मराठी भाषा दिवस २०२२: सरस्वतीची चिरंजीव मुले: पं.भीमसेन जोशी (अमा)

Submitted by अश्विनीमामी on 26 February, 2022 - 23:06

मराठी भाषा दिनाच्या सर्व माबोकरांना हार्दिक शुभेच्छा.

असं म्हणतात की जेरुसलेम हे शहर दोन पातळ्यांवर वसतं . एक म्हणजे वास्तविक जे साधारण अडीच हजार वर्षांपूर्वी वसलं त्याने अनेक आक्रमणं झेलली. अनेकदा उध्वस्त झालं . तिथे धर्म पंथ उदयास आले व जग भर फोफावले. प्रे षितांनी चमत्कार केले व शिष्यांनी गुरुप्रती दगाफटका केला. मानवी स्वभावाची सर्व रुपे तिथे प्रकट झालेली आहेत व आजही ते शहर एक महत्वाची धार्मिक व सांस्कृतिक राजधानी आहे.

दुसरे जेरुसलेम प्रत्येक अब्राहमिक धर्माच्या अनुयायाच्या मनात वसते. एक आध्यात्मिक शहर. कोणाला तिथे दक्षिण भिंतीला डोके टेकुन
उध्वस्त मंदिराबद्द्ला शोक व्यक्त करावा वाटतो, कोणी चर्च ऑफ द होली सेपल्च र मध्ये येशु ख्रिस्ताचे बलिदान व त्याचे संदर्भ शोधू बघते तर कोणी अल अक्सा मशिदीत प्रेषिताचे स्वर्ग प्रयाण झाले तिथे नमन करतो.

मराठी माणूस मग तो राज्यात, देशात किंवा जगात कोठेही वसला असला तरी त्याच्या मनात असेच एक पंढरपूर वसत असते. टाळ मृदुंगांच्या गजरात तालात पाव्ले पडतात व विठुमाउलीच्या दर्शनास निघतात. जगात जगताना अंगिकारलेले दंभ नकळत गळून पडतात व मन कानडा राजा पंढरीचा ह्याच्या दरबारात भजनानंदी तल्लीन होउन दर्शनानंदासाठी आतुर होते. माय रुक्मिणीच्या वत्सल पदरात डोके खुपसून जगाने दिलेले अपमान तिला सांगून मोकळे व्हावे असा ध्यास धरते. ती माउलीही हे काटे, बाण काढून ' चित्ती असु द्यावे समाधान' भाव आपल्या आधाशी ओंजळीत टाकते.

मराठी मातीतले कलाकार व्यावसायिक जगात कितीही थोरवीस पावले तरी मराठीतले अभंग, आरत्या गाताना आतला अगदी खास भाववि भोर आवाज काढ तात असा माझा अनुभव आहे. कै. लता दिदींच्या साई आरत्या व भक्तिगीते ऐकली की ह्याची प्रचिती येते. तसेच भारत रत्न पंडित भीमसेन जोशी नामा तुक्याचे अभंग गाताना आपला ख्याल गायकीतला प्रचंड अनुभव व ज्ञान बाजूला ठेवतात ; किंवा कदाचित त्या गायकीतल्या संरचना घेउन वर एक आगळे वेग ळे मराठी पणा चे मऊ मखमली अस्तर लावून आपल्यासमोर मांडतात.

पं. भीमसेन जोशींचा जन्म १९२२ चा. माझे वडील १९१५ मधले. पं. विनायक बुवा पट वर्धन ह्यांचे शिष्य. चरितार्थासा ठी व कौटुंबिक
जबाबदार्‍यांमु ळे वडिलां नी संगीत शिकवायचा मार्ग स्वीकार ला तरी आपण मैफीलीतले ख्याल गायक म्हणून नाव कमवू शकलो नाही ही खंत त्यांच्या मनात कायम असे. पुण्यातील संगीत क्षेत्रात समकालीन वावर असल्याने ह्या दोघांचा थोडा का होईना परिचय होता. त्यामुळे मला भीमण्णा कायम एखाद्या मधल्या काकां सारखेच वाटत आले आहेत. त्यांचे ख्याल गायन ऐकून व जालावरुन व्यक्तिमत्वाची ओळख झाल्यावर ही आंतरिक जवळीक वाढतच गेली. मी पंडित भीमसेन जोशी ह्यांना प्रत्यक्षात कधीही भेटलेले नाही. तसा गैरसमज होत असल्यास माझ्या लेखनाचा दोष समजावा. जसे माहेर मानस कल्पना आहे तसेच एका मोठ्या कलाकाराशी भावनिक जवळीकही मानसिकच आहे.

परंतू ख्याल गायकी म्हणजे हे काका कार्यालयात करतात ते काम व त्यांनी गायलेले अभंग, मिले सुर मेरा तुम्हारा, बजे सरगम हर तरफसे गुंजे बन कर देस राग असे काही हे आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांसाठी दिलेले छोट्या डब्यातले खाउ. आपल्या अबोध मनाला समजू शकेल म्हणून त्यांनी त्यांचे अफाट ज्ञान व सुर एखाद्या तीन कडव्यांच्या अभंगात नाहीतर सुरावटीत फिट बसवून आपल्याला रंगीत कागदात बांधून आणलेली छोटीशी पण जिवा भावाची भेटच आहे असे मला मनापासून वाट्ते.

पं भीमसेनांच्या स्वर- संगीत समुद्रातून मंथन केलेली काही उत्तम रत्ने माझे माहेर पंढरी ह्या अभंग मालिकेत समाविष्ट आहेत.

पुण्यात पालख्या यायच्या त्या दिवशी आमच्या डेक्कनच्या घरी मोठी धमाल असे. खाली भली मोठी जत्रा भरलेली, तुफान गर्दी, उभ्या लाकडी पाळण्यांचा पँ पॅ आवाज( हे एक माणूसच हाताने लटकून , फिरवून त्याला गती द्यायचा.) यंत्र पाळणे नव्हते तेव्हा. आडवी फिरफिरे , मेरी गो राउंड ...हे सर्व दोन तीन दिवस आधी सुरू व्हायचे व त्यांच्या परीक्षेला आम्ही उत्साहाने पुढेच असायचो. सकाळी गर्दी जमायला लागायची,
रंगात ठसे बुडवून कपाळावर लावायचे व त्यावर चमकी पेरलेली असे काळे सावळे चेहरे फिरत असत. वडे भजी ह्यांचे स्टॉल लागत. पिटपिटे
रंगीबेरंगी काग्दाच्या पिसे लावलेल्या टोप्या , अश्या अनेक वस्तु मिळत.दुपारी अडीच तीन पर्यंत गर्दी म्हणजे ठेप. त्यात ही गणपतीच्या मिरवणुकी पेक्षा विरुद्ध दिशेहून येणारी गर्दी. फुलांचा उदबत्तीचा मिश्र वास. हे सर्व वरून बघायचे म्हणजे मौजच असे.

ह्या सर्वावर भरुन वर वाहात असायचा तो भीमाकाकांचा दमदार आवाज. माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तिरी. त्या दिवशी पुण्याची पंढरीच होउन जात असे म्हटले तरी वावगे होणार नाही.

हे खूपच जुने संकलन आहे म्हणजे स्पॉटिफाय वर बघितले तर १९६० किंवा १९७७ अश्या दोन तारखा दिसतात. मूळ रचना १९६० मधील
असतील व संकलन करुन अल्बम १९७७ मध्ये काढला असावा. मला कल्पना नाही. आजकाल एखाद्या गाण्याची आठवण काढली की पोस्ट वाळून थंड व्हायच्या आत लिंक देणार्‍या बहाद्दर लोकांना सांगावे वाट्ते की अहो हे मला नवीन नाही किंवा शोधायाची गरज नाही हे मी लाँग प्लेइन्ग रेकॉर्ड , क्यासिट, सीडी , एम पी थ्री व आता स्पॉटिफाय अश्या अनेक माध्यमांतून ऐकलेले नव्हे आत्मसात केलेले गाणे आहे. पण ते एक असो.

ह्या संकलनातील सर्वच अभंग पंडितजींनी एका जोरकस भक्तिभावाने गायले आहेत. प्रत्येक सूर कसा जिथल्या तिथे व हवा तितकाच, आलाप, ताना, हरकती कसे ठासून. देवाला आपल्या भक्ती बद्दल काही शंका नको असे ठण कावून सांग णारा. त्यांचे जसे व्यक्तिमत्व तसाच त्याचा भक्ति आविष्कार.

ह्यातला माझा सर्वात आवडता अभंग म्हणजे माझे माहेर पंढरी:

ह्याची सुरुवातच एका वरच्या प्रतलावर होते. पखवाजाचा/ म्रुदंगाचा एक दुर्दम्य तुकडा घेउन विठ्ट्ठल असा गजर सुरू होतो. एक जबरदस्त तान घेउन पंडित भीमसेन जी ह्या स्वरनृत्यात उडी घेतात व चपखल सुर- न्यास करू लागतात.

माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तिरी
बाप आणि आई माझी विठ्ठल-रखुमाई

अगदी कमी वाद्यवृंद साथीला आहे. तबला, व्हायोलीन, झांजा व पेटी व पहिला मस्त मजेदार पखवाज/ मृदंगाचा तुकडा.

गाण्याची गती अशी की जब वी मेट मध्ये गीत म्हणते ना " कोई डाउट मत रखना!!" त्या मजबूत आत्म विश्वासात विठ्ठलास हो आहे माझी
तुझ्यावर भक्ती करतो मी माय बापांवर प्रेम असे ठासून सांगायचं झालं. ह्या मुलाचे नाव जोशी मास्तरांनी भीम का ठेवले असावे ते ह्या वेळीस कळते. तीच शक्ती तोच स्वबलावर विश्वास.

पुंडलिक राहे बंधू त्याची ख्याति काय सांगू.

माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तिरी

माझी बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा ह्यात एकदा चौंद्र भागा म्हणतो भीमाकाका. चंद्रीच ती. रागावुन काहोईना जखम धुवून त्याला औषध लावणारी ताई.

एका जनार्दनी शरण. ह्या पुढे एक आलाप आहे. काय फिरकी काय फिरकी.
एखादा कसलेला अतरिया एकदम गुलाबाच्या सुवासात एखादी केशर केवड्याची लकेर टाकून जातो तसेच आहे. हे ऐकायला कर्णभाग्य लागते हो कर्णभाग्य.

करी माहे रची आठवण. माझे माहेर पंढरी. करून वरच्या पट्टीवर अभंग संपवतो.

प्रत्येकाच्या जीवनात येतात तसे कधी कधी क्षोभ, असहाय्यते मुळे अपमान गिळावे लागायचे आपले अश्रु आपणच पुसायचे प्रसंग माझ्यावरही आले पण मग तेव्हा वेळ झाला की मी हा अभंग ऐकते. पहिल्या मृदंगाच्या तुकड्यातच साचलेल्या भावनांचा उद्रेक होउन निचरा होतो. व मन ह्या आध्यात्मिक माहेरी ओसरीवर जाउन पोहोचते. जगाच्या व्यवहारांची काळजी घेत असलेले वडील एक प्रेमळ कटाक्ष टाकतात. विश्वमाउली गोड शिरा करायला रवा भाजायला घेते. पुंडलिक दादा नवे पुस्तक दाखवतो व एखादा उतारा वाचून दाखव तो. ( बहुदा पर्यावरणाची काळ जी घेउन विट कशी बनवावी हे असावे.) चंद्रीताई माठातले गार पाणी घेउन येते.

मन शांत झाले व वर बघितले की तोपर्यंत भीमा काका, सुखाचे हे नाव आव्डीने घ्यावे, माझा भाव तुझे चरणी तुझे रुप माझ्या नयनी मध्ये शिरलेले असतात. आपणही त्यांचे बोट धरून पुढे जातो. पुढे अनंत लढाया आहेत. आव्हाने आहेत पण हे माहेर मनात कायम शांत वस्ती करून आहे.

कधीतरी त्यातच लुप्त व्हायचे आहे तिथे मंदिराच्या मंडपात पंडितजींचा ख्याल महोत्सव अखंड चालू आहे. माय मराठी तले एक वैभवी दालन आपली रत्ने घेउन वाट बघत आहे. जो पर्यंत माय मराठी ह्या ग्रहावर आहे तो पर्यंत मराठी मानसातली ही अक्षय पंढरी अशीच टाळ - मृदुंगाच्या गजराने दुमदुमत राहावी .. . आपल्याला सुखवत, शांतवत राहावी.

जय मराठी जय महाराष्ट्र.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पंडीतजींचा सहवास लाभला हे मोठे भाग्य आहे. अभंगवाणी आणि पं भीमसेन जोशी हे नाते छान उलगडून सांगितले आहे.
पंडीतजी अभंगवाणीच्या पलिकडेही आहेत. तुमच्याकडून त्यांच्या गायकीबद्दल आणि काही अनुभव, किस्से ऐकायला आवडेल. पुढे एखादी मालिका येईल ही अपेक्षा.

अभंग ऐकतेवेळी, त्या अभंगाचे बोट धरुन होत जाणारा मनाचा प्रवास फार हृद्य वाटला.
>>>>>>>>>> मन ह्या आध्यात्मिक माहेरी ओसरीवर जाउन पोहोचते. जगाच्या व्यवहारांची काळजी घेत असलेले वडील एक प्रेमळ कटाक्ष टाकतात. विश्वमाउली गोड शिरा करायला रवा भाजायला घेते. पुंडलिक दादा नवे पुस्तक दाखवतो व एखादा उतारा वाचून दाखव तो. ( बहुदा पर्यावरणाची काळ जी घेउन विट कशी बनवावी हे असावे.) चंद्रीताई माठातले गार पाणी घेउन येते.
_/\_

कदाचित अभंग म्हटले की आपलेच मन हळवे आणि रिसेप्टिव्ह होउन जाते व आपल्याला आवाज खास आतून आलेला वाटतो. भीमसेन जोशींची फार गाणी, अभंग मी ऐकलेले नाहीत पण जे काही ४ ऐकले आहेत त्या सर्व अभंगांत, गाण्यात मला एकच तन्मयता, पराकोटीची उन्मनी अवस्था आढळते. मग ते गाणे 'माझे माहेर पंढरी' असो वा 'राजस सुकुमार मदनाता पुतळा' असो, 'रम्य ही स्वर्गाहुनी लंका' असो की 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा' ही पुरंदरदासांची प्रासादिक रचना असो.

तुम्ही दाखविलेले मनाचे हे 'माहेरवाशीण' रुप फार फार लोभस तर वाटलेच परंतु भक्तीगीत, अभंग, कीर्तन, भजन कसे ऐकायचे हे शिकवुन गेले. त्याबद्दल पुनश्च आभार.

शांत माणूस अहो माझी व पंडितजीं जी कधी भेट झालेली नाही. त्याकाळा त मी फारच लहान म्हणजे कॉन्सर्ट मध्ये दंगा करेन अश्या वयाची असल्याने मला नेत नसत. तसे ध्वनित होउ नये म्हणून लेखात बदल केला आहे. जीवनात काही फार आव्ड ले ली व फॉलो केलेली व्यक्तिमत्वे आहेत त्यातील हे एक इतकेच.

व्वा अमा! माझे माहेर पंढरी बद्दल फार छान लिहिलंय. "मन ह्या आध्यात्मिक माहेरी ओसरीवर जाउन पोहोचते. जगाच्या व्यवहारांची काळजी घेत असलेले वडील एक प्रेमळ कटाक्ष टाकतात. विश्वमाउली गोड शिरा करायला रवा भाजायला घेते. पुंडलिक दादा नवे पुस्तक दाखवतो व एखादा उतारा वाचून दाखव तो. ( बहुदा पर्यावरणाची काळ जी घेउन विट कशी बनवावी हे असावे.) चंद्रीताई माठातले गार पाणी घेउन येते." >>> हे खास एकदम अमा स्टाइल Happy
देवाला आपल्या भक्ती बद्दल काही शंका नको असे ठण कावून सांग णारा >>>
आपल्या अबोध मनाला समजू शकेल म्हणून त्यांनी त्यांचे अफाट ज्ञान व सुर एखाद्या तीन कडव्यांच्या अभंगात नाहीतर सुरावटीत फिट बसवून आपल्याला रंगीत कागदात बांधून आणलेली छोटीशी पण जिवा भावाची भेटच>>> हे पण आवडले!

हा ही लेख छान
यंदा या ऊपक्रमात छान लेख वाचायला मिळत आहेत.

सुंदर लिहिलंय, अमा!

>>> हे ऐकायला कर्णभाग्य लागते हो कर्णभाग्य.
अगदी!!

सुंदर लिहिलंय. अभंग संपतो' नंतर च्या परिच्छेदात विठो-रखुमाई-चंद्रभागा- पुंडलिक घरात वावरताहेत असं चित्रच उभं केलंत. तो अभंग आणखी पुढे घेऊन गेलात.

पंडितजींकडून अभंग गाऊन घ्यायचा विचार ज्यांनी केला, त्यांचं ऋणी राहायला हवं. किती जण शास्त्रीय संगीत मुद्दाम ऐकायला जातील?

अमा, सुरेख लेख! कर्णभाग्य हा अगदी योग्य शब्द आहे!
बहुदा पर्यावरणाची काळ जी घेउन विट कशी बनवावी हे असावे. >> हे खासच!

हुदा पर्यावरणाची काळ जी घेउन विट कशी बनवावी हे असावे. >> मी एन टी पी सी रामगुंडम प्लांट च्या पर्यावर ण संबंधी अ‍ॅक्टिव्हिटीज वर एक
डॉक्युमेंटरी स्क्रिप्ट लिहि ले आहे. त्यात प्लांट व्हिजिट पण होती. ट्रेन ने गेले होते. तर तिथे एक बाय प्रोडक्ट आहे फ्लाय अ‍ॅश. तर त्यांनी त्या फ्लाय अ‍ॅश पासून चांग ल्या विटा बनवतात ते दाखवले होते. ह्या इकोफ्रेंडली आहेत. कारण नाहीतर ती अ‍ॅश इथे तिथे उडत राह्ते व प्रदु षण करत राहते. त्यापेक्षा वीट बनवावी. त्या पासून घरे बांध ता येतात. स्वस्तात.

तर कधी तरी त्या विटा घेउन एक लॉरी बेकर इस्टाइल घर कुल झोप्डे बांधावे किंवा शेजारी वीट भट्टी टाकावी असे एक स्वपन होते.
लहान पणी चिंचवडात वीट भट्टी शेजारच्या मातीच्या टेकडीत खेळ ले आहे असे दोन संदर्भ आहेत ह्या वाक्याला.

अफाट लिहिलं आहे.

पहिल्या मृदंगाच्या तुकड्यातच साचलेल्या भावनांचा उद्रेक होउन निचरा होतो. व मन ह्या आध्यात्मिक माहेरी ओसरीवर जाउन पोहोचते. जगाच्या व्यवहारांची काळजी घेत असलेले वडील एक प्रेमळ कटाक्ष टाकतात. विश्वमाउली गोड शिरा करायला रवा भाजायला घेते. पुंडलिक दादा नवे पुस्तक दाखवतो व एखादा उतारा वाचून दाखव तो. ( बहुदा पर्यावरणाची काळ जी घेउन विट कशी बनवावी हे असावे.) चंद्रीताई माठातले गार पाणी घेउन येते. ///

क्या बात है! साहित्यदेवी प्रसन्न आहे तुमच्यावर Happy