मैत्रेयी, कादंबरी अशक्य सुंदर. जबर्या अभ्यास आहे तुझा वेगवेगळ्या विषयातला, त्याचा छान वापर केला आहेस. शेवटपर्यंत रहस्य टिकवुन ठेवलंस त्यामुळे वाचकांची उत्सुकताही. कादंबरी संपली असं वाटलं आणि अचानक तिथे ट्विस्ट. जियो ! मजा आली एकदम. द अफ्रिकेचं वर्णन एकदम डिटेल्ड.
थँक्स, सुट्टीच्या दिवशी मजा आली एक रहस्यमय आणि वेगळ्याच विषयावरची कादंबरी वाचायला. ते कादंबरीवरचं चित्र सहीच. कादंबरीला एकदम अॅप्रोप्रिएट. 10/10 मार्क दिले मी तुला.
ते कादंबरीवरचं चित्र सहीच. कादंबरीला एकदम अॅप्रोप्रिएट. 10/10 मार्क दिले मी तुला.
मनिमाऊ थँक्स
(ऑनलाईन नाही बहुधा ) चला, तुझ्यामुळे मला श्रेय तरी मिळालं (हौस म्हणून केलंय, श्रेयासाठी नाही हे सांगणे नकोच.. ही आपली गंमत ) 
चित्रं मीच काढलंय ते, मैत्रेयी आत्ता लिहील, मग लिहील म्हणून मी वाट पाहत बसलेलो
प्रफुल्ल शिंपी आणि मानिमाऊ.... मनःपूर्वक आभार दोघांचे
किरण - एक्स्ट्रीमली सॉरी... राहून गेलं
आवडली. मस्तच आहे. पुलेशु
बकवास .......................... वेळ वाया गेला माझा........................
आभार सर्वांचे..
अनंत - तुमचा वेळ वाया गेल्याबद्दल वाईट वाटलं..