एक होता अवचट --- भाग ८

Submitted by देवभुबाबा on 10 July, 2021 - 07:48

सर्वांनाच मदतीसाठी धावणारा आणि सर्वांशी प्रेमाने आपुलकीने वागणारा अवचट आता सर्वांच्याच परिचयाचा झाला होता. शहरात अनेकांना उपयोगी पडल्यामुळे त्याच्या नावाची चर्चा सर्वत्रच होती. असा गुणी मुलगा होणे नाही, अशीच त्याची ख्याती होऊ लागली.

त्याच सुमारास शाम्भवीला स्थळ चालून आलं. मुलगा MBA, नामांकित कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करणारा आणि गलेलठ्ठ पगार घेणारा. माहिती एकूणच मीनाक्षीदेवी खुश. मुलगा मुलीला पाहायला आला. पांढरे शुभ्र कपडे, चांगली शरीरयष्टी, कणखर आवाज, कुणाच्याही नजरेत भरेल असे व्यक्तिमत्व.

पाहताक्षणीच भुरकटराव आणि मीनाक्षीदेवींना मुलगा पसंत पडला. शाम्भवी अजूनही तयारी करत होती. तिला बाहेर यायला थोडा वेळ होता. मीनाक्षीदेवींनी पाहुण्यांना पाणी देऊ केले. मुलगा उद्गारला "आम्ही मुलगी पाहायला आलोय, पाणीसुद्धा तिच्याच हाताने घेणार".

शाम्भवीने शब्द ऐकले. खुर्चीतून ती उठली. kitchen मधून दुसरा पाण्याचा ग्लास भरून, मान खाली घालून ती मुलासमोर आली.

पाणी देण्यासाठी हात पुढे केला. नवरा मुलगा शाम्भवीला न्याहाळु लागला. बराच वेळ हात पुढे करूनही नवरा मुलगा ग्लास घेत नव्हता. शाम्भवीचे ग्लास घेऊन पुढे केलेले हात दुखू लागले. थरथरू लागले. आणि टप .. टप्पाक्क ...टप्प ...पाण्याचा ग्लास खाली पडला. नवऱ्या मुलाची पॅन्ट आणि shoes भिजले. तो चिडला. शाम्भवीवर जोरात ओरडला. "यु रास्कल...." शाम्भवी घाबरली. भुरकटराव आणि मीनाक्षीदेवी पाहत राहिले. किती हा राग?...

दुसऱ्याच क्षणी नवरा मुलगा शांत झाला. शाम्भवीच्या हातून चहा घेतला. कळवतो सांगून निघून गेला.

मीनाक्षीदेवी:- शाम्भवी... बाळा वाईट वाटलं का तुला?
जास्त मनावर घेऊ नकोस. होत असं कधी कधी...
मुलगा छान आहे. नोकरी सुद्धा चांगली आहे.
भुरकटराव :- हो शाम्भवी... आपल्याला असा मुलगा शोधून सापडणार नाही.

शाम्भवी दोघांच्याही हो ला हो मिळवते.

संध्याकाळची वेळ असते. भुरकटरावांचा फोन वाजतो.
समोरून (फोनवर) :- आम्हाला मुलगी पसंत आहे. देण्या-घेण्याची बोलणी करून पुढच्या महिन्यात लग्नाची तारीख घेऊ.
भुरकटराव:- (आनंदात) ठीक आहे. रविवारी या तुम्ही बोलणी करायला.

रविवारचा दिवस उजाडतो. बरेच दिवस शाम्भवीला ना पाहिल्याने उतावीळ झालेला अवचट सकाळी सकाळी भाजी घेण्याच्या बहाण्याने रस्त्यासमोर येतो. पवळ्याची आई त्याला पाहून घरी बोलावते.
इकडे मीनाक्षीदेवीची आणि भुरकटरावांची घराची सजावट चालू असते.
दारासमोर रांगोळी काढलेली असते.

अवचट:- (पवळ्याच्या घरात जाता जाता) मावशी... आज काय विशेष तुमच्या शेजारी?
पवळ्याची आई:- शाम्भवी ला मुलगा पाहून गेला. आता बोलणी करायला येत आहेत.
अवचट:- (थोडा नाराज होत) म्हणजे?... पसंती वगैरे?
पवळ्याची आई:- हो. मुलाला मुलगी पसंत आहे.
अवचट:- मुलगी तर पसंत पडणारच.... मावशी..... पण मुलीला मुलगा पसंत आहे का?
पवळ्याची आई:- अरे असणारच... खूप छान आहे दिसायला. नोकरी आणि पगार पण चांगला आहे.
अवचट:- ठीक आहे मावशी. येतो मी. भाजी घेऊन जायचं आहे.
(अवचट नाराज होऊन निघून जातो. पवळ्याची आई शांत होऊन त्याच्याकडे पाहत राहते.)

अवचट पवळ्याला फोन करून माहिती देत राहायला सांगतो.
पाहुणे येतात, बोलणी चालू...

मुलाचे वडील:- आमच्या मुलाला मुलगी पसंत आहे. मुलीच काही म्हणणं?
भुरकटराव:- तीच काही म्हणणं नाही.
मुलाचे वडील:- हॉल चा अर्धा खर्च तुमचा राहील. आम्हाला येण्या-जाण्यासाठी गाड्यांचा खर्च म्हणून ५०,०००/- रुपये, मुलाला कपड्यांसाठी १५,०००/- रुपये, एक चैन एक अंगठी एवढीच आमची वाजवी मागणी.
भुरकटराव:- मला थोडा वेळ द्या, चर्चा करायला.
(भुरकटराव आणि मीनाक्षीदेवी आतल्या रूम मध्ये जातात)
भुरकटराव:- (मीनाक्षीदेवींना) हॉल चा अर्धा खर्च पकडला तर कमीतकमी ५०,००० ते ६०,०००, गाड्यांचा खर्च ५०,०००/-, कपड्यांसाठी १५,०००/-, चैन आणि अंगठीचा ५०,०००/- याव्यतिरिक्त आपल्याला शाम्भवीसाठी कपडे, दागिने, जेवणाचा खर्च आणि मानपानाचा खर्च आहेच.
नाही म्हटलं तरी ५,००,०००/- रुपये पर्यंत जाईल बजेट.
मीनाक्षीदेवी:- आपल्या पोरीच चांगलं होत असेल तर आपण काहीतरी खटाटोप करू. तुम्ही आता माघार घेऊ नका.
भुरकटराव:- अहो देवी ... मी आता रिटायर्ड आहे. कमाई नाही. शिल्लक जेमतेम २,००,०००/- रुपयांची असेल. बाकी पैसा कसा उभा करायचा? मीनाक्षीदेवी:- अहो आपण कर्ज घेऊ, माझ्याकडचं सोनं आहे ते मोडू.
भुरकटराव:- तरीही आपल्याला ५,००,०००/- रुपये कसे उभे करता येतील. काही कमी होतील तर बोलून बघतो.
(भुरकटराव बाहेर येत, पाहुण्यांना) नाही म्हणजे मी काय म्हणतो... आमची तेवढी परिस्थिती नाही, एवढा खर्च करायची. आम्ही हॉल चा अर्धा खर्च करतो, पण बाकी गाडी वगैरे चा खर्च तेवढा तुम्ही बघा.

Group content visibility: 
Use group defaults