मी आणि श्रावण..

Submitted by प्राजु on 28 July, 2009 - 14:35

श्रावण सुरू झाली की, घराघरांतून नॉनव्हेज, अंडी, हेच नव्हे तर काही घरातून कांदा-लसूण सुद्धा हद्द्पार होते. आमच्या घरी कधी श्रावणाच अथवा चातुर्मासाचं स्तोम माजलं नसलं तरी माझी आजी मात्र श्रावण पाळायची. पाळायची म्हणजे कांदा-लसूण खायची नाही. आणि श्रावणात होणार्‍या एकेका सणाची चर्चा सुरू व्हायची.

कोणा नवविवाहीतेची मंगळागौर. श्रावणातला सोमवार म्हणजे मंगळागौरीच्या आदलेदिवशी केलेली शिवलिंगाची पूजा. आणि मग उपास. घरात आजी उपास करायचीच सोमवारी तिच्यामुळे खिचडीसारखा अद्वितिय आणि अवर्णनिय पदार्थ दर सोमवारी मिळायचा खायला. शिवाय आजूबाजूला कोणी ना कोणी नवविहाहीता असायचीच त्यामुळे मंगळवारी सकाळी तिच्या मंगळागौरीच्या पूजेला जायचं . पूजा चालू असताना तिथे होणारा मंत्रघोष, श्री सूक्त आणि एकापेक्षा एक सुंदर आणि सुगंधी फुलांनी होणारी मंगळागौरीची पूजा बघायची. सगळं वातावरण इतकं प्रसन्न... त्या पूजेला बसलेल्या सालंकृत नवविवाहीता... !! पूजा झाली की, त्या मंगळागौरीला सजवायचं वेगवेग्ळ्या फुलापानांची आरास, भोवती रांगोळी.. तिथेच बाजूला प्राजक्ताच्या फुलांनी शिवलिंग बनवायचे. तिथे पुरणाचं जेवण, सांडगे पापड, सुरळीची वडी.. असं सगळं हादडून मग दुपारी जरा जडावल्या पोटाने सुस्तावायचं आणि मग संध्याकाळ्च्या आरतीची तयारी. संध्याकाळी जेवायला मूगाच्या डाळीची खिचडी, वाटली डाळ, टॉमॅटोचं सार, शिरा.. शिवाय तळण. इतक्या वेळेला घरात मूगाच्या डाळीची खिचडी होते पण .. ही मंगळागौरीला संध्याकाळच्या जेवणात असणार्‍या खिचडीसारखी कध्धीच होत नाही. आणि मग नंतर सुरू होतो सकाळपासून ज्याची वाट पहात असतो तो कार्यक्रम म्हणजेच.. मंगळागौर जागवण्याचा कार्यक्रम. इतकी गाणी, इतके उखाणे, इतके खेळ... इतक्या फुगड्या... एकापाठोपाठ बसफुगडी घालत जाणे.. झिम्मा.. त्यातली ती माहेर कस्सं छान आणि सासर कसं कजाग.. हे सांगणारी गाणी.. आणि मग सगळे खेळून दमले की, मग अंताक्षरी म्हणजेच गाण्याच्या भेंड्या. तो धुंद झालेला माहोल कधीच संपू नये असं वाटायचं. दमून भागून रात्री झोपलं की, सकाळी उठून उत्तर पूजा.. आणि मग थालीपीठाचा खमंग नाष्टा. हा झाला श्रावणात अतिउत्साहात चालणारा एक सोहळा. बाहेर ..श्रावणामासि हर्षा मानसी हिरवळ दाटे चोहीकडे.. असा माहोल तर घरात असा खळाळणारा प्रसन्न सोहळा. नक्की काय सुंदर हे सांगणं कठीण.

घराच्या गच्चीतून नुसती नजर टाकली तर लांबवर... नाजूक हिरवट रंगाची लुसलुशीत हिरवळ दिसावी आणि अंगणात पोचावं तर ओलेत्या जमिनीवर प्राजक्ताने पांढर्‍या शेंदरी रंगाचा गालिचा अंथरलेला असावा. मागे बागेत जावे तर जास्वंदी ऐन यौवनात लाल बुंद झालेली असावी आणि स्वस्तिकाचं फूल उगाचच निरागसपणे त्या उंच गेलेल्या जांभळाच्या झाडाकडे बघून ओलसर हसत असावं. आळवाच्या पानावर पावसाने मोत्याचा खजिना साठवलेला असावा आणि पिवळ्सर, लालसर मध्येच डाळिंबी रंगात कर्दळी न्हात असावी. श्रावणावर या सर्वांचं फार फार प्रेम आहे की श्रावणाचं या सर्वांवर? असं वाटल्यास आश्चर्य वाटू नये. थोडं पुढे जावं तर ओल्या मातीत चांदण्या पडल्यासारख्या दिसाव्यात.. हे काय म्हणून पहावं तर नारळाच्या तुर्‍यातली फुलं निखळलेली दिसावी. किती पहावं आणि किती नको.. एका बाजूला निशिगंध उन्मत्त , मदमस्त आपल्याच गुर्मित उभा असावा ..तर एका कोपर्‍यात थोडिशी ओशाळून उभी असलेली गुलाबी आणि जांभळ्या रंगाची कोरांटी काट्यातूनही उठून दिसावी.. आणि वाटावं असं सांगते आहे की, माझ्याकडे सुगंध नाहीये पण माझा रंग बघ ना.. श्रावणाचा हा खेळ गेली कित्येक वर्ष चालू असला तरी दरवेळी श्रावण येताना इतकं नाविन्य कुठून आणतो हेच समजत नाही.

मला नेहमीच श्रावण बुचकळ्यात टाकत आला आहे. तो त्याच्या या रूपामुळे नाही तर मेहंदीमुळे. श्रावणाचा आणि मेहंदीचा असा काय सबंध आहे माहिती नाही पण सगळ्या कविंनीसुद्धा मेहंदीला श्रावणाच्या जोडीनेच कवितेत स्थान दिले. श्रावण आला की आम्ही बहिणी लग्गेच चर्चा करायचो... आता नागपंचमी येणार. मेहंदिच्या तयारीला लागलं पाहिजे. दर श्रावणात न चुकता ही चर्चा होणार. आजकाल मेहंदी कधीही लावली जाते.. आणि अगदी सहज दुकानातून कोनांत भरलेली मेहंदी मिळते त्यामुळे मेहंदी लावण्यात मध्ये तितकं नाविन्य मला तरी नाही वाटत. पण माझ्या लहानपणी जेव्हा आम्ही इचकरंजीत होतो तेव्हा नागपंचमी आली म्हंटलं की मेहंदीचे वेध लागायचे. मग ती मेहंदिची पावडर विकत आणणे. ती वस्त्रगाळ करणे आणि वस्त्र गाळ करण्यासाठी कधी कधी आईची शिफॉनची साडी किंवा बाबांचा स्वच्छ रूमाल घेणे.. वस्त्रगाळ मेहंदी मध्ये कुटलेला कात, लिंबाचा रस आणि चहाचं पाणी घालून हात संपूर्ण मनगटापर्यंत बरबटून सगळ्या गाठी मोडून ती भिजवणे. ती ८ तास झाकून ठेवणे. आणि मग काडेपिटीची काडी अथवा खराट्याची काडी घेऊन जमेल तितकी नाजूक (?)नक्षी काढणे. हाही मंगळागौरी इतकाच उत्साहाचा सोहळा असायचा. मेंदी काढत कित्येक रात्री जागवल्या आहेत. हातावरची मेहंदी वाळायला लागली की त्यावर साखर पाणी लावणे. आणि मग दुसरे दिवशी मेहंदी स्वच्छ पाण्याने धुऊन त्यावर खोबरेल तेल लावणे आणि मग तव्यावर लवंग भाजून त्याची धुरी देणे. तेव्हा मेहंदी खरडून काढून हात पुढचे ३-४ तास पाण्यात घालयचा नाही हे माहिती असूनही कधी ते पथ्य पाळलं गेलं नाही.. किंवा त्याचं तितकं गांभिर्यही नाही समजलं. दिवस जसा चढू लागे तसा मेहंदिचा चढत जाणारा रंग पाहून मनही भरायचं आणि दर ३ मिनिटांनी हात नाकापाशी नेऊन संपूर्ण श्वास भरून मेहंदीचा सुगंध घेताना.. मेहंदीसाठी घेतलेल्या कष्टाचं चीज झाल्याचं समाधान असायचं.

इचलकरंजीत मारवडी समाज खूप आहे.. त्यामुळे शाळेत असलेल्या बाहेती, छाबडा, लाहोटी, शर्मा, चड्डा, लोहिया अशा मैत्रीणींच्या हातावर कोनातून काढलेली अतिनाजूक, जाळिदार आणि गडद्द चॉकलेटी रंगाची मेहंदी पाहून मन त्यांच्या हातावरच कितीतरी वेळ घुटमळायचं. वाटायचं राजस्थानी मेहंदी आपल्यालाही मिळायला हवी आणि कोन बनवता यायला हवा. एकदा एक मारवाडी मैत्रीण मेहेंदीचा कोन घेऊन आली घरातून. तिच्या पुढे जी रांग लागली मेहेंदी काढण्यासाठी.. विचारायलाच नको! माझ्या सगळ्या नातातल्या बहिणी मिळून जेव्हा जेव्हा अशी मेहंदी काढायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा कोन फेकून देऊन शेवटी खरट्याच्या काड्यांचाच आधार घेतला. आणि मग खरट्याच्या काड्यांनी आपापल्या हातावर मेहंदी काढताना एकेका बहिणीच्या चित्रकलेची कसोटी लागायची. बर्‍याचदा काढायला गेलो मोर आणि झाला घोडा अशी परिस्थिती. मग त्या चित्रांवरून फिदीफिदी हसण.. मग कोणीतरी उठून चिवडा किंवा फरसाणाचा डबा घेऊन यायचा.. मग कोण्या ताईने उठून मस्त चहा करायचा.. आणि मग रिकाम्या असलेल्या हाताने तो चहा आणि फरसाण किंवा चिवडा खायचा. तो पर्यंत सगळ्यांत लहान असलेल्या एखाद्या बहिणीला जिचे दोन्ही हात मेहंदीने भरले आहेत तिला नेमकं बाथरूमला जायचं असायचं.. आणि मग तिला थोडी मदत करायची.. आणि सगळ्यांत कहर् म्हणजे ती छोटी बाहेर आली की अंगठा दाखवत म्हणायची, "ए इथं जरा पुन्हा लाव गं मेहंदी.." की नक्की काय झालं असेल हे लक्षात येऊन पुन्हा हसून हसून मुरकुटी वळायची. मग मध्येच जरा बाहेर अंगणात जाऊन पाय मोकळे करायचे.. आणि पुन्हा मेहंदीचा कार्यक्रम चालू. किती रात्री अशा गेल्या आहेत .... सगळ्या बहिणी जगाच्या कोपर्‍यात कुठे कुठे स्थिरावल्या आहेत.. पण मेहंदी समोर आली की नक्कीच एकमेकीची आठवण होत असते.
हळूहळू मेहंदी नीट काढायला लागलो अगदी.. कोन हातात घेऊन हंस, मोर हे देखणे प्राणी तितक्याच देखण्या नक्षी मध्ये गुंफायला लागलो.. आजपर्यंत घरांत नात्यात जी लग्नं झाली त्या लग्नांत मेहंदिचा सोहळा असाच रंगवला आणि गंधवला. मेहंदी सारखी जिवाभावची रंगेल सखी आपल्या हातावर तांत्रिकपणे जिला आपण ओळ्खतही नाही त्या तोंड उतरलेल्या एखाद्या प्रोफेशनल कडून काढून घेणं हा मला मेहंदिचा अपमान वाटतो. मेहंदी अशी जिवाभाची सखी तितक्याच जिवाभावाच्या सख्यांमध्ये बसून चहाच्या सोबतीने आणि हास्याचे तुषार उडवतच रेखाटली.. रंगली पाहिजे. मेहंदी तांत्रिकपणे नाही तर.. त्या मंतरलेल्या गंधाला भरून घेत काढली पाहिजे. मेहंदिला इतक्या प्रेमाने गोंजारले पाहिजे की, त्या कोनातून अल्लड, अवखळपणे उतरून तितक्याच प्रेमाने ती हातावर विसावली पाहिजे. रंगणारा आणि अख्ख घर दार गंधाळून टाकणारा हा सोहळा अंधाराच्या, चांदण्यांच्या आणि रातराणीच्या साक्षीने रंगला पाहिजे.

आता मिळणार्‍या मेहंदीच्या कोनामध्ये केमिकलचा भार जास्ती वाटतो. हातावर उतरलेली मेहंदी विदेशातून आलेली .. आणि परकी वाटते. अशा मेहंदीला आपला हातावर प्रेमाने कशी उतरवावी? डिझाईनमध्ये अरेबिक सारखे प्रकार आले.. मात्र खराट्याच्या काड्यांनी काढलेल्या घोड्याची सर त्याला कशी यावी!
आजही श्रावण चालू झाल्या बरोबर मला मंगळा गौरीच्या आधी काय आठवली असेल तर मेहंदी. पण आता ती मेहंदीची मैफिलही नाही, तो चहाही नाही आणि खराट्याच्या काड्यांनी रेखलेला घोडारूपी मोरही नाही. आणि ही मैफिल सजवणारी ती माझी सखी पटेलच्या दुकानात थोडी काळसर होऊन , केमिकलच्या भपकार्‍यात ,चक्चकीत कागदाच्या कोनांत अडकून पडलेली.... का कोण जाणे मला तरी ती उदास वाटली.
ही मेहंदी लावून.. तळव्यावर मेहंदीचा अजून रंग ओला... हे गाणं म्हणावं असंही वाटलं नाही.

- प्राजु

गुलमोहर: 

वा वा, क्या बात है प्राजु. मस्त. अगदी लहाणपणी बघितलेले जग उभे केलेस डोळ्यांसमोर. जियो.
..............................................................................
आई माझा देव, सुख माझे घे गा
रूंदावल्या किती, पायीच्या गं भेगा!

अप्रतीम .... शब्दचं नाहीत.....
फक्त एकच ... प्लीज तो मेहंदी शब्द बदला.....
मेंदी जशी जवळची वाटते , तेवढीच मेहंदी दुरची वाटते.

बहोत खूब. मस्तं जमलाय प्राजू. (श्री१२३ शी सहमत. ते एक मेहंदी चं बघ ना... नागपंचमीची मेंदी खरच आपली.. मराठी वाटते)

दाद, श्री, अहो असले शब्द आता ईतके भिनलेत आपल्यात ऐकून ऐकून की मराठी शब्द हा पर्यायी वाटायला लागलाय! मेहेंदी, बिजी(आजी), जिजाजी, भाभी वगैरे. नशीब गाणे पण तसेच नाही म्हणत नवीन पिढी; 'मेहेंदीच्या पानावर.... मन अजून...'
चलता है. माफ करा, चालायचच.
..............................................................................
आई माझा देव, सुख माझे घे गा
रूंदावल्या किती, पायीच्या गं भेगा!

नोस्टल्जिया पण अगदी कळवळा आणणारा! सुंदर लेख!!
मी लहान शहरात आणि एकत्र कुटुंबांत वाढलो; घरांत सहा थोरल्या बहिणी, मी एकटाच मुलगा. त्यामुळे मंगळागौर, मेंदी वगैरे 'बायकी' प्रकारात सामील व्हावं लागायचं पण त्यांतही प्रचंड मजा यायची. त्या सगळ्याची आठवण प्रकर्षाने झाली. आता फक्त 'ते हि नो दिवसो गतः ' अशी हळहळ व्यक्त करायची!
बापू करंदीकर

प्राजु सुरेख उतरलय गं! आवडलच.

प्राजु काय लिहिले आहेस वा मस्त्.परत कोल्हापुर् ला गेल्यासारखे वाट्ले.अम्बाबाईच्या मन्दिरात गेल्यासारखे वाटले

मस्त लिहीलयं.. नागपंचमीला मराठी मुलीला मेंदी, रिबीनी(किती दिवसांनी हा शब्द आठवला) अन बांगड्या मस्टच असायच्या त्या काळात Happy

प्राजु, सुरेखच लिहीलं आहेस Happy आवडलं !______________________________________________
प्रकाश

प्राजु, मस्तच!

कालच्या रविवारी लेकीच्या हातावर घातली पहिल्यांदा मेहेंदी आणि तिला बांगड्या पण घेतल्या नव्या! अशी मज्जा आली ना! मेहंदीचे १ फुल तिच्या चिमुकल्या हातावर घालेपर्यन्त झोपली पण ती! मग दुसर्‍या हातावर नुसते गोळे काढले. Happy काल परवा तिच्या सगळ्या मैत्रिणिंना दाखवली तिने. नीट बोलता येत नाही अजून पण "उ उ" करत मिरवत होती. तेंव्हा मला हे माझ्या लहानपणीचं आठवत होतं आणि आज हा लेख वाचला. टेलीपथी!

मस्त लिहीलय. Happy मी पण लेकीला नविन बांगड्या घेतल्या. बर नव्हत तिला म्हणुन मेंदी तेव्हढी राहिली. कोन आणुन ठेवलाय घरी, कालपासुन मागे लागलेय उद्या मेंदी काढायची म्हणून

प्राजु मस्त... मेहंदी म्हणजेच आपली मेंदी छानच..मनातला श्रावण कागदावर उतरवलास तु..:)

*************************
हा देह तुझा पण देहातिल तू कोण
हा देह तुझा पण देहाविण तू कोण

श्रावण म्हटलं की मला शाळेचे दिवस आठवतात, आमच्या शाळेला पहिल्या आणि शेवटच्या श्रावण सोमवारी सुट्टी असायची Happy आणि इतर श्रावण सोमवारी अर्धी शाळा असायची Happy
तसेच मेंदी प्रकरण तर या काळात फार असायचे, मुलींना मिरवण्याची आणखी एक संधी मिळायची. Wink