स्पर्धा-२ (उर्वरित)

Submitted by दाद on 6 January, 2008 - 17:28

स्पर्धा-२ चा आधीचा भग इथे आहे - http://www.maayboli.com/node/940
****************************************************
कावळा त्याच्या टवळ्यांना घेऊन खोलीत शिरला. नॉर्मली कावळ्याच्या वतीने त्याचे टवळेच बोलतात. सगळे मराठीच आहेत पण एकदम बॉलिवूड स्टाईल.
'अपने गुरूका कितवा है?', त्यातलं एक घुबड बोललं.

'काय कितवंय? काय? हा गातोय?.... आय मीन, काय गातोय हा?', मी धीर करून विचारलं. वासलेल्या तोंडाने बोलणं खूप कठीण असतं.
'तिला म्हणायच, हा काय गातोय?' वश्याने त्याच्यामते मला सुधारलं.

'मला 'उज्वला, ये ना' म्हणायचं होतं', कावळ्याच्या तोंडचं अख्खं वाक्य ऐकणं म्हणजे अरेबियन नाईट्स मधल्यासारखं सुरस आणि चमत्कारिक वाटत होतं.
ह्याचं बोलणं अरेबियन नाईट्स तर गाणं काय? 'विक्रम आणि वेताळ'?, मी मनात म्हटलं. पण मोठ्ठ्याने आम्ही अजून गप्पच.
'उज्वला, ये ना' असं गाणं आहे?' शेवटी वश्याला वाचा फुटली.

'नाही. ओरिजिनल 'अश्विनी ये ना' असं आहे. उज्वलाच नको म्हणाली म्हणून ओरिजिनल अश्विनी येनाच म्हणणार आहे.' कावळ्या.
'आणि ते... हे.. त्या हिला... आपल्या अश्विनी शुंगारपुरे आणि तिच्या त्या ह्याला... तो भास्क्या... त्यांना चालणारंय?' वश्याने आवंढे गिळत विचारलं.
'उज्वलाला चालणारय.', कावळ्या.
'अश्विनी अऊर भास्क्याको हॉलके बाहेरच अटकके ठेवताय, मगतर चलेगा की नही?', एक धिप्पाड गिधाड.

'पण आणि शिवाय ते ड्युएट आहे. दोगांनी गायचं.', कावळ्याला ड्युएट म्हणजे काय ते समजावून सांगत वश्या पुढे बोलला,'म्हंजे दुसरी पोरगी हवी गायला, पोरेलोक चालणार नाहीत'.

'ते पेटीवर वाजव. त्या वरच्या चिरक्या बटणांवर....' म्हणजे कुठे ते पेटीवर दाखवत कावळ्याने गायला सुरूवात केलीही.

'पण त्ये दोगांचं येकदम असताना, मी कोण? म्हंजे तू पोर्गाच ते सोडुन सोड.... पण मी पोर्गी की पोर्गा? त्ये चिरकं वाजवायचं का तुला साथ करायची? काय ते तू सांग. तू निकाल देशील तसं. आपलं काय, तू सांगशील तसं वाजवणार... पोरी म्हंट्ला, पोरी, आणि काय म्हंटला तर त्ये....पण येकाचवेळी काय दोगं दोगं...', वश्या कावळ्यावर कावूनसुद्धा न कावल्याच्या अविर्भावात चिवचिवत म्हणाला!

'आयला पॉईंटय!', कावळ्या कधी नव्हे ते विचारात पडलेला दिसला. खर्‍या कावळ्यासारखा एक डोळा तिरकाही झाला.

'सोड च्यायला.... तू पोरगीच.', कावळ्याने वश्याचा निक्काल लावला.

'पण ती....' वश्याने प्रयत्नांना सुरूवात केली पण आपल्या तोंडातून अजून एकच अक्षर आणि कावळ्या आपल्याला पणतीसारखा पेटवेल हे लक्षात आल्यावर गप्प बसला.
वर आणखी जाताना, 'तिकडे माज्या तोडिस तोड आवाज यायला पायजे हा तुज्या पेटीतल्या पोरीचा' असं बजावून गेला कावळ्या. मग एकेक करत खुन्नस देत, 'अच्छाच बजानेका, क्या?', असलं बोलत, वेगवेगळ्या पोजेसमध्ये हातांची वेगवेगळी बोटं दाखवत त्याचे टवळे गेले.

'माझी बस चालती ना, तर.....' वश्या त्यांचं ऐकून हिंन्दित चिडला पण बोलला मराठीतच.

क्रमश:
******************************************
इतक्यात सेक्सोफोन, कब्बास, कोंगो, इलेक्ट्रिक गिटार असलं घेऊन सहा पुरुष माणसं, ते वाजवणारी पाच-सात अजून पुरुष माणसं, त्यांची बायामाणसं आणि एक मुलगी असा लवाजमा खोलीत शिरला आणि जागा पकडून उभा राहिला.
आज मी जरा लिपस्टिक लावली, म्हणून 'काय? रंगरंगोटी? खास काय?' म्हणणार्‍या वश्याला मी मगाशीच 'मेकप' म्हणजे काय ते दाखवलं होतं...... हीच ती.
'मेकप? ह्या मेकपच्या थरातून येक गणपती नाई तरी किमानपक्षी येक ऊंदीर तरी होईल. किती भडक्क! किती भडक्क मेकप! हे आपलं बाबा जाहीर मत्त', वश्याने आपलं मत्त तेव्हा जाहीरपणे कुजबुजत मला ऐकवलं होत.

तीच आता एक अख्खा बाबला ऑर्केस्ट्रा घेऊन आली होती!

'तुम्ही तुमचे साथिदार आणल्येत का? चालेल. वा वा!', मी पळायचा प्रयत्नं केला.
'नाय नाय, ते काय आपलं उगीच, टुय टुय, टॉय टॉय. पेटी, तबलाच खरा बघा. काय मनाला लावून घेऊ नका. तुमी वाजवा... जरा हळू वाजवा म्हणजे झालं.', लीडरसारखे दिसणारे, हातात कब्बास घेतलेले... ते नाचवत, त्याचा खिस्स-फिस्स आवाज करीत म्हणाले.

'अवो, पण साथीला एकूण तीनच वाद्य लावता येतात.' वश्याने संस्थेच्या नियम क्रमांक नऊ वर बोट ठेवलं.

'....आणि इलेक्ट्रिक गिटारला वरती सप्लाय नाहीये वगैरे वगैरे.... ते सगळं झालय. मगाशीच तुमच्या व्यवस्थापकांशी बोलून झालय. संस्थेच्या लिखित नियमाप्रमाणे "स्टेजवर" तीनच वाद्य असतिल.', खिसफिसणारा कब्बासवाला पोचलेला दिसला.

'मग? बाकीची?', वश्या. त्याला मी डोळ्यांनीच झापला. उगीच नाही ते आपल्या टकलावर कशाला घेतोय? तरी तो अजून पुटपुटतच होता.

'बाकीची तिथेच स्टेजच्या डावी-उजवीकडे..... सॅक्सोफोन मात्र तिसर्‍या रांगेत मध्ये.... नीट ऐकू जायला हवा.', पुन्हा कब्बासधारक.

'तिसर्‍या रांकेत म्हंजे? प्रेक्षकात?', वश्या किती बावळट प्रश्न विचारू शकतो.... त्याला तोड नाही. रोज एक नवीन विक्रम असतो त्याचा.

'नाव काय'? मी मुलीला विचारलं.

'वासंतिका भडकमकर', मुलीचा आवाज मेकप इतका भडक नाही वाटला.

'भड्क्मकर.... भड.. कम.. कर.... भडक्क... मकर..... भडक्क.. मेक..' चार्टवर तिचं आडनाव शोधता शोधता वश्याने भलत्याच दलदलीत पाय घातला होता.....
"वासंतीका का? वा वा छान नावय....." मी मध्येच बोलत, आपला जमेल तसा त्याला ओढायचा प्रयत्नं केला.

"वासंती काका काय? वासंती "काका"? "मावशी" पण शोबणार नाई. पोरगी केवडी....", वश्या एका दलदलीतून दुसर्‍या खाजणात पडला.... "हा. सापडलं. काय गाणार?"

"येऊ कशी" वासंतिका जरा पुढे सरत म्हणाली.
"कशा येता? या की. चालतच या. अश्शा. सगळी तुमचीच माणसं. आमची थोडीच? तिकडून निघा येकदाच्या आणि लवकर पोचा इथे म्हंजे झालं....", वश्या सुटला होता नुसता, तिरका.

"टिक्का, 'येऊ कशी' म्हणणारय", त्या टिक्काची अख्खी तंदुरी माऊली किंवा मावशी बोलली.

"त्ये? त्येला काय करायचं तुमचे त्ये सेक्सी फोन, आणि झालच तर त्ये झंपाक झंपाक?" कब्बासधारक काही खिस-फिसायच्या आधीच वश्या बोलला, "ब्बास का राव? आता आमी तुमाला सांगायचं? अवो, येक टांग टांग टांग टांग वाजवायला ढोलकी हवी.... "

"न्ह्येमि चराया तुमची घायीऽऽऽऽऽ...."
वश्याने ती गाणं विसरली असल्यास त्याची सुरूवात म्हणून दाखवत, गुढग्यावर बोटं चालवून ढोलकी म्हणजे नक्की काय ते अख्ख्या बाबला ऑर्केस्ट्राला दाखवलं.

टिक्काने धक्का दिली, "ते नाही. येऊऽऽऽऽऽ कशी प्रिया!" आणि मागे तत्परतेने सॅक्सोफोन वाजला 'टॅऽऽ रॅ डॅरॅडॅरॅडॅऽऽऽऽ'

"त्ये होय?" म्हणायचं सुद्धा सुचलं नाही वश्याला. वश्याने एव्हढं अगाध ज्ञान पाजळल्यावर टिक्का आणि बाबला आणि कंपनीने दुपारच्या सत्रात फद्या आणि वर्तक बरोबर गायचं ठरवलं.

*******************************
एकेक करून येऊन प्रॅक्टिस करून जात होते.
कलिका ठोंबरे नावाची एक, दोन वेण्यांवर दोन गजरे, फुलाफुलांचा पंजाबी.... 'मी आज फूल झाले' म्हणत होती.

वश्या कसा कुठे घात करेल, सांगत येत नाही. आमच्या संस्थेच्या स्पर्धांमध्ये आम्ही कुणालाच नाही म्हणत नाही.... म्हणू शकत नाही. बोबडं बोलणार्‍याने गावं का? तर गावं, जरूर गावं. पण असा कुणी 'घनश्याम सुंदरा' म्हणत असेल तर त्याला कितीही भूपाळी आवडत असली तरी, 'अरे जरा उडती भूपाळी म्हण, तुज्या आवाजाला फिट्ट' असं म्हणून 'सांगा मुकुंद कुणी हा पाहिला' म्हणायचं सुचवेल का? तर वश्या असले किरकोळ आणि घाऊक अचरटपणा करण्यात प्रवीण आहे.
'सांदा मुतुंद तुणी हा पाहिला.... दोपी आळविती....'

जयसिंग मराठे नावाचा वीर का वेडा, 'वेडात मराठे वीर दौडले सात' म्हणत होता. म्यानातुन उसळे ला लागलेला 'सा' धृवपदाची दौड पूर्ण होईपर्यंत हरवत होता. वश्या आणि मी, धावतोय आपले त्याच्या मागे.... आठवे आणि नववे वेडे बनून.

नाट्यसंगिताच्या वेळी 'आमची घेता का?' विचारणारी ललना परत एकदा येऊन मान वेळावत, वेळावत, 'सपनातिल्या किळ्यांन्यो उमल्यू निकाची किंवा' म्हणून गेली.
'पट्टी कोणती म्हणली त्या सपनातल्या केळ्यांची?', तिला वा वा करण्यात, तिने सांगितलेली पट्टी वश्या विसरला होता.
'गुलाबी सव्वा सोळा', मी वचपा काढला.

ह्या प्रॅक्टिसेसच्या शेवटी शेवटी जऽऽरा वेळ मिळाला तसा वश्याने बॉम्ब टाकला, 'तुला आधीच सांगतोय मागुन वैतागशील.... आमचे वस्ताद आजपण गातायत.'

'कोण? ते? पंचतुंड नर रूंद मान धर?', मला हसावं की रडावं ते न कळूनही प्रतिक्षिप्त क्रियेसारखं हसूच आलं.
'त्यांना त्ये फद्याचं बुळबुळीत वाजवल्येलं काय पसंत पडलेलं नाही... तूच वाजवायचं म्हणतायत.' वश्याने आता खरा नेम धरून बॉम्ब टाकला. आत्ता मला नक्की कळलं... हसावं की रडावं, ते.

'आणि त्ये 'वेडात मराठी वीर दौड्ले सात' म्हणतायत......' वश्याने शेवटचा घाव घातला.
'म्यानातुनं उसळे' वगैरेला त्यांचा अभिनय.... नुसत्या कल्पनेनेच मला आत्ताच हसू यायला लागलं होतं. आणि हे न हसता वाजवायचंय ह्या कल्पनेने आत्तापासूनच पोटात बाकबुक व्हायला लागलं.

एखाद्याच्या गाण्यांच्या निवडीला किती नाट लागू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे वैशाली चिंचणकर. तिला सगळे चुनचुनकर म्हणायचे.... अतिशय "निवडक" असायचं तिचं सगळं.
पहिली निवड-
'क्षणभर उघडी नयन देवा...'
नको.... मोहन देव, ते यंग, हॅंडसम, डोळे मिटून गाणं ऐकतात... ते तीन परिक्षकांपैकी एक आहेत. त्यामुळे देवाची गाणी बाद. बरीचशी कृष्णाची गाणी शक्यतो नकोत.

'मला हे दत्तगुरू दिसले....'
नको! तिन्ही परिक्षक पुरुष आहेत.

'रामा रघुनंदना...'
नकोच. दुसर्‍या परिक्षकांचं नाव रघुनंदन पाचोळे.... रामाची, रघु नंदना वगैरे गाणी शक्यतो नकोत. आणि हो! ते 'पाचोळे आम्ही हो पाचोळे' ही नको (इती वश्या. ती काय म्हणत नव्हती, ते गाणं)

'रिमझिम पाऊस पडे सारखा....'
पुन्हा गेला मोहन कुणीकडे? ते तिकडे समोरच बसल्येत, देवासारखे, डोळे मिटून!

तिने 'चुनचुनकर' निवडलेली सगळी गाणी एकामागोमग एक बाद झाली. तिला भक्तिगीतच गायचं होतं. मग तीनशेचौदा चौकशा करून तिने 'मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश' म्हणायचं ठरवलं...... तो पर्यंत प्रॅक्टीस करायची वेळही संपत आली.

त्यातली दुसरी ओळ ती गाताना, वश्याने कपाळावर हात मारला आणि मोठ्ठा हशा पिकल्यावरच लक्षात आली.... 'माझ्याकडे देव माझा पाहतो आहे'!

वश्याचे गुरूबंधू, रूंद मानवाले, परवाचे अफझलखानसाहेब जरा उशीरा आले... आणि तडक स्टेजच्या मागेच भेटले. जयसिंग मराठेने केलेला सात वेडेपणा बघुन त्यांनी आयत्यावेळी गाणं बदलायचं ठरवलं.

ते एकाचवेळी माझ्या आणि वश्याच्या कानात आपल्यामते कुजबुजत होते.
'त्ये मगाचं 'वेडात मराठे वीर'? काय दौड्ले नाय बरोबर.... गाण्यात भाव दिस्ला नाही वो... त्ये म्हंजे मर्दानी गाणं... उग्गीच आपलं भेंडी चिरल्यासारखं बुळू बुळू म्हंटला तर कसं चालेल? पण त्यांनी म्हंटला म्हणताना आपण पण त्येच कसं म्हणणार, म्हणतो मी....
बऽऽऽरं, 'माझा घाव तुजे चरणी.....' आपलं पंडितजींचं अबंग हो! म्हणू म्हणता?....'
'अहो, माझ भाव... भाव तुझे चरणी' असं आहे ते', मी कुजबुजत जितका 'भाव' दाखवता येईल तितका दाखवला.
'ते तुमच्या शब्दाचं काय म्हत्वं नाय आपल्याला. भाव हवा भाव गाण्यात.... आता तुमी म्हंटा 'भाव' तर 'भाव'... काय वास्द्येवभाव?'

'तोंड्पाठ कोणचं आहे? ते लिहून काढा, आमाला दाखवा आणि मग म्हणा.' वश्या अंग चोरत पण जरा जरबेतच म्हणाला.
'हे घ्या! काय रागाला येऊ नका तुमी, वास्द्येवभाव.... घ्या. लिहुन आणलो एक दोन-पाच गाणी. तुमी असलं कायतरी झ्येंगट काडणार... आमाला ठाऊक होतच. घ्या', असं म्हणून त्यांनी दोनशेपाच गाण्यांचं एक बाड वश्याच्या हातात ठेवलं. पहिल्या पाच पानात त्यांना झेपेल असं एक निरुपद्रवी गाणं मिळालं आम्हाला. ते त्यांच्या हातात दिलं.

ह्यांनी माईम आर्टिस्ट म्हणूनच खरतर काम करायचं. कमीतकमी आम्हाला साथीला तरी बसावं लागलं नसतं.

'आकाशी झ्येप घेरे पाखरा...'
पाखरू उडतानाचे हातवारे. दोन्ही पंजे अंगठ्याकडे गूंतवून एकदा पक्षी उजवीकडे उडत होता आणि एकदा डावीकडे.... दिशाहीन.

सोडी सोन्याचा पिंजरा.... तोडी सोन्याचा पिंजरा.... मूळ गाण्यातलं एकदा 'सोडी' म्हणून झाल्यावर मग आपल्यापद्धतीने तोडफोड करायला सुरूवात. हातवार्‍यांसह, तेसुद्धा. सोन्याच्या पिंजर्‍याचे एक घाव दोन तुकडे! घ्या!

तुज भवती वैभव माया.... आजूबाजूचे माईक, त्यांच्या वायरी, लाईट्स, इतकच काय पण परिक्षक, प्रेक्षक सुद्धा मायेत जमा झाले.
फळ रसाळ मिळते खाया....
सुखलोलुप झाली काया...

भयानक विनोदी... भयंकरच विनोदी! डोळे मोठ्ठे करून... फळाचा रसाळपणा.... खाण्याची ऍक्शन, सुखलोलुप होऊन शहारलेली काया वगैरेने परिपूर्ण....

'भाव'पूर्ण गाणं!

समोरच्या देवांना डोळे उघडायला लावले. प्रसन्न वदने तिन्ही परिक्षक आधी मिशितल्या मिशीत आणि मग पोट धरून हसत होते.
अगदी पहिल्याच ओळीपासून प्रेक्षकात खळबळ उडाली... कुजबुज, खसखस, शेवटी हशा, शिट्ट्या, टाळ्या...
असलं मनसोक्त गाऊन पैलवानांनी आखाडा सोडला...... पडदा पाडूनच पहिलं सत्रं संपवावं लागलं.

पडद्याच्या मागे परत एकदा वश्याला आलिंगनात अधांतरी धरून अफझलखान अत्यानंदाने म्हणाला, 'काय, आपले परिक्षक खुष काय नाय? ऑ? प्रेक्षक काय आपल्याला सोडायला तयार नाय बगा.... शिट्ट्या काय टाळ्या काय... वन्स्मोर घ्येतला, सोडा तुमी.... त्या सात दौडीपेक्षा ही येकच झ्येप झक्कास होती.... तुमी गाणं सांगितला त्ये येक बरं केलास बगा....!'

मुळापासून गदागदा हलवलेला वश्या जमिनीला टेकला तेव्हा खिळखिळा झाला होता.

'बरं निक्कालाच्या दिवशी भेटूच... राम राम!' असं म्हणून पैलवान चालू पडले.

समाप्त

गुलमोहर: 

कसल जबरी लिहिल आहे!
तो "पंचतुंड नर रूंद मान धर" चा उल्लेख आला त्यावेळी तर गरागरा गोल फिरुन हसणारे रावणासारखे १० स्माइली लावले तरी माझाच नं लागला असता हसण्यात Happy
इकडे ते हसणारे स्माइली दिसत असते तर स्माइलींची माळच लावली असती. दुसरी काही प्रतिक्रिया शक्यच नाही. Happy

दोन वेण्यांवर दोन गजरे, फुलाफुलांचा पंजाबी.... 'मी आज फूल झाले' , घाव चरणी, 'भाव'पूर्ण गाणं :):):):)
<< हसून हसून संपले मी!
पुढची स्पर्धा कधी? Happy

बापरे बाप! काय अफलातून सुटली आहेस दाद! :))))))))
'टिक्का' एपिसोड खतरा जमलाय..
एकदम मस्त!
त्या वश्याला भेटायला मिळेल का? Wink

नाही, दाद नाही. तू एवढ्यात समाप्त करूच शकत नाहीस. अजून लोकगीत, शास्त्रीय संगीत, भक्तीगीत स्पर्धा बाकी आहेत.

स्पर्धा २ मध्ये 'बाबला ऑर्केस्ट्रा' , 'दलदल - खाजण' , 'टीक्का' , 'अफझलखान- वास्द्येवभाव' , 'फूल' सगळं सगळंच खास आहे.

कसल जबरी धमाल लिहिलय!! Happy आज ऑफिसमधे अगदी वैताग पूर्ण दिवस होता, पण आत्त्ता हे वाचून अगदी हा हा ही ही !!!! Happy Happy खूप हसले अन बर वाटल तुझ्यामुळे Happy धन्स ग!! Happy लिहित रहा अन आम्हाला असच वाचायला मिळूदेत!:)

'माझी बस चालती ना, तर.....' वश्या त्यांचं ऐकून हिंन्दित चिडला पण बोलला मराठीतच>>>>>>>>
स्वप्नातल्या किळ्यांनो काय..>>
दोन वेण्या दोन गजरे...सगळच जबरी...
हसुन हसुन पोट दुखल की वो !..म्हन्ते मी..काय समजले!!

आभार सगळ्यांचेच.

हे सगळं कल्पनेतलं. हा आपला वश्या बेळगाव्-धारवाड कडला पण वश्या खरा नाही. त्यामुळे भेटायचं झाल्यास असाच भेटावा लागेल.... इथे तिथे... मायबोलीवर Happy
नाट्यसंगिताच्या स्पर्धेत वश्या फारसा बोललेला नाही. इथे मात्रं सुटलाय भन्नाट, त्यामुळे तिथे शुद्द आणि इथे....
...असं वाटण्याची शक्यता आहे.
असो. परत एकदा आभार.
अजून काही स्पर्धा झाल्याच तर तुम्हाला कळल्याशिवाय रहातिल म्हणता?

आधीच्या स्पर्धेचा हा भाग पण जबरा आवडला.
कटाची आमटीपण आवडली होती.
- अनु

यार तु बेळगावाकडली आहेस काय ?? लै भारी लिहीलस ... परत १दा लंप्या , शारदा संगीत विद्यालय .. जमखंडीकर .. सरस्वती केरुर वगैरे लोकं समोर आली ..... बेस्स्स्स्ट !!!!

दाद सही लिहीलंय गं दोन्ही. पंचेस जबरदस्त नेहमीसारखेच. तुझ्या विनोदी लिखाणाचा सगळ्यात मोठा पॉईंट म्हणजे विनोदाची एकही जागा तू सोडत नाहीस आणि कितीही क्लिष्ट विनोद होऊ शकत असेल त्या जागेवर, तरी तो तू बरोबर सोपा होईल अशी खबरदारी घेतेस. फार अवघड आहे हे खरंच.
नुसती त्या पंचला वा अशी दाद जात नाही तर खदखदून बाहेर येतेच. Happy
लिहीत रहा बाई.

खरच दाद द्यायला काहि शब्दच नाहित, हसून हसून लोटपोट.
दाद मला तुमचे लिखाण अगदि मनापासून आवडते,अशाच लिहित रहा.

शलाका, तुफान हसले गं... काय लिहितेस तु!!
'सपनातल्या केळ्यांची पट्टी'.......... सही है!!

अरे काय लेखन आहे....

'सांदा मुतुंद तुणी हा पाहिला' Happy Happy Happy Happy

लिहीत रहा (यापुढे ऑफिसात तुझे लेखन वाचणार नाही मी)

'परदेसाई' विनय देसाई

Sorry .... Marathi madhe typing ajun jamat nahi ... (mhanunach far kami comments lihito) pan bhawana pohanchatil ashi asha karao...
Daad ... Tumachya likhanala daad dyawi tewadhi kamich ahe....
Itake diwas tumach likhan satat wachun ... me ata tumacha FAN / rasik wachak zalo ahe....
Katha, Vinod ani Lalit ashya sarwa thikani tumhi dhamal udawun deta....
Wyakti chitran, prasang chitran ani bhawana chitran ashya tinahi prakarat tumacha zabardast hatkhand ahe...
Ani mhanunach tumach kuthalahi likhana manapasun asat ani te apratim hota....
Sagalyat shewati ani ati mahatwacha mhanje ... itaka surekh wachayala dilyabaddal SHATASHA ABHAR
THANK YOU.

दाद तुम्हाला दाद द्यावी तितकी थोडी आहे. स्पर्धेचे आणि त्यातील विविध पात्रांचे चित्रण अतिशय बहारदार पद्धतीने आपण केलेले आहे.
हल्लीच्या भाषेत म्हणायचे झाले तर "फुल्टु धमाल" आली.

परत एकदा आभार सगळ्यांचे.
अरे, नुस्तं हेच नाही तर मागलंही कुठचंतरी वाचून तेही आवडल्याचं कळवताय... अजून काय हवं?
नक्की हवं. अजून एकच हवं - आवडलं नाही तरी सांगायचं. कारण त्याविना शिकणं होणार नाही.

मी मुंबईची. पण संतांचा लंपन मनात आणि डोक्यात जाऊन बसलाय.... मॅडसारखा.
संकेत, इंग्रजीत का होईना पण लिहून मला कळवण्याची धडपड अगदी भिडली. मनापासून धन्यवाद!

परत एकदा thanks heaps!