ऐतिहासिक मराठी चित्रपटांचा तुलनात्मक आढावा!

Submitted by निमिष_सोनार on 23 September, 2023 - 08:02

दिगपाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक चित्रपट मालिकेची घोषणा केली तेव्हा त्यांचा पहिला चित्रपट "फर्जंद नी" होता. यात सुरुवातीला पाच मिनिटात तानाजी मालुसरे सिंहगड जिंकताना दाखवले होते आणि त्यानंतर कोंडाजी फर्जंद यांची कथा होती. सिंहगड जिंकला जातो आणि शिवराज्याभिषेक जवळ येऊन ठेपला असतो. मात्र पन्हाळा किल्ला बेशक खानच्या अजूनही ताब्यात असतो. बेशककडून नागरिकांवर आणि स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचारांच्या बातम्यांनी शिवाजी महाराज अस्वस्थ होतात. नेताजी पालकर उशिरा आल्याने पूर्वी पन्हाळा हातातून निसटलेला असतो, असे शिवाजी म्हणतात. मग त्यांना पन्हाळा जिंकल्याशिवाय राज्याभिषेकात अर्थ नाही असे वाटू लागते. जिजाऊ तसेच अनाजी पंत, बहिर्जी नाईक यांचेशी विचार विनिमय करून ते पन्हाळा जिंकण्यासाठी कोंडाजी फर्झंद याला बोलावणे धाडतात. तो नंतर त्याच्या मर्जीतल्या फक्त साठ मावळ्यांना एकत्र करून पन्हाळा जिंकून दाखवतो.

फर्जंद रिलीज झाला त्याच वेळेस अजय देवगणने तानाजी मालुसरेवर चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली होती. नाहीतर दीगपालचा विचार तानाजी मालुसरेवर स्वतंत्र चित्रपट काढण्याचा होता. त्यामुळे त्यानंतर दिगापलने शाहिस्तेखानावरच्या शिवाजी महाराजांनी केलेल्या हल्ल्यावर आधारित "फत्तेशिकस्त", बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्य पराक्रमावर आधारित "पावनखिंड" आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफजलखानाशी झालेल्या भेटीवर "शेर शिवराज" हा चित्रपट बनवला. अर्थात या सर्व चित्रपटातील कालखंड, पुढे मागे आहे, सलग नाही ही नोंद घ्यावी.

पावनखिंड कथेवर आधारित "हर हर महादेव" हा सुबोध भावेचा अभिजीत देशपांडे दिग्दर्शित चित्रपट मागच्या दिवाळीत आला होता. पण त्यात इतिहासाचा विपर्यास केला आहे अशा बातम्या कानावर आल्या. तो मी बघितला आहे. त्यातील ज्या प्रसंगांवर आक्षेप घेतला होता त्यापैकी एक प्रसंग मी सध्या वाचत असलेल्या विश्वास पाटील यांच्या झंझावात या पुस्तकात वाचला. असो. मी काही इतिहासाचा तज्ञ नाही.

त्यानंतर "शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका" या प्रसंगावर दिगपाल चित्रपट बनवणार, तेवढ्यात अमोल कोल्हे यांनी त्याच कथेवर आधारित "शिवप्रताप गरुडझेप" हा चित्रपट बनवला. पण अमोल कोल्हे यांनी त्याची कथा ट्विस्ट केली आहे. सुटकेच्या आतापर्यंत असलेल्या मूळ गृहितकालाच हादरा दिला आहे. म्हणजे शिवाजी महाराज मिठाईच्या पेटीत लपले नव्हते तर ते त्या पेटारे वाहून नेणाऱ्या व्यक्तीपैकी एक होते (वेश बदलून). असो. तर दीगपाल यांनी आग्रा सुटका विषय रद्द करून पुन्हा तानाजी मालुसरेवर "सुभेदार" नावाचा चित्रपट बनवला आणि तो 25 ऑगस्ट 2023 ला रिलीज झाला. हा एक खूप मोठा पत्करलेला धोका होता कारण, आधीच 2019 साली तान्हाजी मालुसरे यांची गोष्ट मोठ्या पडद्यावर बॉलिवूडद्वारे आली होती. त्यामुळे पुन्हा अगदी त्याच विषयावर हा चित्रपट प्रेक्षक बघतील का याची शंका असतेच. 22 सप्टेंबरला एमेजॉन प्राइम वर सुद्धा सुभेदार रिलीज झाला.

सुभेदार चित्रपटाबद्दल लोकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. अजय देवगनच्या "तान्हाजी" पेक्षाही हा चित्रपट संयमित आणि योग्य इतिहास दाखवणारा आहे, असे बऱ्याच "चित्रपट परीक्षण करणाऱ्या" लोकांचे आणि प्रेक्षकांचेही मत आहे. तसेच दीगपालच्या आधीच्या चार चित्रपटांपेक्षा हा चित्रपट चांगल्या बजेटमध्ये आणि छान बनला आहे असे लोक सांगत आहेत.

मी तान्हाजी आणि सुभेदार दोन्ही पहिले. सारख्याच विषयांवरचे चित्रपट बघतांना मनात तुलना होतेच.

सुभेदारची कथा खूप वेगळी आहे. यात आपल्याला पुन्हा बहिर्जी, केसर भेटतात. यापूर्वी फत्तेशीकस्तमध्ये दोघांचे सर्वात उत्तम काम झाले होते. त्या मनाने सुभेदारमध्ये म्हणावे तितके फुटेज या दोन्ही व्याकरीरेखांना दिले गेले नाही. सुभेदार हा अजय देवगणच्या तान्हाजी एवढा भव्यदिव्य आणि लार्जर दॅन लाईफ नाही. शक्यतो इतिहासाशी प्रामाणिक राहून कथा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हरिष दुधाडे हाच कलाकार बहिर्जी यांच्या भूमिकेत जास्त योग्य होता असे वाटते. स्वत: दीगपाल नाही. आग्र्याहून सुटका या शिवाजी महाराजांच्या जीवनावरील महत्वाच्या घटनेतील काही प्रसंग सुभेदार मध्ये दाखवण्याचा मोह मात्र दीगपालला आवरता आला नाही. प्रसंग आहेत पण अपूर्ण आहेत आणि प्रेक्षकांना त्याबद्दलची पार्श्वभूमी माहिती आहे असे गृहीत धरले आहे. पण सर्वच प्रेक्षकांना तसे माहिती नसते. त्यामुळे थोडक्यात नरेशनद्वारे का होईना कथेची एकसंध सांगड घालण्यासाठी आग्रा नजरकैद आणि त्यामागची पार्श्वभूमी सांगणे आवश्यक होते. पण यात तसे होत नाही. असो.

मात्र फर्जंद चित्रपटाच्या सुरुवातीचे दहा मिनिटे दाखवलेली सिंहगडावरची लढाई खूप छान, कमी वेळ पण परिणामकारक वाटली होती. त्या मनाने सुभेदारमधली लढाई खूप वेळ असूनही तेवढी मनावर प्रभाव टाकत नाही. मोहिमेचा डिटेल प्लॅन तान्हाजी मध्ये तुलनेने चांगला दाखवला होता, असे माझे वैयक्तिक मत आहे.

फर्जंदमध्ये पन्हाळा जिंकतांना गड चढण्याचे प्रसंग तितकेसे नीट दाखवले नव्हते. तेव्हा वाटले होते की, दीगपालचा तो पहिला प्रयत्न होता म्हणून त्रुटि राहिल्या. पण सुभेदार हा चित्रपट त्याचा पाचवा चित्रपट आहे. यात माझी अपेक्षा होती की गड चढून जाण्याचा प्रसंग (जो या चित्रपटाच्या कथेचे एक महत्वाचे अंग आहे) जरा जास्त थरारकपणे आणि जास्त वेळ दाखवला जाईल. पण इथेही निराशा हाती आली.

दीगपालच्या आतापर्यंत आलेल्या पाच पैकी मला सर्वात जास्त फत्तेशीकस्त आणि शेर शिवराज हे दोन चित्रपट आवडले. बाजी प्रभु पावनखिंड लढवतात त्यातील लढाईची दृश्ये "पावनखिंड" चित्रपटापेक्षा "हर हर महादेव" मध्ये जास्त चांगली होती. "हर हर महादेव" मधील खिंड ही खरी खिंड वाटते.

"हिरकणी" या चित्रपटात तरी VFX वापरुन गड उतरण्याचा प्रसंग बऱ्यापैकी थरारक होता. पण त्यातही म्हणावा तसा थरार जाणवलं नाही. खरे तर गड चढणे, उतरणे हे शिवाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रपटांचे अविभाज्य प्रसंग आहेत, त्यावर मराठी ऐतिहासिक चित्रपट दिग्दर्शकांनी जास्त मेहनत घ्यायला हवी. प्रेक्षकांना ऐतिहासिक चित्रपट फक्त राजकीय डावपेच जाणून घेण्यासाठी नव्हे तर युद्धातील थरार, गड चढणे, उतरणे यातील थरार पण अनुभवायचा असतो. त्याबद्दल मराठीत स्वतंत्र ऐतिहासिक एक्शन दिग्दर्शक निर्माण होण्याची नितांत आवश्यकता आहे. मराठी निर्मात्यानी VFX भरभरून वापरावे. माझ्यासारख्या असंख्य ऐतिहासिक चित्रपट प्रेमींचा प्रेक्षक म्हणून पाठिंबा नेहमी असणारच आहे.

तसे पहिले तर, अमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशनतर्फे आजपर्यंत आलेल्या सगळ्या मालिका छानच होत्या यात वादच नाही. स्टार प्लस वरील "राजा शिवछत्रपती" असो, झी मराठीवरील "स्वराज्यरक्षक संभाजी" असो किंवा मग अलीकडची सोनी टिव्ही वरची "स्वराज्य सौदामिनी ताराराणी" मालिका असो, सर्व छानच आहेत यात वाद नाही. स्वराज्य सौदामिनी ताराराणी या सिरीयलबद्दल मी स्वतंत्र सविस्तर लेख लिहिणार आहेच. असो.

मराठीत बनणाऱ्या या सर्व चित्रपट आणि मालिकांचे बजेट खूप कमी असते त्यामुळे युद्धाचे प्रसंग दाखवताना हात आखडता घेतला जातो. VFX बऱ्याच ठिकाणी कमी दर्जाचे वाटतात. त्यामुळे मराठी चित्रपट व मालिका निर्मात्यांनी आपले बजेट वाढवावे, जेणेकरून असे चित्रपट जागतिक दर्जाचे होतील आणि सर्व दूर लोक बघतील.

नुकताच येऊन गेलेला "रावरंभा" हा चित्रपट प्रतापराव गुजर आणि सहा मावळे यांच्या पराक्रमावर आधारित होता. या चित्रपटात इतर मराठी ऐतिहासिक चित्रपटांच्या मनाने VFX खूप चांगल्या दर्जाचे होते. याच विषयावर महेश मांजरेकर यांनी "वेडात मराठे वीर दोडले सात" या चित्रपटाची घोषणा केली होती आणि तो चित्रपट शूटिंग होऊन रिलीज व्हायच्या आत "अनुप अशोक जगदाळे" यांनी "रावरंभा" चित्रपट तयार करून आणला.

एका युद्धात बेहलोल खान शरण आल्यावरही त्याला सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी जीवदान दिल्यामुळे शिवाजी महाराज प्रतापरावांवर नाराज झाले कारण तोच बेहलोल खान पुन्हा स्वराज्यावर चालून आला होता. शिवाजी राजांचे शब्द जिव्हारी लागून लागून बेहलोल खानाचा पाडाव करण्यासाठी एकट्यानेच निघालेल्या प्रतापराव गुजर यांना इतर सहजण येऊन मिळतात आणि "वेडात दौडलेल्या या सात मराठ्यांपैकी" एक मराठा ज्याचे नाव रावजी असते, याची "राव रंभा" मध्ये कथा आहे.

परंतु या कथेच्या शेवटी जो क्लायमॅक्स आहे तोच "वेडात मराठी वीर दौडले सात" याच्या सुध्दा असणार आहे. शेवटी सर्व सातही जण एवढ्या मोठ्या बेहलोल खानच्या फौजेमध्ये लढता लढता मृत्युमुखी पडतात. त्यामुळे एका चित्रपटामुळे दुसऱ्या चित्रपटाची हानी होते की काय असे वाटते.

बॉबी देओल आणि अजय देवगन या दोघांचे भगतसिंगवर आधारित चित्रपट एकाच दिवशी रिलीज होऊन दोन्ही चांगले चालले होते.

त्यामानाने प्रवीण तरडे दिग्दर्शित "सरसेनापती हंबीरराव" हा चित्रपट पूर्णपणे वेगळ्या विषयावर होता आणि कुणा ऐतिहासीक चित्रपट निर्मात्याशी त्याची स्पर्धा नव्हती. पहिल्यांदाच या चित्रपटात छत्रपती शिवाजी आणि संभाजी या दोघांचाही काळ चित्रित केला गेला होता. यात गशमिर महाजनी शिवाजी आणि संभाजी महाराज या दोन्ही भूमिकांत शोभून दिसला. प्रविण तरडे हे कोणत्याही भूमिकेत प्रविण तरडेच असतात. अमोल कोल्हे शिवाजी म्हणून शोभतातच, पण दीगपाल चित्रपटात चिन्मय पण त्यांच्या भूमिकेला न्याय देतो. राव रंभा मध्ये शंतनू मोघे पण शिवाजी म्हणून शोभून दिसतात. मात्र हर हर महादेव मध्ये सुबोध भावे शिवाजी महाराज म्हणून मनाला पटत नाही. अभिनय तो चांगला करतो पण शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा म्हणून तो शोभत नाही. हिरकणी मध्ये प्रसाद ओक शिवाजी महाराज बनला होता, पण ती भूमिका फार थोडी होती.

पण इतिहासावर आधारित चित्रपट नेहमी बनत राहिले पाहिजेत कारण नव्या पिढीला हा इतिहास माहीत असण्याची खूप गरज आहे कारण आजकाल वाचन खूप कमी झाले आहे. महाराष्ट्रातील नव्या पिढीला शिवाजी महाराजांचा आणि पेशव्यांचा इतिहास माहीत असणे खूप आवश्यक आहे. पेशव्यांवर आधारित मराठी चित्रपट बनले पण फारसे चालले नाहीत. परंतु संजय लीला भन्साळीचा बाजीराव मस्तानी सुपरहिट ठरला तसेच आशुतोष गोवारीकर चा "पानिपत" सुद्धा बऱ्यापैकी चालला. पेशव्यांच्या जीवनावर मालिका बनल्या त्या मात्र चालल्या. उदाहरणार्थ कलर्स मराठी वरील "स्वामिनी" तसेच ईटीवी मराठी वरील "श्रीमंत पेशवा बाजीराव आणि मस्तानी" वगैरे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजय पुर्कर यानी बाजि प्रभु आणी तानाजि एकाच डायरेक्ट्रर कडुन भुमीका का केल्या?
तानाजी साठी चान्ग्ला कलाकार मिळाला नाही?

निमिष जी सर्जा चित्रपटात देखील डोंगर चढण्याचे चित्रीकरण चांगले केलेले इतकेच आठवतेय.
अर्थात स्टोरी काल्पनिक होती.

पेशव्यांवर आधारित मराठी चित्रपट बनले पण फारसे चालले नाहीत. >>>>>>>>>>>
नक्की कोणकोणते ?
मला तर एक ही आठवत नाही !!!!
बाकी ते पाच सहा ऐतिहासिक सिनेमांची स्पेशल इफेक्ट्सरहित निर्मिती करून मराठे शाही खूपच गरीब होती हे मराठी मनावरचं ठसविण्यात दीगपाल लांजेकर यशस्वी झाला हे मात्र नक्की .

राजांचं नाव घेऊन तुम्ही कसेही कितीही चित्रपट काढा, आम्ही तुमचा गल्ला भरून देणार, असं म्हणणार्‍या प्रेक्षकांमुळे या निर्मात्यांचं फावतं असं वाटत नाही?