भारतात, भाच्याशी बोलले परवा. आत्येबरोबर अजूनतरी बरच काही शेअर करायला आवडतंय. पूर्वी सरळ मांडीवर येऊन बसायचा. आता नुस्त्याच फोनवर गप्पा होतात. पण अविर्भाव मांडीवर बसून बोलल्याचाच. मी पूर्णपणे कान देऊन फक्तं त्याचंच ऐकतेय ना याची खात्री करणं वगैरे सगळं.....
नवीन मित्र, आणि हो! मैत्रिणीसुद्धा. नवीन खेळ, नवीन पिक्चर्स... सॉरी चुकलं. मूव्ही म्हणायचं नाही का?...
त्याची टकळी चालू असते. नुसतं 'हो का?', 'अर्रे व्वा'... असलं चालत नाही. आधीच्या फोनचे संदर्भ निघतात.
'विसरलीस ना?...' असला हिरमुसला प्रश्न येतो हजारो मैलावरून. खरच मांडीवर असता तर नुसतं कवळून 'होय रे....' ची कबुली चालली असती. आता नाही... स्पर्शाच्या ताटातुटीबरोबर ती सूटही गेलीये.
'ह्या वर्षी सायन्सच्या टीचर बदलल्या. पीटीचे सर फ्रेंड आहेत माझे. स्विमिंग स्क्वॉडच्या टेस्टला सिलेक्ट झालो नाही.... तीन महिन्यांनी पुन्हा टेस्ट आहे.... तेव्हा नक्की.
आत्ये....इंग्लिशच्या टीचर आहेत ना.... खडूस आहेत. त्या गं... गेल्यावेळी नव्हतो का बोललो? त्या. उगीचच राग धरतात. मी ऑस्ट्रेलियाहून इथे आलोय ते माहितीये त्यांना. माझं इंग्लिश चागलं आहे... मग माझ्या इतर चुका काढत बसतात..... का ते माहीत नाही... बट आय थिंक शी हेट्स मी....'
हे ऐकलं आणि माझ्या मनावरल्या एका खूप जुन्या ओरखड्यावर पुन्हा ताजे थेंब तरारून आले....
नववीला होत्ये तेव्हाची गोष्ट. साधारण चांगल्या अवस्थेतली जुनी पुस्तकं घ्यायची, नीट वापरायची आणि कुणा चुलत-मावस भावंडाला द्यायची किंवा परत विकायची.... हाच परिपाठ होता. ह्यात काही कमीपणा आहे असं वाटलही नव्हतं. आई-वडिलांनी हे करण्यामागचं कारण "परिस्थिती" नसून पैशाचा अपव्यय टाळणं हे अगदी बिंबवलं होतं मनात. कारण हौसेने गोष्टीची पुस्तकं घेत होतोच की विकत!
तरीही इतर मुलांची कोरी करकरीत पुस्तकं बघून कधी कधी बालसुलभ हेवा वाटायचा तो वाटायचाच.
माझ्या दहावीच्या वर्षी बहुतेक जरा अभ्यासक्रम बदलला असावा, कारण नवीन पुस्तकं घेतल्याचं आठवतं. इतिहासाच्या तासाला बाई आल्या वर्गात. त्यांनी सगळ्यांना दुसर्या तासापासून एक फूटपट्टी आणि लाल रंगाचं पेन आणायला सांगितलं.
शिकवायची पद्धत अशी की, त्या इतिहासचा धडा वाचत जाणार. आणि त्या सांगतिल त्या ओळी अधोरेखित करायच्या, लाल पेनाने.
तो तास संपल्यावर बाईंना जाऊन भेटले. सांगितलं की, हे पुस्तक मी ह्या वर्षानंतर विकणार आहे आणि असं लाल रेघा मारलेलं कुणी विकत घेणार नाही. तेव्हा त्या सांगतिल त्या ओळींचे नंबर, पान क्रमांक वगैरे मी वेगळ्या वहीत लिहून घेईन.
त्यांनी रोखून बघितलं माझ्याकडे आणि टीचर्स रूममध्ये निघून गेल्या. परत दार ठोठावून त्यांना बाहेर बोलावून, 'मग काय करू?' विचारायचं धाडस झालं नाही.
*****************************************************
दुसर्याच दिवशी इतिहासाचा तास. माझ्य पोटात गोळा आला. बाईंनी सगळ्या वर्गावरून एक नजर फिरवली आणि माझ्याकडे रोखत विचारलं, 'फूटपट्टी, पेनं आणलीत?'.
ओळी आखायच्या नाहीत हे इतकं मी स्वत:ला बजावलं होतं की, नकळत उभी राहिले आणि कसबसं बोलले.
'बाई, मी काल बोलल्ये ना तुमच्याशी की, पुस्तकावर मी ओळी आखू शकणार नाही.... कारण.... कारण.....' मी थांबले. मला वाटलं बाई म्हणतिल 'असूदे. बस खाली. आणि लिहून मात्रं घे नीट...'
पण त्या म्हणाल्या, 'नीट उभी रहा आणि अख्ख्या वर्गाला ऐकू जाईल असं सांग तुझं कारण.'... त्यांच्या डोळ्यात एक शिक्षकाची शिस्त न दिसता वेगळाच आसुरी भाव दिसला. आणि पहिल्यांदा.... खरच पहिल्यांदाच, मी सेकंड हॅंड पुस्तकं वापरते, ती वापरून झाल्यावर विकत्ये ह्याची वेगळीच लाजिरवाणी जाणीव मला झाली. ही जाणीव आपल्याला मुद्दाम करून देण्यात आलीये हे ही लक्षात आलं.
इतरवेळी घडाघडा बोलणारी जीभ लुळी पडली. चेहरा, कान लाल झाले, मानेवर काटे आल्यासारखं दुखू लागलं, डोळ्यात पाणी आलं की नाही माहीत नाही.
'कारण सांगायचं नसेल तर माझ्या वर्गात बसू नकोस. वर्गाबाहेर जा... चल नीघ.' असं म्हणून त्या खुर्चीवर बसल्याही. त्यांच्यामते हा विषय त्यांनी एक घाव दोन तुकडे करून संपवला होता.
मी हातात पुस्तक, वही घेऊन वर्गाबाहेरचा रस्ता धरला. मुलं कुजबुजत होता, काही रोखून बघत होती, काहींनी नजरा चुकवल्या. मान खाली घालून धुमसत मी वर्गाबाहेर उभी राहिले. येणारी-जाणारी इतर मुलं, शाळेचे शिपाई, इतर शिक्षक ह्यांच्या नजरांनी अजूनच अपमानास्पद वाटायला लागलं.
त्या वयात हा घाव खूप खूप लागला. बाईंनी आपल्याला समजून घ्यायला हवं.... त्याउलट अख्ख्या वर्गासमोर असं.....
पुढल्या तासापासून दिवसभर लक्ष लागलच नाही मग. मैत्रिणी येऊन काही-बाही बोलून गेल्या. संध्याकाळी घरी येऊन बाबांना घडलेला प्रकार सांगितला. आईशी न जमण्याचे दिवस असावेत ते..... आणि तसही बाबांशी जास्तं जमायचं.
'तुला काय करायचंय? नवीन पुस्तक घ्यायचंय का? माझी ना नाही. पण....', बाबा बोलता बोलता थांबले पण त्यांना नक्की काय म्हणायचं होतं ते मला कळलच.
माझ्या ढासळत्या धैर्याला आधार मिळाला असावा.
पण मी वळता वळता बाबांनी बजावलच, 'जे काही करशील ते आधी विचार करून मगच करायचं. मनात आलं म्हणून केलं, मनात आलं ते बोलले... हे नाही चालायचं. त्या तुझ्या बाई आहेत. त्यांचा अपमान झालेला मला चालणार नाही... हे एक पक्कं लक्षात ठेव.'
*******************************************************************
दुसर्या दिवशी खूप वेळ टीचर्स रूमसमोर उभी राहिले. एकदा धडा करून बापू शिपायाला आत पाठवून बाईंना 'बोलायचय' म्हणून निरोप पाठवला. बाईंचा 'कामात आहे' असा निरोप परत आला.
इतिहासाच्या तासाला बाईनी मला उभं केलं. 'पेन, पट्टी आणली असलीस तरच वर्गात बसायच.....'.
त्या क्षणापर्यंत मी हाच विचार करत होते. की आज राग शांत झाला असेल आणि बाई बाजूला घेऊन विचारतिल... आपण तेच कारण सांगायचं. नीट लिहून घेईन पान क्रमांक आणि ओळ क्रमांक.... शिवाय बाईना सांगायचं की, मनिषाचं पुस्तक घेऊन पुन्हा नीट तपासून बघेन... बरोबर आहेत ना... वगैरे वगैरे. अनेकदा मनात बाईशी कसं बोलायचं त्याची उजळणी करून झाली होती...
पण बाई पुन्हा भर वर्गासमोर धिंडवडे काढतिल असं खरच वाटलं नव्हतं. 'मोठ्ठ्याने सांगणार आहेस वर्गाला का ओळी आखायच्या नाहीत तुला?' बाईनी पुन्हा तोच पेच टाकला.
कारण सांगितलं तर ओळी आखाव्या लागणार नाहीत...
तरी काय झालं? सगळ्यांसमोर सांगायचं की मी जुनी पुस्तकं वापरते, किंवा विकते?
मग काय झालं? बाकीची कुणी वापरत असतिलच ना.....
पण माझ्या मैत्रिणिंपैकी कुणीच नाहीये....
पण वर्गात बसू देतिल.... दहावीसाठी वर्गातली हजेरी महत्वाची नाही का?
पण बहुतेक कालच्या बाबांशी झालेल्या बोलण्याने धीर आला असावा. कसंबसं अवसान गोळा करून, अर्धवट मान खाली घालत, कशातरी शब्दात शेवटी सांगितलंच मी.
'मलाच नीट ऐकू आलं नाही तर बाकीच्यांना काय ऐकू गेलं असणार.... पुन्हा सांग. घडाघडा बोल... मोठ्ठ्याने. वर बघ, ताठ उभी रहा....', बाई ओरडल्या.
सगळ्या संवेदना गोठून मी तरीही त्या म्हणाल्या तश्शी ताठ, मान वर करून उभी राहिले. आणि मोठ्ठ्याने सगळ्या वर्गाला सांगितलं, 'मी जुनी पुस्तकं वापरते आणि ती शेवटी विकतेही. पुस्तक खराब होईल म्हणून मला त्यावर ओळी आखायच्या नाहीत'.
मला वाटलं तसं वर्गातल्या, माझ्याकडे वळून बघणार्या चेहर्यांवर... वेगळे, कुत्सित, मला हलकं समजणारे, माझ्या आर्थिक परिस्थितीबद्दल अंदाज बांधणारे भाव दिसले नाहीत.
लटपटत्या पायांनी मी बाकावर बसू गेले तर, 'झालं बोलून? आता वर्गाबाहेर जा आणि वर्षभर माझ्या वर्गात पाऊल ठेवायचं नाहीस. गेट आऊट!', बाई ओरडल्या.
हा धक्का मात्रं अगदिच अनपेक्षित होता. कारण सांगितलं तरीही वर्गात बसायचं नाही? वर्गातही एकदम कुजबुज वाढली. मी आश्चर्याने इतकी थिजले की बाईना परत ओरडावं लागलं, 'ऐकू येत नाहीये का? वर्गाबाहेर चालती हो. माझा वेळ खाऊ नकोस'.
मी परत एकदा वर्गाबाहेर येऊन उभी राहिले. आता मात्रं कळेना पुढे काय?
वर्गात वर्षभर बसले नाही तर.... दहावीचा फॉर्म भरताना काहीतरी नक्की गडबड होणार.
आपलं वर्षं फुकट जाणार की काय?
काय चुकलं आपलं? उद्धटपणाही केला नाहीये.
परत परत मी गेल्या दोन दिवसांच्या घटनांची उजळणी करत होते. बाबांना सांगायचं वैद्यसरांना भेटायला. प्रिन्सिपॉल म्हणून ते काहीतरी करतीलच ना....
पण अशी वेळ आई-बाबांवर कधीच आली नव्हती... शाळेत ते अशा कारणासाठी कधीच आले नाहीयेत. काय हे?
इतक्यात वैद्यसरांची फेरी झाली. मला वर्गाबाहेर उभी बघून त्यांनी विचारलं, 'काय झालं?'.
वैद्यसरांनी नुस्तं थांबून सरळ साध्या स्वरात विचारलं..... कुठेही जरब नव्हती, मी गुन्हेगार असल्याचं गृहितक नव्हतं....
मी थोडं रडत, थोडं थांबत, श्वास घेत... कसंतरी त्यांना सांगितलं.
'ह्यातला शब्द-न-शब्द खरा आहे?' सरांनी माझ्याकडे रोखून बघत विचारलं.
'होय, सर.', आता मलाही थोडा धीर आला होता.
'बरं. आज वर्गात काय झालंय ते कुणाकडूनतरी विचारून घे. आणि उद्या शाळेच्या आधी मला येऊन भेट.' इतकं बोलून सर निघूनही गेले.
घरी जाऊन आई-बाबांना सगळं सांगितलं, इलाजच नव्हता. आई खूप चिडली. 'काय नको ते सुचतय. भीक लागलीये का आपल्याला? बाईनी सांगितलं ओळी आख तर आखायच्या. कशाला त्यांच्याशी वैर.....'
काही वेळाने मला माझंच काहीतरी चुकलंय असं वाटायला लागलं आणि त्या दोन दिवसांत पहिल्यांदा रडू आलं. त्या दोन दिवसांचा ताण सहन झाला नसावा कारण जवळ जवळ हिस्टेरिक होऊन मी किंचाळले होते, 'का? का आखायच्या ओळी? काय शिकणार आम्ही त्यातून? मला नाही पटत तर मी नाही आखणार....'
बाबांनी शांत केलं कसंबसं पण एक गोष्टं मात्रं सांगितली, 'आई म्हणते तसा बाईनी राग धरला तर वर्षभर काय होईल ते भोगायची तयारी असायला हवी. शांतपणा दाखवलास तर ह्याच्यातून नक्की बाहेर पडशील.... एक खंबीरपणा येईल. मनाची ताकद हवी. तसं काही वेडवाकडं होत असलं तर मी आहे... पण शाळेत तुलाच जायचय.'
'मनाच्या ताकदीला बाकीचं आयुष्य पडलंय. तुम्ही नको त्या भरीला घालू नका तिला. अभ्यास आहे दहावीचा. त्यात आणि हे ओझं घेऊन पोरीने वर्षं कशाला काढायचं म्हणते मी...' आईचं तिच्यामते बरोबरच होतं.
********************************************************
दुसर्या दिवशी पहिल्या घंटेच्या आधी वैद्यसरांच्या केबिनपुढे जाऊन उभी राहिले. त्यांनी मला बघितल्या बघितल्या आत बोलावलं.
'इतिहासाच्या तासाला वर्गात जाऊन बस नेहमीप्रमाणे. बाई सांगतिल त्या ओळींचे, पानांचे नंबर नीट लिहून घे. जा. मी बोललोय बाईंशी'
माझा माझ्या कानावर विश्वास बसला नाही. मान हलवून मी "थॅक्स सर" एव्हढच म्हटलं आणि वर्गात नेहमीच्या जागी जाऊन बसले. बाई आल्या पण मला काहीच बोलल्या नाहीत.
'ज्यांना ओळी आखायच्या नाहीत त्यांनी शेवटच्या बाकावर जाऊन बसा' अशी आज्ञा मात्रं केली. सगळा वर्ग माझ्याकडे बघू लागला.
मला बाबांची कालची सूचना आठवली. मी निमूटपणे दप्तर उचलून शेवटच्या बाकावर जाऊन बसले.
संपूर्ण वर्षं असंच छोट्या छोट्या गोष्टींसाठी बोलून घेण्यात गेलं. माझे पेपर्स इतरांपेक्षा जास्तं काटेकोरपणे तपासले गेले. ज्या ज्या ठिकाणी त्या बाई होत्या त्या त्या स्पर्धा, ट्रिप्स, खेळ, विविध करमणुकीचे कार्यक्रम, गॅदरिंग मधले कार्यक्रम... सगळीकडे एकतर बोलून घ्यावं लागलं किंवा निवडच झाली नाही.... काही ठिकाणी मीच वळले नाही.
आतून मैत्रिणींचा, वर्गमित्रांचा मला पाठिंबा होता. घरी बाबांशी मोकळेपणाने बोलता यायचं. आईहीही काही विपरित त्रास होत नाहीयेना ह्याची चौकशीही करायची. शाळेतल्या टेस्ट्सना इतिहासात मिळणार्या कमी मार्कांचं ठोस कारण घरातही माहीत होतच. बघता बघता अभ्यासाच्या धावपळीत वर्षं सरलंही. बोर्डाच्या परिक्षेत इतिहासात शंभरपैकी सत्त्याणव मिळाले....
आत्ता मागे बघताना वाटतय, एखाद्या गोष्टीवर ठाम विश्वास असणं एक गोष्ट झाली पण तो तडीपर नेण्यासाठी जे मनाचा निर्धार, स्थैर्य, धैर्य लागतं ते अंगभूत होतं का आपल्याकडे?
तर उत्तर आहे, 'नाही'. बाबांशी बोलले नसते तर ढासळलेलीच होते की.
मग ते अवसान, तो दृढपणा वेळोवेळी, इथून तिथून मिळवत वर्षं काढलं की काय?
तर... होय! वडील, आई, वैद्यसर, मित्र-मैत्रिणी सगळे कारणीभूत आहेत ती मनोधारणा तयार करायला आणि टिकवून ठेवायलाही. काही चूक नाही त्यात. ह्यालाच मनाचं 'घडणं' म्हणत असावेत. अगदी वैद्यसर, बाबा, आई कुणीच म्हटलं नाही तेव्हा की बाईंची माफी मागून टाक, चुकले म्हण.... सुटशील..... कुणीही नाही. उलट माझं मलाच जेव्हा जेव्हा असह्य झालं तेव्हा तेव्हा मैत्रिणी, बाबा, अगदी आईसुद्धा होतेच आधाराला जवळ.
चारच महिने राहिलेत...
नकोच वाकूस तू, बाईंकडे लक्षच देऊ नकोस ना....
काय चूक आहे तुझी....
असं इथून तिथून आधाराला वेली, पारंब्या येत राहिल्याच.... पडलेच तर खाली आई-बाबा आहेत हात पसरून हा विश्वास होताच.....
....पण कडा माझा मलाच चढावा लागला!
अन...
तरीही ओरखडा उठलाच उठला. एक पूर्ण वर्ष पंधरा वर्षाची एक पोर दररोज आज इतिहासाचा तास आहे की नाही ह्या विचाराने दचकुन उठत होती. तो एक तासभर आपल्या हातून कोणतीही चूक होणार नाही ह्यासाठी दक्ष राहिली.... घाबरून राहिली... त्या तासाला अदृश्य व्हायचा प्रयत्नं करत राहिली.
प्रत्येक स्पर्धेत, कार्यक्रमांत इथे बाई आहेत की नाहीत त्याचा बावरा अंदाज घेत वावरली. कधी कधी साध्या साध्या क्षुल्लक चुकांसाठी बोलून घेत राहिली.
एक साधा, कोवळा, निर्व्याज म्हणायचा तसा फुलपाखरी कालखंड, कसल्यातरी विक्षिप्त भितीचं भूत मानेवर घेऊन जगली.
............................
न राहवून भावाच्या मोबाईलला फोन लावलाच, 'अरे, नंदू परवा....त्या कोणतरी बाई खडूस आहेत म्हणत होता ना?... लक्ष ठेव रे. उगीच कसलंतरी ओझं घेऊन वावरेल पोर..... खंबीर व्हायला सगळं आयुष्य आहे रे, पुढे!'
समाप्त.
पूस्तकाचा अपमान
लहान वयात 'बोचलेले काटे' काही केल्या निघतच नाहीत. बोचतच रहातात सारखे.
मी सुद्धा जूनी पूस्तक बाईंडींग करून वापरलीयेत. आणि एकदा तर माझ 'जून पूस्तक' वर्गा बाहेर फेकण्यात आलय. 'माझ्या पूस्तकाचा' अपमान माझ्या 'स्वतःच्या अपमानापेक्षा' जास्त झोम्बणारा आहे.
तू आपटे शाळेची का ?
मी नाही आहे त्या शाळेचा. खूपच छान लिहिला आहेस तू
दाद!!
काय लिहू?? नेहमी प्रमाणेच सुं द र ! ! !
वाचल्यावर माझ्याही मनात शाळेच्या असंख्य आठवणी दाटून आल्या.. त्यापैकी एक आठवण.. तत्वाला चिकटून राहण्याची..
सातवीत असतानाची गोष्ट आहे. शाळेत दर महिन्याच्या सात तारखेच्या आत वर्गशिक्षकांकडे फी जमा करायला लागायची. एका महिन्यात काही कारणाने मला सहा तारखेपर्यंत फी भरायला जमले नाही. मी सात तारखेला फी घेऊन शाळेत गेलो पण त्यादिवशी आमच्या वर्गशिक्षिका रजेवर होत्या. त्यांच्या तासाला आलेल्या दुसर्या सरांना मी मला आज फी भरायची आहे असं सांगितलं ते म्हणाले मला ती जमा करून घेता येणार नाही तू उद्या तुमच्या बाई आल्या की भर. तरी मधल्या सुट्टीत मी शाळेच्या पर्यवेक्षकांकडे जाऊन पुन्हा तेच सांगितलं तर त्यांनीही मला दुसरे दिवशी फी बाईंकडेच भरायला सांगितले. आठ तारखेला वर्गशिक्षिका आल्यावर मी त्यांच्याकडे फी जमा करायला गेलो तर त्यांनी पन्नास पैसे दंड भरायला सांगितला. मी त्याला साफ नकार दिला. या बाई खरं तर आमच्याच कॉलनीत राहायच्या त्यामुळे त्या म्हणाल्या की तुझ्याकडे आत्ता पन्नास पैसे नसतील तर मी भरते तू नंतर दे. मी त्याला देखिल नकार दिला. मी म्हणालो शेवटच्या दिवशी म्हणजेच सात तारखेला मी फी आणली होती पण शाळेने ती स्विकारली नाही त्यामुळे मी दंड भरणार नाही. त्यांनी मला खूप समजावायचा प्रयत्न केला की पन्नास पैसे काही खूप मोठी रक्कम नाहिये आणि नियमाप्रमाणे सात तारखे नंतर फी भरल्याचा दंड म्हणून ते द्यावेच लागतील.
मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिलो. त्यांना घेऊन पर्यवेक्षकांकडे गेलो तर पर्यवेक्षक सुद्धा दंड भरून टाक म्हणाले. मग तर मी दंड न भरण्याचा ठाम निश्चय केला. बाई म्हणाल्या की तू आत्ता जा मी संध्याकाळी तुझ्या आईशी किंवा बाबांशी बोलते. मी म्हणालो शाळेच्या गोष्टी शाळेतच होऊ देत. तुम्ही त्यांना शाळेत बोलवा आणि बोला. आता मात्र त्यांचा संयम सुटत चालला होता. म्हणाल्या जास्त आगाऊपणा करू नकोस. मी संध्याकाळी घरी येऊन बोलले म्हणून काय फरक पडणार आहे? उलट त्यांचाच हेलपाटा वाचेल. मी म्हणालो मग पुढच्या महिन्याची फी मी तुमच्या घरीच येऊन भरली तर चालेल का? बाईंनी माझ्यापुढे हात टेकले अन म्हणाल्या असो मीच तुझा दंड भरते आणि कोणाला सांगत पण नाही. मी त्याला पण नकार दिला. शेवट हे प्रकरण घरी पोचले. आई-बाबांनी मला पाठिंबा दर्शविला. शाळेने सुद्धा दंड आकारला नाही पण या गोष्टीचा निकाल घरी लागल्याची बोच माझ्या मनाला लागून राहीली.
असो.. तुझ्या लेखाच्या प्रतिक्रियेत हे जरा जास्तच लिहिले आहे.. पण राहवले नाही..
-----------
दाद, खरच गं किती छान लिहिलेस?असे ओरखडे बर्याचदा पडतात ग मनावर. अगदी आताही. इलाज नसतो. जे ओरखडे देतात, त्यांना त्याचं काही गम्य नसतं.आपणच काही न घडल्या सारखं वागायचं झालं.
अगदी मनातले
दाद : नेहमीसारखेच मस्त लिहिलेस.. तुझी भाषा वाचणार्याला गुंगवून ठेवते बघ...
आणि त्या वयात दाखवलेले धैर्य पन कौतुकास्पद...
अभी : तुझे वागणे पण अगदी वाखाणण्याजोगे रे...
)
(credit cards ची बिले भरताना आता उपयोगी पडत असेल तुला
असाच एक माझा किस्सा... पण थोडासा वेगळा...
इयत्ता पाचवी विषय इतिहासच...
छोट्या शाळेतून नुकताच मोठ्या शाळेत आलेलो... मी आणि माझा आधीच्या शाळेतला एक जानी दोस्त, दोघे एकाच बाकावर बसायचो.. तसा मी खूप बडबड्या होतो पण तास सुरु असताना बडबड बंद असायची...
एकदा माह्याकडे पेन नव्हते म्हणून मी मित्राला पेन मागत होतो तास सुरु असताना तर त्याने ईतिहासाच्या बाईंकडे भर वर्गात तक्रार केली की मी बडबड करतोय म्हणून... बाईंना शिकवण्यात व्यत्यय आल्यामुळे त्या खूप चिडल्या आणि त्यांनी मला उठून शेवटच्या बाकावर बसायला सांगितले...
तास संपल्यावर सुद्धा त्यांचा राग गेला नाही आणि त्यांनि मला फर्मावले की माझ्या तासाला तू कायमच शेवटच्या बाकावर बसायचे...
अख्या वर्गात बाईनी असा अपमान केल्यामुळे मी अगदी रडवेला झालो होतो...
तेव्हापासून मी माझी जागाच मागे बदलून घेतली ....
पण मुळात बाई मोठ्या मनाच्या होत्या.. रागाच्या भरात त्यांनी मला शिक्षा केली खरी पण वर्षाच्या शेवटी माझी माफी पण मागितली..
"मी समजले तसा तू नाहीस.. खूप शांत आहेस... तुला मागे बसवायला लावून माझे चुकले"
एखाद्या विद्यार्थ्याची भर वर्गात माफी मागायला पण मनाचा खूप मोठ्ठेपणा लागतो तो बाईनी दाखवला आणि माझा त्यांच्याविषयीचा राग लगेच पळून पण गेला..
पण तो मित्र.. तो अजूनही माझा मित्र आहे.. पण त्याने माझ्या मनावर एक ओरखडा उठवलाच... तो हे कधीच विसरलेला असेल पण मी कधीच विसरु शकणार नाही...
http://milindchhatre.blogspot.com
लई
लई भारी....
खुप काही छान छान...
सुरेख
खूप छान उलगडली आहेस विद्यार्थी मनाची उलघाल... मलाही असेच किस्से आठवले शाळेतले १-२, आता ते इथे लिहित बसत नाही, पण ते कधीही विसरता येत नाहीत, हे ही तितकच खर. तुझ्या वडिलांचही कौतुक वाटल, माझ्या आजोबांची आठवण झाली त्यांचा दृष्टिकोण वाचून. आपाल्याला समजून घेणारे वडिलधारे मिळण हे भाग्यच असत, नाही का?
अभि, तुझेही कौतुक वाटले.
नेहमीप्रमाणेच छान
दाद,
नेहमीप्रमाणेच छान लिहिलं आहेस. मी गुलमोहरवर फारसा फिरकत नाही, पण तुझं आणि itGirl चं लिखाण मात्र आवर्जून वाचतो. मनाला कुठेतरी भिडणारं आणि सरळ ओघवत्या भाषेत लिहिता तुम्ही दोघी, म्हणून ते मला जास्त भावतं.
तुझी ही गोष्ट वाचताना माझं मन मला माझ्या शाळेत घेऊन गेलं आणि स्मरणशक्तीला भरपूर ताण देउन सुद्धा अशा प्रकारचा कुठलाही प्रसंग माझ्या शाळेत घडलेला मला आठवला नाही. in fact मी दहावी मध्ये असताना, इतिहासाच्याच पुस्तकाचा एक दुसराच किस्सा घडला होता.
इतिहासाच्या मराठी भाषेतल्या पुस्तकात Republic of India चं भाषांतर "भारतीय संघराज्य" च्या ऐवजी दुसरंच काहीतरी केलं होतं. वर्ष सुरू झाल्यानंतर एक दोन महिन्यांनंतर चुका सुधारलेली नविन आवृत्ती बाजारात आली. तो पर्यंत आम्ही जुनीच पुस्तकं वापरत होतो. इतिहासाच्या बाईंनी वर्गात हे announce केलं आणि सांगितलं की आपण नविन पुस्तकानुसार शिकणार आहोत. सहाजिकच आम्ही दहावी सारख्या महत्वाच्या वर्षात पंगा नको, म्हणून नविन पुस्तक विकत घेतलं. माझ्याच बेंच वर बसणार्या माझ्या मित्राला मात्र घरच्या परिस्थितीमुळे नविन पुस्तक घेणं परवडणारं नव्हतं. त्याने ते तास संपल्यावर आमच्या इतिहासाच्या बाईंना सांगितलं. बाईंनी शांतपणे त्याचं म्हणणं ऐकून घेतलं. दुसर्या दिवशी शाळा सुटल्यावर येऊन भेट म्हणाल्या.
दुसर्या दिवशी शाळा सुटल्यावर आम्ही टिचर्स रूम मध्ये बाईंना भेटलो. त्यानी मित्राकडे त्याचं पुस्तक मागितलं आणि स्वत: त्या पुस्तकात जिथे जिथे म्हणून दुरुस्ती पाहिजे होती, तिथे तिथे ती करून दिली आणि म्हणाल्या " हे घे तुझं नविन पुस्तक. घरी जा आणि भरपूर अभ्यास कर".
अशी होती माझी शाळा आणि शाळेत शिकवणारे सगळे शिक्षक. त्यामुळे तुझ्या बाबतीत घडलेला प्रसंग वाचून मनात आलं .... "
ऐसा भी होता है ???????"
--
अरूण
आदर
शाळेत असताना आपल्या शिक्षकांबद्दल मनात एक अतिशय आदराचं, प्रेमाचं आणि जवळपास आपल्या आई वडिलांच्या नात्याशी बरोबरी करणारं असं अढळ स्थान असतं. त्या स्थानाला असा धक्का बसला तर मनावर ओरखडाच काय चांगला मोठा व्रण आयुष्यभर राहतो.
अरूण, पडवळ बाई होत्या का रे इतिहासाला???
छान..........
खुप छान लिहिलयेस..... नेहेमीप्रमाणे......... वाचताना मलापण जुन्या काही गोष्टी आठवल्या...... वाचताना डोळे भरुन आले होते.........
मनाला भिडलं!
सुरेख लिहिलयस दाद.. त्या कोवळ्या वयात मनावर कधी कधी सर्रकन ओरखडे उठतात!

अभि, तुझे कौतुक वाटले.
मिल्या, तुझ्या बाईंचा मोठेपणाच स्वतःची चूक कबूल करणं म्हणजे.. आणि तुझाही.. की त्यांनी माफी मागितल्यावर तू उगाच कटूपणा मनात ठेवला नाहीस ते.. नाहीतर काही लोक उगाच काही गोष्टी कुरवाळत बसतात
अरुण, वा सही होत्या त्या बाई! आणि शिक्षक असेच असावेत ना.. दादच्या इतिहासाच्या बाईंसारखे शिक्षक imagine करवत नाहीत!
खुप छान
ओघवत लिहिल आहे तुम्ही..... आणी शाळेतला कणखरपणा सुध्दा आवडला........... शाळेतले आनि कालेज (कस लिहायच??) पण घटना आठवल्या.................
:) बालमनाच्
बालमनाच्या कप्प्यात असे कितीतरी ओरखडे आपण सुंदर क्षणांबरोबरच जपून ठेवतो, नाही?
चवथीत असतांना ताप आला होता. मग होमवर्क नाही झाला. विचारल्यावर उभे राहून कारण सांगितले. सरांनी जवळ बोलाविले. ध्यानीमनी नसतांना सणकन गालावर ओढून दिली. अशक्त पणामुळे की बेसावध असल्याने तोल गेला माझा आणि शेजारी असलेल्या बोर्डवर जावून आपटले. खरचटलं. सर निर्विकारपणे दुसर्याकडे वळाले.
इतक्या वर्षांनी हे फक्त तुलाच सांगत्येय.
छान !!!
एकदम ओघवते लिहीले आहेस, या निमीत्ताने परत एकदा शाळा, वर्ग, सगळ्या बाई-गुरुजी, शाळेतले मानापमान आणि बरेच प्रसंग असे सगळे डोळ्यासमोर येवुन गेले.
अगदी
खरच शिक्षकांनी मुलांना घडवायला हवं पण शिक्षकच काही काही विद्यार्थ्यांबद्दल अढी ठेवून वागतात. शाळेचे दिवस आठवावेसे पण वाटत नाही कधी कधी. कारण वाईट अनुभवच जास्त लक्षात रहातात. अर्थात सगळे शिक्षक असे असतात असं माझं मुळीच म्हणणं नाही.
त्यामुळे दाद, मला जाणवला तुझा ओरखडा.
नाही
मंजू,
नाही. पडवळ बाई कधीच नव्हत्या आम्हाला. करंदीकर बाई होत्या.
पूनम,
हो. आमची शाळाच तशी होती चांगली. अपवादात्मक एक दोन प्रकार सोडता, असले कुठलेच प्रसंग आमच्या शाळेत घडलेले मला आठवत नाहीत.
--
अरूण
मन हेलाऊन गेल
दाद,
काही काळापूर्वी तू आपल्या ज्ञानेश्वरीच तत्वज्ञान जगणार्या बाईंविषयी लिहील होतस. ते चित्र आणि हे चित्र दोन्ही परस्पर विसन्गत असुनही तू छान रंगवली आहेस. तुझ लेखन मी नेहेमी वाचते पण आज पहिल्यादाच प्रतिक्रिया देत आहे. बाल मनाची होणारी घालमेल प्रत्येकानेच केव्हा ना केव्हा तरी अनुभवली असेल पण तिला सुरेख रित्या शब्दबद्ध केल्याबद्दल अभिनन्दन.
छान
नेहमी प्रमणेच सुरेख. एक विनंती आहे तुझ्या लिखाणा बरोबर माझी 'सुरेख' अशी प्रतिक्रिया तुच टाकत जा
by default
छान
नेहमि प्रमाणेच छान...........
सगळ्या शाळेतल्या गोश्टीची आठवण झाली.
मस्त
दाद, खुपच वाईट अनुभव आणि खुपच छान लिहीलास. खरच ओघवती भाषा
लिहिलंस तर
लिहिलंस तर छानच आहेस पण एकदम एक जखम भळभळली...
पुण्यामधे मुलींच्या मराठी शाळांमधे शाळेचा फोकडान्स ही एक फार मोठी गोष्ट असायची. पहिल्या बक्षिसाची चांदीची परडी हुजूरपागा, अहिल्या किंवा रेणुका अश्या शाळांच्यात फिरत असायची. त्यातही आमच्या शाळेकडे म्हणजे हुजूरपागेकडे जास्त. त्यामुळे शाळेचा फोकडान्स ही महत्वाची बाब असायची. साधारण जुलै ऑगस्ट मधेच निवड आणि तालमी सुरू व्हायच्या.
नाचायला तर काय पहिल्यापासूनच आवडायचं त्यामुळे ५वीत असताना ठरवलं यावर्षी जायचंच. स्वत:च्या नाचाबद्दल खात्री होती नक्की. निवडीची नोटीस लागली, अमुक तमुक आणि तमुक बाईंना भेटा म्हणून. मी गेले एका तमुक बाईंना भेटायला. वय वर्ष ९, उंची बरी पण पाप्याचं पितर, केस हे एवढे लांब, त्याच्या दोन वेण्या त्याही वरती बांधलेल्या. अर्थात बर्याचश्या मुली अश्याच असायच्या. बाईंना विचारलं की मला पण यायचंय म्हणून तर बाईं हसल्या आणि सरळ म्हणाल्या "आम्ही फक्त सुंदर मुलींनाच घेणारोत!" आजूबाजूच्या २ मुली फिसकन हसल्याचंही आठवतंय. सगळा दिवस मी स्वतःला लपवत फिरत होते. पण हे घरी सांगण्याचीही हिंमत झाली नाही का कोण जाणे. हल्ली हल्ली कधीतरी आईला सांगितलं होतं.
आणि त्यात आमच्या नातेवाइकांनी भर घातली. आई माझी सुंदर, तर ही तुझी मुलगी? असं सगळे बघायचे माझ्याकडे आईने ओळख करून दिली की. बिचारी माझी आई पण कळवळायची यामुळे आणि मी अजूनच आक्रसून घ्यायचे स्वत:ला. नंतर पुढे कैक वर्ष दिसायला सुंदर नसण्यामुळे गिल्टी वाटून घेत घालवली. एकुणातच कॉन्फिडन्स कमी पडायचा कित्येक वर्ष. आजही पटकन अनोळखी कुणाशी बोलायला सांगितलं की एक क्षण स्वत:चा चेहर्याचा विचार येऊन बाचकायला होतं.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
दाद, अतिशय
दाद, अतिशय सुंदर लेख. तुझ्या हिंमतीला सलाम ! आणि तुझ्या आई वडीलांना पण. अतिशय धैर्यानं सामोरं गेलात तुम्ही या प्रसंगाला. वर्षभर इतका मानसिक ताण सहन करणे खूपच कठीण आहे.
एक किस्सा. हे माझ्या बाबतीत घडलेलं नाही पण आठवलं वरचं सगळं वाचून. शाळेत एक चित्रकलेच्या बाई होत्या. वर्गात एक मुलगी होती जिला ३ मोठ्या बहीणी होत्या, त्याही याच शाळेत शिकून गेलेल्या. तर ही पाचवीत आली तेव्हा या बाई पहील्या दिवशी ओळख करुन घेताना तिचं आडनाव ऐकून म्हणाल्या "अगंबाई, तू त्या xyz ची बहीण का ? अरे बापरे, बरीच मोठी लाईन आहे की तुमची ! अजून किती आहेत तुझ्या मागे ? " ... नवीन शाळा, नवीन मुलींदेखत अश्या अनपेक्शित प्रकारे बाईंनी उपहास केल्यामुळे तिची काय अवस्था झाली असेल ? शिवाय या गोष्टित त्या बिचारीचा काय दोष ? पण वर्षानुवर्षे असे ओरखडे मुलांच्या मनावर शाळेत उमटतच असतात. कधी शिक्षकांकडून तर कधी वर्गातल्याच इतर मुलामुलींकडून.
दाद...... छान
दाद...... छान लिहिलं आहेस गं !
राहवून भावाच्या मोबाईलला फोन लावलाच, 'अरे, नंदू परवा....त्या कोणतरी बाई खडूस आहेत म्हणत होता ना?... लक्ष ठेव रे. उगीच कसलंतरी ओझं घेऊन वावरेल पोर..... खंबीर व्हायला सगळं आयुष्य आहे रे, पुढे!'
........... हे वाक्य अगदी हलवून गेलं गं...!
दाद! मस्तच
दाद! मस्तच लिहिलंस! नववी दहावीच्या वयात स्वतः "खंबीर" असण्यापेक्षा आपल्यामागे कोणितरी खंबीरपणे उभे आहे हा आधार जास्त महत्वाचा असतो. 'आणि 'खंबीर व्हायला सगळं आयुष्य आहे रे, पुढे!' अगदी बरोबर!
बोले तो
बोले तो सलाम!!!!
बाईंना मुल्य शिक्षणाची गरज कळत नव्हती का?
हे वाचलच
हे वाचलच नव्हतं मी. छानच लिहिलं आहेस. शाळेत असताना शिक्षकांचं एक वेगळच स्थान असतं ना आपल्या मनात. आणि अचानक हे असं कोणी वागलं की खूप वाईट वाटतं. तुझ्या आई-बाबांचं ही कौतुक. त्यांनी संयत हातळले सगळेच.
अज्जुके, माझी आई तर आई दोन्ही ताया पण छान दिसायला, एकुण व्यक्तीमत्वही हुशार, हरहुन्नरी. आम्ही एकाच शाळेत शिकलो. त्यामूळे मी चित्र-बित्र न काढणारी, नाचता न येणारी, कुरुप मुलगी आहे हे दिसायचं सगळ्यांच्या डोळ्यात
त्यातल्या त्यात वर्षाखेर निकाल त्यांच्या सारखा यायचा त्यामूळे थोडी तरी लाज राखायचे 
छान ,आवडल
छान ,आवडल
नि:शब्द
नि:शब्द कोलाहल. !!!
you may meet me in details at ....... www.layakari.com
I am here too in part ..... http://adnyaatvaas.blogspot.com
धन्स, रे
धन्स, रे सगळ्यांना.
दाद अगदी
दाद
अगदी टचिन्ग लिहिल आहेस. कोवळ्या वयातल्या ओरखाड्यांचा व्रण खूप काळ मनावर रहातो.
Pages