बापलेक

Submitted by prachee on 4 January, 2008 - 13:33

"अगं अनघा, मी आलो ग. आणि ही देवाची फुलं ठेवलियेत टेबलावर."
अप्पानी फुलं ठेवली आणि ते बाल्कनीत येऊन आरामखुर्चीवर बसले. ही त्यांची नेहमीची आवडती जागा होती. रोज सकाळी फिरुन आल्यावर इथे बसुन ते गरम गरम चहा पित असत.सोबतीला रेडिओ असायचाच.
आजही अनघाने आणुन ठेवलेला कप हातात घेत त्यानी विचारले," प्रकाश कुठे दिसत नाही. अजुन झोपला आहे का?"
"नाही, पहाटेच्या गाडीने मुंबईला गेले ते..काहितरी काम होतं " - अनघा
"हो हो... तसं काल म्हणाला होता तो. लक्षातच नाही माझ्या" - अप्पा

काहीच न बोलता अनघा आत निघुन गेली. महिन्याभरापुर्वीच तर लग्न होऊन आली ती या घरात. अजुन रुळली नव्हती. अप्पांशी तर फार मोजकं बोलायची.
तसं पाहिलं तर प्रकाश कामावर गेला की ही दोघंच असायची घरात. सिन्धुताई, प्रकाशची आई, जाऊन ४ वर्षं झाली. कसल्याशा आजाराचे निमित्त झाले आणि सगळा खेळच संपला. तेव्हापासुन अप्पा एकदम एकटे झाले.

प्रकाशचे लग्न ठरले तेव्हा अगदी उत्साहाने त्यांनी सगळ्या कार्यात भाग घेतला. गीता, त्यांची मोठी मुलगी, मुलांना घेउन महिनाभर आली होती.सगळं घर कसं अगदी भरुन गेलं होतं. पाहुणे परत गेले आणि घरत उरले हे तिघे. अप्पांना खुप वाटायचं, अनघाशी गप्पा मारव्या, वेगवेगळ्या विषयांवरची आपली मतं तिच्याबरोबर शेअर करावी, तिच्या आवडीनिवडी जाणुन घ्याव्या. पण ती जास्त बोलायचीच नाही. जेवण उरकले की आपल्या खोलीत दरवाजा लाऊन बसायची. ते सन्ध्याकाळी प्रकाश आला की बाहेर यायची, मग तिघे एकत्र चहा घ्यायचे आणि मग ती दोघे फिरायला जायचे. अप्पा रात्री जेवत नसतं, नुसतं कपभर दुध पिउन ते झोपुनही जातं. ते दोघे कधी परत येतं,जेवतं याचा त्यांना पत्ताही लागत नसे.

"नवीनच आहे अजुन पोर. जरा भीड चेपली की बोलेल हळुहळु ..." अप्पा स्वतःची समजुत घालुन घेत.

"बरं का गं अनघा, जेवायला काहितरी साधंच कर हो, उगाच चारी ठाव नको करत बसु." त्यांनी आत हाक मारुन सांगितले. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. अप्पांनी फोन उचलला तर अंजु, अनघाची मैत्रिण, बोलत होती.
" अगं, अंजुचा फोन आहे बघ"
" हो हो आले हं. हाय, कशी आहेस?
" मस्त. तु बोल..." - अंजु
" मी मजेत.."- अनघा
" आणि नवरा...?"- अंजु
" अगं तो गेला आहे मुंबैला...."- अनघा
" वा छानच. मग काय आज जरा बाहेर पडायला जमेल का?"-अंजु
" हो, जमेल की... कधी भेटु या?"
" आज संध्याकाळी."-
" कुठे?"
" 'दिशा' मध्ये.... अगं पण सासरेबुवांचं काय? त्यांना विचार बाई आधी. नाहीतर लगेच लावतील फोन मुंबैला...चुगली करायला"
"नाही गं. तसे नाहीत ते. खुप प्रेमळ आहेत."
"हो ग. पण ते लेकासमोर. लेकाची पाठ फिरली की दाखवतात आपला खरा रंग"
"गप गं"
"का ग ? जवळच आहेत की काय?"
"नाही . मी फोनवर असले की ते बाल्कनीत उभे राहतात जाऊन. तु न उगाचच ..."
"हो आत्ता तुला पटणारच नाही. पटेल हळुहळु."
फोन ठेवुन अनघा अप्पानां म्हणाली," संध्याकाळी जरा मैत्रिणीकडे जायचं होतं. जाऊ का? लवकर येईन परत."
"अगं जा की. विचारतेस काय? आणि हे बघ ,आरामात ये परत. माझी काळजी करू नकोस. "

संध्याकाळी ५ वाजताच अनघा बाहेर पडली. लग्नानंतर १ल्यांदाच ती आपल्या मैत्रिणींना निवांत भेटत होती. कित्ती काही सांगायचे होते, घर कसे आहे? सिमल्याची ट्रीप कशी झाली? काय काय खरेदी केली? आणि मुख्य म्हणजे 'तिकडची स्वारी' कशी आहे? चेष्टमस्करीत गप्पा मारता मारता ७ कधी वाजले तिला कळलेच नाही. घड्याळ पाहिले तेव्हा ती गडबडुन उठलीच.

"अय्या, किती उशीर झाला.चला गं निघते मी आता."
"अगं हो, ७च तर वाजलेत. अरे हो, बरोबर सा'बुवांनी बजावले असेल- ७च्या आत घरात..."- मेधा म्हणाली.
सगळ्याजणी हसु लागल्या...
"अने, नवरा आला की त्याला म्हणावं काही दिवस बहिणीकडे पाठव तुझ्या वडलांना. थोडी तरी प्रायव्हसी नको का तुम्हां दोघांना.?" - अंजु

कसंनुसं हसत अनघाने सगळ्यांना बाय बाय केले आणि ती निघाली.
बसमध्येही तिच्या डोक्यात अंजुचे बोलणेच चालु होते. 'खरंच, काही दिवस जरा निश्चिंत जातील आपले अप्पा ताईंकडे गेले तर. नाहीतर दिवसभर टेंशनच असते. फार कडक आहेत म्हणे. भिती वाटत राहते सतत-आपले काही चुकणार तर नाही ना. काही बोलायला जायची पण भिती वाटत राहते.'
अनघा घरी पोहचली तेव्हा ८ वाजुन गेले होते. 'अप्पा अजुन जागेच आहेत वाटतं. आता रागवलेत की काय? ' तिने विचार केला.
"माफ करा अप्पा. खुप उशिर झाला."
"अगं असु दे. खुप दिवसांनी भेटलात ना? होणारच असं. बरं प्रकाशचा फोन आला होता. उद्या सकाळी परत करेल. तुझं जेवणाचं काय? मी दुध घेतलं नुकतंच."
"नाही. मलाही फारशी भुक नाही. झोपेनच आता."
"गुडनाइट"

सकाळी नेहमीप्रमाणे अप्पा फिरुन परतले तरी अनघा उठली नव्हती. अप्पांनी चहा करुन घेतला आणि रेडिओ सुरु केला.
बाल्कनीत येऊन बसतात तोवर अनघा आली.
"अप्पा, आलात तुम्ही? चहा ठेवते हं."
"अगं मी केलाय चहा. तुझाही ठेवलाय थरमासमध्ये घालुन. "
"अं हो.."
अनघाला फारच कानकोंडं झालं.
- 'का असं करतात हे. १० मिनिटं थांबले असते तर काय बिघडलं असतं? अमंळ डोकं जड झालं म्हणुन पडुन राहिले तर लगेच.....'
तिच्या विचारांची लिंक फोनच्या आवाजाने तुटली.
"प्रकाश बोलतोय. काल कुठे गेली होतीस तु? फोन केला होता मी."
"अरे अंजु, मेधा सगळ्या जमलो होतो 'दिशा'मध्ये."
"बरं कशी आहेस? आवाज का असा येतोय तुझा? काही झालंय का?"
"मला जरा बरं वाटत नाहीये रे. जरा कणकण आहे. तु कधी येतो आहेस?"
"अजुन ३-४ दिवस लागतील मला"
"असं रे काय? लवकर ये ना. मला खरंच बरं नाही वाटतंय. अश्यावेळी कोणीतरी आपलं माणुस नको का जवळ?"
"अगं अप्पा नाहीत का आपले?" ओठावर आलेले शब्द प्रकाशने परत फिरवले. 'हो उगाच वाद नकोत यावेळेला...'
"बरं बघतो मी कसं जमतेय ते. तु मात्र डॉक्टर कडे जाउन ये. काहीतरी औषध घे. ठेवतो मी आता."

फोन ठेवुन अनघा तशीच बसुन राहिली. काहीच करावेसे वाटत नव्हते आज. पण जेवण तर बनवावेच लागणार होते ,त्यांतुन सुटका नव्हती.

संध्याकाळचे ५ वाजले तरी अनघा अजुन उठली नव्हती. अप्पांनी चहा बनवला आणि तिला हाक मारली.
"अनघा..."
"अं ...अं...."
"का ग? काय होतयं? बरं नाही का तुला?" अप्पा बाहेरुनच म्हणाले. सुनेच्या खोलीत असं जाणं त्यांना प्रशस्त वाटेना.
"हो... किंचित ताप आहे "
मग मात्र अप्पा आत गेले. तिच्या कपाळाला हात लावुन बघितला.
"अरे बाप रे, अगं केवढी तापली आहेस... बरं नव्ह्तं तर सांगायचं नाही का आधीच... थांब डॉ. चित्र्यांना बोलावतो मी."
अनघा काही बोलण्याच्या स्थितीतच नव्हती. अंग खुप दुखतं होतं आणि डोळेही उघडवतं नव्हते. ती गप्प पडून राहिली.

"अनघा उठतेस का बेटा? थोड्सं जेऊन घे."
अनघाने डोळे उघडले तर अप्पा ताट घेउन समोरच उभे होते.
ती उठुन बसली. आता मघापेक्षा जरा बरे वाटतं होते.

"ही घे पेज केलेयं गरम गरम. आणि थोडं लिंबाचं लोणच."
अनघा बघतच राहिली अप्पांकडे.
"अगं घे नाहीतर गार होउन जाईल पेज. बरं का ग, माझ्या आईकडुन शिकलो होतो पेज मी. सिंधुनी कधी संधीच दिली नाही बनवायची... प्रकाशचे आजोळ गावातच असल्याने माहेरी गेली तरी एका दिवसातच परत यायची. एवढ्या वर्षांत एकदाच आजारी पडली, तेव्हाही काही सेवा करु दिली नाही....देवाकडेच निघुन गेली काही करण्याआधीच...." बायकोच्या आठवणीने डोळे भरुन आले अप्पांचे.
"ही एक पेज सोडली तर काही येत नाही मला दुसरं..... सिंधु गेल्यावर राधाबाई येउन स्वैंपाक करुन जायच्या. तुमच्या लग्नानंतर तुच सांभाळंलस सगळं."
अनघा खाली मान पेज खात होती. लोणच्याने जरा चव आली जिभेला.
साइडटेबलवर एका बाऊलमध्ये कापडी पट्ट्या ठेवल्या होत्या पाण्यात. म्हणजे अप्पा...?
"डॉ.चित्रे येउन गेले. एक इंजक्शन दिले त्यांनी. गार पाण्याच्या पट्ट्या ठेवा म्हणाले. दिडेक तासात उतरला ताप तुझा त्याने. आता जरा पड. मी प्रकाशला फोन करुन सांगितलेय लवकर यायला."
अनघा न बोलता गप्प पडुन राहिली. कधी डोळा लागला कळलेच नाही तिला..

सकाळी तिला जाग आली तेव्हा ९ वाजुन गेले होते. तिला बरीच हुशारी आली होती. उठुन बाहेर आली तर अप्पा पेपर वाचत होते.
"उठलीस? कसं वाट्तय आता? चहा करु का थोडा? आणि हो, तु काही करत बसु नकोस. राधाबाई येतील ११ वाजता. त्याच बनवतिल जेवण वगैरे. तु विश्रांती घे"

तेवढ्यात फोनची रिंग वाजली. अनघानेच फोन घेतला.
"प्रकाश बोलतोय. कशी आहेस आता? मी आज रात्री निघायचा प्रयत्न करतो आहे." त्याच्या आवाजात काळजी जाणवत होती.
"नाहीतर तु आईकडे जातेस का तुझ्या?" -प्रकाश
"नको रे आता बरी आहे मी. तुपण यायची घाई करु नकोस. आपले अप्पा आहेत की माझ्याबरोबर....."
अनघा पुढे बोलुच शकली नाही. 'परवा आपण कायकाय विचार केला अप्पांबद्दल... आणि त्यांनी किती केले आपले काल.... अगदी बापाच्या मायेनी.... खरचं अप्पा वडलांसारखे नाहीत तर वडीलच आहेत आपले...'

ती पटकन म्हणाली,"अप्पा, मीच करते चहा आणि दोघेही बाल्कनीत बसुन घेऊ एकत्रच चहा."

आणि स्वैंपाकघरात पळालेल्या आपल्या 'लेकीकडे' अप्पा बघतच राहिले.

समाप्त.....

गुलमोहर: 

mast ahe kahi mulich lagna adhi pasun gairsamaj asto sasrche loka ase astat tya mule lagnantr pan tasch vichar krtat aani mag bhadan ani gairsamaj, tyapeksha positively pahila kahi gosti tar doghna fayda hoto..manya pratek gharat nai khar asa..

Pages