एक धगधगते अग्नीकुंड असते. निखार्यांनी पेट घेतलेला असतो. स्पेशल ईफेक्टमुळे ज्वाला आणखी भडकत असतात. त्यावरून चालायची स्पर्धा लागली असते. पायाला चटके सोसत ते पार केल्यावर मिळणार काय असते? तर साधारण चारपाच मरतुकडी लालगुलाबी रंगाची फुले. त्यांचे नाव तेवढे भारी ईंग्लिश असते.
पण हिरोईन मनातल्या मनात ते नाव मोठ्याने पुटपुटते. मला बाई हिच फुले हवीत. माझ्या पैठणीलासुद्धा ही मॅच करतात. परवा करवा चौथ आहे. माळली असती तुझ्या नावाने..
हिरोला माहीत असते, आपण हे करू शकतो. कारण तो स्वतःला अक्षय कुमार समजत नसतो, तर तो खरेच अक्षय कुमार असतो. त्यामुळे कांदा कापल्यावर जितके पाणी डोळ्यातून यावे तितपत पाणी काढत तो भरभर त्यावरून चालू लागतो. अश्यावेळी बायको सोबत असती तर त्याला सरकन खेचून बाहेर काढले असते. कारण रात्री त्याच्या पायांना तेल तिलाच लावावे लागले असते. गर्लफ्रेंडला असले काही टेंशन नसते. त्यामुळे ती बोलते, आगे बढो सैय्या, आगे बढो..
म्हटले तर हा सीन अतर्क्य नसतो. पण अचाट असतो. तमाम गर्लफ्रेंड भगिनींच्या अपेक्षा वाढवणारा असतो. आपण हलकेच चोरट्या नजरेने आपलीवाली किती सिरीअस आहे हे चेक करतो. तर थोडा कांदा कोणीतरी तिच्याही डोळ्यात कापला असतो. तिच्याही अपेक्षा वाढल्या असतात. त्या भरल्या डोळ्यांनी आणि वाढलेल्या अपेक्षांनी ती आपल्याकडे बघते आणि आपण थिएटरमध्ये कबूतर शोधू लागतो.
काय आहे हे? घोर कलियुग! रामाचीच अग्नीपरीक्षा. ते देखील आपल्याच सामानावर मालकीहक्क सांगायला.
मी तुला दर रविवारी कांदा चिरून कांदेपोहे आणि मटण करून देते. पण तुला एकदा डोळ्यातून थोडे पाणी काढायला सांगितले तर तू नजरा फिरवतोस... आहोs ईतके सोपे नसते ओ ताई!
अपेक्षा वाढवण्यासाठी म्हणून एक पॉर्न तेवढे बदनाम आहे. पण हिंदी चित्रपटांनीही वर्षानुवर्षे आपल्याकडे अपेक्षा फारच ऊंचावून ठेवल्या आहेत.
कधी तो नायक विमानतळाची सुरक्षा भेदून थेट नायिकेच्या विमानात प्रवेश मिळवतो, तर कधी याच कामासाठी रेल्वेस्टेशनला जायची वेळ आल्यास चक्क धावत्या ट्रेनला लटकतो. कधी भर ट्राफिकमध्ये घोडा दामटवून तेरा पीच्छा ना छोडूंगा सोनिये हे दाखवून देतो, तर कधी पाईप चढून खिडकीमार्गे शयनगृहात प्रवेश करतो.
यातले काही जमणारे नसले तर किमान पब्लिक प्लेसमध्ये आपल्या रिअल लाईफ हिरोने आपल्याला फिल्मी स्टाईलने प्रपोज करावा ही अपेक्षाही आता साधारण झाली आहे. अन्यथा तू तर बिलकुल रोमँटीक नाहीस हा टोमणा आयुष्यभराचा आहे.
अश्याच काही सीन्सची उजळणी करायला हा धागा वापरूया. सध्या काय ट्रेंड चालू आहे त्याची भर टाकूया.
ता.क. - यातला एखादा सीन तुमच्या हिरोने / हिरोईनने प्रत्यक्ष आयुष्यात वापरून झाला असेल तर तो ही येऊ द्या. वाढवा अजून ईतरांच्याही अपेक्षा