नवरसरंग - काव्यमहास्पर्धा - 'करूण' रस

Submitted by सारंग भणगे on 29 May, 2009 - 12:57

असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी.
जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल,
नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल.

पराकोटीच्या कारूण्याची परिसीमा असलेल हे ना. वा. टिळकांचं काव्यसुमन...

अशाच कारूण्यरसपूर्ण कवितांचा पुर घेऊन या...

या महिन्याच्या 'करूण' रस स्पर्धे अंतर्गत.

हास्यरसाला आलेल्या सहभागानं आम्ही खरेच आश्चर्यचकित झालो. आता हास्यरसाच्या ओथंबून वाहिलेल्या धबधब्यानंतर, या महिन्या करूण रसाच्या कव्यमेघांनी आपल्या 'नवरसरंग' स्पर्धेचं आकाश भरून टाका...

काळजाच्या अरण्यात 'करूण'रसाचं वादळ उठू देत;
शब्दांच्या 'करूण' किमयेनं हुंदक्यांचा बांध फ़ुटू देत.

आपल्या लेखण्यातुन शाईच्या रूपानं कारूण्य-काव्यरस वाहू देत.
------------------------------------------------------------------------------------

तुमच्या एक /दोन "करुणरसपूर्ण" कविता आम्हाला १ जुन ते १५ जुन २००९ पर्यंत

marathikavitamarathispardha@gmail.com वर पाठवा.

सोबत ओर्कुट प्रोफाइलची व ब्लॉग असल्यास त्याची लिंक नक्की पाठवा.

गुलमोहर: 

स्पर्धेचे काही नियमः

१. प्रत्येक महिन्याचा सुरुवातीला, त्या महिन्याचा 'रस' ( विषय ) देण्यात येईल. त्या महिन्यात त्याच विषायवरच्या कविता घेतल्या जातील. कविता दर महिन्याच्या १५ तारखे पर्यंत पाठवाव्यात.

२. त्या रसावर आधारीत तुमच्या एक किंवा दोन कविता शुद्ध टंकलिखित स्वरूपात आम्हाला marathikavitamarathispardha@gmail.com या ईमेल वर पाठवायची. कविता थेट समूहावर पोस्ट केली तर स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. कविते बरोबर आपले नाव, ओर्कुट आइडी पण पाठवा.

३. कविता प्रकाशित / अप्रकाशित असल्या तरी चालतील.

४. परीक्षक म्हणून समुहा बाहेरच्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात येईल. दर महिन्याला वेगवेगळे परीक्षक असतील.

५. १५ तारखे नंतरचा एक आठवडा परीक्षणाचा असेल आणि त्यानंतर ( महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ) त्या महिन्याचे निकाल प्रसिद्ध केले जातील.

स्पर्धेचा उद्देश लक्षात घ्यावा. हा एक प्रयोग आहे हे ही लक्षात घ्यावे. स्पर्धे बाबत, स्पर्धेतील प्रवेशा बाबत आणि कविता ग्राह्य / अग्राह्य ठरवण्या बाबत चे सर्व हक्क आयोजक अबाधित ठेवत आहेत.

सारंग_काव्यसाधक

अर्थात् काव्यस्पर्धेचा उद्देश 'चढाओढ' हा नाही. कुणी मोठं-छोटं; कविता चांगली-वाईट हे सिद्ध करणं हा मुळिच नाही. ही स्पर्धा आपल्यातल्या प्रतीभेला अव्हान आहे; आपल्यातल्या सृजनशक्तीला आवाहन आहे. आपल्यातून कलाकृतींचे नवनिर्माण करण्यासाठी स्फ़ुरण आहे.

यातून निवडल्या गेलेल्या स्पर्धा 'नेटाक्षरी' मधे प्रकाशित होतील ... हजारो लोकां पर्यंत जातील ...

सारंग_काव्यसाधक

रसांची माहीती आधी टाकलीत तर बर होईल.

रसांची माहिती? नीटसे समजले नाही. करूण रसावर काही माहिती हवी असल्यास तशी टाकेन.

सारंग_काव्यसाधक

हो हवी आहे. म्हणजे मला पुसट माहीती आहे रसांवर तुम्ही पुर्ण दिलीत तर बरे होईल.

करुण रस रौद्रमधून जन्म घेतो, असे मानले आहे. म्हणजे संतापाच्या, उत्पाताच्या लाटेवर आरूढ होऊन येतो, तो करुण रस! करुण रस म्हणजे आक्रंदन, आक्रोश, अश्रु, हुंदके...
आता संताप, उत्पात, विनाश हा जसा युद्धभूमीवर घडतो, तसाच मनाच्या रणांगणात पण! तो शृंगारातसुद्धा विरहवेदना घेऊन येतो.भयानक, रौद्राचा तो परिणाम म्हणून येतो. उत्तम विनोदालाही करुणेची झालर असतेच, असे म्हणतात. वेदना, शोक हा मूळ गाभा असलेला हा रस प्रत्येक नाट्याचा, आणि साहित्याचा एक महत्त्वाचा विषय बनला आहे.
करुण हा तीन प्रकारचा मानतात:
१. धर्मोपगत (न्यायालयीन शिक्षेच्या रूपात),
२. अर्थापचेय (संपतीचा नाश झाल्यामुळे) आणि
३. शोक

असे असले, तरी भरताने शोकान्तिका मत्र वर्ज्य केल्या आहेत. म्हणजे बाकी नाटकभर काहीही घडले, तरी त्याचा शेवट मात्र गोडच व्हायला हवा. परंतु नाट्य काय किंवा कोणतीही कला काय, जेव्हा ती ख-याखु-या आयुष्याचे प्रतिबिंब म्हणून समोर येते, तेव्हा तिला अशा चौकटीत बसवणे शक्यच होत नाही. त्यातून कविता ही तर मनाच्याही अंतरंगाची अभिव्यक्ती! असे म्हणतात, की वेदना जितकी उत्कट्पणे बोलते, तितके सुख नाही बोलत!! त्यामुळे मनाच्या गहि-या जखमा अशा कवितेमधून करुण रस घेऊन अगदी सहज साकार होताना दिसतात.

करुणरसाचा रंग करडा आणि देवता यम. जाता जाता हे नमूद करायला हरकत नाही, की प्रत्येक रसाचा एक विशिष्ट रंग आणि देवता ही कल्पिली गेली आहे. जसे शृंगार रसाचा रंग श्यामल आणि देवता विष्णु. हास्यचा रंग पांढरा आणि देवता प्रमथ इ.

या करुण रसाच्या इतक्या असंख्य छटा कवितांमधून दिसतात.... अगदी राखाडी करड्यापासून ते मिट्ट काळ्यापर्यंत! आणि प्रत्येकीला एक वेगळा साजही! त्यामध्ये उदासी येते, बेचैनी येते, आक्रंदन येतं, तर कधी निव्वळ एकटं मारव्यासरखं दुःख येतं!!

आता ही बोरकरांची कविता पहा:
फांदीसारखी झुकते सांज, जांभळासारखे पिकती ढग
हवेत गारवा जड होऊन पेंगुळपांगुळ होते जग
गगनभरल्या आठवणींचे गर्द झाडीत शिरती थवे
ओला काळोख आळत येतो उकत्याझाकत्या काजव्यांसवे
अशा वेळी दूरचा दिवा जवळ येतो पाण्यावरून
वारा तारा छेडीत घुमतो उदास उदास सूर भरून
डोळ्यामध्ये जमते पाणी: कशासाठी कळत नाही
ऊरभरल्या उसाशाला कुठेच वाट मिळत नाही

- सौ. आसावरी गुपचुप.

ही आहे उदासी. निव्वळ निखळ उदासी. हिचा रंगसुद्धा पूर्ण काळा नाही. फांदीसारख्या भारानी झुकलेला, थकलेला, कुंद हवेचा जांभळा रंग!! ही उदासी अगदी सांजेसारखी, चारी बाजूंनी वेढून घेते. आणि एक एक आठवण जागी होते: कधी दुःखाची, तर कधी सुखाचीही. पण आठवण म्हणजे तो क्षण निसटून गेल्याची जाणीव. आठवण म्हणजे वर्तमानाशी फ़ारकत आणि बेचैन भिरभिरणारं मन.

"ओला काळोख आळत येतो..."
काळोख ’ओला’ का? कारण तो भिजला आहे आठवणींमध्ये. अन्‌ तोही येतो कसा, तर ’आळत’! अगदी अर्क असावा असा. आणि आता या वातावरणाला त्या अथांग समुद्राची गाज सोबतीला असावी! इथे नमूद करणे आवश्यक आहे, की बोरकर हे मूळ गोव्याचे. त्यामुळे त्यांच्या कवितेमधून समुद्राचे संदर्भ वरचे वर येतात. तर ’अशा वेळी दूरचा दिवा जवळ येतो पाण्यावरून’ म्हणजे काय? दूरचा दिवा! दिवा तर प्रकाश देणारा. मग त्याच्या जवळ येण्याने अस्वस्थ का वाटावे?? तर तो दिवा पाण्यावरून, अद्न्यातातून येतो आहे. आणि कदाचित इथला प्रवास संपल्य़ाचा संदेश घेऊन येत आहे. वा-याचे जे उदासीचे सूर आहेत, ते कदाचित निरोपाचे? आणि निरोपही अव्यक्तच... कुणाला ठाऊक, खरंच हाच शेवट आहे की नाही? कुणाला ठाऊक, शेवट तरी आहे की नाही? सगळेच प्रश्न! आणि त्याच्यामधून आलेले अगतिक अश्रू. पण ते अश्रूसुद्धा फितुर. तेही अषाढाच्या पावसासारखे बरसून जात नाहीत. तेही तसेच निरुत्तर थबकून राहतात डोळ्यांच्या कडांपाशी. ’ऊरभरल्या उसाशाला कुठेच वाट मिळत नाही’

ही बोरकरांची कविता म्हणजे उदासीचं मूर्तीमंत रूप आहे. पंचेंद्रियांनी त्यांनी उदासी अनुभवली आहे. ती डोळ्याला जांभळी दिसते, त्वचेला तिचा गार निष्प्राण स्पर्श जाणवतो, कानांना तिचा सूर पीळ पाडतो....माझ्या मते कविता ही जेव्हा अशी समरसून जगली जाते, तेव्हाच अशी जीवंत होऊन अवतरते.

- सौ. आसावरी गुपचुप.

आसावरी ताई खुप छान माहीती दिलीत करूण रसांची आणि बोरकरांच्या कवितेचा अर्थही खुप छान समजाऊन दिलात. धन्यवाद.

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

सारंग_काव्यसाधक

माहिती उद्बबोधक आहे. भावनांचे विश्लेषण सुंदर.
फक्त, संतापातून करूण रस वाहतो असे वाटत नाही. अगतिकता म्हणता येईल, नाही का?
-सविनय.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

आता करुण रस रुद्रामधून जन्म घेतो, याची साक्ष देणारी ही कुसुमाग्रजांची प्रसिद्ध कविता:
कवितेचे नायक: बाजीप्रभू देशपांडे. स्थळ: पावनखिंड

सरणार कधी रण प्रभु तरी
हे कुठवर साहू घाव शिरी!

दिसु लागले अभ्र सभोती
विदीर्ण झाली जरी ही छाती
अजून जळते आंतरज्योती
कसा सावरू देह परी!

होय तनूची केवळ चाळण
प्राण उडाया बघती त्यातुन
मिटण्या झाले अधीर लोचन
खड्‌ग गळाले भूमिवरी

पावनखिंडित पाउल रोवुन
शरीर पिंजेतो केले रण
शरणागतिचा अखेर ये क्षण
बोलवशिल का अता तरी?

- सरणार कधी ही शौर्य रसाची मानायला पाहिजे. बाजीप्रभुंना करूण म्हणने म्हणजे फ़ारच झाले.

- खड्ग गळणे.. वगैरे कल्पना करूणच म्हणायला हवी. त्यात रूपक आहे.. बाजीप्रभूंच्या त्या लढ्यासारखे जीवन कल्पून देवाला धावा केला आहे की हे असे क्लेशदायक दिवस अजून किती बाकी आहेत..? मला कधी थोडेसे सुख मिळेल??

- जस आसावरी आधीच म्हणाली..........."विनोदालाही करूणतेची छटा ही असतेच असं म्हणतात".......याचाच अर्थ, एकाच ठिकाणी हास्यरस आणि करूणरस येउ शकतात.

तसेच, “ सरणार कधी ” हि कविताही अनेक रसांनी युक्त अशी आहे.
त्या मध्ये करूणरसही आहेच.

- saranaar kadhi..............aiklya nantar dhasa dhasa radav nahi vatat

rakt khavaLata................... josh , tevesh....................

babasahebancha shivkalyan raja madhla vivecha................. dagadalahi virashree deil.

आसावरी - मला तरी वाटते, हा करुण रसच आहे. बाजीप्रभू मरणाच्या दारात आहेत. अखेरची लढाई अटीतटीने लढत आहेत. हा शौर्याचा नुसता आव नाही. खरेखुरे रणांगण गाजवत आहेत. पण....अंत अजून दिसत नाहिये. वीरमरण आले, तरी त्यातच कृतार्थता मानणारे नाहीत. त्यांना मरणाहूनही प्रिय गोष्ट म्हणजे....तो तोफ़ेचा आवाज! आणि म्हणूनच, एकिकडे गलितगात्र अवस्था, निघून जाताना दिसणारे प्राण; आणि दुसरीकडे तरीही कानांवर न पडणारा तो तोफेचा आवाज!
त्यांचे रण हे त्यांच्या प्राणांबरोबर संपणार नाहिये. आणि प्राण जाणे त्यांच्या हातात नाहिये. हा खरा कारुण्याचा भाग आहे! "शरणागतीचा अखेर ये क्षण" ही खरी भीती आहे! या एवढ्या समरात, जिथे तनूचीही चाळण होते आहे, तिथे मनाची काय अवस्था झाली असेल?? विजयाचे पोवाडे कितीही वीरश्रीयुक्त असले, तरी तो क्षण मात्र कारुण्यानेच भरलेला आहे.

पहिल्या ३ दिवसात १३ कविंच्या २० कविता.......जोरदार प्रारंभ.

सारंग_काव्यसाधक

मला वाटते आपण त्या प्रसंगाकडे कोणत्या भुमिकेतुन पाहतो त्यावरही ते अवलंबून आहे.

बाजींच्या दृष्टीने तो वीररसच असला पाहिजे. बाजी त्याक्षणाला करूण झाले असतील ही कल्पनाच मला सहन होत नाही.

परंतु आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या दृष्टीने तो करूण रस असू शकेल, काय वाटते?

सारंग_काव्यसाधक

अदमासे ६५ कवितांनी करूण रस स्पर्धा बहरली आहे.

अजुन ३५ कविता अपेक्षित आहेत.

काही मायबोलीकरांनीही सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद.

सारंग_काव्यसाधक

सुमारे 90 कविता मिळाल्या. मित्रहो, सहभागी व्हा आणि यावेळी शतक साजरे करूयात.

सारंग_काव्यसाधक

मला कुसुमाग्रजांची सगळी माहिती हवी आहे मिळेल का?