मेवाडदर्शन-२

Submitted by नरेंद्र गोळे on 16 November, 2009 - 00:58

तिसरा दिवसः हल्दीघाटी व नाथद्वार

चितौडचा इतिहास

इसवी सनाच्या ७ व्या शतकात मौर्य घराण्याने चितौड वसवले. पौराणिक मेवाडी नाण्यांवर आढळणार्‍या चित्रांगद मोरी यांचे नावावरून त्याचे नाव चित्रकूट असे ठेवलेले होते. बाप्पा रावल यांनी इसवी सन ७३४ मधे चितौड जिंकून घेतल्यावर त्यास मेवाडची राजधानी केले. त्यानंतर अकबराने १५६८ मधे जिंकून घेपर्यंत चितौडच मेवाडची राजधानी राहिले. त्यानंतर मग मेवाडची राजधानी उदयपूरला हलवण्यात आली.

बाप्पा रावल यांच्या पश्चात त्यांच्याच गहलोत घराण्यातच सत्ता राहिली. इसवी सन १३०३ मधे दिल्लीच्या अल्लाउद्दिन खिलजी याने पद्मिनीकरता चित्तौडवर हल्ला केला. तत्कालीन राजे, रावल रतनसिंग युद्धात मारले गेले. त्यांची पत्नी पद्मिनी हिने जौहार केला. चित्तौडवर अल्लाउद्दिन खिलजीची सत्ता स्थापन झाली. इसवीसन १३२७ मधे गेहलोत घराण्यातीलच हमीरसिंग यांनी पुन्हा सत्ता परत मिळवली. हमीरसिंग यांचा जन्म ज्या शिसोदा गावात झाला होता, त्यावरून मग या राजघराण्यास शिसोदिया असेही म्हणू लागले.

राणा हमीरसिंग यांचे पणतू महाराणा कुंभकर्ण ऊर्फ कुंभा १४३३ चे सुमारास गादीवर बसले. १४४२ मधे माळव्याचा सुलतान महमूद खिलजी याने चित्तौडगढवर आक्रमण करून मच्छिंद्रगढ, पाणगढ आणि चौमुखा ताब्यात घेतले. या अनिर्णायक लढाईत गुजरात व माळव्याच्या संयुक्त फौजांचा पराभव झाल्याने सुलतान मांडूस परतला. पुढे दहा वर्षेपर्यंत मग चित्तौडवर आक्रमण होऊ शकले नाही. या विजयाची आठवण म्हणून १४४८ मधे महाराणा कुंभा यांनी चित्तौडमधे एक विजयस्तंभ उभारण्यास सुरूवात केली. तो १४५८ मधे बांधून पूर्ण झाला. ३७ मीटर उंचीच्या या स्तंभास नऊ मजले असून १५७ पायर्‍या आहेत. दगडातून शिल्पे साकारून सजवलेले, एकातून एक उमलणारे, शंखाप्रमाणे उलगडत जाणारे जिने आणि हवेशीर कलात्मक खिडक्यांनी विभूषित, भरभक्कम बांधणीच्या या स्तंभाचा सर्वात वरचा मजला तर शिल्पकलेने अप्रतिम सजलेला आहे. इसवीसनाच्या पंधराव्या शतकातील भारतीय तंत्रज्ञानाचे दैदिप्यमान उदाहरण म्हणून या विजयस्तंभाचा उल्लेख अभिमानानेच करावा लागेल.

महाराणा कुंभा यांनी १४५८ पर्यंत राज्य केले. १४५८ मधे त्यांचेच पुत्र उदयसिंग (प्रथम) यांनी सत्तासंपादनार्थ, त्यांचा वध केला. महाराणा कुंभांच्या कारकीर्दीत सर्वप्रकारच्या कलागुणांना ऊर्जितावस्था प्राप्त झाली. मेवाडमधील ८४ किल्ल्यांपैकी ३२ किल्ले बांधले गेले. यांच्यातच मेवाडमधील, चित्तौडनंतरचा सर्वात अभेद्य किल्ला, कुंभलमेर किंवा कुंभलगढचा समावेश होतो. महाराणा प्रताप यांचा जन्मही कुंभलगढचाच. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी आहे. तसेच राजस्थानात महाराणा प्रतापांचे जन्मस्थळ कुंभलगढ आहे. कुंभलगढची तटबंदी ३६ किलोमीटर लांबीची आहे. चीनच्या भिंतीनंतर, जगातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वात लांब तटबंदी आहे ही. महाराणा कुंभांच्याच कारकीर्दीत राणकपूरचे त्रैलोक्य-दीपक जैन मंदिर, चित्तौडची कुंभास्वामी आणि आदिवर्ष तसेच शांतिनाथ जैन मंदिरे बांधली गेली. स्वतः महाराणा कुंभांनी 'संगीत-राजा', गीतगोविंदावरची 'रसिक-प्रिय' ही टीका, 'सूडप्रबंध' आणि 'कामराज-रतिसार' या ग्रंथांचे लेखन केले आहे. त्यांच्याच कार्यकाळात विद्वान अत्रींनी 'चित्तौडच्या कीर्तीस्तंभाची प्रशस्ती' लिहीली आणि कहना व्यास यांनी 'एकलिंग-महात्म्य' लिहीले.

१५२७ मधे राणा संग्रामसिंग (राणा संगा) यांनी खानवा येथे बाबराशी निकराची लढाई केली. त्यात बाबराचा जय झाला. पुढे जखमी झालेले राणा संग्रामसिंग थोड्याच वर्षांत मृत्यू पावले. १५३५ मधे गुजरातचा राजा बहादुरशहा चित्तौडवर चालून आला असता संग्रामसिंगाची पत्नी राणी कर्मवती हिच्याकडे चित्तौडची सूत्रे होती. तिने यावेळी बाबराचा मुलगा हुमायूनची मदत मागितली. त्याने होकारही दिला. मात्र हुमायून पोहोचण्यापूर्वीच बहादुरशाहने चित्तौड काबीज केल्यामुळे राणी कर्मवतीसह सर्व स्त्रियांनी जौहार केला तर गडावरील सर्वच्या सर्व ३२,००० लोक धारातीर्थी पडले.

वरील चित्रपट्टीत पहिले चित्र कुंभलगढाचे आहे तर दुसर्‍या चित्रात बनवीर, उदयसिंग समजून चंदनचा वध करत असतांनाचे चित्र दिसत आहे. बनवीर, राजपुत्र उदय याचा शिरच्छेद करण्याकरता आला असता, पन्नाधायने आपला स्वतःचा पुत्र चंदन याला राजपुत्राचे जागी झोपवले आणि उदयला आधीच दूर पाठवून त्याचे प्राण वाचवले. त्या अत्युच्च त्यागाची ही स्मृती.

१५२८ मधे राणा संग्रामसिंग यांचा मृत्यू झाला. त्यांच्यापश्चात त्यांचा सर्वात मोठा हयात असलेला मुलगा रतनसिंग राणा झाला. १५३१ मधे रतनसिंग मारला गेला व त्याचाच भाऊ विक्रमादित्यसिंग गादीवर बसला. विक्रमादित्याच्याच राज्यकाळात बहादुरशाहने चित्तौडवर कब्जा मिळवला. उदयसिंग यास सुरक्षेच्या कारणास्तव बुंदीस रवाना करण्यात आले. पुढे १५३७ मधे विक्रमादित्यास मारून बनवीर गादीवर बसला. तेव्हाच तो उदयसिंगासही मारणार होता. पण पन्नाधायने त्याचे जागी आपल्या चंदन नावाच्या मुलास बळी देऊन त्याचे प्राण वाचवले. पन्नाधाई स्वतः उदयसिंगासोबत कुंभलगढ इथे आश्रयार्थ जाऊन राहिली. कुंभलगढाचा तत्कालीन शास्ता आशाशाह व इतर सरदारांच्या मदतीने १५४० मधे बनवीरचा पराभव करून उदयसिंग राजा झाला.

महाराणा उदयसिंग (जन्मः ऑगस्ट ४,१५२२, मृत्यूः फेब्रुवारी २८, १५७२)

त्यानंतर महाराणा उदयसिंग यांनी चित्तौडवर राज्य केले. ते राणा संग्रामसिंग व राणी कर्मवती यांचे चौथे पुत्र होते व त्यांचा जन्म झाला तेव्हा राणा संग्रामसिंग हयात नव्हते. मेवाडच्या राजघराण्यातील ते ५३ वे शासक होते. महाराणा उदयसिंगांनी राजपूत राज्यव्यवस्थेचे एकचालकानुवर्तित्व घातक ठरत असल्याचे जाणून जाणत्यांच्या सामूहिक प्रशासनास जन्म दिला. या राज्यव्यवस्थेचा उपयोग पुढे अकबराच्या आक्रमणाचे काळी झाला. तेव्हा सर्वांच्या सल्ल्याने उदयसिंग चित्तौड सोडून निघून गेले होते. तरीही चित्तौडने चार महिनेपर्यंत शर्थीची झुंज दिली. २५ फेब्रुवारी १५६८ रोजी पुन्हा एकदा चित्तौड पडले आणि सर्व स्त्रियांना पुन्हा एकदा जौहार करावा लागला. चित्तौड राज्य करण्यास सुरक्षित राहिलेले नाही हे पाहून महाराणा उदयसिंग यांनी उदयपूर शहराची निर्मिती केली. त्यांच्या पश्चात महाराणा उदयसिंगांनी आपल्या आवडत्या जगमल्ल नावाच्या पुत्रास राज्याची सूत्रे सुपूर्त केली. मात्र त्यांनीच घडवलेल्या सामूहिक प्रशासनास हे रुचले नाही. महाराणा प्रताप हे महाराणा उदयसिंगांचे थोरले पुत्र होते. ते पराक्रमी आणि राज्यकर्ते म्हणून सर्वमान्य होते. म्हणून, त्या सामूहिक प्रशासनाने त्यांस गादीवर बसवले. महाराणा प्रतापांनी अकबराच्या आक्रमणाविरुद्ध हल्दीघाटीत निकराची लढाई केली. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. त्यांचा आवडता घोडा चेतकही मारला गेला. महाराणा प्रताप वाचले. त्यांनी चित्तौड वगळता सारे मेवाड पुन्हा ताब्यात घेतले. चित्तौड ताब्यात येईपर्यंत सारे राजभोग सोडून दिले. पत्रावळीत जेवण्याची शपथ घेतली. पण अखेरपर्यंत ते चित्तौडवर ताबा मिळवू शकले नाहीत.

हल्दीघाटी

अशा तीव्र संघर्षाचा आणि प्रखर स्वाभिमानाचा इतिहास असलेल्या चित्तौडगढाकडे आम्ही आता अग्रसर होत होतो. मग जगप्रसिद्ध हल्दीघाटी लागली. खरोखरीच तिथे आजही हळदीसारखे खडक दिसून येतात. ही एक खूपच अरुंद खिंड आहे. जेमतेम एक वाहन जाऊ शकेल असा डांबरी रस्ता त्यातून पलीकडे घेऊन जातो. बाहेर पडल्यावर एक खासगी वस्तुसंग्रहालय आहे. त्यात हल्दीघाटीचा इतिहास शिल्परूपाने अंकित करण्यात आलेला आहे. एक ग्रंथालयही आहे. तसेच तत्कालीन चित्तौड साकार करणारे देखावेही आहेत. सोबतच स्थानिक पद्धतीच्या जेवणाचीही सोय आहे. तिथे आम्हाला दाल-चुर्मा, बाजरीची भाकरी-ताडाचा गूळ-साजुक तूप, छाछ इत्यादींसहित सुग्रास जेवण घेता आले.

महाराणा प्रताप यांचा घोडा चेतक, याला हत्तीची खोटीच सोंड जोडलेली असे. हत्ती आपल्या पिल्लावर हल्ला करत नाही म्हणून हत्तीच्या हल्ल्यातून वाचण्याकरता या युक्तीचा उपयोग होत असे. मानसिंगाच्या हत्तीवर चेतक चाल करून गेला तेव्हा मात्र, मानसिंगाच्या हत्तीने, सोंडेत दिलेल्या तरवारीने चेतकाच्या मागल्या पायावर गंभीर हल्ला केला. हेच वरील चित्रपट्टीतील पहिल्या चित्रात दर्शवण्यात आलेले आहे. दुसर्‍या चित्रात महाराणा प्रताप यांचे सेनापती हकीमखान सूरी, आदिवासींचे राजे राणा पुंजा आणि महाराणा प्रताप यांचाच वेष घेऊन लढून शहीद झालेले झाला मान (हे महाराणा प्रताप यांच्या प्रमाणे दिसत होते म्हणून त्यांच्यामुळे महाराणांचा प्राण वाचू शकला होता.), हे महाराणा प्रताप यांचे तारक त्रिकूट दर्शवलेले आहे. निशस्त्रावर हल्ला करायचा नाही हे महाराणा प्रतापाच्या स्वभावात एवढे बिनलेले होते की, महाराणा प्रतापाच्या तरवारींची जेवढी काही म्याने मी पाहिली तेवढी सगळी, दोन दोन तरवारींसाठी तयार केलेली आहेत असे आढळून आले. प्रताप निशस्त्र शत्रूला एक तरवार लढण्यासाठी देत असत, आणि मगच त्याच्याशी लढाई करत असत. त्यामुळे एका म्यानात दोन तरवारी नांदत नाहीत हा समजही महाराणा प्रतापांच्या म्यानाने खोटा ठरवलेला आहे.

हल्दीघाटीच्या ग्रामीण वस्तुसंग्रहालयात जेवण करून मग आम्ही नाथद्वारच्या श्रीनाथजी मंदिराकडे निघालो. नाथद्वारच्या मंदिरात बॅगा, कॅमेरे, मोबाईल्स यांना परवानगी नसल्याने हे सर्व सामान बसमधेच ठेवलेले होते. तिथल्या अफाट गर्दीत चटकन ओळखता यावे म्हणून सगळ्यांनी डोक्यांवर सचिनच्या टोप्या घातलेल्या होत्या. नाथद्वार गावात खूपच अरुंद गल्ल्याबोळ असल्याने बस दूरच उभी करावी लागली. श्रीनाथजी मंदिरात बाळकृष्णाची मूर्ती असल्याने, देवाला दिवसात अनेकदा निरनिराळे भोग चढवण्यात येत असतात. भोग चढवणे म्हणजे देवासमोर तर्‍हतर्‍हेचे नैवेद्य सुबक रचनेने मांडून ते देवास अर्पण करणे. ही प्रक्रिया बराच काळ चालत असल्याने, सगळ्यांकरता खुल्या दर्शनाच्या वेळा मर्यादित होतात. अशा दैनंदिन भोग चढवण्याच्या आणि दर्शनास मंदीर खुले असण्याच्या वेळा आधीच नक्की केलेल्या असतात. सचिनच्या प्रतिनिधींनी त्या आधीच माहीत करून घेतलेल्या होत्या.

आम्ही पोहोचलो त्या वेळी मंदीर पंधरा मिनिटे खुले राहणार होते. आम्ही चालत चालत मंदिराजवळ पोहोचलो. सगळ्यांनी एकाच जागी पादत्राणे काढली. तिथे सचिनचे प्रतिनिधी उभे होते. मंदिराच्या दरवाज्यासमोरच्या गर्दीत जाऊन उभे राहिलो. स्त्रिया व पुरूषांचे प्रवेश निरनिराळ्या दरवाजाने होणार होते. या मंदिरात दर्शन झाले तर झुंबडीनेच साध्य होते. नाहीतर भोग चढण्याची वेळ सुरू होऊन दरवाजे बंद होतात व मग ते पुन्हा उघडण्याची वाट पाहत राहावे लागते. अशी माहिती आम्हाला आधीच पुरवलेली असल्याने आम्ही डोंबिवलीकर गाडीत शिरतो, त्या आवेशाने दरवाजा उघडताच समोर झेपावलो. दर्शन झाले. स्त्रिया व पुरूष एकाच दरवाजातून बाहेर पडत होते. तिथून बाहेर आलो. मग सचिनतर्फे कुल्हडीतून चहा पाजण्यात आला. तो खूपच चवदार आणि मधुर लागला. आजूबाजूच्या दुकानांतून दुधातुपाच्या मिठायांचा वास येत होता. तो आसमंतात भरून राहिला होता. आम्ही पुन्हा तसेच दहा पंधरा मिनिटे चालत बसमधे जाऊन पोहोचलो.

इथून आम्ही एकलिंगजी मंदिराकडे गेलो. हे मंदिर महाराजांच्या खासगी मालकीच्या जागेवर असल्याने इथे निराळ्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था आहे. मंदिराचा बराचसा भाग पर्यटकांसाठी खुला नाही. दर्शनार्थ एक लांबच लांब रांग होती. इतरही अनेक मंदिरे या मंदिराजवळच्या मंदिरसमूहात आहेत. मार्गदर्शकाने त्यातील काही मंदिरे व्यवस्थित दाखवली. नंतर पुन्हा बसमधे बसून आम्ही उदयपूरच्या मुख्य रस्त्यावरील सुभाषनगरातील “ओरिएंटल पॅलेस” या हॉटेलात जाऊन राहिलो.

चौथा दिवसः उदयपूर

सहेलियों की बाडी

हल्लीच्या स्वरूपातील 'सख्यांचे घर' बाग, फतेहसागर तलावाच्या बंधार्‍याच्या पूर्वेस, महाराजा फतेहसिंग यांनी इसवीसन १८८८ मधे बांधली आहे. पूर्वी १६६८ मधे मिर्झाराजे जयसिंग यांनी जो मातीचा बंधारा इथे बांधलेला होता, तो २०० वर्षांनंतर वाहून गेल्यामुळे हा बंधारा महाराज फतेहसिंग यांना पुन्हा बांधून घ्यावा लागलेला होता. प्रफुल्लित कमळ पुष्करण्या, लांब रूंद हिरवळींच्या विस्तीर्ण बागा, तर्‍हतर्‍हेच्या रंगीबेरंगी फुलांचे ताटवे यांनी ही बाग सदा बहरलेली दिसते. पुष्करण्यांच्या तीरांवर चहुबाजूंना संगमरवरी हत्ती आपल्या वळवलेल्या सोंडांतून पुष्करणीतील कमळांवर कारंजी उडवत असतात. पक्षांच्या चोचींतून, हत्तींच्या सोंडांतून आणि निरनिराळ्या सूप्त मुखांतून उत्साहाने उसळणारी कारंजी; फतेहसागर तलावाच्या बंधार्‍यातून नैसर्गिक गुरूत्वीय शक्तीने संचालित केलेली आहेत.

त्या कारंजांना उडवण्याकरता पंप वापरलेले नाहीत. कारंजी इथे इतक्या मोठ्या संख्येने आहेत की या बागेस “कारंजांचा बाग” असेही म्हटले जाते. या कारंजांच्या तुषारांनी सारी बागच भारित झालेली असते. पर्यटकास परी-राज्यातच फेरफटका करतो आहोत असा आभास होतो. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण इथेच झाल्याचे मार्गदर्शक सांगतात. इथेच पारंपारिक राजस्थानी पेहरावात फोटो काढवून घेण्याचीही सोय आहे. इथले सारे वातावरणच भारून टाकणारे, अविस्मरणीय आणि आनंदित करणारे आहे.

वरील चित्रपट्टीत डाव्या बाजूची छत्री काळसर संगमरमराची बनवलेली असली तरीही धातूचीच वाटते. एवढे कौशल्य तिच्या घडणीत सामावलेले आहे. शिवाय इतक्या नाजूक, काटकुळ्या खांबांवर टनावारी वजनाची छत्री शतकानुशतके कशी तोलून धरली आहे हेही एक आश्चर्यच. उजव्या बाजूस दगडी हत्तीच्या सोंडेतून उसळणारे कारंजे दिसत आहे तर त्याचे खाली पक्षाच्या चोचीतून कारंजाचे तोंड घडवलेले दिसत आहे.

फतेहसागर तलावात तीन बेटे आहेत. चार वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाच्या मोठ्या बेटावर नेहरूपार्क आहे. त्यावर लोकप्रिय उद्यान, उपाहारगृह तसेच प्राणीसंग्रहालयही आहे. तिथे जाण्याकरता मोतीमगरीच्या पायथ्यापासून मोटार बोटींची सोय आहे. दुसर्‍या ०.०६ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाच्या लहान बेटावर सार्वजनिक उद्यान आहे. तिसर्‍या १.२ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाच्या बेटावर 'उदयपूर सौर वेधशाळा (Udaipur Solar Observatory-USO)' वसवलेली आहे.

नगरमहाल (सिटीपॅलेस)

उदयपूर नगर, महाराज उदयसिंगांनी वसवले. चित्तौड अकबराचे हाती गेल्यानंतर मेवाडची राजधानी उदयपूरच राहिली. या नात्याने इथे राजमहाल असणे साहजिकच आहे. मात्र मी भारतात इतरत्र पाहिलेल्या राजप्रासादांचे मानाने उदयपूरचा राजप्रासाद भव्य, दिव्य आणि वैभवशाली ठरला. इथल्या राजवाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथली कलाकुसरींनी नटलेली दालने आणि इथली भव्यता. स्फटिकसज्जा (crystal galary) हे इथले आणखी एक आकर्षण. राजवाड्याच्या फतेह पोल मधून बाहेर पडल्यावर समोरच्या तलावात दिसणारा जलमहालही इथले आकर्षणच ठरावा. प्रथम आम्ही वरच्या मजल्यापर्यंत फिरून राजवाडा पाहिला. तिथे एका दर्शनीय प्रवेशद्वारावर बसवलेले स्फटिकतुरे सोन्यासारखे पिवळेधमक झळकत होते.

राजप्रासादाच्या भिंती काचा व निरनिराळ्या रंगछटांचे दगड जडवून सुशोभित केलेल्या होत्या. कित्येक ठिकाणी तर त्या त्या दालनाची प्रवेशद्वारे ऋतुमानानुसार रंगछटांनी सजवण्याकरता विशिष्ट रंगाच्या संगमरवराचा सुबकतेने वापर दिसत होता. काचा जडवून तयार केलेले मोर तर अद्वितीयच होते. शुभ्र संगमरवराचे सुंदर हत्ती प्रवेशद्वाराशी झुलत होते.

या चित्रपट्टीत वरच्या बाजूला प्रवेशद्वारावरील संगमरमरी हत्ती, दारावरले स्फटिकतुरे, ऋतूनिदर्शक सज्जासजावट दिसत असून खालच्या बाजूला लाकडी चौकटीच्या सजावटीचे दार, काचा जडवलेली सालंकृत भिंत आणि रत्नजडित कलाकुसरीने घडवलेले मोराचे चित्र दिसत आहेत.

उदयपूरच्या नगरप्रासादातील दरबार दालन. इथेच आमचे चहापान झाले. नंतर श्राव्यसहल यंत्र सोबत घेऊन आम्ही दरबार दालन तसेच स्फटिक सज्जेची (क्रिस्टल गॅलरीची) प्रदक्षिणा केली.

दरम्यान दरबार दालनात आमचे चहापानाने स्वागत करण्यात आले. मात्र इथे कॅमेरा नेण्यास परवानगी नसल्याने चित्रे दाखवता येणार नाहीत. त्यांच्याच माहितीपत्रकावरचे एक चित्र इथे देत आहे त्यावरून दरबार दालनाची कल्पना करता येईल. दालनाच्या भवताली पत्रकारसज्जा असते तशी दीर्घा, पहिल्या मजल्यावर होती.

तिच्या प्रदक्षिणामार्गात जागोजाग स्फटिककाचेची तसेच पैलू पाडलेल्या काचेची (कट ग्लास) विविध भांडी (चहापानाची भांडी, अत्तरदाण्या, गुलाबदाण्या, हळदीकुंकवाची भांडी, कप, बशा, पेले, दारूचे प्याले, बाटल्या इत्यादी अनेकविध वस्तू), उपकरणे, बैठकीचे सामान (मेज, खुर्च्या, घडवंच्या, दिवाण, चौरंग, पाट, पायदाने, तिवया व इतर अनेक ज्यांची नावेही आठवत नाहीत) अशा नानाविध वस्तू काचेच्या कपाटांतून बैजवार मांडून प्रदर्शित केलेल्या होत्या. त्या त्या जागांवर लिहिलेले क्रमांक आपापल्या श्राव्य उपकरणांच्या कळांवर दाबले असता कानाला लावलेल्या श्रवणसंचातून त्या त्या विभागाची माहिती इंग्रजीतून ऐकू येण्याची सोय होती. आजूबाजूच्या ऐश्वर्याने दिपून जात आणि भवतालच्या गर्भश्रीमंती थाटाने भारावून जातच आम्ही तिथून बाहेर पडलो.

उदयपूरचा जलमहाल. याचेबाबत इतकेच सांगता येईल की याची वर्णने करतांना मार्गदर्शक थकत नाहीत, कित्येक चित्रपटांची चित्रीकरणे इथेच झालेली आहेत, आणि श्रीमंतातले श्रीमंत चित्रपट अभिनेते, अभिनेत्या इथे राहण्यास कायमच उत्सुक असतात.

बाहेर संध्याकाळ व्हायला आलेली होती. जलमहालावर संध्याकाळचे ऊन पडून अवर्णनीय शोभा उदयास आलेली होती. आता आमच्या हातात आमचे कॅमेरेही आलेले होते. मग काय विचारता. आतापर्यंत दाबून ठेवलेली प्रकाशचित्रणाची हौस प्रत्येकाने असंख्य चित्रे काढूनच भागवून घेतली. तर कित्येकांनी मनःपूत चलतचित्रणही करून घेतले.

संध्याकाळी आम्ही उदयपूरच्या सूरजपोल ते हाथीपोल दरम्यानच्या बाजारात खरेदीप्रीत्यर्थ गेलो खरे. मात्र रविवारचा दिवस असल्याने बराचसा बाजार बंद होता. त्यामुळे काहीसा हिरमोड झाला. दुसर्‍या दिवशी सकाळी चित्तौडगढ पाहून संध्याकाळी अजमेरपर्यंतचा प्रवास करून ख्वाजा मुईनुद्दीन चिस्तीचा दर्गा पाहायचा व शेवटास पुष्करच्या हॉटेलात जाऊन मुक्काम करायचा होता. म्हणून आम्ही जरा लवकरच बिछाने गाठण्याचा बेत निष्ठेने अंमलात आणला. आमच्या सार्‍या एकवीस प्रवाशांपैकी सारेच्या सारेच अतिशय वक्तशीर असल्यामुळे कधी कुणामुळे पाच मिनिटे उशीर झाला असे झालेच नाही. हे एक सुखद आश्चर्य होते. याचकरता आमचा हा गट आमच्याकरता अविस्मरणीय ठरला आहे. शिवाय उत्साहही एवढा की प्रत्येकजण गुरूशिखरावरही चढून गेलेला होता. इथे हेही नमूद करणे गरजेचे आहे की विशीतले फक्त तीन जण होते. इतर सर्व पन्नाशी-साठीच्या घरातले.

पाचवा दिवसः चित्तौडगढ, अजमेर

सकाळीसच बाहेर पडून आम्ही चित्तौडगढाची वाट चालू लागलो. चित्तौडगढला पोहोचल्यावर हॉटेल मीरामधे आम्ही ताजेतवाने झालो. तिथे पोहोचून सहा सीटर रिक्षा केल्या. कारण बसला चित्तौडगढात फिरण्याची परवानगी नव्हती. या रिक्षा आपल्याकडच्या तीन सीटर रिक्षांप्रमाणेच असून आपल्याकडे जी सामानाकरता जागा असते ती पाठीमागून उघडी ठेवून पाठीकडे तोंड करून बसण्याची आणखी तीन व्यक्तींची सोय केलेली असते. चित्तौडगढात अशाच रिक्षा सर्वत्र फिरतांना दिसत होत्या. सर्वात प्रथम आम्ही कुंभा महालाकडे गेलो. त्याच्या ओवरीतच मार्गदर्शकाने इथल्या भागाचा इतिहास सांगितला. राणा कुंभा हे सूर्यवंशी होते. सूर्योदय पाहण्याची त्यांची प्रथा होती. याकरता खास जागा तयार केलेली असे. तिला सूरज-गोखरा म्हणत. ओवरीतूनच तो कुंभा महालचा सूरज गोखरा दिसत होता. मग दिसला तो कुंभा महालाचा चबुतरा. इथून खाली गावाकडे जाण्याकरता भुयार आहे, असे मार्गदर्शक सांगत होता. आता मात्र ते बंद करून ठेवलेले आहे. त्यानंतर आम्ही पट्टा हवेली पाहिली. वाटेत एका जागी एक कमळपुष्पासारखा घडवलेला दगड दिसला. तो बहुधा कुठल्याशा पुष्करणीतील कारंजाकरता घडवलेला कारंजमुखाचा दगड असावा. इथेच आम्हाला एक मुंगूस ऐटीत फिरतांना दिसले होते.


विजयस्तंभाच्या सर्वोच्च कक्षातील छतावरील नेत्रदीपक कला कुसर.

मग पुन्हा रिक्षांमधे बसून आम्ही विजयस्तंभाकडे गेलो. इथेच सतीचे मैदान दिसले जिथे इतिहासात तीन वेळा जौहार करण्यात आलेला होता. गोमुखातून शिवास अभिषेक होतो ते मंदिर. त्याचे शेजारचा जलाशय, चित्तौडगढाची तटबंदी इत्यादी पाहून मग आम्ही विजयस्तंभावर चढून गेलो. स्तंभावरून संपूर्ण चित्तौडगढाचे विहंगम दृश्य नजरेत येते.

नंतर पुन्हा एकदा रिक्षात बसून आम्ही पोहोचलो पद्मिनी महालाजवळ. तिथल्या एका महालाच्या प्रवेशद्वारावरही स्फटिकतुरा बसवलेला दिसला. हा मात्र काचेसारखाच पारदर्शक दिसत होता. तिथला राजप्रासाद पाहिला. मार्गदर्शकाने, अल्लाऊद्दीन खिलजीला पद्मिनीचे दर्शन आरशातून कसे घडवण्यात आले त्याचे कृतीसह निरूपण केले.

अखेरीस रिक्षात बसून आम्ही कुंभास्वामी मंदिराचे प्रवेशद्वाराशी पोहोचलो. या संकुलात दोन मंदिरे आहेत. मीराबाईंचे आणि कुंभास्वामींचे. मीराबाईंच्या मंदिरासमोर मीराबाईंच्या गुरूंचे स्मारक बांधलेले आहे. समोरच मीराबाईंचे मंदिर आहे. मीराबाईंची मूर्ती छान सजवून ठेवलेली दिसत होती. कुंभास्वामी मंदिराच्या डाव्या भिंतीवरची गणेशाची मूर्ती छान दिसत होती, तिचा फोटो काढला. कुंभास्वामी मंदिरासमोर गरुडाची मूर्ती आहे, ती बघितली. कुंभास्वामी मंदिराचे विशाल स्तंभ पाहत मग आत शिरलो. कुंभास्वामी मंदिरात मूर्ती तीन आहेत. बलराम, कृष्ण आणि राधा. परततांना 'हॉटेल मीरा' पाशी पुन्हा बसमधे बसलो आणि पुष्कर मार्गावरील हॉटेल वूडलँडमधे जाऊन जेवण घेतले, आणि अजमेरचे रस्त्याला लागलो.

रात्री आठचे सुमारास अजमेरमधे पोहोचलो. शहरात अरुंद रस्ते आणि वाहतुकीचे गुंतागुंतीचे नियम असल्यामुळे बस दूरवरच सोडावी लागली. तिथून एका लहान मेटॅडोरमधे बसून पंधरा मिनिटे प्रवास केल्यावर आम्ही ख्वाजा मुईनुद्दिन चिस्ती यांच्या दर्ग्याच्या जवळपास जाऊन पोहोचलो. आजूबाजूच्या दुकानांतून कधी न पाहिलेले खाण्यापिण्याचे पदार्थ, पूजेचे साहित्य, जूती-मोजड्या इत्यादींची दुकाने दिसत होती. दर्ग्यात बॅगा, कॅमेरे, मोबाईल्स यांना परवानगी नसल्याने हे सर्व सामान बसमधेच ठेवलेले होते. दर्ग्यात जातांना डोके झाकलेले असावे लागते म्हणून आणि तिथल्या अफाट गर्दीत चटकन ओळखता यावे म्हणून सगळ्यांनी डोक्यांवर सचिनच्या टोप्या घातलेल्या होत्या. आपल्या मंदिरांतून पंडे असतात तसेच इथेही असतात. त्यांना 'खादिम' म्हणतात.

सचिनतर्फेही एक खादिम नेमण्यात आलेला होता. मग ज्या कुणाला फुले, चादर इत्यादी चढवायचे होते त्यांनी ते खादिमाच्या सल्ल्याने विकत घेतले. दर्ग्यात जाण्याकरता तिकीट नाही. मात्र गर्दी खूपच असते. म्हणून काळजीपूर्वक निवडलेल्या रात्री साडेआठच्या वेळीही खूपच गर्दी होती. दर्गा चौरस खोलीत असून सभोवती स्टेनलेस स्टीलचे कठडे बांधलेले आहेत. कठड्यांच्या आत खादिम उभे असतात. बाहेरून प्रदक्षिणा घालत समोर समोर सरकत चालावे लागते. कठड्यास लगटून दर्ग्याकडे तोंड करून खूपशा स्त्रिया ख्वाजांना आपले गार्‍हाणे घालत होत्या व म्हणूनच तिथून हलायला तयारच नव्हत्या. तसेच भिंतींशी खेटून मुसलमानी क्रोशाच्या टोप्या घातलेले भक्तगण दर्ग्याकडे तोंड करून, निरनिराळी स्तोत्रे पुटपुटत होते, तर काही अनिमिष नेत्रांनी दर्ग्यास पाहत होते. या दोन ओळींमधून प्रवेश करणार्‍या भक्तांना कशीबशी वाट काढावी लागत होती. तिरुपतीच्या मंदिरात असतात तसे भक्तांना पुढे पुढे ढकलणारे पुजारीही कुठे दिसत नव्हते. त्यामुळे दर्ग्यास गार्‍हाणे घालत जागीच खिळून राहणार्‍या भक्तांचे पाठी सारीच गर्दी अडून राही.

त्यातच आम्हाला असे सांगण्यात आलेले होते की मुद्दाम गर्दी करून पाकीट-पर्स पळवण्याचे प्रकारही इथे घडत असतात. म्हणून आम्ही सगळेच सतर्क होतो. स्त्री-पुरूषांना एकाच चिरटोळीतून मार्ग काढावा लागत असल्याने खूपच लोटालोटी होत होती. हळूहळू पुढे सरकत आम्ही चाललो होतो. आम्ही गर्दीच्या रेट्याने सावकाश पुढे सरकत दर्ग्यातून बाहेर पडलो. बाहेर आमचा खादिम आमची वाटच पाहत होता. त्याने मंत्र पुटपुटत, प्रत्येकाचे गळ्यात गंडा बांधला. ऊर्दूत म्हटलेल्या त्या मंत्राचा अर्थ 'आम्ही तुझ्या दरबारात लावलेली हजेरी कबूल करून घे' असा असावा, असा माझा समज झाला. मात्र सर्व धर्मी लोकांच्या श्रद्धेस पात्र ठरलेल्या बाबांच्या दर्ग्यास प्रत्यक्ष भेट दिल्याचे समाधान मनात होते. दर्ग्याबाबत अधिक माहिती त्यांच्या http://khwajagharibnawaz.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. रात्री नऊचे सुमारास आम्ही 'हॉटेल मास्टर्स पॅराडाईज' या पुष्करच्या हॉटेलात पोहोचलो.

या प्रवासवर्णनाच्या तीनही भागांचे दुवे खाली दिलेले आहेत.

http://www.maayboli.com/node/11963
http://www.maayboli.com/node/12036
http://www.maayboli.com/node/12176

http://nvgole.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागत आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users