शांती.......

Submitted by कौतुक शिरोडकर on 7 July, 2009 - 13:59

"हे काय, फक्त दोन हजार रुपये ? "
सदानंदाच्या वैतागलेल्या चेहऱ्याकडून टेबलावर आदळलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल, मान वर न करता, बामणेसाहेबांनी एक छोटी कागदी स्लीप पुढे सरकवली. त्याच्यामागे अजून पंचवीस-तीस जण रांगेत होते. प्रत्येकाकडून दर महिन्याच्या सात तारखेला सकाळचा पहिला प्रहर हे असलं ऐकण्यातच जायचा. सुरुवातीला त्यांची फार चिडचिड व्हायची. कोणी एक म्हटलं की यांचे दोन तयार. पण आता इतक्या वर्षांच्या सरावाने सगळं नीट जमायल लागलं होतं. मान वर न करताच प्रत्येकाला वाटेला लावण्याची हातोटी त्यांनी साधली होती. स्लीप हातात आल्याबरोबर सदानंद स्लीप उघडून पहात बसला आणि मागे उभ्या असलेल्या गजानन संखेने त्याच्या पाठीत बोट रोवून त्यांला बाजुला सरकण्याची प्रेमळ सुचना केली. मागे न वळताच सदानंद बाजुस झाला. त्याने स्लीप पहायला सुरुवात केली. प्रोविडंट फंड, प्रोफेशन टॅक्स, कर्जाचा हप्ता, बावीस तारखेची उचल, मागोमाग पंचवीस तारखेला घेतलेली अर्जंट खर्ची या सगळ्यांचा गोषवारा म्हणून एकुण शिल्लक अडीच हजार होती. म्हणजे.... म्हणजे पाचशे रुपये कमी..... मनातल्या मनात ओरडलाच तो बामणेसाहेबांवर. झपदिशी पुन्हा त्यांच्याकडे वळला. बामनेसाहेबांची मान अजून रजिस्टरमध्येच होती. येणाऱ्याने नाव सांगावं आणि त्यांनी हात मागे करून लिफाफा घ्यावा.... सगळं यंत्रवत चाललं होतं. आज त्यांच्या मागे पुंडलिक उभा होता. लिफाफ्यात नोटा टाकत. मागच्या महिन्यात मालतीची आजी वारली तेव्हा पुंडलिकाकडून पाचशे घेतले होते ते त्याला लख्ख आठवलं. नेमकं त्याचक्षणी पुंडलिकाने मान वर करून त्याच्याकडे पाहीलं. ’यावेळेस बरा सापडलास’ असा अविर्भाव त्याच्या चेहऱ्यावर तरळला. सदानंद कसनुसं हसला. आपल्याला साधं हसतानाही कष्ट पडताहेत हे जाणवलं सदाला आणि स्लीप व पैसे वरच्या खिशात सारून जड पावलांनी तो कॅबिनच्या बाहेर आला.

समोरच खाटेवर फतकल मांडून मनू आणि सुमी अभ्यासाला बसले होते. आई नेहमीप्रमाणेच मागच्या गल्लीतल्या घाटपांडेकडे टिकल्या बनवायला गेलेली. घरात निवांत बसून हरी-हरी करत जपमाळ ओढण्यात वेळ फुकट का घालवा ? या तिच्या तत्वज्ञानाचा थोडासा आर्थिक फायदा होत होता. पहायला गेलं तर तिच्या औषधांचे आणि एक वेळच्या मिरची-कोथिंबीरीचे पैसे सुटत होते त्यात. पलिकडे मालतीचा क्लिप्सचा पसारा पडलेला. हाही घाटपांडेंचाच जोडधंदा. दिवसभराच्या रामरगाड्यात वेळ मिळेल तसा मालतीचा त्यावर हात चालायचा. तेवढाच तिचा हातभार होता संसाराला. आपणही या धंद्यात उतराव असं वाटलं होत एकदा सदाला. त्या निमित्ताने घाटपांडेंकडे फेरी मारली होती त्याने. पण दहा हजार डिपॉजिट ठेवावं लागेल हे ऐकल्यावर कपात अर्धा चहा तसाच सोडून तो निघाला होता. आता ते खरोखरच लागत होते की घाटपांडेने सोडलेली ती पुडी होती हे तपासण्याचा त्रास मात्र घेतला नाही त्याने.

संथ चालीने घरात शिरून त्याने हातातली डब्याची बॅग नेहमीच्या जागेवर ठेवली. त्याला पहाताच मन्या पुढे सरला. त्याने बापाची बॅग उचलली व तो आतल्या दिशेला वळला. सदाने खुर्चीशेजारीच जमिनीवर ठाण मांडली. आत भांड्यांची खुडबुड ऐकू येत होती. मालती स्वयंपाकाच्या तयारीत आहे याचा अंदाज त्याला आला. थकवा त्याच्या सर्वांगाला नव्हे तर मनालाही व्यापून होता. त्यात बाहेरचं वातावरण कुंद होतं. पाऊस पडेल असं दुपारपासून वाटत होतं. पण अजून त्यालाही बरसण्याचा मुड नव्हता. सदाला त्याच्या घामेजलेल्या देहाची जाणिव झाली व त्याने छताकडे पाहीलं. तो जुनाट पंखा आपल्या परिने पुर्ण प्रयत्न करत होता, पण हवा काही जाणवत नव्हती. ट्रेनचा सेकंड क्लासचा तो जीवघेणा व नकोसा वाटणारा प्रवास, त्यात ती हौशी भजन मंडळी व त्यांचा बेंबीच्या देठापासून लागणारा सुर, पत्त्यांचा डाव मांडून इतरांना शक्य तेव्हढी अडचण निर्माण करणारे जुगारी. तीच ती भांडणे, ती रेटारेटी...... सगळ्याचा त्याला उबग आला होता. प्रत्येक पगाराच्या दिवशी तो जास्तच यायचा. सिंदबादच्या मानगुटीवर बसलेल्या म्हाताऱ्यासारखं हे बोजड जगणं आपल्या मानेवर बसलयं असं त्याला प्रकर्षाने जाणवत असे हल्ली. मंदीच्या सावटामुळे डोक्यावर नोकरीतून गच्छंतीची टांगती तलवार होतीच. वर महागाईच्या निचांकात जीवनावश्यक वस्तूंचा उचांक डोळे फिरवत होता. पुर्वी कसतरी भागत तरी होतं. आता तर तेही नव्हतं. शिलकीचा तर प्रश्नच नव्हताच. भकास नजरेने तो सगळ्यांकडे बघत बसला. मनूने आत जाऊन मालतीला त्याच्या येण्याची वर्दी दिली आणि तो पुन्हा आपल्या अभ्यासाला बसला. पुर्वी सदानंद घरी आला की तो ’बाबा, माझ्यासाठी काय आणलं ? ’ असा धोशा लावी. पण सहा वर्षाच्या त्या पोराला आता बऱ्यापैकी समज आली होती. त्याने आता बापाच्या समोर हट्ट करणं सोडून दिलं होतं. मालती काही बाहेर आली नाही, पण तिचा आवाज मात्र त्याच्यापर्यंत येऊन पोहोचला.

"अहो, मनुची फी भरायची आहे परवा. शेवटची तारीख. या महिन्यात निदान सुमीचं तरी टेंशन नाही. पण सरांनी शेरा पाठवलाय त्याच्या अल्मनॅकवर. भरायलाच हवी. लाईट बिल पण खुप आलय या महिन्यात. मागच्या महिन्यात दोन्ही पंखे दिवसरात्र चालू होते. तरी दटावून दटावून दोघांचा टिव्ही कमी केलाय. परवा मोर्चा काढला म्हणे शिवसेनेने. लाईट बिल भरू नका म्हणाले. उगाच यांच्या नादाला लागलो तर उद्या मीटर काढून नेतील. नस्ती बिलामत. त्याचा अजून वरखर्च. वाण्याचं बिल तुंबलय. सुमेबरोबर निरोप पाठवलाय त्याने. साबण आणायला गेली होती तेव्हा. आणि हो.. सुमेला रेनकोट घ्यावा लागेल. तीन वर्षे वापरला पोरीने आधीचा. ..............."
ती बोलत होती. न थांबता. तोंडपाठ असावं तसं तिचं बोलणं चाललं होतं. नेहमीप्रमाणे ते त्याच्या कानावर आदळत होतं. यंत्रवत त्याची मान आवाजाच्या दिशेला फिरली आणि पुन्हा जाग्यावर आली. त्याच्या चेहऱ्याची रेषही हलत नव्हती. भिंतीला टेकून तो शांत बसला. लांब पसरलेले पाय त्याने जवळ घेतले आणि गुडघ्यात मान घातली. मधल्या अवधीत तिने त्याच्यासमोर चहा आणून ठेवला. पण त्याच्या ते लक्षातही आलं नाही. हातात आलेल्या या दोन हजारात हा महिना कसा काढायचा ही दर महिन्याला छळणारी विवंचना आजही समोर दत्त म्हणून हजर होती. डोकं भणाणलं त्याचं. काहीतरी करावं असं त्याला वाटत होतं. पण काय ? .... प्रचंड चीड.. राग.... संताप असलं काहीसं खदखदत होतं आत. उसळी मारून बाहेर येऊ पहात होतं. पण राग काढावा कशावर आणि कुणावर ? मुलांवर ? बायकोवर ? घरात काडी काडी करून जमवलेल्या सामानावर ?

वडिलोपार्जित घर होतं. तोच सदाला मोठा आधार होता. नशिबाने धाकटा भाऊ परागंदा झालेला. एकमेव बहिण होती. तिला गावाला उजवलेली. वाटेकरी म्हणावे असे कोणी नव्हतेच. तेव्ह्ढाच दिलासा होता मनाला. हल्ली सगळ्याच बाबतीत ओढाताण वाढलेली. ती तशी आधीपासूनच होती म्हणा. जन्माला येताना सोबत आलेली. नाळ कापली गेली पण ती मात्र राहीली सोबत. सहज कधी काहीच हाती लागलं नाही सदानंदाच्या. बापाने पहिला मुलगा म्हणून सदानंद नाव ठेवलं. पण आनंद नुसता नावातच. बाकी सगळी बोंबच होती. सदा स्वत: शिक्षणात यथातथा. बापाचा तीन पोरांचा संसार. त्याच्या आईने चांगलाच पेलवला. पुढे साध्या तापाच्या निमित्ताने बाप गेला आणि सदाने शिक्षणाचा नाद सोडून छोटीमोठी कामं करायला सुरुवात केली. एका किरकोळ भांडणात धाकटा घर सोडून गेला. आईने होते नव्हते ते दागिने मोडून जान्हवीचं, सदाच्या धाकट्या बहिणीचं लग्न लावून दिलं. फार चांगल नसलं तरी तिचं नीटनेटकं होत सगळं. तशी सदाला तिच्याकडून काही अपेक्षाही नव्हती.
पण आताशा फार वाटाया लागलं होतं त्याला. चार पैसे जास्त कमवावे. थोडी चैन करावी. बायकोला दोन दागिने करावे, पोरांना नवीन कपडे करावे, दोन वर्षातून का होईना, इथेच जवळपास कुठेतरी.... निदान महाबळेश्वरपर्यंत तरी दोन दिवसासाठी जाऊन यावं. पण महादशा राशीला असावी तसा त्याचा सगळा प्रयत्न नेहमी निष्फळच ठरला. हाताला यश म्हणावं अस काही लाभतच नव्हतं. सगळ्या प्रदक्षिणा करून शेवटी नन्नाचा पाढा हाती होता.

"अहो, चहा थंड होतोय. घ्या लवकर. तुमचं उरकलं की तेवढी भांडी उरकेन म्हणते. रात्री तेवढाच बोजा कमी." मालतीच्या आवाजाने त्याची तंद्री भंगली. त्याने चहाचा कप उचलला आणि तो गार चहा आत ढकलला. कसतरीच झालं त्याला. गार चहाचा त्याला कायम तिटकारा. पण आज चुकून घेतलाच त्याने. चेहरा कडवट करत त्याने पाहीलं, सुमी त्याच्याकडे बघून हसत होती. मग तोही हसला. बाहेरचे राग मुलांवर काढायची सवय नव्हती त्याला. इतर काही नसलं तरी निदान त्यांना थोडं हसू तर तो नक्कीच देऊ शकत होता. त्याला हसलेला पहाताच सुमा मनापासून हसली. तिच्या सावळ्या गोबऱ्या गालाला खळी पडली. पोरीने रंग जरी त्याचा घेतला तरी रुप मात्र आईचचं घेतलं होतं. मनू मात्र सगळ्या बाबतीत त्याच्यावरच गेलेला. त्याला शिक्षणाच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या केवळ सुमाकडूनच. पोरगी रंगारुपाने बरी आहे. उद्या कुठे ना कुठे जमेल तिचं..... भरकटल्यासारखं वाटलं सदाला. दहा वर्षाची तर पोर ती.
"अहो, बाबूचा निरोप आला होता. भेटायला बोलावलयं. आठ वाजेपर्यंत या बोलला होता तो." आतून पुन्हा मालतीने त्याच्याशी संवाद साधला.
"बाबू ... ? सांगायचं ना आधीच. एवढा वेळ नुसता बसून गेला माझा. साडेसात झाले बघ इथेच." नकळत त्याचा आवाज चिडका झाला.
"अहो, विसरलेच मी. बसने दहा मिनिटात पोहचाल." मालतीने घड्याळाकडे नजर टाकत त्याला पुन्हा आतुनच सल्ला दिला.
"बरं बरं..." सदानंदाने पटपट स्लीपर पायात घातली आणि तो बाहेरच्या बाजूस वळला. निघताना त्याची नजर दारावरचं सुमीने चिटकवलेल्या, तिच्या नविन घराच्या चित्राकडे गेली. घर कसलं.. चांगला दुमजली वाडाच होता तो. चारही बाजूस कुंपण, आत फुलवलेली बाग, दारापर्यंत गेलेला फरशीबंद रस्ता, भला मोठा वऱ्हांडा आणि त्यात असलेला तो काळा कुळकुळीत लाकडांचा झोपाळा. सगळ्या वैभवाच्या खुणा अंगावर घेऊन तो लाल दगडांचा वाडा दिमाखात उभा होता. सुमीचं नवं घर..... आपलं नवं घर. तो स्वत:शीच हसला. त्याच्याकडे अपलक पाहणाऱ्या मनुला आणि सुमीला टाटा करून तो बाहेर पडला.

बाबू त्याचा जुना हिकमती मित्र. कायम कसल्या ना कसल्या एजंन्सीच्या कामात गुरफटलेला. ’बोल बच्चन’ म्हणायचे सगळे त्याला. होताही हुशार. बोलता-बोलता समोरच्याची टोपी पळवायचं कसब होतं त्याच्या अंगात. या असल्या नाना उद्योगात बरीच माया गोळा केलेली त्याने. अधुनमधुन सदाला त्याने गुलाबी पाण्याची चवही दिली होती. सुदैवाने फुकट मिळाली तरच प्यायची असला दंडक असलेला सदा त्या व्यसनाच्या नादी लागला नाही. चार दिवसापुर्वीच सदाने गोल्डन रेस्टोरंटच्या काळ्या अण्णाच्या साक्षीने व ग्लासाच्या शपथेवर त्याच्यासाठी काहीतरी करण्याजोगं काम बघायची बाबूला विनंती केलेली. बाबूने तारेत त्याला ’मी आहे ना. तू कशाला काळजी करतो.’ अशा थाटाचा शब्दही दिला होता. सकाळी तो ते विसरला असेल ह्याची सदाला खात्रीच होती. ग्लासाची साक्ष ग्लासाबरोबरच संपते हा त्याचा विश्वास. पण अचानक आलेला हा निरोप... हा फोन कदाचित त्याचाच परिणाम असावा असं वाटल सदाला. त्याच्या पावलांचा वेग वाढला व तो बसस्टॉपवर पोहोचला. बरीच गर्दी होती.
"६१८ गेली का ?" आपल्या तुरळक केसांवर फणी फिरवत असलेल्या एका सदगृहस्थाला त्याने विचारलं. डोक्यावर फिरणारी फणी जागीच थांबवून त्या सदगृहस्थाने त्याच्या महत्त्वाच्या कामात विघ्न आणणाऱ्या सदाकडे पाहीलं. मग मोठा पॉज घेऊन तो बोलला.
"नाही." फणी पुन्हा तिच्या उद्योगात रमली. त्याने गर्दीचा व पसरलेल्या रहदारीचा अंदाज घेतला. बाबूचं घर पायी गेलो तर साधारण वीस मिनिटात सहज गाठू असं त्याने स्वत:लाच सुचवलं आणि तो निघालाही. भराभर चालताना त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाल देखील.

काय काम काढलं असेल बाबूने ?.... त्याच असेल की आपलं काही काम होईल ?.... कसलं काम मिळालं असेल ?.... इन्सुरंसचा एजन्ट तर त्याला नको म्हणून सांगितलं होतं. शिवाय मार्केटिंगसाठी लागणारी वाचासिद्धी त्याला अजिबात प्राप्त नव्हती. त्याने उभ्या आयुष्यात कुणाला कधीच काहीही विकलं नव्हतं. तो त्याचा पिंड नव्हताच मुळी. बचत बॅंकेच्या नावाखाली लोकांकडून रकमा जमा करणे म्हणजे अवघडच. तेही मार्केटींगच. लोकांना स्कीम समजवून सांगायची, त्यातले तोटे दडवायचे आणि फायदे तेवढे फुलवायचे. त्याच्या हिशोबी हा म्हणजे फसवणूकीचाच प्रकार. एकाचे दोन व दोनाचे चार असलं एमएलएम म्हणजे त्याच्यासाठी एखाद्या पेंढा भरलेल्या निवांत पक्ष्याचा डोळा फोडण्यासारखं भारी किचकट. नेम चार हात दुरून धरला तरी तो चुकणार याची त्या बाणापेक्षा जास्त सदाला खात्री. इतके पैसे भरा आणि ही सगळी प्रॉडक्टस घ्या. गरज आहे की नाही ते नंतर... आधी घ्या. असलं काही ... नसावं. नसलेलचं बरं..... काय काम काढलं असेल त्याने माझ्यासाठी ?.... काय असेल ?.... काय असेल ?.... खर तर पुढच्या दहा मिनिटात काय ते कळणार होतचं. पण घाणीवर माश्या घोंगाव्या तसे डोक्यात विचार घोंगावयास लागले. स्वत:च्या नकळत सदा स्वत:चा इवलासा व फारसा वापरात नसलेला मेंदू विनाकारण कुरतडायला लागला होता आणि तेवढ्यात तो कुणालातरी धडकला आणि भेलकांडला. पण रुद्राक्षांची माळ मनगटात असलेल्या हाताने त्याला सावरलं. त्याने तो हात घट्ट धरला. त्या हाताने त्याला नीट उभं केलं. क्षण दोन क्षण तरी लागलेच त्याला सावरायला. त्याने समोर पाहील. डोक्यावर जटा, हातात दंड, अंगात भगवी कफनी, कपाळाला भस्म व त्यात रेखलेला तिसरा डोळा, तोंडावरच्या दाढी मिशांमध्ये हरवलेले ओठ, अंगावर अनेक ठिकाणी उमटवलेल्या तीन बोटांच्या पांढऱ्या रेषा आणि ते अफुच्या तारेत असल्यागत वाटणारे लाल गर्द डोळे. पण ते चक्क हसत होते. उजव्या खांद्यावरची झोळी तशी भरगच्च वाटली सदाला. त्याने स्वत:ला आता नीट सावरलं आणि तो पटकन "सॉरी" बोलला.

"काळजीत दिसतोयस पोरा ?" त्याच्या आवाजात स्निग्धता होती. बापानंतर एवढं मायेने कोण बोललं नव्हतच त्याच्याशी. तेही मातृभाषेत. एका अनोळखी माणसाकडून झालेली विचारणा आणि तोही वरपांगी संन्याश्याच्या वेशात असलेला. नेमकं काय बोलावं तेच सुचेना सदाला. तो थबकला.
"घाई करू नकोस पोरा. दोन घटका थांब. प्रश्न सांग आणि उत्तर घेऊन जा" त्या आवाजात आता आत्मविश्वास डोकावला. नकळत धीर गवसल्यासारखं झाल सदाला. त्या गदारोळात, कोलाहलात जणू कोणी तरी त्याला सावरलं होतं. तो हरवेल या भीतीने. सदा स्तब्ध झाला. आता त्याच्या भोवतालचं जग तेवढं वाहतं होतं. तो आणि तो साधू तेवढे एका जागी थांबले होते. अधुनमधुन लागणाऱ्या धक्क्यांकडे दोघांचही लक्ष नव्हतं. त्याबरोबर येणाऱ्या शेऱ्यांना उत्तरे देण्याची गरजही त्यांना वाटत नव्हती. सदा अंधश्रद्धाळू नव्हता. बुवाबाजी, ज्योतिष असल्या गोष्टींच्या नादाला कधीच लागला नव्हता. विश्वास नव्हता अशातला भाग नसला तरी ’हे करा किंवा ते करा आणि मग पहा नशीब कस फिदा होते तुमच्यावर’ अस सांगितल्यावर मग मनात लोभ निर्माण होतोच. मग पुन्हा तीच खर्चाची ओढाताण. नकोच ते..... अजिबात नको.
"त्रस्तावलोय महाराज." पण सदानंदाने त्याची खंत त्या साधुला सांगितली. कुणाला तरी आपली अडचण सांगावी या विचारात होताच तो. दुसऱ्याला सांगितल्याने द:ख हलकं होतं म्हणे. मालतीला काय सांगणार ? इतक्या वर्षात तिला टेंशनशिवाय दुसरं काही दिलचं नव्हतं आणि हे दर महिन्याचे रडे.... जिवाभावाचा म्हणता येईल असा कुणी मित्र नव्हताच. होत्या त्या नुसत्या ओळखी. पण आज मात्र चारचौघात कुणाला आपली व्यथा सहजी न सांगणारा सदा त्या अनोळखी जटाधारी समोर मोकळा झाला.
"जास्त अपेक्षा नाहीत महाराज. पण हाताला चांगला पैसा देणारं काम हवय. मेहनतीची तयारी आहे माझी. पण ओंजळ मात्र काय रिकामीच राहते." साधू हसला.
"तुझ्या प्रश्नाला उत्तर आहे पण ते फुकट देता यायचं नाही. या झोळीत टाक काय तरी. " साधूने त्याच्या खांद्याची झोळी पुढे केली. लाखमोलाच्या प्रश्नाचे उत्तर फुकट मिळेलच कसं ?.... बरोबर आहे त्या साधुचं..... नाहीतरी कधी कुणाकडून काही फुकट घेतलं नाहीच आजवर.. एक ती बाबूबरोबरची दारू सोडली तर.... देऊन तर पाहू.... बघू काय म्हणतोय ते.... सदाने खिशात हात घातला आणि एक दहाची नोट हातात आली. साधुचे डोळे चमकले आणि पहिल्यांदाच जास्त विचार न करता सदाने ती नोट सोडली. लहरत ती नोट त्या साधूच्या झोळीत दिसेनाशी झाली.
"ऐक. एकच कर. आपल्या पितरांची शांती कर. त्याच्या अतृप्त इच्छा तुझ्या मार्गातील अडथळा आहे. त्यांना शांत कर. त्यांना शांत कर. त्यांना शांत कर." साधूचा आवाज हळू हळू कमी होऊ लागला. तेवढ्यात एक जबर धक्का बसला सदाला आणि तो पुन्हा भेलकांडला.
"गर्दीच्या वेळेस रस्त्यात कशाला मरतात हे लोक तेच कळत नाही ? " किंचित बायकी वाटावा असा आवाज. सदाने स्वत:ला सावरले व तो उठून उभा राहीला. साधू...... त्याला त्याच्या जागृत मनाने पहायला सांगितलं. त्याने सभोवार नजर फिरवली. भोवती अविरत वाहणाऱ्या माणसाच्या दाटीशिवाय काहीच नव्हतं. साधुचा मागमुस नव्हता. अज्ञाताचा पडदा फाडून जणू तो फक्त त्याच्यासाठी तिथे आला होता. त्याला त्याच्या सगळ्या चिंता दुर करण्यासाठी उपाय देऊन पुन्हा अज्ञातात नाहीसा झाला. कोण असावा तो ? साधू की आणखी कोण ? शांतपणे चालत सदा रस्त्याच्या कडेला आला आणि फुटपाथच्या एका बाजुला बेवारशाप्रमाणे पडलेल्या एका रिकाम्या लाकडी खोक्यावर विसावला. तो साधू जाता-जाता दहा रुपयात त्याच्या त्या इवल्या मेंदुला नवं काम देऊन गेला. सदाच्या डोक्यात आता साधुने सांगितलं ते घुमायला लागलं.

पितरांची शांती.... गेल्या कित्येक वर्षात वर्षश्राद्धाच्या नावावर केळीच्या पानावर साधं जेवण... नेहमीप्रमाणे घरात शिजणारं, न चुकता त्याने छपरावर ठेवण्याचा त्रास घेतला होता. तेही आईच्या समाधानासाठी. इथे जिवंत माणसांच्या चोचीत टाकायला आधीच मारामार त्यात मेलेल्यांचे चोचले कशाला पुरवायचे ? हा साधा, सरळ व्यवहारी विचार एवढी वर्षे त्याने जपला. यात दोन पैसे वाचताहेत, शिवाय चारचौघात आम्ही अंधश्रद्धा पाळत नाही असा ढोलदेखील वाजवता येतो. सदाने नेहमी अशी या ना त्या मार्गाने आपली सोयच पाहीली. आपल्या वर गेलेल्या पिढ्या जाताना सोबत त्यांच्या इच्छा अपेक्षा घेऊन गेल्या. आता आपल्याकडून त्यांच्या काहीच अपेक्षा नसतील ही त्याची ठाम समजूत. त्यामुळे असल्या गोष्टींचा त्याने कधी विचार केलाच नाही. शिवाय हल्लीच्या पगारात असले नस्ते खर्च करायला लावणारे विचार तो जवळ येऊही देत नव्हता. नाईलाज होता म्हणा. सर्वपित्रीला अर्धे अधिक मित्र श्राद्धात बिजी असले तरी सदा मात्र खाडा करत नव्हता की कोणता विधी करत नव्हता. तशी मालती कधी कधी म्हणायची त्याला,’ बाबांच्या आवडीचं काही असलं तर सांगा, बनवते मी. पानात असलं तर त्यांना तेवढच बरं’. यावर तो निव्वळ हसून म्हणे,’ बाबांना कसलं बर ? त्या कावळ्यांची मजा फक्त. नाहीतरी नेहमी सडलेलं खात असतात. एक दिवस त्यांच्या चोचीत चांगल पडावं म्हणून केलेली सोय ही." पण नाना गोष्टी आता त्याच्या मेंदुत रिंगण करून, फेर धरून नाचू लागल्या. तशी बाबांसारख्या सर्वसामान्य माणसाच्या आवडीनिवडी तर साध्याच होत्या. कांद्याची भजी, भरलं वांग, तळलेला पापड, तांदळाची खीर हे तीन-चार जिन्नस वर्षातून एकदा फार जड नव्हते. करायला काहीच हरकत नव्हती. वाचून वाचून कितीसे पैसे वाचले असतील त्यात ? कांदा-तेल तसं आता महागच. मध्यंतरी तर कांदा सोडलाच होता. अजूनही कधीतरी चुकून येतो घरात. कुठे स्वस्तात असला तरच. तेलाचीही तीच बोंब. भाव कुठच्या कुठे गेलेत.... पण वांगी, पापड परवडायला हरकत नव्हती.. आपल चुकलचं... ज्यांच्यामुळे आपण आलो, हे जग पाहीलं, कडू गोड आयुष्य जगलो.. त्यांचाच विसर पडावा आपल्याला ? हे आपलं चुकलचं. मनानं बजावल सदाला. सदाने बसल्या जागी होकारार्थी मान डोलावून मनाला दुजोरा दिला. आता काहीही करून हे करायचचं. एवढ्याश्या कारणामुळे आपलं आणि आपल्या घराचं किती नुकसान झालंय याचा हिशोब नकळत मनात होऊ घातला. आपल्या असंतुष्ट पितरांचं त्याच्याशी असं वागणं खटकल त्याला. आपली परिस्थिती असती तर केलं नसतं का सगळं मी ? हे तरी कळायला हवं होत ना त्यांना ? उगाच माझ्या कामात खोडा घालून बसले. पण त्यांच तरी काय चुकलं ? त्यांचे वंशज म्हणून त्यांचा आपल्यावर अधिकार आणि पुर्वजांच्या उरलेल्या इच्छा पुर्ण करण्याचा थोडा तरी प्रयत्न करायला हवा होताच. नाही का ? जुनी जाणती माणसं जे सांगतात, ते काय खोटं असेल ? शास्त्र देखील तेच सांगते, असं आई म्हणते. शरीर जळालं तरी आत्मा जळत नाही. तो असतो कुठेतरी भटकत. त्याला काही हवं-नको ते पहायलं हवं होतं. आता दुसरं काही नाही. ही शांती करायचीच. सदाने मनाशी निर्धार पक्का केला आणि तो पुन्हा घराच्या दिशेने चालू लागला.

घंटा एकदा वाजवून सदाने गणपतीला हात जोडल्यासारखं केले आणि आल्या-आल्या हेरलेल्या भटाकडे तो धावला. भटजी नुकतेच सगळं आटपून कुंडल्या बघायला बसलेले. शेजारीच एक बाई दिनवाणी चेहरा करून बसलेली.
"शक्य नाही. नाडी सारखी आहे त्यांची." भटजींनी दोन्ही कुंडल्या जुळवून पाहील्या.
"मग जमणार नाही म्हणता ?" त्या दिनवाण्या बाईनी चेहरा अजून दिनवाणा करत प्रश्न विचारला.
"नाहीच मुळी. नाडी एकच म्हणजे रक्तगट एकच. मुलांच्या आरोग्याचा प्रश्न. शिवाय गुणदेखील फक्त चौदाच जुळताहेत. हे स्थळ सोडा." भटजींनी निर्वाणीचं सांगितल्यावर ती भटजींच्या पाया पडून उठली आणि समोरच्या ताम्हनात दक्षिणा ठेवून ती निघाली.
"ताई, संध्याकाळी या. तुमच्या मुलीशी जुळणारी कुंडली मिळवून देतो. साडे सहाला या. चिंता नको." भटजींनी दिलासा दिला तसा तो दिनवाणा चेहरा जरा खुलला.
"संध्याकाळी येते मी." असं म्हणून ती पुन्हा पाया पडून निघाली. तसा सदा त्यांच्या पुढ्यात जाऊन बसला.
"बोला. काय काम आहे ? " भटजीनी घातलेली मांडी खोलून पायांची जागा बदलली.
"पितरांची शांती करायची आहे." सदाने ’आज सोमवार आहे’ इतक्या सहज सांगितलं.
"विधी करावे लागतील. नारायण नागबळीचे. तीन दिवस चालणारा विधी आहे हा. त्रंबकेश्वरी करणे अत्युत्तम." भटजीनी त्याच्या इतकचं सहज त्याला सगळं आटोपशीर सांगितलं.
"चालेल. पण खर्च किती येईल ? " सदानंदाने मुद्द्याला हात घातला.
"सगळे मिळून बारा ते पंधरा हजार होतील." भटजींनी निर्विकार चेहऱ्याने आकडा सांगितला. फुग्यातली हवा जाऊन तो वेडावाकडा हवेत फिरत कुठेतरी जाऊन पडावा तसा मनात लाख गोष्टी योजून आलेला सदा त्याच्या मनासकट खाली कोसळला. एक शब्द न बोलता तो उठला.
"काय झाले ? " भटजींनी विचारले. शुन्यपणे सदाने भटजींकडे पाहीलं. पण बोलला काहीच नाही.
"बसा." त्यांनी त्याचा हात धरून बसवले.
"पैशांची अडचण आहे का ? " भटजींना आपल्या गिऱ्हाईकांना ओळखण्यास ब्रम्हदेवाची गरज नव्हती. अनुभवाने तेवढं शहाणपण त्यांना आल होतचं. आपल्या चौरंगापलिकडे बसलेला माणूस काही झालं तरी निराश जाता कामा नये व त्याच्या खिशातील दान आपल्या पदरात बिनबोभाट पडलेच पाहीजे हा त्यांचा दंडक.
"चिंता करू नका. केव्हा करायचाय विधी ? " भटजींनी विचारलं आणि सदा लकाकला.
"लवकरात लवकर." सदाने ’आत्ताच्या आत्ता’ अशी अडचणीत आणणारी वेळ सांगितली नाही हे भटजींच नशीब.
"किती पर्यंत बंदोबस्त करता येईल ? " भटजींनी त्याच्यासमोर बोटे नाचवली. पुन्हा घोडे पैशावर अडतेय हे कळलं सदाला.
"जास्तीत जास्त दोन-अडीच हजार करू शकतो. त्यापेक्षा जास्त नाही." सदाने त्याची अडचण कोणाताही आडपडदा न ठेवता सांगितली. भटजी त्या आकड्याने विचारात पडले.
"जरा कठीणच आहे म्हणा. हे म्हणजे बारशाच्या खर्चात लग्नाचा विधी करण्यासारखं आहे." भटजींच्या या वाक्यावर सदा उठू लागला. तसा भटजींनी त्याला पुन्हा बसण्याचा इशारा केला.
"कशासाठी करायचाय हा विधी ?"
"आर्थिक परिस्थिती फारच दयनीय आहे. ढोर मेहनत करतोय, पण हाताला पैसा लागत नाही. एक साधुपुरुषाने सांगितलं की पितर शांत नाहीत, म्हणून यश हुलकावण्या देतय. आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा यातून." सदाने भटजींच्या पायालाच हात लावला.
"असू दे. असू दे. विचार करायला हवा यावर. काम इतकं सोपं नाही. अजून थोडा खर्च शक्य आहे का ? एक हजार पाचशे तरी निदान ? " भटजीने खडा मारून पाहीलं.
"दोन-अडीच हजार सुद्धा उसने घ्यावे लागणार आहेत, भटजी. अजून डोक्यावर घ्यावं म्हटलं तर परवडणारं नाही. याउपर माझी पतही नाही. तुम्ही काहीतरी इलाज काढा. नंतर चार पैसे हाती आले की तुमच्या हातून घरी जंगी पुजाच करू. पण यावेळेस ही नड भागवा." सदानंदाचा मुळचा केविलवाणा चेहरा आता जास्तच केविलवाणा झाला. बोलण्याच्या भरात आपण भटजींना पुजेचे गाजर दाखवले हे त्याच्या लक्षात आलेच नाही. पण भटजी सुखावले. पितरांच्या शांतीने समजा काही झालच नाही, पण ह्याला जर नशीबाने काही मिळालचं तर आजचा तोटा उद्या भरून काढता येईल, हा दुरदर्शी विचार त्यांच्या डोक्यात टप्पल मारत हजर झाला.
"संध्याकाळी ये. नक्की मार्ग काढू यातून." भटजींनी आशेचा एक किरण दाखवला. सदाच्या चेहऱ्यावर हलकेच आनंद पसरला. डोक्यावरचं भारी ओझं उतरवून ठेवल्यावर वाटावं तस त्याला हलकं हलकं वाटू लागलं. भटजींच्या पायांना हात लावून तो देवळाबाहेर पडला आणि त्याने बाबुला फोन केला.

संध्याकाळी तो बाबूकडून उसने घेतलेले तीन हजार घेऊन देवळात हजर होता. भटजींनी त्याला पहाताच समोरच्या सगळ्या कुंडल्या बाजुस सारल्या. सदा समोर येऊन बसला.
"तुमच्या प्रश्नावर विचार केलाय. शास्त्रात उपाय आहेत. देवा ब्राम्हणांनी सगळ्यांचा विचार करुनच लिहीलय म्हणा ते. तुमचे विधी व्यवस्थित होतील. पण कमीत कमी तीन हजार तरी लागतील. तेवढी सोय करा."
भटजीने भात्यातला पहिला बाण काढला.
"घेऊनच आलोय. हे बघा." सदाने खिशातले पैसे समोर ठेवले आणि भटजींच्या घाऱ्या डोळ्यात नोटा भरल्या. त्यांनी नोटा उचलून मोजायला सुरुवात केली.
"येत्या गुरवारी उत्तम योग आहे. नारायण बळीचे विधी पुरेसे आहेत. नागबळीसाठी सोन्याचा नाग लागतो. ते करण्याची तुम्हाला गरज नाही. तेव्हा गुरवारी सकाळी या. मी सगळी तयारी करतो. पण हे कुणाला सांगायचे नाही. तुमच्या-माझ्यात राहायला हवे." भटजी मोजलेल्या नोटा चौरंगाच्या ड्रॉवरमध्ये ढकलल्या.
"तुम्ही सांगाल तसं." सदाच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं.

गुरुवार आला आणि भटजींच्या म्हणण्याप्रमाणे नारायण बळीचे विधी पुर्ण झाले.

मालतीची स्वयंपाकघरात आवराआवर चालू होती. त्यात अधुनमधुन आईच्या सुचना चालूच होत्या. सुमा खाली गाढ झोपली होती आणि मनू सदाच्या कुशीत एक पाय व हात त्याच्या अंगावर टाकून निद्राधीन झालेला. सदानंदाने डोकं उशीवर टेकवलं. आज एका मोठी जबाबदारी त्याने पार पाडली होती. त्याच्या पितरांची शांती झाली होती. आता भटजींनी सांगितल्याप्रमाणे सगळं सुरळीत होणार होतं. त्याच्या मार्गातले सगळे अडसर दुर होणार होते. जन्मापासून चालू असलेली अडथळ्यांची शर्यत संपणार होती. आता फुलबागेत लहरत जावं असं आयुष्य या रात्रीच्या गर्भात जन्म घेऊन उद्याची सुवर्णसकाळ घेऊन येणार होते. सगळी सुखं हात जोडून समोर उभी राहणार होती. त्याला काय हवं... काय नको हे हिरीरीने विचारणार होती.... विचारांच्या या सुखद गर्तेत त्याचे डोळे जड होऊ लागले आणि तो लहरू लागला एक हिंदोळ्यावर...... काळ्या कुळकुळीत लाकडाच्या झोपाळ्यावर... झोपाळा पुढे मागे हेलकावत होता.... झोपाळ्याची अलवार कुरकुर सुखावह होती. वाऱ्याच्या मंद झुळकी बागेतल्या फुलांचा मंद सुगंध लेऊन त्याच्या अवतीभवती रुंजी घालत होत्या. सुर्याची कोवळी सोनेरी किरणे त्याच्या सर्वांगाला गुदगुल्या करत होती. रखवालदारासारख्या उभारलेल्या अशोकाच्या झाडातून पानांच्या सळसळण्याचा आवाज एक ताल धरत होता. पक्ष्यांचा किलबिलाट त्या तालावर सुर धरत होता. सगळा आसमंत आपली तान समेवर नेण्यास उत्सुक होता. झोके घेता घेता सदानंदाने समोर पाहीलं. दाराजवळच मालती तोंडावर पदरासह हात धरून हसत होती. आतून आईच्या जपाचा आवाज येत होता. डाव्या बाजूस हाताची घडी व मान खाली घालून उभ्या असलेल्या बामनेकडे वळली सदाची नजर. गजानन संखे शेजारीच पिकदाणी घेऊन तत्पर उभा होता. पलिकडे बाबू टिपॉयवर हातातला चहा-बिस्किटांचा ट्रे ठेऊन सदानंदाच्या पुढच्या आदेशाची वाट पहात होता. अंगणात मनू आणि सुमाचा चेंडूचा खेळ रंगला होता. सदानंदाने एकवार त्यांच्याकडे पाहीलं आणि मनूने ’बाबा...’ म्हणत चेंडू त्याच्याकडे फेकला. बसल्या जागेवरून सदानंदाने झेल घ्यायला हात पुढे केला आणि....

समोरचा मनू पाठच्या फटफटीत प्रकाशात दिसेनासा झाला. अचानक उजेड झाल्यावर डोळे दिपावे... तसं काहीसं झालं. आता मनूच्या मागोमाग सुमादेखील नव्हती तिथे. प्रवेशद्वाराच्या लोखंडी गजांना गंज चढू लागला. त्याच्या सोनेरी रंगाएवजी तिथे सडलेले लोखंडाचे भंगार दिसू लागले. कुंपणावर अमरवेल वेड्यासारखी वाढू लागली. पायवाटेची फरशी तडकू लागली. जसजसे चरे पडत गेले तसतसे त्यातून गवत.. तण.. जंगली झुडपे उगवत गेली. फुलं गळून पडायला लागली व रोपटी उभ्या उभ्या वाळायला लागली. बघता-बघता अंगणात पुरुषभर उंचीचं रानगवत फोफावलं. सदानंदाला एव्हाना दरदरून घाम फुटलेला. वाचा जावी तशी अवस्था. तोंडातून शब्द फुटत नव्हता. जणू दातखीळच बसलेली. तो वऱ्हांड्याकडे वळला. वाळवी लागावी तसा टिपॉय जागच्याजागी माती झाला. वरची क्रोकरी त्यात मिसळत गेली. बाबूने त्याच्याकडे पाहून दात विचकले आणि तिथल्या तिथेच तो दलदलीत रुतावा तसा त्या जमिनीत रुतत गेला. त्याचं दात विचकणं मात्र चालू होतचं. हाताची घडी सोडून बामनेंनी मान वर केली. लाल गुंजासारखे त्यांचे डोळे जणू आग ओकत होते. मुठी वळल्या होत्या. चेहरा एखाद्या हिंस्त्र लांडग्यासारखा वाटत होता. त्यांनी तोंड उघडलं आणि त्यातून आगीच्या ज्वाला त्यांच्या शरीरभर ओघळल्या. मेणाच्या पुतळ्यासारखं शरीर वितळायला लागलं त्यांचं. काय घडतय... काय होतय... ते सदानंदाला कळेना. शरीराचं धुराडं झालेल्या संखेकडे त्याने पाहीलचं नाही. त्याचं लक्ष वेधून घेतलं ते आईच्या जपाच्या बदललेल्या भयानक स्वरांनी आणि पाठोपाठ मालतीच्या भेसूर हसण्याने. दाराला टेकून उभी मालती रेतीवाळूसारखी त्या भिंतीत विरघळत होती. ती पुर्ण विरघळली तरी ते भेसूर हसणं अजूनही होतं. सर्वत्र आता डबक्यातल्या हिरव्या पाण्यासारखा काळोख साचू लागला. सुर्य केव्हाचा नाहीसा झालेला. एक उग्र हिरवट दर्प सदाला विळखा घालू लागला. भिंतीचा लाल रंग आता ओघळायला लागला होता. ते लाल ओघळ रक्ताच्या ओहोळासारखे सगळ्या वऱ्हांड्यात पसरत गेले आणि मग हळूहळू अंगणभर. भिंतीचे पोपडे पडू लागले. एखाद्या भंगलेल्या... जीर्ण वास्तूची अवकळा त्याला आली. भेगाभेगातून झाडाझुडपांची मुळं वळवळू लागली. झोपाळा मात्र अजूनही हलत होता. कुरकुर वाजत होता. सदानंद मात्र एखाद्या स्तब्ध पुतळ्यासारखा त्या क्षणात बदलणाऱ्या देखाव्याकडे वेड लागावं तसं पहात होता. तेवढ्यात हातात हालचाल जाणवली. त्याने हातातल्या चेंडूकडे पाहीलं. चेंडूएवजी हातात एक खदखदणारी कवटी होती. दुसऱ्याच क्षणाला त्या कवटीने तोंडाचं बोळकं उघडले आणि ती त्याच्या हातातून निसटली. रक्ताच्या ओहोळातून घरंगळत जाऊ लागली. झोपाळ्याचा वेग वाढला. घाबरून त्याने दोन्ही हातांनी झोपाळा घट्ट धरला आणि लाकडाचे पोखरलेले तुकडे त्याच्या हातात आले. झोपाळ्याच्या फळ्या कडाकडा मोडू लागल्या, पण तो अजूनही झोपाळ्यावरच होता. खाली पसरलेल्या ओहोळाला छेदत पांढूरक्या सावल्या वर येऊ लागल्या. त्याच्या चहू दिशेने. झोपाळ्याच्या कड्या गंजल्या तरी शाबूत होत्या, पण वेग आता मंदावला होता. त्या सावल्या त्याला वेढून होत्या. जोरात ओरडावं.... कुणाला तरी मदतीला बोलवावं.... शक्य झाल्यास तिथून पळून जावं असं वाटत होत सदानंदाला. पण एकही कृती घडत नव्हती. त्याचा त्याच्या पंचेद्रियांवरचा ताबा संपलाच होता जणू. त्या सावल्या आता जवळ आल्या. न राहवून त्याने त्यात चेहरे शोधण्याचा प्रयत्न केला. हळूहळु त्यातल्या एक-दोन सावल्याचे चेहरे त्याला जरा ओळखीचे वाटू लागले. हे बाबा.... नक्की तेच.... आणि आजोबा......, ही कदाचित आजी...... तीच..... बाकीचे चेहरे त्याला ओळखताच येईना.... पण चेहरे त्याच्या जवळ येतच होते. दोन फुट अंतरावर पोहोचले आणि.....

तो दचकून टक्क जागा झाला. त्याला आता फक्त त्याच्या स्वत:च्या श्वासांचा आवाज येत होता. समोर छत होतं. नाईटलॅम्पच्या उजेडात छतावर काही सावल्या नाचत होत्या. क्षणभरात त्याला त्यात अनेक आकार दिसू लागले. भयानक असे. त्याने आपला चेहरा चाचपला. घामाने डबडवला होता. घशाला कोरड पडल्यासारखं वाटलं त्याला. जे पाहीलं ते फारच भयानक होतं. नशीब ते स्वप्न होतं. खरोखर कधी असं घडलं तर श्वास जागीच कोंडला असता. त्याने पाणी पिण्यासाठी उठायचा प्रयत्न केला. पण हलताच आल नाही त्याला. जागच्या जागी जखडला गेला होता तो. हात पाय हलत होते तरीही शरीर साथ देत नव्हते. त्याने मालतीला आवाज देण्यासाठी मान वळवली आणि दचकलाच तो. कारण त्याने जे पाहीलं ते सगळचं स्वप्न नव्हतं. तो एकटा नव्हता. ते चेहरे, त्या पांढऱ्या सावल्या अजूनही त्याच्या भोवती तस्याच होत्या. त्यांची हालचाल आता मंदावली होती. वाऱ्यावर पडदे लहरावे तसे ते जागच्या जागी लहरत होते. सदानंदाने स्वत:ला संयत करण्याचा प्रयत्न केला. धावणाऱ्या श्वासांवर नियंत्रण मिळवलं. त्याने तो कुठे आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला. पण त्या अंधारात त्या पांढऱ्या सावल्यांशिवाय दुसरं काही नव्हतचं. पण त्याला त्याच्या अंगाखाली त्याच्या त्या नेहमीच्या खाटेचा स्पर्श ओळखता आला. आपण आपल्याच घरात आहोत ही जाणिव त्याला धीर देऊन गेली. काही झालचं तर आजुबाजुला आपली माणसं आहेत.... असतील तर ते काळजी घेतील. त्याने हाताने मनुला चाचपले, पण मनू नव्हताच तेथे. मनू कोठे गेला ? अंगावर हात पाय टाकून झोपलेला तो. खाली झोपला असेल. मालतीकडे किंवा आजीकडे. सदानंदाने आता स्वत:वर पुर्ण नियंत्रण मिळवलं. तो त्या सावल्याकडे पाहू लागला. त्याशिवाय दुसरं काही करता येण्याजोगं नव्हतच त्याच्या हातात.
"का जागवलसं आम्हाला ? " त्याच्या बाबांचा चेहरा असलेली सावली बोलली. फार दुरून आल्यासारखा वाटला तो आवाज सदानंदाला.
"शांती ..... शांती करायला." सदानंदाच्या तोंडून शब्द बाहेर पडले.
"शांती ? .... उरकलेल्या विधींना तू शांती म्हणतोस ? कुण्या कुडमुड्या साधूच्या नादाला लागून तुझ्या असफलतेचं खापर तू आमच्या माथ्यावर मारून मोकळा झालास. आमच्या अतृप्त जीवांना विनाकारण आवाहन केलेस आणि त्यात नसत्या कष्टांची भर घातलीस." आवाजातल्या संतापाच्या झळा जाणवल्या सदानंदाला. भीतीची सर्द लहर दौडत गेली नसातून.
"पण माझा हेतू शुद्ध होता." सदानंदाने आपली बाजू मांडायचा प्रयत्न केला.
"असेल, पण तुझ्या अर्धवट विधीने आमच्या मोक्षाचे उरलेसुरले मार्गदेखील खुंटलेत. आता तुला आमच्या सोबत यावं लागेल. केल्या चुकांचे परिणाम भोगायलाच हवेत. हा नियम आहे. चल." सावल्या वळल्या.
"पण माझी काहीच चुक नाही. मी तुमच्यासाठीच हा प्रयत्न केला होता." सदानंदाने पुन्हा आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
"आमच्यासाठी ... की स्वत:साठी? तुझ्या हलाखीच्या परिस्थितीमुळे आम्ही कधी तुझ्याकडून कसल्या अपेक्षाच केल्या नाहीत. आमचा वंशज तू. तुझ्या प्रगतीच्या आड आम्ही आहोत असला नतद्र्ष्ट विचार तुच तुझ्या मनात आणलास आणि फक्त जागवलसं आम्हाला. साधी उदकशांतीही केली नाहीस. " ते सगळेच फुत्कारत असल्याचा भास झाला सदाला.
"सांगण्यात आल ते सगळं मी नीट केलं. मनापासून केलं." सदा काकुळतीला आला.
"असेल. पण आता येणं भाग आहे." सावल्या एकमेकांकडे वळल्या. जणू काही एकमेकांशी चर्चा करत होत्या.
"मला येता येणार नाही. माझ्यावर सगळ्यांच्या जबाबदाऱ्या आहेत." त्याने शेवटचा प्रयत्न केला.
"आमच्यावरही होत्या. तुझ्यासारखी चुक केली नाही पण कधी. तरीही जावचं लागलं. आता तुला याव लागेल. तुझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही." आता त्या आवाजात बर्फासारखी थंड धार होती. काळीज हललं सदाचं आणि आपल्या शरिराला पिसासारखं हलकेपण लाभलं हे जाणवलं सदानंदाला. त्या सगळ्यांच्या मागे तो निघाला. का ? कुठे ? ... असलं काहीच विचारायचं धारिष्ट्य केलचं नाही त्याने. अनिच्छेने असला तरी तो प्रवास आता क्रमप्राप्त होता. केली चुक भोगावी लागणार होती.

ते सगळेच थांबले आणि सदाही. त्याने काळोखात शक्य तेव्हढा डोळे फाडून पहायचा प्रयत्न केला. पण अंधाराशिवाय काहीच दिसलं नाही.
"सदानंदा, तुझ्या केल्या कृत्याची भरपाई तुलाच करायची आहे. चल कर." सदानंदाने सावल्यांकडे व मग त्यांच्या इशाऱ्यांकडे पाहीलं. थरकाप झाला त्याचा.
"हे शक्य नाही. मला जमणार नाही."
"हे करावचं लागेल, सदानंदा. याला पर्याय नाही. आम्ही आमचे कायदे मोडू शकत नाही. चल हो पुढे. याशिवाय तुझी सुटका नाही." आवाजात जरब होती. सदानंदाने त्यांच्याकडे पाहीलं पण तो जागचा हलला नाही आणि सगळे त्वेषाने त्याच्याकडे झेपावले. क्षणार्धात त्याचं शरीर त्याचं राहीलच नाही आणि पुढच्याच क्षणी तो त्या सगळ्या अतृप्त इच्छांसकट समोर तुटून पडला. त्यांच्या पंज्यात निवांत झोपलेल्या भटजींचा घोरणारा गळा होता.

गुलमोहर: 

छान आहे कथा. एका गरीब पापभीरु माणसाची विचार करण्याची पद्धत , त्याचे रोजचे आयुष्य, त्याची अगतिकता छान टिपली आहे.

घराच आधीच आणि नंतरच केलेल वर्णन अप्रतिम... जबरदस्त कल्पनाशक्ती

जबरदस्त वातावरण निर्मिती ! आणि अनपेक्षित शेवट ... आवडली कथा ..

वातावरण निर्मिती वगैरे नेहेमी प्रमाणे सहीच....पण मलाही नाही आवडली ही कथा.

मध्यापर्यंत चांगली वाटली.. त्याच त्या supernatural गोष्टी आल्यावर कंटाळा आला.. Sad

आमचा वंशज तू. तुझ्या प्रगतीच्या आड आम्ही आहोत असला नतद्र्ष्ट विचार तुच तुझ्या मनात आणलास ...>>>

सही.

सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

वातावरण निर्मिती वगैरे नेहेमी प्रमाणे सहीच....पण मलाही नाही आवडली ही कथा.>>>

ह्म्म्म!

Light 1

Searching for guaranteed search engine optimization services at affordable rates? Your search ends here!!! Find your website on the top of popular search engines with our seo services...

कौतुक, तुमच्यासारखी वातावरण निर्मिती करणं कोणालाच जमत नाही, जबरदस्त कथानक...नेहमीसारखंच! खुप सही!

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

कौतुक, कथा आवडली.खासच ! Happy
________________________________________________
~(प्रकाश)~