ममांची माकु

Submitted by संघमित्रा on 28 December, 2007 - 01:38

एकदाची दिवाळी संपली. भरपूर फराळाचे पदार्थ रांधून आणि खाऊन झाले. स्वतःच्या आणि इतरांच्या हातचेही
(खरंतर हेच जास्त). आणि मला अचानक हे जग असार आहे हे जाणवायला लागलं. कशातच काही रस वाटेना. काहीच
करावंसं वाटेना. नुसतं पडून रहावं तर जऽऽऽरा बरं वाटे पण मग एकूणच आपण जगतोयच कशासाठी वगैरे
वैराग्यरसपूर्ण विचार मनात यायला लागले. एखाददोन दिवसात बरं वाटेल म्हणून वाट बघून पण काही उपयोग होईना
तेंव्हा हे मी घाबरून नवर्‍याला सांगायला लागले. तर तो म्हणाला हात्तिच्या म्हणजे नेहेमीचंच आहे की. आता तेही
थोडसं बरोबरच आहे म्हणा. एकूणच..
पण असो. तर आम्ही माझ्या नेहमीच्या डॉक्टरकडे निघालो. तुलिका, ही माझी अल्ट्रा फॅशनेबल डॉक गायनॅकॉलॉजिस्ट आहे.
आता संसार असार वाटल्यावर गायनो कशाला? असं तुम्हाला वाटत असणार. (किंवा नसलं वाटलं तरी मी आता सांगायला सुरू केलंच आहे तेंव्हा थांबणार आहे होय?)
तर...
तर एकदा हात खूप दुखायला लागला. तेंव्हा माझ्या एका कलीगने " दुर्लक्ष करू नकोस हां. हात दुखत असेल तर हार्टचा
पण प्रॉब्लेम असू शकतो. जिपी कडे न जाता स्पेशलिस्टकडे जा. " हा मौलिक सल्ला दिला. मग आता इथं स्पेशलिस्ट कोण आहे म्हटल्यावर तिनंच हिचा पत्ता सांगितला. म्हणाली " अगं स्पेशलिस्ट असलं की झालं. हार्टचं आहे असं कळलं
तर मग हार्ट स्पेशलिस्ट कडे जाऊ म्हणे. " हे सांगून घाबरवून सोडलं होतं.
आणि " अर्थात नसेलच गं हार्टचं काही. पण हल्ली हे सॉफ्टवेअर मधे फार झालंय ना यंग एजमधे अटॅक यायचं.
आपल्या ऑफिसात दोन महिन्यातला एक तरी टू मिनिटस सायलेन्स अंडर थर्टी हार्ट फेल चा असतो. " हे अजून वर.
म्हणून मग पळतपळत हिच्याकडे आले. मग कळले की हार्टच्या प्रॉब्लेम ला जनरली डावा हात दुखतो, म्हणजे
हार्ट डावीकडे असेल तर. हिचं हार्ट डावीकडेच आहे हे नवर्‍यानं ठासून सांगितलं. मग माझा हात माऊसमुळे दुखत
असणार असा मोठ्ठाच शोध लागला. खूप दिवसांनी काम आल्यामुळे माऊस चा अतिरिक्त वापर झाला होता एकदम.
एकूण या प्रकारामुळे तुलिकाशी मैत्री झाली. आणि आता ही माझी डॉक्टर कमी आणि मैत्रीण जास्त. तिच्याशी बोललं की औषध न घेताच बहुतेकदा मी बरी होते. नवर्‍याच्या मते अर्थातच बहुतेकदा मला काही फारसं झालेलंच नसतं.
" त्यापेक्षा तू तिला घरी जेवायलाच बोलवत जा ना. म्हणजे तिलाही बरं वाटेल आणि आपलाही पैसा वाचेल. " नवरा. दुसरं कोण?
पण हॉस्पिटलात गेल्याशिवाय तो फील येत नाही ना. ते आपलं उगाचच हॉटेलातलं जेवण घरी मागवून खाल्ल्यासारखं वाटेल. हॉटेलच्या बिलात खरे चार्जेस तिथल्या ऍंबियंसचे असतात हो की नाही? म्हणून मग नेहमीप्रमाणे अपॉईंटमेंट घेऊन गेलो.
" हाय "
" हाऽऽऽऽय स्विटी कशी आहेस? " (आता स्विटी हे काही माझं नाव नाहीये. ती तिची बोलायची पद्धत.)
तोंडभर हसत माझी अल्ट्रा फॅशनेबल डॉक म्हणाली. तिचा डिओ किंवा पर्फ्युम किंवा दोन्ही आणि रूम फ्रेशनर या
सगळ्यामुळे एखाद्या मॉलमधल्या पर्फ्युम काऊंटरवर उभं असल्यासारखं वाटतं.
" मजेत. तू बोल. " मी म्हणाले. नवर्‍यानं हळूच एक कोपर मारलं. त्याचा अर्थ ' मग इथं कशाला आलोय आपण '
असा असावा. मी कशाला लक्ष देतेय म्हणा!
" अगं मी पण एकदम मज्जेत. कित्ती दिवसांनी आलीस. "
" हो गं. मग काय नवीन ऍक्टीव्हिटी? "
तुलिका (मॉड असल्यामुळे आणि डॉक्टरकीचं शिक्षण घेताना सामाजिक बांधिलकीची जाणीव झाल्यामुळे) अर्थातच एका सोशल ऍक्टीविस्ट ग्रूपमधे आहे. बरेच उद्योग करतात हे लोक.
" अगं आज ना माझं लेक्चर आहे ' शेतकर्‍यांची कुचंबणा आणि सरकारचे शेतकर्‍यांप्रती कर्तव्य '
याविषयावर. " आता हे सगळे शब्द जरी तिला बोलायला अवघड जात असले तरी मोठ्या नेटानं ती असली मराठी
शिकलीय ग्रूपमधे ऍक्टीव्ह रहाण्यासाठी.
" काय? पण कुठं आहे लेक्चर? "
" इथंच. "
" पण मुंबईत कुठंयत शेतकरी? "
" अगं मेळावा असेल. ' चलो शिवाजी पार्क ' वगैरे " नवरा लॉजिक लावत होता. पण अर्थातच इतकं सोप्पं नसतं
म्हणावं सोशल वर्क.
" मेळावा नाही काही " त्याच्याकडे एक कीवयुक्त कटाक्ष टाकत तुलिका पुढं म्हणाली. " व्हिडियो कॉन्फरन्सिंग आहे. "
आता मात्र आम्ही उडालो. " अगं पण व्हिडियो कॉन्फरन्सवर शेतकरी कसे ऐकणार तुझं लेक्चर? आपल्या खेड्यापाड्यात पोचलं पण विडियो कॉन्फरन्सिंग? "
" आपल्या नाही गं पण अमेरिकेतल्या खेड्यापाड्यात तर पोचलं ना. "
" ओह वाव अमेरिकेतल्या शेतकर्‍यांना तू लेक्चर देणार? " मी मनातच कौतुक करायला लागले.
" पण अमेरिकेतल्या शेतकर्‍यांना मराठी येतं का? " अर्थातच नवरा.
आता यापेक्षा " अमेरिकतल्या शेतकर्‍यांचीही कुचंबणा होते का? " हा मला सुचलेला प्रश्न जास्त लॉजिकल होता की नाही?
" अरे शेतकरी अमेरिकेत असले तरी मराठीच आहेत. "
" अमेरिकेत मराठी शेतकरी? "
" हो अरे बरेच आधी मायग्रेट झालेले लोक होते ना त्यांच्या मुलांनी वेगवेगळ्या कारणांनी चालू केलीय शेती. काहींनी
मंदी आली म्हणून काहींनी कंटाळून आणि उरलेल्यांनी भारतीय जीन्समधे असलेल्या शेतीच्या ओढीमुळं. आणि फार पैसा आहे तिकडं शेतीत. "
मग माझा मगाशीचा कसाबसा रोखून धरलेला प्रश्न विचारून टाकला.
" अमेरिकतल्या शेतकर्‍यांचीही कुचंबणा होते का? "
" अगं कुचंबणा होत नाही हाच तर प्रॉब्लेम आहे ना. मराठी माणसाची कुचंबणा झाल्याशिवाय त्याची प्रगती होत नाही
असा मानसशास्त्रातला नवा शोध तुला माहित नाही? मानसिक कुचंबणा हा म. मा. चा मोठ्ठाच ड्रायव्हिंग फोर्स असतो.
पण अमेरिकेत नुसतीच सुबत्ता. मग कशी होणार कुचंबणा आणि प्रगती? सरकारचं कर्तव्य नाही का त्यांची प्रगती
कशी होईल हे पहाण्याचं? मायग्रेटेड झाले म्हणून काय झालं? आता तिथलेच नागरिक आहेत ना ते? ममांच्या प्रगतीकडे फक्त भारतीय सरकारच नव्हे तर अमेरिकन सरकारही दुर्लक्ष करतंय. हे चालणार नाही. या अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे. म्हणून हे लेक्चर. " मोठ्ठा लांब श्वास घेत तुलिका थांबली.
मी आश्चर्यचकित होत विचार करत राहिले. माझं संसार - असार छाप दुखणं त्या हजारो मैलांवरच्या
ममांच्या मा. कु. पुढं फारच क्षुल्लक वाटायला लागलं. तुलिकाला ते सांगायचीही लाज वाटायला लागली. आणि एक मोठाच
साक्षात्कार झाला मला की माझीही परिस्थिती तीच आहे की साधारण. एकूणच सॉफ्टवेयर मधे बर्‍यापैकी आराम असल्यामुळं माझी माकु होत नाहीये. कशाविरुद्ध तरी लढावं, आवाज उठवावा असं काही घडतच नाहीये. नुसतं
आपलं " दो पंच, दो मंच और एक लंच " हे काय आयुष्यंय? म्हणूनच हे संसार - असार दुखणं उद्भवलंय.
मग तिला विचारलं " अगं अमेरिकेत रहाणार्‍या ममांची माकु व्हावी म्हणून तुम्ही इतके प्रयत्न करताय तर
भारतात रहाणार्‍या पण अमेरिकेसाठी काम करणार्‍या लोकांची कुचंबणा व्हावी म्हणून का नाही काही करत? कित्ती स्कोप आहे तुम्हाला आपल्या सॉफ्टवेयर इंडस्ट्रीत? "
" ओह रियली? हे अमेरिकन लोक मेले, यांना कुठल्याच ममांची प्रगती बघवत नाही वाटतं. डोंट वरी. आम्ही पाहू ते.
तू मदत करशील का आम्हाला जरा केसेस जमा करायला? डेटा गोळा करायला? आम्ही नक्की हाती घेऊ हे प्रोजेक्ट.
मग मी लगेच ' भारतीय सॉफ्टवेयर प्रोफेशनल्स ची माकु आणि त्याप्रती अमेरिकन सरकारचे कर्तव्य '
असं भाषण लिहायला घेते. "
मला केवढा उत्साह आला म्हणून सांगू? जगात सगळीकडं सार भरून राहिलंय आणि सगळे ममा त्यात मनस्वीपण पोहतायत असं रमणीय दृष्य बघत तीनशे रुपये तुलिकाच्या रिसेप्शनिस्टच्या हातात ठेऊन (मेडीकल क्लेमसाठी रिसीट पण घ्यायचं विसरून) मी बाहेर पडले.

गुलमोहर: 

सहीच लिहिलं आहेस सन्मे. बरं, ते भाषण तयार झालं की ते पण टाक इकडे. म्हणजे मग आमच्यासारख्या भारतातल्या ममांना ड्रायव्हिंग फोर्स मिळेल.

सन्मे, मस्त!
एखादं हलकं फुलकं सदर वाचल्यासारखे वाटले!

पण एकंदरीत सध्या तुझी लेखणी बहरलीय खरी. हा ओघ नव्या वर्षात पण कायम राहो! तुला शुभेच्छा!!

नाव वाचून मला कोणत्यातरी वेगळ्याच 'ममा'बद्दल आहे असं वाटलं होतं :))
सही लिहिलं आहेस.. विषय अगदी वेगळा आणि मस्त मांडला आहेस..
लेखणी 'फळतीये'.. लाभ घ्या.. Happy

पुलं, मंगला गोडबोले या नंतर काही तरी छानसं वाचायला मिळालं. लेखनी अशीच झरु दे.
हार्दिक शुभेच्छा!

आपल्याला भेटायला आवडेल.

सन्मे, बर्‍याच दिसांनी दिसलीस ह्या अवतारात Happy माकुचा डेटा हवा असल्यास सांग. अगदी पोत्यांनी भरभरून मिळेल Proud
दो पंच, दो मंच, एक लंच... अगदी अगदी!

सही.. टायटलसकट!
"पंच..मंच..लंच".. जबरी आहे!

सन्मे, मस्तच. माझ्याकडच्या ममाच्या माकु चा डेटा कोणत्या ईमेल ऍड्रेस वर पाठवू ते कळव ................ Happy
--
अरूण