आमचा जुगारी बाप

Submitted by nikhilmkhaire on 3 February, 2010 - 00:37

हे, ओंकारेश्वरा, दगडूशेठ हलवाया, तांबड्या जोगेश्वरी माते आणि
तिरुपतीहून खास भक्तांसाठी केतकावळ्याला आलेल्या बालाजीदेवा
तुम्हाला काहीच माहित नाही,
असं मला बिलकूल म्हणायचं नाही,
तरीही...

आमचा बाप हाडाचा जुगारी
म्हणून अजून टिकून आहे.
नाहीतर कधीच बाकिच्यांसारखा
टिकट्वेन्टि किंवा गळफास घेऊन मेला असता.

बापाचं जुगारावर अतोनात प्रेम!
इतकं की उधार्‍या उसणवार्‍या करून किंवा
इतर जोडधंदा करून मिळालेला पैसा जुगारात घालवावा.

कधितरी आम्हाला बाप आहे हे आठवते, मग आम्ही म्हणतो,
"बापराव, आता बास करा की, लय झाला जुगार!"
यावर आमचा बाप कावतो आणि म्हणतो,
"भोसडीच्या, गांड झाकायला पहिली चड्डी या जुगारानंच दिली ना!
तवा नाय सुचलं तुला, आता सांगतोय, बास झालं!"
आम्ही म्हणतो बरं!

कोणे एके काळी, आमच्या बापानं जुगारामध्ये बक्कळ पैसा मिळवला होता,
असं गाववाले सांगतात.
आम्हाला मात्र काही आठवत नाही.
आम्हाला आठवतो ते जुगाराच्या पुढच्या हंगामासाठी
पैसा कुठून आणायचा या चिंतेमध्ये व्यग्र असणारा आमचा बाप.

परवा आमच्या गावचा एक माणूस भेटला.
जुगारानं पार खंगलेला. सोबत बायको आणि लहान पोरगं!
तिघं मिळून भीक मागत होती.
आम्ही म्हंटलं, का रे बाबा?
तो म्हणाला, काही नाही मागचा हंगाम वाईच जड गेला.
आम्ही म्हणालो, झेपत नाही तर खेळता कशाला जुगार!
तर तो म्हणाला, असं कसं बापजाद्यापासून चालत आलं आहे, असं कसं सोडणार?
आम्ही म्हणालो आता काय?
तो म्हणाला, काही नाहि, जुगारासाठी पैसा जमला की परत जाणार गावाला!
आम्ही म्हणालो बरं!

एवढं का हे वेड जुगारचं हेच कळत नाही!
म्हणून एकदा आमच्या बापाल विचारलं,
"बापराव, एवढं वेड कशासाठी, कशासाठी हा हट्ट?"
आमच्या बापनं बराच वेळ आमच्याकडं नुसतंच पाहिलं, मग म्हणाला,
"तू माझीच औलाद आहेस याची मला शंक येते"
आम्ही म्हणालो बरं!

बाप अजूनही जुगार खेळतो आहे.
हे, ओंकारेश्वरा, दगडूशेठ हलवाया, तांबड्या जोगेश्वरी माते आणि
तिरुपतीहून खास भक्तांसाठी केतकावळ्याला आलेल्या बालाजीदेवा
तुम्हाला काहीच माहित नाही,
असं मला बिलकूल म्हणायचं नाही,
तरीही...
आमच्या बापाला एक तर जुगारात यश द्या किंवा असंच निब्बर बनून राहण्याची शक्ती द्या,
एवढीच प्रार्थना!

गुलमोहर: 

जबराट...
काही शब्द अंगावर येताहेत पण खटकत नाहीत ! मला वाटतं यातच कविचं यश आहे...
मुजरा सरकार Happy

Pages