एक होता अवचट - भाग ९

Submitted by देवभुबाबा on 12 July, 2021 - 06:55

नवरामुलगा आणि त्याचे वडील बाहेर एका कोपऱ्यात जाऊन चर्चा करतात. आणि पुन्हा येऊन बोलू लागतात.

नवरदेवाचे वडील:- भुरकटराव, आम्ही तुमच्या शब्दाचा मान ठेऊन गाडीचा खर्च १०,०००/- ने कमी करतो. पण लग्न मात्र या महिनाभरात उरकावे लागेल.

नाममात्र कमी केलेली रक्कम हा शब्दाचा मान नसून आपल्याला दाखवलेला ठेंगा आहे याची पुरेपूर कल्पना भुरकटरावांना आली होती. आणि त्यातही एका महिन्यात पैश्याची जमवा जमव करून लग्नाची तयारी करणे आव्हानात्मक होते.
मुलीच्या सुखाचा विचार करता थोडी धावपळ करणे अपरिहार्य होतेच.

मीनाक्षीदेवींकडे पाहत, मुक्यानेच इशाऱ्याने काय करायचं म्हणून विचारतात.
मीनाक्षीदेवी होकार देण्यास सांगतात.
सुपारी फोडून लग्न पक्क केलं जात.

इकडे लग्न जमल्याचं समजताच, अवचट दुखी होतो. मनातून खचतो. पण काय करणार. त्याच्याकडे काहीच पर्याय नसतो.
दुसऱ्या दिवसापासून तो स्वतःला कामात गुंतवून घेतो. लोकांशी बोलणं टाळतो. एकटा राहू लागतो.
भुरकटराव आणि मीनाक्षीदेवीसुद्धा काळजीत पडतात. एवढ्या कमी वेळात पैसे जमवून तयारी कशी होणार. वातावरण चिंताग्रस्त होऊन जाते.
लग्न पक्क झाल्यामुळे नवरदेव शाम्भवी ला अधून मधून फोन करू लागतो. मितभाषी शाम्भवी, आई वडिलांना चिंतेत पाहून बोलण्याच्या मनस्थितीत नसतेच, परंतु नाईलाज म्हणून थोडं फार मन राखण्यासाठी ती नवरदेवाशी बोलणं करत असते.

याच चिंतेत असताना भुरकटरावांना खोकल्याचा त्रास जाणवू लागतो.

नेहमीच्या डॉक्टर कडे जाऊन ते औषध घेऊन येतात. पहिला दिवस तसा साधारण जातो. दुसऱ्या दिवशी त्यांचं अंग दुखू लागत. ताप येतो. ते पुन्हा डॉक्टर कडे जातात. डॉटर औषध लिहून देतात. रात्रभरात त्यांचा ताप जास्तच वाढतो. कोरोनाची टेस्ट करायला हवी असं बरेच जण सांगतात. डॉक्टरसुद्धा त्यांना टेस्ट करायला पाठवतात. अँटीजेन टेस्ट केली जाते. त्यात पॉसिटीव्ह रिपोर्ट मिळतो. आता मात्र मीनाक्षीदेवी आणि शाम्भवी पुरते अवसान गाळून पडतात.

भुरकटरावांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करून शाम्भवी नवरदेवाला फोन करून सांगू लागते.
शाम्भवी:- (फोनवर) हॅलो... माझ्या पप्पांची तब्येत ठीक नाही. त्यांची कोरोना टेस्ट पॉसिटीव्ह आली आहे. Admit केलं आहे.
समोरून:- अरे तुम्हाला माहित आहे ना, सध्या काय परिस्थिती चालू आहे. कश्याला बाहेर फिरायचं? आता निस्तरा तुमचं तुम्ही.
नवरदेव फोन कट करतो.

शाम्भवी रडवेल होते. ज्यावेळी तिला मदतीची, आधाराची गरज आहे आणि ज्याच्याकडून अपेक्षा आहे तोच असा वागतोय.
मीनाक्षीदेवी शाम्भवीला विचारतात,"काय झालं शाम्भवी, सांगितलं का त्यांना?, काय बोलले ते?"
शाम्भवी:- (मीनाक्षीदेवींना मिठी मारते) आई, ते माझ्यावरच ओरडले, आणि फोन कट केला.
मीनाक्षीदेवी:- (शाम्भवीला गप्प करत) शाम्भवी नको रडू, काही नाही होत. आपलं आपण सांगायचं कर्तव्य केलय. त्यांना वाटलं तर येतील.

इकडे पवळ्याच्या आईला भुरकटरावांबद्दल कळताच ती अवचट ला कळविते. पवळ्याची आई:- (फोनवर) हॅलो, अवचट .. अरे बाळा तुला समजलं का?
अवचट:- मावशी काय झालं?
पवळ्याची आई:- अरे भुरकटरावांना admit केलय.
अवचट:- मावशी मला हॉस्पिटल चा address पाठवा, मी फेरी मारतो.

अवचट मोबाइल वर address पाहून लगेचच हॉस्पिटल ला जातो. हास्पिटलच्या बाहेर मीनाक्षीदेवी आणि शाम्भवी थांबलेले असतात. अवचटला येताना पाहून मीनाक्षीदेवी त्याला आवाज देतात.
अवचट:- नानी, कुठे आहेत? आता कशी आहे तब्येत?
मीनाक्षीदेवी:- बेड नंबर १५ ला आहेत. खोकला आणि ताप खूप आहे. weakness आहे.
अवचट:- ठीक आहे, मी पाहून येतो. तुम्ही नका काळजी करू. अण्णा होतील लवकर बरे.

खचलेल्या माणसाला शब्दांचा आधारच पुरेसा असतो. आणि अश्या परिस्थितीत एखादा आपल्यासाठी धावून येत असेल तर......
नक्कीच तो आधार सर्वांनाच हवाहवासा वाटतो.

अवचट आत जातो. भुरकटरावांना ऑक्सिजन मास्क लावलेला असतो. जवळ जाऊन त्यांना सांगू लागतो. "अण्णा काळजी करू नका, लवकर बरे व्हाल. व्यवस्थित खात पित जा. मी आणि पवळ्या बाहेर आहोतच. तुम्ही कसली चिंता नका करू?."

तेवढ्यात nurse येऊन त्यांच्या औषधांची लिस्ट अवचट कडे सोपवतो. आतूनच अवचट पवळ्याला फोन करून थोडे पैसे बरोबर घेऊन हॉस्पिटजवळ यायला सांगतो. सर्व मेडिसिन आणि रेमेडिसिवीर इंजेकशन nurse कडे सोपवून तो पुन्हा मीनाक्षीदेवींना भेटतो.
corona काळातील हॉस्पिटलच्या परिस्थितीशी चांगला अवगत असलेला अवचट सर्वात आधी दोघींनाही चहा बिस्कीट खायला देतो. नंतर दोघींनाही रिक्शात बसवून देत "नानी तुम्ही आता निवांत राहा. घरी जाऊन काही खाऊन घ्या आणि आराम करा. पवळ्या आणि मी दोघे आहोत इकडे. माझी ओळख निघेल इथे, स्टाफ मध्ये. ते पण लक्ष देतील".

Group content visibility: 
Use group defaults