हळद आणि हडळ - २

Submitted by देवभुबाबा on 19 July, 2021 - 05:01

हळद आणि हडळ - २

शुद्धीवर आली तेव्हा अमृता एका लाकडी खुर्चीवर बसलेली होती. डोळे चौफेर फिरवत ती न्याहाळू लागली. गर्द काळोखातही थोडंफार समजण्याइतपत तिला दिसत होत. कोंदट दुर्गंधी, जागोजागी कोळयाचे जाळे, धूळ. भेदरलेल्या अवस्थेत ती उठून पळायचा प्रयत्न करत होती. मध्येच हुंदक्यांचा आवाज येत होता. कोणीतरी बहुदा आतल्या खोलीत रडत असाव. अमृताचे हात पाय बांधले होते. तोंडावर पट्टी बांधली होती. जखडलेल्या अवस्थेतुन ती सुटका होण्यासाठी धडपडत होती. जोराने ओरडण्याचा प्रयत्न करत होती.

तोच तिला आवाज येऊ लागला. "तुला पुन्हा ईथेच यायचंय, लवकर येशील ना?"

अमृता नकारार्थी मान हलवून बोलण्याचा प्रयत्न करू लागली, झटपटू लागली.

तोच तिच्या श्रीमुखात कुणीतरी जोरात लगावली. तोंडावर कुणीतरी पाणी मारलं.

"तायडे, अगं ये तायडे, उठ , काय होतंय तुला?

आई, तायडी बघ कशी करते."

अवंती अमृताला झोपेतून उठवू लागली.

अमृताची आई आणि आजी धावतच तिच्या खोलीत आले.

अमृता घामाने डबडबली होती. किती भयंकर स्वप्न पडलं होत.

आई तिला विचारू लागली. "खराब स्वप्न पडलं का, अमृता?"

आजी बोलू लागली, "दडपलं असेल, लग्न जवळ आलंय बाहेर जास्त फिरू नको आणि रात्री अपरात्री बाहेर जात जाऊ नकोस."

अमृता ने स्वतःला सावरलं. खराब स्वप्न समजून ती तयारीला लागली. आज खरेदीसाठी अमृता आणि अवंती बाहेर जाणार होत्या.

पिवळ्या रंगाचा कुर्ता, लाल रंगाचा पायजमा आणि लाल रंगाची ओढणी, भुवया थोड्या कोरून अमृता तयार झाली. खांद्याला बॅग अडकवून तिने अवंतीला आवाज दिला. "अवंती, चल निघूया, उशीर होतोय".

अवंती आणि ती, दोघीही निघाल्या. आजीने आतल्या खोलीतूनच आवाज दिला, " अमृता, देवाला पाया पडून जा".

अमृता आणि अवंती तोवर घराबाहेर पडल्या होत्या. आजीची हाक दुर्लक्षित करून त्यांच्याच नादात त्या घाईघाईत चालत होत्या. काही पावलांवर तारा साहेबांचा बंगला होता आणि त्याच बंगल्या समोरून तिचा येण्या जाण्याचा रस्ता होता.

जसजसा बंगला जवळ येऊ लागला तसतशी अमृताची पावले संथ पडू लागली. अवंती मात्र पुढे चालतच होती. रिक्षा पकडण्यासाठी नाक्यावर पोहोचायचं होत.

अमृताला रात्रीच्या स्वप्नातील प्रसंग आठवू लागले. भीतीने मनात घर केले होते. बंगल्याच्या दाराकडे तिने पाहिले, दार बंदच होते. तिला तो रडण्याचा आवाज आठवला, ते शब्द आठवले. "तुला पुन्हा इथेच यायचंय, येशील ना?"

अमृता घाबरली. कपाळावर घाम साठला. ती पावले जोरात उचलू लागली. चौकात अवंती रिक्शात बसली होती. "चल ग तायडे, किती हळूहळू चालतेस तू?" अवंती चिडून बोलली.

दोघी बाजारात पोहोचल्या तेव्हा बाजारात चांगलीच गर्दी होती. दोघींनीही आपापल्यासाठी ड्रेस, मेकअप बॉक्स, सँडल्स, परफ्यूम्स, नेलं पॉलिश, साड्या अशी भरगच्च खरेदी केली. दुपारच्या सुमारास दोघी परतत होत्या. अवंतीला घरी जाण्याची घाई. अमृता दोन्ही हातात सामानाच्या पिशव्या घेऊन हळूहळू मागून चालत येत होती. तारासाहेबांचा बंगला जवळ येताच ती पुन्हा भयग्रस्त झाली. बंगल्याच्या बाजूला लाल फुलांनी बहरलेला गुलमोहर तिला साद घालत होता. ती त्याकडे पाहताच राहिली. दोन्ही हातात सामानाच्या पिशव्या असूनही बंगल्या समोर तिचे पाऊल खोळंबले, डोळे एकाग्र झाले. एकटक झाडाकडे पाहण्यात ती जणू त्यातच हरवून गेली. काही क्षणाचाच विलंब असेल, एक सावली झाडामागून धावतच बंगल्याच्या मागे हरवली. काय होते ते?

अमृताला काहीतरी दिसल्याचा भास होता कि आणखी काही?

Group content visibility: 
Use group defaults

झोपेमध्ये भयानक स्वप्न पडल्यामुळे आपण स्वप्नामध्ये ओरडण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु आवाज बाहेर फुटत नाही असा आपला भास असतो. परंतु प्रत्यक्षात आपण जोरजोरात ओरडत असतो. स्वप्नात आपल्याला श्वास घ्यायला त्रास होत असतो. परंतु प्रत्यक्षात आपण झोपेत असतो. या अश्या प्रकारच्या घटनेला भुताने दडपलं अस काही ठिकाणी म्हंटल जात.