एका माणसाला किती कपड्यांची गरज असते? माझ्या आजीच्या शब्दांत सांगायचं तर 'एक दांडीवर आणि एक **वर' पुरेसे असतात.
पण खरंच तेवढेच पुरतात?
अकरावीला कॉलेजला अॅडमिशन घेतली आणि मनातून खुश झाले की आता रोज वेगवेगळे कपडे घालायला मिळणार. युनिफॉर्मच्या जंजाळातून सुटका झाल्याचा आनंद झाला. रोज कॉलेजला जायच्या आधी सुटकेस (आमच्या वाड्यातल्या घरात कपाटं कमी असल्याने आमचे कपडे सुटकेसमध्ये ठेवलेले असायचे.)उघडून कपड्यांच्या घड्या वर खाली करून 'आज कोणता ड्रेस घालावा?' यावर विचार करण्यात मी आणि ताई तासभर घालवायचो. तेव्हा आई म्हणायची," 'एक दांडीवर आणि एक **वर' असावेत म्हणजे काय घालू, कुठला घालू, कधी घालू, किती घालू असे प्रश्न पडत नाहीत."
नंतर नंतर का कोण जाणे पण माझा कपड्यांचा शौक कमी झाला, बारावीत एका परीक्षेच्या वेळी 'लकी' आहेत म्हणून मी पूर्ण परीक्षेच्या काळात दोनच ड्रेस आलटूनपालटून वापरले.
माझी अशी 'लकी' प्रकरणं खूप आहेत, त्याबद्दल परत कधीतरी. 
त्यावेळी माझ्याकडे जास्त कपडे नसायचेही, कारण, वर्षातून दोनदाच कपडे खरेदी व्हायची. एक दिवाळीला आणि दुसरी रिझल्ट लागल्यावर.
पण ताई आणि मी एकमेकींचे कपडे आलटूनपालटून वापरायचो. त्यामुळे, बरेच Options असायचे.
इंजि. झाले, एके ठिकाणी नोकरीही लागली. एकदा गप्पा मारताना माझ्या बॉसच्या सेक्रेटरीने माझ्या मनात एक पिल्लू सोडून दिले की प्रत्येक दिवसाचा एक रंग असतो आणि त्यानुसार कपडे घातले की दिवस चांगला जातो. त्या त्यानुसारच कपडे घालायच्या, मीही कटाक्षाने ते पाळायला सुरुवात केली. मग ज्या रंगाचे कपडे नाहीत, दिवाळीला ते घेण्यावर भर असायचा. पण कपड्यांचा विशेष सोस नव्हताच.
मग लग्न झालं. आत्तापर्यंत आईबाबा घेतील तेव्हाच कपडे मिळायचे, आता हातात पैसा आला. तरी मला कपड्यांवर खर्च करणे जमायचे नाही. लग्नानंतर आम्ही फिरोजपुरला पोस्टिंग गेलो. मी तिकडे गेले तेव्हा जानेवारी महिना होता. त्यावेळी, ऑप पराक्रम चालू असल्याने आणि खूप थंडी असल्याने आजूबाजूला जास्त बायका नव्हत्या, पार्ट्याही होत नसत. त्यामुळे, जे कपडे जवळ होते, त्यात काम भागले.
जसा मार्च महिना संपत आला युनिटमधल्या बाकीच्या बायका यायला सुरुवात झाली. संध्याकाळी फिरायला जात असताना त्यांच्या गप्पा मी ऐकत असे. माझ्याकडे बोलण्यासारखे काही नसायचेच. तर एकदा दोघीतिघींना 'विंटर क्लोदिंग पॅक केले, समर क्लोदिंग बाहेर काढले' असे बोलताना ऐकले. मी विचारात पडले 'हे विंटर क्लोदिंग /समर क्लोदिंग काय प्रकार आहे?' आपल्याकडे, बारा महिने तेच ड्रेस वापरायचे, हिवाळ्यात स्वेटर घालायचा आणि उन्हाळ्यात नाही घालायचा एवढाच फरक. त्यामुळे, हिवाळ्यातले /उन्हाळ्यातले कपडे काय वेगळे असतात हेच मला कळेना. जसा उन्हाळा वाढला तसं लक्षात आलं की माझ्याकडच्या कपड्यांत प्रचंड उकडायचं. मग इतर बायकांना विचारून जरा पातळ कापड विकत घेऊन ड्रेस शिवून घेतले. बरं, आत्तापर्यंत फक्त उक्तेच कपडे घेतलेले, हे शिंप्याकडून शिवून घेणे वगैरे नवेच होते मला. शेवटी सगळे अडथळे पार करून मी नवे कपडे घेतले.
मग हिवाळा आला , तसे जाड, वुलन्सचे सुटचे कापड घेऊन ड्रेस शिवले. माझा संसार बघायला आई आली तेव्हा कानमंत्र देऊन गेली," कपडे चांगले घाल, वेळकाळ काय आहे ते बघून घाल. लक्षात ठेव - एक नूर आदमी, दस नूर कपडा." झालं...तेव्हा जी मी कपडे खरेदी सुरु केली ती अजून चालूच आहे.
अहो, अशी काय खरेदी करते मी , काय विचारता? घरात घालायचे कपडे वेगळे(त्यात उन्हाळ्याचे वेगळे पातळ कापडाचे, हिवाळ्याचे वेगळे जाड वुलन्सचे), बाहेर घालायचे वेगळे (परत उ वे हि वे.) पार्टीला घालायचे वेगळे(परत उ वे हि वे.) सगळ्यांवर मॅचिंग स्वेटर्स, शॉल्स ,स्टोल्स इ.इ.इ.
जिथे जिथे पोस्टिंग येईल, तिकडची स्पेशालिटी तर घेतलीच पाहिजे. म्.प्र मध्ये चंदेरी साड्या, सुटस, सिकंदरबादला होते तेव्हा पोचमपल्ली साड्या हव्याच.
पंजाबात राहून फुलकारी नाही घ्यायची? जम्मूत वुलन सुटस मस्त मिळतात कश्मिरी वर्कवाले. कश्मिरी सिल्क तर हवेच. महूला तर वेगळ्यावेगळ्या टाइपची एक अश्या सहा साड्या घेतल्या. दहा-बारा सुट्स तर झालेच आवडले म्हणून.
कपड्यांचा सोस इतका की मुलीच्या जन्मानंतर मी मटेरिअल घ्यायचे आणि न शिवता तसेच ठेवून द्यायचे. (जरा तब्येत सुधारलेली होती ना म्हणून :)) कपाटात ढीग साचला होता मटेरिअल्सचा ,तरी खरेदी चालूच. नवर्याने विचारले तर म्हणाले की,'अरे, जरा बारीक होते आणि मग शिवून घेते, नाहीतर वाया जातील सगळे.' पण जेव्हा अगदीच १५-२० वर आकडा गेला आणि मापं बदलायची चिन्हं दिसेनात, तेव्हा मुकाट्याने एक एक करून शिवून घेतले.
बरं आता एवढ्या साड्या, ड्रेस आहेत तर ते तेवढे वापरले जातात का, तर नाही. पार्टीसाठी साड्या घ्यायच्या आणि जेव्हा नेसायची वेळ येते तेव्हा हज्जार कारणं पुढं करून ड्रेसच घालून जायचं. कधीकधी साडी नेसायचा मूड येतो, तेव्हा एखादी विशिष्ट साडी नेसायचाच मूड असतो. मज्जा म्हणजे, तीच साडी नेसायचा वारंवार मूड असतो आणि बाकीच्या साड्यांना वारंदेखील लागत नाही.
हे झालं माझ्या कपड्यांचं. नवर्याचे तर विचारू नका. आधी ते १०-१२ युनिफॉर्म, मग मेस मध्ये घालायला फिक्या रंगाचे (नवर्याच्या शब्दात सोबर) कपडे, बाहेर येता जाता घालायला टी शर्ट-जीन्स, खेळाचे वेगळे, संध्याकाळी ऑफिसला जाताना वेगळे,सुट्स्,ब्लेझर्स. नुसता ढीग असतो. त्यातले काही युनिफॉर्म तर नुसते शिवून ठेवायचे, कधी ऑर्डर आली तर घालायला, घातलेले काही मी बघितले नाहीत. ते नुसते पडून राहतात, जेव्हा घालायची वेळ येते, तेव्हा मापं बदललेली असतात. मग परत नवे शिवा.या कपड्यांची विल्हेवाट लावणे, मोठे काम असते. ते असे कोणाला देऊनही टाकता येत नाहीत. मग ते फाडा, जाळा.. उद्योग नुसता. या सगळ्यांत परत उ वे हि वे. आलेच.
आमच्या दोघांचे कपडे कमी म्हणून लेकीची भर त्यात. शाळेचे वेगळे, खेळायला जायचे वेगळे,घरातले वेगळे, बाहेरचे वेगळे, पार्टीचे वेगळे.... हुश्श. इथेही परत उ वे हि वे. आलेच. शिवाय ते दोन महिने चालले तरी खूप झालं. लगेच लहान होतात, परत खरेदीला आम्ही तय्यार. बरं, बाईसाहेबांचे नखरे कमी का आहेत, असेच हवे, हेच हवे, तेच हवे. दोन वर्षांपुर्वी केप्रीची फॅशन होती, तर बाईसाहेबांना केप्री नको, का तर म्हणे,'पाय दिसतात त्यात.' 
तर असे हे आमचे कपडेपुराण. लेहला येताना थोडेच सामान बरोबर आणायचे होते. बाकीचे घरीच ठेवणार होतो. कपडे पॅक करताना घाम फुटला अक्षरश:. मग एक दिवस बसून आमचे त्यातल्या त्यात जुने कपडे बाजूला काढले आणि जवळच्या अनाथ आश्रमात देऊन आलो. तरी घरी दोन बॅगा आणि एक ट्रंक भरून कपडे पाठवावेच लागले.
आत्ताही इकडे आल्यावर इतकी कपडे खरेदी झाली आहे, की आमची तीन कपाटं भरून ओसंडून वाहताहेत आणि शिवाय ट्रंकेत कपडे आहेतच.
आता काही महिन्यांत पोस्टींग येईल आणि खोलीभर पसरलेले कपडे बघताना आईचे वर लिहिलेले वाक्य परत परत आठवेल, फक्त थोडा बदल असेल्...'काय पॅक करू,किती पॅक करू,कुठे पॅक करू,कधी पॅक करू'....... 
चांगलं लिहिलयस प्राची. घरोघरी
चांगलं लिहिलयस प्राची.
घरोघरी मातीच्याच चुली !!
छान लिहिलयस प्राची. मलाही
छान लिहिलयस प्राची.
मलाही कपडे खरेदीचा नाद नाहिये..
पण आमचा एक group आहे . दर ३-४ महिन्यांनी आम्ही आपापल्या society मधुन आवाहन करतो आणि त्यांना नको असलेले कपडे गोळा करतो आणि आदिवासी वस्तीत , गरीब वस्तीत नेउन वाटतो.
कोणाला खरच हा कपड्यांचा प्रश्न असेल तर मला विपु मधे टाकलं तरी आम्ही जेन्व्हा जाणार असु ते सांगेन .
social work वगैरे उदात्त काही नाही पण त्या लोकांना होणारा आनंद बघायला याय्लाच हव ते सांगता येणार नाही. आणि गरिबी म्हणजे काय ते पण तिथच कळतं .
विषयांतर झालं असेलही पण रहावलं नाही.
भारी लिहिलय प्राची.
भारी लिहिलय प्राची.
सायली, खरं आहे ग. आम्हीही
सायली, खरं आहे ग. आम्हीही जुने कपडे मोलकरणीला देतो. जास्त कपडे निघाले तर असाच आश्रम शोधून ते देऊन टाकतो.
प्राची, कित्ती लोकांच्या एकदम
प्राची,
कित्ती लोकांच्या एकदम मनातलं लिहिलंयस. बर्याच लोकांना कपडे खरेदीचा कंटाळा असतो पण 'जमाने के और नये फॅशन के साथ' असायला कपडे खरेदी मस्ट आहे. मग एका लग्नातला डिझाईनर ड्रेस, किंवा पार्टीतली सिल्क साडी पुढे निदान एक वर्ष तरी कोणत्याच पार्टी/लग्नात नाही घालू शकत. ऑफिसात तर नवनविन फॅशनचे ड्रेसेस हवेतच. उन्हाळ्यात हलक्या रंगाचे, सुती कपडे चालू शकतील, पण थंडीत थोडे गडद, जाडसर हवेत, फुल बाह्यांचे हवेत (बायकांसाठी :फिदी:)
थोडक्यात काय तर? कपडे आणि चपला हव्यातच..
माझ्याकडे ही कपड्यांचा प्रचंड साठा आहे, मोजले नाहीत कधीच.. पण माझे कपडे टिकतात ही भरपूर. (म्हणजे मी टिकवते. :))
प्राची.. मस्त्..सर्वांच्या
प्राची..
मस्त्..सर्वांच्या मनातलच लिहिलस की अगदी!!
..
आमच्याकडे माझी ४ तर माझ्या नवर्याची ८ कपाटं भरून कपडे आहेत्..त्यातही सध्या विन्टर वेअर बाहेर तर समर ,कपाटांत वरच्या माळ्यावर्..दर सहा महिन्यांनी अदलाबदलीची कसरत आहेच.. शिवाय दरवर्षी जुन्या फॅशन चे काढून टाकून, (अर्थातच त्यातील काही फेवरेट सोडून )नवीन ,चालू फॅशन चे अॅड करणे चालूच असते.त्यात नवर्यानी जपून ठेवलेल्या ३२,३४ वेस्ट च्या पँट्स तर अनगिनत.. आपण ३५,३६ वरून पुन्हा एकदा ३२,३४ वर गेलो तर नकोत का असा सारासार विचार करून ठेवल्यात आपल्या
मला उगाचच वाटत होतं की न
मला उगाचच वाटत होतं की न घातल्या जाणार्या कपड्यांमुळे माझ्याकडेच गर्दी जास्त झालीये ते आता सगळेच एका बोटीत समजल्यावर बरं वाटलं...
पण आता शूट संपलं की मेजर क्लिनप निघणारे कपड्यांचं कारण सगळे कपडे तोवर सिंधुदुर्गी रंगाचे झालेले असणारेत. नशीबाने मी कॉटनच वापरते त्यामुळे त्यातले काही घरात घालायला, काही देऊन टाकायला तर काही अगदीच वाईट झालेले विविध वस्तू पुसणे कार्यक्रमासाठी वापरता येतील. यात न बसणार्यांचं काय करायचं मात्र माहीत नाही.
>>यात न बसणार्यांचं काय
>>यात न बसणार्यांचं काय करायचं मात्र माहीत नाही >> एक गम्मत आठवली.

माझ्याकडे एक व्हाईट शर्ट आहे, तो मी २००३ ला खरेदी केलाय, अजून ही घालते. तर परवा बस स्टॉपला
कलिग १ : शर्ट छान आहे, चांगला दिसतोय.
मी : थॅन्क्स, खूप जुना आहे २००३ ला घेतलाय.
कलिग १ - अजून बसतो?
मी : हो आता घातलाय ना?
कलिग नं २ - अगं ती वाढत्या अंगाचेच घेते कपडे...
दक्षे
दक्षे प्राची खरेच खूप छान
दक्षे
प्राची खरेच खूप छान लिहिले आहे. तुमच्या फोर्सेस च्या लेडीज कपडे खूप छान ठेवतात. व त्यात दिसतातही सुंदर. कॉम्प्लिमेन्ट्स.
अगदी अगदी प्राची सगळ्यांच्या
अगदी अगदी प्राची


सगळ्यांच्या आया अगदी असंच बोलतात बहुतेक.
आमच्या कडे पण प्रत्येकाच्या नावाची कपाटं घेतल्या जातात.....पण हळुहळु त्या प्रत्येक कपाटातला खालचा खण मी माझ्याही नकळत काबीज करत जाते
पण आता कंटाळा आला.....असं म्हणत जायचं आणि नवी खरेदी करत जायची
अतिसुंदर
अतिसुंदर
मस्त लेख ! ... घरोघरी
मस्त लेख ! ... घरोघरी मातीच्या चुली
प्राची , फार वाईट वाटून घेऊ
प्राची ,
फार वाईट वाटून घेऊ नकोस:-)
अमेरिकेत नोकरी करणार्यांचे हाल आणखीन वाईट - ऑफिसच्या कपड्यांचे फॉर्मल, बिझनेस कॅजुअल , अन कॅजुअल हे मुख्य प्रकार. फॉर्मल मधे मुलाखतीला (देताना अन घेताना ) घालायचे, फ्यूनरल ला घालायचे, बोर्ड मीटिंग ला घालायचे असे पोट प्रकार असतात. हिवाळी, उन्हाळी, हे सि़झन प्रमाणे मुख्य प्रकार. त्यात मग ट्रान्झिशन ( स्प्रिंग, फॉल) हे पोट प्रकार,
हॅलोवीनच्या आसपास भोपळे, भुतं ,कवट्या, असले टीशर्ट किंवा स्वेटशर्ट, ख्रिसमसला सँटा, स्नो फ्लेक,,ख्रिसमस ट्री वगैरे स्वेटरवर. जुलइ ४ ला लाल निळे पांढरे शर्ट, जूनच्या आधी पांढरे स्कर्ट, शॉर्टस घालायचे नाहीत अन सप्टेंबरच्या नंतर पण घालायचे नाहीत.
शिवाय सीझन अन ठिकाणाप्रमाणे पायताणं वेगळीच. वेगळंच पुराण आहे ते जाउ दे
प्राची पण असल्या भरपूर ड्रेस
प्राची पण असल्या भरपूर ड्रेस कोडस मधे अडकलेली असणार. आर्मी म्हणल्यावर.
अमेरिकेत नोकरी करणार्यांचे हाल आणखीन वाईट - ऑफिसच्या कपड्यांचे फॉर्मल, बिझनेस कॅजुअल , अन कॅजुअल हे मुख्य प्रकार. फॉर्मल मधे मुलाखतीला (देताना अन घेताना ) घालायचे,<<<
हे एवढं सोडलं तर बाकीच्या लिस्टमधलं mandatory काहीही नसतं.
प्राची..आजच विन्टर
प्राची..आजच विन्टर ट्रॅक्सूट्स विकत घेतले..प्रत्येकी दोन जोड.. जिम मधे श्टाईल मधे जायला लागतं म्हणून.. पुन्हा समर वेअर ला लागणार्या ट्रॅक्स ची आठवण आली आणी ते कुठे ठेवलेत ते शोधण्याचा/आठवण्याचा प्रयत्न करत आहे.. आजकाल सारखी तुझीच आठवण येते कपडे शोधतांना ,घेताना
घरोघरी मातीच्या चुली आणि
घरोघरी मातीच्या चुली आणि वाहुन जाणारी कपाटं
अमेरिकेत नोकरी करणार्यांचे हाल आणखीन वाईट >>>> हे आणि त्याच्या पुढचं भारतात पण लागू होते. फक्त तिथे अजून तरी हॅलोवीन वगैरेला वेगळे घालायचे वेगळे कपडे नाहीयेत. तरी १५ ऑगस्ट, २६ जान, होळीला पांढरे, दिवाळीचे तीन दिवसांचे तीन प्रकार, इतरांच्या/घरच्या लग्न समारंभात घालायचे, ऑफिस पार्टीवेअर, आजकाल महिला दिनास वेगळे (:)) असे हौस करणार्याला काही कमी प्रसंग नाहीत. तीच तर्हा पायताणांची सुद्धा.
सिनेमावाल्या ना पुन्हा कोणी
सिनेमावाल्या ना पुन्हा कोणी 'गचकला' तर लग्गेच घालायला पांढरेफेक कपडे पुन्हा वार्डरोबात ठेवायला लागतात. घरातलं कुणी गेलं तर हे ताबड तोब वार्डरोबकडे पळत असावेत.
मस्तच आहे प्राचीचं (आणि इतर
मस्तच आहे प्राचीचं (आणि इतर सर्वांचंही) कपडेपुराण.
माझ्या भावाला, कसाई बकरे टांगतो, तसे घरभर कपडे टांगत सुटण्याची भारी वाईट खोड आहे. त्याचे मळलेले कपडे दीन्वाण्या अवस्थेत घरात कुठे लोळत / टांगत पडले असतील, सांगणे अवघड. मग एकदा आईने सारे गोळा करून जुने, नवे, मळलेले, धुतलेले, लाँड्रीवाले असे सारे शर्ट्स मोजले, तर ते ४६ निघाले. हे त्याला स्वतःलाच माहिती मव्हते. मग प्रचंड शिव्यापुराण.
त्या मानाने मी भारीच आटोपशीर, म्हणावं.
प्राची मी मात्र यावर उपाय
प्राची
मी मात्र यावर उपाय शोधलाय. एक्सेल शीट केले आहे एक. नविन काही आणले की त्यात एन्ट्री करायची आणि फेकुन दिले की डीलीट करायचे. नवीन घ्यायचा विचार आला की एक नजर फिरवायची या शीटवर. टोटल मेनटेन करायचा प्रयत्न गेली ३ वर्ष तरी जमला आहे. साड्यांचा आकडा वाढतो आहे.. पण वाढायचा रेट कमी झालाय
बायकाना अजून काम काय? माझ्या
बायकाना अजून काम काय? माझ्या घरीपण दोन जणी उच्छाद मांडतायेत
>> बायकांनाच कामं नसतात असं समजू नकोस.. एकदा नवर्यानं दर आठवड्याला एक ऑफ व्हाईट कलरची पँट घेतलेली.. एक काय फॉर्मल, एक काय क्वाड्रा, एक सिक्स पॉकेट, एक शॉर्टस...
मी आपली ट्रायल रूमच्या बाहेर पुस्तक वाचत उभी असायचे.. (अशा वेळी लोकांच्या चेहर्यावरचे भाव बघण्यासारखे असतात) ...
सासरच्या सगळ्या लोकांना खरेदीचा शौक आहे.. मग मी आणि सासरे तुळशीबागेतल्या रामाच्या देवळात नणंदेच्या मुलीला सांभाळत बसायचो.. बाकीचेही खूष - आम्ही ही खूष!
प्रत्येक दिवसाचा एक रंग असतो आणि त्यानुसार कपडे घातले की दिवस चांगला जातो. त्या त्यानुसारच कपडे घालायच्या, मीही कटाक्षाने ते पाळायला सुरुवात केली. >>
काय हे प्राची! बु.प्रा.वा ना तू!
बुप्रावा वेडे नसतात असं कोणी
बुप्रावा वेडे नसतात असं कोणी सांगितलं?
बुप्रावा वेडे नसतात असं कोणी
बुप्रावा वेडे नसतात असं कोणी सांगितलं?
>> टोणगा, मी प्राचीला बुप्रावा म्हणाले, वेडी नाही... कृपया गैरसमज नसावा!
छान लिहिलसं!
छान लिहिलसं!
सुरेख लेख..माझ्या कपाटाचंही
सुरेख लेख..माझ्या कपाटाचंही नेहमी असंच होतं कपड्यांमुळे..मातोश्री कानी कपाळी ओरडुन थकतात..."ह्या पुढे मी तुझं कपाट आवरणार नाही" असं किमान पाच हजार वेळा बोलुन झाल्यावर आपोआप जाते ती सगळा ढिग उपसायला
बरं,all said and done...खरेदी काही केल्या संपत नाही...माझ्या एका मैत्रीणीची आई आम्हाला नेहमी म्हणायची "पोरींनो...बारा लुगडी तरी सदा तुमची *** उघडीच!!"
बायकाना अजून काम काय? माझ्या
बायकाना अजून काम काय? माझ्या घरीपण दोन जणी उच्छाद मांडतायेत>>>> मीताने वाचलं तर लग्गेच तुझ्या वार्डरोबचं पोस्ट्मार्टम होईल. टाकु का काडी?
एकदा नवर्यानं दर आठवड्याला एक ऑफ व्हाईट कलरची पँट घेतलेली.. एक काय फॉर्मल, एक काय क्वाड्रा, एक सिक्स पॉकेट, एक शॉर्टस...
>>> पूनमची 'फिटींग' आठवली.
मस्तच गं... सगळ्यांनी जे
मस्तच गं...
सगळ्यांनी जे काही भरभरुन लिहिलंय ना त्याला सेम पिंच! माझी तर काही काही कपडे घालवत नाहीत आणि टाकवत नाही अशी अवस्था झाली आहे. शिवाय ज्या प्रकारासाठी जो ड्रेस (ऑफिस, पार्टी, कॅज्युअल) घेतलेला असतो त्याच्या बरोब्बर विरुध्द प्रकारासाठी घालायला ड्रेसच नसतो! मग हा घ्यायच्या ऐवजी तो का नाही घेतला मी या डायलेमातून कधी सुटका होणारे माझी देव जाणे! 
भारी लिहीलय हां! मला कधीही
भारी लिहीलय हां!
मला कधीही आपल्याला पुरेसे कपडे आहेत असं फिलींग येत नाही. त्यामुळे खरेदी अपरिहार्य होते. त्यात मी कपडे नीट वापरत नाही बायको आणि आईच्या मते त्यांचा तात्काळ 'गुधडा' करतो त्यामुळे खरेदीला नेताना मला बजेटची वारंवार कल्पना दिली जाते. त्यात पुन्हा माझा ब्रँडेडचा सोस आणि बायकोची 'मोनिषागिरी' (म्हणजे काय ते कळायला तुम्ही साराभाई वर्सेस साराभाईचे फॅन असणे आवश्यक आहे!) यातुन दुकानात अत्यंत मनोरंजक संवाद होतात, त्यांचा मुख्य सारांश -' एवढ्या पैशात आमच्या गावात (म्हणजे खोपोलीत) ४ शर्ट येतील' असा असतो!
मनिषा नाही रे .... मोनिषा
मनिषा नाही रे .... मोनिषा म्हण
टीपीकली मिडलक्लास वाटतं मनिषा 
हायला !! आगावा मी ही पोस्ट
हायला !! आगावा मी ही पोस्ट टाकणारे हे कसं कळलं तुला ? बादवे, तू (पुरुष असून) सुद्धा टीवी सिरियल बघतोस ?

Pages