दिवाळी उद्योग : स्वराज्य तोरण चढे.....

Submitted by रुणुझुणू on 4 November, 2011 - 02:08

दिवाळी आली की उत्साह, सजावट, चकली-करंज्यांसोबतच आणखी एक आठवण येते.... लुटुपुटीच्या किल्ल्याची !
यंदाची दिवाळी भारताबाहेर मालदीवमध्ये साजरी करताना अर्थातच ह्या सगळ्याचीच उणीव चुटपुट लावत होती.
लेकाला दिवाळीच्या आठवणी सांगताना किल्ल्याबद्दल सांगत होते.
पण कधीच न पाहिलेल्या गोष्टीची कल्पना करायला त्याला काही जमेना.
मनात आलं , इथेच किल्ला बनवायचा प्रयत्न केला तर !
त्याच इच्छेतून साकार झाला आमचा किल्ला.

१. किल्लेबांधणीसाठी कच्चा माल.
इथे प्रवाळांची ( कोरल्सची ) बेटं असल्याने आणि सगळीकडे फक्त पांढरी वाळू असल्याने दगड-माती कुठून आणायची हा प्रश्न पडला. पण मग.......घरातल्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये आम्हाला किल्ल्याचे बुरुज दिसायला लागले. Happy

killa-bottles.jpg.JPG

२. घरातच किल्ला बनवायचा असल्याने भिंती खराब होऊ नयेत म्हणून कार्डबोर्डच्या खोक्याचा एक भाग कापून घेतला.

cardboard.jpg.JPG

३. किल्ल्याच्या भिंती बांधण्यासाठी हार्डवेअरच्या दुकानातून " काहीतरी " मिळालं. ते काय होतं हे अजूनही आम्हाला कळलं नाही. प्लॅस्टर ऑफ पॅरिस आहे का ? असं विचारल्यावर " नू " ( म्हणजे - ' नाही') असं उत्तर मिळालं. ही पावडर इथले स्थानिक लोक घरं बांधताना वापरतात, एवढीच माहिती कशीबशी मिळाली.

आमच्या बाटल्यांच्या किल्ल्यावर हिरवळ उगवणं शक्यच नव्हतं. ती पावडरसुद्धा पांढरी होती. पण हिरवळीशिवाय किल्ल्याची कल्पना करवेना. मग पावडरमध्ये खायचा हिरवा रंग मिसळायचं ठरलं.

Mixing colors for killa.jpg.JPG

४. " काय करताय तरी काय तुम्ही ? बघू दे बरं मला ! "

Color for killa.jpg.JPG

५. कार्डबोर्डच्या कोपर्‍यात बाटल्यांची मांडणी करून त्याच्यावर हिरव्या पावडरचा लेप लावला. पण रंग लावून झाल्यावर तयार झालेलं प्रकरण पाहून आम्ही जरा हिरमुसलो. आम्हाला छान पोपटी-हिरवा रंग हवा होता. पण हा रंग तर शेणाने सारवल्यासारखा दिसत होता.
आमचा किल्ला बांधून व्हायच्या आधीच ( लेकाच्या कृपेने ) त्याच्यावर एक पूर्ण वाढीचं हिरवंगार नारळाचं झाड उगवलंय बरं का ! Lol

killa.jpg.JPG

६. अजून थोड्या वेळाने तर आमच्या किल्ल्याने आणखीनच वेगळा रंग दाखवला. Happy शेवटी दगडांचा आभास निर्माण करायला राखाडी रंग लावायला सुरूवात केली.
शिवाजीराजांना बसायला सिंहासन कशाचं करायचं ? 'स्क्वेअर बॉक्स' हवंय म्हटल्यावर लेकाने लगबगीने जाऊन म्हैसूर सँडल साबणाचं बॉक्स आणलं....आतला साबण बेघर झाला !

killa-gray.jpg.JPG

७. आणि हा आमचा किल्ल्ला !

killa-complete.jpg.JPG

८. शिवाजीराजांचे चित्र आंतरजालावरून घेतलं. आमच्या बेटावर प्रिंटिंगची मोजकीच दुकाने. त्यातल्या एकाकडे अगदी उत्साहात पेनड्राईव्ह घेऊन गेलो. त्याने फोटो पाहिला आणि आमच्याकडे जरा विचित्र नजरेने बघितलं. पण आमच्या ओळखीतला असल्याने त्याने फोटो प्रिंट केला.
मात्र शेवटी हळूच सांगितलं, " प्लीज डोण्ट टेल एनीबडी दॅट आय हॅव प्रिन्टेड धिस अ‍ॅण्ड प्लीज डोण्ट शो टु एनीवन. "
तो तसं म्हटल्यानंतर आमची ट्युब पेटली की आपण एका १००% मुस्लिम देशात खुलेआम शिवाजीराजांचा फोटो घेऊन फिरतोय ! Uhoh
सिंहासनाला लाल रंगाचं कापड चिकटवलं आणि राजे सिंहासनाधिष्ठित झाले.

killa-raje.jpg.JPG

९. भगव्या रंगाच्या क्राफ्ट पेपरचं ' स्वराज्य-तोरण ' बनवलं. बासरीच्या टोकावर चिकटवलं. आमचा भगवा ध्वज किल्ल्याच्या उंचीइतका झाला....पण हौसेपुढे प्रमाण आणि मोजमापांचं काय इतकं ?

killa-full.jpg.JPG

आमच्या किल्ल्याला दार नाही...म्हणजे रात्र झाल्यामुळे ते बंद केलंय ना, म्हणून दिसत नाहीये. Happy
आणि आमचा किल्ला ' मोबाईल ' आहे बरं का ! खोक्याच्या कोपर्‍यावर केल्याने आख्खा किल्ला उचलून इकडून तिकडे हलवता येतो.
भारतात असतो तर तुळशीबागेत फेरफटका मारून भरपूर मावळे, गवळणी आणल्या असत्या आणि किल्ला सजवला असता.
पण सध्यापुरतं एवढ्यानेसुद्धा खूप समाधान वाटलं !

.

गुलमोहर: 

आवडला किल्ला आणि तो बनवताना केलेल्या खटपटी लटपटींचं वर्णनही! Happy लेकाच्या व तुमच्या चांगलाच लक्षात राहील हा किल्ला!

कल्पकता, कष्ट, जिद्द .........हॅट्स ऑफ....
छत्रपती शिवाजी महाराज की जय...

आयला सही. मी (अर्थातच ईथेच असल्याने) १ दिवस कुठे किल्ले बनवले आहेत हे शोधत लेकासह हिंडले व अचानक मागच्याच गल्लीत २ मोठ्ठे किल्ले केलेले सापडले. आहाहा काय बरे वाटले पण ....
तु केलेला हा खटाटोप धन्य आहेस ___/\___.

मस्त झाले आहे. आपल्याला भारतात कसली कसली स्वातंत्र्यं आहेत ते समजून फार बरे वाटले.

सुरेखच झालाय. लेक अगदी भारतात वाढल्यासारखा वाढतोय म्हणायचा.

पण मुसलमानांच्या देशात, हिरवा रंग टिकत नाही म्हणजे काय, आँ ?

सगळ्यांना मनापासून धन्यवाद...:)

मोनाली, अचानक दोन किल्ले दिसल्यावर लेक जाम खुष झाला असेल ना.
<< आपल्याला भारतात कसली कसली स्वातंत्र्यं आहेत ते समजून फार बरे वाटले.>> अगदी अगदी, अमा.
<< पण मुसलमानांच्या देशात, हिरवा रंग टिकत नाही म्हणजे काय, आँ ?>> दिनेशदा, ज्वालाग्राही वाक्य आहे हे Proud
कविता,स्वाती.. खरं सांगायचं तर मला स्वतःलाच असले किडे करायला जाम आवडतं. Lol आता लेकाचं निमित्त मिळालंय...

वर्षा, पियापेटी...नक्की करून बघा. धमाल येते. तिकडे माती मिळते त्यामुळे आणखी सोप्पं पडेल. इथे फक्त वाळू...
शशांक,...छत्रपती शिवाजी महाराज की जय ! Happy

76103_461639519437_859199437_5338904_1470051_n.jpg

आमचा मागच्या वर्षी चा किल्ला... [मी , माउ , ओम्कार आणी श्री ने बनवलेला ]
-त्यात एक मडके आणी ४-५ विटकरी आहेत
-वरुन माती , रंग आणी शिवाजी महाराज व त्यांचे मावळे

मस्त आहे किल्ला..आपण सक्रिय सहभाग घेत असलो कि मुलांच्या कल्पनेला आपोआप खत-पाणी मिळायला सुरवात होते ती अशी..

मस्त...मस्त खूप आवडला.पुढच्या वर्षी मी पण करणार लेकी सोबत.मुंबईत मी कुठे कुणी किल्ले बनवलेले अजुन तरी पाहिलेले नाहीत पण पुढच्या वर्षाचा कार्यक्रम नक्की...

Pages