आमचा जुगारी बाप

Submitted by nikhilmkhaire on 3 February, 2010 - 00:37

हे, ओंकारेश्वरा, दगडूशेठ हलवाया, तांबड्या जोगेश्वरी माते आणि
तिरुपतीहून खास भक्तांसाठी केतकावळ्याला आलेल्या बालाजीदेवा
तुम्हाला काहीच माहित नाही,
असं मला बिलकूल म्हणायचं नाही,
तरीही...

आमचा बाप हाडाचा जुगारी
म्हणून अजून टिकून आहे.
नाहीतर कधीच बाकिच्यांसारखा
टिकट्वेन्टि किंवा गळफास घेऊन मेला असता.

बापाचं जुगारावर अतोनात प्रेम!
इतकं की उधार्‍या उसणवार्‍या करून किंवा
इतर जोडधंदा करून मिळालेला पैसा जुगारात घालवावा.

कधितरी आम्हाला बाप आहे हे आठवते, मग आम्ही म्हणतो,
"बापराव, आता बास करा की, लय झाला जुगार!"
यावर आमचा बाप कावतो आणि म्हणतो,
"भोसडीच्या, गांड झाकायला पहिली चड्डी या जुगारानंच दिली ना!
तवा नाय सुचलं तुला, आता सांगतोय, बास झालं!"
आम्ही म्हणतो बरं!

कोणे एके काळी, आमच्या बापानं जुगारामध्ये बक्कळ पैसा मिळवला होता,
असं गाववाले सांगतात.
आम्हाला मात्र काही आठवत नाही.
आम्हाला आठवतो ते जुगाराच्या पुढच्या हंगामासाठी
पैसा कुठून आणायचा या चिंतेमध्ये व्यग्र असणारा आमचा बाप.

परवा आमच्या गावचा एक माणूस भेटला.
जुगारानं पार खंगलेला. सोबत बायको आणि लहान पोरगं!
तिघं मिळून भीक मागत होती.
आम्ही म्हंटलं, का रे बाबा?
तो म्हणाला, काही नाही मागचा हंगाम वाईच जड गेला.
आम्ही म्हणालो, झेपत नाही तर खेळता कशाला जुगार!
तर तो म्हणाला, असं कसं बापजाद्यापासून चालत आलं आहे, असं कसं सोडणार?
आम्ही म्हणालो आता काय?
तो म्हणाला, काही नाहि, जुगारासाठी पैसा जमला की परत जाणार गावाला!
आम्ही म्हणालो बरं!

एवढं का हे वेड जुगारचं हेच कळत नाही!
म्हणून एकदा आमच्या बापाल विचारलं,
"बापराव, एवढं वेड कशासाठी, कशासाठी हा हट्ट?"
आमच्या बापनं बराच वेळ आमच्याकडं नुसतंच पाहिलं, मग म्हणाला,
"तू माझीच औलाद आहेस याची मला शंक येते"
आम्ही म्हणालो बरं!

बाप अजूनही जुगार खेळतो आहे.
हे, ओंकारेश्वरा, दगडूशेठ हलवाया, तांबड्या जोगेश्वरी माते आणि
तिरुपतीहून खास भक्तांसाठी केतकावळ्याला आलेल्या बालाजीदेवा
तुम्हाला काहीच माहित नाही,
असं मला बिलकूल म्हणायचं नाही,
तरीही...
आमच्या बापाला एक तर जुगारात यश द्या किंवा असंच निब्बर बनून राहण्याची शक्ती द्या,
एवढीच प्रार्थना!

गुलमोहर: 

अं,,,,,,,,,,,, खरं सांगु का? ही चांगली आहे की नाही हे मी सांगणं अवघड आहे कारण अशा कविता आवडण्याचा माझा पिंड नाही रे, शब्द जरा अंगावर आले. माफ कर मित्रा! खरतर माझा अधिकार नाही म्हणायला हवं

Happy
औंद्याच्याला पाऊस झाला तर बाप जिंकल. निब्बर हाये त्येच बरय.
तो एक अट्टल जुगारी बसलाय ना वर, त्याला पाझर फुटला तर पाऊस पडल.

शब्द जरा अंगावर आले पण कविता आवडली.

औंद्याच्याला पाऊस झाला तर बाप जिंकल. निब्बर हाये त्येच बरय.
तो एक अट्टल जुगारी बसलाय ना वर, त्याला पाझर फुटला तर पाऊस पडल.>>>>>>.परफेक्ट!

(शीर्षक बघून मी वळत नव्हतो इकडे पण) खरच चांगली आहे.. प्रभावी आहे..>>>> अनुमोदन.

रैनालाही अनुमोदन.

चांगली कविता. वास्तवाचे चित्रण पण सुरेख...!!
...............................................................
"भोसडीच्या, गांड ही दोन शब्दाऐवजी पर्यायी शब्दरचना केली असती तरी कवितेच्या आशयाला आणि वास्तवाला काही धक्का लागला असता असे मला वाटत नाही.:स्मित:

माफ करा पण कवितेच्या आशयामधे ते शब्द सहज आलेले आहेत.
मुद्दामून आणायचे म्हणून आलेले वाटत नाही.
व्यक्त होणं हे उगाच सोवळं करायची गरज नाही.

छानच - बर्‍याच दिवसांनी दिसलास.
>>त्याला पाझर फुटला तर पाऊस पडल.
जीवनी आवर्षणारा तू कृपेचा मेघ का? ... Happy

सगळ्यांना धन्यवाद!
अनेक वर्षांपासून वडील, काका, मामा इ. मंडळींना शेतामध्ये राबतान बघतो आहे, पण कधीही स्वतः तिथे काम करावसं वाटलं नाही. हरबरा, हुरडा, चिंचा, बोरं यांच्या पुरताच शेताशी संबंध उरला आहे. कधितरी राग येतो स्वतःचा पण त्याहून अधिक काहीच करता येत नाही, ही 'गिल्ट फिलिंग' वाढत जाते. मग स्वयंघोषित नास्तिकाला राजकारण्यांसारखी संधी मिळते. देवावर सगळं ढकलून द्यायचं आणि मोकळं व्हायचं. पण करायचं काहीच नाही. अवेळी पडणारा पाऊस काय किंवा मी काय सगळेच सारखे, बेभरवशाचे!

@गंगाधर मुटे : Happy

भिडणारी कविता. हा जुगार जगण्यासाठी व जगविण्यासाठी आहे. तो जो खेळतो तो सर्वात साहसी असतो. ज्यांच्या अशा अव्यावहारीक साहसामुळे आपण जगतो त्यांना सलाम!

रैना,
दोन ओळींत अर्थ सांगितलासा..
हे असं फोडायचं नसतया Happy

निखिलराव, आवडली भावा कविता.. अख्खी!

आवडली नाही
मी कदाचित ब्य्याकवर्ड आहे
या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे -अशा कवितांवर प्रेम करणारा मी आहे
Happy

लई भारी !
कविता जुगार्‍याची नसून जुगाराचे चटके बसलेल्या कुटुंबियांची आहे. आणि जुगारी शेअर बाजारातला किंवा रेसकोर्सवरचा नसून खेड्यातला आहे. त्यामुळे, भाषेचा बाळबोधपणाच जरा खटकला असता !
शिवाय, कधीतरी नेहमीच्या वरण-भाताबरोबर थोडासा मिरचीचा ठेचा असला तर काही वाईट नाही; ताटातला तो मुख्य पदार्थ मात्र नसावा एव्हढंच !!

Pages