झोंबी

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 23 May, 2010 - 05:03

आनंद यादव ह्या नावाला “नटरंग” सिनेमामुळे आता वलय प्राप्त झालंय. त्यामुळे “पुस्तक-मित्र” च्या लायब्ररीत त्यांचं “झोंबी” पुस्तक दिसल्याबरोबर लक्ष वेधल्या गेलं.

पुस्तक उघडल्याबरोबर “झोंबी” ह्या पुस्तकाला मिळालेले पानभर पुरस्कार दिसतात त्यामुळे पुस्तक वाचायची उत्सुकता अजूनच वाढते. त्यात पुढे पु.ल.देशपांड्यांची प्रस्तावना…….मग काय विचारायलाच नको. त्यांनी त्या प्रस्तावनेला नाव पण इतकं सुरेख दिलंय….! “झोंबी- एक बाल्य हरवलेलं बालकांड” ! ह्या नावामुळे नक्कीच काहीतरी जगावेगळं असेल ह्याची कल्पना येते. कारण बाल्याला “बालकांड” संबोधलंय म्हणजे बराच भोग, हाल अपेष्टा, गरीबी असणार असं वाटतं.

प्रस्तावनेत पु.ल. म्हणतात की हे आनंद यादवांचं आत्मकथन आहे. जर असं असेल तर आनंद यादव ह्यांना साष्टांग दंडवतच घालायला हवा. कारण ह्या कथनात इतक्या भयंकर परिस्थितीतलं बालपण दाखवलंय ना………की आपण कल्पनाही करु शकत नाही. अतिशय हट्टी आणि कामचुकार वडील, आपल्या अकरा मुलांचा जीवाच्या आकांताने सांभाळ करुन संसार सावरणारी आई आणि भीषण दारिद्र्य ह्याचं इतकं विदारक शब्दचित्र लेखकाने चितारलंय. सगळं स्वत: भोगलं असल्यामुळे त्यातला निखार अंगावर येतो.

शिक्षणाची, शाळेची, कलेची मनापासून आवड असते आनंद (आंद्या) ला. खरं तर त्यांच्या जातीत अशी काही आवड ठेवणं हाच जणू काही गुन्हा ….अशी परिस्थिती होती. अतिशय हलाखीच्या दिवसातही त्याच्या मनातली शिक्षणाची ओढ काही कमी होत नाही. ज्या प्रकारची कामं करुन तो शाळेत धडपडत जातो…….त्याला तोड नाही. वेळप्रसंगी चोरी सुद्धा ! बरोबरीच्या मुलाची शिकवणी, नकलांचे कार्यक्रम, रोजंदारी …….हे सगळं करुन तो शिकतो. वडीलांचा जबरदस्त विरोध असतो त्याच्या शिक्षणाला. कारण मुलगा शाळेत गेला तर शेतातली सगळी कामं त्यांच्यावर पडणार. शिवाय शाळेसाठी पैसे नाहीत. त्यामुळे त्यांना समजावणं हे सगळ्यात कठीण काम असतं त्याच्यापुढे. त्यासाठी तो वडीलांचा बेदम मार खातो. शेवटपर्यंत म्हणजे तो अगदी घर सोडून जाईपर्यत त्याच्या वडीलांना त्याची शिक्षणाची तळमळ कळत नाही.

घरात अकरा भावंडं……….अगदी एका पाठोपाठ झालेली त्यामुळे रोगट, अशक्त. घरात दोन्ही वेळेच्या जेवणाची भ्रांत ! शेतकाम करुन शाळेत गेल्यामुळे कायम मळलेले कपडे, आंघोळीला, कपडे धुवायला साबण सुद्धा नाही. वह्या , पुस्तकं घ्यायला पण पैसे नाहीत. फी भरायला पैसे नाही. शेतातल्या कामामुळे शाळेत यायला उशीर ह्या सगळ्या कारणांमूळे त्याला शाळेत खूप शरमिंदं वाटायचं. भरीस भर म्हणजे वडीलांचा शिक्षणाला विरोध ! तरीही अगदी हट्टाने त्यांनी एकेक वर्ष शिक्षण घेतलं. काही वेळेला शिक्षकांनी त्याची परिस्थिती समजून त्याला मदत केली तर काही वेळेला त्याला मुद्दाम त्रासही दिला. जात्याच हुशार असल्यामुळे शाळा बुडाली तरी पाठांतराचे त्यानेच वेगवेगळे प्रकार शोधून काढले. कामाच्या रगाड्यातही त्याने कविता, शब्दार्थ, प्रश्नोत्तरं चालूच ठेवले. इतकं सगळं सांभाळूनही त्याने कायम पहिला, दुसरा नंबर ठेवला शाळेमधे. त्याच्या शिक्षणाच्या वेडाला जरी त्याच्या वडीलांनी कधी दाद दिली नसली तरी शेवटी त्यांनाही हार मानावीच लागली. मोठ्या कष्टाने त्याला एस.एस.सी ची परिक्षा देण्याची परवानगी त्यांनी दिली आणि आनंदने त्याचं सोनं केलं.

कादंबरी संपली तरी एक हुरहुर तशीच राहते मनात. पुढे काय झालं असेल ह्या आंद्याचं…………त्याच्या घराचं……बहिण भावंडांचं ?? आज आनंद यादव एक मोठं नाव आहे. ते नाव मिळवण्यासाठी त्यांना पुढे कोणत्या दिव्यातून जावं लागलं असेल ?? असे बरेच प्रश्न मनात तयार होतात. ती उत्तरं पुढच्या काही कादंबर्‍यातून वाचायला मिळावी असं वाटतं ह्यातच लेखकाचं यश आहे.

आनंद यादवांना एक कडक सॅल्यूट

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिला आहेस गं पुस्तक-परिचय! अशी पुस्तकं जगायची, झुंजायची ताकद तर देतातच, शिवाय आपले छोटे-मोठे प्रश्न लेखकाच्या ह्या जगण्याच्या - परिस्थितीच्या संघर्षासमोर कस्पटासमान वाटायला लागतात!

दोनदा संघर्ष करावा लागला. एकदा शिक्षणासाठी दुसर्‍यांदा वैष्णवांबरोबर. माफी मागुन, पुस्तक मागे घेऊनही मानले नाहीत ते वैष्णव.

'तुकाराम' कादंबरीवरुन गोंधळ झाला होता. वारकरी संप्रदायाचा असा आरोप होता की यादवांनी 'तुकारामाचे' चारित्र्य हनन केले आहे ह्या कादंबरीत. मी वाचली नसल्यामुळे नक्की माहित नाही. अधिक माहिती इथे:
'तुकाराम आणि आनंद यादव'

झोंबी आणि नांगरणी ही नववी दहावीच्या सुटीत वाचल्याचं आठवतं. त्या वयात खूपच जबरदस्त परिणाम झाला होता त्या पुस्तकांचा. म्हणजे आपल्याला जे सगळं आपोआप हाताशी मिळतं त्याला आपण खरंच लायक आहोत की नाही असं सतत टोचायचं. जे आपल्याला मिळालंय त्याला किंमत द्यायला शिकायचं असेल तर ही म्हणजे पाठ्यपुस्तकं.
रच्याकने, नववी दहावीच्या निकालानंतर कुणाला बक्षीस द्यायचे असेल तर ही पुस्तकं आदर्श ठरावीत. Happy

आनंद यादवांनी ज्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण केलय ती वाचल्यावर त्यांना दंडवतच घालावेत. त्यांची कथा जर प्रातिनिधिक मानली तर असे अनेक जण आजही असतील की ज्यांना इच्छा असूनही शिकायला मिळत नाही व ते त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी धडपडतायत. अशा अनेक व्यक्तींना केवळ शुभेच्छाच देवू शकतो.

>>म्हणजे आपल्याला जे सगळं आपोआप हाताशी मिळतं त्याला आपण खरंच लायक आहोत की नाही असं सतत टोचायचं. << अगदी खरय, हे पुस्तक वाचल्यावर असच वाटतय.

आशुडी, अनुमोदन!

आमच्या घरी अभ्यासात असलेले मराठीचे धडे ज्या पुस्तकातून आले ती वाचायची पद्धत होती. तेंव्हा कधी तरी दलित/शोषित साहित्य वाचताना ही वाचली.

आशुडी अनुमोदन Happy

आता नीटसं कारण आठवत नाही पण झोंबी, नांगरणीने जेव्हढं ढवळून काढलं तेव्हढ काचवेल वाचताना नाही जाणवलं. ही मी एका पाठोपाठ एक अशी सलग संपवलेली सिरिज कदाचित एका पद्धतीच्या लेखनाचा ओव्हरडोस म्हणून काचवेल नसेल भावलं तेव्हढं

ह्याच प्रकारातली जगण्याची, शिकून पुढे जाण्याची जिद्द ह्या ध्येयाने भारावलेली जीवन कहाणी सांगणारी पुस्तकं म्हणजे "जगायचय प्रत्येक सेकंद" हे मंगला केवळेंनी लिहीलेलं डॉ. केवळेंवरचं पुस्तक आणि आमचा बाप अन आम्ही हे नरेंद्र जाधवांच पुस्तक

आता नीटसं कारण आठवत नाही पण झोंबी, नांगरणीने जेव्हढं ढवळून काढलं तेव्हढ काचवेल वाचताना नाही जाणवलं. >>एकदम बरोबर. आधीच्या पुस्तकांमधला प्रामाणिकपणा एकदम जखडून टाकणारा होता. नंतर कदाचित तोच तोच पणा आला असावा का ?

जयवी,छान पुस्तक परिचय! आजच हा धागा वाचला.मी प्रथम नांगरणी वाचलं,मग आधाश्यासारखी झोंबी,घरभिंती व काचवेलही वाचून काढली.पण झोंबी सगळ्यात जास्त आवडलं.

जयवी अगदी असच मला देखील वाटल होत .. काय झाल असेल पुढे आन्द्याच .. पुढे काय ? पुढचा कादंबरिचा भाग आहे की नाहि ह्याचा देखील मी खुप दिवस शोध घेत होते ... आहे का झोंबी २ ?

मध्यंतरी 'झोंबी' कार आनंद यादवांचे निधन अशी बातमी वाचली आणि तेव्हा सवडीने वाचायला म्हणून कधीतरी आणून ठेवलेल्या या पुस्तकाची आठवण झाली. हातात वाचायला वेळ असल्याने सुरुवात केली आणि झपाटल्यासारखं दोन दिवसात वाचून काढलं. पुस्तक परिचयाचा हा लेख आणि त्या खालच्या प्रतिक्रिया सगळ्याच पटल्या.
शेवटची काही पानं वाचताना अक्षरशः भडभडून येतं.. चीड येते... !
सुंदर संग्रही ठेवावं असं प्रेरणादायी पुस्तक !
आनंद यादवांना एक कडक सॅल्यूट>>+१

मराठीच्या पुस्तकात होता हा धडा मला..
माझ्या काकोबाई (आईची आई) त्यावेळी हेडमिस्ट्रेस होत्या. त्या घरी वाचायला त्यांच्या वाचनालयातुन बरीच पुस्तके आणायच्या. एकदा झोंबी घेऊन आल्या त्यावेळी झपाटल्यासारखं ते वाचुन संपवल.. ६वी ७वीत असेल मी तेव्हा... तो धडा वाचतानाच भडभ्डून यायचं.. पुस्तक वाचल्यानंतर ती त्यांनी मांडलेल्या/भोगलेल्या आयुष्यातली काही पाने होती फक्त हे जाणवून खुप अस्वस्थ झाली होती मी... माझं आयुष्य कित्ती कित्ती सुंदर आहे याची तीव्र जाणीव झाली होती.. एका ट्रान्स मधे होती कित्येक दिवस.. परत एकदा वाचायची इच्छा आहे पण माहिती नाही वाचल्या जाईल कि नाही मला..

@असाम@,
<< आता नीटसं कारण आठवत नाही पण झोंबी, नांगरणीने जेव्हढं ढवळून काढलं तेव्हढ काचवेल वाचताना नाही जाणवलं. >>
बरोबर. त्यांच्या जीवनातील संघर्ष संपला की लेखन बोथट होत जाते आणि आपल्याला तेव्हढे सुरस वाटत नाही जेव्हढे आधीचे भाग वाटतात.

दलित आत्मकथनाचे पण असेच आहेत. एक दोन पुस्तकां नंतर ते पांढरपेशी होत गेले तसे त्यांचे लेखन ओसरत गेले.
मला वाटतं शरणकुमार लिंबाणे यांच्या पुस्तकातील एका लेखात ही खंत व्यक्त केलेली आढळते.

>> Submitted by आशूडी on 24 May, 2010 - 10:12

या प्रतिसादाशी तंतोतंत सहमत. आनंद यादव यांची "झोंबी" व्ही. शांताराम यांचे "शांतारामा" आणि व्यंकटेश माडगुळकर यांच्या अनेकविध पुस्तकांच्या वाचनाने भारावून गेलेले दिवस आठवले.

प्रा. आनंद यादव यांची "पाटी आणि पोळी" नावाची कथा अभ्यासक्रमात होती. बहुतेक आठवीच्या पुस्तकात असेल. ती तेंव्हा इतकी आवडली होती कि पारायणे करून करून पहिला परिच्छेद तर तेंव्हा अक्षरशः तोंडपाठ झाला होता. पुढे दोनेक वर्षांनी "झोंबी" वाचायला मिळाली. झपाटल्यासारखी वाचून काढली. वाचल्यानंतर अक्षरशः झोप उडाली होती. इतके कष्टप्रद आणि शिक्षणासाठी संघर्षप्रद बालपण! "मूत त्या शाळेवर" असे त्यांच्या काकांचे उद्गार वाचून अंगावर काटा आला होता. एकदा वाचल्यानंतर कायमची स्मरणात राहील अशी आत्मकथा.

शेवटच्या काळात आनंद यादव यांना काही घटनामुळे अत्यंत मानसिक क्लेशातून जावे लागले. ज्यांनी परिस्थितीशी अखंड संघर्ष करत उभारी घेतली त्यांना उतारवयात असा त्रास व्हायला नको होता. या काळात आपणच लिहिलेल्या झोंबी व इतर पुस्तकांचे वाचन करून जुन्या काळात ते हरवून जात असा उल्लेख त्यांच्या निधनानंतर एका बातमीत आला होता. ते वाचून मन गहिवरून गेले.