चाफा फुलला

Submitted by अजित केतकर on 9 October, 2022 - 04:45

अंदाजे ऑक्टोबर २०२१ मध्ये आमच्या शेजाऱ्यांनी त्यांच्या मित्राने छाटलेल्या चाफ्याच्या काही फांद्या दिल्या. आमचे गच्चीवरचे उद्योग बघताना केव्हातरी मी चाफ्याचे झाड लावायची इच्छा दर्शवली होती. ती लक्षात ठेवून त्यांनी ही भेट मला दिली. त्यातून चार फांद्या निवडल्या आणि त्यांचे खालचे टोक ४५ अंशात कापले. पांढरा चीक आला त्यावरच मध, हळद आणि दालचिनी पूड समप्रमाणात घेऊन मिश्रणाचा लेप दिला आणि छोट्या चार कुंड्यांमध्ये एकेक रोप लावले. घरातच चारही प्रयोग ठेवले. आठ दिवसातून एकदा थोडे पाणी घालायचो. तीन चार महिन्यात एकेक करून तीन फांद्या सुकल्या पण एक मात्र तग धरून होती. मरत नव्हती हेच जिवंत असल्याचे लक्षण. साधारण पाच महिन्यांनी तिच्या टोकाची एकमेकाला चिकटलेली छोटीशी पाने विलग होऊन "आम्ही आहोत" असे सांगू लागली. प्रयोग यशस्वी झाल्याने उत्सुकता वाढली आणि उत्साहही. पुढे रोज बदल दिसू लागले. इवलीशी पाने तुकतुकीत चॉकलेटी दिसू लागली.
पानांचे आकार हळूहळू मोठे होऊ लागले आणि रंग टवटवीत हिरवा होऊ लागला. लवकरच रोप मोठ्या कुंडीत स्थलांतरित करून त्याची गच्चीवर पाठवणी केली. मातीविरहित कुंडीत मुख्यतः बदामाच्या वाळक्या पानांपासून आणि घरच्या जैविक कचऱ्यापासून केलेले खत, भरपुर ऊन, मोकळी हवा आणि बाजूचे हिरवे सवंगडी यांच्या सान्निध्यात चाफा जोमाने वाढू लागला. पावसाळ्यात हिरवीगार टवटवीत पाने नेत्रसूख देत असतानाच जुलै महिन्यात एक दिवस शेंड्यावर वेगळी वाढ दिसली. करंगळी इतपत जाड पण सरळ वाढणारा दांडा आणि त्यावर छोटे छोटे काळे ठिपके. चारपाच दिवसातच तो कळ्यांचा गुच्छ असल्याचे लक्षात आले आणि "किती सांगू मी सांगू कुणाला..." असे झाले. काही दिवसातच कळ्या स्पष्ट दिसू लागल्या आणि हा पांढरा चाफा असल्याचे लक्षात आले. रोप लावल्यापासून साधारण नऊ महिन्यांनी स्वातंत्र्यदिनी पाहिले फूल फुलले हा निव्वळ योगायोग.

लवकरच चाफा आणखीन बहरला आणि भरघोस फुले देऊ लागला
20221009_141729.jpg

छाटलेली फांदी ते बहरलेल्या झाडाचे फूल हा वाढीचा प्रवास पहाणे म्हणजे निखळ आनंद. काय धडपड केली असेल त्या इवल्याश्या रोपाने सुप्तावस्थेतल्या पहिल्या पाच महिन्यात? कुठे सापडला हा मोहक सोनेरी पिवळा रंग? कोठून आणले ते स्वच्छ पांढऱ्या रंगाचे तेज? कचऱ्यातून कसा शोधला रेशमाहूनही मुलायम स्पर्श? कुजलेल्या खतात कुठे दडला होता सुगंध? सगळेच अनाकलनीय आणि म्हणूनच वंदनीय.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलंय.
हा लेख पूर्वी पण इथे टाकला होता का ?

खूप छान. सुंदर फोटो. कुठलंही झाड मोठं होऊन बघताना खूप आनंद होतो, मग ते फुलझाड असो अथवा साधं कडीपत्त्याचं झाड.

खुपच सुन्दर प्रवास….

मी एक पाहिलेय, निसर्ग त्याचे नियम
बदलत नाही. झाड कितीही वाईट स्थितीत असले तरी योग्य वेळी फुल येतेच, मग भलेही ते फुल अगदी छोटे, एकुलतेच का असेना.. परिस्थिती कशीही असली तरी आपले रुटिन बदलायचे नाही हे निसर्गाचे ब्रिद आहे असे मला वाटते.

मीही चाफ्याची फांदी लावली होती, यंदा फुलेही आली होती पण ल्पावसाळ्यात व्हराम्ड्यात ठेऊनही त्याला पाणी जास्त झाले. जगेल असे वाटत नाही आता तरी, पण निसर्गाचे नियम लक्षात घेता जगेलही. बघुया.