कोटीच्या कोटी- भाग-३

Submitted by मानस६ on 30 December, 2007 - 11:53

कोटीच्या-कोटी: भाग-३

* आम्हाला मराठी व्याकरण शिकवायला एक सर होते- ते खूप ठेंगणे होते. ते वर्गात आले की काही वात्रट मुले " अरे, ते बघ ’लघु-गुरु’ शिकवायला ’लघु’असलेले ’गुरु’ आलेत" असे म्हणायचे.
****************************
* "मधु-मेह झाल्यामुळे आपल्या अंगात ’(इन्शु)लीनता’ हा गुण आल्याचे बाबुराव गमतीने म्हणतात.
****************************
* अभ्यासाला कंटाळलेला आमच्या शेजारचा एक विद्यार्थी परीक्षेला जाताना " कधी एकदा त्या प्रश्नांचे ’उत्तर-कार्य’ पार पाडतो, असे मला झाले आहे" असे वैतागाने म्हणत असतो
****************************
* ’चरखा संस्कृतीचा’ वारसा सांगणाऱ्या, बहुतेक जणांची संस्कृती आता केवळ ’चर’ आणि ’खा’ ही झाली आहे
****************************
* अमेरिकेत राहून कंटाळलेली माधुरी दिक्षीत आपल्या नवऱ्याला "ने मजसी ने, ( अरे, नेने) परत मातृ-भूमीला" असे तर म्हणत नसेल ना?
****************************
* कल्याणच्या ’अनंत हलवाई’ ह्यांच्या दुकानातील मिठाईची ताटेच्या ताटे बघुन मला ’अनंता, तुला कोण खाऊ शके’ असे म्हणावेसे वाटते.
****************************
* एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते "ओम-ओम" ह्या ऐवजी "रोम-रोम" असा जप करताना आढळले..त्यामुळे त्यांचा ’रोम-रोम’ पुलकित होतो असे कळले...आणि हो; ’होम’ सुद्धा ’होम’ खाते मिळण्यासाठी करतात म्हणे!
****************************
* एका वाहिनीने ’सातच्या आत घरात’ हा चित्रपट ’रात्री अकरानंतर’ दाखविला!
****************************
* लीलाताई इतक्या भक्ति-भावाने भगवान शंकराला बेल वाहतात की त्यांचे पतिदेव (योगायोगाने शंकररावच) गमतीने " आता शंकर प्रसन्न होणारच; त्याच्या नावाने ’नॉन-बेलेबल’ वॉरंट जे निघाले आहे" असे उदगारतात.
*****************************
* आमचा एक खूप खादाड मित्र हिंदुस्तान-लिव्हर मधे कामाला आहे. त्याला " लेका, तू इतका खातोस ह्याचे कारण सगळ्या हिंदुस्तानचे लिव्हर तुला मिळाले आहे" असे गमतीने म्हटल्या जाते.
******************************
* आमचा एक खूप आळशी मित्र घरातील पंखे, कधी नव्हे ते, साफ करताना बाबूजींच्या स्टाईलमधे " एकवार पंख्यावरुनी फिरो तुझा हात" असे मोठ्याने म्हणत असतो.
********************************
* मिस्कील नेहा, रिमिक्सच्या सी.डी.ज ’बर्न’ करताना, "सी.डी. जलईले, जिगरसे पिया.." असे बिपाशा-स्टाईलने म्हणत नाचत असते.
*******************************
* नितीनच्या टेबलावर फाईल न केल्या गेलेल्या डिलीव्हरी-चलान साठत गेल्या की, राघवन त्याला " अरे तुझा ’चलन-फुगवटा’ नियंत्रणात आण रे" असा टोमणा मारत असतो.
********************************
-मानस६

गुलमोहर: