फिटींग!

Submitted by पूनम on 14 July, 2009 - 02:59

आमचे ’हे’ अलिकडे कपडे शिवून घेत नाहीत.. नाही, शिंप्याचं नाव अली नाहीये, अलिकडे म्हणजे 'आताशा' हे कपडे शिवून घेत नाहीत, सरळ विकतच घेतात.. इतके मॉल्स शहरभर उभे राहिल्यानंतर आणि त्यांच्याकडे अक्षरश: हजारो तयार कपडे तयार असताना कपडे शिवून घ्यायचे म्हणजे अंमळ औट ऑफ फ्यॅशनच! त्यातून, आजकाल पॅकेजिंग आणि ब्रँडींगला किती महत्त्व आलंय, ठाऊकाय ना? कपड्याच्या लेबलवरून माणसाच्या स्टेटसचा अंदाज घेतात आजकाल, आहात कुठे? तात्पर्य काय, की सध्या ह्यांची कपडे खरेदी मॉल्समध्ये होते.. आणि ती आमच्या- म्हणजे मी आणि आमच्या संसारवेलीवरच्या गोमट्या फुलाच्या दृष्टीने प्रचंड कंटाळवाणी असते.. कंटाळवाणी का? कारण शर्टाची खरेदी त्या मानाने पटकन उरकते.. मापाप्रमाणे शर्टांचे ढीग असतात, त्यातले आवडतील ते घ्यायचे. पण पँट खरेदी होईस्तोवर आमची जांभया देऊदेऊन तोंड फाटायची वेळ येते.

पहिली गोष्ट म्हणजे पँट घ्यायची, म्हणजे पोटाचे माप उघडउघड तिथल्या ’हेल्पर’ला सांगायचे! हे माप दर सहा महिन्याने वाढत असल्याने, ते असं उघड बोलायची वाटते लाज. त्यामुळे तो तत्परतेने पुढे आला, तरी त्याला ’मी बघतो’ असं मारे तोर्‍यात त्याला सांगितलं जातं. ’मी जाड झालेलो नाहीये’ हे पटवण्यासाठी जुन्या मापाची एक पँट ट्रायलसाठी म्हणून हे ट्रायल रूममध्ये घेऊन जातात. आत गेलं की, आधी पायातले बूट काढायचे, मग अंगावरची पँट उतरवायची. मग ही नवी घालायचा प्रयत्न करायचा. ती होत नाही. मग चरफडत ती उतरवायची. पुन्हा लाजेकाजेखातर जुनी पँट चढवायची. बूटात पाय सरकवायचे. उगाचच गोंधळलेला चेहरा- की 'घरी आहेत त्या या मापाच्या पँट तर मला होत आहेत, हीच कशी होत नाही बरं?'- असा करून बाहेर यायचे. मग नवीन (मोठ्या) मापाच्या ढीगाकडे वळायचे. त्यातली एक घ्यायची. पुन्हा ट्रायल रूममध्ये हे सगळं करायचं. ती मात्र पहिलीच्या मानाने फिट्ट होते. मग ’अरेच्च्या, मला आता हे माप लागतं? काहीतरी घोळ आहे ह्यांच्याच मापात’ असं त्या विदेशी, बड्या, जिच्यामागे हे स्वत:च धावत आलेत त्या कंपनीचं माप काढायचं. मग एकूणच या कंपनीबद्दल मन थोडं कलुषित झालेलं असतं- कारण ती कंपनी ह्यांना जाड ठरवते. म्हणून मग दुसर्‍या कंपनीकडे वळलं जातं.

दुसर्‍या कंपनीच्या पँट ट्राय करताना, हेच सगळं घडतं. आधी जुनं माप, मग नवीन माप. किती वेळा ट्रायल रूममध्ये जायचं, पँट बदलायच्या.. देवा! आणि मी आणि आमच्या मुलाने काय करायचं या वेळात? तर हे बाहेर कधी येतात याची वाट पहायची. बर्‍याचदा तर ट्रायल रूमसाठीही नंबर असतात. तेव्हा तर आमची तोंडं बघण्यालायक असतात. बरं, ’तुमचं चालूदे, मीही माझ्यासाठी काहीतरी बघते’ असं म्हटलेलंही खपत नाही. ’नाही, तू थांब, सीलेक्शनसाठी’. मग काय, एक कोपरा गाठून मी येणारेजाणारे निरखत बसते. लेक मात्र भयंकर कंटाळतो.. ’आई, मी काय करू?’, ’बाबांना इतका वेळ का लागतोय?’, ’मी तिकडे एक चक्कर मारून येतो’, ’आई, भूक’, ’कंटाळा आला’ हे आळीपाळीने माझ्या कानावर आदळत रहातात. मी ’हो रे, झालंच हां’ असं काहीतरी बडबडत त्याला धीर देते. (एकदा तर तो इतका वैतागला की बाबांना म्हणाला, ’बाबा, तुम्ही तिकडे जाऊन काय करता? मलाही बघायचंय’. हे ऐकून मला इतकं हसायला आलं आणि बाबांनाही, की ते खरंच घेऊन गेले त्याला ट्रायलरूममध्ये! बाबा काही भारी करत नाहीयेत हे पाहिल्यावरच त्याचं कुतुहल शमलं.)

तर अश्या रीतीनी कंपनी कोणतीही असो, माप वाढीवच आहे अशी एकदाची यांची समजूत पटते. मग निवड. नेमके यांना आवडलेले रंग त्यांच्या मापात नसतात. जे असतात, ते यांच्याकडे आधीच असतात. (मुळात पुरुषांच्या कपड्यात रंग असतात तरी किती???) मग पुन्हा तिसरी कंपनी. आताशा कापडातही पन्नास प्रकार आलेत -असं कंपन्यांचं म्हणणं हं. ’चिनोज’, ’अँटी रिंकल’, ’कूल फॅब्रिक’, ’टेरिकॉट्स’ वगैरे वगैरे.. मग, ही घेऊ? का ती बरी? वगैरेत वेळ जातो.. सुरकुत्या न पडणारं ’कॉटन’ कसं काय बरं असू शकतं हे मला कळलेलच नाहीये.. माझा समज की चुरगाळलं की सुरकुत्या पडणार ही तर कॉटनची खासीयत.. पण विदेशी कंपन्यांचं कॉटन असेल बाई अँटी रिंकल असं म्हणून मी पुन्हा विघ्न आणत नाही. अश्या रीतीने बराच उहापोह झाला की एकदाची पसंती होते. मग पुन्हा एकदा खात्री म्हणून अजून एकदा ट्रायल रूम गाठून प्रत्यक्ष चाचणी होते, आणि माल पक्का केला जातो.

किंमत मी विचारतच नाही. (म्हणजे ह्यांनी घेतलेल्या कपड्यांची पहात नाही.. ढीगातल्या कपड्यांची हळूच पाहून साधारण अंदाज घेते.) ती बघून माझे डोळे पांढरे होऊन, मला चक्कर येऊन मी पूर्ववत झाले की मगच हे ट्रायल रूममधून अवतीर्ण होतात. माझ्या एका आख्ख्या पूर्ण सहावारी, पार्टी वेअर साडीची, जी मी किमान दहा वर्ष तरी वापरू शकेन जी किंमत असते, ती यांच्या एका य:कश्चित दुटांगी वस्त्राची असते!!! एक तर हे सर्रास ती पँट वापरणार.. माझी साडी मी जपूनजपून वर्षातून एखाददोनदा वापरते.. परत ही मोलामहागाची पँट त्यांना कितीशी वर्ष होणार? एक? फारतर दोन.. तरी त्याला चार आकड्यात पैसे मोजायचे?? ..असले विचार करून माझं बीपी वाढतं, आणि ’शेवटी तू टीपीकल मध्यमवर्गीय वातावरणातून बाहेर कधी येणार???’ असा कटाक्ष तेवढा मिळतो मला.. त्यापेक्षा जाऊचदेना.. मी किंमत विचारत नाही. मन शांत करण्यासाठी मॉलमधल्या इतर विभागांना (नुसतीच) भेट देऊन येते.. इतकी महाग खरेदी झाल्यानंतर अजून काय विकत घ्यायची माझी टाप?

कथा इथे संपत नाही. या विकतच्या पँटना खालून शिवणी नसतात. त्या घालणार्‍याच्या उंचीप्रमाणे नंतर मारून घ्यायच्या. त्यासाठी कपडे आल्टर करणारा ’स्पेशालिस्ट’ शोधायला लागतो. घराच्या आसपास जे असतात, त्यांच्या टपर्‍या छोट्या.. ते हे कपडे खराब करतील, म्हणून त्यांच्याकडे टाकायचे नसतात ह्यांना. त्यांना लांब गावातल्या लोकांकडेच जायचं असतं, पण वेळ कोणाला असतो? या शनिवारी, पुढच्या शनिवारी करत करत किमान दोन महिने उलटल्यानंतर तो मुहूर्त लागतो..

मी दरम्यानच्या काळात ह्यांचं ह्यांच्याच नकळत डायट फूड सुरू करते.. त्या नव्या पँट घालण्यायोग्य होईपर्यंत पुन्हा न घालण्यायोग्य व्हायच्या आणि पुन्हा आम्हाला मॉलवारी करावी लागायची, या भीतीने!

समाप्त!

(त.टी. ह्या लेखनामधील घटना काही काल्पनिक आणि काही सत्य यांचा मिलाफ आहे, कृपया त्यावरून कोणतेही निष्कर्श काढू नयेत ही विनंती :))

गुलमोहर: 

पूनम Rofl
मस्तच लिहिलंय.
एका छत्रे सासुरवाशीणीची व्यथा अजून एका छत्रे सासुरवाशीणीनेच शब्दात मांडावी याला योगायोग म्हणावे काय... Wink

~~~
मन उधाण वार्‍याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते...

आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींकडे अशा (तुम्ही बघत आहात अशा...) द्रूष्टीने पाहीले की जीवन छान सुसह्य होते नाही ?

छानच ... , आवडले!

Biggrin पूनम मस्तच

****************************************
सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वाथ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते

मस्तच लिहीलयस पूनम!! Lol

सही आहे एकदम Happy

’नाही, तू थांब, सीलेक्शनसाठी’ >> हा कदाचित नंतरची टीकास्त्रे टाळायला असेल Proud

अरे देवा.. मला वाटलं होतं हा उपद्व्याप माझ्याच मागे आहे..आज कळलं आणी माझ्या बोटीत अजून लोक पाहून धीर आला म्हणजे पेशंस आला Rofl

पूनम ... Lol
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संतों की बातें मान भी ले, इस मे ही भलाई तेरी है...
तकदीर का सारा खेल है ये, और वक्त की हेराफेरी है...

वाचुन मजा आली , पण एवढा काही वेळ नाही लावतं हं आम्ही पुरुष मंडळी.

>>>बायकांच्या खरेदीबद्दल सदासर्वकाळ बोंबा मारणार्‍या समस्त पुरूषजातीला जबरी पंच!<<<
>>>... एका आख्ख्या पूर्ण सहावारी, पार्टी वेअर साडीची, जी मी किमान दहा वर्ष तरी वापरू शकेन जी किंमत असते, ती यांच्या एका य:कश्चित दुटांगी वस्त्राची असते <<< अगदी सही ! यातली बदलणारी मापं सोडून सगळी गोष्ट माझ्या अनुभवावर आधारित असे टाकले तर एकदम फिट्ट बसेल बरं का Wink
आता पुढच्या प्रत्येक वेळेस खरेदीला याची आठवण होणार हे नक्की Happy

सही... काय निरिक्षण आहे... पूनम, <<पूनम, साड्या खरेदीबद्दल गळे काढणार्‍या तमाम नवर्‍यांना सही जवाब>>
नीधपला एकवीस मोदक!

कूल..! नवर्‍याला फॉरवर्ड केला लेख तर चालेल का? सध्या आमचा असाच खरेदीचा विचार आहे Proud

व्वा! लेख वाचताना मजा आली. मॉल कल्चर कडे वढाळ मनाने खेचल्या जाणार्‍या नवरोबांचे वर्णन आणि त्यांच्यामागे धावताना 'आक्रंदणारे' तुमचे मध्यमवर्गी मन यांचे चित्र छान रेखाटले आहेत तुम्ही!

-- अरुंधती कुलकर्णी

पूनम, सही. आमचे हे "वाढता वाढता वाढे" यातले असल्याने हा अनुभव दर वर्षी येइल यात शंका नाही. Happy

--------------
नंदिनी
--------------

काल पुन्हा घेतला बाई हा अनुभव Sad
त्यात अजून एक भर. वर्षानुवर्षे त्याच कंपनीचा त्याच साईजचा शर्ट घेत असूनही ( अगदी खरेदीच्या वेळेसही त्याच कंपनीचा, त्याच मापाचा शर्ट अंगात असतानाही ) अन त्या मोठ्ठ्या कंपनीची मापे कणानीही बदलत नसताना, दर वेळेस ट्राइअल का घ्यायची? हे काही कळत नाही.
शिवाय यांच्या शर्टाचे फिटींग काही आपल्या ब्लाउज/ कुडत्या सारखे अपेक्षित नसते. हं, आता खांद्याला बरोबर बसतोय ना, उंची ठीक आहे ना इतके झाल्यावर; या अघळ पघळ ( तुलनेत म्हणतेय ) शर्टाचे "फिटिंग" हा काय प्रकार आहे हे कोणी समजाउन सांगेल का? Proud

असं कसं! Happy त्या शर्टात आपण किती रूबाबदार दिसतो, हे कळायला नको का? Lol

थोडक्यात काय, नवरा-बायकोने एकमेकांसोबत खरेदी करू नये हेच खरे! आपण मैत्रिणी-मैत्रिणी जातो, तेव्हा एकदातरी तक्रार करतो का? Wink शिवाय मैत्रिणीसोबत गॉसिप करत शॉपिंग करण्याची मजाच निराळी.. नवरा-बायको-एकत्र-खरेदी म्हणजे कुरबुरींमध्ये अजून एक मुद्याची भर! Happy Light 1

धन्स लोकहो Happy जस्ट एक गंमत म्हणून लिहिले, तुम्हाला आवडले, तुम्ही रीलेट करू शकलात, मी खुश Happy
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..

अन त्या मोठ्ठ्या कंपनीची मापे कणानीही बदलत नसताना, दर वेळेस ट्राइअल का घ्यायची? हे काही कळत नाही.<<
अगं आरती मापे नाही बदलली पण पॅटर्न बदलतो ना.. तो अंगावर कसा दिसतो ते कळायला नको का?

या अघळ पघळ ( तुलनेत म्हणतेय ) शर्टाचे "फिटिंग" हा काय प्रकार आहे हे कोणी समजाउन सांगेल का?<<
असतं गं. समजाऊन सांगू शकेन पण फार टेक्निकल भाषेत. तेव्हा असतं गं असं मान आणि सोडून दे.. Happy

शिवाय मैत्रिणीसोबत गॉसिप करत शॉपिंग करण्याची मजाच निराळी.. << हे मात्र जाम खरंय.. येतेस का माझ्याबरोबर आज शॉपिंगला? Wink

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

एका आख्ख्या पूर्ण सहावारी, पार्टी वेअर साडीची, जी मी किमान दहा वर्ष तरी वापरू शकेन जी किंमत असते, ती यांच्या एका य:कश्चित दुटांगी वस्त्राची असते

Rofl

------------------------------------------------------
आठवणींच्या मागे धावलॉ कि माझं असंच होतं.
आठवणीं वेचत जाताना, परतायचं राहुन जातं.

Lol सहीच पकडलीय दुखरी नस !:P
पँटखरेदी म्हणजे खरेच एक दिव्य असते!
नकळत डायट फूड सुरू करते>>> देवा ! वाचव रे ! Biggrin

ये नॉ चॉलबे... सॉच्ची लिखो !!!!! Happy

दुटांगी वस्त्र कसलं? दोन पुंगळ्याच खरेदी करायच्या असतात. खरं तर मी खरेदीला गेलो की का कोण जाणे मला सगळ्याच वस्तू नावडत्या होतात आणी ९० टक्के वेळा मी काहीही न घेताच परत येतो. त्या वस्तूची गरज असतानाही. बाकी कपड्यांच्या बाबतीत खरेच मटेरियल , नॉवेल्टी, सर्व चार्जेस वगैरे किमती ठरविणार्‍या सगळ्या घटकांचा विचार करूनही तयार कपड्यांच्या किमती अवास्तवच वाटतात. रिंकल न पडणारे कॉटन हा प्रकार मलाही न उमजणारा आहे. मुळात कॉटनचे कपडे मेन्टेन करायला अवघडच त्या मुळे मला तर ते अजिबातच आवडत नाहीत कारण मी कपड्याच्या बाबतीत गबाळ्याच आहे.....

पूनमा आज हा लेख वाचनात आला. एकदम सही निरीक्षण आणि लेखनही.

आमच्याकडे आणखीन काही वेगळंच आहे. आपण जाड झालोय हे मान्य करायचं नाही, आणि वर म्हणायचं इथल्या पाण्यात(आम्ही सध्या आहोत त्या देशाचं म्हणायचंय मला) काहीतरी गडबड आहे, कपडे आटतायंत (म्हणजे पँट हो)

अफलातुन फिटिंग. नविन पँट घेताना वाढत्या मापाचीच घ्यावी, जुनी होईर्यंत कमरेवर सांभाळायच काम बेल्टवर सोपवावे. जशी ऐकदा वाढलेली महागाई कमी होत नाही तसेच साधारण तब्येतीचे असते. पुनमजी खासच लिहिल आहे.

ह. ह. पु. वा.
<<<<<मुळात पुरुषांच्या कपड्यात रंग असतात तरी किती??

आई शपथ.. काय बोर अयुश्य असत ह्या पुर् षान्च...

ए मला अनुस्वार जमत नहिये Sad

Pages