टॅबलेट

Submitted by कौतुक शिरोडकर on 27 May, 2009 - 08:24

२४ जुलै

दिग्विजय भारमळांनी रिक्षातून हात दाखवताच वॉचमनने गेट खोलला. रिक्षा 'सी' विंगच्या गेटला पोहोचला आणि भारमळ खाली उतरले. रिक्षावाल्याला पैसे देऊन ते वळले तोच समोरून शिवाजीराव पाटील आले. नुकतेच लिफ्टमधून बाहेर आले होते ते.
"अरे, भारमळ, आहात कुठे ? " पाटलांचा बिनकामी प्रश्न.
"आहे इथेच." पाटलांनी पुढे काही विचारायच्या आत भारमळांनी लिफ्ट गाठली. नवव्या माळ्याचं बटन दाबलं. पाटील हा फक्त 'पकाव' आहे याची त्यांना गेल्या काही दिवसात खात्री झालीच होती. खांदे उंचावून पाटील पुढे सरकले.
बेल वाजवताच अक्षताने दरवाजा उघडला.
tablet-kAUTUK.jpg"वाव, पप्पा आज चक्क दिवसाउजेडी आलात." तिने त्यांच्या हातातली बॅग घेतली.
"चावटपणा नको अक्षे. आणि दिवसाउजेडी म्हणायला बाहेर दिवस राहीलाय कुठे ? पाऊस भरलाय बघ." बुटातून पाय बाहेर पडताच एक समाधानाची छटा त्यांच्या चेहयावर आली. ते आत शिरले.
"काय ग, आई कुठेय तुझी ? "
"मातोश्री शयनगृहात आराम करत आहेत." अक्षता अजूनही थट्टेच्या मुडमध्ये होती.
"यावेळी ... ? काय झालय ? " भारमळ बेडरूमकडे वळले. त्यांनी आत डोकावून पाहीली. सुमती एका कुशीवर पहूडली होती.
"काही नाही हो. हल्कीशी डोकेदु:खी आहे म्हणे. सॅरीडॉन घेऊन पडलीय. तुम्हाला काही हवय का ? " ती त्यांच्यासमोर हुजयासारखी उभी राहीली.
"कन्ये, जर आपणास शक्य असल्यास आपण एक कप गरमागरम कॉफी आम्हाला देऊ शकाल काय ? " तिचा मघासचा टोन पकडून भारमळ सोफ्यावर विसावले.
"जशी आपली आज्ञा पिताश्री." मान लवून ती किचनकडे वळली. कॉफी तयार होत असल्याचा अदमास येताच भारमळ बाथरूमकडे वळले.

थोड्याच वेळात गरमागरम कॉफीचा कप त्यांच्यासमोर होता. भारमळांनी बॅगेतली फाईल टेबलवर ठेवली आणि कप उचलला.
"पप्पा, काही खाणार का ? "
"नको गं." त्यांनी तिच्या डोक्यावर हात फिरवला व ते खुर्चीवर बसले. " अक्षे, अवि कुठे गेलाय ?"
"रोहनकडे. आठ वाजेपर्यंत येईन म्हणालाय."
"ठिक आहे." त्यांनी नजर तिच्यावरून त्या फाईलवर फिरवली. दोन तासापुर्वीच साहेबांनी त्यांना दिली होती.
"भारमळ, ही केस मी तुमच्याकडे देतोय. तुम्ही लवकरच रिजल्ट द्याल याची खात्री आहे." डोळे मिचकावत त्यांनी फाईल भारमळांच्या समोर ठेवलेली. भारमळांनी नाकावर चष्मा चढवला आणि फाईल उघडली.

२० जुलै

४ मेपासून महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात अचानक अफवांच पेव फुटावं तसं आत्महत्याचं पेव फुटलं. नेहमी होणार्‍या आत्महत्या आणि या आत्महत्या यात प्रचंड फरक होता. आतापर्यंत जवळ्जवळ १२७ जणांची यात वर्गवारी करण्यात आली आहे. सोबतच्या कागदपत्रात प्रत्येक घटनेसंदर्भात माहीती आहे. प्रत्येक घटनेची एफ आय आर, पंचनामा, घटनास्थळाची, मयताची आणि साक्षीदारांची छायाचित्रे, साक्षीदारांचे व संबधितांचे कबुलीजवाब, पॉस्टमार्टॆम रिपोर्ट, मयत इसमाची तपशीलवार माहीती या सगळ्या गोष्टी सोबतच्या डिव्हीडीत आहेत.
आतापर्यंतच्या तपासात ज्या काही गोष्टी ठळकपणे जाणवल्यात त्या खाली दिल्या आहेत.
१. एकाही मयत इसमाचा दुरान्वये एकमेकांशी काहीच संबंध नाही.
२. मयत व्यक्ती या ठराविक वयोगट वा ठराविक जाती प्रजातीशी निगडीत आहेत असं नाही.
३. मयत इसमाने हे पाऊल अचानक म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये उचललं आहे.
४. कोणताही मोठा ताण व कोणतेही सबळ कारण नसताना यातल्या अनेक आत्महत्या या सार्वजनिक
ठिकाणी झाल्या आहेत.
५. आत्महत्यासाठी प्रसिद्ध असलेल्या स्थानाचा वापर यात अपवादानेच झालाय.
६. एकही सुसाईड नोट सापडलेली नाही.
७. प्रत्येक मयत व्यक्तीचे मानसिक संतुलन पुर्णपणे संयत होते याचे त्यांच्या फॅमिली डॉक्टरने दाखले
दिलेले आहेत.
८. यातल्या अनेक मयत व्यक्तीनी मात्र आत्महत्या करण्यापुर्वी हे जग जगण्यालायक नाही किंवा आता
आयुष्याला काहीच अर्थ नाही असे प्रचंड निराशावादी उद्गार काढले होते.
९. सामुहिक आत्महत्या हा प्रकार, जगात काही ठिकाणी, विशिष्ट पंथाची वाटचाल करणार्‍याच्या बाबतीत
घडलेला आहे. पण यातला कोणीही अशा पंथाशी संबधित आढळला नाही.

नेमकं त्या प्रसंगी काय घडलं हे तपासकार्यासाठी गरजेचे वाटल्याने अनेक साक्षीदारांच्या उलटतपासणी नंतर त्या घटना जशाच्या तशा नोंदविण्याचा पुर्ण प्रयत्न करण्यात आलेला आहे.

४ मे

सोलापूर.. महापालिकेची इमारत... दत्तात्रय कुलकर्णी, वय वर्षे ४६, राहणार....

"ओ कानडे, चहाला येताय काय ? " कुलकर्ण्यांनी कानडेंना आवाज दिला आणि कानडेंनी ’तरुण भारत’ मधून मान बाहेर काढली.
"कुलकर्णी, चहावाला मागेच आहे तुमच्या." कुलकर्णी वळले. चहावाला पोर्‍या चहा देत त्यांच्या दिशेनेच येत होता.
"कानडे, नुसताच चहा घ्यायचा असता तर बोललो असतो का तुम्हाला ? चलो एकेक कांडी पेटवेंगे." कुलकर्णी पुन्हा कानडेंकडे वळले.
"नको. मनसबदारसाहेब येतील इतक्यात. मघाशी गजा सांगून गेलाय." कानडेंनी बसल्या जागेवरून नकार घंटा हलवली.
"कानडे, उभी हयात घाबरण्यात घालवलीत. आता तरी जरा धीट व्हा. तुम्ही बसा पेपर चाळत. मी आलोच पंधरा मिनिटात." कुलकर्णी वळले आणि कानडे पुन्हा 'तभा'त शिरले. साधारण वीस मिनिटांनी त्यांनी खालून गलका ऐकला. तसे ते खिडकीजवळ आले. खाली उभी असलेली सगळी डोकी वर पहात होती. गजा त्यांच्यातच होता.
"काय झाल गजा ? " कानडे वरूनच किंचाळले.
"कुलकर्णी... वरती चढलेत..... वर....." पुढचं काही बोललाच नाही गजा. आ वासलेला तो वासलेला. कानडेंनी त्यातल्या त्यात वर पाहण्याचा प्रयत्न केला आणि तेवढ्यात काहीतरी लहरत समोरून गेलं. दुसर्‍याच क्षणाला कुलकर्णी खाली नवीनच घातलेल्या स्लॅबवर होते. डोक्याखालून रक्ताचे ओहोळ बाजुच्या वाफ्यांकडे सरकले.

(कुलकर्ण्यांशी शेवटचे बोललेले गृहस्थ म्हणजे कानडे. पण कुलकर्णी चहाला खाली गेलेच नाहीत. नंतर ते दिसले ते इमारतीच्या टोकावरच. त्यामुळे त्यांच्या बाबतीत अचानक नेमकं काय झालं असावं त्याबद्दल काहीच माहीती नाही.)

५ मे

मुंबई... भाईदर खाडीचा पूल.... चिराग पारेख.. वय वर्षे २३, राहणार.....

(मुळ संवाद गुजरातीत होते. सोयीसाठी त्यांचे तज्ञांकडून मराठीकरण केलेले आहे.)

"हितेन, मला हा डुबणारा सुर्य पहायला खुप आवडतं बघ. जिग्ना आली की तिला मी इकडे नक्की घेऊन येईन. तिला मी आजच याबद्दल बोललोय." चिराग एकटक समोर अस्त होणार्‍या सुर्याकडे पहात होता.
"आहे खरा. पण आता आमच्याबरोबर पहायला तुला यापुढे जमणार नाही हे नक्की. एकदा का जिग्ना बेंडबाजा वाजवत घरी पोहोचली की मग तू तिचाच." हितेनने शब्दातून त्याला चिमटा काढला. लग्नाचा विषय निघताच सुर्याची लाली त्याच्या गोर्‍या गालावर चमकली. तो हितेनकडे वळला.
"यस. काही दिवस तरी. फक्त आठवडा उरलाय आता लग्नाला. नंतर लग्नाच्या घाईत इथं यायला मिळेल की नाही याचीही शंकाच आहे म्हणा." चिरागला आपलं लग्न डोळ्यासमोर दिसू लागलं.
"होत असं सगळ्यांबरोबर. तू काही त्याला अपवाद नाहीस." हितेनने त्याला एक टप्पल हाणत पुन्हा माघारी आणलं. चिराग सुर्याकडे वळला. ते बिंब आता अर्ध्या पाण्यात होतं. तो एकटक ते डुंबणं न्याहाळू लागला. त्या सुर्यास्ताचं प्रतिबिंब आता त्याच्या चेहर्‍यावर होतं. हितेनचं अस्तित्व जणू त्याला तिथे जाणवतच नव्हतं. बघता-बघता सुर्य अस्त झाला. क्षितिजावर असलेल्या लालीत आता काळीमा हळूहळू शिरकाव करू लागलेला. हितेन काहीतरी म्हणत होता हे त्याला जाणवत नव्हतं. जणूकाही एखाद्या अज्ञात वाटेवर तो हरवलाच होता.
"त्या डूंबणार्‍या सुर्यासारखे आपणपण डुंबणार ना एक दिवस." स्वतःशीच बोलल्यागत चिराग बोलला. त्याच्या स्वरातलं वेगळेपण जाणवलं हितेनला.
"मला ते डुंबणं अनुभवयाचयं. आता या क्षणी." चिरागच्या त्या वाक्यावर हितेन दचकलाच. पलिकडून विरार ट्रेन धडधडत गेली. क्षणभरासाठी त्याने मागे पाहीलं. ट्रेनच्या दरवाज्यातले लोक हात दाखवून ओरडत आहेत हे जाणवलं त्याला. तो वळला. चिराग पुलाच्या कठड्यावर चढला होता.
"चिराग, काय करतोयस ? खाली उतर." चिराग थट्टा करत नाही हे जाणवलं त्याला. रेलिंगवरून मावळतीच्या दिशेला आपले दोन्ही हात पसरून चिराग त्याच्याकडे वळला. त्याच्या त्या क्षणभरापुर्वीच्या स्वप्नाळू डोळ्यात आता एक पोकळी होती. गुढ अशी. चिराग पुन्हा मावळतीकडे वळला.
"या जगण्यात आता काहीच अर्थ नाही. मला तुझ्याकडे येऊ दे." हितेन पुरता गोंधळला त्याच्या या वाक्यावर. काहीतरी अशुभ घडणार आहे हे जाणवलं त्याला आणि तो पुढे सरला. पण तोपर्यंत चिरागने स्वत:ला खाली झोकून दिले. दुसर्‍याच क्षणी चिराग खाली उधाणलेल्या प्रवाहात नाहीसा झाला.

त्याच दिवशी.......

नाहूर - मुलुंड दरम्यानचा रेल्वे ब्रिज.... मेथिल्डा सेबेस्टिन ...वय वर्षे ३९, राहणार....

"अगं, लुट आहे नुस्ती. साधा सुरण आठ रूपये पाव किलो. कधी ऐकला होतास ? मग." रुमालाने कपाळाचा घाम पुसत मेथिल्डाने मनिषाला तिचं लेटेस्ट दु:ख सांगितलं.
"हो ना गं, सोन्याचा भाव पण किती वाढलाय. १५ हजारापर्यंत पोहोचलय." पुलाच्या पायर्‍या चढता चढता मनिषाची गाडी भलत्याच ट्रॅकवर गेली.
"मनशौ, मी भाजीचं बोलतेय आणि तू कुठे पोहोचलीस ? " मेथिल्डा तिच्याकडे वळली.
"संजयच्या लग्नाचं ठरलय पुढच्या महिन्यात. थोडंफार सोनं करावं लागणार का नाय नव्या सुनेला ? तेच डोक्यात आहे बघ." मनिषाने तिच्या बदललेल्या ट्रॅकचं कारण सांगितलं.
"जरा थांब गं, दमल्यासारखं झाल बघ. बी.पी वाढलं वाटतं" दोन पावलं पुढे सरलेली मनिषा मागे फिरली. तेव्हाच एक सी.एस.टी. फास्ट धडधडत गेली.
"किती गाड्या येतात नि जातात. किती लोकांना इकडून तिकडे नेतात. इतकी महागाई इकडे, तरी सगळ्यांना मुंबईच पाहीजे." दुरून कर्जत फास्ट येताना दिसली मेथिल्डाला.
"खरयं ग तुझं. एकतर आहे त्यात भागत नाही आणि वर सगळीकडेच महागाईचा डोंगर. महागाईचा दर एकदम खाली आलाय म्हणे. पण सगळे भाव मात्र वर चाललेत, वर. जीव नकोसा केलाय या महागाईने." मनिषा आता तिच्या ट्रेकवर आली. मेथिल्डाने काहीच प्रत्युत्तर दिलं नाही तशी ती तिच्याकडे वळली.
"काय गं काय झाल ? "
"ती गाडी बघ."
"काय आहे तिच्यात एवढं. रोजच आपण इथून जाताना बघतोच ना गाड्या."
"बघ ना किती वेगात आहे. अशा वेळेस समोर कोण आला की थांबते का गं ती" मेथिल्डाचा आवाज जणू दुरवरून येत होता. मनिषा शहारलीच.
"थांबत नाही म्हणे. चल आता, आपण नको थांबुया." मनिषाने पुढे सरायला सुरूवात केली.
"मनशौ असं वाटतं या ट्रेनबरोबर आपण पण दुर जावं." ती जवळ येणार्‍या ट्रेनकडे एकटक पहात होती.
"अस्सं. कुठे जाणार आहेस तू ? "
"तिथे." मेथिल्डाने रूळांकडे बोट दाखवलं. "हे असलं जगणं जगण्यापेक्षा ते जास्त सोपं गं."
"शहाणीच आहेस. चल उठ आता." तिला हात धरून तिने उठवलच. उठून मेथिल्डा तिथेच उभी राहीली, तोपर्यंत मनिषा चार पावलं पुढे सरकली आणि मागे वळली. मेथिल्डा आता ब्रिजच्या रेलिंगवर चढत होती.
"मेथिल्डे......." किंचाळलीच मनिषा. मेथिल्डाने तिच्याकडे पाहील आणि खाली उडी मारली. गाडीने ब्रेक मारला आणि मुलुंड स्टेशनच्या जवळ येऊन थांबली. पुढच्या हुकला लांबलेली मान अडकलेली पाहताच एका बाईला तिथेच भोवळ आली.

७ मे

नाशिक ..... गोदावरीचा काठ..... अवधूत रांगणेकर. वय वर्षे ३२... राहणार....

"मामा, आईची इच्छा होती सगळे विधी इथेच व्हावे म्हणून." अवधूत सुरेशमामाना हलकेच बोलला.
"असते रे. काही जागांच्या पावित्र्याचा अनुभव आलेला असतो कुणाकुणाला. अस्थि विसर्जन इथे केल्याने जर तुझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळेल असं जर तिला वाटत असेल तर त्यात गैर काय ? " मामांनी पण भटाच्या कानावर जाणार नाही एवढ्या हळू आवाजात त्याला समजावले.
"चला, आता अस्थिंना विसर्जित करा. पण जास्त पुढे जाऊ नका. धरणाचं पाणी सोडलय. प्रवाह जोराचा आहे." भटाची सुचना ऐकताच मामा-भाचा पुढे सरसावता थांबले. अवधूत क्षणभर थांबुन दोन पावलं पुढे गेला. कलशावरील कापड काढून अवधुतने अस्थि नदीत सोडल्या आणि तो भटजींकडे वळला.
"भटजी, अस्थि पाण्यात विसर्जित केल्याने मोक्ष प्राप्त होतो का ?" पाण्यात विरघळणार्‍या व पाण्याबरोबर पुढे सरणार्‍या राखेला पहात त्याने अवचित भटजींना प्रश्न केला.
"नक्कीच. शास्त्रात लिहिलेलं आहे ते." भटजींनी आवराआवर करायला सुरूवात केलेली.
"सदेह पाण्यात गेलो तर ..... ? " त्याची नजर आता प्रवाहात हरलेली.
"तर मग आधी मृत्यु प्राप्त होतो आणि मग मोक्ष." भटजींनी खवचटपणे उत्तर दिले.
"अवधुत, उगाच काहीही विचारू नकोस." मामा जरा चिडलेच.
"मामा, मेल्यावर अस्थि विसर्जन करतात. मयताच्या आप्तांना त्रासच नाही का तो ? त्यापेक्षा सदेह पाण्यात गेलेलेच चांगले नाही का ?" अवधूतच्या आवाजातला बदल जाणवला मामांना.
"मुर्खासारखा बरळू नकोस. तो कलश सोड पाण्यात आणि चल मागे फिर पाहू."मामांचा स्वर आता वाढला आणि ते पाण्याच्या बाहेर आले. तोच मागे 'धप्प' असा आवाज झाला. मामा मागे वळले. पाण्यात आलेले बुडबुडे तेवढे दिसले त्यांना. अवधुत नव्हताच तिथे. त्याला पोहता येत नाही एवढेच आठवले त्यांना.
"अवधुत.... अवधुत...." मामांनी त्याला हाका मारायला सुरुवात केली. मागोमाग भटजी ओरडले. त्याबरोबर दोन चार जण त्यांच्या दिशेने धावले व त्यांनी पाण्यात उड्या मारल्या. पण प्रवाहाचा वेग जास्त होता. अवधुत नव्हताच तेथे आता.

८ मे

पुणे . शिवाजीनगर..... इन्जिनिअरिंग हॉस्टेल.. विठ्ठल धायगुडे... वय वर्षे...२०, राहणार...

"विठ्या, सोलिड पिक्चर हाय बघ. दत्त्या कालच बघून आलाय. ही बघ, अलकाची दोन तिकीटं पण आणलीत." शिर्‍या अर्धा थेटरला पोहोचलाच होता.
"शिर्‍या, इंग्लिश हाय का पिक्चर ? " विठ्या त्याच्या मुलभुत प्रश्नावर अडकला.
"हिंदीत डब केलाय." शिर्‍याने त्याचा प्रश्न सोडवला.
"चल मग." विठ्या दाराकडे वळला.
"विठ्या, नाश्ताचे पैसे हायेत ना ? " शिर्‍याने बाहेर पडता पडता त्याला विचारलं.
"हायेत रे. चल." विठ्याने त्याच्या खांद्यावर हात टाकला.
थोड्याच वेळात दोघे अलकाला पोहोचले. चित्रपट सुरू व्हायला फक्त पाच मिनिटे होती. शोच्या सुरुवातीला उत्साहात असलेल्या विठ्याचा मुड शिर्‍याला बदलल्यासारखा वाटायला लागला. शो संपला आणि दोघे बाईकच्या दिशेने वळले. नेहमीचा, चित्रपट संपल्यावर, पोपटासारखा शंभर प्रश्न विचारणारा विठ्या मुग गिळून गप्प बसलेला.
"विठ्या, गप का रे ? सिनेमा आवडला नाही का तुला ?" शिर्‍याला त्याचं ते गप्प राहणं फ़ारच खटकत होतं.
"शिर्‍या, जन्माला येणार्‍या माणसाचा अंत आधीच ठरलेला असतो का ? " विठ्याचा असंबद्ध प्रश्न.
"असतो म्हणतात." शिर्‍याला त्याच्या प्रश्नाचा रोख समजला नसला तरी त्तो चित्रपटाचा असर आहे ह्याची खात्री होती त्याला. "म्हणजे माझापण ठरलेला असेल. काय असेल तो ? " विठ्याचा पुढचा गुगली.
"बस आता. बाकी हॉस्टेलवर गेल्यावर बोलू." शिर्‍याने बाईक स्टार्ट गेली.
"शिर्‍या, चालत्या बाईकवरून पडल्यावर होईल का रे ? " विठ्या बोलला आणि शिर्‍या दचकला.
"समोरून येणार्‍या डंपरखाली ?" विठ्याचा पुन्हा प्रश्न. शिर्‍याने गिअरमध्ये टाकलेली बाईक पुन्हा न्युट्रलला आणली.
"विठ्या, काय प्रोब्लेम झालाय ? तो पिक्चर संपलाय. ते आता डोक्यातून काढून टाका." शिर्‍या त्याच्याकडे वळला.
"शिर्‍या, जर मरण आधीच ठरलेलं असेल तर मग या असल्या जगण्यात काय अर्थ ? जगण्याच्या प्रत्येक क्षणावर मरण्याची भीती ठाण मांडून बसलेली आहे. हे असलं जिणं जगण्यापेक्षा मरण बरं." विठ्याच्या आवाजात शिर्‍याला अनामिक निश्चय जाणवला.
"विठ्या, हे बघ, हॉस्टेलवर गेल्यावर बोलू." शिर्‍याने बाईक गिअरमध्ये टाकली. लवकरात लवकर आता हॉस्टेलवर पोहोचावं एवढच त्याच्या डोक्यात होतं. अचानक विठ्या बाहेरच्या बाजूस धावला. शिर्‍या उतरुन बाहेर धावेपर्यंत करकचून ब्रेक लागल्याचा आवाज आणि पाठोपाठ रस्त्यावर उडालेला गलका. शिर्‍या क्षणभर थांबला आणि गर्दीच्या रोखाने धावला. विठ्या रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

(एक राहीलं, चित्रपटाचं नाव होतं 'फायनल डेस्टिनेशन')

१० मे

कोल्हापुर - शबनम शाकूर, वय वर्षे ३५, राहणार.............

नगर - तन्मय गोखले, वय वर्षे २८, राहणार .............

रत्नागिरी- अबोली सावंत, वय वर्षे १४, राहणार ................

११ मे

अकोला - उत्तम तांबट, वय वर्षे ४२, राहणार ..............

चंद्रपुर - सोपान चॅटर्जी, वय वर्षे ३६, राहणार ............

मालेगाव - सत्तार शेख, वय वर्षे ५२, राहणार ..............

२४ जुलै

भारमळांनी फाईल बंद केली आणि चुरचुरणारे डोळे बंद केले. पण मेंदू मात्र बंद झाला नाही. आतापर्यंत वाचलेल्या सगळ्या घटनांचं पृथक्करण मेंदूत सुरू झालं. आतापर्यंतच्या सगळ्या घटना मृत्युशी संबधित काही ना काही होतचं. सुर्यास्त, अस्थिविसर्जन, धावती ट्रेन.. वगैरे... यासारख्या गोष्टी पाहतानाच वा अनुभवतानाच मयतांची विचारधारणा बदलली व त्यांनी आत्महत्या केल्या. पण ती कोणती गोष्ट ज्याने त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले ? त्याचं उत्तर फक्त पोस्टमार्टेम रिपोर्टमध्येच मिळणार याची त्याना खात्री होती.
"केव्हा आलात ? " मागुन सुमतीबाईंचा आवाज आला आणि ते वळले.
"झाला थोडा वेळ. तुझी डोकेदु:खी काय म्हणतेय ? "
"नेहमीचचं झालय हे आता. वय झालय की होते म्हणे. हे काय घेऊन बसलात ?" त्यांनी टेबलावरचा पसारा पाहीला.
"आमचही नेहमीचचं. काम. दुसरं काय ? " ते हसले.
"चला. जेवणाचं पहाते. झालं की आवाज देते. तुम्हाला काही हवयं का ? " त्या दाराकडे वळता-वळता थांबल्या.
"नको. तुझं चालू दे." त्यांनी फाईल उघडली. सीडी काढून कॉम्पुटरमध्ये सारली. सगळा तक्ता समोर होता. 'पोलिसखातं आता बरचं पुढारलयं म्हणा. या नव्या नव्या टेक्नोलॉजीमुळे काम किती सोपं झालय.' भारमळ स्वतःशीच पुटपुटले. 'या सगळ्या प्रकरणात काहीतरी साम्य असायलाच हवं.' त्यांना याची खात्री होती. त्यांनी पोस्टमार्टेम रिपोर्ट न्याहाळायला सुरुवात केली. एका जागी थांबले. तो व्हिसेरा रिपोर्ट होता. त्यांनी आणखी चार-पाच रिपोर्टस चेक केले. शेवटी 'पेपरमिंट' हा शब्द फायनल केला. त्यांना तपासाचा धागा सापडला होता.

२५ जुलै

"हॅलो, डॉक्टर माने ?"
"बोलतोय."
"मी सीआयडी इन्स्पेक्टर भारमळ, मुंबईहून बोलतोय. आठ मेला कुलकर्णी नावाच्या इसमाने सोलापुर महापालिकेच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्याचे पोस्टमार्टेम तुम्ही केले होते."
"बर मग ? "
"त्याच्या व्हिसेर्‍यात पेपरमिंटचे अंश सापडल्याचा उल्लेख आहे. मला त्याबद्दल अजून काही माहीती मिळेल का ? "
"भारमळसाहेब, पहावं लागेल. असचं सांगता येणार नाही. मी तुम्हाला उद्या फोन करून याची संपुर्ण॑ माहीती देतो."
"प्लीज डॉक्टर. मी तुमच्या फोनची वाट पहातो."

"हॅलो, डॉक्टर लघाटे ? "
"यस. लघाटे. युअरसेल्फ ?"
"मी सीआयडी इन्स्पेक्टर भारमळ, मुंबईहून बोलतोय. १० मेला अबोली सावंत नावाच्या एका बाईने आत्महत्या केली होती व तिचे पोस्टमार्टेम तुम्ही केले होते."
"सो. अ‍ॅनी डाउट अबाऊट इट ? "
"नाही. तिच्या व्हिसेर्‍यात पेपरमिंटचे अंश सापडल्याचा उल्लेख आहे. मला त्याबद्दल अजून काही माहीती मिळेल का ? "
"शुअर. व्हाय नॉट ? बट मि...."
"भारमळ."
"यस. आय नीड सम टाईम फॉर दॅट. आय होप यु वॉन्ट माईंड."
"मी उद्या फोन करतो डॉक्टर." भारमळानी फोन ठेवला. 'काय साला इंग्रजी फेकतोय. मराठी असून यांना मराठी बोलण्यात लाज.' भारमळांच तत्क्षणी लघाटेंबद्दल झालेलं मत त्यांनी मनातल्या मनात नोंदवल. 'चला नेक्स्ट'. ते पुढच्या नंबरकडे वळले.

"शिंदे, किती फोन झाले ? "
"१३ साहेब."
"लवकर करा. हे काम आज संपायला हवं."
"करतो साहेब."

२६ जुलै

आख्खा दिवस पुन्हा फोनाफोनी. संध्याकाळपर्यंत त्यांनी बर्‍याच डॉक्टरांची मते (फॅक्स) समोर ठेवली आणि पुन्हा त्यातला समान दुवा शोधू लागले. शिंदे अधुनमधुन काही फॅक्स आणून समोर मांडू लागले.

२७ जुलै

"इन्स्पे. वासवे, भारमळ बोलतोय. सीआयडी ऑफिसमधून. भाईंदर पुलावरून आत्महत्या केलेल्या चिरागच्या सदर्भात थोडी माहीती हवी होती."
"बोला सर, काय माहीती हवी आहे ? "
"तुमच्या लक्षात आहे वाटतं तो ? "
"हो सर. या केसने डोकं खराब केलय माझं. विसरणं अशक्य."
"मला फक्त एवढं चेक करून सांगा की त्याला गोड खाण्याची म्हणजे चॉकलेटस किंवा गोड गोळ्या असं काही चघळण्याची सवय होती का ? किंवा एखादा त्रास.. शरीरदुखी, पोटदुखी, डोकेदुखी वगैरे.. ? शक्य तेव्हढ्या लवकर मला फोन करा."
"यस सर. दुपारपर्यंत कळवतो सर."
.................................................

"मिसेस. मनिषा ? "
"कोण बोलतय ? "
"मी इन्स्पे. भारमळ, मला तुमच्या मैत्रीणीसंबंधी, मिसेस. मेथिल्डासंबंधी थोडीशी माहीती हवी होती ? "
"काय..... काय माहीती हवीय ? ... मी आधीच सगळं सांगितलय."
"मला माहीत आहे ते. मला फक्त एव्हढं सांगा की त्यांना काही त्रास होता का ? पोटदुखी, डोकेदुखी वगैरे.... किंवा त्यांना कायम गोड खाण्याची आवड होती का ? त्या गोड गोळ्या बाळगायच्या त्यांच्या जवळ ? "
"गोड गोळ्या.... तिला डायबेटीस होता. त्यामुळे तशा गोळ्या ठेवायची ती. सुगर लो झाली तर लागायची तिला. शिवाय तिला डोकेदुखीचा त्रास व्हायचा. टेंशन खुप घ्यायची ती."
"कोणत्या गोळ्या घ्यायची ती ते सांगू शकाल काय ? "
"ते नाही आठवत. तिच्या घरी विचारावं लागेल. तुम्ही तिच्या नवर्‍याशी बोला ना. त्यांना माहीत असेल."
"थॅक्स. मी बोलतो त्यांच्याशी."
.............................................

"मि. सेबेस्टिन ? "
"यस. "
"मी इन्स्पे. भारमळ. तुमची मिसेस लिमलेटच्या काही गोळ्या घ्यायची. शिवाय डोकेदुखीसाठी देखील गोळ्या घ्यायची. त्यापैकी एखाद दुसरी तुमच्या घरी आहे का ? "
"असेल. पळोंग जाये..... बघाव लागेल."
"मी हवालदार गोरूवलेना तुमच्याकडे पाठवतोय. त्यांच्याकडे द्याल का ? "
"असेल तर देईन."
"थॅंक्स."

२९ जुलै

"शिंदे, अवधुत रांगणेकरांचे मामा येणार होते. त्याचं काय झालं ? "
"येऊन गेले साहेब. हे पाकीट दिलयं."
"गुड. अजून कुणाकुणाची पाकीट आलीत ? "
"दोन चार आहेत. काही पत्रे व मेल आलेत. सगळं तुमच्या टेबलावर ठेवलयं. "
"गुड, आता एक काम करा. सगळ्या मयतांच्यापैकी शक्य तेव्हढ्या जणांचे व्हिसेरे मागवून घ्या आणि लॅब टेस्टिंगला पाठवा. पाठवल्यावर सांगा मला."

४ ऑगस्ट

"हे बघा डॉक्टर जोशी, मला फक्त एव्हढं कळायला हवयं की ते पेपरमिंटचे अवशेष आले कुठून ? बस."
"भारमळ, प्रयत्न करतो. अशक्य नाही पण इतकं सोप देखील नाही."

८ ऑगस्ट

"सर, डॉक्टर जोशींचा रिपोर्ट आलाय. तुमच्या टेबलावर ठेवलाय."
भारमळांचे डोळे चमकले. त्यांच्या आधीच्या माहीतीवर शिक्कामोर्तब झाल होतं. पेपरमिंटचा उपयोग 'पेन रिलिव्हर' म्हणून होतो.

९ ऑगस्ट

"काय गं आहेस कुठे ? "
"मॉलमध्ये आलेय. अक्षताबरोबर. तिला शॉपिंग करायची होती."
"मग मैत्रिणीबरोबर करायच्या गोष्टीत तू कशी काय ? "
"साडी घ्यायचीय तिला. कॉलेजच्या फंक्शनसाठी. त्यात मैत्रिण काय कामाची ? त्यासाठी आईच."
"मजा करा. बाकी डोकं आहे ना ठिकाणावर ? "
"हो. काहीच त्रास नाही."
"घरी पोहोचलीस की फोन कर."

११ ऑगस्ट

"यस सर."
"भारमळ. इन्स्पे. भारमळ. मला तुमच्या व्हीपींना भेटायचयं. त्यांची अपोईंटमेंट आहे."
"पण व्हीपी काल रात्रीच जर्मनीला गेलेत..... " इंटरकॉम वाजला. " एक मिनिट सर."
"हॅलो सर..."
"....."
"यस सर."
"............"
"ते आलेले आहेत सर."
"........."
"ओ.के. सर." फोन ठेवून ती भारमळांकडे वळली. "सर, आमचे एम्.डी. तुम्हाला भेटतील. समोर. फिफ्थ फ्लोर."
"थॅंक्स." भारमळ लिफ्टकडे वळले. काही क्षणातच ते 'अशोका लॅबोरेटरीज' च्या एम. डी. समोर होते.
"मी. चक्रवर्ती. बोला. मि. भारमळ, काय करू शकतो तुमच्यासाठी ?" चक्रवर्तीनी हसून त्यांच स्वागत केलं.
"थोडी चौकशी करायची होती." भारमळ त्यांच्यासमोर स्थानापन्न झाले.
"नक्कीच. काय घेणार ? चहा की कॉफी ? " चक्रवर्तीनी ऑफिस मॅनर्स पाळत विचारलं.
"कॉफी."
"रोज, टू कॉफी प्लीज."
"मराठी छान बोलता तुम्ही." भारमळ त्यांच्या त्या भाषेच्या प्रभुत्वाने थोडे प्रभावित झाले.
"जन्म इथलाच मि. भारमळ. इथे अवतीभवती अनेक मराठी माणसे आहेत माझ्या. "
"गुड. मि. चक्रवर्ती मी इथे का आलोय याची तुम्हाला कल्पना असेलच."
"आहे मि. भारमळ. तुम्ही 'हेडेसिन'च्या संदर्भात इथे आला आहात याची जाणिव आहे मला."
"गुड. मग मला थोडी सविस्तर माहीती द्याल. तशी बरीच माहीती माझ्या या रिपोर्टसमध्ये आहेच. पण तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल. "
"तुम्ही इथपर्यंत आलात तेव्हा तयारीत आला असाल याची खात्री आहेच मला. जास्त टेक्निकल डिटेल्समध्ये न जाता थोडक्यात सांगतो. माणसाच्या सगळ्या कृतींवर मेंदुचं नियंत्रण असते. आपल्या मनात निर्माण होणार्‍या अनेक भावना ह्या मेंदुमध्ये पाझरणार्‍या द्रव्यांचे फलित आहे. हार्मोन्स म्हणतात त्याला. यातलीच एक भावना म्हणजे नैराश्य. प्रचंड नैराश्य आलेला माणूस आत्महत्येचा विचार करतो." चक्रवर्ती बोलता-बोलता थांबले आणि त्यांनी भारमळांकडे पाहीलं. त्यांनी 'चालू ठेवा' चा इशारा केला.
"नैराश्याचं मळभ हळू हळू मनावर साचत जात आणि मग जगण्याबद्दलची आस्था नाहीशी होते. पण हे एका दिवसात वा रात्रीत होत नाही. परिस्थितीनुसार स्थित्यंतरे घडत जातात."
"मग यात 'हेडेसिन' आली."
"हो. डोकेदुखी ही एक अशी व्याधी जी प्रत्येकाला अधूनमधून छळतेच. त्यावर बाजारात अनेक औषधं आहेतच. आम्हाला त्यात वेगळेपण पाहीजे होतं. आमच्या लॅबमध्ये यावर गेली अनेक वर्षे संशोधन चालू होतं. यात आम्हाला असं कॉम्बिनेशन सापडलं जे यावर एक रामबाण उपाय होतं. ते आम्ही हेडेसिनमध्ये वापरलं. रिजल्ट पॉजिटिव्ह होता आणि 'टॅबलेट' लाँच केली. पण यात एक गफलत झाली. याच्या साईड इफेक्टवर लक्ष गेल नाही. कारण ते इफेक्ट व्यक्तीसदृश्य होते. प्रत्येकाची रोग प्रतिकारशक्ती, रक्ताचा गट व त्याचा शुद्धपणा, त्याच्या शरीरात ठाण मांडून बसलेले रोग इत्यादी. या टेबलेटचा त्यानुसार प्रत्येकाच्या मेंदुवर परिणाम होऊ लागला. टेबलेटमधील कॉम्बिनेशनमुळे मेंदुतील नैराश्य निर्माण करणारे हार्मोन्स अ‍ॅक्टीव्ह होऊ लागले. त्यांचे प्रमाण बांडगुळांसारखं वाढून मेंदुच्या कार्यक्षमतेला वेढा घालू लागले आणि शेवटी त्या व्यक्ती आत्महत्या करू लागल्या. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही महाराष्ट्रातल्या ठराविक शहरात ही टॅबलेट लाँच केली. त्यानंतर आत्महत्याचं सत्र सुरू झालं. मधल्या काळात इथे लॅबमध्ये काही टेस्टमध्ये टॅबलेटमधला गोंधळ लक्षात आला. आम्ही ताबडतोब टॅबलेट बॅकाऊट केली. त्यामुळे आता अशा आत्महत्या आता होणार नाहीत."
"बाजारात 'हेडेसीन' बिल्कुल नाही असं म्हणायचय तुम्हाला ? "
"शंभर टक्के खात्री नाही. छोट्यामोठया किराणा मालाच्या दुकानात असू शकते किंवा कुणी घरी स्टॉक केला असेल तर तेही शक्य आहे. बाकी आढळणार नाही हे खात्रीने."
"तुम्हाला जेव्हा हा प्रोब्लेम जाणवला तेव्हा तुम्ही याची जाहिरात का नाही केलीत ?"
"७६ वर्षांचे गुडविल असलेली कंपनी एका रात्रीत बंद झाली असती मि. भारमळ. जे गेले त्याच्या कितीतरी पटीने जास्त लोक गेले असते मग. कंपनीच्या प्युन, शेअरहोल्डरपासून संचालकांपर्यंत."
"मि. चक्रवर्ती, थँक्स. आज मी माझा फायनल रिपोर्ट बनवून साहेबांना देऊ शकतो."
"त्याने काय होईल मि. भारमळ ? "
"ही केस सोल्व होईल. दोषींना शिक्षा होईल. आणि काय ? "
"त्यापुढचे परिणाम मी तुम्हाला आधीच सांगितलेत मि. भारमळ. माझ्याकडे यावर दुसरा उपाय आहे." चक्रवर्तीनी एक बॅग समोर ठेवली.
"आमच्याकडे उत्तमोतम वकीलांची फौज आहे. केस वर्षानु वर्षे चालत राहील. निकाल लागेपर्यंत आपला निकाल लागलेला असेल. यात कोणाचा फायदाच नाही. त्यापेक्षा ही केस क्लोज करायची. आत्महत्यादेखील थांबतील आणि जे झालय त्यापेक्षा जास्त नुकसान होणार नाही. इच्छा असली तरी आम्ही त्या बळींना नुकसानभरपाई देऊ शकत नाही हे जाणण्यापत तुम्ही हुषार आहातच."
"तुम्ही माझ्यापेक्षाही हुषार आहात मि. चक्रवर्ती."
"तुमच्याएवढा नाही. पण तुम्हाला हे कळलं कसं ? "
"पेपरमिंट. पेन रिलिफच्या गोळ्यात ते वापरतात. प्रत्येकाच्या पोटात त्यांनी घेतलेल्या शेवटच्या गोळीतला पेपरमिंटचा अंश होतात. लॅब टेस्टमध्ये काही व्हिसेरांमध्ये कॅफिनही सापडलं तसेच अ‍ॅसेटमिनाफेन देखील. नोर्मली डोकेदुखीच्या गोळ्यात हे घटक असतातच. मग मयताच्या नातेवाईकांकडून तुमच्या टॅबलेट व रिकामे कवर्स मिळाले. तेव्ह्ढं पुरेसे होतं."

रिक्षाबाल्याला पैसे देऊन भारमळांनी बॅग उचलली व ते बिल्डिंगच्या दिशेने चालू लागले. पावसाची रिमझिम चालू होतीच. पावसाचं पाणी साठल्याने रिक्षा पुढे यायला तयार नव्हता. ते सी विंगच्या दिशेने चालू लागले. तोच...
भारमळ समोर धावले. त्यांनी तिचा चेहरा पाहीला आणि त्याच्या हातातली बॅग निसटली. गुडघे टेकवून ते तिच्या जवळ बसले. सुमतीच्या चेहर्‍याखालून वाहणारे रक्ताचे ओघळ त्याच्यापर्यंत पोहोचले होते.

समाप्त.

रेखाचित्रः पल्लवी देशपांडे

गुलमोहर: 

छान आहे! फक्त १ शंका..
कलशावरील कापड काढून अवधुतने अस्थि सागरात सोडल्या >> सागरात की नदीत?
-----------------------------------------------------------
इथे प्रत्येक फ्लॅटचे दार बंद नी प्रत्येक जण घरात बसून आहे,
शेजार्‍याची बेल वाजल्यावर मात्र आयहोल मधून पाहण्याचा छंद आहे!
-----------------------------------------------------------

कौतुक नेहमी प्रमाणेच जबरी..
फक्त मध्ये थोडासा संशय येऊन गेला.. सुमतीच्या बाबतीत असेच काहीसे घडेल असा आणि तोच खरा ठरला.. कदाचित त्यामुळे शेवटचा धक्का थोडा धीरेसे वाटला..
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

जबरदस्त. अजून काही सुचतच नाहीये प्रतिक्रिया द्यायला !

- गौरी

माधवी चुक दुरूस्त केली आहे. कथा आवडली की नाही ते लिहलं नाहीत.
हिम्स, ते टाळायची इच्छा होती पण कथेला जास्त रहस्याचा टच देऊ नये असं ठरवलेलं आता. पुढच्या कथेत निराशा होणार नाही याची काळजी घेईन.
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे

त्यामुळे शेवटचा धक्का थोडा धीरेसे वाटला..>> हिम्सकुलना अनुमोदन.
केस झटक्यात सॉल्व्ह झाली. हे म्हणजे विमानात बसे बसेपर्यंत उतरायची वेळ आल्यासारखं वाटलं.(स्वैर अनुवाद "रहना है तेरे दिल में" च्या एका संवादाचा.)
पण कथा मस्त आहे. फार आवडली.

कौतुक ! चांगली आहे कथा.. सुमतिच जाण अगदि प्रेडिक्टेबल वाटल तरि अपेक्षित परिणाम साधलाय्.लेखनशैली छान.

सहेद पाण्यात गेलो तर >> इथे सदेह हवे..

कौतुक, मस्त झालीये कथा.
हिम्स म्हणतो ते खर आहे पण कथेचा flow इतका जबरदस्त आहे की खरतर तो विचार करायलाही वेळ मिळाला नाही. आवडली.
---------------------------------
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

कौतुक, कथा आवडली. सुमतिचा शेवट असा होणार ही शंका आलीच होती. भारमळांनी बॅग स्विकारली तिथेच त्यावर शिक्कामोर्तब झाले. कथा ओघवती आहे.

आभार सर्वांचे. वर म्हटल्याप्रमाणे यात गुंतागुंत निर्माण केली नाही. केस लांबवणे अशक्य नव्हते. पण यावेळेस थोडक्यात आटपायचं ठरवलं होतं. म्हणून भारमळांना मध्यवर्ती ठेवून मांडणी केली. कथा आवडली हेच खुप झाल माझ्यासाठी.
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे

कथा छान आहे.

"असेल. पळोंग जाये..... बघाव लागेल" >>>> मला यातील 'पळोंग जाये' चा अर्थ सांगेल का कोणी?

वाचली पूर्ण कथा. छान आहे. सुमतीचे जाणे प्रेडिक्टेबल वाटले तरी त्यामुळे कथेच्या प्रवाहात काही बाधा येत नाही. मात्र मनोज नाईट श्यामलन च्या 'हॅपनिंग' या एव्हढ्यात बघितलेल्या ईंग्रजी चित्रपटातील कथेत आणि या कथेत त्या सामूहिक आत्महत्या करण्याच्या उन्मादाच्या बाबतीत कमालीचे साम्य आहे.अर्थात तो चित्रपट आधी बघितल्यामुळे येथे नाविन्य नाही वाटले काही.

फक्त फरक एव्हढा आहे की त्यात निसर्ग किंवा वृक्ष, वनस्पती ह्या मानवजातीविरूद्ध युद्ध, बंड पुकारून विशिष्ट पद्धतीने हवेतून न्यूरोटॉक्सिक घटक पसरवून माणसांच्या मनात आत्महत्या करण्याचा उन्माद जागृत करतात. आणि या कथेत टॅबलेट्मधील विशिष्ट औषधांमुळे तसे होते. आणि विलक्षण योगायोग म्हणजे आत्महत्येचे प्रसंग पण असेच आहेत. ते डंपरखाली आत्महत्या करणे, उडी मारून वगैरे. अर्थात बाकी प्लॉट वेगळा आहे चित्रपटाचा. ज्यांनी बघितला असेल त्यांना जाणवले असेल ते.

फक्त मला सुमतीच्या जाण्यापेक्षा शेवटी काहीतरी वेगळा झटका बसेल असे वाटत होते. काहीतरी अनपेक्षित शेवट असेल या अपेक्षेनेच वाचत होतो. पण कौतुकने सांगितलेच की मुद्दाम प्रेडिक्टेबल ठेवले म्हणून. पण छान ओघवती कथा. कथेचा फ्लो जबरी ठेवलाय; त्यामुळे अपेक्षित परिणाम साधल्या जातो. मस्त.आता ८८० व्होल्ट चा झटका देणारी नवीन कथा लवकर येवू दे.
.............................................................................
येता कणकण कवितेची
करा तपासणी डोक्याची!

मीसुद्धा उमेश् ने लिहिलेलेच लिहिणार होते, 'हॅपनिन्ग' ची आठवण झाली अगदी.

कौतुक, मस्तं कथा. (पण तुझ्या आधीच्या 400KV वालींसारखी नाही. तरी कथेचा ओघ जबरी रे).
पात्रांची नावं, त्यांचे संवाद,.. कसलं निरिक्षण आहे तुझं. जियो!

सुप्रभात, असेल. पळोंग जाये..... बघाव लागेल" >>>>

कौतुक, हिम्स्कुलला अनुमोदन.. पण माझा अपेक्षाभंग नाही झाला.. मला आवडली कथा Happy !

कौतुक कथा छानच, खुप आवडली... ! कथेची मांडणी, वेग जबरद्स्त.
(भारमळांपेक्षा थोडासा कमीच Wink )
शेवट पटेबल असला तरी तो तुझ्या कथेत असल्याने पटला नाही. मला वाटलं होतं आपल्याला असं वाटतय म्हणल्यावर शेवट नक्की काहीतरी वेगळा असणार. पण ......
अवांतर : आणि ते "अस्थी सागरात सोडल्या" देखील चाललं असतं, कारण असेही गोदावरीला नाथसागराचेच पाणी असते. Wink

***********************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

शेवट प्रेडिक्टेबल वाटला तरी आवडली कथा..
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.

कौतुक कथा आवडली. फ्लो वेगवान आणि कुठे जाणार हे कळलं तरीही निराशा नाही झाली.

कौतुक, जबरदस्त. मलापण सुमतीचं पण काहितरी होणार असं वाटून गेलं होतं.
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

कौतुक, खुप छान कथा होती..सुमतीची डोकेदुखी, भारमळानी बॅग उचलणे आणि सुमतीचा म्रुत्यु एक्स्पेक्टेड...छान वेग होता कथेचा..आवड्ली..:)

सर्वांचे आभार.
उमेश, एवढं माझ्यासाठी खरडलसं त्याबद्दल आभार. 'हॅपनिंग' पाहीला नाही. नाहीतर सगळ्यांना वेगळ्या पदधतीने मारलं असतं. यातल्या आत्महत्या कुठे ना कुठे घडलेल्या आहेत. वर्तमानपत्रातून वाचनात आलेल्या आहेत. मुलूडला ती लांबलेली मान मी स्वतः पाहीली होती.
मला वाटतं रहस्यकथा लिहीता-लिहीता मलाही लेबल लागलयं. आताच सावरायला हवं.
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे

मुलूडला ती लांबलेली मान मी स्वतः पाहीली होती.>> आई गं. तुच भोवळ येवून पड्ला होतास का?

************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

कौतुक, कथेची कल्पना/विषय छान आहे, पण शेवट अपेक्षित होता..
कथेची मांडणी, पात्रे, संवाद आणि कथेचा वेग..एकदम मस्त

----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

नाही अश्विनी. तसा थोडा धीराचा आहे मी. म्हणून तर असे खुन पाडत असतो कथेत. तिथे शेवटच्या लेडीज डब्यासाठी थोडीफार गर्दी होती. एक किंचाळली तर दुसरी भोवळली. तेव्हा पाहीलं ते.
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे

परफेक्ट डिटेलिंग केलं आहे....... ना कम, ना ज्यादा.. आवडली कथा.

मस्त!!!!... खूप आवडली कथा!

प्रेडिकटेबल आहे शेवट तरी कथा मनपासून आवडली!

========================
बस एवढंच!!

मस्त आहे कथा. आवडली...
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

फ्लो जबरदस्त! कथा आवडली!

छान कथासुत्र..!
आणि मांडणी तर झकासच. Happy

सहीये कथा.. मलातरी शेवट अनपेक्षित होता Happy मस्त लिहिली आहे.
-------------------------------------------
Prioritize. It hurts (others) but helps (you).

Pages