मराठी चित्रपट "तुंबाडची मंजुळा" - निरीक्षणे
क्रमांक १) मध्ये चार ओळीत स्टोरीलाईन सांगतो. माझ्यामते त्यात स्पॉइलर नाहीये. तरी शंका वाटल्यास किंवा चित्रपट बघताना मनाची पाटी अगदी कोरी हवी असल्यास क्रमांक २ वर उडी मारा.
----
१) थोडक्यात कथानक - चित्रपटाचा हिरो ओम भुतकर रात्रीच्या अंधारात एक कांड करतो. पकडले जाणार असे वाटते तेव्हा अंगात भूत शिरल्याचे नाटक करतो. भूत म्हणून एका बाईचे नाव घेतो ते मंजुळा. गंमत अशी होते की शेजारच्या गावात त्याच नावाची बाई खरोखर वर्षभरापूर्वी मेलेली असते. तिची मुलगी सई ताम्हणकर आईच्या भुताला मोक्ष मिळवून द्यायला येते. पण सोबत तिचे काही प्रॉब्लेम्स घेऊन येते. ज्यातून आपली आई आपल्याला सोडवेल अशी अपेक्षा घेऊन येते. पण आईचे भूत तर प्रत्यक्षात नसते. मग ते प्रॉब्लेम सुटतात की नाही आणि सुटल्यास कोण सोडवते यासाठीच तर बघायची आहे तुंबाडची मंजुळा!
--------
आता परीक्षणाकडे वळूया,
२) पूर्वार्ध पूर्ण कॉमेडी आहे. माझ्या थिएटरमधील लोकं नॉनस्टॉप खिदळत होती. हाऊसफुल असल्याने जरा जास्तच.
(अरे हो, मी मंगळवारी चित्रपट बघायला गेलो होतो. फक्त ९२ रुपये तिकीट होते. त्यामुळे अगदी पहिली A रांग सुद्धा हाऊसफुल होती. एवढ्या पब्लिकसोबत पिक्चर बघायची एक वेगळीच मजा. ती सुद्धा मराठमोळी पब्लिक. कपल वगैरे फाफटपसारा नाही, जे हसतात कमी आणि लाजतात जास्त)
असो, पण तरीही दुर्दैवाने मला इतरांच्या तुलनेत कमी हसायला आले. असते एकेकाची आवड.
तसा मी फार उच्च अभिरुचीच्या विनोदावरच हसतो अश्यातला भाग नाही. पण मासला आवडणाऱ्या विनोदामध्येही प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. तरी हसणाऱ्यांचे बहुमत पाहता चित्रपट धमाल विनोदी आहे असे आपण (माझे वैयक्तिक मत बाजूला ठेवून) म्हणू शकतो.
३) उत्तरार्धात सई ताम्हणकर एन्ट्री घेते आणि जो इमोशनल अँगल असलेला ड्रामा सुरू होतो., मला तो जास्त आवडला. दोन तीन दृश्यात डोळे पाणावले. जिथे माझे डोळे पाणावतात ते मला भावते. व्हायसे वर्सा सुद्धा म्हणू शकतो. त्यामुळे उत्तरार्धात आलेले प्रासंगिक विनोद सुद्धा भावले. कारण तेव्हा सोबत कारुण्याची झालर जोडली गेली होती. पूर्वार्धात फार एकसुरी झाले होते असे वाटले. त्यामुळे एडिटिंग करताना तिथे काटछाट करता आली असती आणि उत्तरार्ध वाढवला असता तर बरे झाले असते असे अजून एक वैयक्तिक मत.
४) सई ताम्हणकर! अगदी पूर्वीपासूनच मी हिच्या प्रेमात होतो.
आहे नाही, होतो... कारण आता नव्याने पडलो आहे 
जेव्हा ती नवीनच आली होती तेव्हा मी सुद्धा वयात येत असल्याने ती माझ्या क्रश लिस्टमध्ये होती इतकी आवडीची अभिनेत्री. (मायबोलीकरांना वेगळे सांगायला नकोच) तिच्यावरून तेव्हा बरेच चिडवणे झेलले आहे. पण आजच्या तारखेला जेव्हा त्या गुलाबाचे असे "गुलकंद" बघायला मिळते तेव्हा आत काहीतरी सुखावते. वर उल्लेख केल्याप्रमाणे या चित्रपटात जेव्हा जेव्हा डोळे पाणावले आहेत समोर पडद्यावर सई होतीच!
ज्याच्या अंगात भूत आले तो भुतकर, गावचे तडफदार व्यक्तिमत्व जोशी जितेंदर, मांत्रिकाच्या भूमिकेत अनासपुरे मकरंद आणि अध्येमधे तडका देणाऱ्या आज्जी उषा नाडकर्णी अशी दिग्गज कलाकारांची फौज एकेका भावखाऊ भूमिकेत असूनही चित्रपट मध्यंतरानंतर एन्ट्री घेतलेल्या सईपाशी येऊन थांबतो. तिच्या कॅरेक्टरने आणि त्याला साजेश्या तिच्या अभिनयाने चित्रपटाला डेप्थ येते.
५) "हे देवा मला पाव की रे.., की देवा घे धाव की रे.." हे गाणे ऐकताक्षणीच भिडते. समान आशयामुळे "देवाक काळजी" गाणे आठवले. पण त्याच्याशी तुलना नको. ते प्रचंड आवडीचे आहे. अजय यांच्या आवाजात अतुलनीय आहे. पण हे गाणे भिडते आणि सईच्या चित्रपटातील आयुष्याशी आपल्याला जोडते.
६) "वेड्या मनाचं, वेड्या मनाला, वेड लागू लागलंय पुन्हा.." हे गाणे सुरू झाले आणि हळूवार आत झिरपत जाणारा हा नवा गोड आवाज कोणाचा याची उत्सुकता वाटली. घरी आल्यावर उत्साहाने चेक केले पण पदरी निराशाच पडली. जुनाच खिलाडी होता. गायक हरिहरन निघाले. आपल्याला आवाजाचा कान आहे एवढेच काय ते समाधान मिळाले.
७) बाकी इतर गाणी सुद्धा चांगली आहेत. काही न आवडलेल्या विनोदांनी मला असह्य झाले असेल पण गाण्यांनी बिलकुल झाले नाही. पण ती तुमची तुम्ही शोधा. गाण्यांची आवड सुद्धा प्रत्येकाची वेगळी असते.
उदाहरणार्थ, सैराट मधील झिंगाट गाण्याचे यात एक तर्राट वर्जन आहे. अर्थात झिंगाटची सर येणे अशक्यच, पण काय माहीत खरोखरचे तर्राट झालेले यावरही तितक्याच भक्तिभावाने झिंगतील..
८) हा चित्रपट कन्नड ब्लॉकबस्टर 'सु फ्रॉम सो' ('सुलोचना फ्रॉम सोमेश्वर' ) या चित्रपटाचा ऑफिशियल रीमेक आहे. तो चित्रपट हिंदी डब मध्ये उपलब्ध नसल्याने कोणी बघितले असण्याची शक्यता कमीच. तरी हे फक्त माहितीसाठी म्हणून सांगितले आहे. आपल्याला दोन्हींची तुलना करायची काही एक गरज नाही. आपल्या चित्रपटाचा बाज मराठी आहे आणि ती मराठी मातीतीलच कथा वाटते इतके आपल्यासाठी पुरेसे आहे. कोकणात घडते कारण त्यामुळे कदाचित भूतांवर एखाद्याचा चटकन विश्वास बसावा. अन्यथा महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावात घडणारी अशी कथा आहे. त्यात कोकण शोधायला जाऊ नये. ते कुठे दिसलेच नाही. बाकी भूताखेतानवर विश्वास असेल नसेल आपापल्या जबाबदारीवर बघून घ्या.
-- तुमचा अभिषेक

सो ने री
सो ने री
अहो थिएटरमध्ये लोकं फार हसत
अहो थिएटरमध्ये लोकं फार हसत होते. पण मला अपवाद वगळता तितके हसायला येत नव्हते. म्हणून माझे वैयक्तिक मत बाजूला ठेवून असे म्हटले. विनोदापेक्षा मला त्यातला इमोशनल भाग आवडला होता.
काल जरा उशिरानेच आणि तोही
काल जरा उशिरानेच आणि तोही फक्त उत्तरार्ध पाहिला.
कोकण कुठेही, कसेही जरी दृष्टीसमोर आले तरी अतिशय शांत आनंद आणि सुकून देत रहाते ; त्यामुळे आधीच मन हा चित्रपट पाहायला सज्ज झाले
आणि त्यातून कोकणातली घरे , तिथले रस्ते आणि एकूण तिथले सगळे वातावरण पहात पहात ही गोष्ट बघण्यात मजा आली !
कल्पना अतिशय छान आहे; पण दोन-तीन गोष्टी नमूद कराव्याशा वाटल्या!
पटकथा नीट जमलेली नाही
यातले कोणीही अभिनेते कोकणातले किंवा अशी अंधश्रद्धा वगैरे बाळगणारे भोळे , तसं म्हटलं तर थोड्या मागास वातावरणातले वाटत नाहीत
पडद्यावर विनोद निर्मिती करणे हे तितके सोपे काम नाही महाराजा ; ते बिलकुलच् जमलेले नाही
कंटारा हा सिनेमा ; मंजुळा तयार करणाऱ्या लोकांनी आधी बघितला असता तर त्यांच्यासमोर एक दर्जेदार उदाहरण तरी राहिलं असतं
एकूणात ठीक ठीक इतपतच म्हणावा असा चित्रपट
काल जरा उशिरानेच आणि तोही
सई बद्दल काही लिहिले नाही तर लेखकाला राग येईल म्हणून इतकंच लिहितो की तिच्याबद्दल या चित्रपटाच्या संदर्भात मुद्दामून लिहिण्यासारखे काहीही नाही !!
शेवटचा प्रतिसाद
शेवटचा प्रतिसाद
पशुपत
पशुपत
आता तुम्ही सईसाठी अडकित्ता बघा आणि किंवा बघितले असल्यास त्यावर मत मांडा
Pages