चेन्नई ट्रीपा ?

Submitted by सुमेधा आदवडे on 26 July, 2009 - 04:03

कुठलंही ठोस कारण नसताना माझ्या अप्रेझलची अक्षरशः वाट लागल्यानंतर मला मुळात कामातच काही रस उरला नव्हता. मग कंपनीसाठी घरापासुन लांब जाऊन एखादं प्रोजेक्ट करणं तर दूरच राहीलं. पण रोज ऑफिसमधले "नको ते" चेहरे बघुन मनःस्ताप नाही होणार आणि सगळ्यापासुन थोडा ब्रेक मिळणार असा साधा सरळ विचार करुन मी एका महीन्याच्या प्रोजेक्टसाठी चेन्नईला जायला होकार दिला. विमानतळावर माझं चेन्नईचं मित्र मंडळ मला घ्यायला आलं होतं.

तिथुन आम्ही सगळे बाहेर पडत असतानाच, माझ्या ट्रॉलीचं हॅन्डल अतीव आनंदाने बाहेर निघुन माझ्या मित्राच्या हातात आलं. मग एक महीन्याचं सामान मावण्याच्या क्षमतेचा सदुपयोग केल्यामुळे, अंगापिंडाने मजबूत असलेल्या माझ्या ट्रॉलीला उचलुन माझ्या मित्राच्या गाडीपर्यंत न्यावं लागलं. सुरुवात तर चांगलीच झाली होती चेन्नईमध्ये.

दुसर्‍या दिवशीपासुन कामाला सुरूवात केली. शब्दशः बारा तास काम असायचं दिवसभरात. मग रात्रीचं जेवण. जेवणाची गंमतच होती गेस्ट हाऊस मधे. आमचा केअर टेकर राजु म्हणजे एकदम हुशार(?) माणुस. काय मस्त चव होती त्याच्या हाताला! त्याने काहीही बनवलं तरी एकसारखंच लागायचं. रोज तीच डाळ, चार तास अगोदर शिजवुन ठेवलेला भात, जेल मधल्या कैद्यांना देतात तश्या चपात्या, न जाणो किती दिवस अगोदर लावलेलं अंबट दही आणि कसलीतरी भाजी. दिसण्याव्यतीरिक्त आजच्या आणि उद्याच्या भाजीतला फरक जो कोणी सांगेल, त्याच्यासाठी आम्ही बक्षीस जाहीर केलं होतं. दोन-तीन दिवसांमधेच आम्हाला त्याच्या पाककलेच्या प्रतिभेची पुरेपुर प्रचिती आल्यामुळे आम्ही बाहेर जवळपासची हॉटेल्स पाहुन तिथे जेवु लागलो किंवा जेवण ऑर्डर करु लागलो.

पण सकाळी खुप घाई होत असल्यामुळे नाश्ता गेस्ट हाऊस मधेच करावा लागे. मग काय, कधी बटाट्याव्यतीरिक्त काही न घातलेले (मिठही नाही) पराठे, कधी गाजराचे मोठमोठे काप आणि नावापुरता कांदा पेरलेले अंबट उत्तप्पम तर कधी फरसबीचे मोठमोठाल्या कापांव्यतीरिक्त काही न घालता शिजवुन "थंड" केलेले मॅगी नूडल्स. आणि चहा- कॉफीचं काय विचारता? पाण्यात काहीही टाकलं तरी ते त्या पदार्थाचा रंग घेतं ह्या सिद्धांतावर दृढ विश्वास असलेला राजु रंगापुर्ती चहा पावडर किंवा कॉफी पाण्यात उकळवुन ते पाणी "चहा "किंवा "कोफी"च्या नावाने आमच्यासमोर साजरं करायचा.

हा राजु भैय्या आम्हाला नेहमी लागणारे काही पदार्थ, उदा. वाटीत काढलेली साखर, वाटीत काढलेलं थोडंसं लोणचं, मीठ इ. डायनींग टेबलच्या मागे, लाकडी कपाट वजा मुंग्याचे भंडार असलेल्या एका खणात ठेवायचा. त्याला मी सतराशे साठ वेळा सांगितेलं असेल की ह्या वाट्या झाकुन दुसरीकडे ठेवत जा, कपाटात मुंग्या आहेत. पण हा ऐकेल तर शप्पथ! एकदा आलू पराठ्याच्या नावाखाली काहीसं खात असताना लोणच्याची आठवण झाली. मागच्या वेळी कधी तरी खाल्ल्यानंतर उरलेल्या लोणाच्याची वाटी कपाटातुन काढुन राजुने आमच्या समोर ठेवली. त्या लोणच्याचा वरचा थर सुकून गेला होता. त्यात एकही मुंगी न जाऊन ते लोणचं पुर्णपणे शाकाहारी आहे हे सिद्ध करायला आमच्या राजुला कुठल्या रसायनाची गरज नव्हती. त्याला दटावल्यावर तो म्हणाला, "लोणच्यात मुंग्या जाणं शक्य नाही, कारण त्या लोणच्यात जाऊ नयेत म्हणुन मी साखरेची वाटी त्याच्या शेजारी ठेवतो. मग त्या साखरेच्या वाटीत जातात." आता बोला. ह्यावर काय उत्तर असणार आम्हा पामरांचे?

संपुर्ण महीनाभरात बर्‍याच लोकांशी संबंध आला. पहिल्या आठवड्याच्या शेवटी शेवटी, आमच्या गेस्ट हाऊसमधे एक युरोपीयन अजोबा रहायला आले. मी इथे अजोबा म्हणतीये, पण प्रत्येक्षात त्यांना अंकल म्हटलेलंही खटकायचं (केसांतुन, त्वचेतुन दिसत असलेलं वय लपवायचा प्रयत्न म्हणुन की अजुन काही म्हणुन ते माहीत नाही). हे अजोबा वीस वर्षे अफ्रीकेत होते, पाच वर्षे ऑस्ट्रेलियात होते, आणि विएटनामला पण कितीतरी वर्षे होते. मुळचे ते लंडनचे होते, थोडक्यात सांगायचं झालं तर आतापर्यंत त्यांचं ४६ देशात भ्रमण करुन झालं होतं. त्यांच्याकडे नेहमी काहीतरी असायचं सांगायला. आणि एकदा सुरूवात केली की त्यांची गाडी राजधानी सारखी न थांबता चालुच रहायची. ऑफिसमधेही एक अधीकारी असे होते की त्यांच्यापासुन सगळे दूर पळायचे. त्यांनी एकदा बोलायला सुरूवात केली की जो विषय चालु असतो, तो सोडुन, बाकी सगSSळ्या गोष्टी असंबद्ध उदाहरणं देऊन बोलायचे. त्यांचे आगळेवेगळे (?) तर्कशास्त्र नेहमी विनोदाचा आणि कधीकधी वैताग देणाराही विषय असायचा. माणसाने नेहमी बोलुन मन मोकळं करावं यावर माझाही विश्वास आहे. पण अशा लोकांचे मन मोकळं करणं म्हणजे मला मोकाट सुटलेल्या बैलासारखं वाटतं. बरं, त्या बैलाला आवरता येतं तरी. पण यांच्या बैलांना वेसण घालणं म्हणजे..

या फॉरेनर लोकांना खाण्यात खरंच काहीही चालतं यावर माझा चांगला विश्वास बसलाय आता. एके दिवशी राजुने डोसे बनवले होते. अजोबांनी त्याला, त्यांनी आणलेल्या मधाची बाटली मागितली. डोसा आणि मध? मी म्हटलं आपणही ट्राय करुया. कपाटातुन मधाची बाटली काढताच त्यावर असंख्य मुंग्यांचा थर स्पष्ट दिसला. मी राजुवर पुन्हा डाफरले. तर अजोबा मधे पडुन म्हणतात कसे, "दॅट्स ओके सु. यू सी, युरोपियन्स कॅन हॅव इट, इंडीयन्स कान्ट." मला आश्चर्य वाटलं ....आणि त्यांनी त्याच मधीसोबत दोन डोसे खाल्ले. मला कसंतरीच झालं पाहुन. म्हटलं खरंच हे लोक पोटात जातंय म्हणुन काहीही खाऊ शकतात. आणि म्हणे युरोपियन्स कॅन हॅव इट. बरंच झालं मी इंडीयन आहे, मला नाही खायच्या मुंग्या!

आपल्या देशात जेवढ्या भाषा बोलल्या जातात तेवढ्या क्वचितच कुठल्या देशात बोलल्या जात असतील. तमीळ पण त्यातलीच एक. ही भाषा एकदम जबरी आहे. ह्यातला एक एक शब्द ऐकुन प्रथम तो बोलायला शिकणं म्हणजे घोड्याच्या पायाला नाल ठोकण्यापेक्षा कठीण काम ! आता बटाटा : एक साधी सुधी, जेवणात नेहमी असणारी गोंडस फळभाजी. त्याला "उर्लकळंगल" असं भयाण नाव देण्यामागे काय उद्देश असेल या तमीळ लोकांचा? हे नाव म्हणुन होईपर्यंत चुलीवरची बटाट्याची भाजी कधी करपुन जाईल हे तुमचं तुम्हालाही कळणार नाही. शिवाय एखाद्या नवीन माणसाला तुम्ही सांगितलंत की तुम्ही उर्लकळंगल पोरीयल (बटाट्याची सुकी भाजी) बनवत आहात तर त्याला तुम्ही एखाद्या राक्षसाचं नाव घेताय हे वाटलं तर त्यात काही नवल नाही. केळं म्हणजे "वाळ्यय पयम". नाही नाही...नाव तसं फार कटीण नाही. फक्त तो मधला "ळ्य" म्हणताना तुमची जीभ पुर्ण मागे वळुण, तिला ९० अंशाचा बाक पडुन ती टाळुला चिकटली पाहीजे असा नियम आहे. (गंमत नाही, मला अजुनही हा शब्द म्हणता येत नाही) ही भाषा बनवणारा कोणीतरी बोबडा असला पाहीजे असं मला वाटलं होतं हा शब्द ऐकुन.

रोजच्या बोलण्यात येणारे काही सोपे शब्दही आहेत ह्या भाषेत, नाही असं नाही. पण त्यांचं व्याकरण आणी उच्चार असे आहेत की प्रत्येक माणसाच्या तोंडुन ऐकताना तुम्हाला नवीनच काही ऐकताय असंच वाटतं. विशेष म्हणजे हिंदी भाषेचेही ह्या शहरात फार वाली नव्हते म्हणुन इंग्रजीवर जगावं लागत होतं. तमीळींग्लीश म्हणजे आणखी गमतीची आणि वेगळीच भाषा. त्यांचा इंग्लीश मधला ओके म्हणजे फक्त ओके नसतो, तो ओकेवा असतो (मी भोजपुरी चिंटुवा, पिंटुवा वगरे लिहीताना इथे टायपो आलाय असं समजु नका, ओकेवा हा खरंच इथला शब्द आहे!) बीकॉज म्हणताना, त्या कॉ वर किमान ५ सेकंद थांबलं नाही तर ती त्यांना चूकीची इंग्लीश वाटते. शिवाय इथे इंग्लीशचे टेन्स म्हणजे टेन्शनची गोष्ट होती. भूत, भविष्य, वर्तमान सगळा आनंदच होता. मला जर म्हणायचं आहे, "मी कॉलेजमधे असताना खुप मजा करायचे" तर तमीळींग्लीश मधे ते " व्हेन आय ऍम इन कॉलेज, आय विल एन्जोय ए लॉट" असं काहीसं असतं. जाऊदे, इथे वाचकांचं इंग्लीश बिघडवण्याचा मानस नाही मा़झा!

आणखी एक गमतीची गोष्ट म्हणजे वाक्यातल्या प्रत्येक शेवटल्या शब्दाच्या अखेरीस "आ" जोडाण्याची प्रथा आहे इथे. हे मला ऑफिसला जाताना पहील्याच दिवशी कळले. मी रिक्षावाल्याले " बीच स्टेशन" म्हटल्यावर तो स्टेशना चा आकार माझ्या लक्षात आला होता तेव्हाच. ह्या लेखाचं शिर्षक असं का आहे हे एव्हाना लक्षात आलं असेल तुम्हाला. एकदा मी माझ्या मित्रांसोबत जेवायला गेले होते. त्या हॉटेल मधे बॉलीवुडची थीम असल्याने सगळीकडे नव्या जुन्या चित्रपटांचे पोस्टर्स होते. आमच्या समोरच्या भिंतीवर "तिसरी आँख " चं पोस्टर होतं. माझ्या चेन्नईच्या मित्र मंडळाची पण हिंदीच्या नावाने बोंबच होती. लहानपणी हिंदीचे विशेष क्लासेस बुडवत असल्याचं त्यांनी कबुल केलंय माझ्यासमोर. पण एक जण प्रयत्न करायचा नेहमी. तो मला म्हणाला, " सुमेधा, तिसरी आँख मीन्स? थर्ड आय्या?" तो आय्या ऐकुन मला आपल्या मराठीतल्या लाडीक अय्याची नय्या तमीळींग्लीशच्या समुद्रात हेलकावे घेत आहे असं वाटलं.

म्हणुन ऑफिसमधे असलेल्या एकच्या एक मराठी मुलीबरोबर मी रोज पाच मिनीटे संवाद केला तरी मला तमीळच्या भयाण वाळवंटात ओऍसीस सापडल्यासारखं वाटायचं. तिथलं वातावरण तर वाळवंटासारखंच होतं. मुंबईमधे वादळी पाऊस पडत होता तेव्हा चेन्नईला भर उन्हाचा रखरखाट होता. रवीराज आपला सगळा संताप ह्याच भागात काढत आहेत असंच जाणवायचं. अशा प्रकारे एक महीना चेन्नई ट्रीपा संपवुन मी जेव्हा मुंबईला आले तेव्हा छान पाऊस पडत होता. तेव्हा काहीतरी आपलंसं वाटलं.

दी एन्डा...

(त.टी. या कथेतील सगळी पात्रे आणि प्रसंग काल्पनिक नसुन त्याचा फक्त वास्तवाशीच संबंध आहे. कोणत्याही जीवंत अथवा..( सगळे जीवंतच आहेत) व्यक्तीशी संबंध अढळल्यास तो निव्वळ योगायोग समाजावा.)

गुलमोहर: 

<<"आणि एकदा सुरूवात केली की त्यांची गाडी राजधानी सारखी न थांबता चालुच रहायची. ऑफिसमधेही एक अधीकारी असे होते की त्यांच्यापासुन सगळे दूर पळायचे. त्यांनी एकदा बोलायला सुरूवात केली की जो विषय चालु असतो, तो सोडुन, बाकी सगSSळ्या गोष्टी असंबद्ध उदाहरणं देऊन बोलायचे. त्यांचे आगळेवेगळे (?) तर्कशास्त्र नेहमी विनोदाचा आणि कधीकधी वैताग देणाराही विषय असायचा"">>

मला भेटणार्‍या लोकांचे माझ्याबद्दलचे मत अगदी अस्सेच्च आहे. पण मी चेन्नैला कधी नव्हतो.
Happy Light 1

LOL !! Happy

>> प्रत्येक शेवटल्या शब्दाच्या अखेरीस "आ" जोडाण्याची प्रथा आहे >> तुम्ही "डा" शब्द जोडताना ऐकला नाही का? येन्न डा, पो डा वैगेरे. तीपण एक प्रथा आहे Happy

माझा अनुभव पण सेम असाच आहे .... तमिळ ईल्या

छान अनुभव. यात 'ह' शब्द कसा आला नाही याचे आश्चर्य वाटले. मधुचा उच्चार मदु, क चा उच्चार ग, मोहन म्हणताना मोघन म्हणणे ही तर खासीयत. माझा एक कानडी मित्र दुसर्‍या एका तमिळ मित्राला विचारायचा की तुम्ही हसताना पण हाहाहा ऐवजी गागागा हसता का? कमल हसन म्हणताना क व ह बरोबर म्हणताना कधी ऐकलेत?

चेन्नईला राहणे म्हणजे जेवनाची आबाळ होतेय अस दिसतयं. असो, तुम्ही तरी एकाच महिन्याकरिता गेला होता नाहीतर या अनुभवात रजनीदेवा!! च्या भक्त्तीरसाची भर पडली असती. यन्ना रास्कल्ला!! माईंड इट्!!

तुमचा कुक राजू कुशल आचारी असावा, कारण कमीतकमी साहित्य वापरून सर्वांना पुरेल असे जेवण तयार करतोय. Wink

मस्त लिहीलयस Happy

वा वा सुमेधा. शेवटी एकदाची परत आलीस तर. एस एम एस वरूनच बोलत होतीस. छान अनुभव मांडलेस. चांगलाच वेट लॉस झाला असणार तुझा मग बिनखर्चाने.
देव तुला दरवर्षी चेन्नईला महिनाभर पाठवो हीच शुभेच्छा!(आपला गंमता की हो)
..............................................................................
मोठा झाला दादा, मोठी झाली ताई
मोठा झाला 'बाळ', ये ना बघायला आई!

सर्वांचे धन्यवाद! उमेशजी, नको हो परत चेन्नई..तिला रामराम ठोकला आता Happy
चेतन, ते लिहायचं राहीलंच माझं, डा, मा, पा ही आणि यासारखी अनेक व्यंजने तिथे वापरली जातात.
मी जेवायला गेल्यावर मा़झ्या कलीगला नेहमी गमतीत म्हणायचे, " जेवणानंतर सोडा ,आफ्टर दॅट पोडा " म्हणजे निघुया Happy

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

चान आहे लेक....

एक शेजारी वारल्यावर मद्रासीअण्णांने शेजारणीचे सांत्वन असे केले....

'वगिनी, बाऊ गेला.. पण तुमी दिर सोडू नका...'

विनय Happy

विनय... हेहेहे.
..............................................................................
मोठा झाला दादा, मोठी झाली ताई
मोठा झाला 'बाळ', ये ना बघायला आई!

सुमेधा,

लेख छान ...
मी देखिल चेन्नइ ला ३ वर्षे होतो ...पण माझा अनुभव छान आहे.

सुमेधाप,
१३ वर्षापुर्वी मी १ महिन्यासाठी मैत्रीणीच्या भावाच्या मुंजीला मद्रासला गेलो.. तर हेच खाण्याच्या बाबतीत अनुभव होते हॉटेलातले ते पण टी नगर मधले.
त्यानंतर पण गेले मैत्रीणीच्या आजोळी गेले ते पण असेच अनुभव होते.

पंजाबी पकोडा कढी सांबार मसाला घालून, आंबट ढाण डोसे, काळी कॉफी. रिक्षावाल्याने लुबाडणे तामिळ समजत नाही म्हणून. असो. त्या त्या शहराची वैषिश्ट आहे असे समजायचे. Wink

LOL !!

>> प्रत्येक शेवटल्या शब्दाच्या अखेरीस "आ" जोडाण्याची प्रथा आहे >>
खरंच माझा एक शेजारी दुसर्‍याला त्यांच्या खास टोन मधे सांगत होता ते ऐकले
' Fire Polissaa,it's my son's dream JOBBAA ... Happy

विनय Lol

झक्की काका, ते तुम्ही नव्हता हे नक्की. त्या दोघांपैकी कोणाचेच नाव झक्की नव्हते Happy

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

मस्त Happy
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

सुमेधा Happy
विनय Rofl
----------------------------------------
मै जिंदगी का साथ निभाता चला गया ...

मस्त लिहीले आहेस सुमेधा.. Happy Happy
विनय Happy

झकास लेख ! मला पण माझ्या चेन्नै ट्रिपबद्दल लिहावसं वाटु लागलय आता. मी फक्त आठवडाभरच होतो, पण चैन्नेमध्ये नव्हे तर तिथुन ३-४०० किमीवर असलेल्या कारेकलमध्ये. सात दिवसात एवढा भात खाल्ला की त्यानंतर दोन महिना नाव काधलं नाही. असं नको...मी लिहीतोच आता वेळ काढुन. Wink

मस्त लिहिलंय!

लेख वाचल्यावर तारामणी भागातल्या CSIR guest house मधे राहताना खाल्लेल्या 'गोभी मंजुरम्' ची आठवण झाली. त्याला कढीपत्त्याची फोडणी पण होती. साउथींडियन चायनीजचा नवा प्रकार रिचवल्याचं समाधान मिळालं. Proud

छान लिहिले आहे... Happy

ते 'हेच' कुठेही लावतात ते लोक... आमच्या इथे एक हिंदू मंदिर आहे.. तिथे कोणी साउथ इंडियन आध्यात्मिक व्यक्ती येणार असेल तर जाहिरातीच्या पोस्टरवर 'Sadhguru Shri...' असं लिहितात. मला ते 'सध्गुरू' वाचून फार हसू येतं.. Happy

मस्तच!
बेंगळुरूत देखिल शब्दांना 'आ' लावायची पद्धत आहे. रिक्षावाल्याला 'लेफ्ट लेना' असे सांगताक्षणी 'लेफ्टा...?' असा त्याचा प्रश्न आलाच समजा Happy

धन्यवाद मंडळी....सगळ्यांचे अनुभव जवळपास सारखेच आहेत ना चेन्नई विषयी Happy आणखी कोणाला काही वेगळा अनुभव आला असला तरी इथे मांडा, तेवढंच आणखी मनोरंजन वाचकांचे Happy

Pages