सांगते ऐकाऽऽऽ

Submitted by लालू on 13 November, 2009 - 21:23

'फक्त स्त्रियांसाठी' असा ग्रूप तर तयार केला खरा, पण करतात काय या बायका मिळून? या ग्रूपसंबंधी माहितीच्या धाग्यावरुन साधारण कल्पना येत असली तरी नेमकं काय चालू आहे? अश्या प्रकारचे प्रश्न हल्ली अधूनमधून लोकांकडून ऐकले. 'संयुक्ता' सुरु होऊन ४ महिने होत आले आहेत. सदस्यांच्या संख्येनेही शतक ओलांडले आहे. काही उपक्रम हळूहळू मूळ धरत आहेत. तेव्हा वाटलं सगळ्या मायबोलीकरांशी बोलायची ही चांगली वेळ आहे, म्हणून हा प्रपंच!

शर्मिला फडकेंनी लोकसत्ताच्या 'ती'चं जग मध्ये संयुक्ताचा उल्लेख केला आणि 'संयुक्ता'चं नाव सर्वांना माहीत झालं. तेव्हा ग्रुपची सुरुवात नुकतीच झाली होती. तशी कल्पना होती पण शर्मिला फडकेंनी असा विश्वास व्यक्त केला की लवकरच संयुक्ताचं काम सुरळीत आणि जोरात सुरु होईल. त्यामुळं आता काहीतरी करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे याची जाणीव झाली. म्हणजे नोबेल मिळाल्यावर ओबामाच्या शब्दांत 'कॉल टु अ‍ॅक्शन' हो. Happy त्या लोकसत्तातल्या बातमीचा सदस्यसंख्या वाढण्यासाठी मात्र खूप उपयोग झाला.

संयुक्तातर्फे घेण्यात आलेली गुंतवणूक बँकर समिता शहा यांची मुलाखत तुम्ही वाचलीच. अश्याच अजून काही येऊ घातल्या आहेत. याबरोबरच संयुक्ताच्या सदस्य असलेल्या काही स्त्रिया अश्याच वेगळ्या क्षेत्रात काम करतात. त्यांच्या कामाची माहिती देता यावी, अनुभवांची देवाण-घेवाण करता यावी यासाठी ग्रुपमध्ये एक नवीन कार्यक्रम "माझा छंद माझा व्यवसाय' सुरु केला आहे. करियरबद्दल किंवा छंदाबद्दल माहिती देणारे लेख या मालिकेत येतात. उद्देश असा की त्या क्षेत्रात कोणाला जाण्याची इच्छा असल्यास उपयोग व्हावा, नवीन क्षेत्रांची माहिती मिळावी.

सदस्य anudon हिच्या कल्पनेनुसार 'चिंतन' हा नवीन उपक्रम सुरु केला आहे. यामध्ये स्त्रियांनी स्त्रीविषयक प्रश्नांवर लिहिलेले लेख, साहित्य वाचनासाठी उपलब्ध करुन त्यावर चर्चा करुन मते मांडावी असा विचार आहे. यामधील लेख स्त्रियांना चिंतन करायला भाग पाडून काही प्रश्नांची उत्तरे शोधायला, स्वतःला ओळखायला मदत करतील तर काही नवीन प्रश्नही तयार करतील.

माहिती संकलनाचे कामही सुरु आहे. यामध्ये जगभरातल्या स्त्रियांना मदत करणार्‍या संस्थांची माहिती एकत्र करण्यात येईल. यासाठी मायबोली प्रशासनाचीही मदत होत आहे. या प्रकारच्या माहितीची गरज भासेल अशा एक दोन केसेस नुकत्याच संयुक्ताकडे आल्या आहेत. कौटुंबिक समस्येशी सामना करणार्‍या या स्त्रियांना संयुक्ताचे सदस्य स्वतःच्या तसंच त्यांच्या इतर मैत्रिणींच्या अनुभवांतून मिळालेल्या माहितीचा उपयोग करुन या स्त्रियांना सर्वतोपरी मदत करायचा प्रयत्न करत आहेत. संयुक्ता मधून अशी एखादी संस्था उदयाला येईल का याचे उत्तर आत्ताच देता येणार नाही, पण ज्या संस्था आधीच या प्रकारचे काम करत आहेत त्यांच्या जोडीने संयुक्ताला नक्कीच काम करता येईल.

संयुक्ताचे क्षितीज अजून निश्चित झालेले नाही पण ते रुंदावण्याची संधी नक्कीच आहे. आम्ही 'आरंभशूर' नव्हतोच, काही मोजके पण सकस उपक्रम सातत्याने चालू ठेवण्याचा मानस आहे. यासाठी मायबोलीकरांच्या शुभेच्छा मिळाव्यात ही सदिच्छा!

धन्यवाद.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages