एक नूर आदमी......

एका माणसाला किती कपड्यांची गरज असते? माझ्या आजीच्या शब्दांत सांगायचं तर 'एक दांडीवर आणि एक **वर' पुरेसे असतात. स्मित पण खरंच तेवढेच पुरतात?

अकरावीला कॉलेजला अ‍ॅडमिशन घेतली आणि मनातून खुश झाले की आता रोज वेगवेगळे कपडे घालायला मिळणार. युनिफॉर्मच्या जंजाळातून सुटका झाल्याचा आनंद झाला. रोज कॉलेजला जायच्या आधी सुटकेस (आमच्या वाड्यातल्या घरात कपाटं कमी असल्याने आमचे कपडे सुटकेसमध्ये ठेवलेले असायचे.)उघडून कपड्यांच्या घड्या वर खाली करून 'आज कोणता ड्रेस घालावा?' यावर विचार करण्यात मी आणि ताई तासभर घालवायचो. तेव्हा आई म्हणायची," 'एक दांडीवर आणि एक **वर' असावेत म्हणजे काय घालू, कुठला घालू, कधी घालू, किती घालू असे प्रश्न पडत नाहीत."

नंतर नंतर का कोण जाणे पण माझा कपड्यांचा शौक कमी झाला, बारावीत एका परीक्षेच्या वेळी 'लकी' आहेत म्हणून मी पूर्ण परीक्षेच्या काळात दोनच ड्रेस आलटूनपालटून वापरले. स्मित माझी अशी 'लकी' प्रकरणं खूप आहेत, त्याबद्दल परत कधीतरी. स्मित

त्यावेळी माझ्याकडे जास्त कपडे नसायचेही, कारण, वर्षातून दोनदाच कपडे खरेदी व्हायची. एक दिवाळीला आणि दुसरी रिझल्ट लागल्यावर. स्मित पण ताई आणि मी एकमेकींचे कपडे आलटूनपालटून वापरायचो. त्यामुळे, बरेच Options असायचे.

इंजि. झाले, एके ठिकाणी नोकरीही लागली. एकदा गप्पा मारताना माझ्या बॉसच्या सेक्रेटरीने माझ्या मनात एक पिल्लू सोडून दिले की प्रत्येक दिवसाचा एक रंग असतो आणि त्यानुसार कपडे घातले की दिवस चांगला जातो. त्या त्यानुसारच कपडे घालायच्या, मीही कटाक्षाने ते पाळायला सुरुवात केली. मग ज्या रंगाचे कपडे नाहीत, दिवाळीला ते घेण्यावर भर असायचा. पण कपड्यांचा विशेष सोस नव्हताच.

मग लग्न झालं. आत्तापर्यंत आईबाबा घेतील तेव्हाच कपडे मिळायचे, आता हातात पैसा आला. तरी मला कपड्यांवर खर्च करणे जमायचे नाही. लग्नानंतर आम्ही फिरोजपुरला पोस्टिंग गेलो. मी तिकडे गेले तेव्हा जानेवारी महिना होता. त्यावेळी, ऑप पराक्रम चालू असल्याने आणि खूप थंडी असल्याने आजूबाजूला जास्त बायका नव्हत्या, पार्ट्याही होत नसत. त्यामुळे, जे कपडे जवळ होते, त्यात काम भागले.

जसा मार्च महिना संपत आला युनिटमधल्या बाकीच्या बायका यायला सुरुवात झाली. संध्याकाळी फिरायला जात असताना त्यांच्या गप्पा मी ऐकत असे. माझ्याकडे बोलण्यासारखे काही नसायचेच. तर एकदा दोघीतिघींना 'विंटर क्लोदिंग पॅक केले, समर क्लोदिंग बाहेर काढले' असे बोलताना ऐकले. मी विचारात पडले 'हे विंटर क्लोदिंग /समर क्लोदिंग काय प्रकार आहे?' आपल्याकडे, बारा महिने तेच ड्रेस वापरायचे, हिवाळ्यात स्वेटर घालायचा आणि उन्हाळ्यात नाही घालायचा एवढाच फरक. त्यामुळे, हिवाळ्यातले /उन्हाळ्यातले कपडे काय वेगळे असतात हेच मला कळेना. जसा उन्हाळा वाढला तसं लक्षात आलं की माझ्याकडच्या कपड्यांत प्रचंड उकडायचं. मग इतर बायकांना विचारून जरा पातळ कापड विकत घेऊन ड्रेस शिवून घेतले. बरं, आत्तापर्यंत फक्त उक्तेच कपडे घेतलेले, हे शिंप्याकडून शिवून घेणे वगैरे नवेच होते मला. शेवटी सगळे अडथळे पार करून मी नवे कपडे घेतले.

मग हिवाळा आला , तसे जाड, वुलन्सचे सुटचे कापड घेऊन ड्रेस शिवले. माझा संसार बघायला आई आली तेव्हा कानमंत्र देऊन गेली," कपडे चांगले घाल, वेळकाळ काय आहे ते बघून घाल. लक्षात ठेव - एक नूर आदमी, दस नूर कपडा." झालं...तेव्हा जी मी कपडे खरेदी सुरु केली ती अजून चालूच आहे.

अहो, अशी काय खरेदी करते मी , काय विचारता? घरात घालायचे कपडे वेगळे(त्यात उन्हाळ्याचे वेगळे पातळ कापडाचे, हिवाळ्याचे वेगळे जाड वुलन्सचे), बाहेर घालायचे वेगळे (परत उ वे हि वे.) पार्टीला घालायचे वेगळे(परत उ वे हि वे.) सगळ्यांवर मॅचिंग स्वेटर्स, शॉल्स ,स्टोल्स इ.इ.इ.

जिथे जिथे पोस्टिंग येईल, तिकडची स्पेशालिटी तर घेतलीच पाहिजे. म्.प्र मध्ये चंदेरी साड्या, सुटस, सिकंदरबादला होते तेव्हा पोचमपल्ली साड्या हव्याच. स्मित पंजाबात राहून फुलकारी नाही घ्यायची? जम्मूत वुलन सुटस मस्त मिळतात कश्मिरी वर्कवाले. कश्मिरी सिल्क तर हवेच. महूला तर वेगळ्यावेगळ्या टाइपची एक अश्या सहा साड्या घेतल्या. दहा-बारा सुट्स तर झालेच आवडले म्हणून.

कपड्यांचा सोस इतका की मुलीच्या जन्मानंतर मी मटेरिअल घ्यायचे आणि न शिवता तसेच ठेवून द्यायचे. (जरा तब्येत सुधारलेली होती ना म्हणून स्मित) कपाटात ढीग साचला होता मटेरिअल्सचा ,तरी खरेदी चालूच. नवर्‍याने विचारले तर म्हणाले की,'अरे, जरा बारीक होते आणि मग शिवून घेते, नाहीतर वाया जातील सगळे.' पण जेव्हा अगदीच १५-२० वर आकडा गेला आणि मापं बदलायची चिन्हं दिसेनात, तेव्हा मुकाट्याने एक एक करून शिवून घेतले.

बरं आता एवढ्या साड्या, ड्रेस आहेत तर ते तेवढे वापरले जातात का, तर नाही. पार्टीसाठी साड्या घ्यायच्या आणि जेव्हा नेसायची वेळ येते तेव्हा हज्जार कारणं पुढं करून ड्रेसच घालून जायचं. कधीकधी साडी नेसायचा मूड येतो, तेव्हा एखादी विशिष्ट साडी नेसायचाच मूड असतो. मज्जा म्हणजे, तीच साडी नेसायचा वारंवार मूड असतो आणि बाकीच्या साड्यांना वारंदेखील लागत नाही.

हे झालं माझ्या कपड्यांचं. नवर्‍याचे तर विचारू नका. आधी ते १०-१२ युनिफॉर्म, मग मेस मध्ये घालायला फिक्या रंगाचे (नवर्‍याच्या शब्दात सोबर) कपडे, बाहेर येता जाता घालायला टी शर्ट-जीन्स, खेळाचे वेगळे, संध्याकाळी ऑफिसला जाताना वेगळे,सुट्स्,ब्लेझर्स. नुसता ढीग असतो. त्यातले काही युनिफॉर्म तर नुसते शिवून ठेवायचे, कधी ऑर्डर आली तर घालायला, घातलेले काही मी बघितले नाहीत. ते नुसते पडून राहतात, जेव्हा घालायची वेळ येते, तेव्हा मापं बदललेली असतात. मग परत नवे शिवा.या कपड्यांची विल्हेवाट लावणे, मोठे काम असते. ते असे कोणाला देऊनही टाकता येत नाहीत. मग ते फाडा, जाळा.. उद्योग नुसता. या सगळ्यांत परत उ वे हि वे. आलेच.

आमच्या दोघांचे कपडे कमी म्हणून लेकीची भर त्यात. शाळेचे वेगळे, खेळायला जायचे वेगळे,घरातले वेगळे, बाहेरचे वेगळे, पार्टीचे वेगळे.... हुश्श. इथेही परत उ वे हि वे. आलेच. शिवाय ते दोन महिने चालले तरी खूप झालं. लगेच लहान होतात, परत खरेदीला आम्ही तय्यार. बरं, बाईसाहेबांचे नखरे कमी का आहेत, असेच हवे, हेच हवे, तेच हवे. दोन वर्षांपुर्वी केप्रीची फॅशन होती, तर बाईसाहेबांना केप्री नको, का तर म्हणे,'पाय दिसतात त्यात.' स्मित

तर असे हे आमचे कपडेपुराण. लेहला येताना थोडेच सामान बरोबर आणायचे होते. बाकीचे घरीच ठेवणार होतो. कपडे पॅक करताना घाम फुटला अक्षरश:. मग एक दिवस बसून आमचे त्यातल्या त्यात जुने कपडे बाजूला काढले आणि जवळच्या अनाथ आश्रमात देऊन आलो. तरी घरी दोन बॅगा आणि एक ट्रंक भरून कपडे पाठवावेच लागले.

आत्ताही इकडे आल्यावर इतकी कपडे खरेदी झाली आहे, की आमची तीन कपाटं भरून ओसंडून वाहताहेत आणि शिवाय ट्रंकेत कपडे आहेतच. स्मित

आता काही महिन्यांत पोस्टींग येईल आणि खोलीभर पसरलेले कपडे बघताना आईचे वर लिहिलेले वाक्य परत परत आठवेल, फक्त थोडा बदल असेल्...'काय पॅक करू,किती पॅक करू,कुठे पॅक करू,कधी पॅक करू'....... स्मित

Submit to kanokani.com

अगदी..
सगळी कपड्यांची कपाट आवरयला घेतली कि नेहमी ठरवते आता one in one out नियम ठेवायचा.. पण ते काही जमत नाही..
वरून ते size कमी होईल या आशेवर जुन्या साइझ चे कपडे सांभाळून ठेवणं आहेच...
छान लिहलय्..आवडलं स्मित

अगदी अगदी. मस्त लिहीलं आहेस प्राची. एक Dवर आणि एक Gवर हेच काय ते अंतिम सत्य.
पूर्वी १० बाहेरचे आख्खे कपडे नव्हते, लागतात कशाला म्हणून आणि परिस्थिती. आता ?
त्यात हापिसचे कपडे बाहेर चालत नाहीत, बाहेरचे हापिसात चालत नाहीत, घरातले वेगळे. तरी मला पाहून कोणी फॅशनलिटरेट वगैरे म्हणणार नाही. जोडेबिडे मॅच करायच्या भानगडीत अजून पडले नाहिये हेच त्यातल्या त्यात बरे.
साधेपणाला फारशी किंमत नाही हे मात्र खरं. हुद्यानुसार पेहराव बदलावा(च) लागतो आणि ड्रेसिंग अप (आपण आहोत त्यापेक्षा जास्त महाग कपडे वापरणे) हे कॉर्पोरेटजगात महत्वाचे ठरते दुर्दैवाने.
अजून दहा वर्षांनी ते पुरुषांसारखं सगळे निळे नायतर पांढरे कपडे वापरावे का?. कटकटच नको फिदीफिदी

प्राची छान लिहीलंयंस गं. खरंय आता जमाने के साथ चलो हे तत्व थोड्याफार प्रमाणात का होईना अंगिकारावं लागतंच.

छान लिहिलय प्राची.

अरे बापरे! इतके कपडे? स्मित माझ्याकडे भरपूर कपडे आहेत अशा समजूतीत होते मी, आता नाहीये डोळा मारा माझा नेहेमीचा प्रश्न- जागा कुठे मिळते? स्मित

माझ्या बाबतीत एक मात्र अगदी हमखास होतं- मी 'हा चांगल्यापैकी ड्रेस आहे हं' म्हणून अगदी जपून जपून जो ड्रेस वापरते, त्याच फॅशनचा ड्रेस इतर बायका अगदी चिल्लरमध्ये वापरून जुना करून टाकतात अ ओ, आता काय करायचं माझ्याकडे तो वर्षानुवर्ष तसाच नवीन पण आऊट ऑफ फॅशन होऊन पडून रहातो बिचारा अरेरे

छान स्मित
पण कपड्यांचं वेड हे पुरुषांकडंही असतं हो.
माझे दोनतीन मित्र आहेत, "दस नुर कपडा" टाईप स्मित

हम्म्म्म, तरी अजून आसाम पोस्टिंग झालेलं नाहीये, राजस्थानात गेलेलो नाही. तिथल्या खरेदीच्या याद्या तयार आहेत. डोळा मारा

छान लिहीलय, अगदी असच घडत! स्मित

छान आहे. स्मित
मला आई उगाच म्हणत असते कित्ती कपडे आहेत तुझे म्हणुन.. इथे बघायला सांगयला हवं तिला डोळा मारा

आवडलं स्मित छान लिहिलंय.

माझा नेहेमीचा प्रश्न- जागा कुठे मिळते?
>>>> अगं, उन्हाळ्यात उन्हाळ्याचे कपडे कपाटात आणि हिवाळ्याचे ट्रंकेत. हिवाळ्यात हिवाळ्याचे कपडे कपाटात आणि उन्हाळ्याचे ट्रंकेत.

ह्म्म, छान आहे. मला ही कपड्यांचा प्रचंड सोस आहे. एवढे घेतलेले वापरले जाणार नाहीत हे माहित असूनही दरवेळी हावरटासारखे आणले मात्र जातात. डोकं वगैरे पार गहाण पडतं घेताना.

अगं तू कपड्यांच आकड्यांसहीत वर्णन केलं असतस तर जास्त मज्जा आली असती. की मोजतच नाहीस आता? स्मित

मस्त लेख! आईला नाही दाखवत कारण लगेच ती माझ्या भरून वहाणा र्‍या कपड्यांच्या कपाटावर घसरेल फिदीफिदी

आऊट ऑफ फॅशन >> सदरे, झब्बे खूप आहेत अन् मी ते ज्याम म्हणजे ज्याम जपून ठेवतो आता वापरायला काढेन

छान आहे लेख आणि तुझं कपड्यांवरचं खुसखुशीत भाष्य! खरं तर आपल्याला एवढ्या सगळ्या कपड्यांची गरज तरी असते का? पण हौसेला मोल नाही म्हणतात तेच खरे! एकदा का कापड बाजारात किंवा ड्रेसच्या दुकानात शिरले की सर्व रिझोल्यूशन्सचा विसर पडतो आणि काय काय घेऊ असं होऊन जातं.... स्मित
अर्थात ज्यांना टूरिंग करायला लागतं, भरपूर जनसंपर्क असलेले कार्यक्रम अटेन्ड करायला लागतात त्यांना कपड्यांचा संग्रह करायलाच लागतो. मग कपाट दुथडी भरून वाहायला लागलं की पुन्हा एकदा दृढनिश्चय : आता नवे कपडे घेणे नाही! स्मित

बायकाना अजून काम काय? माझ्या घरीपण दोन जणी उच्छाद मांडतायेत फिदीफिदी कपडे आणि चपलांचा ढिग पडलाय स्मित

मस्त लेख.
माझही पूनम सारखच होतं मी आपली एक ड्रेस जपून -जपून वापरते आणि आजूबाजूच्या बायका त्या वर्षापुर्वीच वापरलेल्या असतात. स्मित
माझ्या नवर्‍याचे तर शेकडोंनी कपडे त्या त्या सिझनचे. त्यामानानी मी खुप कमी विकत घेते. स्मित
मीपण ११,१२ वी फ्कत दोन ड्रेसेसवर काढलेली आहे. आता तेच ठिक होते असे वाटते. स्मित

पहिल्याच वाक्याला गुगली 'एक दांडीवर आणि एक **वर' Smiley

हेहे कसला सही लिहीलाय लेख!!
माझी आई हे समर क्लोदिंग्,विंटर क्लोदिंग करत असते. (ही फार चांगली पद्धत आहे खरंतर. क्लोजेट्स जरा नीटनीटकी दिसतात!! मला फार बरं वाटतं तसं क्लोजेट पाहायला! स्मित )
पूर्वी मी आईच्या साड्या मोजायचा पराक्रम केला होता. नशिब आईने तो हल्ला परतवला नाही. माझे कपडे तर आत्ताही अमेरिकेच्या घरी, माहेरी आणि सासरी ओसंडून वाहतायत. कसे ठेवायचे नीट हा प्रश्न जीवनमरणाच्या तोडीचा आहे आणि !!

मस्तं लेख.
मला कपड्यांची खरेदीत फारसा उत्साहं नाही.... 'मला कपडे घेता येत नाहीत' ह्या बाबतीत सगळ्यांचं (दुकानदारासकट) एक मत आहे, पांढरा फेक, नीळ दिल्यासारखा पांढरा, नुस्ता पांढरा, ऑफ व्हाईट, मोतिया हे माझ्यासाठी वेगवेगळे रंग नाहीत... लोकाना वाटतं की मला रंग कळत नाहीत स्मित
असो!
तुझं कपडे पुराण केवळ झक्कास. इथेसुद्धा ते उन्हाळ्याचे वेगळे, हिवाळ्याचे वेगळे वगैरे वैतागवाडी प्रकार करावे(च) लागतात (त्यावरून आठवलं.... हिवाळ्याचे बाहेर काढायची वेळ आलीये).

छान लिहीलय प्राची. मला स्वतःला खूप कपडे खरेदीची आवड नाही (म्हणजे माझा असा समज आहे) त्यामुळे खूप कपडे नसतात माझ्याकडे. असे म्हणून पण बरेच कपडे जमतात माझे, एवढे करूनही शेवटी दर वेळी काय घालु हा प्रश्न नेहमीच पडतो किंवा आपल्याकडे त्या प्रसंगासाठी योग्य कपडे नाहीत असा दरवेळी साक्षात्कार होतो.

प्राची, अगदी सेम पिंच कपडे खरेदीबाबत स्मित
छान लिहिलसं!

झक्कास लिहीलय प्राची स्मित

मी कालच मोजले.. आता वापरत नाही / वापरू शकत नाही फिदीफिदी असे माझ्याकडे १७ शर्ट - टाय, ४ जीन्स,१२ टीशर्ट, ५ पॅन्ट्स आहेत!! अन् आता मी वॉर्डरोब चेंज करणारे - फक्त कॉटन्स स्मित

डुआय, टाय पण होईनासा झाला? डोळा मारा

नाही नाही.. नववर्षातला पण मी नेमाने पाळणारे स्मित (त्याशिवाय १० किलो कसं कमी होणार फिदीफिदी)

टाय का होईनासा का होईल?? टायवर मॅच होणारे शर्ट बघायच्येत आता कुठं जाऊ चांगले ऑप्शन्स कुठे बरं?? कॉटन्स बाय सेंन्च्युरी की अजून काही? तू सुचवत्येस का?

प्युअर कॉटन्सकरता आत्तातरी नाव लक्षात येत नाहीये.

फॅबमधे पण मस्त आलेत बरका रे डुआय. आणि किमती अती नाहीयेत.

प्राची,
आसामात मुगा सिल्कची मेखला चादर आणि राजस्थानात जिथे बांधणी करतात तुमच्यासमोर तिथली कॉटन क्रेप बंधेज....
विसरू नको बरंका!

स्मित देशात येतांना पहिला प्रश्न कपड्यांचा आणि शूज चाच होता. उन्हाळी, हिवाळी जॅकेट्स, स्टोल्स, विंटर शूज, काही जुन्या साड्या, सूट्स, चादरी ( हो मला वेगवेगळ्या बेडशीट्स आणि सोफाकव्हर्स जमा करण्याचापण भलता नाद आहे स्मित) असे सगळे देऊन टाकले.
(इथे आल्यावर ट्रंका आणि कपाटं ओसांडून वाहताहेत हे वेगळं सांगायला नकोच फिदीफिदी)

धन्यवाद मंडळी.
नी, हो लक्षात ठेवेन. स्मित