डांग डोन डांग
महाराष्ट्र गुजरात सीमेवरील उत्तर सह्याद्रीतील सापुतारा ते किल्ले साल्हेर, कांचन घाट ते डोन या भागातील वाटा तसेच काही पुरातन गुहा या मोहिमेबद्दल नाशिक स्थित राहुलभाईची विचारणा. मग काय नकार देण्याचा प्रश्नच नाही....
या डांग परगण्यात परीटघडीचे हिलस्टेशन सापुतारा, अहवा, सोनगड, वघई, वाजदा, उनई उकई येथे जाणं झालेले. तसेच गेल्या वर्षी याच दिवसात रुपगड पाहिलेला. त्यामुळे या मुलुखाची तशी ओळख होतीच.
शुक्रवारी रात्री कल्याणहून निघालो बारा सव्वाबाराच्या सुमारास राहुलभाईच्या घरी. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सहा वाजता डॉक्टर अशोक गोसावी, महेश भन्साळी, भाऊसाहेब कानमहाले आणि सुदर्शन कुलथे एकत्र जमून राहुलच्या दणकट इसुझू मधून ट्रेकचा श्रीगणेशा केला. रुपगड वेळी सर्वांशी ओळख झालेली. https://ahireyogesh.blogspot.com/2019/04/roopgad.html
हि सारी वैनतेय संस्थेशी निगडीत असलेली अत्यंत अनुभवी मातब्बर भटकी मंडळी. यांनी सह्याद्री हिमालयापासून देशा परदेशातील अनेक ठिकाणं पालथी घातलेली. राहुलभाईला तर आमच्यात नेपाळनरेश असही म्हणतात. असो...
नाशिक अभोणा कनाशी बोलकीपाडा कांचनघाट मांगलीदार उतरून (कोकणात) गळकुंड पुढे अंजनी गुफा पांडव गुफा शक्य होईल तिथे मुक्काम. दुसऱ्या दिवशी पुन्हा घाटाने वर डोन मग मानूर साल्हेर बाजूने तेल्या किंवा एखाद्या पुरातन वहिवाटेनं खाली (कोकणात) चिंचणी. वेळेचा आणि रहदारीचा अंदाज घेऊन सापुतारा वणी अथवा मुल्हेर सटाणा मार्गे नाशिक. असे साधारण नियोजन होते.
निघेपर्यंत सव्वासहा झाले. मार्च महिना असूनही वातावरण कमालीचा गारवा. दिंडोरी पल्याड सकाळच्या कोवळ्या उन्हात अचला पासून दूरवर चांदवड पर्यंतचे सातमाळेतील सारे मानकरी. हवा स्वच्छ असल्यानं सर्व व्यवस्थित दिसून आले. गाडीत वाजणारी लतादीदी किशोरकुमार यांची गाणी त्या वातावरणात अधिकच आवडून गेली. नांदुरीहून डावी मारून मोहनदरी कडील खिंडीतून अभोणाच्या वाटेला मध्ये कण्हेरगडाचं दर्शन सुखावणारं जुन्या आठवणी जाग्या झाल्या. https://ahireyogesh.blogspot.com/2016/02/fort-kanhergad.html
अभोणाला चौकात छोट्या हॉटेलात शेव पापडी आणि चवदार मिसळ. पोटभर नाश्ता करून कनाशी गावचा रस्ता धरला. गिरणा नदी ओलांडून ईशान्येला दूरवर चौलेर किल्ला झलक दाखवून गेला. https://ahireyogesh.blogspot.com/2017/08/chaulher-pimpala.html
पुढे नैऋत्येला हातगड उठावलेला त्या पल्याड होते सापुतारा. (मोहिमेत सापुतारा जरी असले तरी प्रत्यक्षात सुरुवात होती ती सापुतारा नजीकच्या उत्तरेकडील बोलकीपाडा या गावातून) मध्ये विरशेत नावाचं गाव, या गावात अनेक वीरगळ व शिळा आहेत अशी माहिती सुदर्शनने पुरवली. वेळे अभावी न थांबता पुन्हा येऊ कधीतरी मात्र नक्की येणार. इथून पुढे या वाटेवर उजव्या बाजूला महाकाय भोरू डोंगर सोबत करतो, त्याच्या माथ्यावरील ठिपक्यासारखे भासणारे मंदिर लक्ष वेधून घेते. नऊच्या सुमारास बोलकीपाड्यात दाखल झालो.
कांचन घाट - शिवाजी महाराजांची सुरतेची बाजारपेठ लूट हि घटना तर सारेच जाणतात. इ.स. १६६४ व १६७० अशी दोनदा स्वराज्यासाठी महाराजांनी हि मोहीम यशस्वीरित्या पूर्ण पाडली.
१६७० च्या मोहिमेतून परत येताना महाराजांच्या सैन्यावर मुघल सरदार दाऊदखान याने हल्ला केला. हि लढाई वणी दिंडोरी तसेच कांचन बारीची लढाई म्हणून ओळखली जाते. अनेकांचा असा समज आहे ही लढाई सातमाळेतील कांचन मांचन या किल्ल्याजवळ झाली, पण नाशकातील प्रसिद्ध अनुभवी इतिहास अभ्यासक श्री. गिरीश टकले सर यांनी मात्र अत्यंत तर्क शुद्ध प्रभावीपणे ही लढाई तिथं न होता या कांचन घाटात झाली असं मांडले आहे. महाराजांचे सैन्य या पुरातन काळापासून डांग भागातून सह्याद्रीच्या घाट माथ्यावर येणाऱ्या वाटेने चढून पुढे हातगड वणी दिंडोरी मार्गे गेले याच दरम्यान चांदवड भागातून आलेल्या दाउद खानाच्या सैन्यानं हल्ला चढवला. हा कांचन बारीचा घाट लहान आणि तुलनेत चढण्यास सोपा. सारं समान सैन्य आणि इतर गोष्टी गृहीत धरल्या तर याच वाटेनं येणं अतिशय अनुकूल. कमीत कमी वेळात सुरक्षितपणे पोहचणे हे महाराजांचे उदिष्ट होते.
संदर्भ : सुरतेची लूट की स्वराज्याची भरपाई ! लेखक : गिरीश टकले सर. (नाशिक)
डांग प्रांतातील गळकुंड गावातून हा इतिहासकालीन कांचन घाट चढून आल्यावर बोलकीपाडा लागते. पुरातन घाटाचे रूपांतर आता गाडी रस्त्यात झाले आहे. बोलकी पाडा जरी घाटावर वसले आहे तरी सापुतारा प्रमाणे हा उत्तरेकडील घाटमाथ्यावरील डोन पर्यंतचा काही वरील भाग गुजरात मध्ये येतो. १९६० साली जी महाराष्ट्र गुजरात राज्य प्रांतीय सीमा ठरवली गेली त्याप्रमाणे. असो..
बाकी मंडळी घाटाच्या चौकीवर थांबली तर राहुल व सुदर्शन बोलकीपाड्यात गेले. अत्यंत कमी वर्दळ असलेल्या घाटाच्या रस्त्याने दुसऱ्या वळणा पर्यंत मी चक्कर मारून आलो. याच वाटेनं त्या काळी महाराजांचं सैन्य धनाने शिगोशिग भरलेले ओझ लादून शेकडो घोडे खेचर बैल गेले असतील. खरंच कसा असेल तो काळ ? ?
सह्यधार उत्तरेकडून ईशान्येकडे पसरत गेलेली याच दिशेला दूरवर टकारा व किल्ले साल्हेर, हवा स्वच्छ असल्याचा परिणाम. बोलकीपाड्यात आलो तोवर राहुल व सुदर्शन यांनी ‘कैलास गायकवाड’ नामक एकाला पुढच्या टप्प्यासाठी सोबतीला तयार केलेले. आता इथून दक्षिणेला थोडक्यात सापुताराच्या दिशेने असलेल्या मांगलीदार या घाटमाथ्यावरील गावातून जुन्या पायवाटेच्या घाटाने खाली गळकुंड गाठणे. मोहिमेची थीम सापुतारा ते साल्हेर व्हाया डोन. यात खालच्या डांग (हवंतर कोकण समजा) आणि घाटमाथ्यावरील गावात चढाई उतराई तेही नव्या जुन्या ऐतिहासिक व पौराणिक खुणा पाहत. सापुतारा मांगलीदार हा वरचा भाग टाळून आम्ही बोलकीपाडा ते मांगलीदार पायी जाण्याचे ठरवलं. मुख्य कारण दोन, पहिलं कांचन घाट पाहणे आणि दुसरे गाडीची सुरक्षित सोय. गाडी कैलास यांच्या ओळखीच्या घरात लावून निघेपर्यंत साडे नऊ वाजले. गावाबाहेर शेतात विविध प्रकार गहू, बाजरी पासून ते कांदा, टमाटा, मका, सूर्यफूल ते पार स्ट्रॉबेरी पर्यंत यशस्वी प्रयोग. खरंच अत्यंत सुजलाम सुफलाम म्हणावा असा भाग. मांगलीदार गावाजवळ छोटेखानी धरण बांधले आहे, त्याचा हा चांगला परिणाम म्हणावा.
याच धरणाच्या खालच्या बाजूला एक पावसाळी मोठा ओढा दरीत झेपावतो, तो पार करून पलिकडच्या टेपाडावर आलो. वाटेत अनेक ठिकाणी पाईपाच्या साहाय्याने शेतीसाठी पाणी पुरवलेले. मांगलीदारच्या एका वाडीत विसावा घेण्यासाठी थांबलो. चौकशी केल्यावर त्या मावशीला आम्ही गळकुंड कांचन घाटाच्या गाडी रस्त्याने न जाता या पायवाटेने का जातोय तेच उमजेना. या भागात असं पाठीवर बोजा घेऊन विनाकारण कुणीही फिरत नाही, त्यामुळे ट्रेकर जमात इथे या लहान लहान आदिवासी वाड्या पाड्यात माहीतच नाही. मावशींनी त्यांच्या अंगणातील स्ट्रॉबेरी तोडून खायला दिली. अकराच्या सुमारास गळकुंड साठी उतरायला सुरुवात केली. अगदी प्रशस्त मळलेली पायवाट अबाल वृद्धांपासून ते पार गुर ढोर सर्वांना सोयीची. या भागातील वाड्या वस्तीतील मंडळी गळकुंड, पायरपाडा, खैर व इतर लहान लहान पाड्यात जाण्यासाठी हीच वाट वापरतात. या वाटेने उतरताना घोरपाडी डोंगर त्याला चिकटून उतरणारा ऐतिहासिक कांचन घाट सतत उजवीकडे दिसत राहतो.
हतारा टेकडी डावीकडे ठेवत वाट वळसा घेत पदरात उतरली. या भागातले जंगल तसे फार दाट नाही करवंदाची जाळी आंबा साग सारखी झाडे थोडीफार हिरवाई नक्कीच त्यात या दिवसात पळस, काटेसावर पांगारा यांची केशरी उधळण. अशातच एका मोठ्या आंब्याच्या खाली ब्रेक घेत पेरू, बॉईल अंडी व ताक यांचा भडीमार. कैलासने या जागेला भिवळ म्हणतात असे सांगितले. वीसेक मिनिटांत चालू पडलो आता रुंद अशा सोंडेवरून टप्पा टप्प्याने उतराई, वाटेत अनेक ढोर वाटा त्यातून जवळच्या मुख्य वस्तीत जाणाऱ्या वाटा ओळखणे फारस अवघड नाही.
या ठिकाणी सह्याद्रीत थोडा वेगळा पॅटर्न जाणवतो. उत्तरेला साधारण कसारा, मोखाडा, जव्हार, सुरगाणा पासून तर या डांग भागातही सारखेच विरळ माळरान, डोंगराचा उतार अगदी सौम्य, कुठेही दरडवणारे कडे व खोल दऱ्या नाहीत. उंच सखल भागात तुकड्या तुकड्यात विखुरलेली वस्ती त्याला लागून थोडीफार काय ती शेती. वातावरण खूपच स्वच्छ जोडीला हवेत गारवा त्यामुळे उन्हाचा फार त्रास नाही. घाट उतरल्यावर पायरपाडा हि आदिवासी वस्ती. गोळ्या पोंगे शेंगदाणे ठंडा करत पंधरा वीस मिनिटांचा ब्रेक झाला. आता होती ती डांबरी रस्त्याने चाल वाटेत या भागातली भेगु नदी लागली, योग्य जागेवर बांध घातल्यामुळे या दिवसात ही नदीपात्रात पाणी. पाणी अडवा पाणी जिरवा.. अर्ध्या तासाची पायपीट करून गळकुंडला आलो.
अहवा सापुतारा मार्गावर सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले गळकुंड. या गळकुंडहून सापुतारा किंवा कांचन घाटाने देशावर जाता येते. दुपारचं जेवण ‘मोतीराम दळवी’ यांच्या ढाबा कम हॉटेलात. जेवण झाल्यावर कैलासच्या ओळखीने एक बाईकवाला सोबत घेऊन राहुल गाडी परत खाली आणायला बोलकीपाड्यात. मोतीराम यांच्याशी चर्चा सुरू असताना सुदर्शनची जुनी ओळख निघाली. ओळख असणारे ‘तुळशीराम भोये’ त्यांचे शेजारी निघाले, हॉटेलच्या मागेच त्यांचे घर. सॅक घेऊन त्यांच्या घरी गेलो मस्त थंडगार पडवी त्यात पंखा चालू आम्ही दोघं तिघ डायरेक्ट आडवे. पोटभर जेवणानंतर हे होणारच तसेही राहुल गाडी घेऊन परत येई पर्यंत काम तरी काय होते... तासभर झोप होते तेच घरातल्या वहिनींनी गरमा गरम अळूच्या वड्या, बुंदी आणि जिलेबी समोर आणून ठेवले. आधीच पोटभर जेवण त्यात झोपने तर पूर्ण सुस्तावलो. आग्रह न मोडता अगदीच थोड खाऊन घेतलं. एव्हाना राहुल गाडी घेऊन आला आरामशीर चारच्या सुमारास मोतीराम व तुळशीराम यांचा निरोप घेत गळकुंड सोडले.
अटळधाम अंजनी पर्वत - अहवा रस्त्याला एखाद दीड किमी गेल्यावर उजवीकडे लिंगा गावचा रस्ता पकडला. रस्ता जरी अरुंद असला तरी खड्डे विरहित, वळण घेत गाडी घाट चढू लागली. आपल्याकडे अकोले आंबेगाव वेल्हा तालुक्यातील पश्चिम भागातील रस्ते अगदी तसेच फक्त दर्जा चांगला. पठारावरील लहान लहान वस्त्या मागे टाकत कामद गावाच्या पुढे उजव्या बाजूला अटळधाम अंजनी पर्वत अशी कमान.
कमानीतून आत गेल्यावर मातीचा अरुंद घाट रस्ता. वळणावळणाचा सोबत खडी चढण राहुलभाईचे ड्रायव्हिंग स्कील आणि दमदार इसुजु होती म्हणून नाहीतर लहान गाड्यांचे इथं काम नाही. अर्ध्या तासात वाटेतले शिवमंदिर लागले. गर्द झाडीत लपलेले मंदिर व आश्रम परिसर बघताच आजोबा येथील वाल्मिकी आश्रम आठवला. काही अंतरावर वाटेतल्या ओढ्याचा गाळ काढण्याचे काम जेणे करून जनावरांना उन्हाळ्यात पाण्याची टंचाई नको. वरच्या भागातील ओढ्यातून पाण्याचा पाईप मंदिरापर्यंत आणलेला. एकदम स्वच्छ व गार पाणी. आजूबाजूला विविध फुलांची आणि भाज्यांची लागवड. तिथले विश्वस्त श्री. वांजळ यांच्या सोबत अंजनी धाम - गुहा व पांडव गुहा या बद्दल चर्चा केली. त्यांच्या मते वेळ पाहता आज पांडव गुहेपर्यंत जाणं शक्यच नाही. अंजनीधाम ते अंजनी गुहा हा एक रूट तर अंजनी गुहा ते पांडव गुहा हा तर आणखी विचित्र टप्पा जो सध्या काहीसा अवघड (कारण पूर्ण डोंगर रांग ओलांडणे) अंजनी गुहा व पांडव गुहा दोन्ही गुहेत खालच्या वाडीतून कच्चा रस्ता आणि पायी जाण्यासाठी वाट आहे, त्यामुळे असं ट्रेक रूट सारखं या भागात फिरण्यात बराच वेळ आणि अतिरिक्त श्रम म्हणजे इथून या दोन्ही ठिकाणी जायचं झालं तर तो एक पूर्ण तयारीने वेगळाच ट्रेक होइल. थोडक्यात आपल्याकडे मुंबई पुणे नाशिक या भागातील सह्याद्रीत गड किल्ल्यांचे रूट आणि बऱ्याच घाटवाटांचे मार्ग ठरलेले आहेत तसा प्रकार या भागात नाही. मुळातच इथं येणाऱ्यांची संख्या अतिशय कमी, या आतील दुर्गम भागात आम्ही सुध्दा नवीनच. त्यामुळं एक्सप्लोर करायचं म्हटलं तसा प्लान ही फ्लेक्झिबल ठेवला होता. वेळ प्रसंग पाहून त्यानुसार बदल करावा लागला तरी हरकत नाही. यातून मिळणारा अनुभव महत्वाचा.
पांडव गुहा होत नाही तर इथंच मुक्काम करू असं सर्वांचे मत पडले, त्या आधी जवळचे अंजनीधाम पाहून येऊ. पुढच्या दहा मिनिटांत गाडी जंगलातून बाहेर येत मोठ्या पटांगणात आली, अगदी ओवर आर्म क्रिकेट खेळता येईल एवढे मोठे. सह्याद्रीच्या पदरात वसलेले अंजनीधाम. समोर पूर्वेला सह्याद्रीची मुख्य रांग आणि उजवीकडे त्या पासून निघालेला हंड्या डोंगर त्याच्या माथ्यावर देवाचं ठाण त्यावर लावलेले झेंडे स्पष्ट नजरेत. आश्रम जवळ गाडी लावताच दोघे जण बाहेर आले, ‘शंकर’ व ‘अंकित’ दोघेही इथले सेवेकरी. शंकराच्या वडिलांनी तर येथेच ध्यान धारणा केलेली. आश्रम परिसर स्वच्छ व प्रशस्त. पाण्याचे कुंड, ठिकठिकाणी झाडं लावलेली त्यावर नावं टाकलेली गुजराती भाषेतील पाटी. जवळच्या टेपाडावर देवतांच्या मूर्ती. त्यात शंकराची मोठी पिंड व मारुतीरायाची मूर्ती खासच. मधल्या भागात ध्यान कुटीत देवांच्या प्रतिमा आणि यज्ञकुंड. आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोकांचं महाशिवरात्री, रामनवमी, हनुमान जयंती तसेच अमावस्या पौर्णिमा वेळी येणं जाणं असते. एकदम शांत परिसर, नावाला पक्ष्याची किलबिल, सायंकाळचा वाहता वारा, स्वच्छ सूर्य प्रकाश खरंच सारं अतिशय प्रसन्न. इथेही पाण्याची चांगली सोय, वरच्या डोंगरातून पाण्याचा पाईप सिमेंटच्या बांधीव कुंडात सोडलेला. हे सर्व पाहून मनात चलबिचल.. सर्वांना ही जागा सुद्धा तितकीच आवडली. अधिक झुकतं माप इथे पडलं, मग काय सॅक टाकत फ्रेश होऊन मंदिर परिसरामागे पश्चिमेला सूर्यास्त पाहायला गेलो. सह्यधारेवर दूरवर दक्षिणेला गजबजलेले सापुतारा तेथील मिच मिचणारे दिवे तर उत्तरेला मोठा अटाळा डोंगर. हा अटाळा डोंगर आणि आम्ही होतो तो अंजनीधाम आश्रम या मध्ये खोल वक्राकार दरी याच दरीच्या मध्य भागातून एक मोठा धबधबा पडतो त्याच्याच मागे नैसर्गिकरीत्या तयार झालेली गुहा म्हणजेच अंजनी गुहा. झूम केल्यावर कॅमेरात सहज दिसते.
मावळतीचे रंग पाहून जागेवर आलो. गरमा गरम सूप झाल्यावर जेवणाची तयारी. शंकरने त्यांच्या सोबत जेवणासाठी आग्रह केला पण सर्व तयारी आणि समान घेऊन आलोय नम्रपणे नकार दिला. भन्साळी साहेब, सुदर्शन आणि राहुल यांनी लीड घेतली. भात पापड लोणचे आणि दाल माखणी. जेवण झाल्यावर निरभ्र आकाशात तारकांचे खेळ बघत बसलो, बहुतेक षष्ठी होती चंद्रोदय तसाही उशिरा झाला असावा. फार वेळ न जागता झोपी गेलो. सकाळी कडक चहा मग ओट्स आणि गुळाचा शिरा. सारं आवरते घेत पावणे नऊच्या सुमारास अंजनीधाम हून निघालो. नवीन प्लान प्रमाणे आता दोन गट पडले, राहुल सोबत भन्साळी साहेब गाडी घेऊन घाट उतरून लिंगा गावात जाऊन पुढे अंजनी गुहा मग पुन्हा गाडीने पांडव गुहा पाहून डोनच्या घाटाने वर डोन गावात दुपारी एक पर्यंत भेटणार. आम्ही चौघे मी, सुदर्शन, भाऊसाहेब, डॉक्टर गोसावी पायी घाटाने डोन गावात त्यांना गाठणार. शंकरने सांगितलेल्या खुणा लक्षात ठेवल्या तसेच अंकित थोड अंतर वाटेत सोबत आला. आश्रमाच्या अगदी सरळ पूर्वेला मुख्य रांगेत कमी उंचीची खिंड बरोबर तिथूनच घाट माथ्यावर आम्ही जाणार. दहा मिनिटांत कच्चा मातीचा गाडी रस्ता सोडून डाव्या बाजूला वळलो.
प्रथम विरळ वाटणारे जंगल काही अंतर आत जाताच दाट वाटू लागले. मोठ मोठे महाकाय वृक्ष राक्षसी वेली. अंकितने रानात पाण्यासाठी बांधलेली विहीर दाखवली. याच विहिरीतून सध्या पाण्याची पातळी नुसार उतार साधून पाणी पाईपाद्वारे आश्रमात नेलं आहे. लहानसा चढ चढून मळलेली वाट डावीकडे आडवी जाऊ लागली. वाटेत वन खात्याच्या निरीक्षण मनोरा, तसेच ठिक ठिकाणी दगडी रचाई आणि बांध घातलेले. या वाटेने सरळ जात राहिलो तर वळसा घेऊन अंजनी गुहा जाता येते त्याच वाटे अलीकडे एक वाट वर जाते. थोडक्यात आम्ही ज्या वाटेने जात होतो त्याच वाटेच्या उत्तरेला, या वाटेला भितबारी असे म्हणतात. गुहा पाहून त्या वाटेने वर येणं हा खूप लांबचा पल्ला. थोड पुढे जात उजवीकडे खिंडीच्या दिशेने जाणारी वाट अंकितने बरोबर दाखवली, निरोप घेत इथून अंकित परत फिरला.
अधे मधे करवंदाची जाळी काही भागात बांबूचे वन. थोड वर येताच पाठीमागे खाली वळून पाहिलं तर आश्रम तसेच साधारण वायव्येला अटाळा डोंगर त्या खाली दरीत अंजनी गुहा. सौम्य चढाई वळणं वळणं घेत टप्पा टप्प्याने खिंडीत घेऊन आली. माथा गाठला तेव्हा दहा वाजलेले.
उजवीकडे हंड्या डोंगर त्याच्या धारेवरून येणारी वाट खालच्या बाजूला येऊन मिळते. त्या पल्याड दरीत काल होतो ते गळकुंड त्या मागे घोरपाडी डोंगर व कांचन घाट तसेच दक्षिणेला सापुतारा अगदी व्यवस्थित नजरेत येत होते. साल्हेर दिसेल असं वाटलं पण डावीकडची टेकडी बहुदा आड येत होती. अंकितने सांगितल्या प्रमाणे सरळ गेल्यावर लगेच जांभाळ गाव लागेल तेच लक्षात घेत मळलेल्या वाटेने आणखी थोड वर येताच उजव्या बाजूला कांचन घाट ते सापुतारा हा भाग तर दिसलाच पण त्या मागे हातगड अचला तवल्या आणि भोरु डोंगर यांचे दर्शन झाले.
आता काय जांभाळ गावा नंतर लगेच डोन येईल फार वेळ नाही लागणार, या भ्रमात राहून सारा नजारा पाहत बराच वेळ घालवला.
जवळपास अर्ध्या तासाने निघालो, डाव्या बाजूच्या टेकडीला वळसा घालून पलीकडे थोड खालच्या भागात शेती दिसू लागली. वाटेत मध्ये रचाई केलेली दगडांची रास उत्तर दक्षिण गेलेली बहुतेक तीच गुजरात महाराष्ट्र सीमा. शेताच्या पुढे जात लहानसा उतार लगेच खाली घरं.
हेच ते दुर्गम असे जांभाळ, या भागातील महाराष्ट्राचे शेवटचं गाव इथून पुढचा उत्तरेचा घाट माथ्यावरील भाग डोन हा गुजरात मध्ये. कळवणहून परिवहन मंडळाची एस टी येते. कधी आली नाही तर कमीत कमी पंधरा किमी मानूर पर्यंत पायपीट. गावात शेतीचे नियोजन एकंदरीत बरे वाटले ग्रीन हाऊस व इतर काही प्रयोग. गावच्या वेशीवर लागून असलेली टेकडी आणि अटाळा डोंगराची आलेली एक बाजू यांचा फायदा घेत मधोमध पावसाचे पाणी अडवून छोटे धरण बांधले आहे. याच धरणाच्या मागच्या बाजूने खिंडीतून भितबारीची वाट वर येते. येथील गावकरी आम्ही आलो ती अंजनीधाम कडील व भितबारीची वाट अंजनकुंड भागात (कोकणात) ये जा करण्यासाठी कायम वापरतात. गावात पाणी टॉप अप करून डोनला जाणाऱ्या वाटेबद्दल विचारून घेतले. गावातल्या मंडळीनी दोन पर्याय सुचविले. पहिला सरळ डांबरी रस्ता धरून डोन मग मानूर जाणे. दुसरा गावाच्या उत्तरेला असलेला डोंगर चढून पलीकडे उतरल्यावर डोन. ट्रेकला डांबरी रस्त्याने चाल हा अतिशय कंटाळवाणा प्रकार. साहजिकच डोंगर चढाई उतराई हा पर्याय असताना डांबरी रस्ता बाद करत डोंगराच्या वाटेला भिडलो. धरण मागे टाकून डोंगर धोपट मार्गाने वर चढू लागलो.
जसे वर जाऊ लागलो तसे खाली धरण त्याला लागून असलेले जांभाळ गाव अगदी चित्रात असते त्याप्रमाणे भासत होते. मध्ये एके ठिकाणी झाप लागला दोघं तिघे शेळ्या मेंढ्या हाकत इकडे तिकडे. अर्ध्या तासाने त्या बोडक्या डोंगराचा माथा गाठल्यावर सभोवतालचा परिसर पाहून चक्रावलोच. सह्यशिरोधारेवर साधारण काटकोनात असलेल्या या घाटमाथ्यावरील डोंगरावरून नैऋत्येला सापुतारा पुढे नजर फिरवली असता घोरपाडी डोंगर कांचन घाट मागे भोरु डोंगर तवल्या, अचला, हातगड आग्नेयेला कंडाळा उर्फ पिंपळा तर ईशान्येला टकारा आणि सर्वोच्च साल्हेर. ईशान्येकडून उत्तर मग वायव्येला असं आणखी डोळे बारीक करून पाहिल्यावर शेंदवड सात गवळणी पासून दूरवर सेलबारी रांगेतील मांगी तुंगी सुध्दा ओळखता आले.
सापुतारा ते साल्हेर या थीम नुसार पूर्ण पॅनोरमा मिळाला थोडक्यात एकाच जागी उभे राहून ही दोन्ही ठिकाणं आणि आजू बाजूचा आसमंत बघणं हा खरंच सुखद अनुभव. बराच वेळ फोटो काढत सारं पाहत रेंगाळलो. डोंगराचा माथा म्हणजे बरच मोठं पठार. आधी वाटलं लगेच उतरायला लागू पण तसं नव्हते वाटेत एक दोघे भेटले त्यांनी पण, याच वाटेनं जावा.. ते काय तिकडे डोन.. असं सांगत हातवारे करून दाखवले. काही वेळा नंतर वाट उजवीकडे कड्याला बिलगून उतरू लागली, फार खाली न उतरता आडवी जात खिंडीतून समोरच्या डोंगरावर गेलेली. खाली पाहिलं असताना दूर दूरच्या वाड्यातून लहान टेकड्या वळसा घेत जाणारा डांबरी रस्ता ते पाहून लागलीच बोलून पडलो. बरं झालं रस्त्याने गेलो नाही हा लांबचा फेरा तर होताच आणि या डोंगर माथ्यावरील चालीत जो नजारा पाहायला मिळाला त्याला नक्कीच मुकलो असतो. खिंडीतून डोंगर चढाई करून पुन्हा माथ्यावरील चाल जसं जसं पुढे जात होतो तसे टकारा साल्हेर जवळ भासू लागले पाठीमागे सेलबारी रांगेतील न्हावी रतनगड सुध्दा नजरेत आला. एव्हाना वेळ पाहून लक्षात आलं एक वाजेपर्यंत डोन गाठणं अवघडच. राहुल व भन्साळी साहेब नक्कीच आमची वाट पाहत बसणार.
बऱ्याच चाली नंतर उजवीकडे दरीत डोकावले असता मोठी वाडी दिसू लागली पण तिथे उतरणारी स्पष्ट अशी वाट आमच्या तरी नजरेत आली नाही तसेही दिशेनुसार डोन सरळ होते त्यामुळे फंदात न पडता सरळ धोपट मार्गाने चालत राहिलो. जेव्हा पलिकडच्या बाजूला आलो तेव्हा खाली आणखी एक वाडी आणि छोटा बंधारा. या ठिकाणी मात्र वाट बरोबर त्या वाडीच्या दिशेने उतरू लागली, मध्ये एके ठिकाणी खिंडी सारख्या भागात दोन वाटा फुटल्या भाऊसाहेब आणि मी खाली बंधारा जाणारी पकडली तर सुदर्शन व डॉक्टर पलिकडच्या टेपाडावरून उतरले.
बंधारा जवळ एक जण भेटला त्याला पाहिलं गावाचं नाव विचारलं. तो सांगू लागला, डोन....
आम्ही डोन ?? तर तो, हो डोन जामुनहुडा...
हि डोन मधली एक वाडी.
आम्ही समजत होतो डोन म्हणजे गडद हून जो घाटरस्ता वरती येतो तिथे रेलिंग लावून हिल स्टेशन तयार करत आहेत ते डोन. कारण या वाडीत तर तसे काही नाही, जिथे घाटरस्ता वर येतो त्यासाठी आणखी एक टेकडी चढून पश्चिमेकडे जावं लागणार..पाहूया वाडीत जाऊन काय ते बघू.
एका घराच्या अंगणात नाचणी साठवायचे काम सुरू होते तिथली मंडळी आमच्याकडे पाहून, कुठून आले ? कसे आले ? का फिरता ? अनेक प्रश्न झाल्यावर पाणी मिळाले तसेही सलग चालून दमलो होतो घराच्या वरंड्यात बैठक मांडली. वयस्कर आजींनी लगेच चहासाठी फर्मान सोडलं. भूक ही लागली होती तसे वाटेत थोडफार सुका खाऊ आणि सकाळचा शिरा खाल्ला होता पण या चालीने मात्र पोटात खड्डा पडला, आम्हाला वाटलं डोन गावात छोटे का होईना हॉटेल मिळेल पण इथं वेगळीच स्थिती. भाऊसाहेबांनी, हळूच भाकरी मिळेल का विचारणा केली. काही वेळातच चटणी भाकरी आणि चहा हजर. या घरातील ‘दिपक वाघ’ हे भाऊसाहेब यांच्या ओळखीचे निघाले. मग काय गप्पांना ऊत आला. आता आमच्या लक्षात आलं, आम्ही जे रेलिंग लावलेली जागा डोन समजत होतो ती डोन ची एक बोरथडा नावाची वाडी आहे. थोडक्यात डोन नावाचं गाव नसून सात लहान लहान वाड्या आहेत. आम्ही सध्या होतो ती जामुनहुडा, वरतून येताना आधी उजवीकडे पहिली ती पाबर पाडा तसेच जरण पाडा, भेंडाना माळ, नारी अंबा, उमर पाडा अशी ही सात वाड्यांची नावं. इथून बोरथडा चालत गेलं तर किमान पाऊण तास आणि गाडीने फक्त दहा मिनिटं. वेळ व भर दुपारचं उन पाहता दिपक यांची बाईक घेऊन जाण्याचं ठरवलं. डॉक्टर गोसावी आणि एकाला सोबत घेऊन निघालो. या बोरथडा वाडीच्या वेशीवर अनेक विरगळी फोटो घेत वरती घाटाच्या पॉईंट वर पोहचलो तेव्हा राहुलभाई आणि भन्साळी साहेब कॅरीमेट टाकून झोपलेले. बराच वेळ ते वाट पाहत होते. त्या दोघांनी ठरल्या प्रमाणे लिंगा गावाच्या पुढे अंजनकुंड तेथून अंजनी गुहा.
नंतर पुन्हा खाली येत मागे जवताळा पांडवा पर्यंत गाडी नेत तिथून पांडव गुहा पाहून ते याच डोनच्या घाटाने वर आले. खालच्या गडद गावातून हा घाट रस्ता वर डोनच्या बोरथडा या वाडीत येतो. या भागात सापुतारा प्रमाणे हिल स्टेशन तयार करण्याचं काम सुरू आहे.
घाटाच्या पायथ्याशी गडद व इतर लहान वाड्या वस्त्या, पश्चिमेला पुर्णा नदीचं खोरं तर वायव्येला शेंदवड आणि सात गवळणी. फोटो काढून पाच दहा मिनिटात निघालो. वाघ यांच्या घरी पुन्हा एकत्र भेटून राहुलच्या गाडीतून मानूर रस्ता पकडला. उजवीकडे टकारा आणि साल्हेर आता एकदम जवळ. साल्हेरच्या जुन्या आठवणी, तिथून पाहिलेले सूर्योदय सूर्यास्त, तिथले मुक्काम. https://ahireyogesh.blogspot.com/2017/04/salher.html
असो पण आता ओढ लागली होती साल्हेरवाडीतून पुरातन तेल्या घाटाने उतराईची. डोन सोडल्यावर महाराष्ट्र हद्दीत प्रवेश केला, वीस मिनिटांत मानूर मध्ये आलो. मानूर मधून एखादी वाट नक्कीच चिंचणी मध्ये उतरत असणार. फार दूर नाही पण मावळतीला काही घरं वस्ती दिसत होती. वेळ पहिली तर सव्वाचार वाजत होते, साल्हेरवाडीत जाऊन तेल्या घाटाने खाली येण्या पेक्षा इथून एखाद्या नवीन वाटेने खाली गेलो तर अंधार पडायच्या आत चिंचणीत नक्की जाऊ. वाटेत दोघांना विचारल्यावर त्यांनी वाट आहे पण ती वरच्या वाडीतून असं सांगितल्यावर आम्ही त्याच वाटेने उतराई ठरवून टाकली. वरच्या वाडीत गेल्यावर कन्फर्म झाले, स्थानिक या वाटेला पिपरबारी म्हणतात. आता राहुल व भन्साळी साहेब गाडी घेऊन डोनच्या घाटाने किंवा बाभुळणे घाटाने चिंचणीत जाणार तर आम्ही चौघजण पायगाडी ने. शेजारच्या घरातील आजी हे सारं पाहून हैराण. गाडी सोडून का पायी जाताय ? असा प्रश्न त्यांनी मला पाणी भरायला गेलो तेव्हा विचारलाच. वाटेची माहिती करून पश्चिमेला सुटलो. पठारावर बहुतेक ठिकाणी शेती व घरांची वस्ती. जांभळा, डोन आता मानूर या भागात एक चांगली बाब म्हणजे बांध घालून पाणी अडविण्याचा प्रयत्न.
या दिवसात ही शेतीसाठी पाण्याची सोय पाहता तो यशस्वी म्हणता येईल. इथेही डोन सारख्याच मानूरच्या लहान लहान बारा वाड्या आहेत. मावळतीच्या उन्हात अर्ध्या तासाची चाल घाटाच्या माथ्यावर घेऊन आली. इथेही दगडी रचाई महाराष्ट्र गुजरात सीमा, आता आम्ही गुजरात राज्यात प्रवेश करून (कोकणातील) डांग भागातील चिंचणी या गावात उतरणार. नाळेतून उतरणारी पण सुरुवातीला अगदी पद्धतशीरपणे बांधलेली वाट काही प्रमाणात नाणेघाट सारखी. खाली चिंचणी गाव अगदी नजरेच्या टप्प्यात सरळ रेषेत सात गवळणी आणि शेंदवड कडील भाग. अंदाजे सहाशे मीटर उतराई असावी. थोड खाली नाळेतून बाहेर येताच एक वाट सरळ डावीकडील कड्याला बिलगून खाली पदरात जात होती तर दुसरी उजवीकडे समांतर. सुदर्शन पुढे होता त्याने उजवी घेतली आम्हीही अर्थातच मागोमाग चालू पडलो तसेही चिंचणी त्याच दिशेला होते.
या वाटेवर असताना नजारा मात्र भारी मिळाला. उत्तरेला अगदी समोर साल्हेर, तेल्या डोंगर त्याच्या बाजूने उतरणारा तेल्या घाट त्याच्या डावीकडे बाभुळणे घाट. वाटेत मागून येत दोन गावातील मुलं भेटली त्यांच्या शेळ्या बकऱ्या रानात शोधायला निघालेली. ते आडव्या वाटेने पुढे गेले तर आम्ही डावीकडच्या पदरात उतरणाऱ्या वाटेला. झाडी भरल्या पदरात वाट मध्येच अस्पष्ट झाली पण योग्य दिशेला असल्याने अडचण नाही. काही अंतर जाताच वरून येणारी मळलेली वाट, हीच ती वरच्या टप्प्यातील डावीकडील वाट. पदरातला झाडीचा भाग संपवत एका टेपाडासारख्या जागी आलो. छोटा ब्रेक घेतला. शेवटची उतराई करत असताना पिपरबारीचा कडा आणि तेल्या डोंगराची उजवी बाजू ज्या ठिकाणी एकत्र येत होते तिथे एक व्यवस्थित नाळ.
नक्कीच या नाळेने जाता येत असावं. सुदर्शन तर बोलून गेला ही नाळ चढू आणि तेल्या घाटाने उतरू.
सुरुवातीला लहान वाटणाऱ्या घाटाने बाकी चांगलाच वेळ घेतला. पायथ्याशी शेतं लागली वाटेत एक शेतकरी दादा बैल गाडी घेऊन घराकडे निघालेले. त्यांच्याशी चर्चा केली त्यांना नाळेबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले, हो वाट आहे ना, आम्ही जातो मोरं मोहर वर जावं लागतं असे म्हणाले.
आता मोहर म्हणजे सरळ समोर असा काहीतरी अर्थ लावला पण हि वाट तेल्या घाटाची जोडीदार मोऱ्या असू शकते ? बहुतेक घाटमाथ्यावर मोऱ्या नावाचा डोंगर किंवा टेकडी असेल ? आणि त्या लागून उतरणारी वाट जसं तेल्या डोंगराजवळ तेल्या घाट तसे... बघू कधी जमतंय ते...
शेतातून वाट काढत थेट हायवेवर आलो इथून मागे वळून पाहिले असता आम्ही आलो ती वाट. चिंचणी एखाद दीड किमी असावं. फोन केल्यावर राहुलभाई गाडी घेऊन बरोबर हजर.
खरंच त्याचे आभार मानायला हवे त्याने जागोजागी गाडी आणली म्हणून या दुर्गम भागातील गावागावातील अंतर वाचून चढाई उतराई सुखकर झाली.
चिंचणी गावातून सह्याद्रीतील सर्वात उंच किल्ला साल्हेर पाहणं एक वेगळा अनुभव. सारं समान गाडीत टाकून एके ठिकाणी कडक चहा झाल्यावर परतीला बाभुळणे घाटाने मुल्हेर ताहराबाद सटाणा मार्गे नाशिक. रात्रीच्या जेवणासाठी आडगाव नाक्या अलीकडे ‘शान ए पंजाब’ नामक ढाब्यावर जेवायला थांबलो. कळकट मळकट पण चवीला बळकट असं काहीसं. याबद्दल पण या नाशिककरांना मानावं लागेल, या भागातील प्रत्येक रोडवर कुठे काय मिळतं त्याबद्दल अचूक माहिती. रात्री बारा वाजता नाशकात पोहचून एका वेगळ्या दुर्गम भागातील दमदार ट्रेक सुफळ संपुर्ण झाला.
बराच वेळ फोटो काढत सारं पाहत
बराच वेळ फोटो काढत सारं पाहत रेंगाळलो
>>>>
आमच्याही शेअर करा ते फोटो ईथे.
वर्णन आणि माहिती सारे छान .. फोटोंनी मजा वाढते
सापुतारा फार लांब पडते ठाणे
सापुतारा फार लांब पडते ठाणे,कल्याणहून.
गड त्याही पुढे. सापुतारा येथे पिकनिक म्हणून दोनदा गेलो. पण भटकंती नाही.
मस्त लिहीलंय
मस्त लिहीलंय
धन्यवाद दोस्तहो...
धन्यवाद दोस्तहो...
फोटोंनी मजा वाढते >>>> बराच वेळ घेउन ही लोड होत नाहीये.
आवडले लिखाण!
आवडले लिखाण!
धन्यवाद हर्पेन !
धन्यवाद हर्पेन !
पुन्हा एका नवीन भटकंतीचे
पुन्हा एका नवीन भटकंतीचे वर्णन, तेही आमच्यासारख्यांनी क्वचितच ऐकलेल्या भागाची. छान!
मस्त लेख , फोटोंची तेवढी उणीव
मस्त लेख , फोटोंची तेवढी उणीव जाणवली.
भारतात आलो कि सोबत ट्रेक ला जाऊ. I am missing all these treks.
फोटोंची तेवढी उणीव जाणवली. >>
फोटोंची तेवढी उणीव जाणवली. >>>> जमत नाहीये, आता काहीतरी गडबड झाली आहे.
मस्त लेख .
मस्त लेख .
जमत नाहीये, आता काहीतरी गडबड
ब्लॉगर वर अपलोड केलेले फोटो इथे डकवणे सोपे आहे. तुमच्या ब्लॉगवरच्या फोटोची ही लिंक.
१. https://1.bp.blogspot.com/-oZgvdQw1LJY/XnuqBNuHjnI/AAAAAAAAY3M/NaIlDz02v08C4USklUkDErir_DFRfvcAwCNcBGAsYHQ/s1600/IMG_20200314_185051.jpg
<img> टॅग मधे अशी अडकवायची.
२. <img src="इथे वर दिलेली ब्लॉगर फोटो लिंक">
ही अशी
३. <img src="https://1.bp.blogspot.com/-oZgvdQw1LJY/XnuqBNuHjnI/AAAAAAAAY3M/NaIlDz02v08C4USklUkDErir_DFRfvcAwCNcBGAsYHQ/s1600/IMG_20200314_185051.jpg">
ही ३.क्रमांकाची लिंक तुमच्या माबो वरील लिखाणात किंवा प्रतिसादात दिली की फोटो माबोवर दिसेल.
धन्यवाद सुनील..
धन्यवाद सुनील..
प्रयत्न करून बघतो..