इंद्रवलय

Submitted by UlhasBhide on 21 August, 2010 - 08:10

इंद्रवलय
मी फारसा निसर्गप्रेमी नाही. परंतु इंध्रधनुष्य मात्र मला फार आकर्षित करत. दर पावसाळ्यात सात रंगांची ती कमान कधी दिसेल याची मी आतुरतेने वाट पहात असतो, आणि बहुतेक वर्षी, वरुणराजा ही माझी इच्छा पूर्ण करतो. अर्धवर्तुळाकार इंद्रधनुष्य दिसणं ही तशी सामान्य बाब आहे. परंतु ते पूर्ण वर्तुळाकार दिसणं हा दुर्मिळ योग माझ्या आयुष्यात ३ वेळा आला. हे पूर्णवर्तुळ सर्वसाधारणत: उंच घाटातून बसने प्रवास करताना दरीमध्ये, तसच विमानाच्या खिडकीतून आकाशात दिसल्याचे उल्लेख आणि फोटो Internet वर आढळतात. परंतु मला तीनही वेळा हे इंद्रवलय चक्क जमिनीवरून दिसल आहे.

सर्वप्रथम दिसल ते दादरला(मुंबई). साधारण १५/१६ वर्षांपूर्वी. माझ्या मामांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती समारंभासाठी मी दादरला, राम मारुती रोड वरील एका छोट्या कार्यालयात गेलो होतो. दुपारचे १२-३०/१२-४५ वाजले होते. जेवण व्हायला थोडा वेळ होता म्हणून मी एकटाच बाहेर सटकलो. हॉल जवळच्या कोपर्‍यावर जरा आडोशाला उभा राहून सिगरेट पेटवली. छान २-३ दम मारले. सहज आकाशाकडे नजर गेली .... ते दृष्य पाहून आवाक् झालो. आजवर चंद्राभोवती खळं पडलेल पाहिल होत. पण सूर्याभोवती मोठ्या आकाराच सप्तरंगी रिंगण प्रथमच पाहत होतो .... अवर्णनीय, विलोभनीय दृष्य .... हरवून गेलो ....आजूबाजूच भान अक्षरश: विसरलो .... सिगरेट जळत जळत बोटापर्यंत आली, चटका बसला तेव्हा भानावर आलो. त्या रस्त्यावर नेहमीच तुरळक वर्दळ असते त्यामुळे बहुधा मला कोणी पाहिल नसाव. हॉल मध्ये गेलो, पाहिलेल दृष्य वर्णन करून बाकीच्यांबरोबर share करायचा प्रयत्न केला पण बहुतेक सर्व भोजनाचा आस्वाद घेण्यातच रंगले होते. त्या सप्तरंगी रिंगणाच मी माझ्या मनात मग नामकरण केल ....... इंद्रवलय

दुसर्‍या वेळी मला इंद्रवलय दिसल ते केळवे (पालघर तालुका) या गावात. केळवे येथे आमचा एक छोटासा प्लॉट आणि घर आहे. काही कामानिमित्त मी सकाळी तिथे गेलो होतो. मुंबईकडे जाणारी दुपारची १२-४० ची रेल्वे गाडी पकडण्यासाठी मी स्टेशनकडे चाललो होतो. आणि अचानक इंद्रवलयाने दर्शन दिल.... यावेळेला ते अधिक स्पष्ट दिसत होत. केळव्याच्या त्या निसर्गरम्य खेडेगावात ते इंद्रवलय अधिकच आकर्षक भासत होत. यावेळी तरी कोणाबरोबर तरी हे दृष्य share कराव अशी इच्छा झाली. परंतु त्या खेडेगावातल्या संपूर्ण रस्त्यावर माझ्याव्यतिरिक्त कोणीही माणूस दिसत नव्हता. मधूनच वर पहात पहात चालताना जरा एक वळण घेऊन पुढे सरकलो ... एक खेडूत समोरून येताना दिसला. निदान याच्याबरोबर तरी ते स्वर्गीय दृष्य share करू असा मनात विचार आला. पण शक्य नव्हत. ते महाशय फुल टू/टल्ली/पिंडक अवस्थेत होते. आधीच स्वर्गात विहरणार्‍या त्या खेडूता बरोबर काय कर्म share करणार ! माझ्या जवळून जाताना मात्र तो माझ्याकडे विचित्र नजरेने बघताना आढळला. कदाचित मी वर बघत बघत चालत असल्याने त्याच्यासारखा ‘कॅट वॉक’ करीत होतो की काय
देव जाणे !!!

तिसर्‍या वेळी मी इंद्रवलय काश्मीर मध्ये पाहिल. २/२.५ वर्षांपूर्वी आम्ही केसरी टूर्स बरोबर काश्मीर सहल केली. एका ठिकाणी क्रिकेटच्या बॅट बनविण्याचा कारखाना बघून परत बस मध्ये बसण्याकरिता चाललो होतो इतक्यात त्या स्वर्गीय सप्तरंगी वलयाचं मनोहारी दर्शन झाल. बरोबरच्या सहप्रवाशांना मी ते दाखवल. प्रथमच पहात होते सर्वजण. पण मी मात्र तिसर्‍यांदा पहात असल्याने सर्वांपेक्षा स्वत:ला अधिक भाग्यवान समजत होतो. फोटो काढायची इच्छा झाली, पण कॅमेरा बस मधल्या बॅगेत होता. धावत सुटलो बसकडे, धसमुसळेपणाने बॅगेतून कॅमेरा काढला आणि रस्त्यावर धाव घेतली ... काय रे देवा !.... इंद्रवलय अंतर्धान पावल होत.

मध्यानीची वेळ, सूर्य माथ्यावर, सूर्याकडे सहज पहाता येईल इतपतच अभ्राच्छादित आकाश, हवेत पावसाळी गारवा, केव्हाही पावसाची हलकी सर येईल अस एकंदरीत वातावरण; पावसाळ्याच्या दिवसात निर्माण झाल की मी खिडकीतून दर ५ मिनिटांनी आकाशाकडे पहात असतो ......
…… इंद्रवलयाच्या दर्शनाभिलाषेने.

(‘गदिमां’ सारखी शब्दसंपदा ज्याच्याकडे आहे,
तोच इंद्रवलयाच शब्दात वर्णन करू शकेल. मेरे बस की बात नहीं | )

...... उल्हास भिडॆ २५-७-२०१०

गुलमोहर: 

भरत, अंजली धन्यवाद !
-----------------------------------------------------------------------------------------
भरत,
खरं आहे तुमच म्हणण, मुंबईत खिडकीतून आकाश दिसणं कठीणच.
पण माझ्या सुदैवाने मात्र आमच्या इमारतीची रचना अशी आहे की,
मध्यान्हीचा सूर्य आणि आकाश पाहणं शक्य होत. तसच ३ वेळा इंद्रवलय
पाहिल असल्याने, ते दिसण्यासाठी पोषक वातावरण निर्माण व्हायला लागल
की मला सहज लक्षात येत.
पण चौथ्यांदा मात्र दिसल नाही अजून..... बघुया कधी योग येतोय ते.
ज्यांना जमीनीवरून इंद्रवलय दिसलय असे माझ्यासारखे
आणखीही काही भाग्यवान लोक आहेत. ही Link पहावी.
http://ireport.cnn.com/docs/DOC-235006
--------------------------------------------------------------------------------------------------------
लेख लिहिण्या मागचा उद्देश इतकाच की
हा अनुभव अनेकांबरोबर share करावा.
अन्यथा या लेखात आणि लेखनात तसा दम नाहीच.

वा... मस्तच... चंद्राभोवतीचं खळं पाहिलंय पण इंद्रवलय कधी बघायला मिळ्णार?
तुम्ही भाग्यवान खरंच..

इंद्रवलय!!आम्हाला नाही कधी दिसलं. तुम्ही भाग्यवान खरे. असं काही सुंदर पाह्यला मिळालं की ते शेअर करावसं वाटतंच.